भारतात व जगभरात सध्या एकटेपणा हा ‘संसर्गजन्य आजार’ झाला आहे. आणि जिथं एकटेपणा आहे, तिथं व्यसनाचा शिरकाव होतोच...
पडघम - विज्ञाननामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 23 February 2024
  • पडघम विज्ञाननामा व्यसन Addiction ड्रग Drug

“The opposite of addiction isn’t sobriety. It’s connection.”

― Johann Hari (‘Chasing the Scream : The First and Last Days of the War on Drugs’)

२०२३मध्ये मनाला चटका लागणार्‍या अनेक घटना घडल्या. त्यापैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे, ‘फ्रेंड्स’ या मालिकेतील मॅथ्यू पेरी (Matthew Perry) या विनोदी अभिनेत्याचा मृत्यू. १९९४ ते २००४ अशी सलग १० वर्षं चाललेल्या या मालिकेतील Chandler Bing या पात्राची भूमिका करणारा पेरी हा गुणी अभिनेता त्याच्या व्यसनाधीनतेमुळे अकाली काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या विशिष्ट विनोदी शैलीसाठी लोकप्रिय असणार्‍या पेरीने २०२२मध्ये ‘Friends, Lovers and the Big Terrible Thing’ या पुस्तकाद्वारे स्वत:चं आयुष्य लोकांसमोर मांडलं. ते प्रचंड धक्कादायक होतं. पेरी त्याच्या पुस्तकाद्वारे व्यसनाबद्दल जागृती आणण्याचा चांगला प्रयत्न करत होता. वयाच्या १४व्या वर्षापासून दारू आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेली पेरीची आत्मकथा अत्यंत नाट्यमय व दुर्दैवी आहे.

लहानपणी आई-वडिलांचा घटस्फोट आणि आईपासून प्रेम व स्वीकृती न मिळाल्यानं सधन कुटुंबात जन्मलेल्या पेरीच्या आयुष्यात दारू कधी आली, हे त्यालाही कळलं नाही. राष्ट्रीय पातळीवर lawn tennisच्या स्पर्धा जिंकणारा हा कलाकार १८व्या वर्षी रोज दारू प्यायला लागला होता. २४व्या वर्षी ‘फ्रेंडस’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला आणि ही मालिका संपता संपता पूर्ण नशेबाज झाला होता. गंमत म्हणजे त्याच्या व्यसनाचा मालिकेतील लोकांना कधीही त्रास झाला नाही, उलट अत्यंत सभ्य व हजरजबाबी सहकलाकार म्हणून त्याची शेवटपर्यंत ओळख राहिली.

अर्थात उघडपणे या सर्व गोष्टी मान्य करणारा हा काही पहिला सेलेब्रिटी नव्हे. यापूर्वीही अनेक हॉलिवुड कलाकारांनी आपल्या व्यसनाधीनतेबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल लिहिलं आहे. काहींचा त्यात अंत झाला, तर काहींनी त्यातून बाहेर पडून सामान्य आयुष्य जगणं पसंत केलं. भारतात मात्र अजूनही व्यसनासंबंधी प्रचंड गैरसमज असल्यानं सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी कोणतीही व्यक्ती स्वत:च्या व्यसनासंबंधी सहसा बोलत नाही. म्हणूनच व्यसनापायी तिचं काही झाल्यानंतर बाहेर येणारी माहिती धक्कादायक ठरते. अधिक माहितीसाठी पहा -

https://youtu.be/57GYwj6YcnU?feature=shared

हा लेख लिहीत असतानाच पुणे शहरात तब्बल ४००० कोटींचं ड्रग पोलिसांनी पकडलं. अर्थात गेल्या काही वर्षांत भारतात, विशेष करून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर ड्रग सापडलं आहे. पुणे शहर शिक्षण व नोकरीमुळे मराठी तरुणाईचं आवडतं शहर म्हणून ओळखलं जातं. तिथं ड्रग एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असेल, तर ती सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंतेची बाब आहे.

स्वत:चं गाव\शहर व कुटुंबापासून दूर राहून शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या तरुणाईला नवीन शहरात जुळवून घेताना अनेक प्रकारच्या ताणांचा सामना करावा लागतो. काळजी घेणार कुणी नसल्याने जेवण असो किंवा आरोग्य सेवा, एकटेपणाचा भार सहन करताना तरुणाई कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नशेकडे आकृष्ट होते.

