लिओनेल मेस्सी : फुटबॉल जगताचा सुलतान
संकीर्ण - पुनर्वाचन
नचिकेत पंढरपुरे
  • लिओनेल मेस्सीची पत्नी आणि मुले
  • Thu , 06 July 2017
  • संकीर्ण पुनर्वाचन लिओनेल मेस्सी Lionel Messi फुटबॉल Footboll नचिकेत पंढरपुरे

आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने मागच्या आठवड्यात ३० जून २०१७ रोजी आपली बालमैत्रीण एंटोनेशी लग्न केलं. गेली आठ वर्षं ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होतं. त्यांना दोन मुलेही आहेत. अर्जेंटिनामधील रोझारियो या शहरात झालेल्या या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र या लग्नाविषयी जगभर उत्सूकता होती. कारण लिओनेल मेस्सी. जगातला आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू. असं मेस्सीला का मानलं जातं आणि मेस्सीच्या जगभर असलेल्या लोकप्रियतेचा याचा उलगडा या लेखातून जाणून घेता येईल.

.............................................................................................................................................

भारतीय उद्योगविश्वात सध्या टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादामुळे काहीशी खळबळ माजली आहे. मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून काढण्यात आलं. या तडकाफडकी निर्णयाबद्दल त्यांच्या वतीने बरीच कारणं दिली गेली आणि त्याविरुद्ध मिस्त्री यांनीसुद्धा आपली बाजू मांडली आहे. या वादाचं पुढे काय होईल ते काळच ठरवेल. तो या लेखाचा विषय नाही. परंतु सायरस मिस्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या एका निर्णयाचा आपण या लेखाशी संबंध जोडू शकतो. काही वादाचे मुद्दे सोडले तर भारताला एका मजबूत अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यात टाटा समूहाचा फार मोठा वाटा आहे. जमशेटजी टाटा यांनी चालू केलेल्या टाटा स्टीलने जणू भारतीय उद्योगविश्वाचाच पाया रचला. चहापासून विमानप्रवासापर्यंत जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात टाटा समूहाची उत्पादनं आहेत. सध्या टाटा समूहाला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळतं, ते टाटा कन्सलटन्सी सव्हिर्सेसकडून. त्यानंतर क्रमांक लागतो तो टाटा मोटर्सचा. सुमो आणि इंडिका अशी तुफान चालणारी उत्पादनं देऊन टाटा मोटर्सने या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. परंतु नंतर चित्र पालटलं. प्रतिस्पर्ध्यांची संख्या वाढली. नवीन उत्पादनं म्हणावी तशी चालली नाहीत. रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नॅनोप्रकल्प वादात  (सिंगूर) सापडला. म्हणूनच बहुदा रतन टाटा यांच्यानंतर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सायरस मिस्त्री यांनी टाटा मोटर्सला एक ग्लोबल ब्रँड बनवायचा निर्णय घेतला होता. तो तयार करताना अर्थातच एका ब्रँड अॅम्बॅसेडरची गरज लागणार होती. तो जगातील बहुतांश देशात ओळखला जाईल असा हवा. तिथं आपली नेहमीची खान, कपूर मंडळी अपुरी पडणार. याचा विचार करून एक खराखुरा ग्लोबल चेहरा निवडला गेला... लिओनेल मेस्सी!

संपूर्ण जग जर कोणता खेळ खेळत असेल तर तो म्हणजे फुटबॉल. पूर्वी बंगाल, केरळ आणि गोव्यापुरता मर्यादित असलेला फुटबॉल आता आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात पसरला आहे. विशेषतः गेल्या दहा-पंधरा वर्षांत शहरी भागात तर हा खेळ अफाट लोकप्रिय होत चालला आहे. आपल्या देशाला मिळालेल्या लोकसंख्येच्या वरदानामुळे भारत ही आपल्यासाठी फार  मोठी बाजारपेठ आहे हे जागतिक फुटबॉल विश्वाने ओळखलं आहे. स्पेन, इंग्लंड, इटलीमध्ये चालणाऱ्या लीग्ज आपल्याकडील क्रीडा वाहिन्यांवर लाइव्ह दाखवल्या जातात. शहरी भागात या लीग्जची प्रेक्षकसंख्या लक्षणीय आहे.  आपल्यासाठी लक्षणीय वाटणारी ही संख्या ही ज्या देशात या लीग्ज खेळल्या जातात, त्या देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. याचा अंदाज घेऊनच फुटबॉलच्या जागतिक नियामक मंडळाने (FIFA) ने भारताला २०१७ च्या १६ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद बहाल केलं आहे.

