ज्या मोजक्या कवयित्रींनी मराठी कवितेचा स्वर ठळक केला, त्यात सुमती लांडे यांच्या कवितेचा आवर्जून समावेश करावा लागेल
ग्रंथनामा - झलक
कविता मुरुमकर
  • ‘सुमती लांडे : समग्र कविता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 24 August 2023
  • ग्रंथनामा झलक सुमती लांडे : समग्र कविता Sumati Lande - Samgra Kavita सुमती लांडे Sumati Lande

मराठीतील एक आघाडीच्या महिला प्रकाशिका सुमती लांडे यांच्या समग्र कविता ‘सुमती लांडे : समग्र कविता’ या नावाने नुकत्याच कॉपर कॉईनतर्फे प्रकाशित झाल्या आहेत. या देखण्या संग्रहाचे संपादन कविता मुरुमकर यांनी केले आहे. त्यांनी या संग्रहाला लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

कवितेच्या पटावर मराठी कवितेला समृद्ध, अर्थघन अभिव्यक्ती देणाऱ्या कवयित्री सुमती लांडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ‘कमळकाचा’ (१९९३) व ‘वाहते अंतर’ (२००२) हे त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह आहेत. त्यांच्या अप्रकाशित कविता प्रस्तुत संपादनात ‘कविता’ या शीर्षकांतर्गत समाविष्ट केल्या आहेत. ‘कमळकाचा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह त्याच्या शीर्षकासह कवयित्रीच्या अभिव्यक्तीचे वेगळेपण सूचित करतो. एक कवयित्री म्हणून त्यांचे लेखन समकालीन कवयित्रींच्या तुलनेत मर्यादित दिसत असले, तरी प्रसिद्धीपासून दूर असलेली ही कवयित्री तिच्या उत्कट अभिव्यक्तिमुळे लक्ष वेधून घेते.

दुःखाचा मनस्वीपणे स्वीकार आणि समंजसपणे स्वीकारलेले एकटेपण ही सुमती लांडे यांच्या कवितेची आशयसूत्रे आहेत. ‘कमळकाचा’ काव्यसंग्रहाच्या या शीर्षकातील शब्दांतच या आशयसूत्राचे प्रतिबिंब दिसून येते. कमळकाचा. कमळकाचा ही देखणी नक्षी. पूर्वी स्त्रिया फुटलेल्या बांगडीच्या ‘कमळकाचा’ करायच्या. त्या तोरण करण्यासाठी, ओल्या भिंतीवर रुतवून या कमळकाचातून भिंती सजवायच्या, अंगणात तुळशीसमोर ओल्या जमिनीत हलक्या हाताने रुतवून कमळकाचांची रंगीत रांगोळी काढायच्या, वहीच्या जाड पुट्ट्याला आकार देऊन ‘वॉलपिस’ करायच्या.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

जी बाई संवेदनशील व सर्जनशील तिलाच या कलाकृतीची नजाकत ठाऊक असे. कमळकाच होण्यासाठी बांगडी फुटावी लागते. हातातल्या जीव जडलेल्या बांगड्या फुटण्याची खिन्नता मनाला सलत असतेच. अशा फुटलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांना विस्तवावर, ज्योतीवर पकडून विशिष्ट तापमान द्यावे लागते. मग ती बांगडीची काच लवचिक होते. अशा लवचिक झालेल्या काचेला दुसरी काच जोडून कमळाची किंवा इतर कोणतीही जी नक्षी केली जाते, ती कमळकाचा. फुटणं, विस्तवावर तापणं, होरपळत लवचीक होणं, दुसऱ्या तुकड्याशी संयतपणे जोडलं जाणं, या वेदनादायी प्रवासातून गेल्यावर कमळकाचेला देखणेपण लाभते. ज्या सौंदर्यासक्त जीवाने वेदनेचा हळवा कोपरा जपत, ही कमळकाच केलेली असते, त्या जीवाच्या वेदना म्हणून या संग्रहाकडे पाहता येईल.

