'आजचा सुधारक'चे दयामरण आणि काही प्रश्न
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘आजचा सुधारक’ मासिकाचे काही अंक
  • Thu , 15 June 2017
  • पडघम सांस्कृतिक आजचा सुधारक Aajcha Sudharak दि.य. देशपांडे D.Y. Deshpande श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ Ravindra R. P.

“जगातील दुरिते टिकून राहण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि सर्व प्रकारची दुरिते अधिक समृद्ध व्हावीत, यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते; ती म्हणजे चांगल्या माणसांनी काहीच करावयाचे नसते.” - एडमंड बर्क (१७२९-१७९७)

‘आजचा सुधारक' या मासिकाचा अंत कर्मठ धर्मवादी चौकटीत झालेला नाही. तो नोकरशाहीच्या आडमुठ्या धोरणाने झाला आहे. या समाजात संवादाची माध्यमे भयानक विकसित होऊनही सुसंवादाचा अभाव, हा वैचारिक असहिष्णुतेचा, विवेकहीनतेचा पुरावा असून भारतीय प्रबोधन अजूनही अर्धवट राहिले आहे याच्या या सज्जड खुणा आहेत. 

युरोपात हजार वर्षांचे तमोयुग होते म्हणतात, तसा १० जून २०१७ हा महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातील 'तमोदिन' म्हटला पाहिजे.

एप्रिल १९९० पासून २७ वर्षे चालू असलेल्या 'आजचा सुधारक' या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाचा शेवटचा छापील अंक आणि ई-अंक १० जून २०१७ रोजी  प्रकाशित झाला आणि या मासिकाचा अंत करण्यात आला\झाला! या मासिकाला दयामरण देण्यात आले. मासिकाचे व्यवस्थापन मंडळ, संपादक, संपादक मंडळ आणि वाचक यांच्या इच्छेविरुद्ध हे मरण मासिकावर लादावे लागले.

व्यवस्थापन आणि संपादक मंडळाने अंतिम अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला 'समापन समारंभ' असा शब्द वापरला आहे. संस्कृतमधील 'समापन' शब्दाचा अर्थ 'समाप्त, अंत' असा होतो. 'समारंभ' = सम + आरंभ असा होतो. एकदा आरंभ झाला की ज्याचा आरंभ झाला आहे त्याच्या 'असणे' या वस्तुतथ्यात 'सातत्य' गृहीत धरले आहे. प्रस्तुत संदर्भात 'मासिकाचा अंत असणे हे सतत राहील' ; म्हणजे हे मासिक कायमचे अंत पावले असून ते कधीही पुन्हा सुरू होणार नाही.    

दि.य. देशपांडे यांचे तात्त्विक योगदान

प्रा. दि. य. देशपांडे (जन्म : २४ जुलै, १९१७, मृत्यू : ३१ डिसेंबर, २००५) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक  होते आणि विवेकवादी तत्त्ववेत्ते म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित होते. (यानंतरचा उल्लेख दिय असा राहील.) तत्त्वज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन या जीवनप्रक्रियेचा परिपाक म्हणून अध्ययन आणि अध्यापन या रहाटगाडग्याबाहेर त्यांचे सामाजिक व वैचारिक योगदान काय? हे योगदान दोन प्रकारचे आहे. एकतर, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीय लोकांसाठी; विशेषतः मराठी विद्यार्थी व अध्यापक मंडळींना इंग्लिशमधील अवघड जाणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या काही मूलभूत वैचारिक ग्रंथांचे मराठीकरण केले. वानगीदाखल सांगायचे तर 'देकार्त : चिंतने' (रेने देकार्त या आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक समजल्या जाणाऱ्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या ‘Meditations’ या ग्रंथाचे भाषांतर, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९७४), 'युक्तिवादाची उपकरणे' (मराठी साहित्य संघ, मुंबई, १९७६) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ, आणि १) प्रज्ञावाद २) अनुभववाद आणि ३) कांट ही पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी अचूक माहिती देणारी त्रिखंडी ग्रंथमाला लिहिली. प्रत्येक खंडाची रचना दोन भागात एका विशिष्ट रीतीने केली असून पहिला भाग तत्त्ववेत्त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञान निर्मितीच्या पार्श्वभूमीचा व पूर्वसुरींच्या तत्त्वज्ञानाचा आहे. शक्य होईल तिथे त्यांच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा परिचयही दिला आहे. दुसर्‍या भागात तत्त्ववेत्यांनी आपले तत्त्वज्ञान ज्या ग्रंथात, लघुग्रंथात मांडले, त्यातील त्यांचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणार्‍या मुख्य निवडक वेच्यांचे, उतार्‍यांचे भाषांतर दिले आहे. हे भाषांतर दियंनी केलेले आहे. मराठी वैचारिक सारस्वतात ही अतिशय मौलिक भर आहे.

विवेकवाद (समकालीन विवेकवाद)

दियंनी मराठीतून विवेकवाद मांडला. त्यांच्या विवेकवादाला दोन तात्त्विक आधार होते. पहिला आधार तत्कालिन आधुनिक पाश्चात्य परंपरेतील विवेकवादी तत्त्वज्ञान व विज्ञान यांचा होता, तर दुसरा भारतीय परंपरेतील नवप्रबोधनकार आचार्य गोपाळ गणेश आगरकर (जन्म : १४ जुलै १८५६, मृत्यू : १७ जून १८९५) यांच्या विवेकवादाचा होता.

व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार, अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार आणि जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह,  ग्रंथप्रामाण्य-धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना विरोध करणे, राजकीय व सामाजिक समता, स्वातंत्र्य, मानवनिर्मित विषमतेचा तीव्र निषेध, 'सर्वांना सारखे, मिळेल तितके समान सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे' हे आगरकरांच्या विवेकवादाचे साधारण स्वरूप होते. महाराष्ट्रातीत समाजपरिवर्तनाची प्रक्रिया केवळ विवेक, बुद्धिप्रामाण्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य या पायावरच गतिमान होऊ शकते असे आगरकरांचे मत होते. या साऱ्या समस्या आगरकरांच्या काळात अतिशय उग्र होत्या. त्यामुळे त्या त्यांनी ऐरणीवर घेतल्या.

युरोपात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आलेली भाषिक विश्लेषण चळवळ ही तत्कालिन आधुनिक तत्त्वज्ञानाचा भाग समजली जात होती (आणि आज तिचाच प्रभाव साऱ्या विचारविश्वावर आहे). ही भाषिक विश्लेषण चळवळ आणि इतर वैचारिक प्रवाहांनी, आधुनिक विज्ञानाने संपृक्त झालेला आधुनिक विवेकवाद, पाश्चात्य-युरोपीय विचारविश्वात आणि समाजजीवनात प्रभावी होता. (भारतात आधुनिकतेचे वारे केवळ राजकीय सुधारणांपुरते मर्यादित राहिले होते. म्हणून तर नंतर टिळक-आगरकर वाद झडला.) 