आपल्या क्रिकेटप्रेमी देशात फुटबॉलविषयी अगदीच औदासीन्य आहे असंही नाही. मॅराडोना, पेले ते थेट ब्राझीलचा रोनाल्डो, फ्रान्सचा झिदान ही नावं आपल्याला ऐकून माहीत असतात. बऱ्याच जणांनी त्यांचा खेळही बघितलेला असतो. कदाचित मेस्सीचंही नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेलं असतं, परंतु मेस्सीला आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू का मानण्यात येतं, तसं मानण्याला कोणाचा विरोध आहे, त्याचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी कोण या विषयी आपल्याला फारशी माहिती नसते. क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा हे आपल्या चर्चेचे मुख्य विषय असल्याने शाहरूख की अमीर की सलमान, उद्धव की राज, सचिन का सौरव का राहुल, आशा की लता हे आपल्या चर्चेचे विषय असतात. परंतु, इथं आपण फुटबॉल विश्वाच्या मेस्सी या अनभिषिक्त सम्राटाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

सुरुवात करूया मेस्सीच्या बालपणापासून. लिओनेल मेस्सी हा अर्जेन्टिनाचा. गेल्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला गेलेला मॅराडोनाही अर्जेन्टिनाचाच (काही लोकांसाठी पेले हा सर्वोत्तम खेळाडू आहे). त्यामुळे अर्जेन्टिनाच्या कोणत्याही फुटबॉलपटूला 'मॅराडोनाशी तुलना' या परीक्षेला जन्मापासूनच सामोरं जावं लागतं. (भारताच्या बाबतीत बोलायचं तर सचिन तेंडुलकर). त्याला तेथील प्रसारमाध्यमंही खतपाणी घालतात. अनेक उदयोन्मुख खेळाडूंची 'नवीन मॅराडोना' अशी तुलना केली गेली. परंतु मॅराडोना इतकाच किंवा त्याहून थोडा जास्त सरस असा निष्कर्ष फक्त मेस्सीच्या बाबतीत काढता येईल. (अशी तुलना झाली तरी मेस्सी व मॅराडोना यांचे संबंध घनिष्ठ असून मेस्सी हा मॅराडोनाच्या नातवाचा ‘गॉडफादर’ आहे!)

