‘नसण्याच्या भीती’पासून ‘स्मरणरंजना’पर्यंत खूप काही
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 28 September 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Nostalgia स्मरणरंजन

शब्दांचे वेध : पुष्प दहावे

आशालता वाबगावकर गेल्या. माझ्या पिढीसाठी आशालताबाईंचे नाव ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ या गीताशी जोडलेले आहे. अत्यंत मधाळ आवाजात गायलेले त्यांचे हे भावपूर्ण गाणे काळजात एखाद्या कट्यारीसारखे पण कायमचे घुसून बसलेले आहे.

जीवनातला निरर्थकपणा आणि वैयर्थ्य यासोबत मानवाच्या एकूणच अस्तित्वाच्या उपयुक्ततेविषयी, त्यात काही अर्थ आहे का हे शोधण्यासाठी, आणि ज्यांना तो सापडला नाही त्यांनी त्यामुळे केलेल्या कारणमीमांसेसाठी आजवर हजारो पाने लिहिली गेली आहेत. ‘अस्तित्ववाद’ (Existentialism), ‘शून्यवाद’ किंवा ‘विनाशवाद’ (Nihilism) यासारखे -isms, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’सारखी तत्त्वज्ञाने, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’सारखी कवने, दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात आलेल्या परकेपण किंवा एलिअनेशन (alienation)सारख्या वैफल्याच्या भावनेने भरलेल्या लाटा, ही सगळी या निरर्थकपणाच्या शोधाची प्रतीके आहेत. काहींना जीवनात भरपूर रस आणि अर्थ वाटतो – तर काहींना जीवन हे असार आहे, असे वाटते.

आपल्या आयुष्याच्या ग्रंथाचे सार काहीही नाही, एवढे सारे त्यात लिहिलेले आहे, पण ती फक्त निरर्थक बडबड आहे, कशासाठी केली ही सगळी धडपड आत्तापर्यंत आपण, असे आपलेच आपल्याला जेव्हा वाटते, तेव्हा तो आपल्या स्वतःलाच झालेला ‘नॉडस टॉलंझ’ (Nodus Tollens)चा साक्षात्कार असतो. ‘Propositional logic’मधल्या ‘modus tollens’ या संकल्पनेच्या धर्तीवर हा शब्द तयार केला गेला आहे.

Nodus Tollens (noun) : The realization that the plot of your life doesn’t make sense to you anymore—that although you thought you were following the arc of the story, you keep finding yourself immersed in passages you don’t understand, that don’t even seem to belong in the same genre—which requires you to go back and reread the chapters you had originally skimmed to get to the good parts, only to learn that all along you were supposed to choose your own adventure.*

https://www.bkconnection.com/bkblog/jeevan-sivasubramaniam/thoroughly-depressing-word-of-the-day-nodus-tollens

खरेच हे जीवन निरर्थक असते का हो? ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे सत्य की जीवन म्हणजे ‘रैन का है सपना’ हे सत्य?

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

माझे जगण्यावर प्रेम आहे. मी जगण्याचा प्रत्येक क्षण एंजॉय करतो.  पण जगाचे सध्याचे एकूण स्वरूप बघता, कोविडसारख्या मानवनिर्मित महामाऱ्या बघता, अण्वस्त्रयुद्धांचा धोका बघता, पर्यावरणाचा सतत होणारा ऱ्हास बघता हे सारे एखाद दिवशी साबणाच्या फेसाच्या बुडबुड्यासारखे फटकन फुटून तर जाणार नाही ना, अशी हलकीशी धास्तीही मला अनेकदा वाटते. मानवी जमात नष्ट होऊन हे जग, ही पृथ्वी शून्यवत झाली तर काय होईल हे मला माहीत नाही -- पण ही जी धास्ती मला वाटते, माझ्यासारख्या अनेकांना वाटते, तिला इंग्रजीत काय संज्ञा आहे, हे मात्र मला चांगलेच माहीत आहे. शून्याची भीती, काहीही ‘नसण्याची’ भीती, सारे काही संपून जाण्याची भीती. यासाठी ‘oudenophobia’ असा शब्दाप्रयोग केला जातो. प्राचीन ग्रीक भाषेत ‘οὐδέν, ouden’ म्हणजे ‘nothing’ - काही नाही, आणि ‘फोबिआ’ (phobia) म्हणजे भय, धास्ती. ‘An Anthropology of Nothing in Particular’ (2018) यात Martin D. Frederiksen असे सांगतात की, ‘Oudenophobia is the fear of nothingness. It is the fear that may suddenly engulf a person when she or he comes to think of death, and the possible void that follows.’

