प्राचार्य कौतिकराव ठाले सरांनी उन्हातान्हात भटकणाऱ्या माझ्यासारख्या अनेक गरीब, होतकरू तरुणांना सांभाळलंय… म्हणून मला ते ‘आधारवड’ वाटतात!
ग्रंथनामा - आगामी
श्रीधर नांदेडकर
  • ‘साहित्य, संस्कृती आणि भूमिका : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील गौरवग्रंथ’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 March 2024
  • ग्रंथनामा आगामी साहित्य-संस्कृती आणि भूमिका Sahitya-Sanskruti aani Bhumika कौतिकराव ठाले पाटील Kautikrao Thale Patil

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांची मराठी साहित्य जगताला वाङ्मयीन चळवळीतले कुशल कार्यकर्ते, संघटक, भाषाप्रेमी, मराठीचे व्यासंगी प्राध्यापक, प्राचार्य, शिस्तशीर प्रशासक आणि वाङमयीन सस्थांचे सुजाण नेते अशी ओळख आहे. उद्या ९ मार्च २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरात प्रा. ठाले पाटील यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यात शब्द पब्लिकेशनतर्फे ‘साहित्य, संस्कृती आणि भूमिका : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील गौरवग्रंथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या ग्रंथाचे संपादन रणधीर शिंदे यांनी केले आहे. या निमित्ताने या ग्रंथातला प्रा. ठाले पाटील यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणाऱ्या कवी श्रीधर नांदेडकर यांच्या लेखाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

अभावांच्या गर्दीतून वाट शोधणारी काही माणसं त्यांच्या पुढील आयुष्यात अनेकांना अभावांच्या गर्दीतून वाट काढायला मदत करतात. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना अभावाच्या गर्दीतून वाट काढायला मदत केलीय.

माझे वडील सोमवारी उपवास करायचे. उपवास सोडताना गुरुवंदन करायचे. मग हात जोडून म्हणायचे, ‘माधवराव धोपेश्वरकर साहेब, तुम्ही मला अन्नपाण्याला लावलं, म्हणून आज मला हा दिवस पाहायला मिळतोय.’ पाटबंधारे खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असलेल्या माधवरावांनी आमच्या बाबांना नोकरी दिली. एका कामगाराचं आयुष्य ते जगले. परंतु ज्यानं रोजी-रोटीला लावलं त्यांच्याविषयी अखेरपर्यंत कृतज्ञता व्यक्त करणं माझ्या मनात खोलवर रुजलं होतं.

आज ठाले सरांविषयी लिहिताना त्याच कृतज्ञतेचा मी नम्रपणे उच्चार करतोय. त्यांनी मला रोजीरोटीला लावलं. एवढंच नाही, तर गरिबी सोसताना अनुभवाला येणाऱ्या अपमानित जीवनाचा भूतकाळ विसरायला लावेल, असं सन्मानाचं जगणं माझ्या वाट्याला येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची पितृछाया आजतागायत माझ्यावर आहे. म्हणून मला ते ‘आधारवड’ वाटतात आणि त्यांची ही सावली केवळ माझ्या एकट्यासाठी नव्हती. ठाले सरांनी उन्हातान्हात भटकणाऱ्या अनेक गरीब, होतकरू तरुणांना या सावलीत सांभाळलंय आणि हे सगळं करताना कधीही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा केली नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मी ज्या पदावर असेन त्या पदाचा समाजातील गरजू लोकांना फायदा होणार नसेल, तर सार्वजनिक पदावर राहण्याचा मला अधिकारच नाही, अशी जाहीरपणे भूमिका मांडणाऱ्या आणि हे तत्त्व कृतीत उतरवणाऱ्या ठाले सरांना मी गेली ३४ वर्षं सतत कार्यमग्न असलेलं पाहतोय.

नांदेडला पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून एम. ए. इंग्लिशच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी १९८९च्या जुलै महिन्यात मी आणि माझा मित्र मनोज बोरगावकर हा, असे आम्ही दोघे औरंगाबादला आलो. मनोज हॉस्टेलला राहायला गेला. मी मामांकडे राहून शिक्षण घेणार होतो. गुरुवर्य रवींद्र किंबहुने सरांचा सहवास आणि त्यांच्याकडून ‘कविता’ शिकायला मिळणार, याचा आम्हाला फार आनंद झालेला होता. त्या वेळी मामांचा मुलगा व्यंकटेश हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.