आर्थिक विवंचना, प्रचंड स्पर्धा आणि मायेचा आधार देणार कुणी जवळ नसताना दारू, सिगरेट, ड्रग, सोशल मीडिया, पॉर्न आणि शारीरिक संबंध, या गोष्टी ताणापासून काही काळ विरंगुळा म्हणून वापरल्या जातात. मात्र हळूहळू बहुतेक लोकांना त्याचं व्यसन लागतं. मानवी मेंदूचं स्व-नियंत्रण कार्य २५व्या वयापर्यंत पूर्णपणे विकसित होतं, त्याअगोदरच्या मेंदूला आनंदाची अनुभूती देणार्‍या गोष्टींचं व्यसन लवकर लागू शकतं. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.youtube.com/watch?v=wITy72nf1AM

भारतात ‘मानसिक आरोग्या’बाबत अजूनही पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून तो एक मानसिक आजार आहे, याचं भान विकसित झालेलं नाही. व्यसनाचा शरीरावर खोल परिणाम होतो. लोक नशेच्या पदार्थांचं का सेवन करतात, यामागे भरपूर कारणं असली तरी सर्वच लोकांना त्याचं व्यसन लागत नाही, हेही तितकंच खरं.

जगातले सर्वांत जास्त व्यसनाचं प्राबल्य असलेले दहा देश

१) अफगाणिस्तान, २) इराण, ३) कोलंबिया, ४) अमेरिका, ५) डॉमिनिक रिपब्लिक, ६) मेक्सिको, ७) रशिया, ८) लाओस, ९) नायजेरिया, १०) फिलिपिन्स

या सर्व देशांत (अमेरिका वगळता) राजकीय व सामाजिक परिस्थिती शांततापूर्ण नाही. हे देश आर्थिकदृष्ट्या कमवकुवत (अमेरिका व रशिया वगळता) असून त्यांची शिक्षण व रोजगार या आघाड्यांवर अत्यंत वाईट स्थिती आहे. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.youtube.com/watch?v=zftWMus7zuc

तुम्ही म्हणाल या सर्वांचा व्यसनाशी काय संबंध?

७०च्या दशकात डॉ. ब्रूस अलेक्झांडर (Dr. Bruce Alexander) या मानसशास्त्रज्ञाने उंदरांवर एक प्रयोग केला होता. त्यांनी एका पिंजऱ्यात सुंदर असा ‘रॅट पार्क’ बनवला. त्यात मुबलक अन्न, खेळणी आणि शारीरिक संबंधासाठी जोडीदार अशी व्यवस्था केली. या पार्कमध्ये ‘मॉर्फिन’ असलेलं पाणीदेखील ठेवलं. उंदरांनी त्या पाण्याची चव घेतली, पण त्याचं त्यांना व्यसन लागलं नाही.

मग डॉ. अलेक्झांडर यांनी आणखी एक ‘रॅट पार्क’ तयार केला. त्यात उंदरांना एकेकटं वेगवेगळ्या डब्ब्यात ठेवलं. सोबतीला जोडीदार, पुरेसं अन्न दिलं नाही, पण मात्र मॉर्फिन असलेलं पाणी ठेवलं. तेव्हा त्याचं व्यसन सगळ्या उंदरांना लागलं आणि हळूहळू ते नष्ट झाले. उंदीर हा सामाजिक, कळपात राहणारा प्राणी असल्याने एकटं ठेवल्यावर त्याला व्यसन लागून त्याचा शेवट झाला. अधिक माहितीसाठी पहा -

https://youtu.be/d-0KfwFCMRM?feature=shared

हेच तत्त्व माणसालाही लागू पडतं, कारण तोही सामाजिक प्राणी आहे.

जगभरात गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाने आपल्या सामाजिक रचनेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. समोरासमोर/प्रत्यक्ष देवाणघेवाणासाठी तयार असलेला आपला मेंदू इंटरनेट व सोशल मीडियाच्या आभासी जगातील देवाणघेवाण समजू शकत नाही. त्यामुळे आपल्या मेंदूची नैसर्गिक गरज भागत नाही.

मात्र याच इंटरनेट व सोशल मीडियामुळे ‘डोपामाइन’ हे आनंद देणारं रसायन मेंदूत स्त्रवतं. त्याचं व्यसन लागून जगभरात एकटेपणा वाढला आहे. सामाजिक प्राणी असलेल्या माणूसप्राण्याची त्या पिंजऱ्यात एकट्या ठेवलेल्या उंदरासारखी गत झाली आहे. सोबतीला दारू, तंबाखू, अमली पदार्थ तर आहेतच… इंटरनेटच्या माध्यमातून हे पदार्थ आणखी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व प्रगत युरोपातील अनेक देश नशेच्या समस्येशी झुंज देत आहेत. अधिक माहितीसाठी पहा -

https://youtu.be/CsH152NE9Ak?feature=shared

त्या तुलनेत गरीब व विकसनशील देश नशेच्या समस्येचा (त्यात भारतही येतो) सामना करत आहेत. प्रगत देशात मानसिक आरोग्याबद्दल असलेली जागृती, सरकारकडून केले जाणारे प्रयत्न आणि जनतेचा सहभाग, यांमुळे व्यसनाशी सामना करणं शक्य होतं. आपल्याकडे हे सर्व प्रकार नवीन आहेत, लोक व सरकारी यंत्रणा उदासीन आहे. व्यसन कधीपासून लागलं आहे आणि ते किती तीव्र आहे, यावर मेंदूला व शरीराला काय नुकसान होईल, हे अवलंबून असतं.

व्यसनाचे मेंदूवर होणारे परिणाम

- स्वनियंत्रण व्यवस्था गडबडते व तार्किक मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे उतावीळपणा वाढीस लागतो.

- मेंदूचं कार्य बदलतं. त्याच्या रचनेत बदल होऊन रोजच्या बौद्धिक क्षमतांवर परिणाम होतो. हा परिणाम कायमचा राहतो.

- झोप, भूक व लैंगिक क्षमता अशा नैसर्गिक क्रियांवर वाईट परिणाम होतो.

- चांगल्या-वाईटाची सीमारेषा धूसर होऊन गुन्हे घडतात. त्यामुळे आयुष्यभरासाठी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का बसू शकतो.

- मेंदूत ‘केमिकल लोचा’ होऊन चिंता (anxiety), औदासीन्य (depression) व भ्रम (hallucinations) विकसित होतात. 

व्यसनाचे शरीरावर होणारे परिणाम

- हृदयाची गती व रक्तदाब वाढते

- पचनसंस्थेवर, मज्जासंस्थेवर व श्वसन संस्थेवर गंभीर दूरगामी परिणाम होतात

- लैंगिक क्षमता कमी होते व वंध्यत्व येतं.

- होणार्‍या बाळाच्या शारीरिक व मानसिक वाढीवर वाईट परिणाम होतो. अधिक माहितीसाठी पहा -

https://youtu.be/eVLpnMHHEPU?feature=shared

व्यसनी व्यक्तीच्या वागण्याने आजूबाजूच्या वातावरणावर, कामाच्या ठिकाणी, कुटुंबियांवर व सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होतो.

आपल्या आजूबाजूला बघितलं, तर काय दिसतं?

वेगवेगळ्या स्वरूपात वाढलेली हिंसा, त्यामुळे क्षणाक्षणाला जाणवणारी भीती, चिंता व असुरक्षितता. करोना महामारी व त्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रांत झालेले बदल हे अचंबित करणारे आहेत. या अस्थिरतेचा सर्वांत जास्त परिणाम वाढत्या वयातील मुलं-मुली आणि तिशीच्या आतील तरुणाईवर होतो आहे.

आजच्या घडीला महाराष्ट्रात रोज दोन बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ, त्यामुळे हव्या तशा विकसित न झालेल्या क्षमता, रोजगाराच्या संधी नसणं, शेतीतील अस्थिरता व त्यामुळे वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम (योग्य वयात लग्न न होणं इ.), यांमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दुर्दैवानं यावर पुरेशी जनजागृती होत नाही.

व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकन सैनिकांनी ‘हेरॉईन’ या अमली पदार्थाचा वापर प्रचंड प्रमाणात केला. तो एवढा होता की, युद्धभूमीवरून परत आलेले सैनिक अमेरिकेत गोंधळ करतील, अशी भीती सरकारला होती, परंतु त्यापैकी ९५ टक्के सैनिकांचं व्यसन घरी परत आल्यावर काही दिवसांतच सुटलं. युद्धभूमीवर हिंसेच्या छायेत वावरताना, तात्पुरती सुटका म्हणून ‘हेरॉईन’चा वापर करणारे अमेरिकन सैनिक घरच्या लोकांसोबत, आपल्या मायभूमीत परत आल्यावर त्याच्या वाट्याला गेले नाहीत.

त्याचं उत्तर डॉ. अलेक्झांडर यांचा ‘रॅट पार्क’चा प्रयोग देतो. एकटेपणाच्या समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी आपण ‘कनेक्ट’ होऊ, अशी नाती असणं गरजेचं असतं. त्यांच्याजवळ आपण मन मोकळं करू शकतो, आपल्याला शारीरिक व भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं, आपला विनाशर्त स्वीकार होतो… हे ज्यांना मिळतं त्यांना व्यसनांशी ‘कनेक्ट’ होण्याची गरज भासत नाही.

याच तत्त्वाचा वापर करत पोर्तुगालने आपल्या देशातील व्यसनाची लाट कमी केली. व्यसनी लोकांना औषध, समुपदेशन, व्यवसाय/नोकरीसाठी सरकारी मदत आणि जोडीदार शोधून देणं, अशा पद्धतीनं पोर्तुगाल सरकारने व्यसनी नागरिकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.youtube.com/watch?v=ElxXXTpw8Cg

व्यसन केवळ नशेच्या पदार्थांचंच लागतं असं नाही. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, कफ सिरप, पॉर्न, सेक्स, जुगार, व्यायाम, धावणे, व्हिडिओ गेम्स अशा गोष्टींचंही व्यसन लागतं. व्यसनामध्ये दारू, इनहेलेंट्स, अफू, कोकेन आणि निकोटीन वा जुगार यांसारख्या वर्तनाचाही समावेश असू शकतो.

भारतात व जगभरात सध्या एकटेपणा हा संसर्गजन्य आजार झाला आहे. आणि जिथं एकटेपणा आहे, तिथं व्यसनाचा शिरकाव होतोच. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.indiatoday.in/health/story/unmasking-loneliness-the-silent-epidemic-sweeping-india-and-the-world-2494802-2024-01-29

भारतात व्यसन हा एक मेंदूचा आजार आहे, हे सरकारी व्यवस्थेला व जनतेला पट‍वून देणं गरजेचं आहे. कुटुंब व्यवस्था ही व्यक्तीची व त्या अनुषंगानं समाजाची सर्वांत मोठी ताकद आहे. घरात संवाद वाढवणं, व्यावहारिक कोरडेपणा न शिकवता नात्यात भावनेचा ओलावा कसा जपता येईल आणि मानवी दया, सहसंवेदना या गोष्टी कशा रुजवता येतील, याची नितांत आवश्यकता आहे.

जात, भाषा व धर्म यांच्या आधारावर चालणाऱ्या आपल्या समाजात ‘आपण विरुद्ध ते’ची शिकवण घरातून दिली जाते. त्यामुळे ‘आपला’ नसेल त्याला काही सांगू नये, असं समजलं, सांगितलं आणि मानलं जातं. अशा समाजरचनेत सहसंवेदना (empathy) विकसित होण्याला अनेक मर्यादा पडतात. सहसंवेदना हा मानवी नात्यांचा पाया आहे. त्यामुळे एकमेकांना कधीही न ओळखणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात. अधिक माहितीसाठी पहा -

https://www.youtube.com/watch?v=l80zgw07W4Y&t=73s

आपल्याकडे उच्चशिक्षित वर्गातदेखील या विषयावर मोकळेपणानं बोललं जात नाही. त्यामुळे आलिशान घर, आधुनिक मोबाइल फोन आणि कार असली म्हणजे आपण ‘आधुनिक’ झालो, हा एक गैरसमजच आहे. आजच्या अति वेगवान युगात वाढत्या वयातील मुला-मुलींना समजून घेण्याला प्राथमिकता द्यायला हवी. पुण्या-मुंबईतील अनेक मोठ्या महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सिगरेट पिणार्‍या मुली दिसतात. पुण्यात काही ठिकाणी झिंगलेली मुलं-मुली नको त्या अवस्थेत दिसणंदेखील स्वीकारलं जातं.

नशा करणं, व्यसन लागणं हे खरं तर आपल्या देशाला कोणत्याच दृष्टीनं परवडणार नाही, कारण आपण युरोप किंवा अमेरिका नाही. आपलं मनुष्यबळ हीच आपली सर्वांत मोठी ताकद आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हीच ताकद कमकुवत होताना दिसत आहे. व्यसन एकटं राहत नाही. त्यातून असुरक्षित शरीरसंबंध आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यादेखील निर्माण होतात.

पेरीसारख्या गुणी अभिनेत्याचं झालेलं नुकसान बघितल्यावर व्यसन कोणाच्याही वाट्याला येऊ नये असंच वाटतं. व्यसनातून बाहेर पडणं काही वेळा शक्य आहे, पण नेहमी नाही, म्हणून व्यसन जीवघेणं आहे. ते लागूच नये, यासाठी जमेल ती काळजी आधीपासून घ्यावी. बोअरिंग वाटत असले तरी सांभाळून घेणारी मित्र-मैत्रिणी आवश्यक आहेत. पार्टी करणाऱ्या, नको ते धोके घ्यायला लावणाऱ्या मंडळींपासून चार हात लांब राहावं. शरीराची व मनाची काळजी घ्यावी. रोज वेळेवर जेवण व पुरेशी झोप घेणं, हा नियम हवा. छंद जोपासावेत. मन मोकळं करायची सवय लावावी. त्यासाठी लिखाणाचाही उपयोग होतो. निसर्गात वेळ घालवावा.

आपल्याला मिळालेल्या आयुष्याचं काय करायचं, ही आपली जबाबदारी आहे. आयुष्य सुंदर आहे, फक्त आपण ते कसं जगतो, यावर अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी पहा -

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा