‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सामान्य नागरिकांना ‘खऱ्या भारता’ची ओळख करून देणारा आराखडा आहे. मला ठाऊक असलेल्या भारताच्या वास्तवाची ही एक प्रामाणिक नोंद आहे
ग्रंथनामा - झलक
 जोसी जोसेफ
  • ‘गिधाडांची मेजवानी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2023
  • ग्रंथनामा झलक जोसी जोसेफ Josy Joseph ए फीस्ट ऑफ व्हल्चर्स A Feast of Vultures गिधाडांची मेजवानी Gidhadanchi Mejvani भारत India

इंग्रजीतील नामांकित शोधपत्रकार जोसी जोसेफ यांच्या ‘A Feast of Vultures’ या प्रसिद्ध पुस्तकाचा ‘गिधाडांची मेजवानी’ या नावाने डॉ. नितीन हांडे यांनी केलेले मराठी अनुवाद नुकताच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला जोसेफ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

१.

बहुपदरी महामार्ग, पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेली मेट्रो, पॉश निवासी वसाहती आणि चकचकीत शॉपिंग मॉल्स, हे सर्व मागे पडत असताना माझ्या गाडीच्या रियर-व्ह्यू मिररमध्ये दिसत होते. रस्ता जिथे संपला, तिथे एक अनधिकृत गाव सुरू झाले. मी दिल्लीच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागात होतो.

एकेका खोल्यांची दाट वस्ती असलेली ही भव्य झोपडपट्टी एका अरुंद मार्गाने बाहेरच्या जगाशी जोडलेली होती. नुकताच पाऊस पडून गेला होता. फाटक्या कपड्यातील लहान मुले डबक्यात पाणी उडवत खेळत होती. छोट्या छोट्या दुकानांजवळ अनेक माणसे विनाकारणच उभी होती. मी माझा निष्फळ म्हणता येईल, असा शोध इथे सुरू केला.

२०१०च्या कॉमनवेल्थ गेम्स (CWG)चे यजमानपद दिल्लीला मिळालेले होते. एका स्पोट्‌‍र्स मार्केटिंग कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, कॉमनवेल्थ गेम्सच्या संदर्भात अनेक फायदेशीर करार पदरात पाडून घेणाऱ्या या कंपनीचे बहुतांश गुंतवणूकदार या कराल्ला गावातील रहिवासी होते. मी त्या भाग्यवान गुंतवणूकदारांनाच शोधत होतो.

एकोणिसाव्या कॉमनवेल्थ खेळांत ७१ देशांतील सहा हजारहून अधिक खेळाडूंनी २१ खेळ प्रकार आणि २७२ स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. भारताने आयोजित केलेली ही सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा होती. अनेक तज्ज्ञांचा असा अंदाज होता की, या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.

दिल्लीच्या गजबजलेल्या भागांवर बहुपदरी उड्डाणपूल बांधले गेले. शहरामध्ये जमिनीच्या खालून आणि वरून नवीन मेट्रो लाईन्सचे जाळे पसरले गेले. यमुना नदीच्या पात्रावर खास क्रीडापटूंसाठीच्या अपार्टमेंट्‌‍स उभ्या राहिल्या, जर्जर झालेल्या स्टेडियमचे चेहरेमोहरे बदलण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ आली, तसतसे दिल्लीतील बकाल दिसणारे भाग ‌‘व्ह्यू ब्लॉकर्स'ने झाकले गेले. हजारो भिकाऱ्यांना शहराबाहेर सरकारी वसतिगृहात हलवण्यात आले. परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वच्छ, सुंदर भारत सुसज्ज झाला होता!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्युबिली स्पोट्‌‍र्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे नाव, जिच्या अनेक प्रवर्तकांनी कराल्लामध्ये राहत असल्याचा दावा केला होता. निदान कागदपत्रे तरी तसे म्हणत होती. या प्रवर्तकांनी शहराला खेळांसाठी सज्ज करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेव्हा मला समजले की, ही कंपनी अशा व्यक्तीने स्थापन केली आहे, जिला सरकारी गुन्हे तपास यंत्रणांनी यापूर्वी अटक केली होती, तेव्हा मला या कंपनीबद्दल कुतूहल वाटू लागले. आपल्या दिवंगत वडिलांच्या वतीने लाच घेतल्याचा गुन्हा त्या व्यक्तीवर दाखल झाला होता. मी अनेक तास कसोशीने शोध घेतला, स्थानिक रहिवाशांची मदत घेतली. मात्र ज्युबिली स्पोट्‌‍र्सच्या प्रवर्तकांच्या यादीत असलेले पुरुष त्या गावात मी शोधू शकलो नाही. या हरवलेल्या व्यक्तींची बातमी देण्यासाठी मी माघारी फिरलो.

