अन्नपूर्णा देवी : गगन में आवाज हो रही है झिनी झिनी...
संकीर्ण - श्रद्धांजली
अंजली अंबेकर
  • अन्नपूर्णा देवी (२३ एप्रिल १९२७- १३ ऑक्टोबर २०१८)
  • Mon , 15 October 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली अन्नपूर्णा देवी Annapurna Devi रविशंकर Ravi Shankar

‘सुनता है गुरु ज्ञानी’ कबीराचा हा दोहा मनात आळवत असतानाच शास्त्रीय संगीतातील विविध आलापी मनात फेर धरतात आणि ‘गुरु ज्ञानी’ शब्दाचे स्वर मला थेट अन्नपूर्णा देवींच्या सुरांच्या प्रांतात घेऊन जातात.

अन्नपूर्णा देवी या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या मैहर-सेनिया घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाउद्दीन खान यांची कन्या. त्यांची गणना पहिल्या काही महिला संगीतकारांमध्ये होते. त्या स्वत: सितार, सरोद आणि आता दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सूरबहार या वाद्यामध्ये पारंगत होत्याच, परंतु त्यांनी शास्त्रीय संगीतांतील उपजत ज्ञानांमुळे त्यापेक्षा कितीतरी जास्त वाद्यं शिकवून शास्त्रीय संगीताची परंपरा अधिक समृद्ध केली.

असा लोकविलक्षण सांगितिक प्रवास करणाऱ्या अन्नपूर्णा देवींचा संदर्भ पहिल्यांदा ऐकला तो, पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या मुलाखतीत. अन्नपूर्णा देवी पंडितजींच्याही गुरू माँ. त्या मुलाखतीत वाचलेला संदर्भ मग त्यांना शोधतच गेला आणि त्याच शोधाचा प्रवास थेट भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा अधिक समृद्ध करणाऱ्या मैहर-सेनिया घराण्यानं घडवलेल्या अनेक अष्टपैलू संगीतकारांपर्यंत.

अन्नपूर्णा देवींचा विलक्षण प्रवास त्यांच्या नावाच्या कथेपासूनच सुरू होतो. त्या मैहर बाबा अल्लाउद्दिन खान यांची कनिष्ठ कन्या. त्यांचा जन्म चैती पौर्णिमेच्या, चैत्र महिन्यातील आठव्या दिवशीचा. हा दिवस देवी अन्नपूर्णेच्या पूजेचा असतो, म्हणून मैहरचे राजा ब्रिजनाथ सिंग यांनी बाबा अल्लाउद्दिन खान यांना मुलीचं नाव ‘अन्नपूर्णा’ ठेवण्यास सुचवलं आणि कट्टर मुस्लिम घराण्यात जन्म घेतलेल्या बाबांनी ते मानलंदेखील. तात्पुरतं म्हणून ठेवलेलं ‘रोशन आरा’ हे मुस्लिम नाव मागे पडून ‘अन्नपूर्णा देवी’ हेच नाव कायम झालं.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category/

.............................................................................................................................................

अन्नपूर्णा देवींचा जन्म २३ एप्रिल १९२७ चा. त्या काळाचा विचार करता हे अद्भुतच वाटतं. अन्नपूर्णा देवींची मोठी बहीण जहां आरा हिच्या वैवाहिक आयुष्यात संगीतामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. आणि त्यातच लहानवयात तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अनुभवामुळे बाबांनी अन्नपूर्णांना संगीताचं शिक्षण द्यायचं नाही असं ठरवलं होतं. परंतु अन्नपूर्णांच्या भागधेयात संगीताच्या तारा कधीच्याच छेडल्या गेल्या होत्या. अन्नपूर्णांचे मोठे भाऊ आणि प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खान लहान असताना बाबांनी शिकवलेला राग भैरव सरोदवर वाजवून दाखवत होते, परंतु त्यातल्या काही ताना त्यांना जमत नव्हत्या. बाबा हे बघून प्रचंड रागावले आणि रागाच्या भरात घराबाहेर पडले. काही वेळानं ते घरी परतले, तेव्हा त्या ताना कुणीतरी गाऊन अली अकबरांना शिकवत असल्याचं त्यांना ऐकायला आलं. त्यांनी आत डोकावून बघितल्यावर अन्नपूर्णा ते आपल्या भावाला शिकवत असल्याचं दृश्य बाबांना दिसलं. त्यावेळी अन्नपूर्णांचं वय होतं अवघ्या दहा वर्षांचं. त्या क्षणी बाबांनी अन्नपूर्णांना गंडा बांधला आणि त्यांची  तालीम सुरू केली. पुढे त्या सितार, सुरबहार आणि सरोद या वाद्यांत पारंगत झाल्या.

