हा देश जमावांच्या झुंडींनी भरत चालला आहे!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 10 July 2018
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama मॉब लिंचिंग Mob Lynching व्हॉट्सअॅप WhatsApp झुंड Crowd

सध्या भारतीय समाजजीवनाला एक अतिशय महत्त्वाची घटना गिळू लागलीय. ही घटना म्हणजे संपूर्ण सामाजिक बलस्थानांवर जनसमुदाय आरूढ होत आहे ही होय. हे जनसमुदाय झुंडींच्या स्वरूपात आहेत. किंबहुना आजच्या भारताचं राजकारणच झुंडीचं राजकारण होत चाललं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे शब्द केवळ आकर्षक घोषणेतले शब्द उरले आहेत. राजकीय सत्ता काबीज करू पाहणाऱ्यांची ती शिडी झाली आहे. हिटलरनं साठ लाख ज्यूंना गॅस चेंबरमध्ये घालून ठार मारलं. त्याला कुणाची साथ होती? तत्कालिन बुद्धिजीवींची. स्टॅलिननंही तीन कोटी निरपराध माणसं ठार केली. पण झालं काय? जगभरच्या विचारवंतांनी त्याचा गौरव केला.

भारत आज समाज, राष्ट्रप्रेम आणि संस्कृती यांना गिळून टाकणाऱ्या देशप्रेम, हिंदूप्रेम नावाच्या महान संकटात सापडला आहे. इतिहासात अशी अवस्था अनेकदा येऊन गेली आहे, नाही असं नाही. त्यामुळे झुंडशाहीची काही लक्षणं आणि परिणाम अनेकांच्या परिचयाचे आहेत. हे समजून घेण्यासाठी या झुंडशाहीला राजकीय अर्थ देण्याचं खरं तर कारण नाही. पण राजकीय जीवन हे पूर्णपणे राजकीय कधीच नसतं. तर ते धार्मिक, नैतिक, आर्थिक, बौद्धिकही असतं. त्यात धर्मश्रद्धा, समजुती, अंधश्रद्धा, अस्मिता, अहंकार यांचाही समावेश असतो.

फार वर्षांपूर्वी प्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी म्हटलं होतं की, ‘मुंबई शहर वाढीच्या रोगानं भरत आहे.’ या विधानात बदल करून असं म्हणता येईल की, ‘आज भारत जमावांच्या झुंडीनं भरत चालला आहे.’ आणि हे कुठल्याही रोगापेक्षा जास्त भयंकर आहे. पण भारतीय बुद्धिजीवी, बुद्धिवादी यांना या घटनेचं फारसं काही वाटताना दिसत नाही. वर्तमानपत्रात रोजच्या रोज बलात्कार, खून, मारपीट यांच्या बातम्या येतात. त्या रोज रोज वाचून इतक्या अंगवळणी पडतात की, त्यांचं काही वाटेनासं होतं. झुंडींच्या घटनाही अशाच ‘साधारण घटना’ व्हायला लागला आहेत. कारण देशभरात कुठे ना कुठे झुंडी आपले पराक्रम बिनबोभाट करत आहेत. आणि त्याच्या बातम्याही बिनबोभाट वर्तमानपत्रांत येत आहेत. जी घटना सातत्यानं घडत राहते, पण त्यावरून देशातले बुद्धिजीवी, बुद्धिवादी किंवा विचारी लोक फारसे काळजी करत नाहीत. त्या घटना फारशा संहारक ठरत नाहीत. प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्या देशभरातल्या बुद्धिजीवी, बुद्धिवादींचा प्रवास मूठभराकडून चिमूटभराकडे होत चालला आहे. किंबहुना तसाच तो झाला आहे. तसा तो व्हावा म्हणूनही काही शक्ती रीतसर प्रयत्नही करत आहेत. मग दुसरं काय होणार?