अशा घटना अर्थातच अपवादात्मक नव्हत्या. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठा आर्थिक व्यवहार असाच होत आहे. काल्पनिक भागधारक आणि तोतया संचालकांमार्फत असे संशयास्पद व्यवहार, रोख रकमेची देवाणघेवाण, करबुडवेगिरी आणि अगदी उघड गुन्हेगारी कारवायादेखील केल्या गेल्या आहेत. खरे तर या पद्धतीची कार्यप्रणाली आता केवळ आर्थिक जगापुरती मर्यादित राहिलेली नाही.

२.

काल्पनिक भागधारक आणि तोतया मतदारांमागची खरी शक्ती शोधण्यासाठी काही चिकित्सक कौशल्ये आवश्यक आहेत. अशी कौशल्ये तुम्ही आत्मसात केलीत, तर प्रभावी कामगिरी करून जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भारताच्या स्वच्छ, लोकशाही आवरणाखाली दडलेले खदखदणारे वास्तव समोर येईल.

या वास्तवाची वाढती व्यापकता माझी अस्वस्थता वाढवत आहे, ज्यामुळे हे पुस्तक लिहावे, असे मला वाटले. आपल्या लोकशाहीच्या हृदयावर अनैतिकतेने मोठा हल्ला केला आहे, भारतीय संस्थांची अवस्था मोडकळीस आली आहे. हे सर्व भ्रष्ट आणि अनैतिक घटक एकत्र येऊन भारतातील बहुसंख्य नागरिकांना लाचार करू पाहत आहेत. या लाचार जनतेला आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे. अशा मृत्यूंबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या एकसुरी बातम्या आणि भारतातील उच्चभ्रू लोकांची वाढती असंवेदनशीलता यामुळे मला २००७मध्ये या पुस्तकासाठी शोधपत्रकारिता करावीशी वाटली.

आधुनिक भारतातील या खेळाचे नियम अगदी सोपे आहेत, जरी त्यांची रचना ही भयानक गुंतागुंतीच्या चक्रव्यूहासारखी वाटत असली तरी! बनावट प्रवर्तक वापरणे, लाच घेणे, सुपारी देऊन खून पाडणे, मीडियाला धमकवणे, न्यायालयांमध्ये हेराफेरी करणे आणि सत्ता बळकावणे, यांपैकी काहीही या देशात व्यावहारिकदृष्ट्या चूक ठरत नाही. फक्त ‌‘पकडले जाऊ नका’ हा एकच महत्त्वाचा नियम आहे या खेळाचा! देशाच्या प्रत्येक नागरिकाबरोबरच परदेशी पाहुण्यांनादेखील हा अनुभव आलेला आहेच. मी केवळ या पुस्तकातून आपल्या सर्वांचा अनुभव शब्दबद्ध करत आहे. भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशाची ही दाहक पार्श्वभूमी मांडण्यासाठी मी अनेक वर्षे धडपडत आहे आणि तरीही या पुस्तकातदेखील ती मांडणी पूर्णपणे झाली आहे, असे मला वाटत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सहभागी असलेला प्रत्येक व्यक्ती ही भ्रष्ट व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम करतो. त्यांच्यापैकी प्रत्येक जण लोकशाहीच्या साधनांपासून गरिबांना वंचित ठेवण्याचे काम करतो. त्यांना दाद मागण्याची संधी नाकारण्यात हातभार लावतो. जगातील या सर्वांत मोठ्या लोकशाहीतील न्यायव्यवस्था अतिशय महागडी आहे, तिच्यावर प्रचंड ताण आहे. पोलीस भ्रष्ट आणि क्रूर आहेत. दूरचित्रवाणी आणि इतर इंग्रजी प्रसारमाध्यमे केवळ शहरांचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि राजकीय वर्ग सत्ता बळकावण्याच्या कटात व्यस्त आहे.