कवितागत ‘ती’च्या सवयीच्या झालेल्या आणि जीव गुंतलेल्या हातातल्या बांगड्या फुटल्यावर ते तुकडे ‘वेचून’ घेताना जीव सांडतो. कमळकाचेसाठी बांगडीचे तुकडे विस्तावावर गरम करताना बोटांना चांगलेच पोळते. हे पोळणे केवळ बोटालाच जाणवत नाही, तर त्याची सल खूप आतवरही उमटते, ‘देठाला’ही जाणवते. काळजाला पोळलेलं दुःख सावरत, गोळाही होत नाहीत पदराशी बांधून ठेवाव्यात अशा कमळकाचा. या शब्दांतून ही कविता नेमकेपणाने काळजाला भिडते आणि वाचकाच्या मनात सलत राहते. कवयित्रीचा दुःखालाही देखणं करणारा संयत मनस्वीपणा तिच्या भावविश्वाच्या परिपक्वतेची अनुभूती देतो. दुःखाला गच्च गळामिठी दिल्याशिवाय अशी कविता लिहिताच येत नाही, याची जाणीव होते.

‘कमळकाचा’ या संग्रहातील कवितांतून दिसून येते की, कवितागत ‘ती’ही दुःख, अंधार, एकटेपण, संयतपणे पचवणारी मनस्वी स्त्री आहे. आजवर ती अंधाराला (दुःखाला) सोबत घेऊन एकटी आयुष्याचा प्रवास करत आहे. तिने अंधाराला मनापासून स्वीकारले आहे. म्हणून तर तो तिला आपला वाटतो. सावल्या कितीही प्रेमळ असल्या तरी परक्या असतात. अंतर ‘हलणारे’ आहे. म्हणजे कमी-जास्त होणारे आहे. झाडंसुद्धा सूर्याच्या पूर्व पश्चिमेला कलण्यानुसार सावली ‘हलती’ ठेवतं. आपल्याला जीव लावणारे ही त्याच्या ‘मूड’नुसार आपल्याला ‘सावली’ (प्रेम) देतात. त्यापेक्षा आपला अंधारच शेवटी आपला असतो. आपले दुःख शेवटी आपलेच असते. कमळकांचामधील कवितागत ‘ती’चा संदर्भ या कवितेत डोकावतोच, कारण दुःखाने, अंधाराने एकटेपणाने ती आता प्रगल्भ झाली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सुमती लांडे यांच्या कवितेत निसर्ग संवेदनही दिसून येते. आकाश, पाऊस, माती, संध्याकाळ, चंद्र, चांदण्या, समुद्र, झाडे, वारा, इ. निसर्गातील घटक त्यांच्या कवितेत भावरूप घेऊन येतात. कवयित्रीने या निसर्ग प्रतिमांचा वापर करून काव्याशयाला अधिक नेमका अर्थ बहाल केला आहे. ‘सूर्य’, ‘पक्षी’ या प्रतिमेतील प्रियकराच्या अस्तित्वाचे सूचन होते. ‘सूर्य बुडत्यावेळी आभाळ कलते थोडेसे मनात सलते थोडेसे, कुठेतरी आभाळाच्या तुकड्यावर’. सूर्य बुडताना होणाऱ्या हुरहुरीने ‘आभाळाचे कलणे’ प्रेमातली व्याकूळता, हुरहुर सूचित करते. आभाळाचा दुरावा मनात सलत राहतो. स्वछंद विहरणारा पक्षी क्षणभर आपला वाटतो. मग तो ही मनाच्या झुकल्या फांदीवर उतरतो. सुखदुःखाच्या गोष्टी त्याच्याबरोबर बोलल्या जातात.

तसे तर सूर्य, आभाळ, पक्षी परकेच असतात. तरीही मन गुंतत जाते. भावनेच्या जिव्हाळ्याच्या ओलाव्याने आकाशवेड्या पक्षाचे पंख भिजतात. पक्षी पुन्हा सैरभैर होतो आणि कवितागत ‘ती’चे मन त्या क्षणांचे, भिजण्याचे अर्थ लावत राहते. निसर्ग प्रतिमांचा वापर करत मानवी भावभावनांची तरल स्पंदने कवयित्री शब्दबद्ध करते. या कवितासंग्रहातील कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करणाऱ्या कवितेच्या ओळी हृदयस्पर्शी वाटतात. निसर्ग प्रतिमांचा वापर करून कवयित्रीने मानवी नात्याचे कंगोरे शब्दबद्ध केले आहेत.