संध्याकाळ झाली की, मी, किशोर अग्रवाल हा मित्र आणि व्यंकटेश आदी क्रांती चौकात काहीतरी खायला, चहा घ्यायला, भटकायला जायचो. तिथे त्याचा अत्यंत जवळचा मित्र आम्हाला भेटायला यायचा. तो पहिल्यांदा भेटला, तेव्हा व्यंकटेशनं ओळख करून देताना सांगितलं की, हा माझा मित्र नरेंद्र पाटील. माझी ओळख करून देताना त्याला सांगितलं की, हा माझा भाऊ कविता करतो.

अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असलेला नरेंद्र तेव्हा सर्व मित्रांमध्ये नेतृत्वगुणांमुळे प्रसिद्ध होता. अडचणीत असणाऱ्या सगळ्या मित्रांना मदत करणारा, सल्ला देणारा, स्वतःच्या करिअरविषयी अत्यंत आत्मविश्वासानं बोलणारा नरेंद्र अत्यंत संवेदनशील आणि प्रेमळ असल्यामुळे माझाही जवळचा मित्र झाला. आपलं प्रेम स्वीकारलं जाईल की नाही, याबद्दल कायम साशंक असलेला नरेंद्र त्या काळात फार अस्वस्थ असायचा.

आम्ही त्या वेळी कायम सोबत असायचो, अगदी जवळच्या मित्राकडे त्याची वही वाचण्यासाठी दिलेली असायची. तो आपल्या भावनांवर धीरानं नियंत्रण ठेवायचा. जेव्हा मला कळालं की, नरेंद्र ठाले सरांचा आणि अनुराधाबाईंचा मुलगा आहे, तेव्हा त्याच्याबद्दलचा जिव्हाळा अधिकच दुणावला.

बीएला असतानाच अनुराधाबाईंच्या कविता वाचून कधीतरी त्यांना भेटायचंच असं मनाशी ठरवलं होतं. योगायोगानं आम्ही औरंगाबादलाच आलो होतो. औरंगपुऱ्यात फिरताना कधीतरी मित्रानं एका दिशेला बोट दाखवत सांगितलं की, अनुराधाबाई मंडईच्या दिशेनं जात आहेत. अत्यंत साधी राहणी असलेल्या अनुराधाबाईंना पाहून आपलं या व्यक्तीशी आत्मीय नातं असल्याची तीव्रतेनं जाणीव झाली.

भराभर चालत जाऊन स्वतःहून काहीतरी बोलावं, असं धाडस माझ्यात नव्हतं. जन्मजात संकोची स्वभावाचा मी. नंतरही अधूनमधून त्या दिसल्या की, वाटायचं बोलू या चार शब्द. सांगू या की, मला तुमच्या कविता फार आवडतात. पण मनातले शब्द मनातच विरून जायचे आणि पाय जागेवरच थबकायचे.

खरं तर नरेंद्रसोबत एक-दोनदा त्याच्या घरीही गेलो होतो, परंतु ‘मी बाहेरच थांबतो, तू ये घरातलं आवरून’ असं म्हणून बाहेरच थांबलो. बाईंकडे कुणीतरी आलेलं होतं. खिडकीतून त्या मला दिसत होत्या. त्यांच्या गप्पाही ऐकू येत होत्या. पण आवडत्या कवयित्रीशी संवाद साधण्याची वेळ कदाचित आलेली नव्हती.

ऑक्टोबर महिन्यात मराठवाडा साहित्य परिषदेनं भालचंद्र नेमाडे यांच्या समग्र साहित्यावर दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याचं अत्यंत नेटकं आयोजन करण्यात जे लोक होते, त्यात प्राचार्य ठाले सरही होते. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं. त्यांच्या नीटनेटकेपणाची आणि कार्यतत्परतेची मी मनातल्या मनात नोंद केली होती. प्रत्येक सत्र वेळेत कसं पूर्ण होईल, चर्चा विषयकेंद्रित कशी राहील, पुढील सत्रातील नियोजन या सर्व बाबतीत ठाले सर लक्ष देत होते.