जेव्हा तुम्ही देशाला आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चालवणाऱ्या या लोकांच्या सालस खेळामागचा भयंकर नकली मुखवटा उलगडण्याचा प्रयत्न करता आणि त्यांच्या दुटप्पीपणाचे पुरावे एकत्र करता, तेव्हा ते तुम्हाला शांत करण्यासाठी नाना युक्त्या वापरतात. ते नेहमी धमकवण्याची क्रूर पद्धतच तुमच्यासाठी वापरतील असे नाहीत.

जगातील सर्वांत महागड्या बाजारांपैकी एक असलेल्या दिल्लीच्या खान मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील कॉफी शॉपमध्ये मी एका माजी पत्रकाराला भेटत होतो. हिवाळ्यातील सूर्य उंच काचेच्या खिडकीतून आत डोकावत होता, त्यामुळे ती दुपार खूप आल्हाददायी होती. मात्र माझ्या जोडीदाराला तिचा आनंद घेता येत नव्हता. अगदी कालपरवापर्यंत एका हिंदी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या या पत्रकाराने नुकतीच चांगल्या पगाराची नवी नोकरी स्वीकारली होती. मुंबईत राहणाऱ्या एका वादग्रस्त अब्जाधीशाचा प्रवक्ता म्हणून त्याने नवीन कार्यभार स्वीकारला होता.

फेब्रुवारीच्या थंडीचा देशाच्या राजकारणावर कोणताही प्रभाव पडला नव्हता, तिथे अनेक गोष्टी उकळत होत्या. एक एक घोटाळा उघड होत होता आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार अधिक गाळात रुतत चालले होते. २०११ हे वर्ष सुरू होते आणि सरकारला अजून तीन वर्षांचा कालावधी बाकी होता. मात्र देशात निराशाजनक वातावरण तयार होऊ लागले होते. काही महिन्यांतच देशातील विविध शहरांमध्ये निदर्शने होऊन भ्रष्टाचाराविरुद्धच्या संतापाचा मोठा उद्रेक होणार होता.

त्या दिवशी सकाळी भारताची व्यापारी राजधानी मुंबई इथून दोन तासांचा विमानप्रवास करून अब्जाधीशाचा हा प्रवक्ता मला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बॉसच्या वकिलांनी माझ्यावर आणि माझ्या वृत्तपत्रावर अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस बजावली होती. मी या अब्जाधीशाचा अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी जगताशी कसा संबंध आहे, याबाबत बातमी केली होती. हा दावा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे अधिकृत कागदपत्रे असून हे पुरावे योग्य त्या कायदेशीर व्यासपीठासमोर सादर करू, असे म्हणत आम्ही त्यांच्या कायदेशीर नोटीसला उत्तर दिले होते.

