वेताळाची वही / खवीसाची खतावणी / શેતાનનો શબ્દકોશ / ਸ਼ੈਤਾਨ ਦਾ ਸ਼ਬਦਕੋਸ਼ / Devil's Dictionary -- in deference to Ambrose Bierce
दीपावली २०२३ - लेख
मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर
  • डावीकडून ‘The Old Man of the Sea (1923) स्केच - Monro Scott Orr, मध्यभागी Sinbad and the Old Man of the Sea आणि उजवीकडे A. E. Jacksonने ‘Tales of the Arabian Nights’साठी केलेलं एक स्केच
  • Fri , 17 November 2023
  • दीपावली २०२३ लेख वेताळाची वही खवीसाची खतावणी

कावळ्याप्रमाणे आजूबाजूच्या जगाकडे वाकड्या मानेनं आणि (एका वेळी) एका(च) डोळ्यानं बघणाऱ्या ‘कसं असावं’ऐवजी ‘काय आहे’ हे तिरक्या (पुणेरी?) पद्धतीनं मांडणारी ही ‘वेताळाची वही’ / ‘खवीसाची खतावणी’. अँब्रोज बिअर्स (१८४२-१९१४?) यांची ‘डेव्हिल्स डिक्शनरी’ आणि एके काळचं पुणेरी अनियतकालिक ‘कट्टा’ (१९७?/८?-??) यांच्याकडून (चुकून) प्रेरणा घेऊन (चुकून) झालेलं (चुकीचं) संकलन…

.................................................................................................................................................................

अभिनिवेश : कस आणि गुणवत्तेचा अभाव झाकण्याची एक क्लृप्ती. पाहा : #भारती.

आंतरशाखीय : गेल्या दोन दशकांमध्ये, विशेषतः नव्या शिक्षणधोरणामुळे, भसकन प्रसिद्धी पावलेला, ‘interdisciplinary’ या इंग्रजी शब्दाला पर्यायी म्हणून रूढ असलेला एक शब्द. अशा नावाची वेगळी विद्याशाखा काढणं, म्हणजे जातिसंस्थेविरुद्ध बंड करणाऱ्यांची वेगळी जात करून जातिसंस्था तिला खाऊन टाकते, तसला प्रकार आहे. या शब्दाचा सोयीस्कर उदोउदो करणाऱ्यांना ‘(आंतर)शाखामृग’ म्हणता यावं. पाहा : शाखाशाप, विद्या/पीठ, ओओटीई.

इंजिनियर (भारतीय) : अभ्यास (फक्त) परीक्षेच्या आदल्या रात्री जागवणारी, आणि पदवी के उपरान्त अभ्यासविषय (तो पण न केलेला) सोडून पोटापाण्यासाठी इतर उद्योग करणारी जमात. अशा बहुतेकांची उत्कृष्ट रिव्हर्स इंजिनियरिंग कौशल्यं बहुधा परीक्षेत(च) दिसतात. श्रीलाल शुक्लसाहेब म्हणतात (१९८३) : ... अड़चनों के बावजूद, इस देश को इंजीनियर पैदा करने हैं; ... इंजीनियर ... तो असल में वे तब होंगे जब वे अमरीका या इंगलैण्ड जाएंगे, पर कुछ शुरुआती काम -- टेक-ऑफ स्टेजवाला -- यहाँ भी होना हैं...

इतिहास : नित्य अनित्य आणि अनिश्चित असणारा एक ज्वालाग्राही आणि स्फोटक पदार्थ. पाहा : भावना, महापुरुष. “The future is certain; it is only the past that is unpredictable” -- सोविएत निरीक्षण. अनिश्चित भूतकाळ असलेल्या विकसित देशांमध्ये आता भारताचाही समावेश केला जावा. पाहा : विकास. आद्य शैतान-दा-शब्दकोशवाला बाबा अँब्रोज बियर्स महाराज याच्या मते : HISTORY, n. An account mostly false, of events mostly unimportant, which are brought about by rulers mostly knaves, and soldiers mostly fools.

ईडी : प्राचीन भारतात दुर्वासांसारखे जटाधारी दाढीवाले ऋषीमुनींमधले डेंजर पावरबाज डॉन कुणावर रागावले की आपल्याच डोक्याची एक जट उपटून जमिनीवर आपटून त्यातून कृत्या नामक राक्षसी निर्माण करून मागे लावून देत असत. हल्ली या प्रकाराला ईडी म्हणतात. त्यापासून वाचण्यासाठी ‘इडीपिडी टळो | मंत्री पद मिळो’ असा जप काही जण रोज १०८ वेळा (किंवा पटीत) करतात आणि आपापल्या विघ्नकर्त्या-विघ्नहर्त्या दैवताला रोज २१ उलट्या प्रदक्षिणा घालतात, असं ऐकिवात आहे.

ईश्वर : जी तपशिलांमध्ये असते ती. पाहा : सैतान.

एक-क्ष-व्रत एक आधुनिक पर्यावरणपूरक व्रत. क्ष == मॉनिटर, फोन, सिम, डेस्कटॉप, लॅपटॉप, गाडी, स्कूटर, घर, इ. टीप : एकच ब्रौजर खिडकी, पण अनेक टॅब हा व्रतभंग मानावा.

