टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रणव मुखर्जी, राधाकृष्ण विखे पाटील, अण्णा हजारे, नितीन गडकरी आणि पूनम महाजन
  • Thu , 27 April 2017
  • विनोदनामा टपल्या प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe-Patil अण्णा हजारे Anna Hazare नितीन गडकरी Nitin Gadkari पूनम महाजन Poonam Mahajan

टपलीचित्र - श्रीनिवास आगवणे

१. महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने गुंडांना प्रवेश दिला अशी टीका भाजपवर होत होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यावरही विरोधकांनी ही टीका सुरूच ठेवली. त्या टीकेला उत्तर देताना भाजपमध्ये आल्यावर ‘वाल्याचा वाल्मिकी’ होऊ शकतो, असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपने आयात उमेदवारांना तिकीटे देऊन सत्ता आणली अशी ओरड होऊ लागली होती. विरोधकांना पक्षात घेतल्याशिवाय पक्षच वाढणार नाही, असे मत गडकरी यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. विरोधी पक्षातील उमेदवारास तिकीट दिल्यास कुठे बिघडते असे त्यांनी म्हटले आहे.

निम्मी राष्ट्रवादी काँग्रेसची भरती आणि निम्मी काँग्रेसची भरती कमळाच्या चिन्हावर निवडून आली तरी पक्षाचं नाव भारतीय जनता पक्षच असतं, तेवढं महत्त्वाचं, असं गडकरी यांना वाटत असावं. शिवाय, त्यांना शुद्ध नैतिक चारित्र्य वगैरेवरही बोलायचं असतंच. आपण कायमस्वरूपी सत्ताधीश जमातीचे निव्वळ नवचिन्ह-पुरवठादार बनून बसलो आहोत, याचं भान भाजपला कधी येईल?

टपलीचित्र - श्रीनिवास आगवणे

२. दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चा पराभव झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली आहे. मी सांगितलेल्या मार्गावर केजरीवाल चालले असते, तर त्यांचा पराभव झाला नसता, असे ते म्हणाले. केजरीवालांची कृती शून्य आहे, ते फक्त बोलतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

राळेगण सिद्धीमधून उभे राहिलो, तरी आपलं डिपॉझिट वाचायचं नाही, याचं व्यावहारिक भान अण्णा हजारेंना आहे म्हणतात! बाकी देशात सगळं आबादीआबाद असल्यामुळे अण्णांना गाढ झोप लागते आणि केजरीवालांना फटका बसला तरच त्यांना अशी खाडकन् जाग येते आणि काही सुवचनांची मौक्तिकमाला जगाला अर्पण करावीशी वाटते, ही झोप तर कुंभकर्णालाही लाजवणारी आहे.

...............................................................................................................

३. दिवसेंदिवस उच्च शिक्षण घेणे आव्हानात्मक होत चालले आहे. उच्च शिक्षणाला नवसंजीवनी देणारे पोषक वातावरणच उपलब्ध नाही, अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज व्यक्त केली. भारतात तसेच जगभरात उच्च शिक्षणाची स्थिती खालावत चालली आहे, असे ते म्हणाले. एखाद्या विषयाचा ध्यास घेणे किंवा ज्ञानार्थी बनणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. ही शिकवण देण्यास आजकालची महाविद्यालये कमी पडत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. आशिया खंडाला ज्ञानार्जनाची थोर परंपरा लाभली आहे असे ते म्हणाले. गौतम बुद्धांनी ज्ञानाची बीजे भारतामध्ये रोवली. ही याच भूमीत अंकुरित झाली आणि समृद्ध झाली. याच भूमीत नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांची स्थापना झाली आणि त्यांनी अनेक पिढ्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींनी आपल्याकडच्या शिक्षणसंस्था ज्ञानमार्गी नाहीत, पोटार्थी आहेत, यावर भाष्य केलं, ते ठीकच आहे; परदेशांतल्या शिक्षणाच्या दर्जाचा हवाला त्यांनी कशाच्या आधारावर दिला असेल? शिवाय, आपल्याकडच्या शिक्षणाचा दर्जा घसरला, ही पश्चातबुद्धी झाली. आपल्या थोर पक्षाची देशभरात जवळपास एकहाती सत्ता असतानाच सगळ्या शिक्षणव्यवस्थेचा ऱ्हास झाला आणि कॅपिटेशन फीच्या नादाने गावोगावचे गणंग शिक्षणसम्राट बनले ना मुखर्जीसाहेब?

...............................................................................................................

४. माझी चार वर्षांची मुलगीही जास्त समजूतदार असून ती मोठ्या मनाने पराभव स्वीकारते, अशा शब्दात भाजप खासदार पूनम महाजन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत भाजपचा विजय मोदी लाटेमुळे नव्हे तर ईव्हीएममुळे झाला, असा आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षांवर त्यांनी ही बोचरी टीका केली आहे.

पूनमताई, मोठ्या माणसांची पुढची पिढी अनेकदा निस्तेज निघते आणि निस्तेज आईबापांची मुलं कधी कधी आई-वडिलांपेक्षाही हुशार निघतात, ही जगरहाटी आहे; त्यापुढे केजरीवालांची काय कथा?

...............................................................................................................

५. शेतकरी प्रश्नावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था एखाद्या विनोदी नटासारखी झाली आहे. त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकारांनाही मागे टाकले आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला विरोध केला. पण नंतर सत्तेत एकत्र आले. यावरून शिवसेनेचे नेतृत्व गोंधळल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

शिवसेनेकडे निदान ‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका तरी आहे. पण, देशात, राज्यात भाजपविरोधी वातावरण खदखदत असतानाही लोक नाईलाजाने त्यांना निवडून देतायत आणि भाजपला मोदीलाटेच्या यशाचा भ्रम होतो आहे, ते पाहता आपण बेरोजगार कलावंत झालो आहोत- आपल्याला रोजगार हमी योजनेवरही कोणी घेणार नाही, याचं भान या नेत्यांना केव्हा येणार?

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......