काव्यविषयाच्या नवजाणिवेच्या अनुषंगाने रेगे सर्वार्थाने नवकवी ठरतात, परंतु नवकाव्याच्या अग्रतेचा मान, नवकाव्याच्या प्रवर्तकतेचा मान रेग्यांना देता येणार नाही
ग्रंथनामा - झलक
राजशेखर शिंदे
  • ‘पु. शि. रेगे यांच्या कवितेचा शोध’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2023
  • ग्रंथनामा झलक पु. शि. रेगे यांच्या कवितेचा शोध राजशेखर शिंदे Rajshekhar Shinde पु. शि. रेगे P. S. Rege

‘पु. शि. रेगे यांच्या कवितेचा शोध’ हे प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांचे पुस्तक नुकतेच हर्मिस प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

पु. शि. रेगे मराठी काव्यपरंपरेमध्ये एक वेगळे कवी आहेत. त्यांच्या कवितेचे बोट धरून चालणारे कोणी नाहीत. शब्दकळा, शब्दसोस आणि अटकर रचनेची आसक्ती पाहता पु. शि. रेगे हे मराठी काव्यामधील एकमेव कवी दिसतात. त्यांच्या कवितेतून घ्यावे; अनुकरण करावे असे बरेच काही आहे. शब्दकळेने मराठीची ‘काव्यभाषा’ अधिक समृद्ध होण्यास रेग्यांच्या ‘मऊ जवसाच्या फुलासारखी अलवार भाषे’ने मराठी कवितेला अधिक आशयघन, अधिक अर्थघन बनवले. त्यांना चारचौघांसारखी कविता करायची नव्हती. म्हणून रेग्यांनी आजूबाजूला न बघता थेट प्राचीन भारतीय परंपरेकडे आणि पाश्चात्यांच्या नवदृष्टीकडे लक्ष दिले. यातून त्यांच्या कवितेला चेहरा गवसला. इतका सुंदर चेहरा की, तो मराठी काव्यपरंपरेत उठून दिसतो. म्हणून नेमाडे, चित्रे, कोल्हटकर या नंतरच्या कवींना हा चेहरा आकृष्ट करून घेतो. त्यांची शब्दकळा त्यांना ल्हादवते.

रेग्यांनी १९३१ ते १९३४ या काळातील रविकिरण मंडळाची कविता वाचली नव्हती. केवळ गोविंदाग्रज काय तो त्यांनी वाचलेला होता. आपल्या समकाळात निस्तेज झालेल्या कवितेपासून ते हातभर लांबच होते. आणि १९३१ला त्यांचा ‘साधना आणि इतर कविता’ हा संग्रह प्रकाशित झालेला होता. त्यावरही समकालीन कवींचा प्रभाव दिसत नाही. कवितेची जाण वाढत असतानाच्या काळात ते परदेशात होते. त्या वास्तव्यात त्यांना तिकडची परंपरा पाहता आली, जाणून आली. त्याच वास्तव्यात ते अतिशय वस्तुनिष्ठ, तर्काधिष्ठित, पूर्ण बुद्धिवादी दृष्टीने अभ्यास करत होते.

रेगे आपल्या कालीन साहित्यसंस्कृतीच्या वातावरणापासून, भाषेच्या नित्य व्यवहाराच्या श्रवणापासून लांब होते. पाश्चात्य साहित्य- संस्कृतीच्या निरीक्षणातून आणि स्वसाहित्यसंस्कृतीच्या विचारचिंतनातून त्यांच्या साहित्यविषयक विचारात, निर्मितीमध्ये भाबडेपणा दिसत नाही. साहित्यविषयाची त्यांची स्वतःची पक्की धारणा झाली होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रेग्यांच्या त्या वास्तव्यात श्रीमती सर्निस यांनी रेग्यांची इंग्रजी कवितेची रुची वाढवली. सर्निसबाईंमुळे त्यांनी येट्स, हॉपकिन्स, एम. ई. हायमन वाचले आणि त्यांचे रचनाविशेष हेतुतः समजावून घेतले. आणि केट् साळ्झ या जर्मन मैत्रिणीकडून जर्मन भाषेतील कविताही त्यांनी समजावून घेतल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून रेग्यांना स्वतःचा सूर सापडत गेला. आपल्या समाजसंस्कृतीबाहेर काय चालले आहे, हे सजगतेने पाहण्याच्या दृष्टीमुळे त्यांची साहित्यविषक जाणीव आधुनिक झाली.