मृत्यूच्या कल्पनेने आणि त्यानंतर सारे नाहीसे होईल या भीतीखाली वावरणाऱ्या व्यक्तीलाही हा ‘आउडेनोफोबिआ’ झाला असू शकतो. मानवाच्या मूर्खपणामुळे जगाचा विनाश होईल, अशी मला धास्ती वाटते, नैसर्गिक मृत्यूबद्दल मात्र अतिरेकी भीती वाटत नाही.

हे जरी असले तरी मी वर्षातून काही काळ सॅड होतो, हेही सत्य आहे. हा सॅडनेस येण्यामागे एक मानसशात्रीय कारण आहे. सध्या ऋतुपालट होण्याचे दिवस जवळ येत आहेत. आणखी एखाद महिनाभरात पावसाळा पूर्ण संपून हळूहळू थंडी जाणवायला लागेल. दर वर्षी या ऋतुसंक्रमण काळात मला SADची बाधा होते. साधारणपणे संक्रांतीपर्यंत माझा मूड असाच अपसेट असतो. नागपूरच्या ४६-४७ डिग्री तापमान असलेल्या उन्हाळ्यात बिना ए.सी. आणि बिना कुलरचा मी राहू शकतो. साध्या पंख्यानेही माझे काम भागते. दिवस जितका मोठा, लख्ख सूर्यप्रकाशाने चमकणारा, तितका मी खुश असतो. पण एकदा का, दिवस छोटा होऊ लागला, पारा खाली खाली जाऊ लागला की, माझ्या मनावर हळूहळू अवसाद आणि विषण्णतेचे, उदास भावनांचे मळभ जमा व्हायला सुरुवात होते. कडक, तीव्र हिवाळ्यात तर मला कधीकधी ‘डिप्रेशन’ (depression) येऊ लागते. विनाकारणच माझे डोळे भरून येतात, शब्दांत व्यक्त करता येत नाही, अशी हुरहूर, एक प्रकारचा विचित्र अस्वस्थपणा मला बेजार करून सोडतो. हे सारे दरवर्षी नियमाने घडते, मात्र जानेवारीच्या शेवटी शेवटी माझा मूड अचानकच बदलतो आणि एका नव्या आशेचा माझ्या मनात जन्म होतो. मनावर जमलेली उदासीनतेची अभ्रे निघून जातात आणि आता लवकरच उन्हाळा येणार या जाणिवेने मी पुन्हा नॉर्मल होतो.

माझ्या या ‘मूड स्विंग’चे शास्त्रीय कारण आहे, ‘सीझनल अफेटिव्ह डिसऑर्डर’ (Seasonal affective disorder) (SAD, seasonal depression). दरवर्षी ठराविक काळात नैराश्याच्या भावनेने मनस्थिती बिघडणे या प्रकाराला मानसोपचारशास्त्रात ‘Seasonal affective disorder’ (SAD) असे म्हणतात. एकट्या भारतात दर वर्षी एक कोटीहून जास्त लोक असे ऋतुपालटामुळे नैराश्यग्रस्त होतात. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे असे होते. यामुळे थकवा येतो, निराशा येते, कोणाच्या संपर्कात येऊ नये असे वाटते, आणि मुख्य म्हणजे सारे काही ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी मनाची अवस्था होऊन जाते.

