‘अंकुर’ : ही कविता जीवनातील नश्वरतेचा दिलासा प्रेमात शोधणारी कविता आहे, असे मला मनापासून वाटते
ग्रंथनामा - झलक
फ. म. शहाजिंदे
  • ‘अंकुर’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 25 October 2023
  • ग्रंथनामा झलक अंकुर Ankur प्रेम Love

डॉ. निलेश नागरगोजे या कवीचा ‘अंकुर’ हा कवितासंग्रह नुकताच हरिती प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ कवी व लेखक फ. म. शहाजिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

या पृथ्वीतलावरील मानवी जीवन केवळ धर्मग्रंथांनुसारच नश्वर नाहीय, तर ‘अंकुर’ या डॉ. निलेश नागरगोजे यांच्या कवितासंग्रहातील ‘दवबिंदू’ कवितेनुसारही क्षणभंगुर आहे. हे त्रिकालाबाधीत सत्य सर्वांना माहिती आहे. पण असे असले, तरी हे जीवन हवेहवेसेच वाटते. कारण गवताच्या हिरव्यागार पात्यावरून वितळून अथवा घरंगळून जाताना दवबिंदूने त्या पात्याच्या मनात पुनर्भेटीची ओढ पेरलेली असते. खरं तर ही भेट कधी होणारच नसते. पण तरीही ती भेट होणार आहे, असे समजून जगायचे असते.

ही अशी कवीची जीवनविषयक समतोल साधणारी दृष्टी आहे. कारण कोवळ्या कळीला तारुण्याचा हा सुगंधी बहर कधीच संपू नये, असे वाटत असते. पण कालप्रवाहात रंग, गंध आणि तारुण्यही संपून जातच असते. कारण उगवणे व मावळणे, निर्माण होणे आणि संपून जाणे, हे तर या सृष्टीचे गमक आहे. म्हणून सर्वांचा अन्नदाता असलेल्या निसर्गाशी माणसांनी, प्राण्यांनी, पक्ष्यांनी त्यात आपल्या परिश्रमाच्या घामाचे सिंचन करायला हवे.

इथे सौहार्दाने जगण्यासाठी संहारक वादळापुढे गर्भगळित न होता, या कवितेतील चिमणीप्रमाणे आपल्या पिलांच्या मनात भरारी घेण्याचे तुफान पेरायला हवे. काही झाले असले, तरी संयमाने आलेल्या संकटांशी झुंज देत जगायला हवे. जसे या संग्रहातील शब्दांकुर आपल्या उगवण्यालाच आपला धर्म, आपल्या उमलण्यालाच आपली जात समजून सर्वांना सावली देत देत, ईश्वराला आपली पाने, फुले अर्पण करत आनंदाने जगत असतात.

या संग्रहातील प्रगल्भ जाणिवांच्या कवितांतून जगण्याची आसक्ती व्यक्त झालेली आहे. जगण्याच्या लालसेपोटीच तर या कवितेतील ‘दिवा’ दगडात देव नसल्याचे कधीच कोणाला सांगत नाही. कारण देव आहे, म्हणून तर त्याला तेल मिळत असते. या संग्रहातील जीवन म्हणजे जळणाऱ्या मनांचा उजेड आहे, धगधगत राहणाऱ्या अतृप्त मनाची अधुरी\अपुरी कहाणी आहे. मानवी जीवनातील ही नश्वरता आपल्या खाणाखुणांसह सर्वांच्याच आसपास वावरत असते. म्हणून प्रत्येक क्षण जगून घेतलेले बरे असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आजच्या जागतिकीकरणाच्या कोलाहलात माणूस ‘परात्मभावा’मुळे पार बदलून गेलेला आहे. त्यामुळे आज कोणीच कोणाचे सुखदुःख ऐकून घ्यायलाही तयार नाही. प्रेयसीचे प्रेमही हल्ली विकत घ्यावे लागते आहे. आज उजेड देणाऱ्या दिव्याच्या वातीतून उजेडाऐवजी अंधाराचे रोप उगवून येत आहे. त्यामुळे आता माणसात संतवृत्तीचा दुष्काळच पडलेला आहे, असे या कवीच्या प्रतिभेचे उन्मेष शब्दांच्या रूपांनी रसिक जाणीव समृद्ध करतात.