आगरकर स्वयंप्रज्ञ तत्त्ववेत्ते होते, पण त्यांना हे पाश्चात्य विवेकवादी तत्त्वज्ञान उपलब्ध झालेले नव्हते. कारण मुदलातच ते नव्हते. आगरकरांना उपलब्ध नसलेले हे आधुनिक पाश्चात्य विवेकवादी तत्त्वज्ञान दियंना त्यांच्या काळात उपलब्ध झालेले होते. या परंपरेतून भाषिक विश्लेषण चळवळीतून लाभलेली तात्त्विक विश्लेषणाची पद्धती दियंनी आगरकरी आशयाला आणि मांडणीला उपयोजित केली. त्यातून दियंचा स्वतंत्र भारतीय विवेकवाद आकाराला आला.

दियंचा विवेकवादाचा आशय ते पहिल्याच अंकातील 'विवेकवाद' या लेखमालेतील ‘विवेकवाद- १’ या लेखात स्पष्ट करतात : “विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत....'विवेक’ हा शब्द 'reason' इंग्लिश शब्दाला पर्याय म्हणून येथे वापरला आहे. 'Reason' या अर्थी 'बुद्धि' हा शब्दही वापरला जातो, आणि 'rationalism' ला 'बुद्धिवाद' म्हटले जाते. परंतु हे शब्द गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे येथे 'विवेक' आणि 'विवेकवाद' हे शब्द पसंत केले आहेत."    

थोडक्यात, दियंचा विवेकवादाचा आशय आणि विषय भारतीय सामाजिक आणि वैचारिक सुधारणा हा होता आणि मांडणीची पद्धती पाश्च्यात्य होती. आगरकरी विवेकवादाचा पुरस्कार करून भारतीय समाजात चपखल बसणारा अत्याधुनिक पाश्चात्य धाटणीचा व्यापक सुधारणावादी विवेकवाद दियंनी मांडला. या अर्थाने दि.य. हे स्वतंत्र विचारांचे तत्त्ववेत्ते होते. त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती.

तात्त्विक विचारांचे प्रशिक्षण

तात्त्विक विचारांचे प्रशिक्षण महाराष्ट्रीय जनतेला सार्वजनिकरीत्या देण्याचे काम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. सुरेंद्र बारलिंगे, प्रा. मे. पुं. रेगे व प्रा. दि. य देशपांडे यांनी केले, असे म्हणता यावे. प्रा. श्रीनिवास दीक्षित, प्रा. एस. व्ही. बोकील, प्रा. शि. स. अंतरकर इत्यादि इतरही मान्यवरांनी ते केले आहे. पण त्यांचे कार्य अकादमिक क्षेत्रापुरते, त्यांच्या विद्यार्थीवर्गापुरते सीमित राहिले. या सर्वांपेक्षा वेगळे योगदान कॉ. शरद पाटील यांचे आहे. ते रूढ अर्थाने तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी किंवा प्राध्यापक नव्हते. पण शरद पाटील खुद्द तत्त्ववेत्तेच होते.

तर्कतीर्थ रॉयवादी-मार्क्सवादी होते, रेगे तर जवळपास तत्त्वज्ञानात्मक धार्मिक चिंतक होते, सुरेंद्र बारलिंगे यांची नीटशी ओळख महाराष्ट्राला झालेली नाही. त्यांचे भारतीय तत्त्वज्ञानाचे पुनराकलन, भारतीय नीतिशास्त्र आणि भारतीय सौंदर्यशास्त्र यांची जाण वेगळ्या वाटेने जाणारी आहे. त्यांचे दुसरे योगदान म्हणजे त्यांनी निखळ तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानविषयक विचारांना समर्पित झालेली ‘परामर्श’ (मराठी) आणि ‘परामर्श’ (हिंदी) ही स्वतंत्ररीत्या प्रकाशित होणारी त्रैमासिके आणि त्यांचे इंग्लिश भावंड ‘इंडियन फिलॉसॉफीकल क्वार्टरली’ (आयपीक्यू) सुरू केली. प्रा. ग. ना. जोशी यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास’ आणि ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’ असे खंड लिहिले.  

चार्वाक विचारांची आधुनिक ओळख हे आ.ह. साळुंखे, सदाशिव आठवले, राघवेंद्र कुलकर्णी, प्रदीप गोखले, डी. वाय. हाडेकर यांचे योगदान आहे. आ. ह. साळुंखे आणि प्रदीप गोखले यांनी तत्त्वज्ञानेतर नियतकालिकांमध्ये लेखन करून त्यांची मते, नवे विचारप्रवाह तत्त्वज्ञानेतर वाचकांपर्यंत पोहोचवले. पण यांनी नवे नियतकालिक सुरू केले नाही. त्यांनी इतरांची व्यासपीठे वापरली. गोखले ‘परामर्श’चे संपादक राहिल्याने त्यांना ते व्यासपीठही लाभले.

तर्कतीर्थ, रेगे यांनी प्राज्ञपाठशाळा आणि 'नवभारत'चे व्यासपीठ वापरले. त्यामागे केवलानंद सरस्वती यांचे बळ होते. बारलिंग्यांचे विचार अकादमिक वर्तुळात फिरत राहिले. त्यांच्या 'परामर्श' आणि 'आयपीक्यू' यांची पोहोच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राबाहेर गेली नाही. रेग्यांनी तत्त्वज्ञानाचा परिचय दिला, तो तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राबाहेर पोहोचला पण हा परिचय तत्त्वज्ञानाच्या परंपरेच्या चौकटीत राहून झाला. ते तत्त्वज्ञानाचे उत्तम शिक्षक होते. प्रा. दि. य. देशपांडे हे तत्त्वज्ञानाचे जाणकार शिक्षक होते आणि त्यांना त्यांची एक तत्त्वज्ञानाची बैठक होती. म्हणून ते एका अर्थाने 'विचारसरणीचे प्रवर्तक' (School Guru) होते. त्यांनी परंपरेची चौकट सोडून विश्लेषक पद्धतीने तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. 'आजचा सुधारक' हे त्यांचे स्वतंत्र व्यासपीठ होते.

समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद

दियंच्या विवेकवादाला मी 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' (Contemporary Philosophical Indian Rationalism) म्हणेन. आधी 'समकालीन विवेकवाद' (Contemporary Rationalism) ही संकल्पना स्पष्ट करतो. 'समकालीन बुद्धिवाद' ही जिचा आशय अजून नीट भरता येत नाही अशी संज्ञा आहे. त्यामुळे तिचा वापर क्वचितच केला जातो.