जमाव, झुंड हे पूर्वी नित्याचे नव्हते. मग ते आत्ताच का नित्याचे झाले आहे? पाचेक वर्षांपूर्वी तर भारताची लोकसंख्या जवळपास आजच्यापेक्षा फार काही कमी नव्हती. आजची लोकसंख्या ‘सव्वासो करोड’ असली तरी ती पाचेक वर्षांपूर्वी १२४ वा १२३ करोड तरी नक्कीच असेल. म्हणजे तेव्हाही जमाव वा झुंडी अस्तित्वात असणारच की! म्हणजे त्या तेव्हा ‘अनियंत्रित’ स्वरूपात नव्हत्या. लहान गटांत किंवा विस्कळीत स्वरूपात होत्या. त्या आपापल्या शहरात किंवा गावात, गल्लीत किंवा आळीत राहत होत्या. त्या फारशा सक्रिय नव्हत्या. किंवा होऊ पाहत नव्हत्या. किंवा त्यांना सक्रिय व्हायला सांगितलं जात नव्हतं. किंवा त्यांना सक्रिय होण्यासाठी कुणी ‘वन्ही’ पेटवत नव्हतं. थोडक्यात त्या निद्रित अवस्थेतील झुंडींच्या निखाऱ्यांवर कुणी फारशी फुंकर घालत नव्हतं. अलीकडे ती घातली गेली. आणि पाहता पाहता त्या झुंडी फुलारल्या. तिच्या ज्वाळांनी हळूहळू मोठा प्रदेश बळकावला आहे. दिवसेंदिवस त्या ज्वाळा प्रदेश बळकावत चालल्या आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

या झुंडींचं नेटवर्क प्रसारमाध्यमांपेक्षा आणि सरकारच्या गुप्तचर विभागांपेक्षाही सक्षम आहे. कारण त्या नेहमी योग्य वेळी योग्य जागी उपस्थित असतात. त्या फारशी शहानिशा करत नाहीत. संवादाला त्यांच्या लेखी फारसं महत्त्व नसतं. सत्य जाणून घेण्याच्या भानगडीत त्या पडत नाहीत. असले रिकामटेकडे उद्योग त्यांना मानवत नाहीत. त्या कृतीला महत्त्व देतात. लक्ष्यभेद हाच त्यांचा प्राधान्यक्रम असतो. घटना (Fact), वास्तव (Reality) आणि सत्य (Truth) यांना ते स्वतंत्रपणे जाणून घेऊ शकत नाहीत. ते त्यांना करायचंही नसतं. ते घटनेलाच वास्तव आणि वास्तवाला सत्य मानतात. आणि मग त्यांच्या पद्धतीनं न्यायनिवाडा करून टाकतात.

झुंडीतली माणसं ही प्रत्येक वेळी संमोहित केलेलीच असतात असं नाही. अनेकदा ती गैरप्रचाराची, गैरसमजुतीची बळी असतात. कधी अफवांमुळे त्यांची माथी भडकतील असंही होतं. कारण झुंडीतली माणसं ही एका उत्कलन बिंदूपर्यंत पोहचलेली असतात. तशी ती पोहचावीत यासाठीच तर झुंड निर्माण केली जाते. किंवा अशा घटना, अफवा पसरवल्या जातात की, माणसांचं जमावात आणि जमावांचं झुंडीत रूपांतर व्हावं. कारण एकदा का माणसांचं झुंडींत रूपांतर झालं की, तिला हवं तसं नियंत्रित करता येतं. किंवा नियंत्रित न करताही त्या अनेकांच्या जीवावर उठतात. त्यांचा बळी घेतात.

झुंडीपुढे कायदा गाढव असतो. लोकशाही निष्प्रभ असते. समतेची, न्यायाची भाषा झुंडींना मान्य नसते. सत्याची चाड कुठल्याच झुंडींना कधीच नसते. मुळात लोकशाही मान्य नसलेल्या, ती जीवनशैली म्हणून न स्वीकारलेल्या कुठल्याही माणसांची झुंड सहजपणे तयार करता येते. ज्या समाजावर लोकशाही थोपवलेली असते, ते ती झुगारून देतात. वेळ मिळेल तेव्हा. संधी मिळेल तशी. लोकशाही ही काही आपापत:च झिरपत जाणारी विचारप्रणाली वा शासनप्रणाली नाही. ती तशी झिरपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. वर्षानुवर्षं करावे लागतात. त्या प्रयत्नांना नियोजनाची, सक्षम अमलबजावणीची जोड द्यावी लागते. ते नसेल तर माणसं मन मानेल तशी वागतात. प्राणीमात्रामध्ये माणसालाच विचार करणारा मेंदू दिला असला तरी विचार न करण्याचं स्वातंत्र्यही दिलेलं आहेच. त्यामुळे बहुतांश माणसं – मग ती शिक्षित असोत, सुशिक्षित असोत किंवा बुद्धिजीवी – एकवेळ जीव देऊ पण विचार करणार नाही, हा प्राणीमात्राचा गुणधर्मच अंगी, उरी बाळगून असतात. अशा मनुष्यप्राण्यांना विचारानं, संस्कारानं सुसंस्कारीत करता येतच असं नाही. बहुतांश वेळा तसे प्रयत्न फोलच ठरतात.

झुंडीमध्ये हुशार माणसं असतात, तशी हुशार नसलेली, म्हणजे अडाणी माणसंही असतात. झुंडींची ध्येय अनेकदा निर्धारित असतात. कुठे काय करायचं याविषयीचे झुंडींचं लक्ष्य ठरलेलं असतं. कारण बहुतांश माणसांना स्वत:चा म्हणून कुठलाच विचार नसतो. इतरांनी दिलेल्या तथ्यावर आपला आपण विचार करून ताबडतोबीनं कुठलीही कृती करू नये, हाही विचार बहुतांश लोकांच्या मनीमानसी वसलेला नसतो. तसे अनुभव त्यांच्या दैनंदिन आयुष्यात फारसे आलेले नसतात. त्यामुळे त्यांना कुणीतरी विचार पंप करावे लागतात. ते विचार विध्वंसक असले की, विध्वंस घडतो आणि विध्वंसक नसले की, लहान-मोठी क्रांती घडते. त्यामुळे झुंडीकडून चांगली आणि वाईट कामं करवून घेणं सहजशक्य असतं.

विचारामागची कृती आणि कृतीमागचा विचार, हा विचारवंतांचा कल्पनाविलास असतो. तो काही झुंडींचा स्वभावधर्म नसतो. झुंडींना विचार करण्याची चैन मानवत नाही. त्या कृतीलाच सर्वश्रेष्ठ मानतात.

दुसरं असं की, हुशार माणसं ही नेहमीच घोषणांचा आहारी जातात. एखाद्या नेत्याची भक्त होतात. अडाणी माणसांचं असं नसतं. ती घोषणांना फारशी भुलत नाहीत. व्यक्तिमाहात्म्यही त्यांना फार चालत नाही. पण जात-धर्म, पैसा या गोष्टी मात्र त्यांना लगेच कळतात. ‘जातीसाठी माती खावी’ इथपासून ‘धर्मासाठी मती खावी’ इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला असतो. त्यामुळे एका मर्यादेनंतर ‘अडाणी माणसं’ आणि ‘शहाणी माणसं’ यांच्यात फारसा फरक राहत नाही. दोघेही एकाच बोटीतले प्रवासी होतात. कारण दोघांनाही जात-धर्म, पैसा, हित, स्वार्थ यांच्या जोरावर फसवता येते. त्यांचे वेळप्रसंगी झुंडीत रूपांतर करता येते.

अशा कुणीतरी विचार पंप केलेल्या झुंडी हे विद्यमान भारताचं वास्तवतथ्य झालेलं आहे. या झुंडींपासून देशाच्या परराष्ट्र मंत्री वाचू शकत नाहीत आणि निरपराध, हातावर पोट असलेले सर्वसामान्य नागरिकही.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Tue , 10 July 2018

सध्याच्या भारतामध्ये हिंदुत्ववादी झुंडींचा अनाचार चालला आहे, हा या लेखाचा विषय असेल तर त्यापासून कोसो दूर असलेली उथळ शेरेबाजी सोडून काहीच यात वाचकाला सापडत नाही. आपण कदाचित विश्वास पाटील यांचे झुंडीचे मानसशास्त्र एवढे एकच पुस्तक वाचून बऱ्याच उड्या मारलेल्या दिसत आहेत. त्या पुस्तकाचेही पुरेसे आकलन आपल्याला झालेले नसावे. स्वतःची अक्कल आपल्याला वापरता येत नाही किंवा अधिकचे वाचन करण्याची आपली कुवत नाही. तरीही तुमच्या हिताची प्रायव्हेट लिमिटेडमधे कौतुक झालेले तुम्हाला पुरेल असे दिसते. तुमच्यासारख्या स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या परंतु चमच्याएवढीही खोली नसलेल्या लोकांपासून देशाला जास्त धोका आहे, खरे तर असेच लोक सध्याच्या सरकारलाही सोयीचे आहे. असे लोक ना प्रश्न धड मांडू शकत, ना टीका धड करू शकत, उत्तरे शोधणे तर दूरच राहिले. असो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख