टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरुण जेटली, मोहम्मद शमी पत्नीसह आणि नरेंद्र मोदी
  • Wed , 28 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मोहम्मद शमी Mohammed Shami

१. वीस वर्षांपूर्वी केवळ एक टक्का लोकांकडे मोबाइल फोन होते, आता ९० टक्के लोकांकडे मोबाइल फोन आहेत, त्याचा वापर आपण आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी करायला हवा. आपल्या देशात १०० कोटींपेक्षा अधिक लोकांकडे मोबाईल फोन आहेत आणि १०९ लोकांकडे आधार कार्ड आहेत. ज्या व्यक्तींकडे एटीएम कार्ड किंवा मोबाइल फोन नाहीत, त्यांची खाती आधार कार्डाला जोडली जातील. केवळ अंगठा ठेवून भविष्यातील व्यवहार होतील. : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

निव्वळ मोबाइल फोन असले की व्यवहार सोपे होतात का? ते सगळे स्मार्टफोन असावे लागतात, त्यांच्यासाठी मोफत किंवा किरकोळ दराने विश्वासार्ह इंटरनेट सेवा अखंडित उपलब्ध असायला लागते, वीज असावी लागते. या पायाभूत सुविधांची बोंब असताना अंगठा दाखवून व्यवहार करण्याची आयडिया ‘ठेंगा’ दाखवण्यात रूपांतरित झाली नाही, म्हणजे मिळवली.

………………………………………

२. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तो भलत्याच धर्मसंकटात सापडला आहे. आपल्या पत्नीसोबतच्या या फोटोत तो तिच्या खांद्यावर हात टाकून बसलेला दिसतो. त्याच्या पत्नीने आखूड बाह्यांचा ड्रेस केलेला आहे. शमी मुस्लिम असल्याने त्याने आपल्या पत्नीला बुरख्यात ठेवायला हवं होतं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच्या धर्मबांधवांनी व्यक्त केल्या आहेत.  

शमीभाऊ, या सगळ्या धर्मबांधवांच्या अगोचर सूचना शमीच्या झाडावर टांगून ठेवा आणि पुन्हा कधीही तिकडे फिरकू नका. धर्माज्ञेची एवढीच फिकीर आहे तर मुळात यांनी फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दुसऱ्याच्या बायकोकडे इतकं डोळे फाडफाडून पाहायलाच पाहायला नको होतं. हराम तर तेही आहे धर्मात. आपापल्या बायकांना असा वेष परिधान करायला लावून त्यांच्यासोबत असा फोटो काढला, तर जरा जळजळ कमी होईल त्यांची. यांचं ऐकलं असतं तर सानिया मिर्झाला आतापर्यंत बुरखा पांघरून वाती वळायला बसावं लागलं असतं!

………………………………………

३. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भले शाबास! अर्धकच्च्या अंमलबजावणीमुळे अंगाशी आलेल्या निर्णयाचं खापर आधीच्यांवर फोडून मोकळेही झालात! असं म्हणतात की जो पडतो, तो अपयशी नसतो; कोणीतरी मला ढकललं म्हणून मी पडलो, असं सांगतो, तो अपयशी असतो. तुमच्या तथाकथित निडरपणावर भाळलेल्यांनी आता भाळावर हात मारून घेतला असेल. हळूहळू तुम्ही ब्रिटिशांपर्यंत आणि त्यामागे मुघल सत्तेपर्यंत जाल फसलेल्या नोटाबंदीचं समर्थन करण्यासाठी.

४. उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत गेलेल्या २२० भारतीय मच्छिमारांची नुकतीच सुटका केली आहे. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध निवळण्यात मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

छे हो, असं काही नाही झालेलं! पेद्रू पाकडे घाबरलेत आमच्या जहाल देशभक्तांना. आम्ही इथे पाकिस्तानी नटनट्यांवर बहिष्कार घातला, फेसबुक आणि ट्विटरवरून जो बॉम्बवर्षाव केला, त्याने हवालदिल झाले पाकडे. आम्ही सगळे फेसबुकी देशभक्त अकाउंट डिअॅक्टिव्हेट करून, लष्करी गणवेष चढवून सीमेवर आलो, तर पळता भुई थोडी होईल, हे लक्षात आल्यामुळेच त्यांना हे शहाणपण सुचलंय.

………………………………………

५. देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा निपटून काढण्यासाठीच्या लढाईची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. नोटाबंदी अमलात आली. आता केंद्र सरकारचा यापुढील घाव बेनामी मालमत्तांवर घातला जाईल. त्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळा पैसा कमावणारे, साठवणारे आणि तो पांढरा करून घेणारे, यांना जराही धक्का न लावता सर्वसामान्यांना ५० दिवस गुरासारखे वेठीला धरणाऱ्या निश्चलनीकरणाचा अनुभव पाहता, आता हक्काच्या, कष्टार्जित, वडिलोपार्जित मिळकतींवरही हे सरकार डल्ला मारणार की काय, या धास्तीने सामान्यजनांच्या डोळ्यांसमोर आताच तारे चमकायला लागले असतील.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......