विसाव्या शतकात आणि तेव्हापासून पाश्चात्य विचारविश्वात विविध प्रकारचा बुद्धिवाद उदयास येतो आहे. बुद्धिवादाचे मूळ तत्त्वज्ञानात आहे. बुद्धिवाद ही सैद्धान्तिक रचना असते आणि तिला व्यवहारीकतेची जोड असते. विसाव्या शतकात बुद्धिवाद केवळ तत्त्वज्ञान आणि साहित्य या क्षेत्राबाहेर पडून विविध सामाजिक विज्ञाने, मानव्य, कला, संगीत क्षेत्रातून आणि जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायन शास्त्र, भौतिकी विज्ञान, संगणक विज्ञान इत्यादी निसर्ग विज्ञान क्षेत्रातून येतो आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात बुद्धिवादी आविष्कारवाद, बुद्धिवादी फलवाद, भाषिक बुद्धिवाद असे बुद्धिवाद येऊ पाहत आहेत. त्या त्या ज्ञानक्षेत्रात 'यथार्थ सिद्धान्तास आवश्यक असलेला  सुयोग्य युक्तिवाद रचण्यासाठी तर्कशक्तीचा वापर करणे म्हणजे बुद्धीचा वापर करणे' हा त्या संबंधित क्षेत्राचा 'बुद्धिवाद'. 'क्षेत्रीय बुद्धीवादाची निकड' ही जाणीव विशेषतः १९५० नंतर आल्याने 'समकालीन' हे विशेषण १९५० नंतरच्या बुद्धिवादाला उद्देशून वापरले जाते. प्रत्येक ज्ञानक्षेत्रात स्वतंत्र बुद्धिवाद येऊ पाहत असून ढोबळमानाने या साऱ्या समूहाला 'समकालीन बुद्धिवाद' म्हटले जाते. युक्तिवादाचे अनुभवजन्य तर्कावर आधारित समर्थन असे त्याचे संक्षिप्त स्वरूप सांगता येते.              

भारतात असा बुद्धिवाद उदय पावला आहे, यात शंका नाही. पण सामाजिक क्षेत्रातही तो उतरला आहे, असेही नाही. सामाजिक व राजकीय क्षेत्रात तात्त्विक रूपाने महाराष्ट्रात, मराठीत बुद्धिवाद आणण्याचे श्रेय दियंकडे जाते.

दियं 'बुद्धि' आणि हा 'बुद्धिवाद' असे शब्द वापरत नाहीत, तर 'विवेक' आणि विवेकवाद' असे शब्द वापरतात. इथून त्यांच्या फरकाची सुरुवात होते. विवेकाला ते जीवनाचे सूत्र मानतात आणि विवेकी जीवन म्हणजे काय? हा विचार ते विवेकवादाचा केंद्रबिंदू मानतात. ही नवी ज्ञानरचना आहे. ती भारतात, महाराष्ट्रात, मराठीत नवीन आहे. ती १९९० ला मांडली गेली. म्हणून पाश्चात्य अर्थानेही ती 'समकालीन' आहे. ती 'भारतीय' आहे आणि 'तत्त्वज्ञानात्मक' पद्धतीने मांडली, म्हणून तिला 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' हे नाव शोभून दिसते, असे मला वाटते. ही ज्ञानरचना दियंनी 'नवासुधारक/आजचा सुधारक'मधून मांडली. म्हणून 'समकालीन तत्त्वज्ञानात्मक भारतीय विवेकवाद' आणि 'आजचा सुधारक' या दोन फरक करता येणाऱ्या, पण अलग न करता येणाऱ्या एकमेकात गुंतलेल्या वैचारिक कृती आहेत.

 ‘परामर्श’चे विशेषांक 

प्रा. दि.य देशपांडे यांचे विचार सुस्पष्ट करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या 'परामर्श' या तत्त्वज्ञानविषयक मराठी नियतकालिकाने  त्यांच्या हयातीत ‘प्रा. दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन’ या नावाचा विशेषांक दोन खंडांत (अंक १, मे १९९३ आणि ऑगस्ट १९९३, संपादक : सुरेंद्र शिवदास बारलिंगे आणि प्रदीप प्रभाकर गोखले) प्रसिद्ध केला. पहिल्या खंडात दोन विभाग आहेत तर दुसर्‍या खंडात तिसरा विभाग आहे. त्याशिवाय दि.यं.नी अनुवाद केलेल्या लेखांचा वेगळा अंकही ("मूर, रसेल, फ्रेगे", अंक ४ फेब्रुवारी-एप्रिल २००६) 'परामर्श'ने प्रसिद्ध केला.

'आजचा सुधारक'   

दि.य. देशपांडे यांचे मुख्य योगदान 'आजचा सुधारक' च्या रूपात आहे. दि.य. देशपांडे यांनी एप्रिल १९९० मध्ये म्हणजे त्यांच्या त्र्याहत्तराव्या वर्षी जगण्याच्या उत्तरार्धात 'आजचा सुधारक' सुरू केला. त्यांच्या ग्रंथ निर्मितीप्रमाणेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन या जीवनप्रक्रियेचा परिपाक म्हणून त्यांच्या 'आजचा सुधारक' या तात्त्विक कृतीकडे पाहाता येते. 'आजचा सुधारक' हे त्यांनी त्यांच्या विवेकवादी विचारांना दिलेले जणू प्रात्यक्षिक होते.

दिय आणि त्यांच्या पत्नी प्रा. मनुताई नातू हे दोघेही विवेकवादी होते आणि त्यांना आगरकरप्रणीत विवेकवाद मान्य होता. तो त्यांना पुढे न्यायचा होता. 'काहीतरी करावे' असे त्यांच्या मनात असतानाच अचानक मनुताईंचे ०३ एप्रिल १९८८ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ०३ एप्रिल १९९० ला मनुताईंच्या दुसऱ्या स्मृतिदिनाला दियंनी सहकारी मित्रांच्या मदतीने विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे हे मासिक सुरू केले. प्रमुख पाहुणे प्रा. य. दि. फडके, अध्यक्षपदी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी होते. प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर यांनी केले. दियंनी संपादकीय मनोगत, सहकारी लेखक प्रा. भा. ल. भोळे यांनी आपले विचार मांडले तर प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी सभा संचालन केले होते.     

'आजचा सुधारक'चे मूळ नाव 'नवा सुधारक'  होते. ते डिसेंबर १९९० अंकापासून 'आजचा सुधारक' करण्यात आले. नवप्रबोधनकार आगरकर यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचा समकालीन नवा अवतार म्हणून हे मासिक सुरू करण्यात आले. 'नवा सुधारक'च्या पहिल्या अंकाच्या  संपादकीयात दि. य. देशपांडे म्हणतात, 'नवा सुधारक' हा जुन्या 'सुधारक'चा नवा अवतार म्हणून आम्ही पाहात आहोत... आम्ही त्यांचेच काम पुढे चालवीत आहोत, अशी आमची भावना आहे. त्यांनी शंभर वर्षापूर्वी जे करण्याचा प्रयत्न केला, आणि जे त्यांनी मोठ्या प्रमाणात साध्यही केले, तेच कार्य आज आम्ही करीत आहोत... आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वागीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतर ती तशीच आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इ. गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इ. उपासतपासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद अजून पूर्वीइतकेच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघडे आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती, असे म्हणण्याची पाळी आली आहे."

कोणत्या पार्श्वभूमीवर हे मासिक सुरू झाले आणि कोणत्या हेतूने सुरू झाले याची कल्पना या निवेदनामुळे येते. १९९० ची देशाची स्थिती आणि आजच स्थिती यात फारसा फरक पडलेला नाही. 

अशा प्रकारच्या परिस्थितीत समाजाला तत्त्वचिंतनाचे धडे देणे, समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करणे, संवादाचे प्रशिक्षण देणे, वैचारिक उच्चदर्ज्याचे भान देणे हे काम आवश्यक असते. कारण, समाज मूलतः तात्त्विक संकल्पनांनीच घडत जातो. राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादी या तात्त्विक संकल्पनांचे केवळ वाहक असतात. तात्त्विक संकल्पना नीटपणे समजावून घ्यावयाच्या असतील तर समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होणे, ही ज्ञानशास्त्रीय गरज असते. हा तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला तात्त्विक प्रशिक्षणाची गरज असते. या संदर्भात आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड  (१८६१-१९४७) हा ब्रिटिश तत्त्ववेत्ता म्हणतो, "समाजातील सार्वजनिक शिक्षणव्यवस्था जोपर्यंत जनतेत तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत अस्सल लोकशाही समाज निर्माण होऊ शकत नाही. तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ उदात्त भावनांचा एकगठ्ठा कल्लोळ नसतो. कोणत्याही भावनिक प्रक्षोभात चांगले काही होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. तत्त्वज्ञान असे कधीही नसते. तत्त्वज्ञान हे नेहमी मानवी प्रतिभेचे एकाच वेळी समीक्षात्मक आणि परिशीलन करणारे, आशयघन व सामान्य स्वरूपाचे, सर्वांना उपयोगात आणता येईल असे, साधन असते. तत्त्वज्ञानात वस्तुस्थिती, सिद्धान्त, पर्याय आणि आदर्श यांना एकाच पारड्यात समान रितीने तोलले जाते. शक्यता आणि त्यांची वस्तुस्थितीशी केलेली तुलना यांचे ते निरपेक्ष सर्वेक्षण असते." (अॅडव्हेंचर्स ऑफ आयडीयाज १९३३). आता, भारतीय शिक्षणव्यवस्था असा तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करत नसल्याने ते काम 'आजचा सुधारक' सारख्या नियतकालिकावर पडते.    

तत्त्वज्ञान हे नेहमी लोकांकडून लोकांसाठी निर्माण केले जाते. साहजिकच लोकांचेच प्रश्न सोडविणे, हे तत्त्वज्ञानाचे काम असते. एखाद्या सामाजिक प्रश्नाला तात्त्विक प्रश्नाचा दर्जा कधी लाभतो, हाच एक तात्त्विक प्रश्न असतो. राज्य म्हणजे काय ? या तात्त्विक प्रश्नाचे सामाजिक रूप ‘आदर्श राज्य म्हणजे नेमके कोणते राज्य?’ हे आहे. अशा प्रश्नांचे उत्तर कोणत्याही विषयाच्या वर्गात दिले जात नसते. दिले गेलेच तर ती उत्तरे संशयास्पद ठरतील, असे विरोधी वातावरण बाह्य जगतात असतेच. अशा वेळेस कठोर टीका, चिकित्सा आवश्यक असते आणि ती भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या वर्गात शिकवली जात नाही, म्हणून वैचारिक साहित्यावर, साहित्यिकांवर आणि प्रकाशानांवर येते. तेच काम 'आजचा सुधारका' ने विवेकवादाची कास धरून केले.  

वैचारिक प्रकाशनांचा हेतू

वैचारिक नियतकालिके, मासिके इत्यादींचा एक मुख्य हेतू असतो. 'प्रदर्शित विचार अपेक्षित वाचकवर्गापर्यंत पोहोचला आहे, तो रुजला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नवा जीवनाचा आकार निर्माण झाला आहे. किमान संबंधित वाचकांचा जीवनाकार तरी बदलला आहे; पुढे जाऊन त्या वाचकांनी त्यांच्या पुढच्या पिढीला तो विचार दिला आहे, तो देताना समकालीन नवा विचार त्यात समाविष्ट केला आहे आणि मूळ विचार पुष्ट केला आहे', अशा प्रकारे त्या हेतूचे साधारण स्वरूप सांगता येते. आपल्या स्वीकृत विचारांच्या आशयात, घडणीत राहिलेल्या त्रुटी, उणीवा ओळखून त्यांनी सुधारणांच्या जागा नव्या आचार-विचारांनी भरल्या गेल्या आहेत. हे सातत्याने करत राहणे, हे विचारकांचे आणि वैचारिक प्रकाशनांचे नियतकार्य असते.

समाजाच्या सर्वांगीण वैज्ञानिक, भौतिक आणि वैचारिक प्रगतीला अतिशय काटेकोर चिकित्सा आवश्यक असते. एखादी कल्पना अथवा संकल्पना समजावून घेणे हे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच ती तपासणे महत्त्वाचे असते. किंबहुना ती जास्त महत्त्वाची आणि मूलगामी कृती असते. तपासणे याचा अर्थ बदलेल्या तत्त्वज्ञानानुसार ही तपासणी करणे, गतकालीन विचारवंताच्या विचाराचा आजच्या विचाराशी कोणकोणत्या प्रकारे संबंध पोहोचतो, त्याचे ज्ञानात्मक मूल्य काय, त्याची समकालीन प्रस्तुतता कशात शोधात येईल व जोडता येईल हे पाहणे, हे चिकित्सेत अपेक्षित असते. ती गरज हे मासिक पूर्ण करत होते. इतर कोणत्याही वैचारिक मासिकापेक्षा 'आजचा सुधारक'ने हे कार्य अधिक सकसपणे केले आहे. जगण्यातील वेगवान गती लक्षात घेऊन 'आजचा सुधारक' हा 'उद्याचा सनातनी' होऊ नये याची जाणीव ठेवूनच 'आ. सु.’ने अनेक विषय हाताळले. अनेक नवे विचार, नवे परिप्रेक्ष्य मांडले. वाद मांडले. अनेक लेखमाला प्रसिद्ध केल्या. (माझी 'भारतीय वाद पद्धती' ही लेखमालाही ऑगस्ट २०१६ ते फेबुवारी २०१७ दरम्यान प्रसिद्ध झाली. 'भारतीय वाद पद्धतीच्या विधायक पुनरुज्जीवनाची गरज' हा सातवा भाग मार्च २०१७ च्या अंकात अपेक्षित होता.) अनेक विषयावर विशेषांक प्रसिद्ध केले.