सुमती लांडे यांच्या कवितेतील स्त्री संवेदन हे मनस्वी, कणखर व समंजस आहे. नात्यातील अपरिहार्यतेचे मर्म जाणत असूनसुद्धा नात्यांच्या मर्यादांना समंजसपणे स्वीकारणारे व दु:खालाही जीव लावणारे उत्कट स्त्री-संवेदन त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आदिम स्त्री आणि आदिम पुरुषाचे प्रतिनिधित्व करणारे ‘झारिना’ आणि ‘पुराणपुरुष’ हे नवे मिथक सुमती लांडे यांनी निर्माण केले आहे. ‘वाहते अंतर’ या संग्रहातील कविता क्रमांक अकरा, बारा, तेरा या कवितेत पुराणपुरुषाचे मिथक येते. या कवितेत झारिना ही आदिम स्त्री आहे, तर पुराणपुरुष हा आदिम पुरुष आहे. या दोहोंची प्रेमकहाणी या कवितांतून व्यक्त होते. झारिना ही वालुकामय साम्राज्याची सम्राज्ञी. वाळवंट हे केवळ भौगोलिक अवस्थाच सूचित करत नाही, तर तिची मनोभूमी, भावभूमी सूचित करते. तिचा वालुकामय प्रदेश पावसाची वाट पाहतो. ती वाळू आहे, तर पुराणपुरुष हा पाऊस आहे. युगानयुगीची तृष्णा घेऊन ती या पुराणपुरुषाच्या बरसण्याची वाट पाहत आहे. त्याच्या बरसण्याने ती तृप्त होणार आहे. झारिनाच्या सर्वदूर देशात हा पुराणपुरुष बेटावरच्या दगडाखडकांशी ज्वालामुखीचे कूळ सिद्ध करत मनसोक्त भटकतो. मग नंतर तो ‘सावयव सैलावतो’. या शब्दांतून दैहिक संवेदन व्यक्त होते. जणू झारिनाच्या तप्त वाळवंटात तो पाऊस होऊन झिरपतो. या तृष्णेच्या तृप्तीने झारिना त्याचे वज्रमस्तक हळूच थोपटते.

‘वज्रमस्तक’ या शब्दांतून हा पुराणपुरुष योद्धा असल्याचे सूचित होते. झारिनाचे त्याचे वज्रमस्तकाला थोपटणे शृंगारातील वात्सल्य सूचित करते. पुराणपुरुषाचे प्राचीन (सनातन) असणे या कवितेत अधोरेखित होते. कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाच्या प्रवेशद्वारावर पुराणपुरुष उभा असतो. लढायांमधली हारजीत, अस्मानी, सुलतानीच्या गोष्टी, पुरातन किल्यांच्या पडझडीबद्दलही तो बोलतो. गावागावांची वाताहत होताना तो पहातो. न ढासळलेला बुरुजही त्याला ठाऊक असतो. किल्ल्याच्या भिंतींना तो जोजावतो आणि त्याचवेळी तटबंदीचा भक्कमपणा तपासून घेतो. निरंकुश साम्राज्याचा हा पुराणपुरुष सम्राट असतो.