आमच्या या शांत संयमी प्रत्युत्तराने या उद्योगपती मंडळींना आपली रणनीती बदलण्यास प्रवृत्त केले असावे. त्यांच्या या पीआर मॅनेजरने आपल्या बॉसच्या वतीने प्रदीर्घ माफी मागून संभाषणास सुरुवात केली. ‌‘तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवणे ही एक चूक होती. बॉसने खरं तर त्याच्या कायदेशीर टीमला सांगितलं होतं की, तुम्हाला नोटीस पाठवू नका.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आम्हा दोघांनाही माहीत होते की, ही अनवधानाने झालेली चूक अजिबात नव्हती, ही तर रुळलेली कार्यपद्धती असते. जेव्हा कधीही भारतातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींवर टीका करणारा लेख येतो, तेव्हा असाच घटनाक्रम घडतो. गेल्या काही वर्षांत मला भारतातील काही मोठमोठे कॉर्पोरेट्‌‍स आणि शक्तिशाली लोकांकडून अशा डझनभर नोटिसा मिळाल्या आहेत. दिल्लीच्या वीज वितरण कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करणारा गुप्त लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित केल्याबद्दल, त्यापैकी एका कंपनीने जवळपास एक अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी नोटीस बजावली. माजी लष्करप्रमुखांनीदेखील माझ्यावर मानहानीची नोटीस काढली आहे, जेव्हा मी त्यांच्यावर टीकात्मक लेख लिहिला होता. मुंबई काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंहांचा सामान्य भाजी विक्रेता ते करोडपती, असा आश्चर्यकारक प्रवास कसा झाला, याचा जेव्हा मी मागोवा घ्यायला लागलो, तेव्हा तेदेखील चवताळून उठले होते. गंभीर सुरक्षा प्रकरणांवरील संसदीय समितीचे अध्यक्ष असणाऱ्या खासदाराने जेव्हा ती समिती सोडली, तेव्हा त्याचा मी रिपोर्ट बनवला होता. मात्र त्यांनी माझ्यावर लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकाराचा भंग केल्याचा आरोप करणारी नोटीस बजावली होती.

आपल्या बिनबुडाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण हा एक भरभराटीला आलेला उद्योग आहे. यामध्ये पीआर सल्लागार नेमले जातात. श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना न्यूजरूममध्ये त्यांच्या विरोधात तयार होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल रिपोट्‌‍र्सबद्दल सावध करणे, हे त्यांचे काम असते. अब्रूनुकसानीच्या नोटिसा तयार करणारे वकील असतात आणि नोटीस वगैरे देऊन काम न झाल्यास पुढची परिस्थिती हाताळणारे लोक असतात. श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींची संभाव्य पेचातून सुटका करण्यासाठी हे सर्व घटक नेमलेले असतात.

त्याने माफी मागितल्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हा त्या प्रवक्त्याने सांगितले, ‌‘तुमच्या लेखामुळे एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना मोठा हादरा बसला आहे, तरी माझ्या बॉसचे कुणाशी संबंध आहेत की नाही, याबाबत अधिक काही लिहू नका, अशी विनंती मी तुम्हाला करावी, अशी त्यांची इच्छा आहे.’

टू-जी मोबाइल नेटवर्क चालवण्याचा परवाना आणि रेडिओ स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी त्यांच्या कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले होते आणि त्यासाठी त्यांना गुन्हेगारी तपासाला सामोरे जावे लागत होते. आता ही कंपनी अरब देशातील गुंतवणूकदारांकडून सुमारे तीन हजार कोटी रुपये उभारण्यासाठी बाजारात प्रयत्न करत होती.

त्यानंतर प्रवक्त्याने आजूबाजूच्या टेबलवर नजर टाकली आणि कपाळावरील घाम टिपत तो कुजबुजला, ‌‘कार, घर किंवा इतर काहीही असो, तुमच्या सर्व गरजा माझे बॉस सांभाळू शकतात, हे मी तुम्हाला सांगावे, अशी त्यांची इच्छा आहे.’

