आत सुफी संगीतावर प्रयोग चालू आहेत आणि बाहेर रस्त्यावर बॉम्ब फुटतायत. दहशतवादी हल्ले होतायत. लोक मरतायत...
कला-संस्कृती - सतार ते रॉक
सौरभ नानिवडेकर
  • रोहील हयात (मध्यभागी) आणि इतर पाकिस्तानी गायक-गायिका
  • Sat , 20 July 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti सतार ते रॉक रोहील हयात Rohail Hyatt कोक स्टुडिओ Coke Studio

महत्त्वाची सूचना

खालील लिखाणातील काही मतं आपल्याला प्रक्षोभक वाटू शकतात; आपल्या विचारांना आणि आदर्शांना सुरुंग लावू शकतात. तरी वाचकांनी आपल्या विवेकबुद्धीनं वाचन करावं. उद्या जर भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालंच तर सगळ्यात आधी मी बंदूक घेऊन सीमेवर जाईन...

.............................................................................................................................................

अमीर खुसरोनं बाराव्या शतकात लिहिलेली ‘दमा दम मस्त कलंदर’ ही एक फार सुंदर सुफी कव्वाली किंवा भजन. ठसकेबाज चाल आणि तसंच ठसकेबाज, रांगडं संगीत असलेली. ती अशीच एकदा रेडिओवर ऐकली आणि खूपच आवडली. मग नेहमीप्रमाणे मायबाप youtubeवर सर्च केलं. तिथं या कव्वालीच्या जुन्या ऑडिओ रेकॉर्डिंगपासून ते लेटेस्ट फ्युजनपर्यंत ढिगभर व्हिडिओ समोर आले. असंच ऐकता ऐकता एक Mtv coke studioचा पण व्हिडिओ दिसला, तो लावला.

नेहमीप्रमाणेच coke studioमध्ये असतात, तशी बँड, ड्रमसेट, की बोर्ड, गिटार, व्हायोलिन या विदेशी वाद्यांबरोबरच पेटी, तबला, घटम, सितार अशी आपली देशी वाद्यं. तसंच coke studioची ट्रेडमार्क असलेली लाल रंगसंगती, लाल प्रकाश सगळीकडे पडलेला. सगळं ओळखीचं वातावरण. पण सगळेच चेहरे अनोळखी. म्हटलं, काय एवढं ढीगभर व्हिडिओ आहेत coke studioचे, असेल त्यातलाच कुठलातरी एक. व्होकल्सला एक गायिका- ती सुनिधी चौहानच वाटली मला आधी - आणि तिच्या शेजारी एक कुडता-पायजमा घातलेला, डोक्यावर काबुली फेटा बांधलेला रागीट आणि राठ चेहऱ्याचा दाढीवाला पुरुष गायक. तो तर अगदी अफगाणिस्तानातल्या जिहादी टोळीचा प्रमुखच वाटत होता. जरासा लादेनसारखाच वाटत होता.

बऱ्याचशा coke studio फ्युजनसारखं हे गाणंही फारच सुंदर होतं. दाढीवाल्या गायकानं आधी वेगळ्याच कुठल्यातरी भाषेत एक गाणं म्हटलं. फारच जोरकस आणि ठसकेबाज असं. हिंदीमिश्रित उर्दूत गायिका त्याला साथ करत होती. कोरसची साथ करायला दोन फारच देखण्या मुली होत्या. गायकाच गाणं झाल्यावर गायिकेनं मी जे गाणं ऐकायला व्हिडिओ लावला, ते ‘दमा दम मस्त कलंदर’ हे गाणं गायलं. त्यात मध्येच दाढीवाला गायक तिला साथ करत होता.