‘वाहते अंतर’ या काव्यसंग्रहातील तेराव्या कवितेत पुराणपुरुष या आदिम पुरुष तत्त्वाची आणि झारिना या वालुमय प्रदेशाच्या सम्राज्ञीच्या आदिम स्त्रीत्त्वाची रतिक्रिडा सूचित होते. निरंकुश साम्राज्याचा सम्राट असलेला पुरुष इशाऱ्यानेच थोपवतो रणभूमीवरच्या बेलगाम घोड्यांच्या पलटणी. ‘रणभूमी’ हा युगानुयुगीची तृष्णा होऊन राहिलेला ‘देह’ आहे. ‘बेलगाम घोडे’ या मीलनासाठी अनावर झालेल्या इच्छा, आकांक्षा, वासना आहेत. या इच्छ पिढीजात आहेत. ‘पिढीजात’ या शब्दांतून आदिम असणे सूचित होते. आदिम मिलनाची आस उकळत असते शरीरभर, हे ‘रसायन’ दैहिक, भावनिक, मानसिक मीलनाच्या इच्छेचे आहे. 'पूर्वजांचे पीळ धावत असतात धमण्या धमण्यातून' या शब्दांतून पुरुष तत्त्वाची प्राचीन आस येथे अधोरेखित होते. पुराणपुरुष मीलनाच्या परमोच्च अंतिम क्षणाला तिच्या लवलवत्या पात्यांचे आवेग जोखताना रंध्रांतून दुःखावून घेतो. ‘लवलवत्या पात्यांचे आवेग’ या अर्थपूर्ण शब्दांतून तिच्या (आदिम स्त्री) उत्कट असोशीचे आवेग सूचित होतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘कमळकाचा’ आणि ‘वाहते अंतर’ या कवितासंग्रहांनंतर सुमती लांडे यांच्या अप्रकाशित कविता ‘कविता’ या शीर्षकाने प्रस्तुत संपादनात समाविष्ट केलेल्या आहेत. ‘कमळकाचा’ आणि ‘वाहते अंतर’ या संग्रहांतील कविता व या नव्या कविता यामध्ये काळाचा एक तुकडा दडला आहे. जगण्याच्या प्रगल्भ अनुभूतीतून आणि चिंतनातून या नव्या कविता साकार होतात. आसक्तीकडून विरक्तीकडे या नव्या कवितांचा प्रवास आहे. जगण्याच्या-सौंदर्याच्या पडझडीतून आलेले दुःख आणि त्यातूनही स्वतःला सावरत सकारात्मकतेने त्या दु:खाकडे पाहणं, या कवितेत अधारेखित होते.

केस गळू लागले, तरी बरेच शिल्लक आहेत. दात पडू लागले तरी दोन दात शाबुत व शिल्लकही आहेत. गर्भाशय हा स्त्रीच्या शरीराचा महत्त्वाचा अवयव, त्यालाही निवडुंगासारखे काटे फुटले होते आणि ते नाहीसं झालं होतं. कवितागत तिचे संवेदन जगण्याच्या कुरूपतेला तटस्थपणे सामोरे जाताना दिसते. आसक्ती-विरक्ती, सौंदर्यसंवेदन-कुरूपता, स्वप्न-वास्तव या विरोधाभासी द्वंद्वात हेलकावे खाताखाता स्थितप्रज्ञतेचा अंतिम टप्पा गाठण्यापर्यंतचा हा प्रवास या समग्र कवितांतून अधोरेखित होतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

‘कमळकाचा’ (१९९३), ‘वाहते अंतर’ (२००२) आणि त्यानंतरच्या ‘कविता’ (२०२२) अशी एकूण चार दशकांत ही कविता समोर आलेली आहे. हा चार दशकाचा कालखंड या एकूण ‘सुमती लांडे यांची समग्र कविता’ मागे उभा आहे. एकूण काळाचा विचार करता सुमती यांनी केलेले काव्यलेखन काहीसे संथ वाटत असले, तरी इथे प्रकाशित करण्याचा सोस नाही, हे उघडच आहे. आतून उन्मळून आल्याशिवाय लिहायचे नाही, ही वृत्ती फार थोड्या कवी-कवयित्रींना जोपासता आली आहे. अर्थातच एखाद्या कवी-कवयित्रीने किती कविता लिहिल्या, यावर त्यांचे मूल्यमापन ठरत नाही, तर त्या कवितेने मराठी कवितेच्या काव्यपरंपरेत काय भर घातली, यावर त्याचे महत्त्व अधोरेखित होत असते.

दु:खाचा मनस्वीपणे स्वीकार आणि एकटेपणाचा समंजसपणे स्वीकार हे आशयतत्त्व असलेल्या सुमती लांडे यांची कविता अल्पाक्षरी रूपबंधातून अर्थाची खोली प्राप्त करून देत कवितेला एका उंचीवर घेऊन जाते. दुःखाचा कुठलाही आकांत न करता, दुःख पचवूनही जीवनाला नकारात्मक ओरखडा न लावता संयतपणे, परिपक्वतेने दुःख भोगण्याची नजाकत सुमती यांच्या अनेक कवितांतून प्रकट होते.