मी काही क्षण शांततेत जाऊ दिले, त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका विस्तीर्ण आलिशान बंगल्याकडे बोट दाखवत विचारले, ‌‘तुम्हाला त्या घरांपैकी एक म्हणायचे आहे का?’ त्याने अतिशय आश्वासक प्रतिसाद दिला, ‌‘माझ्या बॉसला कमी लेखू नका. ते कशाचीही व्यवस्था करू शकतात.’ कॉफीसाठी कोणी पैसे दिले, हे मला आठवत नाही, परंतु मी लवकरच मीटिंग थांबवून बाहेर पडलो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशी ऑफर मिळाली, तर नवी दिल्लीतील प्रत्येक जणच माझ्यासारखा अस्वस्थ होईल असे नाही. दुसऱ्या एका प्रसंगी एक प्रसिद्ध वकील मला हॉटेल अशोका इथे भेटले. ते ज्या जिममध्ये जायचे, तिथे गांधी कुटुंबीयांसह इतर मान्यवर येत असत. नवी दिल्लीतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या शेजारी व्यायाम करण्यासाठी हे वकीलमहाशय भरपूर पैसा खर्च करत होते. ते मला त्यांच्या एका क्लायंटच्या वतीने भेटत होते. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा गैरवापर केल्याबद्दल मी एका कंपनीची चौकशी करत होतो. या कंपनीला एका राजकीय कुटुंबाचा पाठिंबा होता, ज्या कुटुंबाने उत्तरेकडील एका राज्यावर सत्ता गाजवली होती. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि इतर गुन्हेगारी कारवायांचा आरोप होता.

‌‘तुम्ही लेख लिहिला तर हे कुटुंब उद्ध्वस्त होईल. मात्र तुम्ही जर हा विषय सोडून दिला, तर हा विषय फक्त तुमच्या आणि माझ्यात राहील’, असे ते म्हणाले. हा विषय सोडण्यासाठी तीन कोटी रुपयांची ऑफर त्यांनी देऊ केली. जेव्हा मी तिथून उठून जायला निघालो, तेव्हा त्यांनी निरोप घेताना सांगितले की, देशाच्या न्यायव्यवस्था आणि राजकारणातील अनेक बडी धेंडे तो रोजच मॅनेज करत असतो... मी अशी संधी का जाऊ देत आहे, याचे त्यांना आश्चर्य वाटले. या वेळी मी बिलाची वाट पाहिली नाही, हे मला नक्की आठवते आहे.

३.

फॅन्सी हॉटेल्समध्ये आणि बंद दारांच्या आड मला दिसलेले हे खऱ्या भारताचे पैलू माझ्या रिपोट्‌‍र्समध्ये मांडण्याची संधी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे मला प्रत्येक वेळी देणार नव्हतीच. मात्र देशाच्या या आधुनिक व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय मला चैन पडणार नव्हते. या देशातील लोकशाही किती मजबूत आहे? किती न्याय्य आहे? या लोकशाहीचा रचनात्मक पाया गेल्या काही वर्षांपासून परिपक्व होत आहे का? पारदर्शक वातावरणात लढल्या जात असलेल्या निवडणुकांमुळे गरिबांची स्थिती सुधारत आहे का? लोकशाहीचे इतर स्तंभ जीर्ण, आजारी आणि कमजोर होत आहेत का? किंवा ते नाहीसे होत आहेत का? राजकीय वर्गांच्या दुटप्पीपणाला हे इतर स्तंभ वारंवार आव्हान का देत नाहीत? या प्रजासत्ताक देशाचा विध्वंस करण्याच्या एका भव्य कटात सर्व जण का अडकले आहेत? आधुनिक भारताचे मूल्यमापन सेल्फ सेन्सॉरशिप किंवा कोणत्याही प्रकारचा खोटा मुलामा न देता, धरणाअलीकडील नदीच्या संथ पाण्यालगत पहुडलेल्या माझ्या बालपणीच्या गावाला न फसवता, माझ्या मित्रांना न वगळता आणि या भव्य राजधानीच्या झगमगत्या ग्लॅमरच्या मोहात न पडता करता येण्याचा काही मार्ग असू शकतो का?

सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाचे भवितव्य ठरवणारी शहरी भारताची ही कहाणी अलिखित आणि अपरिचित राहिली आहे. समस्या कोणतीही असू द्या, कायद्याचे शिलेदार असलेले वकील जनमानस आणि प्रसारमाध्यमांमध्ये या समस्या पद्धतशीर हाताळतात. आपल्याला हवा तो संदेश लोकांपर्यंत पोचवतात. यासाठी लाच आणि बळाचा वापर करावा लागतो. योग्य लोकांना लाच दिली, तरच अब्ज डॉलर्सचे सौदे पार पडतात. राजकीय पक्ष त्यांच्या कामकाजासाठी निधी म्हणून काळा पैसा गोळा करतात. पैसे ओतल्यास माध्यमांमध्ये कव्हरेज उपलब्ध होत आहे. सशुल्क बातम्या हा अधिकृत व्यवसाय झालेला आहे. या देशाची दुरवस्था करण्यात प्रशासकीय अधिकारी राजकीय वर्गाला साथ देतात. ‌‘दलालीचा धंदा’ हा या भरभराटीला जाऊ पाहणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वांत यशस्वी व्यवसाय आहे. प्रत्येक बाब आणि प्रत्येक जण (काही सन्माननीय अपवाद वगळता) स्वत:ला बाजारात उपलब्ध करून देत आहे. तुम्हाला फक्त योग्य मध्यस्थ शोधण्याची आणि योग्य लाच देण्याची गरज आहे. लाचेचे वंगण लावल्यावरच ही गंजलेली सरकारी यंत्रणा हलत असते.

सरकारी यंत्रणा अशा प्रकारे गंजत जाण्याचा एकत्रित परिणाम धक्कादायक आहे. भारतातील गजबजलेली शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. जगातील सर्वांत जास्त बालकुपोषण आपल्या देशात आहे (पाच वर्षांखालील ४२ टक्के मुलांचे वजन कमी आहे). जगातील सर्वांत मोठी तरुणाई आपल्या देशात असली, तरी तिच्यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या खूप कमी संधी उपलब्ध आहेत. येथील ६० टक्क्यांहून अधिक लोकांकडे स्नानगृह नाही. ३३ कोटींहून अधिक भारतीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. दमनकारी आणि स्त्रीद्वेषी संस्थांकडून हजारो सामान्य रहिवाशांना दररोज छळ करून अपमानित केले जात आहे. हिंसा हेच आज एक सार्वत्रिक वास्तव झाले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बहुसंख्य भारतीयांच्या मते, त्यांचा देश फारसा प्रजासत्ताक नाही आणि लोकतांत्रिकदेखील नाही. नाहीतर उद्योजकांची पिढी सत्तेचा निर्लज्जपणे गैरवापर करून स्वत:ची भरभराट कशी करू शकली? आपल्या खासगी फायद्यासाठी निवडणूक प्रक्रियांमध्ये अफरातफरी करत काही लोक कायदेमंडळ आणि संसदेत शिरकाव कसे करू शकले? ज्या नेत्यांच्या अनैतिक राजकारणाच्या कथा जगजाहीर आहेत, ते सत्तेच्या खुर्चीवर नियंत्रण कसे ठेवू शकतात? सर्वोच्च न्यायालयाला ‌‘बेंच हंटिंग’ हा शब्दप्रयोग वापरून ताशेरे का ओढावे वाटतात? ‘पेड न्यूज’ हा उद्योग एवढा भरभराटीचा कसा काय झाला? उद्ध्वस्त केलेल्या अनाथाश्रमाच्या जागेवर एक अब्जाधीश आनंदाने घर कसे बांधू शकतो?