गायकाबरोबर आलेला त्याचा शागीर्द हातात कोणतं तरी वाद्य घेऊन धुंदीत असल्यासारखा नाचत होता. हे सगळं संपता संपता मीही त्या धुंदीत तरंगत होतो. शेवटी शेवटी वाद्यांचा आणि आवाजाचा जोर जसा वाढत होता, तसं वाटत होतं की आता हा दाढीधारी बाबा त्या धुंदीतच एके 47 काढून एकदमच गोळ्या झाडील की काय! पण तसं काही घडलं नाही. मी मात्र पुढचे दोन आठवडे त्याच गाण्यावर काढले. तो व्हिडिओ जरी coke studioचा असला तरी चॅनेलचं नाव होतं- रोहील हयात (Rohail Hyatt). प्ले लिस्टमध्ये चांगले शंभरेक coke studioचे व्हिडिओ दिसत होते. कोण हा शौकीन म्हणून चॅनेल पेजवरच्या ‘about’मध्ये बघितलं आणि उडालोच. तिथं ‘coke studio pakistan season 1-7’ असं लिहिलेलं होतं. मनात अचानक एक सणक आली. मघाशी आवडलेलं गाणं आता एकदम नावडायला लागल्यासारखं वाटलं… पण काही क्षणच.

.............................................................................................................................................

दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse

.............................................................................................................................................

पाकिस्तान आपला सख्खा शेजारी आणि नंबर एकचा शत्रू. सीमेवरचं वातावरण नेहमीच तणावाचं. त्यात रोज काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपले जवान मारल्याचा बातम्या. पाकिस्तानचं अंतरंगही असंच पोखरलेलं. लष्कराच्या आणि धर्मवाद्यांच्या मध्ये ताणलं गेलेलं राजकारण आणि स्वतः दहशतवादाचा बळी ठरल्यामुळे समाजाची, अर्थकारणाची लक्तरं झालेली. संपूर्ण पुरुषप्रधान संस्कृती असलेला धर्मवेडा समाज. स्त्रियांचं आयुष्य तर ‘चूल आणि मूल’ यांच्यापर्यंतच, अशीच आपली पाकिस्तानबद्दलची समजूत.

पाकिस्तानातले बडे गायक आपल्याकडे हिंदी चित्रपटात गाणी वगैरे गाऊन जातात, हीच काय ती त्यांच्या संगीताशी ओळख. आणि इथं तर चक्क coke studioसारखं एक व्यासपीठ असावं आणि तेही इतकं भन्नाट, हे काही केल्या पटत नव्हतं. आणि त्यात पारंपरिक दाढीधारी लादेनसदृश पुरुष अशा झकपक वातावरणात शेजारी बुरखा नसलेल्या आणि पाश्चिमात्य कपडे घातलेल्या एका गायिकेबरोबर गाणं म्हणतोय, तेही अगदी सराईतपणे, न संकोचता. कोरसलाही देखण्या मुली. to be honest आपल्याकडचा कुठल्याही coke studio किंवा unplugedमध्ये मी एवढ्या सुंदर मुली बघितलेल्या नाहीत (खानदानी मुस्लीम सौंदर्याची बातच वेगळी, आदाब!). हे सगळं खरंच अविश्वसनीय वाटत होतं. आपली पाकिस्तानची ओळख, त्याच्याबद्दल मनात असलेली चीड आणि ‘एकदाचं संपवून का टाकत नाही त्यांनी’ ही आपली भावना. आणि इथं हे असलं काहीतरी अप्रतिम! रोहील हयातच चॅनल म्हणजे अलीबाबाची गुहाच सापडल्यासारखं झालं मला. मी पुरता अडकलोय त्या गुहेत.

जवळजवळ ४४ व्हिडिओज. त्यामधले काही मेकिंग आणि behind the scean सोडले तर बाकी नुसतं संगीतच. राहत फतेह अली, आतीफ अस्लम, मिशा शफी, अबीदा परवीन, शफाकत अमानत अली असे काही माहितीचे आपल्याकडे गाणरे कलाकार सोडले तर बाकी सगळेचा सगळे नवीन आवाज आणि चेहरे. खूपच रिफ्रेशिंग. कधीच पूर्वी न ऐकल्यासारखं आणि जरासुद्धा कंटाळवाणं न वाटणारं. एखादा व्हिडिओ लावलाय आणि गाणं आवडलं नाही म्हणून पुढचा लावलाय, असं क्वचितच व्हावं अशी परिस्थिती. कितीही आखडूपणा करायचं ठरवलं तरी प्रत्येक गाण्याला द्यावासा वाटणारा थम्पस अप!