कालांतरानं त्यांचं लग्न झालं ते पंडित रविशंकर यांच्याशी. त्याची कथाही विलक्षणच. पंडित रविशंकरांचे मोठे भाऊ उदयशंकर हे प्रसिद्ध नर्तक होते. त्यांच्या डान्स ट्रूपमध्ये रविशंकर नृत्य करायचे. एकदा बाबा अल्लाउद्दीन खान त्यांच्या ट्रूपसोबत फ्रान्सला परफॉर्म करायला गेले असताना, तिथं त्यांच्या संगीतानं प्रभावित होऊन रविशंकर यांनी त्यांच्याकडे संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बाबांनी त्यांना नृत्य किंवा संगीत यापैकी एकाची निवड करायला सांगितली. रविशंकर यांनी संगीताची निवड केली आणि युरोपमधील झगझमगाटी आयुष्य सोडून, नृत्याला तिलांजली देऊन बाबांकडे मैहरच्या गहिऱ्या एकांतात सितारची तालीम सुरू केली. त्यात ते रमलेही.

अन्नपूर्णांचीही बाबांकडे तालीम सुरू होती. ते सगळं मनाशी जुळवून त्यांच्या रविशंकरांच्या मोठ्या वहिनीनं बाबांकडे रविशंकर आणि अन्नपूर्णा यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला, हिंदू असून मुस्लिम मुलीशी लग्नाचा प्रस्ताव तोही १९४० च्या सुमारास मांडणाऱ्या रविशंकरांचं कुटुंब आणि कट्टर मुस्लिम असूनही तो मान्य करणारे बाबा थोरच वाटतात. त्यापेक्षाही कलेसाठीचे हे विचार आजही तितकेच अभिनव वाटतात.

अन्नपूर्णा देवींची मोठी बहीण- जहां आराचा अनुभव बघता अन्नपूर्णांची संगीत साधना सुरू राहायची असेल तर हिंदूशी त्यांचं लग्न झालं तरच शक्य आहे, हा बाबांचा या लग्नामागचा विचार होता. त्याच विचारातून अन्नपूर्णा-रविशंकर यांचं १९४१ मध्ये उत्तराखंडमधील उदयशंकरांच्या अल्मोरा येथील अकादमीत लग्न झालं. त्यावेळी रविशंकर २१ वर्षांचे, तर अन्नपूर्णा अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर अन्नपूर्णांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.

सांगीतिक विचारानं अन्नपूर्णा-रविशंकर विवाहबद्ध झाले खरे, पण त्यांची मनं जुळू शकली नाहीत. दोघांच्या व्यक्तिमत्त्वांत मोठा फरक होता. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुरुवातीपासून स्थैर्य आणि सुकून नव्हता. त्यातच १९४२ ला त्यांच्या मुलाचा शुभो शंकरचा जन्म झाला. त्यानंतरही त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत झालं नाही. रविशंकरांच्या विविध प्रेमप्रकरणांमुळे, नात्यातील अनेकविध गैरसमजांमुळे त्याला अधिकच तडे गेले. त्याचा परिणामही अन्नपूर्णांच्या सार्वजनिक मैफलींवर झाला. अन्नपूर्णा-रविशंकर यांनी चार-पाच ठिकाणी एकत्रित सितार वादन केलं. साठच्या दशकातील दिल्ली येथील शेवटच्या एकत्रित वादनांनंतर रविशंकरांच्या सुपर इगोनं दुखावल्या  जाऊन अन्नपूर्णांनी सार्वजनिक ठिकाणी वादन करण्यापासून कायमची फारकत घेतली आणि स्वतः पुरत्या त्या सुरांच्या चिरंतन शोधासाठी मुंबईतील वार्डन रोडवरील आकाशगंगेतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये विजनवासात गेल्या. त्यानंतर अन्नपूर्णांच्या ध्यानस्थ, व्रतस्थ संगीत साधनेनं भारतीय शास्त्रीय संगीतातील अनेक हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम केलं.