Seasonal affective disorder (SAD)

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/seasonal-affective-disorder/symptoms-causes/syc-20364651

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

माझ्या एका मित्राला स्वीडनला उत्तम नोकरी होती. मनासारखे काम होते, भरपूर पगार होता, पण तिथे सूर्यप्रकाश नाही या एका कारणासाठी दोन अडीच वर्षांतच तो तिथून भारतात परत आला. माझ्या ‘SAD’ होण्याला माझे बाकीचे मित्र आणि घरचेसुद्धा कधीकधी हसतात, पण हा मित्र अजिबात हसत नाही, कारण तो म्हणतो की बंद खिडकीच्या काचेतून दिवसातून तास दोन तास दिसणारा आणि मिणमिणत्या दिव्यासारखा भासणारा सूर्य ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हे ‘SAD’ होणे म्हणजे काय, हे चांगलेच कळू शकते.

माणूस ‘oudenophobia’ने ‘सॅड’ म्हणजे दुःखी होऊ शकतो, SADने ‘सॅड’ होऊ शकतो आणि कधीकधी ‘nostalgia’नेही. मी स्वतः तर या ‘नॉस्टॅल्जिया’चा खूप मोठा गिऱ्हाईक आहे. नॉस्टॅल्जिया म्हणजे जुन्या दिवसांची सय येणे. वाफेवर चालणाऱ्या जुन्या रेल्वे इंजिनांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिले की, मी नॉस्टॅल्जिक होतो. कधी गोरक्षणमध्ये गेल्यावर तिथल्या हवेत भरलेल्या शेण आणि गोमूत्राच्या वासाने मला मोझरच्या म्हणजे माझ्या गावातल्या घराचे आणि तिथल्या गोठ्याचे स्मरण होते. अशा अनेक अनेक जुन्या आठवणींनी मी बऱ्याचदा भावव्याकूळ होत असतो. अशा वेळी या सुखद पण हळव्या करणाऱ्या स्मृतींना मी कवी ग्रेसच्या शब्दांत असे सांगतोः

तूं मला कुशीला घ्यावें

अंधार हळू ढवळावा ...

संन्यस्त सुखाच्या कांठीं

वळिवाचा पाऊस यावा

(संध्याकाळच्या कविता/आठवण)

वळिवाच्या पावसाने चिंब भिजवावे, तसेच भिजवण्याचे काम या नॉस्टॅल्जियाच्या स्मृती करतात. त्या अचानक, भर्रकन येतात आणि ओलेगच्च करून पसार होतात.

‘नॉस्टॅल्जिया’ (Nostalgia) हा शब्द सगळ्यांनाच माहीत असतो. जुन्या दिवसांची आठवण येणे, ही भावनाही सार्वत्रिक आहे. मागे पडलेल्या काळातल्या कशाची ना कशाची आठवण आपल्याला येतच असते. त्यात ज्या सुखद आठवणी असतात त्यांनी आपल्याला बरे वाटते, तो आपला विरंगुळा ठरतो. तारुण्याचा जोश आणि कैफ संपल्यावर संपून मनुष्य जेव्हा स्थिरावतो, प्रौढत्वातून उतारवयाकडे वाटचाल करू लागतो, तेव्हा तर या अशा गतकाळाच्या सुखद स्मृतीच आपला साथीदार बनतात.

यालाच मराठीत ‘स्मरणरंजन’ असे नाव आहे. या स्मरणरंजनामुळे मनुष्य भावुक बनतो, हळवा बनतो. डोळे पाणावतात, मनाला एक प्रकारची हुरहूर लागते, काहीतरी चुटपूट लागते. यात काहीच गैर नाही. या स्मरणरंजनाची लाज वाटावी, ओशाळे व्हावे, असे मुळीच आवश्यक नाही. ‘Nostalgia’ होणे, गतस्मृतींनी हळवे होणे यात तुमचे मनुष्यपण दिसून येते. गतकाळातच रमून बसू नये हे खरे आहे. पण गतकाळाच्या स्मरणात अजिबातच वेळ घालवू नये, हेदेखील चूक आहे. भूतकाळातल्या त्रासदायक, वाईट आठवणी काढणे कोणालाच आवडणार नाही, पण सुखद स्मृतींच्या सहवासात वेळ घालवण्यात काय चूक आहे, हे मला कळत नाही. काही काही लोक अशा हळवेपणाला हसतात, नावे ठेवतात. पु. ल. देशपांडे जुन्या आठवणी विकतात, ते ‘nostalgia peddler’ आहेत, असे माझा एक मित्र थट्टेने म्हणत असे. रस्किन बाँडवरही असाच आरोप केला जातो. याला रस्किनने काय उत्तर दिले आहे, ते त्याच्याच शब्दांत वाचा -

All this is pure nostalgia, of course, but why be ashamed of it?  Nostalgia is simply an attempt to try and preserve that which was good in the past... The past has served us : why not serve the past in this way?