त्यातच समजलं की, तो दाढीधारी लादेनसदृश्य पुरुष म्हणजे ‘आख्तर छनल झहिरी’. पाकिस्तानातल्या बलुच प्रांतातला. त्यांच्या भाषेत गाणारा. त्याचा म्हणण्याप्रमाणे ‘हमारे यहाँ जब बच्चा पैदा होता हैं, फिर एक तो वो गाता है, या रोता हैं. संगीत तो हमारे नस नस में हैं.’ हा असला भन्नाट माणूस, आणि मी याची तुलना करतोय लादेनशी! खरंच लाज वाटली स्वतःची!!

अशीच सगळी भन्नाट माणसं आणि अप्रतिम संगीत. बोहमिया नावाचा एक पाकिस्तानी-अमेरिकी रॅपर. त्याची पंजाबी रॅप प्रकारातली भन्नाट गाणी. आपल्याकडचे यो यो हानी सिंग वगैरे त्याच्यासमोर काहीच नाहीत. त्याचबरोबर राहत फतेह अली वगैरे लिजंड्स आहेतच. माझं खरं लक्ष वेधलं ते पाकिस्तानी महिला गायिकांनी. त्या सगळ्याच गळ्याबरोबर दिसायलाही खानदानी सुंदर (काय करणार! सगळ्या प्रकारच्या सौंदर्याला दाद दिल्याशिवाय बरं वाटत नाही!) त्या सलवार कमीजसारख्या पारंपरिक पोशाखाबरोबरच पाश्चिमात्य पोशाखातही गाणाऱ्या.

गाण्याबद्दल खुलेपणानं भरभरून बोलणाऱ्या (back stage interwive). बुरख्याचा वगैरे तर काही संबंधच नाही. हे असं काही पाकिस्तानात असेल असं कधी वाटलंच नव्हतं. स्त्रिया एवढ्या मुक्तपणे स्वतःला हव्या तशा वावरतायत हे बघून चागलं वाटलं. खुपसे संगीत प्रकार हे पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या बोलीतले आणि भाषेतले. गायकाही तसेच. कोरसमध्ये टाळ्यांवर कव्वाली म्हणण्यापासून ते गिटारवर सुफी संगीत वाजवणारे. त्यातलं सगळ्यात उच्च कोटीचं लई भारी, रेझ टू इन्फिनिटी असणारं म्हणजे ‘अमाय भाषा ईलीरे’ नावाचं बंगाली आणि उर्दू या दोन अतिसुंदर भाषांचं फ्युजन. ते म्हणजे काय बोलायची सोय नाही! खूपच कळकळीनं गायलेलं. मृदू आणि मुलायम. त्यासाठीचा सगळा ऑर्केस्ट्रा मात्र गोरा!

फॉरेनार सायबेरियातला. व्हायोलिन, मांडोलीन, एवढंच नव्हे तर हार्प वाजवणारी ग्रीक देवांच्या सभेत शोभून दिसेल अशी बाई. सगळं सगळं उच्च कोटीचं. प्रत्येक गाण्यावर कॉमेंट्सही खूपच भारी. ‘सारी रात जागा’ या गाण्यावर तर ‘5:20 on words pure orgasm’ अशी कॉमेंट. गाणंही त्याच तोडीचं. हळूहळू रंगत जाणारं, धुंद करणार. जगभरातल्या लोकांच्या भरपूर कॉमेंट्स. ‘I am from this country, that country and its very beautiful music’, ‘you are lucky’, ‘want to visit pakistan’, ‘pakistani music is great’ वगैरे अशा जगभरातून कॉमेंट्स. Edson F cordeaca या ब्राझिलियन माणसाची तर प्रत्येक दुसऱ्या व्हिडिओवर खूप आवडल्याची कॉमेंट.

आपले स्वदेशी बांधव तर पूर्ण बुडालेतच त्यांच्या प्रेमात. आणि अगदी स्पष्टचं बोलायचं तर हिंदूधर्मीय नावं असलेलेही. प्रत्येक गाण्यावर आपल्या देशबांधव आणि भगिनींच्या गाणं आवडल्याच्या कॉमेंट्स आहेतच. एक तर म्हणतोय ‘call me anti nationalist if you want but pakistan coke studio is lot better than indian one’. एक मुलगी तर म्हणतीये, ‘I wish we were one country’. आणि पुढे राडल्याचा ईमोजी. आणखी अशा खूप साऱ्या कॉमेंट्स

आणि खरंच ते तयार करणारी माणसं ही तशीच त्याच्यात बुडालेली. आणि चॅनेल ज्याचा नावाचा आहे, तो रोहील हयात दुसरा-तिसरा कोणी नाही तर या सगळ्याचा प्रोड्युसर. सगळ्यांना एकत्र आणणारा आणि असल्या वेडावणाऱ्या धून बनवणारा.

रोहील स्वतः पूर्वश्रमीचा ‘vital signs’ आणि ‘जुनुन’ या पाकिस्तानी बँडसचा मेंबर. त्यांचा जॉनरही सुफी रॉक वगैरे. रोहील स्वतःला हिप्पी आणि जिप्सी चळवळीतला मानतो. तशीच दाढी आणि केस वाढवलेला. तो म्हणतो, “post 9/11, I did wake up and I wanted to discover who we really are and which part of world we are in and what our history might be. That for me was an Awakening. That we are Hindus, we are Aryans and now we are Muslims & god knows what else. We are melting pot of all these people and these cultures & they have brought their art forms over the years, their instruments and their ways & their philosophies. So that was liberating, and of course that led to process ofself discovery.”

आता असल्या ग्रेट विचारांचा माणूस याच्या मागे असेल तर हे सगळं भारी असणारच ना!

हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे कराचीच्या स्टुडिओमध्ये. पाकिस्तानचा वेगवेगळ्या भागातूनच नव्हे तर जगातून आर्टिस्ट आलेत. रेकॉर्डिंग-फिल्मइंग वगैरे सुरू आहे. मधुर आणि उत्कट अशा प्रेमाचा संदेश देणाऱ्या सुफी संगीतावर प्रयोग चालू आहेत. आणि बाहेर रस्त्यावर बॉम्ब फुटतायत. लोक मरतायत. तिथंच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानात बॉम्ब फुटतायत. दहशतवादी हल्ले होतायत. केवढा हा विरोधाभास!

एवढी वाईट परिस्थिती असूनसुद्धा कसं काय एवढं दैवी काहीतरी करू शकतात हे लोक? बहुतेक अशा वाईट आणि हलाखीचा परिस्थितीमुळंच एवढं काहीतरी ग्रेट तयार होत असावं. तो सगळा राग, दुःख या गाण्यातून बाहेर पडत असावं. आज नाही तर उद्या मरणारच आहोत, त्यामुळे जे काही करायचं ते उत्तमच, असं काहीतरी त्यांना वाटत असावं कदाचित.

इंग्रज जाताना नुसती नकाशावर एक रेघ ओढून गेले आणि आपण वेगळे झालो! पण खरंच आहोत का आपण वेगळे? का आपले लोक एकमेकांचा एवढा द्वेष करतात? दोन्ही देशांचं एकमेकाबद्दलचं राजकारण आहे का याला जबाबदार? का अमेरिकी अजेंडा आणि त्यांच्या शस्त्रास्त्र कंपन्या स्वतःचं भलं करण्यासाठी ठेणगी पेटती ठेवतायत?

राहता राहिला प्रश्न त्यांचा ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं ती म्हणजे ‘दि कोकाकोला कंपनी’. कोकाकोला वगैरे आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामध्ये कीटकनाशके असतात (म्हणून मी दारू घेतानासुद्धा पाण्यातूनच घेणं पसंत करतो) वगैरे गोष्टी पूर्ण मान्य आहेत. आणि coke studio भारी आहे म्हणून काही मी लगेच कोक पिणार नाही. पण त्यांनी जगभरात वेगवेगळ्या देशात हे जे कोक स्टुडिओ सुरू केले आहेत आणि लोकसंगीताला जी जागतिक मान्यता दिली आहे, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे!

त्यामुळेच उद्या जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलंच तर मी पाहिल्यांदा बंदूक घेऊन सीमेवर जाईन… आणि मला प्रश्न पडेल की नेमकी कोणावर गोळी चालवू? मला ‘देशद्रोही’ म्हणा हवं तर. पाकिस्तानचं संगीत, त्यात चाललेले प्रयोग हे नक्कीच आपल्यापेक्षा उच्च आहेत. आपले ए. आर. रहमान, शंकर एहसन लॉय वगैरेपेक्षा रोहील हयात नक्कीच ग्रेट म्युझिशियन आहे.

आणि कितीही नाही म्हटलं तरी जगाच्या नशिबानं हिटलरला चित्रकला, शिल्पकला यांची जाण होती. म्हणूनच पॅरिस, फ्रान्समधली सगळी चित्रं आणि शिल्पं वाचली. आपल्याकडे आहेत का असे राजकारणी? का ते नुसते हिटलरच्या इतर गोष्टीच फॉलो करतायत? त्यामुळे मला वाटतंय जर असा काही प्रसंग आलाच तर मी शांतीसाठी स्वतःवरच गोळी झाडून घेईन… म्हणजे पुढची काळरात्र मला बघावी लागणार नाही.

.............................................................................................................................................

मला व्यसन लावणारी काही गाणी - 

१) तोरी छब, २) लैला ओ लैला, ३) सेहेर, ४) दमा दम मस्त कलंदर, ५) बलमा, ६) सारी रात, ७) होर विनिवा होर, ८) अमाय भाषा इली रे...

.............................................................................................................................................

रोहील हयातच्या यू-ट्युब चॅनेलची लिंक - 

.............................................................................................................................................

लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.

 saurabhawani@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 28 July 2019

Sanjay Pawar, बुद्धिमताम् वरिष्ठम् असा एक पैलवान होऊन गेला तो तुम्हांस माहित दिसंत नाही. त्यास हनुमान म्हणतात. बुद्धिमताम् वरिष्ठम् हे प्रत्यक्ष रामाने केलेलं वर्णन आहे. पैलवान म्हंटलं की गुडघ्यातला मेंदू आठवतो, पण तुमचा त्यात दोष नाही. काय करणार, मेकॉलेछाप शिक्षणच खऱ्या महापुरुषांची ओळख शिकवंत नाही. बलोपासना तर दूरंच राहिली. आपला नम्र, गामा पैलवान


Sanjay Pawar

Thu , 25 July 2019

हा अवयवच तिथे नसतो हे सिध्द होतेय.


Sanjay Pawar

Thu , 25 July 2019

पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो,असे ऐकून होतो,पण हे पैलवान बघता हा अवयवच तिथे नस्तोच हे सि


Gamma Pailvan

Wed , 24 July 2019

सौरभ नानिवडेकर, तुम्ही हाती बंदूक घेऊन पाकिस्तानात गेलात आणि दिग्मूढ होऊन कुणाला गोळी घालू म्हणून विचारंत हिंडताहात असं दृश्य डोळ्यासामोत तरळलं. आणि ज्याम हसू आलं. ऐशप्पत काय सांगता हो तुम्ही. उद्या भारत पाक युद्ध पेटलं तर तुम्हाला हाती बंदूक घ्यायची आजिबात म्हणजे आज्जिब्बात गरज नाही. आपले शूर सैनिक व मोदी दोघे मिळून पाकिस्तान नष्ट करायला पुरेपूर समर्थ आहेत. तुमची सीमेवर काहीही आवश्यकता नाही. त्यापेक्षा घरभेदी माजलेत त्यांच्याकडे लक्ष द्या. तसंही पाहता पाकिस्तानी लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितलाच नव्हता. भारत तोडला तो भारतातल्या मुंबई, लखनौ, दिल्ली, अलीगड इथल्या पंचमस्तंभीयांनी. ते आजूनही भारतातच आहेत. तुम्ही पाकिस्तानात जाऊन काय दिवे लावणार आहात? तुम्हाला इतिहासाचा गंध नाही आणि चाललेत पाकिस्तानात मानवतेचे सेतू बांधायला. तुम्ही जे करताहात त्याला पढतमूर्खपणा म्हणतात. तो जरा आवरायला शिका. बाकी ते संगीतबिंगीत वगैरे चालू राहू द्या. त्याचा पाकिस्तानाशी संबंध जोडणे नको. एकदा का घरभेदी संपवले की नाचगाणी करायला भरपूर अवसर मिळेल. तस्मात चिंता नसावी. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......