इंग्लंडला जाण्याआधीच येथील परंपरेची त्यांना चांगली जाणीव झाली होती. शाळेमध्ये असतानाच प्रिन्सिपॉल कथबर्ट यांनी साधे-सोपे कसे लिहावे हे शिकवले. शाळेत शिकत असताना त्यांनी ‘वृत्तदर्पण’ वाचले होते आणि ‘रघुवंश’, ‘शाकुंतल’, ‘कादंबरी’, ‘दशकुमार चरित’ही वाचले होते. जुन्या-नव्या कवितांचा असा अभ्यास पुढे रेग्यांनी जाणीवपूर्वक केला. त्यामुळे आपल्याला कविता लिहायची, ती कशी लिहावी, हे त्यांनी निश्चित केले. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख राहिली.

जुन्या मराठीत व पाश्चिमात्यांच्या नवतेजाचे संस्कार घेऊनच रेग्यांनी कविता केल्या. त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या परंपरेमधून परंपरा निर्माण न केलेली कविता केली. या सर्व परिपाकातून रेग्यांनी आपल्या कवितकडे डोळसपणे पाहिले आहे. डोळसवृत्तीच्या स्वीकारातून त्यांची कविता ही आधुनिक कविता ठरते व रेगे आधुनिक कवी ठरतात.

डॉ. सद्रे यांनी आधुनिकवाद ही संकल्पना स्पष्ट करून रेगे आधुनिक कवी ठरतात हे सिद्ध केले आहे. “नव्या वास्तवांच्या संदर्भात साहित्यिक एक तर प्रखर विद्रोहाचा पवित्रा घेतो किंवा जुळवून घेऊ पाहतो. दोन्हीला कारण नवे/ आधुनिक वास्तवच असते. कुणी प्रखर विद्रोहावर भर देतो, तर कुणी पारंपरिकाला नव्या संदर्भात अर्थपूर्ण करू पाहतो. दोन्ही प्रकारच्या प्रतिसादांना ‘आधुनिकवाद’ असेच म्हणावे लागेल. पण साहित्यात बंडखोरी, नकार इत्यादींना महत्त्व येते. तरीही काही साहित्यिक त्यांच्या बंडखोरीमुळेच लक्षणीय ठरतात, काहींना पारंपरिकाला नवे रूप देण्याची निकड वाटते. त्यातून त्यांच्या कलाकृतीमध्ये व्यक्तिविशिष्टता येते. शिवाय आधुनिकवाद्यांच्या कोणत्याही चौकटीमध्ये वा तत्त्वज्ञानाला बांधून घेण्याला नकार असतो. त्यामुळे आधुनिकवादी कलावंत व्यक्तिवादी आणि व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देणारा असतो. सामान्य माणसांच्या बाबतीतही हे घडत असते. साहित्यिकांना मात्र या बदलांचे व प्रतिक्रियांचे शब्दरूपदर्शन आपापल्या साहित्यकृतीमधून घडवणे शक्य होते. त्या बदलांना महायुद्धे आणि विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदललेल्या जगभराच्या जीवनाची आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे. पहिल्या महायुद्धाच्या आगेमागेच युरोपमध्ये मानवी जाणिवेत बदल व्हायला सुरुवात झाली होती. अर्थात आधी जीवनात व मग त्याच्या जाणिवेत बदल हा क्रम सगळीकडे कायमच असतो.

युरोपातील बदललेल्या मूल्यव्यवस्थेचा संबंध बुद्धिप्रामाण्यवाद, तर्कनिष्ठा या ‘एनलायटमेण्ट’च्या आधारभूत अशा मूल्यांच्या संदर्भात आणि एकूणच ‘एनलायटमेण्ट’च्या विरोधात होता. त्यातूनच तिकडे अतिवास्तववाद, अस्तित्ववाद इत्यादी चळवळी साहित्य व इतर कलांच्या क्षेत्रांत सुरू झाल्या होत्या. मर्ढेकर प्रभुतींच्या काव्यामध्ये अशा प्रकारचे जे बदल दिसतात. त्यांचा संबंध महानगरी जीवन आणि महानगरी संवेदनशीतेशी सरळत आहे. त्यांच्या कवितेपासून मराठी कवितेतील आधुनिकवादाची सुरुवात होते. मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि विंदा करंदीकर यांच्या कवितांमधून आधुनिकवाद प्रकर्षाने जाणवतो." (केशव सद्रे, २०००, ३७)

