नरेंद्र मोदी : ‘पर्सन ऑफ द इयर’ नव्हे, ‘द ओव्हरअचिव्हर’!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • डोनाल्ड ट्रम्प, पर्सन ऑफ द इयर, 2016
  • Thu , 08 December 2016
  • संपादकीय अक्षरनामा नरेंद्र मोदी Narendra Modi पर्सन ऑफ द इयर Person of the year टाइम Time

‘टाइम’ या लोकप्रिय व प्रतिष्ठित अमेरिकी साप्ताहिकातर्फे निवडल्या जाणाऱ्या ‘पर्सन ऑफ द इयर, २०१६’साठी ऑनलाईन वाचकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कौल दिला होता. रविवारी ऑनलाईन वाचकांचे मतदान थांबवण्यात आले, तेव्हा मोदी यांना पसंतीची १८ टक्के मते मिळाली होती. त्यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले होते. हिलरी क्लिंटन (४ टक्के), रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच विकिलिक्सचे ज्युलिअन असांज (७ टक्के), फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झकरबर्ग (२ टक्के) यांच्यापेक्षा मोदींना जास्त मते मिळाली होती. प्रत्यक्षात काल मात्र टाइमच्या संपादकांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘पर्सन ऑफ द इयर, २०१६’ म्हणून निवड जाहीर केली. संपादकांचा निर्णय अंतिम असल्याने त्या विषयी दुमत व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही.

ऑनलाईन वाचकांची मते महत्त्वाची असल्याचे टाइमने सांगितले असले, तरी ‘पर्सन ऑफ द इयर’साठीचा तो काही एकमेव निकष नसतो. सलग चौथ्यांदा मोदी यांची ‘पर्सन ऑफ द इयर’चा स्पर्धक म्हणून निवड झाली होती. २०१४मध्येही त्यांना ऑनलाईन वाचकांची सर्वाधिक पसंती होती.

२०१०मध्ये फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झकरबर्ग, २०११मध्ये जगभरातील निदर्शनांमध्ये सहभागी झालेले लोक, २०१२मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, २०१३मध्ये पोप फ्रान्सिस, २०१४मध्ये इबोला आजाराविरुद्ध लढणाऱ्यांना, २०१५मध्ये जर्मनीच्या अध्यक्ष एंजेला मर्केल यांची अनुक्रमे ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. २०१४ आणि २०१५मध्ये नरेंद्र मोदी या स्पर्धेत होते. ‘टाइम’ साप्ताहिक १९२७पासून ‘पर्सन ऑफ द इयर’ची निवड करत आहे. ‘चांगल्या वा वाईट कारणांसाठी सर्वाधिक बातम्यांमध्ये राहिलेल्या व्यक्ती’ची निवड या गौरवासाठी केली जाते.

मोदी या वर्षीचे ‘टाइम’चे ‘पर्सन ऑफ द इयर’ होणार हे जणू भारतीय प्रसारमाध्यमांनी आणि मोदीभक्तांनी गृहीत धरले होते; पण ‘टाइम’च्या वाचकांना हे माहीत असते की, दर चार वर्षांनी जी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होते, तिची निवड साधारणपणे त्या वर्षीचा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून केली जाते. जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण केल्या. त्यामुळे दोन्ही वेळा त्यांची निवड ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून केली गेली. आता ही गोष्टही तितकीच खरी आहे की, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्या वर्षीचा सर्वाधिक बातम्यांचा विषय असतो. मग तो चांगला असो वा नसो. जगभर त्या विषयी उत्सुकता असते. त्यामुळे त्याच्या निवडीचे वर्ष हे ‘पर्सन ऑफ द इयर’चेही होते. यात ‘टाइम’चा पक्षपातीपणा नसून असलाच तर नि:पक्षपातीपणाच आहे. मात्र याला काही अपवादही आहेत. म्हणजे हे काही त्रिकालाबाधित विधिलिखित नाही. असो.

त्यामुळे मोदींच्या निवडीचे मांडे खाणाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला खरा, पण त्याला इलाज नाही. मोदी टाइमच्या मुखपृष्ठावर झळकले नाहीत असे नाही. २०१२मध्ये टाइमने ‘मोदी मिन्स बिझनेस -बट कॅन ही लीड इंडिया?’ या नावाने मोदींवर कव्हर स्टोरी केली होती. १८ मे २०१५च्या ‘टाइम’च्या अंकाची कव्हर स्टोरीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीची होती. तिचे नाव होते, ‘व्हाय मोदी मॅटर्स?’ १६ जुलै २०१२च्या टाइममध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहसिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ‘द अंडरअचिव्हर’ ही कव्हर स्टोरी होती. तेव्हा त्यावर बराच गदारोळ झाला होता. मात्र इतका प्रतिकूल शेरा टाइमने अजून मोदींवर मारलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विषयीच्या आशेला अजूनही वाव आहे, हे नक्की.

काल अपेक्षेप्रमाणे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवड केली गेली. त्यानंतर सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे चर्चेला, खरे तर चहाटळकीला सुरुवात झाली. कुणीतरी म्हणाले की, ‘आता ‘पान्चजन्य’ ‘पर्सन ऑफ द इयर’ सुरू करणार’, कुणी म्हणाले की, ‘मोदी काय ट्रम्प काय, दोन्ही आपलेच!’ प्रसिद्ध कादंबरीकार राजन खान हे सहसा राजकीय विषय, नेते यांच्यावर मते व्यक्त करत नाहीत, पण त्यांनी पोस्ट टाकली की, ‘मॅन ऑफ द इअर ही फार क्षुद्र गोष्ट आहे हो, तुम्हाला तर काळाच्याही सीमा नाहीत. तुस्सी ऑल टाईम ग्रेट हो भाया. आमचे अत्रे म्हणायचे ना, गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही न् पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही, अशी भाग्यरेषा आहे तुमची मालक.’

गेल्या दोन वर्षांतील मोदी यांचा कारभार पाहता, त्याचे वर्णन ‘टाइम’च्या धर्तीवर करायचे झाले, तर ‘द ओव्हरअचिव्हर’ असे करावे लागेल. त्यांनी भारतीय मध्यमवर्गाचा कमावलेला विश्वास अजूनही कायम ठेवला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला आजच एक महिना पूर्ण झाला. या महिनाभरात मोदींनी काळा पैसा नष्ट करण्याविषयी आणि नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा द्यावा, यासाठी जी काही आवाहने, आर्जवे केली, त्याला सर्वाधिक प्रतिसाद भारतीय मध्यमवर्गाने दिला. या निर्णयाचा फारसा काही फायदा होणार नाही, असे अर्थतज्ज्ञ सांगत असतानाही मध्यमवर्गाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. ‘मोदी सांगतात तेच प्रमाण आणि आपल्याला जे वाटते तेच खरे’, या न्यायाने नोटांबदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला काय त्रास होतो आहे, याकडेही मध्यमवर्गाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा कितीही गाजावाजा केला, तरी ते ‘ओव्हरअचिव्हर’च ठरणार. मोदींचा संपूर्ण कारभारच ‘ओव्हरअचिव्हर’ पठडीतला असल्याने ‘पर्सन ऑफ द इयर’ त्यांना हुलकावणी देत राहणार, अशीच शक्यता जास्त आहे!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख