टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज नॉट द क्वेश्चन अॅट ऑल
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • रामुलुची ‘हिंदू’मध्ये आलेली बातमी
  • Tue , 08 November 2016
  • संपादकीय अक्षरनामा

काल ‘हिंदू’ या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ‘हर बॉडी ऑन पुशकार्ट, मॅन टेक्स वाइफ टु फायनल अबोड’ ही बातमी प्रकाशित झाली. अशा बातम्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये सहसा वाचायला मिळत नाहीत. कारण अशा बातम्यांना मराठी वर्तमानपत्रांमध्ये जागाच मिळत नाही. मिळाली तर ती आतल्या पानात कुठेतरी असते आणि तीही ठळक होणार नाही अशा पद्धतीने. याचा अर्थ मराठी वर्तमानपत्रं फक्त मजेत मश्गुल असलेला आत्ममग्न, आत्मलुब्ध मध्यमवर्गच वाचतो, इतर कुणी वाचत नाही असा बिलकूल नाही. आमच्या वाचकांना काय द्यायचं हे आम्ही ठरवू, असा खाक्या असणारी आणि निवडक लोकांचं हितसंवर्धन करणारी मानसिकता त्याला जबाबदार आहे. असो. तो काही आपला मुद्दा नाही आणि इतरांनी काय करावं हे सांगण्याचाही उद्देश नाही.

… तर ‘हिंदू’तील ही बातमी. रामुलु या निर्धन, कुष्ठरोगी माणसाच्या पत्नीला अनेक आजारांनी ग्रासलं होतं. ती ४ नोव्हेंबर रोजी मरण पावली. आपल्या मूळ गावी, हैदराबादजवळील माईकोड या ठिकणी पत्नीवर अंत्यसंस्कार करावेत अशी रामुलुची इच्छा होती. मात्र पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेला देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. चाळीस वर्षांचा रामुलु कुष्ठरोगी आहे. त्याची बायकोही कुष्ठरोगी होती.  मग त्याने बायकोचा मृतदेह ढकलगाडीवर टाकून गावाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. मात्र ५० किलोमीटर चालून गेल्यावर तो रस्ता चुकला. आणि विकराबादला पोहचला. तेथील स्थानिकांनी व पोलिसांनी त्याला मदत करून त्याच्या गावी पत्नीसह पाठवण्याची व्यवस्था केली.

शेवटी रामुलुचं स्वप्न पूर्ण झालं. तो त्याच्या मूळ गावी पोहचला.

छापून आलेली बातमी एवढीच आहे!

‘हिंदू’मध्ये आलेली ही बातमी दुपारनंतर काही इंग्रजी संकेतस्थळावर दिसायला लागली. एका विदेशी संकेतस्थळावर आणि एनडीटीव्हीवरही ती दिसली.

खरं तर या बातमीतून वा घटनेतून अनेक प्रश्न निर्माण होतात. रामुलुकडे खाजगी रुग्णवाहिकेला देण्याइतके पैसे नव्हते, पण त्याला सरकारी रुग्णवाहिका मिळू शकली नसती का? त्याने ५० किलोमीटरचा प्रवास बायकोचा मृतदेह ढकलागाडीवर ठेवून केला, वाटेत त्याला कुणीच पाहिलं नाही? कुणीच त्याच्या मदतीला कसं गेलं नाही? विकराबादला तो पोहोचल्यावर तेथील पोलिसांनी मृत पत्नी पाहून त्याचीच चौकशी सुरू करून त्याला तुरुंगात टाकलं असतं तर? हा त्या पोलिसांचा सहृदयीपणा की स्थानिकांचा? असे अजूनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. एका सामान्य माणसाची या देशात किती वाईट अवस्था आहे, जागतिकीकरणाने सामान्य माणसाचं जगणं कसं मुश्किल केलं आहे, कुठल्याही सरकारला कसं सामान्य माणसाशी देणं-घेणं नसतं वगैरे वगैरे.

यातले काही प्रश्न नक्कीच योग्यही असतील. काही केवळ फॅशन म्हणूनही उपस्थित केलेले असतील. त्यावर हवी तेवढी चर्चा करता येऊ शकते. राजकीय पक्ष, नेते, समाज, मध्यमवर्ग, सरकार, प्रसारमाध्यमं, अशा अनेक घटकांवर टीका करता येईल.

पण खरी गोष्ट अशी आहे की, रामुलुची पत्नी हे जग सोडून गेली आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे तिला त्याने आपल्या मूळ गावीही नेलं आहे. एव्हाना तिच्यावर अंत्यसंस्कारही झाले असतील. त्यामुळे आपण मोकळे आहोत चर्चा करायला.

ती करायलाही हवी. पण अजून एका गोष्टीचाही आपण विचार करायला हवा. तो म्हणजे माणूस गरीब असो की श्रीमंत, निर्धन असो की सधन, त्याला त्याच्या जन्मभूमीची इतकी ओढ का असते? रामुलुसारख्या निर्धन, रोगी माणसाला आपल्या जन्मभूमीची इतकी ओढ असेल यावर कालपरवापर्यंत फारसा कुणी विश्वास ठेवला नसता. त्याने तसं कुणाजवळ बोलून दाखवलं असतं तरी लोकांनी ते खरं मानलं नसतं. कदाचित त्याने ते सांगितलंही असेल. पण त्याचे मित्र, सहकारी, नातेवाईकही त्याच्यासारखेच निर्धन असणार. त्यांना त्याचं म्हणणंच कळलं नसणार. किंवा रामुलुला हे कुणाला सांगताही आलं नसेल. कदाचित ते त्यालाही माहीत नसेल परवापर्यंत. आपली पत्नी दगावल्यावर तिच्यावर अंत्यसंस्कार आपल्या जन्मभूमीत व्हावेत, ही प्रेरणा त्याला असणार कशी? शेक्सपिअरने म्हणून ठेवलंय की, ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन!’ अगदी तसंच रामुलुचं आयुष्य, त्याच्या मृत बायकोचंही. ज्या जगण्यात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असते, त्यात जन्मभूमीची ओढ वगैरे तात्त्विक विचार कसले सुचणार, असाच प्रश्न बहुतेकांना पडेल.

पण रामुलुने त्या सर्वांची निराशा केली. त्याने प्रसारमाध्यमांसमोर जाऊन कुठलंही आकांडतांडव केलं नाही की, ही व्यवस्था कशी भ्रष्ट आहे, याचा पाढा वाचला नाही. आपल्या दारिद्रयाचा दोष इतरांवरही थोपवायचा प्रयत्न केला नाही. त्याला या गोष्टी करायला वेळही नव्हता. त्याला पत्नीला आपल्या गावी घेऊन जायचं होतं, तिथं तिच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. या एकाच महत्त्वाकांक्षेनं, इच्छेनं, प्रेरणेनं त्याच्या पायात हत्तीचं बळ आलं, तो ढकलगाडी ढकलवत ५० किलोमीटर चालत राहिला. त्याची ही विजीगिषू वृत्ती कोलंबसाच्या तोडीचीच म्हणावी लागेल. कविवर्य कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाची एक कविता आहे. त्यात ते शेवटी म्हणतात – ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा...’ रामुलु हे त्याचं ताजं उदाहरण म्हणावं लागेल.

रामुलु खरंच त्याच्या गावी पोहचला का? पत्नीवर त्याने अंत्यसंस्कार केले का? कधी केले? कसे केले? त्यासाठी त्याच्याकडे पैसे होते की नव्हते? असे अनेक प्रश्न अजून निर्माण केले जातील. त्यांच्या उत्तरांचा मागोवा कदाचित घेतला जाईन न जाईल. पण रामुलुने आपल्या जन्मभूमीवरील प्रेम निविर्वादपणे सिद्ध केलं हे नक्की. त्यासाठी त्याने एक स्वप्न पाहिलं हेही नक्की. ते पूर्ण करण्यासाठी अचाट प्रकारे प्रवास केला हेही नक्की.

या निमित्ताने पडणारा प्रश्न वेगळाच आहे. तो म्हणजे इतक्या सामान्य माणसामध्ये इतकं धाडस, इतकं बळ, इतकं साहस येतं कुठून? तर जन्मभूमीच्या ओढीतून येतं, हे त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल, हे रामुलुच्या उदाहरणावरून म्हणता येईल. माणसाची ‘मोडस ऑफरेंडी’ ही खूप मजेशीर गोष्ट असते. रामुलुचंही तसंच आहे. कोण कुठला रामुलु, त्याने थेट शेक्सपिअरच्या एका वाक्याला त्याच्यापरीने आव्हान देण्याचं धाडस कधी केलं नसतं. त्याच्या मनात तसा विचारही कधी आला नसता. पण ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे शेक्सपिअरचं जगप्रसिद्ध वाक्य निदान रामुलुला तरी अडकवून ठेवू शकलं नाही. उलट त्याच्या कृतीतून हेच सिद्ध झालं की, ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज नॉट द क्वेश्चन अॅट ऑल’!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख