आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात
ग्रंथनामा - झलक
भालचंद्र नेमाडे
  • ‘साहित्य-संचित’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 September 2023
  • ग्रंथनामा झलक साहित्य-संचित Sahitya-Sanchit भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade

२०१६मध्ये पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड येथे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात झालेले विचारमंथन ‘साहित्य-संचित’ या पुस्तकाच्या रूपाने डी. वाय. पाटील विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहे. या पुस्तकाचे संपादन सुनील चव्हाण व श्रीधर लोणी यांनी केले आहे, तर प्रस्तावना लिहिली आहे प्रख्यात कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी. तिचं हे पुनर्मुद्रण...

.................................................................................................................................................................

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काळात मी आसामात करबी लोकांच्या वाल्मिकीपूर्वी चारपाचशे वर्षे जुन्या मौखिक रामायणाच्या संशोधन प्रकल्पावर काम करत होतो. अशा वेळी माझे मित्र पुण्याचे रा. सुनील चव्हाण यांचा अचानक निरोप आला की, ‘नेमाडे, तुम्ही साहित्य संमेलनाला कधीही जात नाही, हे माहीत असूनही डॉ. पी. डी. पाटील आणि आमची सर्वांची इच्छा आहे की, तुमची निदान एक मुलाखत आम्हाला मिळावी. त्यासाठी आपण असाल तिथे मंगला खाडिलकर येतील आणि त्या मुलाखत टेप करून घेतील. कळवा.’

आता इतक्या समजूतदारीने मला विचारले आणि विशेषतः माझे स्नेही रा. डॉ. पी.डी. पाटील, ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला अत्यंत आदर वाटतो, त्यांच्या कुशल देखरेखीखाली हे संमेलन देहू-आळंदीच्या परिसरात होणार आहे म्हटल्यावर मी रा. सुनील यांना होकार दिला आणि मंगलाताई खाडिलकर यांना गोहाती येथे येण्याचा पत्ता कळवला. संमेलनासाठी आखलेल्या कार्यक्रमांची तयारी उत्तम रीतीने चालू असल्याचे त्यांनी मोठ्या उभारीने सांगितले.

रा. पी. डी. पाटील यांच्या धुरीणत्वाचा मला चांगला अनुभव असल्याने ते काहीतरी लक्षणीय करतील, याची मला खात्री होतीच. ते स्वतः महाराष्ट्रभर हिंडून निमंत्रितांना, संस्था, ग्रंथालये, प्रकाशक, लेखक, लोककलाकार-कीर्तनकार, आदिवासी कलाकार अशा सर्वांना निमंत्रणं देत आहेत. देशातले ज्ञानपीठ प्राप्त हयात लेखक, नवे-जुने समीक्षक, पुस्तक विक्रेते-सगळ्यांनी संमेलनात आस्थेने भाग घ्यावा म्हणून रात्रंदिवस धडपडत आहेत, हे सगळे मला मुलाखतीच्या वेळात मंगलाताईंनी सांगितले. यामुळे मलाही उत्साहाने मुलाखत देता आली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महिनाभराने मी महाराष्ट्रात आल्यावर तेव्हा संपून गेलेल्या साहित्य संमेलनाचे नेहमीप्रमाणे विनोदी किस्से ऐकायला मिळण्याऐवजी ‘हे संमेलन दृष्ट लागण्यासारखे होते’, अशा प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवडला जाऊन येणार्‍या सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या.

आमचे मित्र ज्ञानपीठावाले केदारनाथ सिंह, रघुवीर चौधरी, एम.टी. वासुदेवन नायर यांनी तर ‘तुम्ही का नाही गेलात’, असेही विचारले आणि मराठीच्या साहित्य गौरवाबद्दल वाखाणणी केली. माझे संमेलनाला जाऊन आलेले विद्यार्थी, लेखकमित्र, पुस्तक विक्रेते-सगळे या संमेलनाच्या नियोजनावर संतुष्ट होते. तीस हजारांहून आसनांच्या आणि अर्धा डझन लहानमोठ्या सभामंडपांमध्ये एकाच वेळी सर्वत्र चाललेले परिसंवाद, कवीसंमेलने, खाण्यापिण्याच्या, निवासाच्या उत्तम सोयी, लाखोंचा मदतनिधी व मानधने, पुस्तकांच्या संचांचे शाळांना मुक्तहस्ताने वितरण, नव्या पिढीलाही मार्गदर्शक असे तंत्रज्ञान, उद्योगजगावर परिसंवाद, ऑडिओ स्वरूपात लोकप्रिय पुस्तके, ध्वनिफिती, चित्रफिती यांची उपलब्धी, महाराष्ट्राबाहेरच्या मराठी संस्थांना मराठीच्या वृद्धीसाठी लाखोंचे मदतनिधी-असा लक्ष्मी आणि सरस्वती यांचा दुर्लभ संयोग उपस्थितांना स्तिमित करून गेला.

पुस्तकांच्या विक्रीसाठी गाळ्यांच्या आलेल्या भाड्यात आयोजकांनी स्वतःची रक्कम टाकून झालेला एक कोटी रुपयांचा निधी कुणाला द्यावा - तर त्या वर्षी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी हा निधी वाटला; शेतकर्‍याचा मुलगाच इतका परहितदक्ष होऊ शकतो. डॉ. पी. डी. पाटील यांचे हे सामाजिक बांधीलकीचे उदाहरण अपवादात्मक ठरेल.

सरकार दरवर्षी साहित्य संमेलनाला देते, तो २५ लाखांचा निधी त्यांनी मराठीच्या वृद्धीसाठी साहित्य महामंडळाकडे सुपूर्त केला. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संशोधनासाठी एक अध्यासन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सुरू झाले, हाही एक नवा पायंडा इथे पाडला, याचा सर्व मराठीप्रेमींना अभिमान वाटेल.

या संमेलनात तीन पिढ्यांचे नावाजलेले लेखक एका व्यासपीठावर दिसले. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, सदानंद मोरे, शेषराव मोहिते, संजय भास्कर जोशी, ज्ञानेश्‍वर मुळे असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले आणि विचारांचे प्रतिनिधी आलेले म्हणजे बोलावलेले दिसतात. हाही पुढील साहित्य संमेलनांना आदर्श ठरावा. अहोरात्र राबणारे पडद्यामागचे कार्यकर्ते यांनाही हे श्रेय दिले पाहिजे.

शेवटी आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे मराठीच्या अन्य भाषाभगिनींशी रसिकांचा थोडा तरी थेट संपर्क घडला आणि संमेलनाचे परिप्रेक्ष्य विस्तारलेः गुलजारांच्या हस्ते उद्घाटन, चेतन भगत यांची मुलाखत, जावेद अख्तरांनी केलेला समारोप - यामुळे संमेलनाला तौलनिक परिप्रेक्ष्य प्राप्त झाले. न्या. म. गो. रानडे यांनी सुरू केलेली, दीडशेक वर्षे आता होतील अशी ही चळवळ पुढे रटाळ समारंभ होऊन बसली.

आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठीची अखिल भारतीय संदर्भातली कामगिरी स्पष्ट होणे गरजेचे आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे दुर्दैवाने मराठीची एक स्वतंत्र संकुचित कोटी होत गेल्याचे आमच्या पिढीला लहानपणीच दिसून आले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपण नेहमी एका विशाल उपखंडाच्या भाषिक कुटुंबात वावरत असतो, याची नव्या पिढ्यांना जाणीवही राहिली नाही. ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ हा आपला व्यवहार होता. संत नामदेव, काशीला संत तुलसीदासांबरोबर शिकलेले संत एकनाथ, रामदास स्वामी, थोर सुफी परंपरा जिचे एकनाथ, तुकाराम हे स्वतःला अनुयायी मानत.