मी विद्यार्थी म्हणून श्रोता म्हणून तिथे होतो. पुढे एप्रिल महिन्यात डॉ. भालचंद्र नेमाडे औरंगाबादला येणार अशी बातमी पेपरात आली. आम्ही सगळे आनंदात होतो की, नेमाडे सरांना ऐकायला मिळणार! आश्चर्यकारक घटना अशी घडली की, दरम्यानच्या काळात एका कार्यक्रमात गुरुवर्य रवींद्र किंबहुने यांनी माझी गुरुवर्य चंद्रकांत पाटील यांच्याशी ओळख करून दिली होती. मराठवाडा दैनिकाच्या ‘चिगूर’ पुरवणीत कव्हर स्टोरी म्हणून मी ‘नवोदितांची भंकस साहित्यनिर्मिती’ हा लेख लिहिला होता आणि पाटील सरांना तो लेख आवडला होता.

अचानक एक दिवस मला पाटील सरांनी भेटायला बोलावले आणि नेमाडे सरांची सगळी पुस्तकं मला देत ते म्हणाले, ‘नेमाडेंची मुलाखत घ्यायची आहे. पंधरा दिवस आहेत. चांगली तयारी कर.’ मी आनंदित झालो, अचंबित झालो आणि काळजीतही पडलो. दडपण आलं मनावर. परीक्षाही तोंडावर आलेली. तरीही मी आनंदाने तयारी केली. भेट झाली. ती मुलाखत घेणारा मी एकटा नव्हतो. नागनाथ कोत्तापल्ले सर, सुजाता महाजन आणि मी, असे आम्ही तिघे होतो. मुलाखत छान झाली. मी मित्रांसोबत निघून गेलो.

दोन वर्षांनंतर किंबहुने सर मला ठाले सरांच्या घरी घेऊन आले. म्हणाले, ‘हा श्रीधर नांदेडकर, याला नोकरी हवीय. तुम्ही मदत करा.’ ठाले सरांनी मला पाहिलं व म्हणाले, ‘तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय’. मी म्हणालो सर, ‘मी नेमाडे सरांची मुलाखत घेतली, तेव्हा तुम्हाला भेटलो होतो.’ ते लगेच म्हणाले, ‘अहो तुम्ही लगेच निघून गेलात. तुमचं मानधन कित्येक दिवस आम्ही सांभाळलं. परंतु मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपलं. आता तुम्हाला ते पैसे देता येणार नाहीत.’ मी म्हणालो, ‘सर, मुलाखत घेणाऱ्याला पैसे दिले जातात हे मला खरोखर माहीत नव्हतं.’ सगळे हसले.

त्याच भेटीत ‘धारूरच्या रिक्त जागेवर इंग्लिशचा माणूस मिळत नाहीय, तुम्ही तिथे जॉईन व्हा. माझा पुतण्या तिथे तात्पुरती नोकरी करतोय. तुमची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत माझ्याच घरी राहा असं सांगितलं.’ मी अगदी आनंदून गेलो. म्हणालो, ‘सर, नरेंद्र माझा मित्र आहे आणि तुमचा पुतण्या भगवानही मित्रच आहे.’ ठाले सरांना फार आश्चर्य वाटलं. ते कौतुकाने म्हणाले, ‘नोकरीचा शब्द देईपर्यंत तुम्ही ही ओळख सांगितली नाही, ही गोष्ट मला आवडली.’

या पहिल्याच भेटीनं माझं जीवन बदलवून टाकलं होतं. त्याच भेटीत अनुराधाबाईंची औपचारिक भेट झाली. मी किल्ले धारूरला नोकरीची सुरुवात केली. तेव्हापासून माझे प्राचार्य म्हणून मला ठाले सरांचा सहवास मिळाला. त्यानंतर गोष्टी फार वेगानं घडल्या. चंद्रकांत पाटील सरांच्या शिफारशीवरून प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी माझ्या कविता विशेष नोंद घेऊन ‘प्रतिष्ठान’ द्वैमासिकात प्रसिद्ध केल्या. याचा मला फार आनंद झाला.

ठाले सरांनी मला दोन अंक भेट दिले आणि म्हणाले, ‘धारूरचं ग्रंथालय फार समृद्ध आहे. छान शिकवा आणि छान वाचन, लेखन करा.’ पुढील काही महिन्यांनी अनुराधाबाई धारूरला एका दिवसासाठी आल्या. सर म्हणाले, ‘बाईंना भेटायचं असेल तर कॉलेज सुटल्यावर जाताना घरी जा.’ मी आनंदाने ज्योतीला, माझ्या पत्नीला घेऊन बाईंना भेटायला गेलो. बाईंनी ‘प्रतिष्ठान’मधल्या कविता आवडल्याचं सांगितलं. मी संकोचून काही बोललो नाही, पण पुढे तीन-चार तास आम्ही बोलत होतो. बाईंनी मनमोकळेपणानं संवाद साधत खूप गोष्टी सांगितल्या.

त्या भेटीनंतर मी ठाले सरांच्या कुटुंबाचा सदस्य झालो. त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं मला कसं स्वीकारलं, याचा अदमास यावा यासाठी सगळ्यांचा संदर्भ देत मी हे जरा विस्तारानं लिहिलंय. त्यानंतर गेली ३०-३५ वर्षं आम्ही सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी आहोत.

आज मागे वळून पाहताना ठाले सरांविषयी असलेला आदर सतत वाढत गेल्याचं प्रकर्षाने जाणवतं. मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन करण्यासाठी हा लेख लिहीत नाहीय. एक व्यक्ती पाठीशी असेल, तर अभावातून एक माणूस आत्मसन्मान जपत, सन्मानानं कसं जगू शकतो, याचा मी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव सांगू पाहतोय.

खरंतर ठाले सरांच्या ठाम भूमिका घेण्याबद्दल आणि ती स्पष्टपणे मांडण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याबद्दल वाङ्‌मयीन वर्तुळात सतत चर्चा घडत असते. आपल्या प्रसारमाध्यमांना अशी व्यक्ती सकारात्मकता निर्माण करण्यासाठी नाही तर ‘वाद’ निर्माण करण्यासाठी आणि ‘वावड्या’ उठवण्यासाठी हवी असते. अशा वेळी आपण ज्या व्यक्तीविषयी जे काही प्रसारित करतो, त्यामुळे त्या व्यक्तीची अनेकदा काहीही दोष नसताना अत्यंत नकारात्मक प्रतिमा समाजात निर्माण होते, याची यत्किंचितही खंत माध्यमांना वाटत नाही.

ठाले सरांचं प्रसारमाध्यामांनी अनेकदा ‘प्रतिमाहनन’ केलेलं आहे. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असली तरीही नैतिकता आणि प्रसारमाध्यमे याचा (काही अपवाद वगळता) जो बट्ट्याबोळ झालेला आपण पाहतो आहोत, त्या पार्श्वभूमीवर त्यांना लाज वाटणं सुसंस्कृत लोकांनी अपेक्षित धरू नये. ‘कोडगेपणा’ हीच ज्यांची ‘कार्यसंस्कृती’ असते, तिथे ‘नैतिकता’ आणि ‘विवेक’ हे शब्द विझून जातात. हे उघड सत्य आहे आणि मग समाज ज्या वावड्यांवर पोसलेला असतो, त्या डोक्यात ठेवूनच तो दोन व्यक्तींच्या नात्याचं केवळ ‘फायदा आणि तोटा’ एवढ्याच दृष्टीकोनातून मूल्यमापन करतो. वास्तव मात्र फार वेगळं असतं.

या वास्तवात ठाले सरांचा ज्यांना प्रदीर्घ काळ सहवास लाभला, केवळ त्यांनाच त्यांच्या तत्त्वनिष्ठतेबद्दल, कार्यतत्परतेबद्दल अधिकारवाणीनं काही सांगता येऊ शकतं. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी म्हणून शकतो की, सरांच्या दीर्घकाळ सहवासात असलेले जे लोक आहेत, त्यात ‘मी’ एक आहे. मी ठामपणे सांगू शकतो की, संस्थात्मक पातळीवर अजोड कार्य करणारे ठाले सर व्यक्ती म्हणून फार प्रेमळ आहेत. मी कवी असल्यामुळे असेल मला व्यक्तीतील गुण अधिक दिसतात.