दियंनंतर 'आजचा सुधारक'ला लाभलेले सर्व संपादक व संपादक मंडळ दिवाकर मोहनी, प्र. ब. कुलकर्णी, नंदा खरे, संजीवनी कुलकर्णी, अनुराधा मोहनी, प्रभाकर नानावटी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ही मंडळी दि. यं.च्या विचाराने जाणारे, त्यांचा विवेकवाद पुढे चालवणारे होते/आहेत. या साऱ्या कामामुळे आजचा सुधारकचे महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनातील महत्व अधोरेखित होते. 'आजचा सुधारक' मुळे महाराष्ट्रातील बौद्धिक  चळवळी, आंदोलने इत्यादींना तात्त्विक बैठक मिळाली, असेही म्हणता येते.

२७ वर्षे अखंड चालू असलेल्या या मासिकाला पूर्णविराम देण्याचे कारण काय असावे? फेब्रुवारी २०१७ च्या अंकात संपादक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी दिलेल्या निवेदनानुसार आणि 'एबीपी माझा' आणि 'लोकसत्ता' यांच्या वार्तांकनानुसार ‘आ. सु.’ला गेल्या दोनेक वर्षांपासून टपाल विभागाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातून टपाल विभाग व मासिक व्यवस्थापन यांच्यात वाद होऊन ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे आधी नियतकालिक म्हणून निघणारे मासिक गेल्या काही काळात ग्रंथमाला म्हणूनही प्रसिद्ध होत होते. मात्र मासिकाच्या डाक खर्चात मिळणाऱ्या सवलतींवर आलेली बंधने, तसेच इतर व्यवस्थापकीय व आर्थिक अडचणींमुळे शेवटी मासिकाचे प्रकाशन थांबवण्याचा निर्णय ‘आजचा सुधारक’च्या व्यवस्थापनाने जाहीर केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याची चर्चा करण्यावर बंधने येतात. परिणामी अधिक माहिती लोकांना देणे व्यवस्थापनाला आणि संपादकांना शक्य नाही.

मासिक बंद करणे याचा अर्थ त्याला ‘दयामरण’ देणे असा होतो. अशा काही असह्य वेदना होत आहेत की, त्या 'सहन करता येत नाहीत आणि सांगताही येत नाहीत' अशी कोंडी झाल्याने व्यवस्थापनाने या विवेकवादी मासिकाला अखेर नाईलाजाने दयामरण दिले. इथे 'दयामरण' म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे.

दयामरण

दयामरण हे इंग्लिशमधील Euthanasia चे मराठी भाषांतर आहे. या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत असून eu + Thanatos मिळून Euthanasia असा शब्द बनतो. eu म्हणजे सोपे किंवा चांगले आणि Thanatos म्हणजे मृत्यू. म्हणून दयामरण म्हणजे 'सोपे आणि चांगले मरण'. ग्रीक पुराणकथांनुसार Thanatos ही मृत्यूची देवता आहे. एका कथेनुसार ती निद्रा आणि रात्र यांनी मिळून जुळी देवता होते तर अन्य कथेनुसार मृत्यू ही निद्रा आणि रात्रीचा मुलगा अशी जुळी भावंडे आहेत. हे खरेच आहे की मृत्यू म्हणजे निद्रा आणि रात्र यांचा दीर्घ विस्तार मानला जातो. भारतीय तत्त्वज्ञानात (म्हणजे अद्वैत वेदान्तात) निद्रेला लघुमरण म्हंटले आहे. Euthanasia हा शब्द वैद्यकीय अर्थाने सर्वप्रथम फ्रान्सिस बेकनने वापरला होता. विद्यमान ज्ञानक्षेत्रात ही समस्या जैवनीतीशास्त्रात (bioethics) अभ्यासली जाते.    

मरण, मृत्यू ही केवळ संकल्पना नसून ते वास्तव असते. मृत्यूचे ज्ञान होण्याचा क्षण आणि आपल्या नाहीसे होण्याचा क्षण एकच असतो. त्या थेट प्रत्यक्ष ज्ञानाचे दान करण्याआधीच आपण नष्ट होत असल्याने त्या ज्ञानाविषयी केवळ अंदाजच बांधणे शक्य असते. 'मी मरणार आहे' याचे नक्की ज्ञान माणसाला आत्मभान असल्याने होते. या ज्ञानाला इतरांच्या मरणाचा आधार असतो. मानव, मानवेतर प्राणी आणि वनस्पतींच्या अंताला 'मृत्यू' हा शब्द वापरला जातो. पृथ्वीला सजीव मानले जाते, त्यामुळे पृथ्वीच्या मृत्यूचीही कल्पना केली जाते. एखाद्या ताऱ्याला उद्देशूनही 'मृत्यू' शब्द वापरला जातो. मानवनिर्मित समाज, राज्य, पैसा, इमारती, पुस्तके, बल्ब, पेन इत्यादी सामाजिक संस्था आणि वस्तूंना 'मृत्यू' हा शब्द यथार्थाने उपयोजित होत नाही. पण हे फारसे योग्य शब्दयोजन नाही. समाजाचा अंत झाला, राज्य नष्ट झाले, पैसा संपला इ. इ. म्हणता येते.

दयामरण ही निवड

मरण अनिवार्य असले तरी दयामरण ही मात्र निवड असते. रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने मृत्यू देणे म्हणजे दयामरण. ठरावीक काळापासून डॉक्टरच्या सानिध्यात असलेल्या रुग्णाला कमालीच्या असह्य वेदना होत आहेत आणि त्यातून त्याच्या बरे होण्याची पुसटशी देखील शक्यता नाहीच. अशा वेळेस रुग्णाने केलेली कळकळीची विनंती आणि इतर सहकारी डॉक्टरांनी या मुद्द्यावर दर्शवलेली सहमत या आधारावर असे दयामरण देता येते. अशा मरणाला इच्छामरण म्हणतात आणि जर रुग्णाला त्याच्या वेदनांचे भान नसेल आणि त्याची सुटका करायची असेल तर कायद्याच्या चौकटीत नातेवाईकांच्या सहमतीने असे मरण देता येते. जर रुग्णाला वेदनांचे भान नसेल पण सुटका करायची असेल तर त्याला सर्व नैतिक व कायदेशीर बंधने पाळून मरण देणे म्हणजे दयामरण. कधी कधी प्राण्यांना असे दयामरण द्यावे लागते.

रुग्णाची, त्याच्या नातेवाईकांची, मित्रांची, मुख्य म्हणजे कायद्याची आणि नैतिक नियमांची परवानगी न घेता मरण देणे म्हणजे खून करणे. समाजाचा, पुस्तकाचा, झाडाचा खून होत नसतो पण तरीही आपण 'झाडाची कत्तल' म्हणतो. असे शब्द हे भावनेची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरले जातात. मी येथे त्याच तीव्र भावनाभिव्यक्तीसाठी ‘आजचा सुधारक'चे दयामरण" असा शब्दप्रयोग करीत आहे. माझी भावना प्रातिनिधिक आहे, एकमेव मीच केवळ तिचा कर्ताभोक्ता नाही.