ओओटीई/OotE/ऊटी या संक्षिप्ताचा विस्तार ‘Oxford of the East’ असा आहे, असं मानलं जातं. प्रत्यक्षात तो ‘Oxen of the East’ असा आहे, असं जाणकारांचं मत आहे. पाहा : विद्या/पीठ.

कट्टा पहिल्या अंकातच हापटलं असं कोणी (पक्षी : पुणेकर) म्हणू नये, म्हणून एकदम दुसऱ्या अंकापासून अकाली सुरू झालेलं, अकालपक्व टवाळांनी चालवलेलं, अकालीच बंद पडलेलं, आणि सध्या ज्याची नितांत गरज आहे, असं एक अनियतकालिक. पाहा : टवाळ.

कटसिद्धांत मराठीत ‘कॉन्स्पिरसी थियरी’. उदा. अस्थितज्ज्ञांच्या (मराठीत ऑर्थोपीडिक/पीडक/पीडित) दबावगटामुळे (मराठीत लॉबी) पुण्याचे रस्ते सुधारत नाहीत. पाहा : मराठी.

करोना टाळ्या, थाळ्या, घंटा, काकडे, आणि करोनिल यांनी पळवून लावलेला एक सांसर्गिक आजार. पाहा : करोनाकोविद, फेक. एका का-कवीची का-कपिता : वाजवा हो वाजवा टाळ थाळ्या आजला /  काकडा जाळून पळवा तो करोना बाजूला / शेण खावा मूत प्यावा सर्व रोगां घालवा / वापरा आता करोनिल ढंग त्याचा वेगळा... फेकुनी फेकात साऱ्या फेक माझा वेगळा //

करोनाकोविद (१) करोनाकाळात करोनापेक्षाही वेगानं पसरलेला एक आजार. यात ‘‘जे जे आपणासी ठावे | ते ते (चुकीचं असलं तरी) दुसऱ्यासी सांगावे | (बळजबरीने) शहाणे करून सोडावे | अवघे जन ||” अशी ज्ञानकफाची तीव्र उबळ येते. या आजारावर कुठलाही उपाय सापडलेला नाही. (२) या उबळीनं पछाडलेला माणूस. अशा रुग्णाचं सहानुभूतीनं ऐकून घ्यावं आणि कानाआड करावं. पाहा : करोना. टीप : बदलणाऱ्या हवेनुसार ज्ञानकारंज्याचे झोत इतरत्रही घसरू शकतात. उदा. नवीन शिक्षण धोरण.

कर्नाटक सतत नाटक/नाटकं करणारा/री/रं. पाहा : महाराष्ट्र.

कुलगुरू : आमचे एक अनाथपंथी बंधू यांच्या खास वैदर्भी वैखरीतले पुढील दोन सिद्धांत ज्याला लागू आहेत असा माणूस : (१) मागचा(च) बरा होता; (२) प्रगती झाली(च) तर दोघांच्या *मधे* होते; (३) (गृहपाठ. आता आपली आपली एक व्याख्या करा.) पाहा : विद्या/पीठ. टीपा : (१) ‘कुलगुरू’ला इंग्रजीत ‘VC’ अर्थात् ‘Vicious Councillor’ म्हणतात. काही जण ‘Vice Chancellor’ असंही समजतात. या पक्षी समासाची फोड बहुधा ‘more vices than virtues’ या अर्थी ‘brand ambassador’ या समासासारखी करावी लागेल. (२) ‘गुरू’ या शब्दाचा ‘एक गुरू, अनेक गुरं’ असा प्राकृत अर्थ घेऊ नये.

काँग्रेसकवडा राहुलजींच्या बाळलीळा बघून ज्याचा/जिचा/ज्याचा ऊर वात्सल्यानं भरून येतो, ते/ती/तो. बहुधा शहरी बुद्धिजीवी. (देशाच्या) उज्ज्वल भविष्याची (दिवा)स्वप्नं बघताना भूतकाळाकडे दुर्लक्ष आणि वर्तमानाचा सोयीस्कर वापर करणारा. काँग्रेसकवडा म्हणजे काँग्रेसजन नव्हे. पाहा : भाजपभाबडा, काँग्रेसजन.

काँग्रेसगवत Parthenium hysterophorus, सपुष्प वानसांची गवत नसलेली एक प्रजाती. आक्रमक विषारी तण असा हिचा लौकिक आहे. १९६०च्या दशकातल्या दुष्काळात अमेरिकन गव्हाबरोबर ही भारतात आली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि नंतरही काँग्रेस पक्ष ज्या वेगानं वाढला नसेल, अशा वेगानं ही भारतभर पसरली. पाहा : भाजपगवत.

काँग्रेसजन ज्यांनी घाऊक भावात सध्या भाजपमध्ये तंबू ठोकलेत ते. पाहा : काँग्रेसकवडा.

गांधारी सिंड्रोम उघड्या डोळ्यांनी आपल्याच धडधाकट डोळ्यांवर आपणच पट्टी बांधून घेऊन जगणं. पाहा : विचार.

ग्रामण्य मध्ययुगीन भारतातल्या बहिष्कार, वाळीत टाकणं या आणि अशा इतर प्रथा. मराठीत ज्याला कॅन्सल कल्चर म्हणतात ते. लहान मुलांमध्ये : कट्टी (१ सेकंद ते फार तर १ दिवस). पाहा : मराठी.