मी ठाले सरांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनुभवलेला ठळक गुण म्हणजे त्यांचं उत्तम प्रशासक असणं. गुणग्राहकता हा त्यांचा गुणविशेष. कोणती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात, केव्हा व कशी ‘महत्त्वा’ची भूमिका पार पाडू शकते, याविषयी त्यांनी बांधलेले आडाखे कधीही चुकत नाहीत. कोणती व्यक्ती ‘दुर्लक्षित’ राहिलीय, याकडे त्यांचा सतत कटाक्ष असतो. त्या व्यक्तीला व्यासपीठ मिळवून देताना, सन्मानित करताना, संधी देताना त्यांना विलक्षण आनंद होतो, हे मी कित्येकदा पाहिलेलं आहे.

प्रशासन करताना साधारणपणे न दिसणारा दुर्मीळ गुण म्हणजे ‘काटकसर’. कॉलेजमध्ये, साहित्य परिषदेत आलेल्या टपालाचे पाकिट उघडून कोऱ्या बाजूवर नोंदी करणे, स्टेशनरी अत्यंत जपून वापरणे; ‘प्रतिष्ठान’च्या पानावर दोन कॉलममध्ये मजकूर असावा, कारण त्यामुळे पाने वाचतात व मजकूर अधिक सामावतो. एक ना दोन अनेक ठिकाणी सूक्ष्मपणे हे ‘बचतसत्र’ कायम सुरू असतं.

ठाले सरांनी सार्वजनिक संस्थेचा, खासगी संस्थेचा, कुठल्याही संस्थेचा पैसा अनाठायी खर्च होणार नाही, याची वर्षानुवर्षं काळजी घेतलीय. आपल्याकडे येणारा पाहुणा सुखरूप पोहोचण्यासाठी त्याने कसा प्रवास करावा, कधी करावा, याबाबतदेखील ते आग्रही असतात. त्या पाहुण्याला लिहिलेल्या पत्रातून ते तशा सूचना नि:संकोचपणे करत असतात.

वैयक्तिक कारणांसाठी, संस्थात्मक कामांसाठी त्यांना अनेकदा कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या. कायद्याचं सूक्ष्म ज्ञान असल्यामुळे आपली बाजू मांडताना त्यांनी तयार केलेले मसुदे वाचून वकीलदेखील अचंबित होतात, हे मला माहीत आहे.

महाराष्ट्रात आणि इतर राज्यात असलेल्या लेखक कवींविषयी इत्यंभूत माहिती त्यांना असते. त्यांनी जात, पात, धर्म, भाषा, प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता अनेकांना सन्मानित केले आहे. कदाचित यामुळेच त्यांना स्वकीयांचा अनेकदा रोषदेखील पत्करावा लागतो. परंतु आपण जे काही करतो, ते व्यापक भूमिका घेऊनच केलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत ते कुणाच्याही संकुचित मांडणीला बळी पडत नाहीत.

एखाद्या व्यक्तीला मदत करायची, असं ठरवल्यावर संपूर्ण जबाबदारी स्वत:कडे घेत, जास्तीत जास्त काय करता येईल, याचा विचार करत, योग्य मांडणी व नियोजन करून परिणामांचा सारासार विचार करून ते सगळे निर्णय घेतात. कुणाला ‘शब्द’ दिला की, अखेरपर्यंत तो पाळायचाच, हा त्यांचा स्वभावविशेष कुठल्याही काळात दुर्मीळच आहे.

बाजू घ्यायची आणि ती लढवायची, तडजोड करायची नाही, माघार घ्यायची नाही, प्रसंगी पराभव स्वीकारायचा परंतु सत्त्व आणि आत्मप्रतिष्ठेला धक्का लागू द्यायचा नाही, हे कित्येकदा त्यांच्या बाबतीत अनेकांनी अनुभवलेलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करायचं तर ‘कटुता’, ‘द्वेष’, ‘मत्सर’, ‘भेदभाव’, ‘आपलं-परकं’ अशा कुठल्याच दोषाला थारा देऊन चालत नाही हे ठाले सरांचा लोकसंग्रह पाहिला की, कुणालाही जाणवणारं सत्य आहे आणि लोकसंग्रहाची व्याप्तीदेखील आश्चर्यकारक. महाराष्ट्रातल्या सर्व सुसंस्कृत राजकीय नेत्यांनाही ठाले सरांच्या कामाविषयी माहिती तर असतेच, परंतु विधायक कार्यासाठी ठाले सरांनी टाकलेला शब्द राजकीय नेतृत्वाने बहुतांश वेळा पाळलेला दिसतो.

