आपल्या पूर्वजांचे विज्ञान - अश्रूंची झाली मुले!
संकीर्ण - व्यंगनामा
रसिकलाल कोठडिया
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 29 June 2017
  • संकीर्ण व्यंगनामा अश्रुंची झाली मुले childbirth from Tears गर्भधारणा pregnancy खजुराहो Khajuraho बजरंग दल Bajrang Dal

खजुराहोच्या कामजीवनावर आधारित मूर्ती पाहून अनेक भाविक बेचैन होतात. बजरंग दलाच्या नेत्यांनी पहिला हल्ला त्या पुस्तक विक्रेत्यांवर केलेला आहे, जे खजुराहोच्या मंदिरातील शिल्पाचे फोटो असलेली पुस्तकं विकत आहेत. कालांतरानं संपूर्ण मंदिर कपड्यानं झाकण्याचा विचार असल्याचं बोललं जात आहे. बजरंग दलाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! 

आपल्या या भूमीची महान परंपरा लोकांच्या विस्मृतीत जाऊ लागली आहे. प्राचीन काळी या भूमीवर गर्भधारणेसाठी अनेकविध मार्ग उपलब्ध होते. त्यातील सर्वांत हमखास मार्ग हा अश्रुपाताद्वारे होणारी गर्भधारणा, हा होय. त्याचप्रमाणे द्रोणात अश्रू किंवा वीर्य भरून ते इप्सित स्थळी पोचवून गर्भधारणा करण्यात आपले पूर्वज पटाईत होते. द्रोणाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रयोग आधुनिक काळात टेस्ट ट्यूब बेबी या नावानं पुन्हा एकदा समोर आलेले आहेत! 

अश्रूविज्ञानाच्या बाबतीत आपले पूर्वज फारच पुढे गेलेले होते. हा मार्ग सोपा व अहिंसक होता. वयात आलेल्या पुरुषानं डोळ्यातून अश्रू काढले की, जवळ असलेली व वयात आलेली स्त्री गर्भार व्हायची. राजा-राणीला मूल होत नसल्यास त्या काळातील ऋषी यज्ञ करायचे. या यज्ञात खूप धूर व्हायचा. त्यामुळे राजाच्या व ऋषींच्याही डोळ्यांतून अश्रू निघायचे. शेजारी असलेल्या राणीला त्यामुळे गर्भधारणा व्हायची. ही गर्भधारणा राजाच्या अश्रूमुळे झाली की ऋषींच्या, ही गोष्ट फक्त ऋषीलाच ठाऊक असायची. पण त्यामुळे राजा आनंदी व्हायचा व राणीही आनंदी व्हायची. यज्ञाच्या काळात राज्यातील अनेक स्त्रिया गरोदर व्हायच्या. (राणी ही गर्भार असायची व सर्वसामान्य स्त्रीही गरोदर असायची)

त्या वेळचे एका प्रख्यात नाटककार श्री पसंत दानेटकार यांनी त्यावर आधारित ‘अश्रूंची झाली मुले’ हे नाटकही लिहिलं होतं. आधुनिक काळातील नाटककार वसंत कानेटकर यांनी या नाटकापासून प्रेरणा घेऊन ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक लिहिलं. हेही नाटक गाजलं. आता काही संशोधक यावर संशोधन करत आहेत की, ‘मुले’ शब्द बदलून ‘फुले’ शब्द वापरण्यामागे माळी समाजाची तर बदनामी करायचा हेतू नव्हता ना? महात्मा फुलेंचे वारस या नावाविरोधात दाद मागण्याच्या विचारात होते, पण मग वसंतरावांनी सन्माननीय तडजोड करून नाटकाच्या आड येणारं विघ्न बाजूला सारलं.

असो. तर सांगायचा मुद्दा असा की, अश्रूच्या माध्यमातून गर्भधारणा करण्याचं कसब आपल्या पूर्वजांना अवगत होतं. हे ज्ञान या पूर्वजांना कुठून मिळालं असेल याचे तर्क करत असताना आम्हा पामराचं ज्ञान अपुरं पडत होतं. पण राजस्थानातील एका न्यायमूर्तींनी केलेल्या विधानामुळे आम्हाला तो साक्षात्कार झाला. मोर आपल्या पायाकडे पाहून रडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू  येऊ लागतात. ते अश्रू पिऊन सौभाग्यवती मयूर (लांडोर) गर्भार होतात. हे वाचून माझ्याही डोळ्यातून अश्रू आले. सुदैवानं माझी बायको वा माझी मैत्रीण शेजारी नव्हती. अन्यथा काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही!

अश्रूच्या माध्यमातून होणारी गर्भधारणा हा प्रकार हाताळायला थोडासा अवघड होता. म्हणून घरात लहानपणापासून आया मुलांना रडायची सवय लागू नये याची काळजी घ्यायच्या. ‘लेका मर्द आहेस. पुरुषासारखा पुरुष असून बायकोसारखा रडतोस काय’! असे संवाद घरोघरी कानावर पडायचे. घरात काही अघटित घडल्यास आजूबाजूला कोणी नाही ना, असं पाहून पुरुष एकांतात जाऊन रडून घेत असत. अजूनही बरेचसे पुरुष असंच करतात. 

आपल्या या सुजलाम सुफलाम देशात अनेक देशांतून लोक येत असत, कधी आक्रमक म्हणून, कधी व्यापारी म्हणून तर कधी पर्यटक म्हणून. त्यातील काही असंस्कृत परदेशी लोकांमध्ये गर्भधारणेसाठी वेगळीच पद्धत असायची. असली तर असली, आपल्याला काय त्याचं! पण त्यातील काही लोकांनी चक्क 'त्या' अवस्थेतील शिल्पं तयार करून ती उपासनेसाठी असलेल्या इमारतींवर लावली. आपली माणसं त्याला भुलली. आपली परंपरा विसरून त्या पद्धतीप्रमाणे वागू लागली. कालांतरानं काही विद्वानांनी असं सांगितलं की, ‘ही पद्धत तर आमच्याकडे प्राचीन काळापासून आहे. यात काय नवीन?’ 

पण बरं झालं. बजरंग दलाच्या विद्वानांना यातील धोके लक्षात आले. त्यांनी आपल्या देशाला संकटातून वाचवण्याचा मार्ग दाखवला आहे. केंद्र सरकारानं गर्भसंस्कारासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यात गर्भधारणेच्या आपल्या प्राचीन पद्धतीचाही समावेश करावा आणि त्यासाठी बजरंग दल, न्यायमूर्ती, साधुश्री ब्रह्मचारी इत्यादींचं सल्लागार मंडळ नेमावं. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी ज्यांना मिळू शकली नाही, त्यांनाही त्यात तज्ज्ञ म्हणून घेता येईल. खजुराहोच्या परिसरात देशी वा परदेशी सर्व पर्यटकांवर बंदी घालावी, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांची 'ताकद' टिकून राहील! 

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......