ग्रामपंचायती कानडा मियाँ तानसेनाला पण न जमलेला आणि हल्ली पुष्कळदा ऐकायला मिळणारा हिंदुस्थानी संगीतातला एक राग (इति जागरणसम्राट). पाहा : पुणेकर श्रोता.

छोटा हत्ती १९८०च्या दशकात महाराष्ट्र विधानसभेत पुढील आशयाचा प्रस्ताव आला होता (म्हणे) : “एका विशिष्ट प्राण्याचा त्याच्या प्रचलित नावानं उल्लेख केल्यास एका विशिष्ट (मानव)समूहाच्या भावना दुखावल्या जातात, म्हणून त्याला (पक्षी : त्या विशिष्ट प्राण्याला) यापुढे अधिकृतपणे ‘छोटा हत्ती’ म्हटलं जावं आणि तसा बदल पाठ्यपुस्तकांमध्ये केला जावा.” कुठल्याही माणसाला कुठल्याही प्राण्याची उपमा देणं हे मुळातच गैर आहे, एवढंच नव्हे तर तो त्या प्राण्याचा अपमान आहे, अशी आमची तीव्र भावना आहे. पाहा : भावना, महाराष्ट्र, प्राणी.

जात जाता जात नाही ती (इति विठूकाका). पाहा : समाज.

टवाळ (१) कसं _असावं_ यापेक्षा कसं _आहे_ हे बघणाऱ्या स्वच्छ नजरेचं माणूस. आद्य शैतान-दा-शब्दकोशवाला बाबा अँब्रोज बियर्समहाराज याची skepticची हीच व्याख्या आहे. (२) ज्याला विनोद आवडतो असा माणूस. आपल्यावरच जो विनोद करू शकतो, त्याची आध्यात्मिक प्रतवारी बरीच वरची आहे असं समजावं. उदा., आपल्याच मुलाला ‘बंदर का बच्चा’ किंवा ‘गधे की औलाद’ म्हणू शकणारा बाप. पाहा : कट्टा.

तोमीनव्हेच सिंड्रोम “ही कलाकृती माझ्याकडून निर्माण झाली, तेव्हा मी मी नव्हतेच/तोच” अशा स्वरूपाची स्व-साहित्य-संगीत-कला-विषयक आत्म-प्रचार-प्रवण, आत्मोद्धारक आणि अज्ञेयवादी भूमिका.

तृतीयपत्री मराठीत ‘पेज थ्री’. पाहा : मराठी.

देशभक्ती नोकरी आणि संधी यांचा अभाव, भ्रष्टाचार, अ(न)र्थव्यवस्था, लाडक्यांप्रती प्रियदर्शित्व, इ.वरचा अक्सीर इलाज.

धर्म तेव्हा : धारयति इति धर्मः, धारणाद्धर्म इत्याहुः, धर्मो रक्षति रक्षितः, वगैरे. हल्ली : अस्मितांना सोयीप्रमाणे धार वगैरे करतो तो, बेचिराख करून शकतो तो, वगैरे.

नगरसेवक नगराचं सेवन करणारा/री. “उदकांचिये मार्गीं / कांकरीट वोतती / प्रळय साधिती / सेवकू //” असं अनाथपंथी गोमळसिद्ध यांनी म्हटलं आहे.

नासा संयुक्त अमरीकी सन्स्थान अर्थात यूएसे येथील हिंदू धर्माचं ग्लोबल कॉर्पोरेट हेडहापीस. इथले आंग्ल गौरवर्णीय उच्चपदस्थ घाऊक भावात सहकुटुंब हिंदूधर्माचा स्वीकार करू लागले आहेत; वामुविवर आमचा ठाम विश्वास आहे. वैदिक कर्मकांडातून वगैरे फुरसत वगैरे मिळाल्यास नासातले पुरोहित वगैरे लोक यज्ञ वगैरे करून आभाळात वगैरे रॉकेटं वगैरे पाठवायचे उद्योग वगैरे करतात. “नासा” हे नाव ऋग्वेदातल्या नासदीय सूक्तावरून कसं आलं, यावर डॅन ब्राऊन नावाचा गोरासाहेब पुढची कादंबरी लिहीत आहे आणि पु. ना. ओकांचा अभ्यास करत आहे, असं कळलं. पाहा : हिंदू, वामुवि.