मृत्यू अटळ आहे अन् अटळच राहणार आहे. तरी मृत्युला आव्हान देता येईल का? ज्यांना कृष्ण लाभलेला आहे, अशी अर्जुनासारखी माणसंही नवे काही करायला आज कचरताहेत. तर मग झाडांच्या पानांसारखी थरथरणारी सामान्य माणसं काय करणार आहेत? ते तर इतरांचेच जगणे जगत असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःचे, स्वतःच्या मनासारखे जगणे राहूनच जाते. म्हणून आयुष्य म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येक काळातील कलावंतांना पडत आलेला प्रश्न आहे, या प्रश्नाच्या शोधातूनच साऱ्या ललितकलांचा जन्म झालेला आहे. तरी पण मानवी जीवन म्हणजे काय? ते नेमके अजून तरी कळलेले नाही. तरीही जीवनाचा शोध घेणे थांबता थांबत नाही.

म्हणून कवीने आपल्या खास अनुभूतीतून जीवन म्हणजे काय ते सांगितले आहे-

‘आयुष्य म्हणजे काय?...

चैत्राच्या पालवीत नव्याने

एक स्वप्न उलगडायचं....

अन् एके दिवशी गळून खाली

पाचोळ्यागत पडायचं....’ (‘आयुष्य म्हणजे काय?’)

मानवी जीवनाचा शोध घेताना या कवीला जीवनाची क्षणभंगुरता जाणवते, हे खरे असले तरी, त्याच वेळी त्याला असाही प्रश्न पडतो की, या पृथ्वीतलावरील जीवनात एवढी प्रचंड नश्वरता भरलेली असतानादेखील जीवन जगण्याची आसक्ती का बरे सुटता सुटत नसावी? त्याचे उत्तर त्याला प्रेमभावात सापडते. म्हणून कवी उत्कटतेने आपल्या प्रेमभावाचा आविष्कार करतो..

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या संग्रहातली प्रेमकविता हळवी असून भोळी आहे. माळरानावरील रानफूल निळ्याशार आकाशाच्या प्रेमात पडून झुलते, नटते, हसते, गाते, पण आकाश काही त्याच्या प्रेमाची दखल घेत नाही… तरीही ते अजिबात खट्टू न होता आकाशासाठीच झुरत राहते… असेच या कवीचेही प्रेम आहे.

तो लग्नासाठी म्हणून मुलगी पाहायला जातो अन् गालावर रुळणाऱ्या बटेला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो. म्हणजे हे प्रेम नुसतेच हळवे, भोळे नाही, तर ते साधे, सरळ आणि सहजही आहे. त्यामुळेच तर त्याला तिच्या वेगवेगळ्या रूपांतल्या भाववृत्तींचा पुनःपुन्हा भास होत राहतो. तो आपल्या प्रेमात लज्जेने चूरचूर झालेल्या या तरुणीचं रूप पाहून, आपली प्रेमकथा फुलवत राहतो. या उत्कट प्रेमात कवीला एकरूपता जाणवू लागते, ती अशी -

‘तुला मिठीत घेऊनी मी संपलो

क्षणाक्षणा ती रात्र सरूनी गेली

जरी ओठांवरी तुझ्या खुणा

ती रात्र येणार का पुन्हा।।’ (‘ती रात्र येणार का पुन्हा’)

अशा प्रकारे जिच्यावर जीव ओवाळून टाकलेला आहे, तिच्या आठवणींचा पीळ त्याच्या अंत:करणाला पडत राहतो. म्हणून तो तिला लाडे लाडे विनवतो की, आपल्यातील परक्या, अनाथ, अबोल क्षणांना संपवूयात. आणि मग परत एकदा आपल्या दोघांच्या आयुष्याचे गोड स्वप्न गिरवायला काय हरकत आहे? मग तो तिच्या मौनातल्या संमतीने तिच्या सौंदर्याचे सोनेरी महाल बांधायला लागतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे सारे ऋतू तिच्या नक्षत्रासारख्या सौंदर्याला पाहण्यासाठी तर बदलत असतात. जुन्या होत जाणाऱ्या क्षणांनाही तिच्या सौंदर्याला पाहून जिवंत व्हायचे आहे. कळ्यांनादेखील तिच्याकडूनच कस्तुरी गंध घ्यायचा आहे. आता तर नक्षत्रांनाही तिच्या सौंदर्याची ईर्ष्या होऊ लागलेली आहे, ही या संग्रहातील रम्य अशी रमणीयता काव्यात्मक आहे. कारण या भोळ्या प्रेमात ती दोघं एकरूप झालेली आहेत, ती अशी-

‘माझ्यातला मी संपणे अन्

तूच उरणे चूक नाही’ (‘प्रेम’)

म्हणून ही कविता जीवनातील नश्वरतेचा दिलासा प्रेमात शोधणारी कविता आहे, असे मला मनापासून वाटते.

कवीने गांधी अजूनही जिवंत कसे आहेत, बाजीप्रभूंची छाती अजिंक्य कशी राहिली आहे, ते सांगून शिवरायांची आजही कशी आवश्यकता आहे, याची उत्कट अनुभूती काही कवितेतून व्यक्त केलेली आहे. काही कवितेतून शेतकरी राजाच्या हालअपेष्टांचे पाढे वाचले आहेत. काही कवितांतून शेतकऱ्यांना कराव्या लागत असलेल्या आत्महत्या, त्यांच्या मुलांचे टांगणीला लागलेले भवितव्य, दुष्काळाने त्यांची होणारी दाणादाण आणि तरीही त्यांच्या सारवलेल्या साध्या घरात प्रचंड श्रमानंतरही वाहत असलेला मायेचा पाझर शब्दबद्ध झालेला आहे. कवीने आपली, अजूनही खेड्याशी जुळून असलेली नाळ, अशी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केलेली आहे.

अदभुत, मंतरलेली, स्वप्नांचे ओझे घेऊन सतत धडपडत राहणारी मुंबई अत्यंत जादुई नगरी आहे; हे कलंदर अन् बिलंदर लोकांचे शहर मानवतेच्या वाटेने प्रवास करते आहे, अशी या कवीची जाणीव आहे. अशाच काही जाणिवा जखडून टाकलेल्या करोनाविषयीही आहेत. खरं तर अचानकच आलेल्या या नव्या, अनोळखी करोनाशी प्रत्येक जण लढत लढतच टिकलेला आहे. या काळात मास्क लावणे अनिवार्य झाल्याने, कोणत्याच प्रेमवेड्याला त्याच्या प्रियतमेला पूर्ण चेहऱ्यानिशी न्याहाळता न आल्याने, सर्वच प्रियकरांनी चीनला मनोमनी खूप खूप शिव्या दिलेल्या आहेत. या कवीकल्पनेने आपल्या ओठांवर हसू येतं, पण शेवटी करोना व्हायरस की शस्त्र, हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे. तेव्हा कवीला आपल्या टकलाचं झालेलं रूंदीकरणही जाणवतं. त्यामुळे तो ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ‘ईश्वरा! या आयुष्यावर दहा वर्षांचा बोनस देऊनच टाक’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या कवीने आपल्या जगण्याबरोबरच आपल्या कवितालेखनाची भूमिका मांडलेली आहे. त्याने नेहमीच जिथे जे कमी पडलेले आहे, तिथे ते उधळून दिलेले आहे. आभाळाचा आनंद असलेल्या पावसाच्या थेंबात कवीने आपले अश्रू मिसळून टाकलेले आहेत. काळोख सांडणाऱ्या प्राजक्तात आपला प्रकाशमय देह वितळून टाकलेला आहे. दु:खांनी पेटून उसळलेल्या सागरात तो लाट होऊन मिसळून गेलेला आहे. अशा या कवीला अजूनही जात, वर्ण, वंश यांसारखे भेद संपलेले नाहीत, याची तीव्र खंत वाटते. त्यामुळे त्याला हे लोक -

‘हसतात लोक

रूसतात लोक

कधीच कोणाचे

नसतात लोक

चुकतात लोक

झुकतात लोक

उन्हात चांदणे

विकतात लोक’

असे आहेत, असे लिहावेसे वाटते.

या कवीने आपल्या ध्येयमार्गाने प्रवास करण्याचा निर्धार केलेला आहे. म्हणून त्याची कविता निवडक व वैशिष्ट्यपूर्ण शब्दाला शब्द जोडत जोडत निघालेली आहे. शब्दच शब्दापुढले अर्थ सांगताहेत. शब्दच या कवितेची लेकरे आहेत. ती कल्पनाशक्तीच्या फांद्यांवर वस्ती करणारी पाखरे आहेत. देवघरातील फुलांना कविता गुंफत राहते, हळव्या नाजूक अंतर्यामीच्या भावनांची भावचित्रे आपल्या शब्दकुंचल्यांनी रेखाटत असते.

या आश्वासक कवितांचे मराठी वाचक नक्की स्वागत करतील.

‘अंकुर’ - डॉ. निलेश नागरगोजे

हरिती प्रकाशन, पुणे | पाने - १०४ | मूल्य – १५० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/bfwI5

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......