संत विनोबा म्हणाले तसे-आपले पहिले पाऊल महाराष्ट्री, दुसरे हिंदुस्थानी आणि तिसरे आंतरराष्ट्रीय असले पाहिजे. महाराष्ट्र धर्म हा केवळ मराठी भाषिकांनीच रचलेला नाहीः श्रीचक्रधरस्वामींपासून काबूलपर्यंत महानुभाव, नाथसंप्रदाय, वारकरी, दत्तसंप्रदाय, शीख गुरू गोविंदसिंग, महाराष्ट्र अस्मितेचे निर्माते मलिक अंबर-अशी कितीतरी नावे घेऊन महाराष्ट्राचा इतिहास सातवाहनांपासून पाहता येतो. जैन, बौद्ध, शीख, ज्यू, पारशी, मुसलमान, ख्रिस्ती - सर्वांची ही भाषा राहिली आहे.

आता एकभाषिक राजकारण फोफावले असले, तरी मराठी ही एका विशाल हिंदू महाव्यवस्थेत या उपखंडात विकसित झालेली एक व्यवस्था आहे, आणि आपल्या पोटभाषा - खानदेशी, अहिराणी, वर्‍हाडी, झाडी, कोंकणी याही मराठीच्या उपव्यवस्था म्हणून विकसित झाल्या पाहिजे. तरच मराठी ही प्रबळ होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ह्या सगळ्या मराठीच्या बोलींचाही सहभाग वाढवावा, असेही पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेताना सुचवावेसे वाटते.

एकंदरीत मराठीने आपल्या उपखंडातल्या भाषिक महाव्यवस्थेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. प्राचीन महाराष्ट्रीतल्या वसुदेवहिंडी, तरंगलोला यासारख्या अनेक शतकांपूर्वीच्या कादंबर्‍या, सट्टक हा असामान्य नाट्यप्रकार, बृहत्कथा सारखे असाधारण कथावाड्मय, कोशवाड्मय, व्याकरणे, महाकाव्ये, खंडकाव्ये, चरित्रकाव्ये - अशी समृद्ध आणि एवढा प्रचंड अवकाश असलेली मराठी जगातली एक प्रमुख भाषा ठरते.

अलीकडेही हिंदी काव्यात नव्या युगाचे निर्माते गजानन माधव मुक्तिबोध, ओडिया भाषेतील आधुनिक साहित्याचे प्रवर्तक कवीवर राधाकृष्ण राव, कन्नड कवितेत क्रांती घडवणारे द. रा. बेंद्रे, डोग्रा भाषेचे आद्यप्रवर्तक साहित्यिक मधुसूदन साठे - असे देशातल्या अनेक भाषांमध्ये युगप्रवर्तक मराठी भाषक होऊन गेले.

तेलंगण, तमिळनाडू, केरळ, कारवार, मंगळूर, गोवा, ग्वाल्हेर, बडोदा, इंदूर वगैरे प्रदेशात मराठी भाषकांनी मोठे योगदान केले आहे. उर्दूचा तर उगमच महाराष्ट्रात आहे. हा आपला वारसा तरुण पिढ्यांनी सतत डोळ्यासमोर ठेवावा, इतका थोर आहे.

प्रस्तुत साहित्य संमेलनात जे विचारमंथन झाले, ते संपादित करून आपल्या स्मरणात राहील अशा स्वरूपात दिल्याबद्दल आयोजकांचे मी अभिनंदन करतो. ज्यांनी अनेक चांगले पायंडे पाडले आहेत! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा दर्जा असाच वाढावा आणि डॉ. पी. डी. पाटील यांनी साहित्याच्या क्षेत्रातही त्यांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत राहावा, अशी उमेद बाळगून मी प्रस्तुत ग्रंथासाठी शुभेच्छा देतो.

‘साहित्य-संचित’ - संपादक सुनील चव्हाण, श्रीधर लोणी

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे | पाने - ४२४, मूल्य - १२५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......