इरफान खानने त्याचा अभिनय एकनिष्ठपणाने जपला, वाढवला आणि त्याला सातासमुद्रापार घेऊन गेला.
संकीर्ण - श्रद्धांजली
अंजली अंबेकर
  • इरफान खान (७ जानेवारी १९६७-२९ एप्रिल २०२०)
  • Fri , 01 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली इरफान खान Irrfan Khan

१.

करोनाने जगण्यावर पसरवलेली अस्वस्थतेची काळी-करडी छाया इरफान खानच्या जाण्याने अधिकच गडद झाली. उण्यापुऱ्या ५३-५४ वर्षांच्या इरफानचं हे काही जाण्याचं वय नव्हतं. आपण आपला वॉरिअर असाच जीवघेण्या दुखण्यातून बाहेर येणार या आशेवर होतो. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा वेग आणि आवेग बघितला तरी कळतं की, आपण लोकप्रियतेच्या निकषात इरफानला न मोजताही तो कितीतरी अधिक पटीने लोकप्रिय होता. हे बहुधा इरफानला माहीत असावं म्हणून त्याचं कलावंतपण तो क्लास आणि मासच्या हिंदोळ्यावर झुलत कधीच ठेवत नव्हता. तो त्याहून खूप आगळावेगळा, अभिनयाला अधिक उंचीवर घेऊन जाणारा आणि प्रेक्षकांच्या जाणिवेला, अभिरुचीला अधिक गहिरी डुब देणारा होता. हो, होता असंच म्हणावं लागेल आता दुर्दैवानं. त्याचे काल-परवाचे चित्रपट आपल्यासोबत आहेत, पण त्याचा उद्याचा चित्रपट आपल्यासोबत नसणार आहे.

इरफान रूढ अर्थानं टॉल, हँडसम हिरोंच्या लोकप्रिय व्याख्येत बसणारा नव्हता. तरी त्याचं असं वेगळं सेक्स अपील होतं. तो आठवला की, मागोमाग त्याचे आरपार बघणारे भेदक डोळे आठवतात आणि त्याच्या डोळ्यातच त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व अलगद सामावल्यासारखं वाटायचं. इरफानच्या डोळ्यांकडे बघताना, त्या नजरेचा वेध घेताना अख्खा ७० मि.मी.चा स्क्रीन त्यांत बंदिस्त होतोय असं वाटायचं. त्याचे हेच डोळे, हीच नजर तो हसताना निर्व्याज व्हायची आणि गंभीर प्रसंगात कारुण्यानं भरून जायची. हे निर्व्याज असण्याच्या आणि कारुण्यानं ओथंबलेपण दाखवण्याच्या तरी त्याच्या कितीतरी तऱ्हा होत्या. त्यात गुंतत जाऊन-बाहेर पडून त्याचं कलावंतपण चांगलंच तावून-सुलाखून निघालं. असं करता करता त्याचा ओव्हरसीज अभिनेत्यापर्यंतचा प्रवास झाला.

इरफानचे अभिनयातील आयडॉल होते- पाश्चात्य चित्रपटातील मार्लन ब्रँडो, रॉबर्ट दि निरो, मार्टिन स्कॉरसीस आणि अल पचिनो; तर भारतातील त्याचे रोल मॉडेल होते- ओम पुरी, नासिरुद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील. या सर्वांच्या अभिनयाने इरफान प्रेरित व्हायचा. यांच्यासोबत इतरांचेही खूप चित्रपट बघणं, वाचन, निरीक्षण व जागतिक चित्रपटांचा निरीक्षणात्मक अभ्यास यातून इरफानमधील ‘फायनेस्ट परफॉर्मर’ आकारास आला. पण त्याने कुणाचीही नक्कल न करता स्वत:ची स्वतंत्र अशी अभिनयाची वाट चोखाळली.

२.

‘इन्फर्नो’ (२०१६) या चित्रपटातील सहअभिनेता ऑस्कर अवॉर्ड विजेता टॉम हँक्स इरफानविषयी म्हणतो- “I am just beguiled by his magic eyes. He has a physicality to him that is so specific and endearing.”

इरफानचा स्क्रीन प्रेझन्स काय जबरदस्त होता, त्याची ती नजर चित्रपटगृहाच्या बाहेर येऊनही आपल्या पाठीच लागलेली असायची. We exactly get caught in his gaze. मला एकदम त्याचा पहिल्यांदा बघितलेला गोविंद निहलानीचा ‘दृष्टी’ आठवतोय. त्यात पंचविशीच्या आसपासचा कोवळा इरफान होता. ‘दृष्टी’मध्ये सुपर हँडसम शेखर कपूर, सुपर सेक्सी आणि टॅलेंटेड डिम्पल, विलक्षण आर्ततेनं गाणाऱ्या किशोरीताई आणि मागे गोविंद निहलानी... असं सगळं दि ग्रेट कॉम्बिनेशन असतानाही कोवळा, भेदरलेला इरफान लक्षात राहिला. इतक्या वर्षानंतरही तो स्पष्ट आठवतोय. त्याचं ते भेदरलेपण, डिम्पलसारख्या अफाट बाईच्या प्रेमात पडण्यातला अंगचोरटेपणा, पण कुठेतरी अशी बाई आपल्या प्रेमात पडलीय याबाबतचं फुशारलेपण, तरीही जात्याच असलेली असुरक्षिततेची भावना आणि हे सगळं त्याच्या सावळ्याशा चेहऱ्यातून सहज सुंदररित्या व्यक्तही झालं. अभिनयाचं मापदंड याहून वेगळं ते काय असतं? इरफानने ते त्याच्या तिसऱ्याच चित्रपटात ‘दृष्टी’मधून सिद्ध केलं होतं. या सगळ्या दिग्गजांच्या मांदियाळीतही स्वतःचा ओंडका मजबूत रोवला होता.

मीरा नायर इरफानबाबत फार महत्त्वाचं आणि नेमक्या बोलल्या – “He didn’t pretend to be anyone else And he was no one else.”

३.

सुरुवातीला इरफानने काही दूरदर्शन मालिकांमध्ये तर काही शॉर्टफिल्म्समध्ये छोटी-मोठी कामं केली. त्यात ‘भारत एक खोज’सारखी ऐतिहासिक, तर ‘बनते-बिगडते’, ‘कहकशां’सारख्याही व्यावसायिक मालिका होत्या. ‘दृष्टी’ करण्यापूर्वी गोविंद निहलानींच्याच ‘पिता’ आणि ‘जझीरे’ या दोन टेलिफिल्ममध्ये इरफानने काम केलं होतं. एनएसडीतून बाहेर पडल्यावर त्याने काही प्रायोगिक नाटकांचे प्रयोगही केले. अशाच कुठल्यातरी प्रयोगाला गोविंद निहलानीही आले होते. त्याचं काम आवडून त्यांनी त्याला टेलिफिल्ममध्ये भूमिका दिली.

इरफानचा जन्म जयपूरच्या व्यावसायिक व सुखवस्तू कुटुंबातला. त्याच्या वडिलांचा टायर बनवण्याचा व्यवसाय होता. वयाच्या सातव्या वर्षी इरफानचा एक अपघात झाला. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे कित्येक दिवस त्याला घरातच बसून राहायला लागलं. शाळेत मुलं त्यावरून त्याला चिडवायची. त्या आघातामुळे इरफानला स्वतःत रमण्याची सवय जडली. हाताच्या वेगवेगळ्या हालचाली करून तो स्वतःला रिझवत असे. इथूनच त्याचं अभिनय प्रेम आकारास आलं. 

महाविद्यालयीन काळात इरफानला थिएटरनं पछाडलं. अभिनय करणं हीच त्याची महत्त्वाकांक्षा बनली होती. पुढे त्याने दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) रीतसर प्रवेश घेतला. एनएसडीमध्ये अभिनयाचं सैद्धांतिक शिक्षण घेतानाच नाटकातील अभिनयाच्या प्रात्यक्षिक शिक्षणाशी इरफानचा जवळून संबंध आला. अभिनयाचं क्षेत्रांतील नवनवीन क्षितिजं त्याला खुणावू लागले.

एनएसडीमध्येच इरफानने जयवंत दळवी यांच्या ‘संध्याछाया’ या नाटकाचा हिंदीतील प्रयोग बघितला. त्यात मनोहर सिंग आणि सुरेखा सिक्री त्या एकाकी पडलेल्या वृद्ध जोडप्यांच्या भूमिका अभिनीत करायचे. दोघांचा अभिनय इरफानला अस्वस्थ करून गेला. नाटक संपल्यावर तो धावतच बॅकस्टेजला गेला आणि मनोहर सिंग यांच्या खांद्यावर डोकं टेकवून लहान मुलासारखा रडला.

इरफानच्या घरांत चित्रपट व नाट्य क्षेत्राबाबत अनुकूल मत नव्हतं. इरफानच्या आईचा त्याने अभिनय क्षेत्रांत जाण्यालाही विरोध होता. त्यांना हिंदी नाचगाणं असणारे चित्रपट अजिबात आवडायचे नाहीत. तशा नाचगाण्यांच्या चित्रपटांत इरफानने अजिबात काम करू नये, अशी त्यांची इच्छा होती.  इरफाननेही आईच्या इच्छेचा मान ठेवला, हे त्याची चित्रपट कारकीर्द बघितल्यावर लक्षात येतंच. 

४.

एनएसडीमध्ये असताना इरफानच्या सुतापा सिकदर आणि मीता वसिष्ठ या दोघी बॅचमेट्स होत्या. तो अंतर्मुख होता, मोजक्या लोकांशी त्याचा संवाद व्हायचा. त्यात त्याची बॅचमेट सुतापा सिकदर होती. पुढे ती दोघे जीवनसाथी बनले. दोघांनी एनएसडीमधून बाहेर पडल्यावर बीबीसीसाठी काही फिल्म्स केल्या. त्यात इरफानने ‘अलविदा’ नावाची फिल्म केली होती. ती बघून युकेस्थित दिग्दर्शक असिफ कापडिया यांनी त्यांच्या ‘द वॉरियर’ (२००१) या चित्रपटासाठी इरफानला निवडलं. या भूमिकेसाठी त्याला प्रतिष्ठेचा BAFTA पुरस्कार मिळाला, समीक्षकांनीही नावाजलं.

तो चित्रपट बघून पाश्चात्य समीक्षकांनी इरफानची तुलना विख्यात अमेरिकन अभिनेता, लेखक व दिग्दर्शक Sean Penn शी केली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीला अशी तुलना होणं, ही इरफानसाठी बहुमानाची बाब होती.

तिथपर्यंत इरफानचा कलावंत म्हणून प्रवास वेगात झाला, परंतु त्यानंतर थोडासा ब्रेक लागल्यासारखं झालं. त्याला महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे नव्वदीच्या दशकातील चित्रपटांचं स्वरूप, त्यातला कचकचीतपणा. त्या गदारोळात इरफान कुठेच बसत नव्हता, बसलाही नाही. काही छोट्या-मोठ्या भूमिका त्याने केल्या, पण त्या भेदक डोळ्यांना साजेसं काही नव्हतं. तो या सगळ्याला कंटाळून राजस्थानला परत जाण्यासाठी निघाला होता, तेव्हा त्याचा एनएसडीचा ज्युनिअर व जवळचा मित्र तिगमांशू धुलियाने त्याला मुंबई सोडण्यापासून परावृत्त केलं आणि सांगितलं की, नॅशनल अवॉर्ड घेतल्याशिवाय परतायचं नाही.

२००३मध्ये तिगमांशू धुलियाने ‘हासील’मध्ये इरफानला महत्त्वाची भूमिका दिली. अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणावर बनलेल्या या चित्रपटांत इरफानने रणविजयची नकारात्मक भूमिका केली होती. ती लोकप्रियता झाली. त्यासाठी त्याला फिल्मफेअरसारखे पारितोषिकही मिळाले. मुख्य म्हणजे ती पाहून विशाल भारद्वाजने इरफानला ‘मकबूल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विचारलं. त्यानंतर अभिनेता म्हणून इरफानचे ‘नो लूकिंग बॅक’ असं झालं.

पुन्हा तिगमांशू धुलियासोबत इरफानने ‘पानसिंग तोमर’ (२०१२) आणि ‘साहिब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स’ (२०१३) हे दोन महत्त्वाचे चित्रपटही केले. ‘पानसिंग तोमर’च्या भूमिकेसाठी इरफानला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि तिगमांशूचे शब्द अक्षरशः खरे झाले.

५.

मकबूल हे शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’चं हिंदी रूपांतर. या मकबूलची भूमिका इरफानने केली. मुळातच कॉम्पलेक्स्ड असणारी ही भूमिका इरफानने ज्या तन्मयतेनं निभावली त्याला तोड नाही. सोबत तब्बूसारखी अप्रतिम अदाकार. दोघांची केमिस्ट्री म्हणजे अभिनयाचे मानदंड स्थापित करणारे क्लासेसच. ‘मकबूल’मध्ये निम्मी (तब्बू) विलक्षण हतबलतेनं, आर्त स्वरांत मकबूल (इरफान)ला शेवटच्या प्रसंगात म्हणते – “मियाँ, क्या सब गुनाह था  मियां…. सब कुछ…. हमारा इश्क तो पाक था ना… इश्क पाक था ना… मियाँ बोलो ना … बोलो ना …” आणि मियाँ (इरफान) तिच्या बाहुंमध्ये लहान मुलासारखा रडायला लागतो. प्रेमातल्या सगळ्या भावना फसवणुकीतील, प्रतारणेतील उद्विग्नतेत परावर्तित होतात आणि वेळ निघून गेलेल्या जगण्याचा आकांत मांडतानाचा इरफान काळीज चिरत जातो.

तब्बूसोबत याच शिद्दतने इरफानने ‘द नेमसेक’ (२००६), ‘लाईफ ऑफ पाय’ (२०१२) आणि ‘तलवार’ (२०१५) हे चित्रपट केले. हे सगळे चित्रपट महत्त्वाचे ठरले.

६.

मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ (१९८७)मध्ये इरफानने भूमिका केली, तेव्हा तो एकोणीस वर्षांचा होता, असा उल्लेख मीरा नायरनेच केला आहे. एनएसडीच्या कुठल्याशा वर्कशॉपमधून त्याची ‘सलाम बॉम्बे’मधील सलीमच्या भूमिकेसाठी निवड केली होती, परंतु प्रत्यक्षात सलीमच्या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या अभिनेत्यापेक्षा इरफानची उंची कितीतरी जास्त होती. तेव्हा त्याला सलीमची भूमिका न देता पात्र लेखकाची छोटीशी भूमिका दिली गेली आणि संकलनात ती भूमिका बरीचशी कापली गेली. त्यामुळे इरफान नाराज झाला. कृष्णा या मुख्य व्यक्तिरेखेसोबत इरफानचा फक्त एक मिनिटाचा प्रसंग आहे.

त्या प्रसंगात तो कृष्णासाठी पत्र लिहीत असतो. त्यात इरफानने जे काम केलंय, तो आजही ‘मेथड अॅक्टिंग’चा सर्वोत्कृष्ट नमुना समजला जातो. मीरा नायरवर ‘सलाम बॉम्बे’मुळे नाराज झालेल्या इरफानला तब्बल १९ वर्षानंतर मीराने ‘द नेमसेक’(२००६)मध्ये अशोक गांगुलीची मुख्य भूमिका दिली. सोबतच २००८ मध्ये ‘न्यूयॉर्क, आय लव्ह यू’ या ११ फिल्मच्या सिरीजमधील मीरा नायरने दिग्दर्शित केलेल्या एका फिल्ममध्येही इरफानने काम केलं.