(The Old Gramophone, from The Best of Ruskin Bond)

..................................................................................................................................................................

हेही वाचा : गंमत म्हणजे फ्रेंच विंडो जन्माने फ्रेंच नाही आणि खिडकीतला अर्धचंद्र उर्फ डीफेनिस्ट्रेशन

..................................................................................................................................................................

‘Nostalgia’ला या शब्दाच्या आधुनिक अर्थाचे मूळ काही फार जुने नाही. जुनी आहे ती ‘Nostalgia’ची भावना. सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत ‘Nostalgia’ हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे, असेच मानले जात होते. ‘स्मरणरंजन’ या अर्थाने ‘Nostalgia’ची ओळख १९२०च्या आसपास होऊ लागली. हा ‘Nostalgia’ बहुतेक वेळी सुखद असतो आणि क्वचित दुःखदसुद्धा असू शकतो. गत दिवसांच्या आठवणी काढणे, त्यांत रममाण होणे - किंवा ते दिवस आता गेले या जाणिवेने शोकव्याकूळ होणे, जुन्या दिवसांसाठी झुरणे, हे सारे जगात सगळीकडेच होत आले आहे. भवभूतीच्या ‘उत्तर रामचरितम्’ या ग्रंथात अगदी प्रभू रामचंद्रांनासुद्धा ‘nostalgic’ होऊन बोलताना दाखवले आहे - ‘ते हि नो दिवसा गता:’ म्हणजे आमचे जुने दिवस निघून गेले आहेत असे श्रीराम लक्ष्मण आणि सीतेला सांगतात.

“राम : (सास्रम्‌) स्मरामि हंत ! स्मरामि

जीवत्सु तातपादेषु नूतने दारसंग्रहे।

मातृभिश्चिंत्यमानानां ते हि नो दिवसा गता:॥1:19॥

‘Nostalgia’ची भावना ही इतकी प्राचीन आहे. घरापासून, मायदेशापासून, प्रिय व्यक्तींपासून लांब राहणे भाग पडल्यावर त्या वियोगाने तळमळणे, पुन्हा पुन्हा त्यांचे स्मरण होणे हाही ‘नॉस्टॅल्जिया’च आहे. अनेक कवींनी या नॉस्टॅल्जियाला वेगवेगळ्या प्रकारे शब्दबद्ध केलेले आहे.

नमुन्यादाखल हे बघा -

पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं ॥

नको हा वियोग । कष्ट होतात जीवासि (संत ज्ञानेश्वर)

‘हाय रे वो दिना क्यों न आये जा जा के ऋतु लौट आये’ (शैलेन्द्र)

‘याद न जाए, बीते दिनों की

जा के न आये जो दिन

दिल क्यूँ बुलाए उन्हें, दिल क्यों बुलाए’ (शैलेन्द्र)

‘वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, गेले, ते दिन गेले’ (भवानीशंकर पंडित)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे काव्य नॉस्टॅल्जियाचा अत्युत्कृष्ट नमुना आहे.

या गाण्यांनी हळवा न झालेला कोण रसिक असेल?

पी. जी. वुडहाऊसचे ‘मदर्स नी’ हे काव्य बघा -

“He looked upon the city, so frivolous and gay; And,

as he heaved a weary sigh, these words he then did say:

It's a long way back to Mother's knee,

                                  Mother's knee,

                                  Mother's knee:

It's a long way back to Mother's knee,

Where I used to stand and prattle

With my teddy-bear and rattle:

Oh, those childhood days in Tennessee,

 They sure look good to me!