तर अशा या मेस्सीचा जन्म झाला तो अर्जेन्टिनामधील रोसारिओ या शहरामध्ये. तारीख होती २४ जून १९८७. मेस्सीचे वडील एका स्टील फॅक्टरीमध्ये व्यवस्थापक होते, तर आई एका चुंबक बनवायच्या कारखान्यात कामाला. बहुदा म्हणूनच चेंडू मेस्सीच्या पायाला चुंबकासारखा चिकटतो! कुटुंब मध्यमवर्गीय होतं. या दाम्पत्याचं लिओनेल (लाडाने ‘लिओ’) हे चौघांमधील तिसरं अपत्य. अर्जेन्टिनाला युरोपियन निर्वासितांचा बराच इतिहास आहे. मेस्सीलाही मुख्य करून इटालियन वंशाचा वारसा मिळाला आहे. याचबरोबर त्याला अजून एक कौटुंबिक वारसा मिळाला, तो म्हणजे फुटबॉलवेडाचा. चार वर्षांचा असल्यापासून त्याने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. त्याचे वडील एका छोट्या क्लबचे प्रशिक्षक होते. तिथं मेस्सीने पहिले धडे गिरवण्यास सुरुवात केली. परंतु त्याच्या सांगण्यानुसार या वयात त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो त्याच्या आजीचा. ही आजी त्याला फुटबॉल सराव आणि सामन्यांना घेऊन जात असे आणि फुटबॉलविषयी कानमंत्र देत असे. रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून आपले ज्ञान वाढवणाऱ्या आपल्या आज्या आणि फुटबॉल शिकवणारी लिओची आजी, या गोष्टी दोन भिन्न संस्कृतींविषयी बरंच काही सांगून जातात. मेस्सी ११ वर्षांचा असताना त्याच्या या लाडक्या आजीचं निधन झालं. या धक्क्याचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. म्हणून आजसुद्धा आजीच्या प्रेमाखातर प्रत्येक गोल मारल्यावर तो आपल्या आकाशातील आजीला वंदन करतो, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सहा वर्षांचा असताना मेस्सीने आपल्या अतिशय आवडत्या अशा Newell's Old Boys या क्लबच्या बाळगटापासून खेळण्यास सुरुवात केली. सहा वर्षांच्या मुलांसाठी क्लब पातळीचं फुटबॉल हे आपल्याला बुचकळ्यात टाकेल, पण यावरूनच आपल्याकडील क्रीडाविषयक उदासीनता दिसून येते. भारतातील अनेक खेळांनी गेल्या १० वर्षांत जागतिक फुटबॉलच्या धर्तीवर लीग्ज चालू केल्या (क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी इ. ). परंतु त्यांचा उद्देश निव्वळ व्यावसायिक असल्याने त्याचा खेळाला फार कमी फायदा झाला. या लीग्जच्या मूळ ढाच्याचा संपूर्ण अभ्यास केला गेलेला दिसत नाही. साधारणतः प्रत्येक क्लबमध्ये प्रत्येक वयोगटाचे पाच-सात संघ असतात. त्यातून प्रत्येक खेळाडूला आपलं कौशल्य पणाला लावून वरच्या संघात स्थान मिळवावं लागतं. मेस्सी या क्लबसाठी सहा वर्षं म्हणजेच वयाच्या १२ वर्षांपर्यंत खेळाला. या काळात त्याने तब्बल ५०० गोल मारले. कनिष्ठ संघाकडून ही कामगिरी करत असताना वरिष्ठ संघाच्या सामन्याच्या वेळी मध्यांतराला आपलं चेंडुवरील कौशल्य दाखवून तो प्रेक्षकांचे मनोरंजनही करत असे. असं सर्व सुरळीत चालू असताना त्याच्यावर एक असं संकट आलं, ज्यामुळे तो फुटबॉलपासून कायमचा दूर जाईल की काय, असं चित्र निर्माण झालं. त्याला Growth Hormone Deficiency म्हणजेच वाढीच्या आजाराचं निदान झालं. आजार जीवघेणा नसला तरी तो मेस्सीला एक फुटबॉलपटू म्हणून त्रास देणारा होता. उपचाराची किंमत कोणत्याही मध्यमवर्गीय घराला न परवडणारी होती. मेस्सीच्या वडिलांच्या विम्यानं फार तर दोन वर्षं उपचार चालले असते. त्याच्या क्लबने उपचाराचा खर्च उचलायचं ठरवलं, परंतु नंतर एकाकी नकार दिला.

ता शेवटचा उपाय म्हणून आपल्या स्पेनमधील नातेवाईकांच्या मदतीनं बार्सिलोना या जगातील एका बलाढ्य क्लबशी बोलणी करायचं ठरवलं. अर्जेन्टिनाचा हिरो मॅराडोना हासुद्धा बार्सिलोनाचा माजी खेळाडू. मेस्सीने तेथील सर्व चाचण्या आरामात पार केल्या. परंतु एका अर्जेन्टिनामधील १२-१३ वर्षाच्या मुलाला आपला खेळाडू म्हणून समाविष्ट करणं आणि वर त्याच्या उपचाराचा खर्च उचलणं यावर क्लबचं एकमत होईना. मात्र मेस्सीच्या चाचणीच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रशिक्षकाला त्याच्या खेळानं वेडावून टाकलं होतं. अखेरीस याच प्रशिक्षकांच्या मध्यस्तीनं एका हॉटेलमधील भेटीत बार्सिलोनाने लिओला आपल्याकडे घेण्याचं ठरवलं. असं म्हणतात की, मेस्सीच्या वडिलांना हमीपत्र म्हणून देण्यासाठी कागद मिळाला नाही म्हणून एका पेपर नॅपकीनवर या प्रशिक्षकांनी लिहून दिलं. मेस्सी कुटुंब स्पेनला स्थलांतरित झालं.