अन्नपूर्णा स्वतः सुरबहार या आता दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या वाद्यात पारंगत असूनही त्यांनी इतरही वाद्यं त्यांच्या शिष्यांना शिकवली. त्यात पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित नित्यानंद हळदीपूर यांना बासरी; पंडित बसंत काबरा, आशिष खान, अमित रॉय, रूशीकुमार पंड्या यांना सरोदचं  शिक्षण दिलं; तर पंडित निखिल बनर्जी, संध्या आपटे, लीनता वेझ यांना सितार शिकवली. असे संगीतातील कितीतरी दिग्गज त्यांनी तयार केले. त्यांच्या शिष्यामार्फत त्यांची संगीतविद्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली, परंतु स्वतः अन्नपूर्णा देवींच्या सुरांचा रंग जगाला नंतर दिसला नाही. ते त्यांच्या गूढयात्रेतलं पार्श्वसंगीत बनूनच राहिलं.

एकदा जगप्रसिद्ध संगीतकार जॉर्ज हरीसन आणि यान्नी यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे अन्नपूर्णा देवींचं वादन ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या विनंतीवरून अन्नपूर्णा देवींनी त्या दोघांना त्यांच्या रियाजाच्या वेळी त्यांच्याजवळ बसण्याची परवानगी दिली. यान्नीना काही वैयक्तिक अडचणीमुळे अमेरिकेत तत्काळ परतावं लागलं, पण जॉर्ज हरीसन मात्र त्या भाग्यवंत क्षणाचं लेणं घेऊन परतले.

भारत सरकारनं १९७२ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार बहाल केला, परंतु तो पुरस्कार स्वीकारायला त्या स्वतः गेल्या नाहीत, सरकारला तो त्यांच्यापर्यंत पोचवायला लागला.

वैयक्तिक आयुष्यात अन्नपूर्णा देवीना अनेक दु:खांना सामोरं जावं लागलं. बाबांचा मृत्यू, भाऊ अली अकबर खानचं अकाली निधन, पंडित रविशंकर यांच्यापासून घ्यावा लागलेला घटस्फोट, मुलगा शुभो शंकरचा ऐन तारुण्यात विचित्र परिस्थितीत झालेला अंत इ. रविशंकर यांच्यापासून वेगळं झाल्यावर त्या १९८२ मध्ये सरोद शिष्य व स्ट्रेस मॅनेजमेंटमधील विख्यात तज्ज्ञ रुशीकुमार पंड्या यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. पंड्या यांचं २०१३मध्ये निधन झालं. त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१२ मध्ये पंडित रविशंकरही गेले.

अन्नपूर्णा देवी एवढं दु:खःपचवून अधिकच एकाकी झाल्या होत्या. त्यांनी स्वतःला एवढं मिटवून का घेतलं? आसमंत व्यापून टाकण्याची त्यांच्या सुरांची क्षमता असताना त्यांनी त्यांच्या सूरांना सीमित का ठेवलं? मैहर घराण्याचा समृद्ध वारसा इतरांपर्यंत पोचवणाऱ्या अन्नपूर्णा देवी स्वतः मात्र आकाशगंगेच्या चार भिंतींच्या बाहेर आल्या नाहीत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः अन्नपूर्णा देवीही आपल्याला देणार नाहीत. त्यांनी शिष्यांपर्यंत पोचवलेले सूर झिरपत झिरपत पुढे पिढ्या न पिढ्या भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध करणारच आहेत… अन्नपूर्णा देवींच्या मनात हे सार्थक नक्कीच असेल.… त्यांच्या सुरातून झिरपत गेलेले कित्येक सूर आसमंतात गात आहेत,

गगन में आवाज हो रही है झिनी झिनी…

.............................................................................................................................................

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com                        

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................   

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......