डॉ. सद्रे यथार्थपणे आधुनिकवाद ही संकल्पना स्पष्ट करत रेगे हे आधुनिक कवी आहेत, हे ठामपणे सांगतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आधुनिकतेची लक्षणे रेग्यांच्या कवितेत आहेत. पहिल्यांदा जाणवणारे लक्षण म्हणजे - उत्कटताहीन रचना. रेग्यांच्या कवितांपैकी एकही कविता उत्कट नाही. निर्मितीच्या वेळी त्यांची मनोवस्था अत्यंत उत्कट अशी असते; पण आविष्कारात ती उत्कटता नसते. शब्दाविष्कारात त्यांची उत्कटता गोठवली जाते. म्हणजे ‘मी’ भावबधिर असते, असे अजिबात नसते. रेग्यांचा आविष्कार सुघड, सौंदर्यदृष्टीचा असतो. त्यांच्या काव्यात दृश्य असते; पण त्या दृश्यात्मकतेवर नितळ दृष्टीने मात केलेली असते. त्यामुळे तदनुषंगी शृंगाररस उत्पन्न होण्याऐवजी शृंगारातील निरलस सौंदर्यतृष्णा उत्पन्न होते.

रेग्यांच्या काव्यातील आशय शोधले असता, त्यात एक आशयसूत्र हाती लागते. स्त्री-पुरुषसंबंध हेच ते आशयसूत्र. हा सनातन विषय रेग्यांच्या काव्यात सृजनरंग होऊन विविधतेने; वैचित्र्यपूर्णातेने नटलेला आहे. ही नायिका आपल्या अनेक तऱ्हांनी प्रियकराला भुलवते. तिचे पार्थिव, दैहिक रूप कवीमन शाब्दसंवेदनेने उपभोगते. ते धंदफुंद होते -

“जे मत्त फुलांच्या कोषांतुन पाझरलें,

निळ्या लाघवी दंवांत उलगडलें,

जें मोरपिसांवर सांवरलें,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें

पुन्हां एकदां

तशाच एका लजवंतीच्या

डोळ्यांमध्ये - डोळ्यांपाशीं

झनन-झांजरे मी पांहिलें ...

पाहिलें न पाहिलें.”  (‘गंधरेखा’, पृ. ५०)

प्रमत्त असा हा आविष्कार. ती एक उपभोग्य वस्तू नव्हे, हेच सांगतो. आधुनिकवादी दृष्टी, ही व्यक्तिवादी-व्यक्तिकोशी असले, तरी दृश्यरूपाला ती कलेवर समजत नाही; तर ती चैतन्यदायी आहे. रेग्यांची प्रतिभा निसर्गाने निर्मिलेल्या अगाध चैतन्यस्रोती स्त्रीरूपावर आसक्त आहे. परंतु त्या रूपस्वरूपाला न्याहाळताना त्या रूपाशी सायुज्य पावते. वास्तवात ती द्वंद्वातीत होते. ‘सावित्री’ कादंबरीतील राजम्माच्या गोष्टीतल्या मोराप्रमाणे. मोराबरोबर लच्छी रोज नाचू लागते. आणि मग मोर येईनासा होतो. कारण लच्छी मोरमय झालेली असते. कारण ‘मोर हवा तर मोर आपणच व्हासचं. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं’. (‘सावित्री’, पृ. ४) तद्वतच

‘तूं हवीस यांत न पाप;

पण हवी असतांना

नसावीस तूं, नकोच तूं, नाहिंसच तूं,

छे छे पापच तूं

यांतच पाप.

तू हवीस यात न पाप.’  (‘गंधरेखा’, पृ. ५३)

अशी अतिव्यक्तिवादी, आत्मभोगी, संज्ञास्रावी वृत्ती बनते, हे आधुनिकतेचे वैशिष्ट्य होय. रेग्यांनी विलक्षण आवेगाने स्त्रीचे शारीर, तिचे रूपलावण्या; पुरुषमनातील तिच्याविषयीची अविश्रांत आसक्ती, तिच्याविषयी अतृप्त आधीशी सौंदर्यतृष्णा आपल्या काव्यातून विविधतेने मांडली. ‘तूं हवीस यात न पाप’ अशी त्यांची नीतिविषयक दृष्टी होती. या नवदृष्टीतून नितळ प्रांजळपणा प्रकटतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रेगे आणि मर्ढेकर हे दोन नवकवी परस्परविरोधी प्रतिभेचे. रेग्यांच्या काव्यातील अनुभव दैहिक, सुंदर, प्रसन्न, जीवनोत्सुक असणारा, आत्मरत वृत्तीमधून प्रकटल्याने काही गूढ वाटणारा असा आहे. परंतु दुर्बोध-क्लिष्ट वाटावी, अशा मर्ढेकरांच्या कवितेसारखी रेग्यांची कविता नाही. मर्ढेकर भयानक भयग्रस्तता, ढासळती नीतिमूल्ये, हताशपण, कटुता, गतिशून्यता, परात्मता इत्यादी गोष्टींना आपल्या काव्यात आशयद्रव्य आणि आशयरूप देतात. मर्ढेकर संतसाहित्याला जवळ करतात. अभंग-ओवी, पादाकुलक अशा प्रकारची रचना करतात. ते भाषेची मोडतोड करतात. इंग्लिश शब्द उदा. ब्रेक, रोबो, पायनल, कॉकटेल, पिस्टन व त्यांपासून होणारे नामधातू उदा. पंक्चरणे, पॉलिशणे इत्यादी बिनदिक्कतपणे वापरतात. पण रेग्यांचे मराठी बोलीचे, मराठी बाण्याचे शब्द घडवतात-मढवतात. इंग्लिश काव्यात शब्दांना थारा नसतोच. ‘Total war’ला ‘अशेष युद्ध’ शब्द वापरतात, उदाहरणार्थ -

‘परस्परांचा निःपात कराया

मांडिलें जेथें अशेष-युद्ध-’ (‘गंधरेखा’, पृ. २४)

त्याचप्रमाणे computer साठी संमानक शब्द वापरतात.

‘संमानक कसा वापरायचा तें कळल्यावर

त्याची उत्तरं अधिकाधिक अचूक आणि फलादेशी होतात’ - (‘दुसरा पक्षी’, पृ. १०)

रेगे शब्दकळेबाबत छांदिष्ट आहेत. तसे आपल्या काव्याशयाला अत्यंत रसिकमनाने निवडतात. स्त्री-पुरुषसंबंधातील ‘सृजन’ हाच विषय ते निवडतात. त्यासाठी त्यांना भाषेची मोडतोड करावीशी वाटत नाही. संस्कृत-पौराणिक, लावणी या वाङ्मयात ते रमतात. शब्द आणि प्रतिमा हे घटक व शब्दरचना आणि पद्यरचना हे घटक रेग्यांच्या कवितेत वेगळ्या पातळीवर कार्य करतात. त्यांचा काहीसा आर्ष आणि ‘सुवर्णयुगीन’ दृष्टीकोन त्यांच्या विषयांत, शब्दांच्या निवडीत आणि सर्वसामान्य प्रतिमासृष्टीत दिसतो.

उलट, त्यांची आधुनिकता त्यांच्या पद्यरचनेत शब्दानुक्रमांत आणि (काही कवितांमध्येच फक्त) त्यांच्या प्रतिमांमध्ये दिसते. म्हणजेच एकीकडे रेग्यांनी एका अ-मराठी परंपरेमधून आपले संदर्भ घेतले आहेत, तर दुसरीकडे त्यांनी या संदर्भांना मराठीत मुरवून घेतले आहे. दुसऱ्या कोणाही आधुनिक मराठी कवीने अभिजात भारतीय परंपरेशी इतक्या स्वाभाविकपणे दुवा जोडलेला आढळत नाही.

“रेग्यांनी जर वृत्तेसुद्धा संस्कृत वापरली असती, तर पंडितकवी त्यांच्या कवितेला मराठीपणा लाभलाच नसता. उशिरा जन्मलेले एक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिले असते.” (दि. पु. चित्रे, १९६९, ३९) पण आता मात्र, रेग्यांनी आपल्या कवितेद्वारा एका विस्मृत परंपरेला आधुनिक मराठी कवितेत वाट करून दिलेली आहे. त्यांचा दृष्टीकोन कर्मठ, पुनरुज्जीवनवादी नाही. गांधीवाद किवा जनसंघी, भव्य नीतीचा पुरस्कार करणारे किंवा पुराणमताभिमानी ही कविता स्वीकारू शकणार नाहीत. तिच्यातला व्यक्तिवाद, स्वत्त्वनिष्ठा आणि नीती आधुनिक आहेत.

थोडक्यात, रेग्यांनी प्रेम हा एकच सनातन विषय आपल्या काव्यांतून नानातऱ्हेने मांडला. कधी प्रेम व्यक्त करत, कधी तिच्याशी लपाछुपी करत, कधी सायुज्य पावून, कधी तिला भोगत; भोगून; कधी दूरस्थपणे निरीक्षण करत शब्दसंवेदनेतून भोगत प्रतिमांकित कधी ‘तू हवीसच’- कधी तू नकोस - कधी तू हवीस यात न पाप - कधी तू पाप नाही, तू हवीस असा आपल्याशी आत्मसंवाद साधत, कधी तिचे देणे इतर अमाप होते, म्हणून तिला ‘पुष्कळा’ करून तर कधी रेषारेषांतून अबलकपणे लखलखणारी बनवून त्यांनी तिचा आविष्कार घडवला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या आविष्काराचे निरतिशय निरामय, सुंदर-लोभस रूपडे आहे. अंग अंग चेतविणारी बाजारू भावना नाही तर त्या आविष्कारात अर्वाचीन अभिरुचीचे दर्शन आहे. भाषेच्या अंगाने, भावाभिव्यक्तीच्या अनुषंगाने, तर्कशुद्ध युक्तिवादी भावप्रतिमांच्या अनुषंगाने, काव्यविषयाच्या नवजाणिवेच्या अनुषंगाने रेगे सर्वार्थाने नवकवी ठरतात.

परंतु असे असूनसुद्धा नवकाव्याच्या अग्रतेचा मान, नवकाव्याच्या प्रवर्तकतेचा मान रेग्यांना देता येणार नाही; रेगे जरूर नवकवी असले तरीसुद्धा. कारण प्रेम, स्त्री-पुरुषसंबंध यांच्या पलीकडेही जीवन आहे. ते अनेक समस्यांनी, ताणतणावांनी आणि वेगवेगळ्या समकालीन कोनेकंगोऱ्यांनी, आयामांनी भरलेले आहे. जीवनाच्या सर्वांगीण व्यापक व्याप्तीच्या जाणिवेला रेग्यांनी आपल्या काव्याशयात स्थान दिले नाही. ते स्थान मर्ढेकरांनी आपल्या काव्याशयात दिले. कवितेच्या आशय- अभिव्यक्तीला केशवसुतांप्रमाणे मर्ढेकरांनी पुनः नूतन केले. म्हणूनच त्यांना ‘दुसरे केशवसुत’ म्हटले गेले.

हा सर्व विचार करता नवकवितेचे प्रवर्तक मर्ढेकरच; रेगे हे नवकवी होय. कारण प्रवर्तकाला मागे तशी परंपरा निर्माण व्हावी लागते. मर्ढेकरांच्या तशी परंपरा निर्माण झाली. तशा पद्धतीने काव्यनिर्मितीची संवेदना मर्ढेकरांच्या कवितेने दिली. परंतु रेग्यांची कविता ‘निःसंग’ राहिली. रेग्यांची वृत्ती स्त्रीच्या लास्यसौंदर्यावर पुष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा केंद्र व काव्याचा परीघ स्त्रीकेंद्री राहिला. रेग्यांची काव्यवृत्ती स्त्रीच्या शरीरातील एक सावयव होऊन तिच्या सृजनावर लुप्त न होता आत्मरत होऊन तिच्यातील कळांना; विभ्रमांना, चवचाल नखरेलपणाला व्यामिश्र प्रतिमांमधून मूर्तरूप दिले. स्त्रीचे शरीर, तिचे रूप-लावण्य यांना सर्जन म्हणून पाहिले. स्त्रीला प्रेयसी- माता-आदिमाता आदी रूपात पाहिले.

कवीमनाला स्त्री - तिचे रूपसौंदर्य तिच्यातील गंधमंथरवी वृत्ती लुब्ध करून टाकते. हेच रेग्यांच्या काव्याचे आशयसूत्र ठरते.

‘पु. शि. रेगे यांच्या कवितेचा शोध’ : डॉ. राजशेखर शिंदे,

हर्मिस प्रकाशन, पुणे | पाने – १४६ | मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vivek Date

Wed , 18 October 2023

Pu Shi Rege was graduate of London School of Economics and while I was student of Economics at Elphinstoine College 1963-65, he was Principal and Professor. He was third class in teaching the subject for which he was paid for, taught nothing. In first lecture he declared to the class the subject he knows was over 30 years ago and shameless in declaring to the class that he will not teach us anything as such except for taking some mandatory session. I have no respect for his standing as poet, he was not paid for that. Other junior professor declared to the class the Rege will not teach anything and instead he will cover the subject along with another junior professor.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......