दुसऱ्या बाजूला उदगीर, उमरगा यांसारख्या सीमावर्ती प्रदेशातल्या खेड्यांमधून लिहिणारी, वाचणारी होतकरू मंडळी त्यांच्याशी जिव्हाळ्यानं संवाद साधताना दिसते. ते जातील तिथं माणसं त्यांना भेटायला येतात. साहित्य संस्थांमधील सर्वोच्चस्थानी काम करताना अनेकदा संघर्षाचे प्रसंग आले. संयम न सोडता, विवेक न सोडता, प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल राहिला आहे.

सर्व साहित्य संस्थांचा विचार करताना मराठवाडा साहित्य परिषदेचं भरीव कार्य सगळ्यांच्या नजरेत भरतं. त्यामागे ३५ वर्षं ठाले सरांनी केलेले कष्ट आहेत आणि त्या कष्टातून झालेली मराठवाडा साहित्य परिषदेची यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी नव्या लोकांना दिशा व बळ मिळेल, असं मूलभूत स्वरूपाचं काम सरांनी करून ठेवलेलं आहे.

हे सगळं एका बाजूला सुरू असताना ठाले सर चर्चेत असलेली सगळी महत्त्वाची पुस्तकं वाचत असतात. लेखकांना ते पुस्तक वाचून काय वाटलं, हे कळवत असतात. भाषा व वाङ्मयीन संस्कृतीविषयक लेख लिहीत असतात, साहित्य संमेलनातून आपली भूमिका निर्भीडपणे मांडत असतात. प्रकाशन समारंभांत सहभागी होऊन अभ्यासपूर्ण निरीक्षणं नोंदवतात. चर्चासत्रात सकारात्मक चर्चा करत असतात आणि पुढील कार्यक्रमांच्या रूपरेषा आखत असतात.

वयाच्या ८१व्या वर्षीही हेवा वाटावी, अशी त्यांची ऊर्जा आहे. स्पष्टवक्तेपणा हा जसा त्यांच्या स्वभावाचा विशेष सांगता येतो, तसाच मिश्किलपणादेखील त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवतो. सगळे चर्चा करत असतील, तर ती लक्षपूर्वक ऐकायची व त्यावर अत्यंत संक्षिप्त परंतु मार्मिक प्रतिक्रिया देण्याची त्यांची खास शैली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

शिक्षकच नसलेल्या खेड्यात प्राथमिक शिक्षणाचे धडे घरच्या घरीच घेत, पाच मैल चालत जाऊन येऊन प्राथमिक शिक्षण घेत, एका साध्या पोषाखावर अत्यंत हलाखीत मिलिंद आणि देवगिरी महाविद्यालयांतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करत त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केलं.

उमरगा येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, म. शि. प्र. मंडळात प्रशासकीय अधिकारी म्हणून, मंडळासारखी संस्था चालवण्यासाठी कोर्टाने नियुक्त केलेल्या ‘प्राचार्यांच्या प्रशासकीय समिती’चे २२ महिने अध्यक्ष म्हणून आणि गंगापूर आणि धारूर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून, मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

काही काळ त्यांच्याकडे मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारीही होती. त्या अल्पकाळातील त्यांचे काही निर्णय अनेकांचे जीवन बदलवणारे ठरले. त्यातील काहींची नावे मी सांगू शकतो. हा सगळा थक्क करणारा प्रवास आहे.

शिक्षण आणि साहित्य ही त्यांची आवडीची आस्थाक्षेत्रे आहेत. अजूनही त्यांच्या मनात काही प्रकल्प आहेत, काही योजना आहेत. पुढील काळात त्यांच्याकडून त्या पूर्ण होवोत, त्यांची कार्यतत्परता प्रदीर्घ काळ राहो, त्यांना चांगले आरोग्य लाभो, हीच निर्मिकाकडे प्रार्थना करतो.

‘साहित्य, संस्कृती आणि भूमिका : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील गौरवग्रंथ’ – संपादक रणधीर शिंदे

शब्द पब्लिकेशन, मुंबई | मूल्य – ७७५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......