आता, 'आ.सु.' मासिकाला पूर्णविराम देण्याचे कारण काय असावे? याची मला दोन करणे दिसतात. पहिले आधी वर नमूद केले आहे ते कायदेशीर कारण म्हणजे टपाल खात्याशी संबधित काही अपरिहार्य तांत्रिक कारणे. दुसरे कारण माझ्या मते अधिक गंभीर आहे.    

‘आ. सु.’च्या ‘विचारभिन्नता विशेषांक’ (ऑगस्ट-सप्टेंबर २०१६)च्या अंकात अतिथी संपादक उत्पल व. ब. म्हणतात, “ ‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. ... भारतामध्ये गेल्या दोन दशकांत विचारभिन्नतेचा प्रवास कसा झाला आहे? एका अर्थी सार्वजनिक चर्चाविश्वात विविध विषयांवर वाद-चर्चा होणे ही आश्वासक गोष्ट आहे, परंतु या चर्चेला विधायक वळण लागण्याऐवजी विघातक वळण लागताना दिसतं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून विरोधी विचार ऐकून घेण्यापेक्षा त्याचं दमन करण्यावरच भर दिला जातो आहे."

या संपादकीयातून दुसरे कारण मिळू शकते. ते तात्त्विक आहे आणि विद्यमान सामाजिक स्थिती अधोरेखित करणारे, त्यावर बोट ठेवणारे आहे. तेच मूळ कारण आहे. ते असे :  

'आ.सु.'ला टपाल खातेरूपी प्रस्थापित व्यवस्थेकडून दमनाला सामोरे जावे लागले. टपाल खाते हे प्रचंड मोठ्या व्यवस्थेचे अनिवार्य अंग आहे. ते ब्रिटिशकालिन असल्याने खाक्यात काम करणारे आहे. तिथे राजकीय प्रभाव फारसा नसला, ते पक्षनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष काम करत असले तरी ती निखळ नोकरशाही आहे. या खात्याला समजूतदारपणा नको आहे, केवळ नियम हवे आहेत, असे दिसते. 'आ.सु.'सारखी मासिके गुळगुळीत सिनेमासिक नाही, त्यापासून कोणतेही उत्पन्न नाही. 'आ. सु.' वितरणासाठी आले काय आणि नाही आले काय, याची दखल घेण्याचे त्यांना महसुली कारण नाही.

आ. सु. ला टपाल खात्याशी संघर्ष करावा लागला, याचे कारण केवळ कायदेशीर तांत्रिक कारण हे नसावे. कोणत्याही भांडणाचे मूळ कारण संवादाचा, संवाद तंत्राचा/कौशल्याचा अभाव आणि विसंवाद मिटवून सामंजस्याकडे नेणाऱ्या मध्यस्ताचा अभाव हे आहे. टपाल खात्याची मूलभूत भूमिका टपाल संकलन आणि वितरण एवढीच आहे. या खात्यात पब्लिक रिलेशन्स ऑफिसर हे पद असले तरी ते कितपत प्रभावी असते, कोण जाणे.

व्यवस्थापन, संपादक आणि टपाल खात्याचे अधिकारी यांच्यात काहीएक चर्चा तरी निश्चित झाली असणार, अनेक वेळाही झाली असणार. पण ती विफल झाली. चर्चा कशी करावी, याचे भान 'आ. सु.'कारांना आहे, यात शंका नाही. पण ती टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांना असेल असे नाही. जी काही चर्चा झाली ती विफल झाली आणि मासिक बंद करण्याचा निर्णय हाच एकमेव पर्याय 'आ. सु.'कारांपुढे उरला. तो कायद्याच्या चौकटीत बसणारा होता.

अनेक कारणांमुळे आधीच रुग्ण झालेल्या या मासिकाच्या वेदना असह्य झाल्या आणि आता मृत्यूची चाह केली पाहिजे, असा निर्णय घेणे भाग पडले. कायद्यानेच मासिक बंद करावे लागले, याचा अर्थ कायद्याच्या चौकटीत झालेला हा वैचारिकतेचा खूनच म्हटला पाहिजे. या मुद्द्यावर दयामरण की खून? असा प्रश्न उपस्थितही करता येईल. खुनाला प्रवृत्त करणे हाही गुन्हाच मानला जातो. म्हणजे तात्त्विक, नैतिक अर्थाने 'आ.सु.’चे मरण हे दयामरण आहे किंवा खून आहे? गेलाबाजार खुनाला प्रवृत्त करणे आहे. उघडच हा गुन्हा नैतिक न्यायालयात चालणार, जे अस्तित्वात नाही!

हे म्हणजे मूळ 'सुधारक'कारांना साजेसे झाले! सनातन्यांनी आगरकरांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. त्याचा परिणाम आगरकरांनी 'फुटके नशीब' हे आत्मचरित्र लिहिले आणि स्वतःच्याच मरण सोहळ्याचे साक्षीदार असल्याचे जाहीर केले. त्याधर्तीवर विद्यमान 'आ.सु.'कारांनाही आपणच देत असलेल्या दयामरणाचे साक्षीदार व्हावे लागले, जाहीर सोहळा करावा लागला!!     

अन्य तात्त्विक कारण असे की, एक मासिक संपले आणि धाड्कन तमोयुग सुरू झाले, असे नाही. आगरकरांनी १८८० साली 'सुधारक' सुरू केले आणि दियं १९९० साली 'नवा/आजचा सुधारक'! तमोयुग एकोणिसाव्या शतकातही होते आणि आज एकविसाव्या शतकातही आहेच. उलट आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने आजचे तमोयुगसुद्धा गतिमान झाले आहे. धर्मवाद्यांनी गेल्या दशकापासून पुन्हा एकदा भारतात, महाराष्ट्रात तमोयुगाचे पुनरुज्जीवन केले आहेच. अमर्त्य सेन, रघुराम राजन यांची हकालपट्टी, गजेंद्रसिंहाचे आरोहण, गडकरी मास्तरांचे विध्वंसन, बंगाल विद्यापीठातील धुडगूस, रोहित वेमुलाची आत्महत्या, दाभोलकर-पानसरे- कलबुर्गी खून, नथुराम गोडसेपूजा, गोवंशमांस प्रकरणी संशयितांचे सामुहिक खूनसत्र, सरकारवर टीका केल्यास द्रोह समजला जाईल, असा आधुनिक 'द्रोहकाल', अनेकांना धमक्या किंवा अन्य असेच काहीही हिंसक व असहिष्णु कारवाया ह्या उदाहरणांनी आपण तमोयुगात जगत आहोत, याची साक्ष मिळते. महाराष्ट्राचे आजचे तत्त्वज्ञान काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला तर फारच केविलवाणी स्थिती होईल.  