असे असले तरी या कवितेकडे अभ्यासकांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. याची वाङ्मयीन कारणे वेगवेगळी असू शकतील किंवा स्वतः कवयित्री म्हणनू सुमती लांडे यांनी पुढल्या काळात मराठीतल्या एक अतिशय महत्त्वाच्या प्रकाशक म्हणून मिळवलेली ओळख, ही त्यांच्या ‘कवी’ असण्याकडे दुर्लक्ष ठरण्यास कारणीभूत ठरली असावी.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या कवितेने माझे लक्ष वेधून घेतले ते दोन कारणासाठी. एक म्हणजे इतकी घट्ट, ठाशीव मोजकी शब्दकळा घेऊन अवतरणारी ही कविता तत्कालीन स्त्री लिखित कवितेत स्वतःचे वेगळेपण जपणारी अशी आहे. तशीच ती तिच्यातल्या आशयाचे असंख्य पदर उलगडून वाचताना मराठी कवितेतला एक वेगळा ‘स्वर’ही रचणारी आहे. दुसरे कारण म्हणजे मराठी स्त्री लिखित कवितेत महत्त्वपूर्ण ‘हस्तक्षेप’ नोंदवूनही ही कविता मराठी साहित्य विश्वाच्या परिघावरच राहिली. या कवितेचे मूल्यमापन तर दूरच, तिचे महत्त्व ‘अधोरेखित’ करण्याचे कष्ट आपल्या ‘वाङ्मयीन समाजा’ने घेतले नाही.

सुमती यांचे लेखन त्यांच्या समकालीन कवयित्रींच्या तुलनेत अल्प असले, तरी हे लेखन स्वतःची अशी वेगळी नाम मुद्रा उमटवणारे आहे. वाङ्मयीन स्वीकार-नकार, त्यातून मिळणारी ओळख कदाचित तितकी त्यांच्या वाट्याला आली नसेल, पण एक सशक्त ‘दस्तक’ या कवितेने दिली आहे, हे निश्चितपणे मान्य करावे लागते. या कवितेचा ‘पैस’ काहीसा मर्यादित स्वरूपाचा असूनही, ज्या अल्पाक्षरी रूपबंधातून ही कविता साकारली आहे, तो लक्ष वेधून घेणारा आहे. वरवरच्या वाचनात काहीशी सहज-सोपी वाटणारी कविता तिच्या आशयाच्या पातळीवर मात्र मराठी कवितेचा पैस रुंदावणारी आहे.

त्यांच्या कवितेतून साधारणतः तीन मनोवस्था सूचित होतात. पहिली- नवथर प्रणय भावना, दुसरी- शृंगार नि तृष्णा. त्यानंतर स्वतःचे अवलोकन करणारी, स्वतःकडे तटस्थपणे पाहणारी आणि सगळे काही हातून निसटून चालले आहे याची जाणीव समंजसपणे, प्रगल्भतेने जोपासणारी तिसरी अवस्था. एकार्थाने कवितेचे संवेदन काहीसे धीट स्वरूपाचे आहे. इथे लपवून छपवून सांगण्याची गरज नाही, वृत्ती नाही. आहे ते स्त्री-पुरुष नात्यातल्या ‘वाहत्या’ अंतराचे परखड निवेदन. गूढ, अॅब्सर्ड शब्दांचा कोलाहल, अनाकलनीय प्रतिमा प्रतीकांना इथे स्थान नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आपल्या वाट्याला जे जगणे आले आहे, त्याचा खंबीरपणे केलेला स्वीकार, रूढ संकेतांना दिलेला नकार, परंपरा-रूढींचे जोखड भिरकावून लावण्याची सडेतोड वृत्ती, मराठी स्त्री लिखित कवितेत अभावानेच आली आहे. मराठी कवितेत ज्या मोजक्या कवयित्रींनी मराठी कवितेचा स्वर ठळक केला, त्यात सुमती लांडे यांच्या कवितेचा मी आवर्जून समावेश करेन.

मी आशा करते की, या समग्र संग्रहानंतरही त्यांच्या पुढच्या काळातल्या कविता मराठी कवितेची परंपरा समृद्ध करत राहतील.

‘सुमती लांडे : समग्र कविता’ – संपादन - कविता मुरुमकर

कॉपर कॉईन, गाजियाबाद | पाने – २२८ (मोठा आकार, हार्ड बाउंड), मूल्य – ५९९ रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......