(‘Indiscretions of Archie’ या कादंबरीतून)

आणि ‘Oscar Hammerstein II’च्या ‘ओल् मॅन रिव्हर’ या गाण्याने तर इतिहास रचला आहे -

Let me go 'way from the Mississippi,

Let me go 'way from de white man boss;

Show me dat stream called de river Jordan,

Dat's de ol' stream dat I long to cross

https://en.wikipedia.org/wiki/Ol%27_Man_River

गोऱ्या जमीनदारांच्या जुलमांना कंटाळलेल्या आणि जिथून त्यांना पळवून आणले होते, त्या अफ्रिकेतल्या त्यांच्या मायभूमीच्या आठवणीत झुरणाऱ्या अ‌ॅफ्रो-अमेरिकन म्हणजे अश्वेत गुलामांची कैफियत या गाण्यात आहे. (‘निग्रो’ हा शब्द वापरणे आज योग्य समजले जात नाही, पण त्या काळात या गुलामांना ‘निग्रो’ किंवा ‘निगर’ असेच म्हटले जाई.)

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातून हजारो गरीब भारतीयांना वेठबिगारीसाठी जगातल्या इतर काही देशांत स्थलांतरीत करवले. कागदावर नसली तरी प्रत्यक्षात एक प्रकारची ही गुलामगिरीच होती. यापैकी दक्षिण अमेरिकेतल्या सुरीनाम या देशात अशाच प्रकारे ज्यांना नेण्यात आले, त्या मूळ भारतीयांनी भोजपुरी संगीत आपल्यासोबत तिथे नेले आणि ते अद्यापी जिवंत आहे. आजही तिकडच्या गाण्यांमध्ये मातृभूमी भारतापासून दूर व्हावे लागल्याचे दुःख  व्यक्त केले जाते.

‘There is a strong tradition of songs of separation in Suriname that evolved from the Bhojpuri bideshiya repertoire. “The bideshiya songs are songs of migration – of leaving home and going away to find work. They touch a deep emotional chord among the listeners. There are similar songs that are still sung in Suriname that tell of dislocation, of longing for the loved ones left behind.’

https://www.indiawrites.org/india-and-the-world/surinamese-indians-voyage-nostalgia-rediscovering-roots/

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ऑपेरातल्या जाड्या बाईने गायलेली भैरवी आणि नानंद

..................................................................................................................................................................

‘Nostalgia’ हा शब्द कसा तयार झाला? आणि त्याचा नक्की अर्थ काय? याचा खरा अर्थ आहे ‘होमसिकनेस’ (homesickness). घराच्या आठवणीने व्याकूळ होणे, झुरणे.

लोप पावलेल्या किंवा लोप पावत चाललेल्या परंपरा, कौटुंबिक व्यवस्था, प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यासाठीही दुःखी होऊन उसासे सोडणारे लोक आहेत. या मानसिक अवस्थेला ‘विस्टफुलनेस’ (wistfulness), ‘लाँगिंग’ (longing), ‘पाइनिंग’ (pining), ‘वो’ (woe), ‘यर्निंग’ (yearning), असेही म्हटले जाते.

या शब्दाच्या इंग्रजी व्याख्येनुसार nostalgia is a ‘morbid longing to return to one's home or native country, severe homesickness considered as a disease.’

इंग्रजीत हा शब्द जर्मन भाषेतून आला आहे. जर्मन ‘heimweh’ (home + woe)चे हे शब्दशः रूपांतर. जर्मनमध्ये या शब्दाच्या रचनेसाठी ग्रीक भाषेची मदत घेण्यात आली. ग्रीक algos ‘pain, grief, distress’ (-algia) + nostos ‘homecoming’ असे दोन शब्द एकत्र आणून हा नवीन शब्द तयार करण्यात आला. प्रारंभी हा एक प्रकारचा मानसिक आजार मानला जात असे आणि तो झाल्यावर झुरून मरणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. अगदी सुरुवातीला फक्त स्विस लोकांसाठीच तो वापरला जाई. १८३० सालापर्यंत त्याची व्याप्ती वाढली आणि महिनोन‌्महिने जहाजावर दिवस घालवणारे खलाशी, जन्मठेप भोगणारे कैदी, आणि अफ्रिकेतून आलेले गुलाम यांच्या मनस्थितीसाठीही या शब्दाचा वापर केला जाऊ लागला. स्कॉटलंडहून परदेशी गेलेल्या अनेक स्कॉट सैनिकांना बॅगपाईप या वाद्याचे सूर ऐकून नॉस्टॅल्जियाचा अटॅक येतो असे ‘Penny Magazine’मध्ये १८४०मध्ये नमूद करण्यात आले आहे. घरी परत जायची तीव्र ओढ, जुन्या मित्रमंडळींना भेटण्याची ओढ, ज्यामुळे उत्पन्न होते असा हा एक ‘endemic disease’ म्हणजे प्रदेशनिष्ठ, अंतर्जन्य व्याधी आहे, असे ब्रिटिश वैद्यकिय तज्ज्ञांचे मत होते. अमेरिकेच्या यादवीत (१८६१ ते १८६५च्या गृहयुद्धात) सैनिकांना होणारा नॉस्टॅल्जियाचा रोग हा एक चिंतेचा विषय मानला गेला होता.

आपल्याला ‘नॉस्टॅल्जिया’ या शब्दाचा जो अर्थ माहीत आहे (भूतकाळाविषयी वाटणारी तीव्र ओढ, हळवेपणा किंवा ‘wistful yearning for the past’) तो १९२०च्या आसपास चलनात आला. ‘Empty Nest Syndrome’ (एम्प्टी नेस्ट सिंड्रोम) म्हणजे मोठी झालेली मुले स्वतःच्या पायावर उभे रहायला एकानंतर एक असे आई-वडिलांचे घर सोडून जातात आणि मग ते घर रिकामे होते, त्यावेळी आई-वडिलांच्या मनाची होणारी दुःखी, उदासवाणी स्थिती. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या’ या गाण्यात याचे उत्कट भावचित्रण प्रत्ययाला येते. अशा वेळी आई-वडील हे मुलांनी घरी परतण्यासाठी, त्यांचे बालपण पुन्हा अनुभवण्यासाठी आसुसलेले असतात. हाही एक प्रकारचा ‘नॉस्टॅल्जिया’च आहे. ‘Algia’ म्हणजे शारिरीक दुःख (जसे ‘Neuralgia’). त्याला इलियड महाकाव्याच्या ‘Nestor’ या नायकाचे नाव जोडून ‘nostalgia’ हा शब्द बनवला आहे, असेही एक मत आहे. नेस्टॉर वयोवृद्ध आणि ज्ञानी होता. म्हणून वयस्कांना जिवलगांच्या, विशेषतः अपत्यांच्या विरहातून होणाऱ्या मानसिक यातना म्हणजे ‘नॉस्टॅल्जिया’.

यासाठी ‘केनोप्सिआ’ (Kenopsia) हादेखील प्रतिशब्द आहे. ‘Kenopsia’ म्हणजे ‘the eerie, forlorn atmosphere of a place that's usually bustling with people but is now abandoned and quiet’. सध्या कोविडमुळे शाळा कॉलेजच्या इमारती, बगीचे आणि खेळाची मैदाने ओस पडली आहेत. मुलांनी एरवी गजबजलेली मनोरंजनाची ठिकाणे निर्मनुष्य झाली आहेत. तिथली ती जुनी चहलपहल, तो माणसांचा राबता, तो हास्याने भरलेला आणि आरडओरड्याने निनादणारा परिसर… सारे कसे शांत शांत झाले आहे. हा अजब, भीतीदायक सन्नाटा अनुभवायला मिळाल्यावर आपल्या मनाची जी अवस्था होईल तिचे नाव ‘केनोप्सिआ’.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : तुमच्या कानात ‘इअरवर्म’ घुसला असेल तर तुम्हाला शेक्सपिअर शिव्या देणार नाही!

..................................................................................................................................................................

