स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणाऱ्या, करुणा आणि मानवता यांना पारख्या न झालेल्या हिंदी साहित्याने मला खूप प्रभावित केलं…
ग्रंथनामा - आगामी
जयप्रकाश सावंत
  • ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 30 August 2023
  • ग्रंथनामा आगामी भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा ‌Bhaiyya Express aani Itar Katha जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant

प्रसिद्ध हिंदी-मराठी अनुवादक जयप्रकाश सावंत यांचं ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ हे अनुवादित पुस्तक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. यात हिंदीतील दहा महत्त्वाच्या लेखकांच्या सतरा कथांचा अनुवाद आहे. शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला सावंत यांनी लिहिलेलं हे मनोगत….

..................................................................................................................................................................

वाढतं वय आणि त्याला जोडून येणाऱ्या व्याधी यांतून अगदी मुंबईतल्या मुंबईत होणाऱ्या प्रवासावरसुद्धा ज्या मर्यादा आल्या, त्यातून गेली काही वर्षं माझं फोर्टमधल्या ‘पीपल्स बुक हाऊस’ला जाणं बंद झालंय. त्याचा मला सर्वांत हळहळ वाटायला लावणारा परिणाम म्हणजे माझा हिंदी नियतकालिकांशी असलेला संबंध पूर्णपणे संपुष्टात आलाय. अगदी थोड्याच वर्षांपूर्वी मी दर महिन्याला ‘पीपल्स’मध्ये जाऊन ‘पहल’, ‘तद्भव’, ‘हंस’, ‘कथादेश’, ‘वागर्थ’, ‘साक्षात्कार’, ‘उद्भावना’ अशी दहा-बारा नियतकालिकं नियमित पाहत होतो. मला नियतकालिकांविषयी नेहमीच फार प्रेम वाटत आलंय.

ऑर्वेलने एके ठिकाणी म्हटलंय की, एखाद्या तद्दन मूर्ख मासिकाचा वर्षभराचा बांधीव अंकही काही काळानंतर बहुसंख्य पुस्तकांपेक्षा जास्त वाचनीय वाटतो. ते मला भावतं. नियतकालिकं मला विविधरंगी फुलांच्या गुच्छांसारखी वाटतात. एखाद्या अंकातली सर्वच फुलं आवडीची निघाली, तर बहारच असते, पण चांगल्या संपादकाने काढलेल्या नियतकालिकात थोड्या तरी आवडत्या गोष्टी मिळतातच. शिवाय दर महिन्याला एखादी तरी चांगली नवजात कविता किंवा कथा वाचायला मिळते. मराठीत सुरुवातीला ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’, ‘वसुधा’, ‘वीणा’ आदी, आणि नंतरच्या काळात ‘सत्यकथा’ अशा मासिकांचा लागलेला नाद आठवतो.  

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी नियतकालिकं क्षीण होत असताना अचानक मला वर उल्लेख केलेल्या हिंदी नियतकालिकांचा शोध लागला आणि त्यांच्या श्रीमंतीने मी हरखून गेलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीतले आघाडीचे लेखक फक्त दिवाळी अंकांत दिसू लागल्याच्या त्या काळात विनोदकुमार शुक्ल, विष्णु खरे, चंद्रकान्त देवताले, मंगलेश डबराल, अशोक वाजपेयी, असग़र वजाहत, विष्णु नागर, शिवमूर्ति, उदय प्रकाश, जितेन्द्र भाटिया, अखिलेश असे हिंदीतले नामवंत कवी-लेखक, त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांतल्या तरुण लेखकांसोबत हिंदी मासिकांतून वाचायला मिळतायत, हे दृश्य आगळं होतं. या साहित्याचं स्वरूपसुद्धा अनोखं होतं.

महाराष्ट्रात आपल्याला महात्मा जोतीबा आणि सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, न्या. रानडे, साने गुरुजी असे थोर समाजसुधारक आपल्याकडे होऊन गेल्याचा अभिमान असतो. खरं तर ते खरोखरच होऊन गेले की, तो केवळ आभास होता, असा प्रश्न पडावा, अशी आजची विषण्ण करणारी स्थिती आहे.

असो. पण या महामानवांच्या विचारांचा मुख्य धारेतल्या मराठी साहित्याला किती स्पर्श झालाय, हे पाहू गेल्यास हाती काय लागेल? याउलट, अशा सुधारकांच्या बाबतीत जे पिछाडीला आहेत, असं आपल्याकडच्या अहंकारातून मानलं जातं, त्या हिंदी भाषकांचं साहित्य बव्हंशी पुरोगामी, प्रगतिशील असल्याचं मला आढळलं. केवळ स्वतःच्या भावभावनांच्या हिंदोळ्यांवर न झुलणारं, आपल्या जातीपुरतं किंवा वर्गापुरतं मर्यादित नसणारं, स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणारं, करुणा आणि मानवता यांना पारखं न झालेलं – अशा प्रकारच्या या हिंदी साहित्यानं मला खूप प्रभावित केलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यातल्या उत्कृष्ट कथा, कविता निवडून त्या मराठीत आणणं, हा या दोन्ही भाषांच्या न फिटणाऱ्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा मार्ग आहे, असं मला वाटलं आणि त्यातून हे अनुवाद सुरू झाले.

सुरुवातीला उदय प्रकाश यांच्या कथांच्या केलेल्या अनुवादाला चांगला प्रतिसाद लाभला. सुमती लांडे यांनी प्रकाशित केलेलं ‘तिरिछ आणि इतर कथा’ लोकप्रिय झालं – विशेषतः मराठीतल्या तरुण कवी-कथाकारांना ते खूप आवडून गेलं. त्यानंतर केलेले रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथांचे अनुवादही वाचकांना आवडले. यामुळे मला एकूणच समकालीन हिंदी कथेचं एक चित्र समोर आणावं, असं वाटलं.

२०१०च्या मे महिन्यात आरंभ झालेल्या ‘मुक्त शब्द’ या मनाजोगत्या स्वरूपाच्या मासिकामुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला. २०१०-११च्या दरम्यान मी हिंदीतील आठ कथाकारांच्या बारा कथांचे अनुवाद करून ‘मुक्त शब्द’ला दिले आणि त्या मासिकाच्या येशू पाटील यांनी ते अगत्याने छापले. हिंदी साहित्याला जास्त महत्त्व दिल्याबद्दल ज्येष्ठ लेखक गो. पु. देशपांडे यांनी व्यक्त केलेली नाराजी सोडल्यास या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभला. विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांची ‘मुक्त शब्द’च्या पत्रव्यवहार सदरात आलेली अत्यंत उमदी प्रतिक्रिया कृतज्ञतापूर्वक लक्षात राहिलीय. त्यांनी लिहिलं होतं, ‘हिंदी कथांचा अनुवाद देणे तत्काळ बंद करावे. कारण मराठी कथाकारांना कॉम्प्लेक्स येईल, अशी भीती वाटते.’

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

त्या बारा कथा आणि नंतरच्या काळात अनुवादित केलेल्या आणखी काही कथा, अशा एकूण बारा कथालेखकांच्या बावीस कथा मी ‘मुक्त शब्द’ला देऊ शकलो. त्यांतल्या उदय प्रकाश आणि रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा वगळून उरलेल्या दहा कथाकारांच्या एकूण सतरा कथा प्रस्तुत संग्रहाद्वारे पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. हा संग्रह काढायचा ठरल्यानंतर प्रत्यक्षात तो प्रकाशित व्हायला अनेक वर्षं लागलीयत, पण इतक्या ‘देरी’नंतरही तो वाचकांना ‘दुरुस्त’ वाटेल, अशी मला आशा आहे.

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ - अनुवाद : जयप्रकाश सावंत

शब्द पब्लिकेशन, मुंबई | मूल्य - ३८५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......