‘सलाम बॉम्बे’ते ‘द नेमसेक’ हा १९ वर्षांचा अभिनेता म्हणून चढत्या ग्राफचा प्रवास आहे. ‘द नेमसेक’च्या सुरूवातीला अशिमाला, बायकोला अमेरिकेत घेऊन गेल्यावर तिचा बुजरेपणा जावा म्हणून वडिलांच्या मायेने आणि नवथर बायकोच्या प्रेमांत लुब्ध झालेला अशोक इरफानने कमालीचा सादर केला आहे. तो शेवटपर्यंत ऑथेंटिक आणि जेन्युइन वाटत राहतो.

प्रत्येक चित्रपटागणिक, विविध व्यक्तिरेखांसोबत बदलत गेलेला इरफान थोर्थोर अभिनेत्याच्या गणनेत अलगद कधी जाऊन बसला ते समजलंच नाही.

७.

इरफानच्या कारकिर्दीकडे सूक्ष्मपणे नजर टाकल्यावर त्याने भारतीय आणि ओव्हरसीज चित्रपटांमध्ये ठेवलेला समतोल लक्षात येतो. एकीकडे त्याने विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ (२००३)मधील भूमिका केली, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये मान्यता मिळालेल्या अश्विनी कुमारच्या ‘रोड टू लदाख’ (२००३) या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं. इकडे तो अनुराग बसूचा ‘लाईफ इन मेट्रो’ (२००७)मध्ये काम करत होता, तर तिकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर बनणाऱ्या ‘द नेमसेक’ (२००६)चा महत्त्वाचा भाग होता. इरफानने अँग ली (लाईफ ऑफ पाय, २०१२), मायकल विंटरबॉटम (अ मायटी हार्ट, २००७), डॅनी बॉयल (स्लमडॉग मिलेनिअर, २००८) आणि रॉन हॉवर्ड (इन्फर्नो, २०१६), स्वीस बेस्ड दिग्दर्शक अनुप सिंग (किस्सा, २०१३, द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स, २०१६) अशा परदेशी दिग्गजांसोबत तर काम केलं; तसंच बासू चॅटर्जी (कमला की मौत, १९८९), गोविंद निहलानी (दृष्टी, १९८९), तपन सिन्हा (एक डॉक्टर की मौत, १९९०), तिगमांशू धुलिया (हासील, पान सिंग तोमर, साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स), विशाल भारद्वाज (मकबूल, ७ खून माफ, हैदर), निशिकांत कामत (मुंबई मेरी जान, मदारी), अनुराग बसू (लाईफ इन मेट्रो २००६), सुधीर मिश्रा (ये साली जिंदगी,२०११), रितेश बात्रा (लंच बॉक्स, २०१३), शूजीत सरकार (पिकू, २०१५), साकेत चौधरी (हिंदी मीडियम,२०१६), होमी अदजानिया (अंग्रेजी मीडियम, २०२०) या भारतातील दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केलं.

या दिग्दर्शकांचा प्रातिनिधिक उल्लेख केलाय. इरफानने दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये, कितीतरी बीबीसी फिल्म्स, टेलिव्हिजन सिरीज आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे.

८.

अभिनयातील इरफानचं वैविध्यही तितकंच थक्क करणारं आहे. इतकं अफाट काम करूनही भूमिकेत शिरकाव करून व्यक्तिरेखा निभावण्याची एनर्जी तो शेवटपर्यंत टिकवून होता. ‘लाईफ इन मेट्रो’मधील त्याचा मॉन्टी एकदम वेगळा होता. त्याचं जगण्याचं आकलन, टायमिंग आणि सेन्स ऑफ ह्युमर या सगळ्यांना समप्रमाणात घेऊन इरफानने मान्टी अधिक जिवंत, लाईव्हली केला. कोंकणा सेन शर्मासोबतचे त्यातले काही प्रसंग तर चित्रपटाचे माईलस्टोन मानावेत इतके सुंदर लिहिले आणि अभिनित केले गेलेत.

‘लंच बॉक्स’मधील साजन फर्नांडिसची भूमिका मेडिटेटिव्ह होती. त्यात अंडरप्लेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार इरफानने घडवलाय.

‘हैदर’मधील रूहदार जगण्याला उग्र पद्धतीने भिडणारा आहे.

‘ये साली जिंदगी’मधील इरफानने सादर केलेला अरुण अधिक गडद, ग्रे रंगाचा होता.

‘जुरासिक वर्ल्ड’ व ‘अमेझिंग स्पायडर मॅन’मधील इरफान मुलांच्या जवळ जाणारा होता.

‘पिकू’मधील इरफानचा राणा चौधरी अधिक रोमँटिक व उत्फुल्ल वाटला. राणा करताना इरफानने पंचेचाळीशी पार केली होती, पण पिकूनंतर ‘इंटलेक्ट स्त्रियांचा सेक्स सिम्बॉल’, असं त्याला नामनिधान मिळालं.

परवाच्या ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये त्याची शरीरयष्टी बघून जाणवलं नाही, पण मुलीसोबतचा हळवेपणा व्यक्त करताना इरफानचा चंपक बन्सल आतून खचल्यासारखा वाटला. त्याला तसं चित्रपटात बघणं त्रासदायक होतं. आपण कदाचित त्याच्या जगण्याच्या लढ्याच्या शक्यतेतून त्याचा चित्रपट बघत असल्यामुळेही तसं वाटून गेलं असेल असं वाटलं, पण आता तो तडकाफडकी जसा निघून गेला, त्यावरून तो संकेत तर मिळाला नव्हता, असं समजणं जास्त संयुक्तिक वाटतं.

९.

इरफानला देश-विदेशातील अनेक मानसन्मान मिळाले. त्यात भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या अभिनयाच्या राष्टीय पारितोषिकासोबत मानाचा समजल्या जाणाऱ्या ‘पदमश्री’चाही समावेश आहे.

त्याहून इरफानबाबत दोन अधिक महत्त्वाच्या गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. एक म्हणजे इरफानने त्याची कला स्वयंभू धर्मासारखी जपली. तो कधी फार वादांमध्ये अडकला नाही किंवा फार सोशल विधानांच्या जंजाळातही फसला नाही. त्याने त्याचा अभिनय एकनिष्ठपणाने जपला, वाढवला आणि त्याला सातासमुद्रापार घेऊन गेला.

दुसरी म्हणजे शशी कपूर, कबीर बेदी आणि सईद जाफरी यांनी घालून दिलेल्या क्रॉसओव्हर चित्रपटाच्या पायवाटेचं त्याने भक्कम चौपदरी रस्त्यात रूपांतर केलं. हॉलिवूडच्या मेनस्ट्रीम चित्रपटापर्यंत त्याने मजल मारली. यातलं त्याचं कर्तृत्व पुढे कित्येक दशकं लक्षात ठेवण्यासारखं आहे. अभिनयाचं तो स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्यावर कित्येक वर्षं संशोधन होईल. त्याच्या भूमिका बघून अभिनेत्यांच्या कैक पिढ्या घडतील, पण इरफान यात कुठे नसेल. 

१०.

प्रसिद्ध शायर व गीतकार इर्शाद कामिल यांच्या ‘एक महिना नजमों का’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात इरफानने वाचलेली त्यांची एक नज्म आठवते आहे-

“तो वहाँ क्यों हो जहाँ हो,

  इधर आओ,

  सोच की सरहद कि इस तरफ

  रोशनी मोहताज नहीं हैं,

  चांद या सूरज की”

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Anjali Ambekar

Sat , 02 May 2020

अनावधनाने लक्षात असूनही राहून गेला होता.त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.आता समाविष्ट केलंय. पुनश्च धन्यवाद.


Sanjay Pawar

Fri , 01 May 2020

लेख चांगलाच आहे.पण एक गोष्ट खटकली.इरफानने निशिकांत कामत दिग्दर्शित दोन चित्रपटात अभिनय केला होता.त्यापैकी मुंबई मेरी जान मधला गरीब चहावाला समिक्षक कसे विसरतात. दूसरा चित्रपट मदारी.ज्याची निर्मिती इरफानने स्वत:च केली होती व दिग्दर्शन निशिकांतवर सोपविले होते. या दोन्ही चित्रपटांचा अनुल्लेख खटकला.एवढेच.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......