निवडणूक लोकशाही राष्ट्राच्या पुढच्या नेतृत्वासाठी नवीन/जुनेच (मनुष्य)प्राणिविशेष निवडण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा विधी, ज्यात एका प्रकारच्या नोटाचा मोजका आणि दुसऱ्या प्रकारच्या नोटांचा मुबलक वापर केला जातो, ज्यानंतर आणि आधीही अनेक चित्रविचित्र राक्षस आणि पैशाच विवाह आणि काडीमोड होतात, आणि ज्यातून निवडल्या गेलेल्या (मनुष्य)प्राणिविशेषांवर पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांना निवडून देणाऱ्यांप्रती किंवा जनतेप्रती कुठलंही उत्तरदायित्व असत नाही. पंचतंत्राच्या काळात बेडकांच्या विहिरीत नेतृत्वाची चणचण भासल्यास आभाळातला देव वरून एखादा ओंडका टाकत असे किंवा पाताळातला सैतान एखाद्या बेडकाला एखाद्या सापाला राजा म्हणून बोलवायची बुद्धी देत असे. बेडूकही मग ‘बेडुक तितुका साव / डरांव डरांव डरांव //’ (विंदाकवी) या धारदार बाण्याने आनंदात जगत असत. हल्ली वरची दोन्ही कामं जनता नामक अब्जशीर्ष पण बहुधा बुद्धिहीन एजन्सीकडे सोपवण्यात आली आहेत. पाहा : लोकशाही, समाज. शतकभरापूर्वीचे लोककवी भाराभर पितळे यांचं हे भविष्यदर्शी भेदक भाकीत पाहा : ‘मधु मागशि माझ्या सख्या जरी / मधुघटि भरिले मी शेण परी // आजवरी कमलांच्या द्रोणीं / शेण पाजिले तुला भरोनी / सेवा ही पूर्वीचि स्मरोनी / दे मत दे सखया दया करी //’. एकनाथ म्हणतात : 'ऐशिये वर्ततां मोहस्थिती / पूर्ण कळीची होय प्रवृत्ती / तेव्हां नीच ते राजे होती / प्रजा नागविती चोरप्राय // अपराधेंवीण वितंड / भले त्यांसी करिती दंड । मार्गस्थांचा करिती कोंड / करिती उदंड सर्वापहरण // अबळांचें निजबळ राजा / तो राजाचि स्वयें नागवी प्रजा / ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां / तें गरुडध्वजा न साहवे //.’ गरुडध्वजाची कळियुगासाठीची पॉलिसी God helps those who help themselves अशी असल्यामुळे तो (पक्षी : गरुडध्वज) आजकाल राष्ट्राच्या व्यवहारामधे दखलअंदाजी करत नाही‌. एकनाथांना मॅकॉलेप्रणित वाघिणीचें दूध मिळालेले नसल्यामुळे याची कल्पना नसावी. पाहा : वाहन दंड, टोल, इ.

निवेदक आपलाच कार्यक्रम आहे असं समजून मध्ये मध्ये बोलून रसभंग करणारी एक आत्मसंतुष्ट जमात. पाहा : पुनियन/पुनिजन, संगीत समीक्षक, पुणेकर श्रोता.

नोकरशाह/शहा मेमो, जीआर, गोलमाल (अर्थात् सर्क्यूलर्स), फतवे, फरमानं अशा (कागदी) मार्गांनी तळ-गाळ, गवतमुळं, माणूस, समाज, व्यवस्था आणि राष्ट्र/समाज बदलता येतं/तो यावर ठाम विश्वास आणि निष्ठा असणारी मनोरानशीन व्यक्ती. पाहा : समाज.

पुणेकर नेहमी दुसऱ्याच्या खर्चानं चहा पिणारा. पेशवाईच्या अर्थव्यस्थेचा हा मूलभूत कणा. तेव्हा चहा नसेल, पण दुसऱ्याच्या खर्चानं करण्याच्या इतर बऱ्याच गोष्टी होत्या. उदा. लढाया. तबियतदार तज्ज्ञांनी आपापल्या वकूबाप्रमाणे इतर ओळखाव्यात. नाही तर साठे/साठये यांचा ‘पेशवे’ हा ग्रंथ (स्वतःच्या खर्चानं विकत घेऊन) चाळावा किंवा (वेळ असल्यास) वाचावा.

पुणेकर श्रोता सकाळच्या बातम्यांप्रमाणे जो सतत केवळ मंत्रमुग्ध, भारावलेला, आणि स्वरवर्षावात चिंब भिजल्यामुळे ज्याला सतत स्वरपडसं झालेलं असतं, असा रसिक (रस = चहा). प्रत्यक्षात हा फार बेरकी असू शकतो. म्हणून पुण्याबाहेरचे गायक-वादक ‘पुण्यासारखे श्रोते दुसरीकडे कुठे नसतात’ असं पुण्यातल्या मैफलीत आवर्जून सांगतात. पुण्याबाहेर काय सांगतात माहीत नाही. पाहा : पुनियन/पुनिजन, संगीत समीक्षक, निवेदक.

पुनियन/पुनिजन सवाई गंधर्व, वसंतोत्सव आणि तत्सम अतिभव्य संगीत महोत्सवांमध्ये (मांडवाबाहेर) गर्दी करणारा पुणेकर. इथे ‘गर्दी’ हा शब्द बखरीतल्या अर्थानं - उदा. ‘गर्दी करून शत्रूस बुडवावे’, ‘गिलचा/गारदी एकच गरदी करता झाला’ - या अर्थानं घ्यावा. पाहा : संगीत समीक्षक, निवेदक, पुणेकर श्रोता. या संदर्भात गोठा-गोपूर घराण्याचे गोस्वामी गोमळसिद्धजी महाराज यांची एक अनवट बंदीश पुढीलप्रमाणे (राग सवाई अडाणा, ताल आडा झप) : स्थायी : ‘सब मो बडो खान / खान मो बडो पान / पान से समाधान / पल छिन कछु सुनिये गान (पाठभेद : सुनिये ना सुनिये गान) //’ अंतरा: ‘जो कछु कछु जान ग्यान / साच समझ बांट अग्यान / आवत-जावत कर अभिमान / सो ही ‘पुनि’जन जान //’

प्राणी मानवी गुणदोषांचा ज्यांच्यावर अकारण आणि सोयिस्कर आरोप केला जातो, असे अमानवी सजीव. पंचतंत्र, हितोपदेश आणि इसापनीतीपर्यंत तरी मागे जाणाऱ्या या उदात्त उज्ज्वल परंपरेनं हल्ली नवं परिमाण धारण केलं आहे. डावी वाळवी, डावरे डास, विचारजंत, उदारमतवादी उवा, कांग्रेशी कसर, साम्यवादी साप, डावी नाहीत उजवी नाहीत अशी मधली माकडं, असे अनेक मानवविशेष हल्ली अचानक निर्माण झालेले दिसतात. आमचा याला पूर्ण विरोध आहे. कुठल्याही माणसाला कुठला तरी प्राणी म्हणणं हा त्या प्राण्याचा घोर अपमान आहे, असं आम्ही मानतो. पाहा : विचार, भावना, छोटा हत्ती.