'आजचा सुधारक' - एक प्रणाली    

'सत्यकथा' बंद पडली आणि मराठी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले, म्हणून मराठी साहित्यविश्व बेवारस पडले असे नाही, इतर अनेक नव्या नियतकालिकांची सुरुवात झाली, ती स्थिरावली. पण 'सत्यकथा नाही ती नाहीच', असे म्हणावेच लागते. तसे 'आजचा सुधारक' बंद पडले याचा अर्थ त्याची उणीव भासणार ती भासणारच. शिवाय आजचा सुधारक वगळता महाराष्ट्रात इतरही वैचारिक मासिके, नियतकालिके आहेतच की. आजचा सुधारक बंद पडले म्हणून विवेकवादच खलास झाला आणि इतर मासिके, नियतकालिके काहीच करत नाहीत, असे नाही. वैचारिक मासिके महाराष्ट्रात फार आहेत, असे नाही. जी काही आहेत ती तशी मोजकीच आहेत. पण तीही बाजारू मासिकांच्या तुलनेत कमीच आहेत. साहित्यिक प्रकाशनेही फार नाहीतच. त्यांचीही प्रत्येकाची भूमिका आहे, कार्य आहे, कार्यक्षेत्र आहे.

पण त्या नियतकालिकांमध्ये आणि 'आजचा सुधारक'मध्ये काही मूलभूत फरक आहेत. या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट विचारसरणीला वाहून घेणारे, त्यातही विवेकवादी विचारसरणीला वाहून घेतलेले आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव मासिक होते. पाश्चात्य तत्त्वज्ञानात आणि भारतीय चार्वाक तत्त्वज्ञानात ज्याला बुद्धिप्रामाण्यता म्हणता येईल असे विचार  मांडणारे हे मासिक होते. विवेकी जीवन म्हणजे काय? याचे चिंतन हा या मासिकाचा केंद्रबिंदू होता. सामाजिक अर्थाने 'आजचा सुधारक'ला दि.यंनी एका व्यापक बौद्धिक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत 'आजचा सुधारक' ही एक प्रणाली (School) होती. तिच्यात दोष असतीलही, होतेच. पण ती मुख्यतः विचारप्रणाली असल्याने तिचे नसणे म्हणजे एक महत्वाचा तत्त्वविचार नसणे.

१. ज्यांच्यात समाज परिवर्तन घडवायचे आहे त्या वर्गातून सर्व प्रकारचा शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी (विशेषतः शिक्षक-प्राध्यापकवर्ग) वगळला जातो आहे. म्हणूनच तर सर्व पातळीवर बौद्धिक दुष्काळ दिसतो. वैचारिक लेखनाचा वाचकवर्ग नेहमी ज्यांना काही सुधारणा, विचारसरणी मान्य असतात, तेच असतात. म्हणजे सुधारणांना मर्यादा पडतात. ज्यांनी खरेच सुधारावे तो लक्ष्यवाचक वर्ग दूरच राहतो.

२. उदाहरणार्थ, टपाल खात्यात पोस्टमन ते टपाल विभागाचा सचिव, टपाल कार्यालय महानिदेशक, टपाल मंडळाचे अध्यक्ष किंवा स्थानीय, विभागीय अधिकारी मंडळी ही वैचारिक, साहित्यिक किंवा कोणत्याही साहित्याचे वाचक असतात का? की ते केवळ नियम, कायदा, शासनादेश आणि वृत्तपत्रेच वाचतात? त्यांना वाचनासाठी वेळ मिळतो का? हा वेगळा प्रश्न आहे. (ज्याला वेळ नाही, त्याला वाचनाची खाजच असेल तो शौचालयातही तेवढ्या वेळेत वाचन करतो. ती निवांत जागा असते.)   

३. केवळ कर्मचारीच नव्हे तर जे समाज रथ चालवतात ते राज्यकर्तेही वाचक नाहीत, हे महत्त्वाचे दुर्दैव आहे. इथे सामान्य दुर्दैवे आणि महत्त्वाची दुर्दैवे असा फरक मी करतो. वैचारिक साहित्यातून किंवा कोणत्याच साहित्यातून राज्यकर्त्यांपर्यंत विचार पोहोचतच नाहीत. मुळात त्यांना सत्तेशिवाय काही नको आहे, त्यात ते वाचक नाहीत. त्यामुळे ते परिवर्तनाच्या कक्षेबाहेर आहेत. अपवाद असू शकतील.

४. राज्यकर्तेच असे विचारबंद असल्याने त्यांची समग्र नोकरशाहीसुद्धा विचारबंदच राहणार यात शंका नसावी. मग अशा मानसिक-वैचारिक घडणीचे नोकर वैचारिक साहित्याला मदत का करतील!?     

५. 'लोकसत्ता'तील लेखात नंदा खरे म्हणतात, "सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ‘प्रगत’ देश मदांध होत गेले आहेत. त्यांना आव्हान मात्र पर्यायी अर्थविचारांतून न येता धार्मिक मूलतत्त्ववादाकडून दिले जात आहे! यामुळे जगभरात धर्माचे आकर्षण वाढत आहे आणि त्याचा पाया वस्तुनिष्ठता नसून श्रद्धा हा आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद नवउदारमताइतकाच असहिष्णु असतो! " या निष्कर्षाप्रत यावे लागते, कारण 'विचारवंत मारला, विचाराचे व्यासपीठ मारले तरी विचार मरत नाहीत', हा पुरोगामी, सुधारणावादी मंडळी इत्यादींचा दावा असतो. तो खराही असतो. पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जाते. विचारात सातत्य राखले जातेच असे घडत नाही, सातत्य धर्म, श्रद्धा, कर्मकांडे, अंधविश्वास यात आणि धंद्यात घडते. विचारात, विचारवंत निर्माण होण्यात सातत्य घडत नाही. कारण प्रत्येक विचारवंत एकमेव राहण्याचाच प्रयत्न करतो. तो आपला उत्तराधिकारी निर्माण होवू नये, आपले एकमेकावाद्वितीयत्व अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.       

६. शिक्षक-प्राध्यापकवर्गाचा विवेकवाद किमान भारतात तरी नेहमीच संशयास्पद राहिला आहे. वाचक ते साहित्य निर्माता या भूमिकेत तो वावरत आला आहे. पण त्यात पारदर्शकतेचा अभाव आहे. परिणामी व्यावसायिक आचारसंहितेचा अभाव आहे.