सुरुवातीच्या एका वर्षात योग्यता असूनही मेस्सी काही तांत्रिक बाबींमुळे कनिष्ठ संघात खेळू शकला नाही. आई इतर भावंडांची काळजी घेण्यासाठी अर्जेन्टिनाला परतल्यामुळे आणि अबोल स्वभावामुळे मेस्सी थोडा एकटा पडला होता. त्याच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार बऱ्याच लोकांना तर तो मुका वाटला होता. फुटबॉलविषयी असलेल्या विलक्षण ओढीनं तो तग धरून होता. शेवटी तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर मेस्सीचा कनिष्ठ संघात समावेश झाला आणि त्याचं नैराश्य दूर झालं. आता बाकी कोणाची सोबत नसली तरी फुटबॉल त्याच्या सोबतीला होता. या काळात मेस्सीची काही सहकाऱ्यांशी झालेली मैत्री आजही टिकून आहे. त्यातील काही महत्त्वाची नावं म्हणजे फॅब्रेगास, पिके (पॉप गायिका शकिराचा जोडीदार) हे नावाजलेले खेळाडू. आता मेस्सी मागे बघणार नव्हता. अपेक्षेप्रमाणे त्याने सामने गाजवायला सुरुवात केली. ३० सामन्यात ३६ गोल मारून त्याने आपल्या संघाला कनिष्ठ लीग जिंकून दिली.

मेस्सी त्याच्या चेंडूबरोबर धावतानाच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. पेप गुआरडीओला या नावाजलेल्या प्रशिक्षकाच्या मतानुसार मेस्सी हा असा एकमेव खेळाडू आहे, जो चेंडू पायात नसताना ज्या वेगानं धावतो, त्यापेक्षा अधिक वेगानं तो चेंडू पायात घेऊन धावतो. मेस्सीने हाच वेग त्याच्या कारकिर्दीतही कायम ठेवला आहे. कनिष्ठ संघांमधून वरिष्ठ संघात जाणं हा क्लबमधील कोणत्याही खेळाडूचा उद्देश असतो. साधारणतः वर्षाला एक वरिष्ठ संघ या गतीनं इतर खेळाडू आगेकूच करत असतात. मेस्सीने एकाच वर्षात पाच वरिष्ठ संघात निवडला जाण्याचा म्हणजे कारकुनी भाषेत एकाच वर्षात पाच प्रमोशन्स घेण्याचा विक्रम क

आता तो मुख्य संघापासून केवळ एक पाऊल लांब होता आणि ती संधी नकळत चालून आली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे मुख्य संघातील काही खेळाडू उपलब्ध नसल्याने काही कनिष्ठ संघातील खेळाडूंना संधी देण्याचं संघ व्यवस्थापनानं ठरवलं. मेस्सीच्या कामगिरीमुळे साहजिकच त्याचं नाव सर्वांत पुढे होतं. पहिल्याच दिवशी वरिष्ठ संघाबरोबरच्या सराव सामन्यात मेस्सीने दिग्गज खेळाडूंना अस्मान दाखवलं. त्या वेळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ खेळाडूच्या सांगण्यानुसार मेस्सीचा खेळ बघून आपली लाज वाचवण्यासाठी काही खेळाडूंनी त्याला पाडायला सुरुवात केली, परंतु मेस्सी स्वतःला मुख्य संघात सिद्ध करण्याच्या इर्ष्येनं खेळत असल्याने तो पडल्यानंतर परत उठून आपला खेळ चालू ठेवत होता.

पहिल्याच सामन्यात मेस्सी वरिष्ठ संघाचा भाग झाला होता. अनुभव कमी असल्याने त्याला काही काळ मुख्य संघाकडून जास्त सामने खेळता आले नाहीत. परंतु एटू, रोनाल्डिन्हीओ, पूयोल अशा रथी-महारथींच्या सहवासात राहून तो खूप काही शिकला. विशेषतः आपल्या फुटबॉलवरील हुकूमतीने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या रोनाल्डिन्हीओशी त्याची चांगलीच गट्टी जमली. दोघेही आघाडीच्या फळीत खेळत असल्याने मेस्सी जणू रोनाल्डिन्हीओकडून आक्रमणाचे धडे घेत होता, असं खात्रीने सांगण्याचं कारण म्हणजे मुख्य संघाकडून नोंदवलेल्या मेस्सीच्या पहिल्या गोलसाठीचा पास होता रोनाल्डिन्हीओचा.