प्रॉपगां# वन् व्हू कमिट्स् प्रॉपगांडा. भाषा आणि लिपी यातला फरक लक्षात यावा म्हणून उदाहरण. (इति नंदीबुवा) पाहा : मराठी. 

फेक/Fake सत्याशी सुतराम् संबंध नसलेलं, वास्तवापेक्षा अनंतपट सुखकर, आणि अफूगांजापेक्षा स्वस्त असं काहीही. पाहा : करोना. एका का-कवीची का-कपिता : फेक इतुके छान असता सत्य कोणा का हवे / हे जया समजे न त्याच्या मुस्कटा अवळून घ्यावे / सुप्त राष्ट्रा झोपवोनी कार्य गुपचुप आवरावे / तंत्र हे माझे नवे अन् ... वगैरे.

भाजपगवत २०१४ पूर्वी ज्याला ‘काँग्रेसगवत’ म्हणत ते गवत नसलेलं तण. वेग आणि आक्रमकता या दोन्ही गुणांमुळे हे नामकरण समर्पक असावं. पाहा : काँग्रेसगवत.

भाजपभाबडा/भाबडभक्त भाजप, प्र.से., #२, प.पू. आणि कं करतात आणि बोलतात ते आणि तेच बरोबर, पूर्वीच्या यच्चयावत् सरकारांचं सर्व चूक आणि चूकच, अर्थक्रांतीवाल्यांकडे(च) सर्व आर्थिक प्रश्नांवर उत्तरं आहेत, वेदांमध्ये सर्व ज्ञान आहे, प्राचीन भारतात विमानं होती, वेदकाळातली जीवनशैली सार्वकालिक आणि आदर्श आहे, असलं सगळं एसीत बसून स्वतःच्या जीवनशैलीला कुठलीही तोशीस लावून न घेता मानणारा भक्तगण. आयुर्वेदात सर्व काही आहे, असं आग्रहानं सांगून वेळप्रसंगी आधुनिक वैद्यकाचीच कास धरणारा. उज्ज्वल भूतकाळाने पछाडलेला, वर्तमानाच्या व्यापक वास्तवाकडे दुर्लक्ष करणारा. मानसिक / बौद्धिकदृष्ट्या कनिष्ठ / मध्यम(?)वर्ग, आर्थिकदृष्ट्या उच्च / मध्यमवर्ग. बहुधा रास्वसं / विहिंम्प / हिंम्म / बद / रामसेने / सनातन / ... समर्थक. तसं काही नसल्यास रविशंकर, सधगुरू अशा हायटेक गुरूंचा भक्त. पुण्यात असल्यास बहुधा पेठा, कोथरूड, प्रभात रोड, औंध, बाणेर, इ. भागांत राहणारा रेसिडेंट नॉन-इंडियन, नाही तर अमेरिकेत राहणारा नॉन-रेसिडेंट इंडियन. (तळटीप : विशेषण म्हणून वापरल्यास ग्रामीण भागात क्षुद्रतादर्शक नपुंसकलिंगी प्रयोगही -- म्हणजे व्याकरणातलं लिंग आणि प्रयोग -- केला जातो.). “भक्तिमंदू” अर्थात् (अति)भक्तीनं (मति)मंद झालेला आणि “द्रव्यभोंदू” ही रामदासांची शेलकी विशेषणं आठवतात. पाहा : काँग्रेसकवडा.

#भारती #चा अभ्यासच काय, त्याबद्दल बालवाडीतली पण माहिती नसताना त्याचा अभिनिवेशानं प्रसार(?) करू बघणारी टोळी. पाहा : अभिनिवेश, व्यक्तिमत्त्व विकास, विकास.

भावणे एक नवीन क्रियापद. एखाद्याला जे/जी/जो भावून त्या/ति/त्याची भूमिका त्यानं (पक्षी : एखाद्यानं) केली त्या/ति/त्याच्या संदर्भात हे वापरावं. उदा. सुबोध सेरेनाला भावला, सुबोध मेसीला भावला, इ. या वापराला काही जण (व्याकरणातला) भावे प्रयोग समजतात. याच्या जवळच्या अर्थाचं एक अशिष्ट क्रियापद ‘बायोपिकलणे’. वापर ‘बुकलणे’प्रमाणे करावा. टीप : मायबाप वाचक मेहेरबान, सध्याच्या मराठीत आमच्या माहितीप्रमाणे तरी तीनच लिंगं आहेत. म्हणून त्यांचाच अंतर्भाव वर केला आहे. चूभूदेघे. कुणाचा अनुल्लेखानं अधिक्षेप/अपमान करायचा अजिबात हेतू नाही. भाषेची आणि आमची मर्यादा समजून घ्यावी हे विनंती.

भावना जी सतत फक्त दुखावली जाते आणि/किंवा भडकते, ती. पाहा : छोटा हत्ती, विचार.

भूतमैथुन : गतकाळाच्या (बहुशः काल्पनिक) आठवणींनी ऊर भरून येणं, तोंडाला पाणी सुटणं (उदा., प्राचीन मद्यमाहात्म्य आणि खाद्यसंस्कृती), गळे काढणं, आणि त्यात (काल्पनिक? वांझोटं?) सुख मानणं. यालाच प्राङ्मैथुन किंवा परोक्षमैथुन असंही म्हणता येईल. समांतर शब्द : मतिमैथुन अर्थात् ‘इंटेलेक्चुअल मास्टरबेशन’. आमची या दोन्ही उपक्रमांवर ठाम श्रद्धा आहे, कारण दोन्हींत कुठलाच धोका नसतो आणि तरी पण काही तरी केल्यासारखं वाटतं.

मराठी ज्यांना भाषा आणि लिपी यांतला फरक कळत नाही अशांनाही जिचा जाज्वल्य अभिमान वाटतो अशी एक रोकठोक भाषा. ती रोकठोक असल्याचा पुरावा अक्षीचा शिलालेख, गाढव-ब्रह्मचारी दृष्टांत, आणि मराठी वृत्तवाहिन्या इथे मिळेल. पाहा : महाराष्ट्र, प्रॉपगां#.

मराठी अभ्यास परिषद ‘शिव्याही द्या, पण मराठीत’ या उदात्त विचारानं कधीकाळी एकत्र आलेल्या मराठी भाषाभ्यासकांची टोळी. ही टोळी मधूनमधून ‘भाजी’ अर्थात् ‘भाषा आणि जीवन’ नावाचं (अ?)नियतकालिक प्रकाशित करते. त्याचा कधी कधी निद्रानाशासाठी उपयोग होऊ शकतो. पाहा : मराठी, विचार.

मर्यादापुरुषोत्तम सिंड्रोम थोर विचारवंत डी. एम. डोईफोडे आणि के. के. आगलावे म्हणतात : “(भारतीय पुरुषाला) एका बाईचा मुलगा, एका बाईचा नवरा, एका बाईचा भाऊ आणि एका बाईचा बाप, अशा अनेक भूमिका कमी-अधिक फरकानं निभवाव्या लागतात.... त्याची दमछाक होते. तो सैरभैर होतो.” (https://www.aksharnama.com/client/article_detail/4622)

महापुरुष इहलोक सोडून गेल्यावरही ज्यांना उसंत आणि मोकळीक मिळत नाही, असे मनुष्यविशेष. ‘#आतातरीआम्हालामोकळंकरा’ असा मानवतावदी हॅशटॅग यांच्याबाबतीत नम्रपणे सुचवीत आहोत. पाहा : इतिहास.

महाराष्ट्र महागराष्ट्र याचं संक्षिप्त रूप, एक दगडांचा देश. पाहा : कर्नाटक.

राजकीय पक्ष भूत, वर्तमान आणि भविष्य यांपैकी एकच काहीतरी धरून सत्तेचं सोयीस्कर राजकारण करणारी टोळी. कंटकार्जुनाचे हे काहीसे प्राचीन (१९६५) आणि बरेचसे काटेरी बोल उद्बोधक असावेत :

भूतं केवलमुत्खनन्ति कतिचित्, निन्दन्ति भव्यं भवत्;

स्वप्नान् खे विलिखन्ति केऽपि मनसा, छिन्दन्ति भूतं भवत् ।

भूतं भव्यमुपेक्ष्य केचन भवच्चिन्तैकचिन्तापराः

भूतं भावि भवद् य ईक्षितुमलं, पक्षः कुतस्तादृशः? ।।

भारतस्थ-राजनैतिकपक्षाणां समासतः वर्णनम् एतत् । आद्ये पर्याये निदर्शनम् -- हिन्दु-महासभा । द्वितीये --  काँग्रेस । तृतीये -- कम्यूनिस्ट ।

तीन प्रकारचे पक्ष : कोणी केवळ भूत काळच उकरत बसतात; वर्तमान आणि भविष्य यांना नावे ठेवतात. दुसरे कोणी हवेत भविष्याची स्वप्नेच तेवढी रेखाटत बसतात; भूत आणि वर्तमान यांच्याशी काडीमोड करतात. आणखी कोणी भूत आणि भविष्य यांची  उपेक्षा करून केवळ वर्तमानाचीच चिंता वाहतात. जो भूत, वर्तमान आणि भविष्य -- तिन्ही पाहू शकतो, असा पक्ष आहेच कुठे?

ललित गद्य गलित लद्य (इति विनाकवी).

वामुवि WA मुक्त विद्यापीठ. विद्या, शिक्षण, महर्षी आणि शिक्षणमहर्षींशी काहीही संबंध नसलेलं एक खरोखर मुक्त आणि खरोखर doomed ज्ञानपीठ.

वास्तव आपल्याला जे खरं वाटतं ते आणि तेच. ‘खरं वाटणं’ या भावनेची तीव्रता राजकीय/सामाजिक/सांस्कृतिक दृष्टिकोनाच्या कर्मठपणाशी सम प्रमाणात. वामुवि-वरच्या ९९.९९ टक्के स्फोटक अर्थात् गालिप्रचोदक चर्चांचा विषय. पाहा : वामुवि, श्रद्धा, भावना.

वाहन दंड, टोल, इ. सुविधा न पुरवता राजमार्गाने आणि राजमार्गांवर केलेली कायदेशीर सनदशीर लूट.

विकास म्हणजे काय ते कळल्यास प्रबोधन करावं.

विचार माणसानं आणि समाजानं जी अजिबात करू नये, असं समस्त राजकारणी, त्यांचे पक्ष, सेना-दलं, सांस्कृतिक संघटना, आणि प्रशासक यांना पोटतिडकीनं आणि आतड्यातून वाटतं अशी एक धोकादायक गोष्ट. तसंही हे शहाणपण बहुतेकांना उपजतच असावं. कुठला तरी फोर्ड, एडिसन, शॉ किंवा आमचे हर्डीकरबुवा अशा कुणी ना कुणी तरी कधी ना कधी तरी  ‘१ टक्का लोक विचार करतात, ९ टक्क्यांना आपण विचार करतो असं वाटतं, आणि उरलेले ९० टक्के जीव गेला तरी चालेल, विचार म्हणून करणार नाही, अशा निकरानं जगत असतात’ असं काहीतरी म्हणून ठेवलंय. बघा थोर विचारवंत (म्हणवून घेणारी) मंडळी किती एकसारखा विचार करतात ते. ईव्हाईनं आदमबाबाला विचार करण्यास प्रवृत्त केलं आणि तिथून सगळा घोटाळा झाला म्हणतात -- आकाशातल्या बापानं पुरुषाला आपली प्रतिमा (आणि बहुधा प्रकृती पण) दिली म्हणतात (पण नंतर दुरुस्त्या केल्या असाव्यात). जुन्या सांख्यांची प्रकृती पण थंड गोळ्यासारख्या पडलेल्या पुरुषाला असलंच काही तरी करत असावी. म्हणून तर आमचे मनुकाका स्त्रीस्वातंत्र्याच्या विरोधात असावेत. बाकी काही चालेल, (कुणालाच) विचार करायला लावू, भाग पाडू -- किंवा करू देऊ -- नका राव!

विज्ञान वेदांमध्ये जे ठासून भरलेलं आहे आणि प्राचीन भारतात जे सगळीकडे होतं, असं बरेच भाजपभाबडे मानतात, ते. यातल्या दुसऱ्या विधानाशी आम्ही अंशतः सहमत आहोत कारण आजकाल ते (म्हणजे विज्ञान; तंत्रज्ञान नव्हे) सगळीकडे किंवा फारसं कुठे जीवनाचा भाग झालेलं दिसत नाही; असलंच तर प्राचीन काळातच असावं. वरच्या तिसऱ्या शब्दावर एका पुणेकरांनं “कुणाची?” असा गाफील प्रश्न विचारला; पुणेकर आहे, माफ करून टाकू या. पाहा : भाजपभाबडा.

विद्या/पीठ ‘मेट्रिक्स’ सिनेमात यंत्रांच्या अस्तित्वासाठी माणसांचं सोयीनुसार प्रजनन केलं जातं, तसं प्रशासनाच्या अस्तित्वासाठी जिथे विद्येला डांबून ठेवण्यात आलेलं असतं आणि प्रशासकीय कर्मकांडाच्या सोयीसाठी जिला सभापर्वातल्या द्रौपदीप्रमाणे वागवलं जातं अशी संस्था. अशाही ठिकाणी विद्याव्रती सापडतात यावरून तरी नास्तिकांनी आस्तिक व्हायला हरकत नसावी. एका ईषत्कवीनं म्हटलं आहे : ‘विद्यापीठा अविद्याश्च / विद्वांसः पुच्छकोविदाः / प्रच्छन्नस्वार्थनेतारः / लिपिकास्ते निरङ्कुशाः //’. अर्थात्: विद्यापीठं - अविद्य (unlearned, unwise); विद्वान - शेपटाच्या विद्येत/कलेत माहीर; नेते - छुपे स्वार्थ जपणारे; कारकून/हिशेबनीस/प्रशासक - मोकाट. पाहा : ओओटीई.

व्यक्तिमत्त्व विकास दुसऱ्यांमधले सुप्त गुण खणून काढून त्यांना झळाळी आणण्याचे अर्धनिद्रिस्तांचे उद्योग (इति विनाकवी). पाहा : #भारती, विकास.

शाखाशाप/चाप खरोखर आंतरशाखीय/बहुशाखीय काम करणाऱ्यांच्या बाबतीत साधारणपणे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, ही गेल्या किमान दोन दशकांची भारतीय विद्याक्षेत्रातली दातखीळ बसावी, अशी परिस्थिती. या परिस्थितीला आधुनिक सांख्यांच्या curse of dimensionalityच्या धर्तीवर curse of disciplinarity अर्थात शाखाशाप किंवा शाखाचाप म्हणावं, अशी नम्र सूचना. पाहा : आंतरशाखीय.

श्रद्धा (१) अकारण खात्री. (२) वास्तवाचा आधार आहे की नाही, याची खातरजमा न करता एखादी गोष्ट सत्य मानणारी मनोभूमिका. (३) ज्याच्या पायी एरवी करणार नाहीत, अशा गोष्टी लोक करतात, असं सर्वांठायी सदोदित भूत जबर मोठे गं बाई. पाहा : विचार, वास्तव.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

संगीत समीक्षक उशिरा येऊन मैफलीत सगळ्यात पुढे घुसून बसणारा. यांना पुणेकरांमधले जागरणसम्राट गाण्यातले दर्दी अर्क ‘पिंडीवरचा नागोबा’ म्हणतात. अशाच एका पिंडीवरच्या नागोबानं ९०च्या दशकात किशोरीताईंना बहादुरी तोडी जमून गायल्यावर जौनपुरीची फरमाईश केली असता एका दर्दी अर्कानं (उपर्युक्त) ‘तरी बरं सकाळचा मारवा गा नाही म्हणाले’ असा अर्ध्या श्रोतृवर्गाला ऐकू जाईल असा घरचा अहेर दिला होता. ताई फारच चांगल्या मुडात होत्या त्या दिवशी; गायल्या बिचाऱ्या जौनपुरी. पाहा : पुनियन/पुनिजन, पुणेकर श्रोता, निवेदक.

सतीचं वाण विनायककवीसाठी जे ‘बुद्ध्याचि धरिले करि’ आणि ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’, आणि ज्याची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे, ते: की टाकिले व्रत कसे अम्हि अंधतेने / लब्धप्रकाश विसरून मतिभ्रमाने / ते दिव्य दाहक सविज्ञविचार वाण / बुद्ध्याचि त्यागुनि अम्ही जगतो सुखाने // सविज्ञविचार (पाठभेद : प्रबुद्धविचार): तर्कप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, स्वतंत्र विचार; विज्ञान, वर्तमान आणि आधुनिकात रुजलेला भविष्यलक्ष्यी जीवनविषयक दृष्टिकोन. ‘दिव्य’, ‘दाहक’ आणि ‘सविज्ञविचार’ ही विशेषणे ‘वाणा’ची. विनायका हो, त्यांना क्षमा करा; ते काय करतात ते त्यांचं त्यांना कळत नाही, इ. पाहा : विचार.

समाज ज्याला समज नाही असं समजलं जातं असं काही तरी (इति विठूकाका). पाहा : निवडणूक.

समाजवादी (१) मांगल्याच्या ध्यासाचे नाजूक बळी. (२) समष्टीचा विचार करू पाहणारे आत्मनिष्ठ व्यक्तिवादी. पाहा : हिंदुत्ववादी.

सर्वात्-म-का सांगीतिक हिंसाचार. तरीही कमालीचा लोकप्रिय. तख़्तों का खेल लोकप्रिय असण्याचं (एक) कारण दर दोन-पाच मिनिटांमागे पडणारे दोन-पाच अनपेक्षित मुडदे आणि रक्तपात असं सांगितलं जातं.

सलाम हे पण वाचताय? तुमच्या सहनशक्तीला पाडगावकरी सलाम.

सल्लागार सल्ला देऊन गार करणारं/री/रा.

संस्कृत (१) प्रगत संगणनासाठी नासात वापरली जाणारी एक भाषाप्रणाली (संदर्भ: वामुवि). पाहा: नासा. (२) याच नावाची एक प्राचीन प्राग्वाक् (Ur-language) पण होती म्हणतात - जिचा Ur नावाच्या संगणकीय भाषाप्रणालीशी काही संबंध नाही. पाहा : #भारती. (३) ही आणि संगणन हे दोन्ही ज्यांना येत नाही आणि जे या दोन्हींपैकी एकही शिकण्याची सुतराम् शक्यता नाही अशांच्या जाज्वल्य अभिमान, भावना आणि अभिनिवेशाचा विषय. पाहा : भावना, अभिनिवेश.

सांस्कृतिक बोका सांस्कृतिक लोण्याची जबरदस्त भूक आणि त्यासाठी काहीही करायची तयारी असलेला सर्वसंचारी (प्रबळबुवा).

सामुदायिक उपासना / महाआरती / इ. उपास्य दैवतावर आध्यात्मिक दहशतवादी कारवाई किंवा (संख्याबळानुसार) मॉब लींचिंग.

सार्वजनिक संस्था : सार्वजनिक खाज भागवण्यासाठी सार्वजनिक फलाट उपलब्ध करून देऊन बाकीच्या समाजाला अनवधानानं वाचवणाऱ्या मंडळ्या (विनाकवी). काही टवाळ हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सुलभ शौचालयांचं रूपक वापरतात. पाहा : टवाळ.

सैतान जो तपशिलांमध्ये असतो तो. पाहा : ईश्वर.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हिंदुत्ववादी : (१) मांगल्याच्या ध्यासाचे आडदांड बळी (‘बळी तो कान पिळी’). (२) विचाराशी बहुधा फारसा संबंध नसलेले आत्मकेंद्रित समष्टिवादी (समष्टी : कळप, झुंड). पाहा : समाजवादी, विचार.

हिंदू एक समृद्ध अडगळ. टीप : हे एका कादंबरीचं नाव आहे; गैरसमज नसावा. हिचाही अभ्यास हल्ली नासात होतो, असं ऐकलं (वामुवि). पाहा : नासा, हिंदुत्ववादी.

.............................................................................................................................................

लेखक मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्यूलेशन विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. 

mihir.arjunwadkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......