मी विज्ञानकथा का लिहितो? विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी!
ग्रंथनामा - झलक
जयंत नारळीकर
  • ‘समग्र जयंत नारळीकर - कादंबरी खंडा’चे मुखपृष्ठ
  • Fri , 17 January 2020
  • ग्रंथनामा झलक समग्र जयंत नारळीकर जयंत नारळीकर राजहंस प्रकाशन

प्रसिद्ध खगोल वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या पाच कादंबऱ्यांचा एक खंड नुकताच राजहंस प्रकाशनाने ‘समग्र जयंत नारळीकर’ या मालेत प्रकाशित केला आहे. या खंडासाठी नारळीकर यांनी लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

तो दिवस मला चांगला आठवतो, जेव्हा मला विज्ञानकथा लिहिण्याची ऊर्मी आली. १९७४ साली अहमदाबाद येथे एक परिसंवाद होता. एका नामवंत वैज्ञानिक संस्थेने त्या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादातील वक्ता श्रोत्यांना झोप आणण्याचे काम चोख बजावत होता. अगदी थोडे श्रोते व्याख्यान ऐकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. मी मात्र त्या व्याख्यानाचा नाद केव्हाच सोडून दिला होता.

नेमक्या अशाच एका क्षणी मला असे वाटले, आता आपण कथालेखन का सुरू करू नये? परिसंवादाच्या संयोजकांनी पुरवलेले कागद मी पुढे ओढले आणि लिहिण्यास सुरुवात केली.

‘कृष्णविवर’ ही कथा प्रकाशात आली ती अशी. विज्ञानकथा लिहिण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. ही कथा मी मराठीत लिहिली. मराठी विज्ञान परिषद, मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी कथा पाठवावी, असा विचार माझ्या मनात घोळत होता.

स्पर्धेच्या संयोजकांनी कथेच्या लांबीबद्दल, शब्दसंख्येबद्दल ज्या अटी घातल्या होत्या, त्यामध्ये माझी ही कथा बसत होती. मी प्रवेशपत्रिका भरली ती मात्र कचरतच. ‘नारायण विनायक जगताप’ या नावाने मी प्रवेशपत्रिका भरली. मी धारण केलेल्या नावाची आद्याक्षरे माझ्या खऱ्या नावाच्या आद्याक्षरांच्या बरोबर उलट्या क्रमाने होती. मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी माझे नावच काय तर हस्ताक्षरदेखील ओळखतील, अशी भीती मला वाटल्याने मी ती कथा माझ्या पत्नीस लिहून काढण्यास सांगितली व ती कथा स्पर्धेसाठी एका वेगळ्या पत्त्यावरून पाठवून दिली.

माझ्या त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले, हे जेव्हा मला समजले; तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी विज्ञानकथा लिहू शकतो, याचे समाधान झाल्यामुळे मी त्यापुढे आणखी कथालेखन करण्याचा विचार फार गांभीर्याने न करता तेथेच थांबणार होतो. तसेच पारितोषिक एका शास्त्रज्ञाला मिळाल्याचे समजल्यामुळे विज्ञानकथा लिहिण्यासाठी इतर लेखकांना प्रवृत्त करण्याचे काम मराठी विज्ञान परिषद पुढे सुरू ठेवू शकणार होती. पण मला अनपेक्षित अशी एक घटना घडली.

श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात माझ्या लिखाणाचा गौरव केला.

महान व्यक्तींनी खास प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे नवे प्रवाह निर्माण होण्यास मदत होते. मग विज्ञानकथा यापासून अलिप्त कशी राहील?

त्या संमेलनानंतर विज्ञानकथा हे मराठी साहित्याचे एक अंग बनले. विज्ञानकथा हवीच, असे नियतकालिकांच्या संपादकांना वाटू लागले. दिवाळी अंकाचे संपादक विज्ञानकथेसाठी विचारणा करू लागले. दररोज अनेक पत्रे येऊ लागली. हे सर्वच मला सर्वस्वी अनपेक्षित होते.

याबाबत एक मुद्दा स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. मी विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी मराठीमध्ये विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत. अगदी १९१५ मध्ये ‘मनोरंजन’ मासिकात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची विज्ञानकथा प्रकाशित झाली होती. त्यानंतर या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकात बरेच विज्ञानकथाकार तयार झाले. काहींनी स्वत:चे साहित्य निर्माण केले, तर काहींनी भाषांतरे केली होती. डी. सी. सोमण, डी. पी. खांबेटे, नारायण धारप, बी. आर. भागवत ही काही यातील नावे आहेत. सर्वच लेखकांची नावे मी देऊ शकत नाही. पण मराठीत विज्ञानकथेच्या उगमाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे, असे मला वाटते.

विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो? मला असे वाटते, मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य काय आहे आणि कथा-कादंबऱ्यांमध्ये काय सांगितले जाते, याची मला जाणीव आहे. पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले, तर हे समजते की, माणूस इवलासा आहे आणि त्याभोवतीचे विश्व अफाट आहे. हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे. ‘‘आपण समजतो, त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे. इतकेच काय आम्ही समजू शकू, त्यापेक्षाही ते अधिक गूढ आहे,’’ असे जे. बी. एस. हॉल्डेन म्हणतो.

वरील पार्श्वभूमी ध्यानात घेता असे वाटते की, विज्ञानकथा लिहिण्यासाठी कल्पनांची उणीव कधीच भासणार नाही. या कल्पना कथेच्या रूपात सादर कशा करायच्या, हाच एक प्रश्न आहे. कथेमध्ये एक समतोल साधला जाणे आवश्यक आहे. विज्ञानकथेला विज्ञानाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप येऊन चालणार नाही. तसेच कथेत वापरलेले वैश्विक गूढ भयकथा विंâवा परीकथेत रूपांतरित करून चालणार नाही. अनेक विज्ञानकथा (त्यामध्ये माझ्याही काही कथांचा समावेश करता येईल) असा समतोल न साधला गेल्यामुळे प्रभावी झालेल्या नाहीत, असे दिसून येते.

जे स्वत: शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात, त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो. एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते, ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. असे करण्याची मुभा त्यांना या विषयासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते. शोधनिबंधात तथ्यांवर भर दिला जातो व अटकळींना दुय्यम स्थान असते.

जे कथेमध्ये मांडण्यात आले आहे, ते पुढे खरे ठरले तर? फ्रेड हॉएल हे माझे खगोलशास्त्रातील गुरू, मार्गदर्शक, विज्ञानकथा लिहिण्याची प्रेरणादेखील मी त्यांच्याकडूनच घेतली. ‘दि ब्लॅक क्लाऊड’ ही त्यांची गाजलेली कादंबरी. आपल्या कादंबरीत त्यांनी हैड्रोजनसारखे अणू-रेणू आणि ताNयांदरम्यान पसरलेले धूलीकण यांपासून बनलेल्या ढगाबद्दलची कल्पना मांडली आहे. गेल्या शतकाच्या पाचव्या दशकात त्यांनी ही कल्पना मांडली. या क्षेत्रात काम करणाऱ्याया शास्त्रज्ञांना असे रेणूंचे ढग अवकाशात असतात, ही कल्पनाच मान्य नव्हती. अशा विरोधामुळे फ्रेड हॉएल विज्ञानविषयक नियतकालिकात हा शोधनिबंध सादर करू शकले नाहीत. त्यांनी त्याची कादंबरी केली. ही ‘ब्लॅक क्लाऊड’ नावाची कादंबरी पुष्कळ गाजली. पण पुढील दशकात जे संशोधन झाले, त्या संशोधनाद्वारे असे ढग आणि धूलीकण अवकाशात असतात, हे सिद्ध झाले आहे. एक गोष्ट नम्रपणे नमूद करावीशी वाटते. ती आहे मला वाटणाऱ्या (विकृत) समाधानाबाबतची! ‘स्विफ्ट टर्टल’ हा धूमकेतू पुढील वारीत सूर्याजवळ येताना पृथ्वीवर आपटणार आहे – असा तर्क केला जात आहे. हे घडणार आहे बाविसाव्या शतकात. पुढील काळात या धूमकेतूबाबतची माहिती आपणाला मिळू शकेल, तेव्हा हा तर्क तपासून पाहता येईल. अर्थात हे गणित अशा माहितीवर आधारित असते.

समाधान वाटण्याचे एक कारण म्हणजे सुमारे अठरा वर्षांपूर्वी अशाच आशयाची एक कथा मी लिहिली होती. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी जी पद्धत मी कथेत सांगितली आहे, तशीच पद्धत आता शास्त्रज्ञ सुचवत आहेत. यदाकदाचित असा धोका निर्माण झाला; तर त्याला सामोरे जाण्याचे तंत्रज्ञान बाविसाव्या शतकातील शास्त्रज्ञ नक्कीच विकसित करतील, असा विश्वास मला वाटतो. मी आज काय म्हणालो, हे पाहण्यासाठी पुढे या पुस्तकाची फाईल उपयोगी पडेल, असे वाटते!

मी विज्ञानकथा का लिहितो? दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून. सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून. विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी.

माझे काही कलावादी साहित्यिक मित्र मला म्हणतात की, असा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे साहित्य नव्हे. मी अशा साहित्यिकांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुळसीदासाचे रामचरित मानस किंवा महाराष्ट्रातील संतवाङ्मयाला काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही साहित्य म्हणणार नसाल, तर तुमच्या साहित्यासाठी वेगळे मानदंड तुम्ही वापरले पाहिजेत.

हा लेख संपवताना समीक्षकांचे काही मुद्दे मला ध्यानात घ्यावयाचे आहेत. आणि त्यांना उत्तर देणे आवश्यक आहे. जगात कोणीही परिपूर्ण नसतोच. एक लेखक म्हणून माझ्या स्वत:च्या मर्यादा आहेत. याबद्दलची जाणीव मला आहे. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये लिखाण करतो. या भाषांतील अनेक लेखक दर्जाने माझ्यापेक्षा वरचे आहेत, हे मला माहीत आहे. माझ्या टीकाकारांनी केलेली टीका मला मान्य आहे की, माझ्या कथांमधील पात्रे निरस आहेत, कथानक प्रभावी नाही वगैरे...

विज्ञानकथांचे समीक्षण करताना मात्र मराठी समीक्षक खूपच खालच्या पातळीवर गेलेले आहेत. काही उदाहरणांवरून याची कल्पना येते.

काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. या समीक्षकांना माझे उत्तर असे की, इंग्रजी शब्दाचा उच्चार न करता त्यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे. त्यांना कळेल की, काही इंग्रजी शब्द हे दैनंदिन जीवनात अगदी रूढ झाले आहेत. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते – असे मला सुचवायचे आहे. आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, हे विसरून चालणार नाही.

इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे. जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टीव्ही, टेलिफोन, फॅक्स, रडार, रॉकेट हे इंग्रजी शब्द कथांमधून वापरले जाणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील. पण सामान्य वाचक जर या शब्दांना स्वीकारू इच्छीत असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी?

माझ्या धूमकेतूवरील कथेवर टीका करताना एका समीक्षकाने गंमतच केली! त्याच्या मते – ती कथा फ्रेड हॉएल यांच्या ‘ऑक्टोबर द फस्र्ट इज टू लेट’ या कादंबरीची नक्कल आहे. या टीकेने चकित होऊन मी हॉएल यांची मूळ कादंबरी लक्षपूर्वक वाचली. माझे कथानक आणि मूळ वैज्ञानिक कल्पना याबाबत कोठे साम्य आहे का, हे तपासून पाहिले. माझी कथा आणि फ्रेड हॉएल यांची कादंबरी यामध्ये एकच साम्य होते, ते म्हणजे ऑक्टोबरची पहिली तारीख - October the first!!

त्या समीक्षकाला भेटण्याचा योग आला. मी त्याला विचारले, ‘‘आपण फ्रेड हॉएल यांची मूळ कादंबरी वाचली आहे काय? वाचली असल्यास मी माझ्या कथेचे कथानक त्या कादंबरीतून घेतले हे कशावरून, ते आपण सांगू शकाल काय?’’ त्यांनी हे मान्य केले की, कादंबरी त्यांनी वाचलीच नव्हती. कादंबरीच्या नावावरूनच त्यांनी असा दावा केला होता!

समीक्षणात अशा प्रकारच्या खूप चुका होत गेल्या आहेत. त्यातून विनोदही निर्माण झाला आहे. एका विद्वानाने विज्ञानकथा या विषयावर प्रबंध लिहिला, सादर केला. या प्रबंधाला एका विद्यापीठाने डॉक्टरेटही बहाल केली. या विद्वानाने पूर्वीच्या समीक्षकांसारखीच चूक केली आहे. मूळ लिखाण वाचण्याचे कष्ट न घेता, ‘भारतीय विज्ञानकथा लेखक इंग्रजी विज्ञानकथांमधून कथानक उचलतात!’ असे ठोकून दिले आहे. याचे त्यांनी दिलेले उदाहरण पहा.

कॉनन डॉयलच्या शेरलॉक होम्स कथांचा मी खूप चाहता आहे. गंमत म्हणून मी एक प्रयोग केला. होम्स आणि वॉटसन यांना पात्रे म्हणून घेऊन मी विज्ञानकथा लिहिली. मराठी धर्तीवर कथा लिहिताना शैली मात्र कॉनन डॉयलची राहील, याची काळजी मी घेतली. अनेक वाचकांना वाटले, मी हे भाषांतरच केले आहे. काही वाचकांनी पत्रे पाठवून मूळ कथेबाबत विचारणादेखील केली.