व्यवस्थेचे अध:पतन हे एक संकट आहे. मात्र श्रीमंत, उच्चभ्रू भारतीय हे संकट असल्याचे मान्य करणार नाहीत, कारण हा सर्व वर्ग, त्यात कदाचित आपणदेखील असू, हा या व्यवस्थेचा लाभार्थी आहे. भारत हा असा श्रीमंत देश बनला आहे, जिथे गरीब नागरिकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या देशाची धुरा ज्यांच्या हातात आहे, त्यांच्या कल्पनेतूनही नैतिकता आणि सार्वजनिक हित पूर्णपणे गायब झाले आहे. मी गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या सर्व बातम्या आणि रिपोर्टमध्ये हाच एकमेव सामाईक धागा आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राखीव असलेल्या डोंगरकपारीच्या जमिनीचे आपल्या मित्रांमध्ये वाटप करून टाकले, वॉर रूममधली गुपिते नौदल अधिकाऱ्यांनी पैशाच्या मोहापायी विकली, शहिदांच्या विधवांसाठी बांधलेले अपार्टमेंट कॉम्प्लेक्स राजकारणी, सैन्य अधिकारी आणि नोकरशहा स्वत: बळकावण्याचा कट रचतात. मी या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ काम करत आहे, त्यामुळे अशा उदाहरणांची यादी मोठी आहे.

जेव्हा एखादा घोटाळा उघडकीला येतो, तेव्हा प्रत्येक वेळी टीव्हीवर संताप आणि सार्वजनिक वादविवाद ऐकायला मिळतात. मात्र जेव्हा स्टुडिओचे दिवे बंद होतात, तेव्हा त्या कार्यक्रमात सहभागी झालेलेच पुढील कटाचे नियोजन करण्यासाठी बसतात. उघडकीला आलेल्या जवळजवळ प्रत्येक घोटाळ्यासाठी पडद्यामागे एक मोठी, खूप वाईट कथा असते.

आजवर न सांगितल्या गेलेल्या आणि न मांडल्या गेलेल्या आधुनिक भारताचे वास्तव मांडणाऱ्या कथा हेच मी हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य कारण आहे. पंतप्रधानांना दहशतवादी धोका असल्याचा आभास निर्माण करून गुप्तचर संस्था निरपराधांना त्यात अडकवते; एका अब्जाधीशाच्या सांगण्यावरून केंद्र सरकार बनावट बँक गॅरंटी स्वीकारते आणि आपल्याला मिळणाऱ्या मदतीची परतफेड तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करते; मोठ्या प्रमाणात मनीलाँड्रिंग केली असल्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, त्याने पुरवलेल्या संसाधनांवर एक नेता काळ्या पैशाच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू करतो. प्रत्येक न्यूजरूममध्ये अशा असंख्य बातम्या असतात, ज्यामध्ये १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाची खरी छबी टिपलेली असते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्या बातम्या कधीच प्रकाशित होत नाहीत.

राष्ट्र कसे कार्य करते आणि तेथील संस्था सामान्य लोकांची सेवा कशी करतात (किंवा सेवा करण्यात अपयशी कशा ठरतात), या विषयावरील माझ्या दोन दशकांच्या पत्रकारितेच्या कार्यावर आधारित अहवाल यापुढील पानांमध्ये मांडताना तुम्हाला माहीत नसलेली भारतातील खरी परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे. ‌‘इथे सर्व काही ‌‘बिकाऊ’ आहे, फक्त मध्यस्थाला पटवून काम करून घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते-ते देण्याची तुमची तयारी हवी,’ या माझ्या सिद्धान्ताला सिद्ध करणारे पुरावे मला सर्वत्र आढळून आले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४.