वरिष्ठ संघाचा भाग असला तरी मेस्सी पुढील सहा महिने प्रत्यक्ष सामन्यात खेळला नव्हता, परंतु तो स्वस्थ बसून नव्हता. लहानचणीच्या मेस्सीच्या पायातील जादूविषयी कोणालाच शंका नव्हती. परंतु वरिष्ठ पातळीवर कौशल्याबरोबरच प्रतिस्पर्धी संघातील बचाव फळीतील खेळाडूंच्या धडकांना सामोरं जायचं तर थोडी upper body strength ही महत्त्वाची. मेस्सीने या सहा महिन्यात आपली शारीरिक क्षमता वाढवण्यावर भर दिला. बार्सिलोनाचा मुख्य संघ थोड्या कठीण काळातून जात होता. त्यांना काहीतरी नवं करण्याची गरज होती. म्हणूनच तेव्हाचे प्रशिक्षक व एकेकाळचे प्रसिद्ध खेळाडू फ्रॅंक रायकार्ड यांनी काही वरिष्ठ खेळाडूंच्या सांगण्यानुसार मेस्सीचा प्रमुख संघात समावेश केला. मेस्सी 'starting eleven' म्हणजेच नियमित खेळणारा खेळाडू झाला. आतापर्यंत त्याच्या नावाचा दबदबा फुटबॉलविश्वात झाला होता. बरेचसे आघाडीचे क्लब मेस्सीला आपल्याकडे खेचण्यासाठी इच्छुक होते. बार्सिलोनाने हे आधीच ओळखून मेस्सीची किंमत ठेवली होती, १५० दशलक्ष युरो! त्यावेळी मेस्सीचं वय होतं १८ वर्ष...

त्यानंतर मेस्सीने मागे वळून बघितलं नाही. हा प्रवास लेखी सांगण्यापेक्षा आकड्यांमधून चांगल्या पद्धतीने कळू शकेल

बार्सिलोनाकडून खेळताना त्याने अनेक प्रकारचे विक्रम केले. साहजिकच त्याची मॅराडोनाबरोबर तुलना चालू झाली आणि मेस्सीने आपल्या खेळाच्या जोरावर त्याला एकप्रकारे खाद्यही पुरवलं. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने हुबेहूब मॅराडोनासारखे दोन गोल मारले. एक म्हणजे कोणालाही कळणार नाही असा कळत-नकळतपणे मारलेला ‘हँड ऑफ गॉड’  आणि मध्यरेषेपासून सहा-सात खेळाडूंना चकवत मारलेला गोल. मॅराडोनाने हे दोन्ही गोल ८६च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध मारून अर्जेन्टिनाला विजयी केलं होतं. आपण सचिनला ‘देव’ मानतो, फुटबॉल चाहत्यांनी मॅराडोनालासुद्धा देवाचीच (‘एल दियोस’) उपमा दिली आहे. मेस्सीला त्याचे चाहते ‘मसीहा’ (प्रेषित) मानतात. फक्त या तिघांमधील फरक असा की, मेस्सीला ही उपाधी वयाच्या २०व्या वर्षीच मिळाली. सर्वसामान्य प्रेक्षक आणि खडूस जाणकार/टीकाकार यांचं सहसा एकमत होत नाही, परंतु मेस्सी हा या समजुतीला अपवाद आहे. सर्वसामान्य चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबरोबरच फुटबॉल विश्वातील ऑस्कर समजला जाणारा ‘Ballons d'or’ हा पुरस्कार मेस्सीने पाच वेळा पटकावला आहे.

जुन्या दिगज्जांशी तुलना करणं हा प्रत्येक खेळाचा एक भाग असतो. परंतु तेवढाच तुल्यबळ समकालीन प्रतिस्पर्धी मिळाला तर मेस्सीसारख्या विक्रमादित्याचा खेळ अजूनच खुलतो. या बाबतीतील इतर उदाहरणं म्हणजे सचिन-लारा, फ्रेझर-मुहम्मद अली, फेडरर-नदाल इ. मेस्सी या बाबतीत नशीबवान ठरला, कारण त्यालाही असाच एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळाला आहे. तो म्हणजे क्रिस्तिआनो रोनाल्डो. जगातील सध्याचे फुटबॉल रसिक हे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक मेस्सी गट तर दुसरा रोनाल्डो गट. कोणत्याही खेळातील चाहत्यांच्या चर्चांप्रमाणे फुटबॉलमधेही या विषयीचे वाद रंगतात. दोन्ही खेळाडूंची अचंबित करणारी आकडेवारी आणि त्यातील सातत्य हे त्यांच्याविरोधी गटातील टीकाकाराला आरोप करण्यासाठी जास्त वाव देत नाही. मग त्याचं विश्लेषण करून मुद्दे शोधले जातात. यातील सर्वच मुद्दे हे दुर्लक्ष करण्यासारखे नसतात. मेस्सीच्या टीकाकारांकडेही असे काही मुद्दे आहेत. या मुद्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. कारण मेस्सीवरच्या टीकेकडे दुर्लक्ष करून, त्याला देवत्व बहाल करून आधीच गिचमिड झालेल्या देव्हाऱ्यात भर घालणं हा या लेखाचा उद्देश नाही.