‘नॉस्टॅल्जिया’ या शब्दाला आणखी काही अतिशय चांगले पर्यायी शब्द आहेत. ‘स्मरणरंजन’ हा आपला पर्याय. ‘स्मरणरंजन’ हा शब्द कोणी तयार केला आणि तो नक्की कधी प्रचारात आला, हे मला सांगता येणार नाही. मात्र nostalgiaला आणखी एक मराठी पर्याय प्रख्यात विचारवंत दिवंगत प्रा. भा. ल. भोळे यांनी सुचवला होता. तो म्हणजे ‘गतकातरता’. हादेखील किती समर्पक शब्द आहे! तोही वापरात आणायला हरकत नाही. (हा संदर्भ पुरवल्याबद्दल श्री. निशिकांत पिंपळापुरे आणि श्री अनिल ल. भोळे यांचे आभार.)

‘हायरेथ्’ (Hiraeth) हा वेल्श भाषेतला याच अर्थाचा एक अतिशय देखणा शब्द आहे. याची मूळ छटा जरी इंग्रजीत आणता येत नसली तरी साधारण अर्थ तोच आहे. ‘Hiraeth’ म्हणजे ‘A homesickness for a home you can't return to, or that never was’. कॉर्निश आणि ब्रेटन या बोलीभाषांत अनुक्रमे ‘hireth’ आणि ‘hiraezh’ असे म्हणतात.

पोर्च्युगीझ संस्कृतीत यासाठी ‘saudade’ (सोदाद) हा प्रतिशब्द आहे.

जॉन कोएनिग (John Koenig) याने ‘The Dictionary of Obscure Sorrows’ (आपल्याला होणाऱ्या छोट्या छोट्या दुःखांची यादी) या नावाची एक अतिशय माहितीपूर्ण वेबसाईट तयार केली आहे. यातली काही दुःखे ही नॉस्टॅल्जियाशी संबंधित आहेत. यामधून मला सर्वांत भावलेला आणि अनेकांना भावेल असा शब्द (आणि दुःख) आहे ‘व्हेलिकर’ (Vellichor). जुन्या पुस्तकांनी भरलेल्या दुकानात गेल्यावर किंवा त्या दुकानासमोरून जाताना व्हेलिकरचा अनुभव होतो. हाही एक प्रकारचा ‘nostalgia’ आहे. आणि मी स्वतः त्याचा अनेक वेळा शिकार झालो आहे. ‘Vellum’ म्हणजे पुस्तक. ‘Ichor’चा या ठिकाणी गंध असा अर्थ करता येईल. (खरा अर्थ वेगळा आहे,) पुस्तकांचा गंध - जुन्या पुस्तकांचा तन मन भारून टाकणारा सुवास म्हणजे ‘Vellichor’. या अद्भुत नॉस्टॅल्जियाचे वर्णन करताना जॉन कोएनिग सांगतो- ‘The strange wistfulness of used bookstores, which are somehow infused with the passage of time — filled with thousands of old books you’ll never have time to read, each of which is itself locked in its own era, bound and dated and papered over like an old room the author abandoned years ago, a hidden annex littered with thoughts left just as they were on the day they were captured.’

जॉन कोएनिग याने शोधून काढलेला आणखी एक नॉस्टॅल्जिया – ‘अनिमॉइया’ (anemoia) - n. nostalgia for a time you’ve never known. तुम्ही जो काळ प्रत्यक्ष कधी पाहिला नाही, त्याच्या आकर्षणाने व्याकूळ होणे. काहींना व्हिक्टोरियन काळातल्या इंग्लंडमध्ये जाण्याची तर काहींना इतर कोणत्या सुवर्णयुगात जायची इच्छा होत असते. किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तिथे शे-दोनशे वर्षांपूर्वी लोक कसे राहत होते, ही बघण्याची तुमची इच्छा आहे. या इच्छेचे जर ‘nostalgia’त परिवर्तन झाले तर तुम्हाला ‘अनिमॉइया’ होतो.

‘Nostalgia fest’ म्हणजे ‘a festival of nostalgia’. आजकाल सगळीकडे ‘रेट्रो’ (Retro) गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे. तीच ही ‘Nostalgia fest’ उर्फ जुन्याची मेजवानी.

या विषयावर अजून बरेच लिहिता येईल, पण सध्या तरी इतकेच पुरे. पण या शिवाय ही आणखीही काही माहिती असू द्या.

एक म्हणजे खोटा, लटका, कृतक नॉस्टॅल्जिया (False nostalgia). तो म्हणजे कथा-कादंबऱ्या, नाटक सिनेमे यात दाखवलेल्या ‘fantasy’ला, काल्पनिक गोष्टींना (विशेषतः सुखकारक, आनंदी, भव्य, इत्यादी) खरे मानून त्यांचा ध्यास घेणे. त्यासाठी ‘झुरणे’ हा ‘False nostalgia’चा प्रकार झाला. झेन ग्रे(Zane Grey)च्या कादंबऱ्या वाचून त्याने वर्णन केलेल्या काल्पनिक वेस्टर्न विश्वाचा, किंवा ज्याला ‘स्पगेटी वेस्टर्न’ (Spaghetti Western) म्हणतात अशा, इटलीत बनलेल्या अमेरिकन वेस्टर्न सिनेमांचा जर तुमच्यावर पगडा बसला तर तुम्ही ‘False nostalgia’चे शिकार व्हाल. (याचे उत्कृष्ट उदाहरण पी. जी. वुडहाऊसच्या ‘The Small Bachelor’ या कादंबरीत सापडते. जन्मात कधी न्यू यॉर्कपासून शंभर मैलांच्या पलिकडे न गेलेला सिग्झ्बी होरॅशिओ वॅडिंग्टन (Sigsbee Horatio Waddington) हा माणूस झेन ग्रेची पुस्तके वाचून पश्चिम अमेरिकेतल्या काऊबॉयच्या सारखे जगता यावे यासाठी कसा ‘false nostalgic’ झाला असतो, हे तुम्हाला तिथे वाचता येईल. अर्थात ही कादंबरी देखील काल्पनिक आहे, हे विसरू नका.) यावरूनच तर ‘Nostalgia isn't what it used to be’ हा वाक्प्रचार अस्तित्वात आला नसेल ना?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दुसरे म्हणजे या सर्व विषयांचा विस्तृत मानसशास्त्रीय अभ्यास केला गेलेला आहे. जिज्ञासूंनी यावरील साहित्य जरूर वाचावे.

आणि सरतेशेवटी - नॉस्टॅल्जियाने व्याकूळ होणे, त्यामुळे स्वतःला भावनिक, मानसिक त्रास करून घेणे, सतत त्याच विचार आवर्तात भोवळत राहणे, स्वतःभोवती खऱ्या-खोट्या दुःखांची भिंत उभी करून स्वतःला त्यात बंदिस्त करून घेणे, हे कितपत योग्य आहे? याचा अतिरेक झाला की, मग मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. या अशा दुःखाच्या स्वनिर्मित भिंतींमागे लपून बसणाऱ्या आणि त्यामुळे स्वतःच स्वतःवर ओढवून घेतलेल्या एकांतवासाच्या शिक्षेचे शिकार ठरलेल्या लोकांसाठी ‘Mauerbauertraurigkeit’ असा शब्द आहे. या जर्मन शब्दाचा उच्चार ‘माओरबाओरट्राओरिगाईट’ असा काहीसा करता येईल. आणि याचा अर्थ ‘wall builder sorrow’ भिंत बांधणाऱ्याचे दुःख असा होतो. हे दुःख खरी भिंत बांधणाऱ्या गवंड्याचे नसणार हे तर उघडच आहे. ‘Mauerbauertraurigkeit’चा अर्थ जॉन कोएनिगच्याच शब्दांत  वाचा -

Mauerbauertraurigkeit : the inexplicable urge to push people away, even close friends who you really like—as if all your social tastebuds suddenly went numb, leaving you unable to distinguish cheap politeness from the taste of genuine affection, unable to recognize its rich and ambiguous flavors, its long and delicate maturation, or the simple fact that each tasting is double-blind.

थोडक्यात काय? स्वतःभोवती काल्पनिक दुःखाच्या मानसिक भिंती बांधू नका - खुल्या, मोकळ्या वातावरणात जगा. नॉस्टॅल्जिक जरूर व्हा, पण वर्तमान आणि भविष्याकडेही बघा.

आज बस, एवढेच!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......