आमच्या समीक्षक विद्वानाने तर कमालच केली. पूर्वीच्या टीकाकारापेक्षा त्यांनी एक पाऊल पुढेच टाकले. ती माझी कथा कॉनन डॉयलच्या ‘ओपल टियारा’ या कथेवरून मी घेतली आहे, असे जाहीर केले. कॉनन डॉयल यांनी या नावाची कथाच लिहिलेली नसताना त्यांनी हा शोध कसा लावला, हे त्यांनाच ठाऊक. माझी कथा Relativity and time travel या तत्त्वावर बेतलेली आहे. कॉनन डॉयल तर या विषयावर काहीच लिखाण करू शकला नसता. कारण त्याकाळी आइन्स्टाइनचा सापेक्षतेचा सिद्धांत प्रचारात नव्हता आणि हा विषय फार निवडक शास्त्रज्ञांनाच समजत असे.

मी वुडहाऊस यांचासुद्धा खूप चाहता आहे. एक कथा मी वुडहाऊस यांच्या शैलीत सादर केली. अनेकांची येथेसुद्धा फसगत झाली. वुडहाउस यांच्या बर्टी बुस्टर व जीव्जच्या एका कथेचेच मी भाषांतर केले आहे, असे अनेकांना वाटले. अनेकांनी पूर्वीप्रमाणेच मूळ कथानकाबाबत विचारणादेखील केली. वुडहाउस यांनी अशी कथाच लिहिलेली नाही, हे समजल्यावर त्यांनी माझ्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

काहीजण विचारतात, ‘‘तुम्हांला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो?’’ विचारणाऱ्याचा सूर असा असतो की, ‘संशोधनाचे काम सोडून तुम्ही हे काय करत आहात?’ माझे त्यांना सांगणे आहे की, विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे.

विज्ञानकथा लिहिण्यासाठी वेळ कसा मिळवायचा, हादेखील एक मुद्दा आहेच. दिवसाच्या चोवीस तासांतील प्रमुख वेळ आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या कामासाठी द्यावा लागतो. शिवाय झोप आणि जगण्यासाठी व इतर आवश्यक गोष्टींसाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्यातून थोडा वेळ मिळतो, तो मात्र आपण असाच घालवतो.

एका व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाची सुरुवात करताना अध्यापकाने बरोबर आणलेल्या बादलीत मोठे दगडधोंडे भरायला सुरुवात केली. जेव्हा आता जास्त दगड मावत नाहीत, हे त्याच्या लक्षात आले; तेव्हा त्याने क्लासला विचारले : ‘‘काय, बदली भरली?’’ क्लास उत्तरला, ‘‘होय.’’ तेव्हा अध्यापक उत्तरला ‘‘चूक!’’ आणि त्याने बरोबर आणलेली वाळू बादलीत ओतली. त्याने विचारले : ‘‘काय बादली भरली?’’ ‘‘नाही.’’ क्लास उत्तरला. ‘‘बरोबर.’’ असे म्हणून त्याने बादलीत पाणी ओतून दाखवले. ‘‘यातून काय बोध घ्यायचा?’’ त्याने विचारले. क्लास म्हणाला, ‘‘तुमची मोठी कामे उरकली की, त्या दरम्यान असलेला मोकळा वेळ लहान कामासाठी वापरावा.’’ पुढे अध्यापकाने दुसऱ्या बादलीत आधी वाळू आणि पाणी भरले, तेव्हा त्यात दगडधोंड्यासाठी जागा राहिली नाही! तात्पर्य? तुमची लहान कामे उरकण्यात वेळ गेला, तर मोठी कामे करणार कधी? तेव्हा वेळेचे नियोजन महत्त्वाचे!

कधी कधी असेपण होते. आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येते की, विमान सुटावयास दोन तासांचा उशीर आहे. यावेळी त्रागा करून घेऊ नका. माझा सल्ला आठवा. वही समोर ओढा आणि लिहायला लागा. आपणही विज्ञानकथा लिहू शकाल.

.............................................................................................................................................

डॉ. जयंत नारळीकर यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5163/Samagra-Jayant-Narlikar

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 20 January 2020

जागतिक कीर्तीचे संशोधक व जागतिक कीर्तीचे गणितत्ज्ञ असूनही नारळीकर विनयशील आहेत. त्यांचा हा कित्ता गिरवायला हवा. त्यांना विनम्र अभिवादन.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......