भारताची कहाणी अशी निराशाजनकच आहे का? नाही, असे मुळीच नाही. शहरांच्या महत्त्वाच्या चकचकीत परिसरात, गगनचुंबी इमारतींच्या फ्लॅट संस्कृतीत आणि उच्चभ्रू बंगल्यामध्ये तुम्हाला हे निराशाजनक चित्र पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे झटपट श्रीमंत होण्याचे प्रलोभन बाजूला सारून सर्वसामान्य भारतीय नागरिक प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि जागतिक पातळीवर आपली यशोगाथा तयार करत आहेत. या देशातील खेड्यापाड्यात सामुदायिक प्रयत्नांद्वारे सक्षमीकरणाच्या नवनवीन कथा लिहिल्या जात आहेत. माहितीचा अधिकार वापरून अनेक नि:स्वार्थी कार्यकर्ते हळूहळू, अगदी हळूहळू सरकारी कामकाजात एक विशिष्ट पारदर्शकता आणण्यास सरकारला भाग पाडत आहेत. या क्रूर राज्ययंत्रणेच्या विरोधात दलित, शोषित, वंचित गटांच्या संघटना वारंवार एकत्र येत आहेत.

जेव्हा मी या पुस्तकावर काम सुरू केले, तेव्हा भारतीय राजकारणात पैशाच्या जोरावर सत्ता ताब्यात घेणाऱ्या उच्चभ्रू वर्गाची नवीन पिढी उदयास आली होती. पुस्तक अर्धे लिहून झाले असेल, तोपर्यंत भ्रष्टाचारविरोधी चळवळ उभी राहिली आणि त्यातून एका नवीन राजकीय पक्षाचा जन्म झाला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष अगदी कमी वेळेत भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक बनला. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे सर्वांत मोठे लाभार्थी नरेंद्र मोदी होते. हिंदुत्ववादी आणि कॉर्पोरेट मंडळीच्या पाठिंब्याने त्यांना २०१४मध्ये प्रस्थापित विरोधी लाटेवर स्वार होऊन पंतप्रधान होता आले. त्यानंतर त्यांनाही भारताला स्थिरस्थावर करण्यात अपयश आले. सर्वाधिक तरुणाईचा हा तरुण देश धुसफूसतच राहिला.

हे पुस्तक लिहून पूर्ण होईपर्यंत हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचा (एचसीयु) विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा मुद्दा घेऊन दलित संघटना आणि समुदाय एकत्र आले होते. हा एक धगधगता मुद्दा आहे, ज्याला भारतातील डाव्या विचारसरणीचे उदारमतवादीदेखील योग्यरित्या हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. एचसीयुच्या पलीकडे संपूर्ण भारतीय राजकारणाच्या अवकाशातून विद्यार्थ्यांचे आवाज गर्जत आहेत. हे आवाज ताजेतवाने, समतावादी आणि दयाळू आहेत. जेएनयु (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी)मधील विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप, त्यानंतर पुन्हा एचसीयुमधील भडकलेला हिंसाचार, यांमुळे संताप आणि जनक्षोभ निर्माण झाला आहे. यामुळे भारत एका भव्य युवक चळवळीकडे जात आहे, असे मला वाटते. मुख्य प्रवाहाच्या राजकारणातील या कमकुवत गोष्टींविरुद्धची लढाई कदाचित ही पुढची पिढी लढेल आणि जिंकेलही!

‌‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सामान्य नागरिकांना खऱ्या भारताची ओळख करून देणारा आराखडा आहे, तो समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना आपापले उद्योगधंदे करता येतील. तसेच या देशातील परदेशी पाहुण्यांना इथे त्यांच्या सभोवताली असलेला गोंधळ समजून घेता यावा, यासाठी पुस्तकाची मांडणी उपयुक्त ठरेल. सैद्धान्तिक, शैक्षणिक मांडणीपेक्षा वेगळी, अशी ही एका पत्रकाराने राष्ट्राच्या स्थितीबद्दल केलेली शोधपत्रकारिता आहे. तरीही तो दुर्लक्ष करण्याजोगा टाकाऊ अहवाल नाही. मला ठाऊक असलेल्या भारताच्या वास्तवाची ही एक प्रामाणिक नोंद आहे.

‘गिधाडांची मेजवानी’ : जोसी जोसेफ

मराठी अनुवाद : डॉ. नितीन हांडे | मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने : २७२ | मूल्य : ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......