रोनाल्डोने तीन वेगवेगळ्या देशांतील लीग्जमध्ये (मँचेस्टर युनाइटेड-इंग्लंड, रिअल माद्रिद-स्पेन व स्पोर्टिंग-पोर्तुगाल) स्वतःला सिद्ध केलं आहे, तर मेस्सीची संपूर्ण कारकीर्द ही बार्सिलोनामध्येच असल्याने त्याचे टीकाकार रोनाल्डोला त्याच्यापेक्षा सरस ठरवतात. थोडक्यात क्रिकेटच्या संदर्भात बोलायचं तर भारतात आणि भारताबाहेरील कामगिरीची तुलना. परंतु मेस्सीला जेव्हा जेव्हा इतर देशात खेळायची संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा त्याने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश-अपयश हे फुटबॉलमधील दिग्गज ठरवण्याचं शेवटचं माप. इथं मेस्सी थोडा मागे पडतो. एकतर मॅराडोनाने आपल्या एकहाती कामगिरीवर अर्जेन्टिनाला विश्वकरंडक मिळवून दिला असल्याने त्याचं वेगळंच दडपण मेस्सीवर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी असतं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळावरून दिसून येतं. आकडेवारी उत्तम असूनही स्पर्धा न जिंकता आल्याने मेस्सीच्या खेळाला गालबोट लागतं, असं बऱ्याच लोकांना वाटतं.

या उलट रोनाल्डोने नुकत्याच झालेल्या युरो चषकात आपल्या नेतृत्वाखाली पोर्तुगालला जेतं ठरवल्यानं मेस्सीवरचं दडपण वाढलं. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु चाहत्यांच्या आग्रहाखातर त्याला माघार घ्यावी लागली. फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचं महत्त्व हे क्लब फुटबॉलपेक्षा थोडं खालचं. बहुतांश खेळाडू हे आपापल्या क्लबकडून विविध देशांतील खेळाडूंसोबत वर्षभर खेळत असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आल्या की, काही दिवस आधी सराव केला जातो. यामुळे खेळाडूंमधील क्लब पातळीवरील समन्वय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वय यात तफावत जाणवते. बहुदा नेयमार, इनिएस्टा अशा बार्सिलोनाच्या दिगज्जांबरोबरील सोबतीची उणीव मेस्सीला अर्जेन्टिनासाठी खेळताना जाणवत असावी.

ड्रिबलिंग म्हणजे चेंडू बरोबर ठेवून आपल्या कौशल्यानं खेळाडूंना चकवत वाऱ्याच्या वेगानं अशक्यप्राय स्थितीमधून गोल मारणं ही मेस्सीची ओळख. तो त्या मानाने कमी उंचीचा (५ फूट ७ इंच उंच असलेल्या मेस्सीला आपण भारतीय तरी बुटका म्हणू शकत नाही!), त्याचा त्याला फायदा होतो. मुख्यकरून डाव्या पायानं गोल मारणाऱ्या मेस्सीने आपल्या उजव्या पायावरही गेल्या काही वर्षांत मेहनत घेतल्याचं दिसून येतं. संधी मिळाली तर डोक्याने गोल मारायलाही तो कधी चुकत नाही. याउलट रोनाल्डो मैदानाच्या कोणत्याही भागातून गोल मारू शकतो. रोनाल्डोचा भर मुख्यकरून त्याचं पदलालित्य आणि वेगावर असतो, तर मेस्सी आपल्या शरीराचा वापर करून वेगाच्या जोरावर समोरच्या खेळाडूला चकवतो. वर्षातून किमान दोन वेळेस हे खेळाडू समोरासमोर येतात. मेस्सीचा बार्सिलोना आणि रोनाल्डोचा रिअल माद्रिद हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी क्लब. त्यामुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं.

हे सर्व झाले मैदानावरील मुद्दे. मैदानाबाहेरील मेस्सीची जीवनशैली ही रोनाल्डोच्या मानानं साधी आहे. रोनाल्डोच्या रांगड्या रूपामुळे आणि त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे तो माहिलावर्गाच्या गळ्यातील ताईत आहे. आजवर अनेक मैत्रिणी, प्रकरणं, महागड्या गाड्या या सर्वांमुळे रोनाल्डोची जीवनशैली ही अनेकांना ‘प्लेबॉय जीवनशैली’ वाटते. या उलट मेस्सी हा अगदी मध्यमवर्गीय घरातील मुलासारखा भासतो. मेस्सीने अँतोनेया या आपल्या बालमैत्रिणीशी विवाह केला असून त्यांना दोन मुलं आहेत. रोनाल्डोलाही त्याच्या माजी प्रेयसीपासून एक मुलगा आहे. एकपत्नीव्रता असणाऱ्या मेस्सीचंही नाव काही मॉडेल्ससोबत जोडलं गेलं होतं, पण लग्नानंतर असं काही ऐकण्यात आलेलं नाही.

असा हा सज्जन वाटणारा ‘फुटबॉल जगताचा सुलतान’ या जुलैमध्ये मात्र एका कचाट्यात सापडला होता. स्पेनमध्ये कर बुडवेगिरीच्या आरोपाखाली मेस्सी व त्याच्या वडिलांना २१ महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. परंतु मोठा दंड भरून कारावास चुकवायचा पर्याय उपलब्ध असल्याने मेस्सी पिता-पुत्र थोडक्यात बचावलं. दिएगो मॅराडोना थेट अमली पदार्थांच्या जाळ्यात सापडला होता. त्या मानानं आपण मेस्सीला या बाबतीत तरी थोडा का होईना पण वरचढ मानू शकतो.

मेस्सी मोठा की रोनाल्डो की मॅराडोना या वादाला काही मरण नाही. आपल्या इथं अजूनही ब्रॅडमन मोठा की गावस्कर की तेंडुलकर याचा निकाल लागलेला नाही. हे वाद न संपण्यासाठीच तयार होत असतात. वरवर निरर्थक वाटत असले तरी असे वाद घडणं, हे कुठे ना कुठे त्या खेळाला मोठं करत असतात. किंबहुना वाद घडतील अशा दोन खेळाडूंचा खेळ एकाच कालखंडात बघायला मिळणं, ही त्या खेळाच्या रसिकांसाठी भाग्याची गोष्ट असते. आपला देश हा फुटबॉलला आपलासा करू पाहतोय. त्याचे बरेच परिणाम दिसायला लागले आहेत. भारताची पुढची शहरी पिढी ही फुटबॉलवेडी असणार आहे. त्यामुळे या पिढीने आपल्याला मेस्सी किंवा रोनाल्डोविषयी विचारलं तर त्यांना निराश करायची वेळ येऊ नये किंवा निदान आपलं हसं तरी होऊ नये. असे भविष्यात खात्रीपूर्वक घडेल हे अधोरेखित करण्यासाठी एक प्रसंग सांगून हा लेख संपवतो. परवाच आमच्या सोसायटीमधील बच्चेकंपनीची दिवाळी खरेदी बघण्याचा योग आला. त्यात फटाके तर नव्हतेच, पण रंगीबेरंगी कपडे किंवा किल्ल्यावरची खेळणीसुद्धा नव्हती. प्रत्येक मुलाने एकतर आपल्या आवडत्या फुटबॉल खेळाडूची जर्सी घेतली होती किंवा फुटबॉल खेळायचे बूट. भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना चालू होता, तरीसुद्धा आपापल्या वडिलांच्या शिव्या खात मुलांनी त्यांना टीव्हीवर फुटबॉल लावायला भाग पाडलं होतं आणि आपापल्या नवीन जर्सी घालून ती या जागतिक खेळाचा आनंद घेत होती. जर्सीमध्ये होते, दोन रोनाल्डो आणि तीन मेस्सी...

लेखक फुटबॉलचे अभ्यासक आहेत.

nachiketpandharpure@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल