अनेक अंगानं क्रांतिकारक असलेला तमिळ ‘कन्नथिल मुथमित्तल’ आणि केवळ कौटुंबिक ड्रामा असलेला मराठी ‘नाळ’!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • मराठी ‘नाळ’ आणि तमिळ ‘कन्नथिल मुथमित्तल’ची पोस्टर्स
  • Sat , 01 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कन्नथिल मुथमित्तल Kannathil Muthamittal नाळ Naal सुधाकर रेड्डी यक्कंटी Sudhakar Reddy Yakkanti नागराज मंजुळे Nagraj Manjule देविका दफ्तरदार Devika Daftardar

‘अमूधाऊम अनाऊम’ या तमिळ लघुकथेवर आधारित ‘Kannathil Muthamittal’ हा चित्रपट मनी रत्नम यांनी २००२ साली बनवला. ही कथा ‘अमुधा’ या गोंडस मुलीची आहे.

९० च्या दशकात श्रीलंका आणि तमिळ या भाषिकांमधील जोराचा संघर्ष सुरू असतो. तेव्हा तमिळ भाषिक असलेले शामा (नंदिता दास) आणि दिलीपान (जे. डी. चक्रवर्ती) यांचं लग्न होतं. काही काळानंतर श्रीलंकेतील सैन्य दिलीपानला मारून टाकतं, कारण तो तमिळ भाषिकांच्या छुप्या कारवाईत सामील असतो. मुळात त्यांना अपत्य नको असतं, इतकं भयाण वास्तव सिलोनमध्ये निर्माण झालेलं असतं. तेव्हा आपला जीव वाचवत गरोदर असलेली ‘शामा’ भारतात येते. तिथं ती अमुधाला जन्म देते. तिला अनाथाश्रमात सोडून ती परत आपल्या कामगिरीवर जाते.

पेशानं लेखक असलेला ‘थिरू’ (आर. माधवन) त्या अनाथ पडलेल्या अमुधाला दत्तक घेण्याचा विचार करतो. पण तो अविवाहित असल्यानं अनाथाश्रम त्यास नकार देतं. मग तो घाईघाईनं इंदिराशी लग्न करतो. आणि लग्न झाल्याबरोबर अमुधाला अनाथाश्रमात जाऊन दत्तक घेतो. पुढे एका सुंदर आयुष्याची सुरुवात होते. अमुधा मोठी होते, तिला थिरू समजावून सांगतो की, तिची खरी आई कोणीतरी वेगळी आहे. अमुधाची मूळ आईला भेटण्याची धावपळ सुरू होते. तिच्या कोवळ्या मनात मूळ आईची आस लागून राहते. थिरू आणि इंदिरा संयमानं घेऊन तिची तिच्या आईशी भेट घालण्याचा प्रवास सुरू करतात...

अमुधाला तिच्या आईशी भेटवण्यासाठी चाललेला थिरू आणि इंदिराचा प्रवास अशाच दहशतीच्या परिस्थितीत असलेल्या सिलोनपर्यंत पोचतो. तिथं अमुधाची भेट आपल्या मूळ आईशी, शामाशी होते आणि तेव्हा आईनं तिला एकटं का सोडून दिलं हे समजतं. अमुधाला सोडून देऊन शामा  श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांना सामील झालेली असते. तेथील तमिळ नागरिकांच्या हक्कासाठी तिनं संघर्षाचा मार्ग निवडलेला असतो. नवी जन्माला येणारी मुलं मोकळ्या हवेत श्वास घेतील यासाठी तिनं आपल्या पोटच्या जीवाचा त्याग केलेला असतो. शामा अमुधाला भेटल्यानंतर तिच्या मायेचा पाझर फुटतो, पण ती ध्येयापासून डगमगत नाही. अमुधाला परिस्थितीची जाणीव होते. तिला तिच्या दोन्ही आईंशी ‘नाळ’ घट्ट झाल्याची अनुभूती येते. 

मुलाची दोन्ही आईंशी ‘नाळ’ घट्ट ठेवण्यात यशस्वी झालेला हा चित्रपट मनी रत्नम यांनी अतिशय भावनिक आणि सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन निर्माण केला आहे. मूळ आईचं मुलीला सोडणं, एका युवकानं त्या अनाथ मुलीला स्वीकारणं आणि त्याच्या पत्नीनं पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करणं... एकंदरीत कथेतील सर्व पात्रं अनेक अंगानं क्रांतिकारक भूमिकेत आहेत. त्यामुळे हा चित्रपट कमालीचा बनतो. 

अशाच आशयाचा मराठी ‘नाळ’ मात्र वरवरचा, पोकळ आणि सामाजिक जाणिवांची उणीव असलेला केवळ कौटुंबिक ड्रामा वाटतो. ‘नाळ’ एक चित्रपट म्हणून फारसा सरस ठरत नाही. चित्रपटातील भूमिका साजेशा असल्या किंवा पटकथा सुंदर असली तरी ती भावनात्मकदृष्ट्या मराठी चित्रपटांची ‘मूळ’ नाळ तोडण्यात यशस्वी ठरत नाही. कारण केवळ भावनांवर आधारित राहून बदलतं सामाजिक संदर्भ आणि बदलता काळ पकडता येत नाही. खरं म्हणजे त्याचा आवाकाच लक्षात येत नाही.

.

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................