७. सध्या प्राध्यापक-शिक्षक काय करतात? गेल्या दशकात हा वर्ग प्रकाशक, वितरक बनून थेट साहित्यनिर्माता झाल्याने त्याच्या सर्व साहित्यव्यवहाराला लाभदायक आर्थिक परिमाण मिळाले. आणि धंदेवाईक आर्थिकता नेहमीच संशयास्पदता गडद असते. असो, म्हणजे नसो! (स्वतंत्र लेखाचा विषय आहे हा.)

८. वैचारिक नियतकालिकांमध्ये परस्परांमध्ये काहीएक संवाद असतो का? तसे काही अधिवेशन, परिसंवाद आजपर्यंत आयोजित केला गेला आहे, याचे पुरावे उपलब्ध आहेत का? साहित्य संमेलन हा परस्पर संवादाचा पुरावा होऊ शकतो का? या नियतकालिकांचा दबावगट निर्माण होवू शकतो का?

९. साहित्यिक (लेखक, कवी, नाटककार इत्यादी आणि समीक्षक इत्यादी लेखनकर्मी) आणि प्रकाशक यांच्यात आर्थिक, वैचारिक साहचर्य खरेच असते काय?

१०. वाचक हा साहित्य व्यवहारातील 'साहित्याचा आस्वादक' याच भूमिकेत असतो. त्याला साहित्य व्यवहारातील अर्थकारण, हितसंबंधी मित्रवर्तुळे खरेच परिचित आहे का? (मी गटबाजी म्हणत नाही. कारण तीच मला टाळायची आहे; म्हणजे आपणा सर्वांना टाळायची आहे.)    

११. वाचक, साहित्यिक, प्रकाशक व समीक्षक यांच्यात एक समाज दर्शन घडवणारी किंवा समाज परिवर्तन करणारी किंवा त्याचे एखादे तरी कारण ठरणारी एक सामाजिक संस्था म्हणून सेंद्रिय एकता आहे का?

१२. समाजावर, शासनावर तातडीने किंवा संथ गतीने परिणाम करणारा प्रभावी घटक म्हणून केवळ वृत्तपत्रे, वाहिन्या इत्यादी माध्यमेच आहेत. त्यांना चारपैकी एक खांब म्हणून त्यांची पोहोच सर्वदूरवर असते, हे खरेच. पाचवा खांब (Fifth Estate) म्हणून समाजमाध्यमे पुढे येत आहेत. पाचवा स्तंभ ही संकल्पना लवचिक आहे. १९३२ साली ‘दि टाईम्स’ या लंडनच्या दैनिकाने रेडिओला पाचवा स्तंभ म्हटले, तर १९५५ च्या दरम्यान कामगार संघटना या पाचवा स्तंभ होत्या. आज अनुदिनी (ब्लॉग), संकेतस्थळ, व्हाट्सअॅप इत्यादी ऑनलाईन समाजमाध्यमे आणि विकीलीक्स यांना पाचवा स्तंभ म्हटले जाते. २०१३ साली आलेल्या ‘दि फिफ्थ इस्टेट’ या चित्रपटाने पाचवा स्तंभाचे चित्रण केले. या स्तंभाने चौथ्या स्तंभाची चिकित्सा करणे हे धोरण स्वीकारले. त्या समाजातील 'पंडित' जनांचा समावेश होता. या पंडितांनाच नंतर सहावा स्तंभ म्हटले जाऊ लागले.

१३. विद्यमान काळात लोकशाहीच्या या सर्व स्तंभांना वैचारिक आशय द्रव्य पुरवणारी 'विचार टाकी' (Think Tank) म्हणून साहित्य निर्माते किंवा एकूण साहित्यविश्वच मुदलात कोणती भूमिका बजावत आहे? बजावत असतील त्याचा परिणाम झालेले समाज गट कोणते? आजचा सुधारक, समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, विचारशलाका, परिवर्तनाचा वाटसरू, आकलन ही वानगीदाखल वैचारिक नियतकालिके पाहा. शब्द, प्रतिष्ठान, नवाक्षर दर्शन इत्यादी साहित्यिक नियतकालिकांमधील लेखनाने कोणते बळ कुणाला पुरवले आहे? ज्ञानसत्ता विरुद्ध अर्थसत्ता असा संघर्ष प्राचीन काळापासून चालू आहेच. पण ज्ञान ही आधुनिक काळात सत्ता होऊ शकते, याचे भान ज्ञाननिर्माते, ज्ञानवितरक, ज्ञानप्रसारक यांनी विकसित केले आहे का?

१४. वैचारिक साहित्याला माध्यमांची जागा मिळू शकणार नाही. पण माध्यमांचे निरीक्षक बनून मिळणारे आशय विषय साहित्याचे आशय द्रव्य ठरू शकते, याचा विचार विचारवंत, साहित्यिकांनी केला आहे का? की तशी अपेक्षा करणे चूक, अस्थानी आहे?  

१५. ज्ञान वितरणात प्रकाशन विश्वाची भूमिका नेमकी कोणती आहे? हे प्रकाशनविश्व धंदा, व्यवसाय आणि परिवर्तनाचे माध्यम अशा कोणत्या कोंडीत सापडले आहे? कोंडीत खरेच सापडले आहे की त्यांनी त्यात 'समतोल' साधला आहे. म्हणजे 'मागणी तसा पुरवठा' या न्यायाने बाजारपेठीय किंमत असणारी पुस्तके ग्राहकांसाठी छापायची आणि त्याच वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून साहित्यिक, ज्ञानात्मक मूल्य असणारी पुस्तकेही प्रसिद्ध करायची. त्यात होणारा तोटा (झालाच तर) ग्राहकप्रिय पुस्तकातून मिळवायचा. केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर वाचक या नात्याने का होईना स्वतःला असणारे संवेदनशीलतेचे भान जागते ठेवण्यासाठी वैचारिक मूल्यवान ग्रंथ निर्मिती करायची. त्याद्वारे लेखक, वाचक आणि वाचन संस्कृती यांचे संवर्धन आणि संरक्षण करायचे. असे काही प्रयत्न प्रकाशनविश्व करते आहे का? असे कितीजण आहेत?       

१६. सहावा स्तंभ कोण असू शकते? या पाचही स्तंभांचे निरीक्षण, त्यांची काटेकोर चिकित्सा आणि त्यांचे यथार्थ मूल्यमापन करणारी समाजातील सुबुद्ध, सुजाण, शहाणे लोक हेच सहावा स्तंभ असू शकतात. या लोकांची चिकित्सक भूमिका या साऱ्यावर नियंत्रण ठेवणारी नैतिक आणि ज्ञानात्मक न्यायदेवतेची भूमिका असेल. ही शहाणी माणसे साहित्य आणि तत्त्वज्ञान याच क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. त्यांची आविष्करणाची माध्यमे म्हणजे वैचारिक आणि तत्त्वज्ञानाची नियतकालिके. ती क्षीण, दुर्बल आणि अशक्त झाली की, सत्तेचे सर्व स्तंभ शिरजोर होणे नैसर्गिक आहे.    

……………………………………………………………………………………………

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......