तुळाजी आंग्रे, ‘सुवर्णदुर्गा’ची इंग्लंडमधील स्मृती आणि आरमारी पराभवाचे दूरगामी परिणाम 
दीपावली २०२३ - लेख
कॅ. मिलिंद परांजपे
  • तुळाजी आंग्रे यांचं म्हणून जाहीर झालेलं एक संशयास्पद चित्र आणि लंडनजवळील सेवनदुर्ग कॅसल
  • Thu , 16 November 2023
  • दीपावली २०२३ लेख शिवाजीमहाराज Shivaji Maharaj पेशवे Peshave तुळाजी आंग्रे Tulaji Angre सेवनदुर्ग कॅसल Severndroog Castle आरमार ARMOUR

रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे बंदरासमोरच्या समुद्रात एका मैलावरील बेटावर ‘सुवर्णदुर्ग’ हा किल्ला आदिलशाही राजवटीत बांधला, असं मानलं जातं. शिवाजीमहाराजांचे सरखेल - म्हणजे नौसेनेचे मुख्य अ‍ॅडमिरल - सिधोजी गुजर यांनी ‘विजयदुर्ग’ (आधीचं नाव घेरिया) आणि ‘सुवर्णदुर्ग’ जिंकले आणि त्यांची बळकटी केली. कान्होजी आंग्र्यांचे वडील तुकोजी आणि आजोबा दोघेही छत्रपतींच्या आरमारी सेवेत होते. तुकोजी सुवर्णदुर्गाचे किल्लेदारही होते. कान्होजींचं बालपण सुवर्णदुर्ग किल्ल्यात गेलं, असं त्यांच्यावरील पुस्तकात वाचायला मिळतं. 

कान्होजीची १६९४मध्ये सरखेल म्हणून राजाराममहाराजांतर्फे नेमणूक झाली. मराठी राज्य त्या वेळेस कठीण परिस्थितीतून जात होतं. शाहू मोगलांच्या कैदेत होते, तर राजाराममहाराज जिंजीला. जंजिऱ्याच्या सिद्दीची समुद्रावरील सत्ता गोव्यापासून काठेवाडापर्यंत अनिर्बंध झाली होती. त्याचा फायदा औरंगजेबाला दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध लढण्यात मिळाला. कान्होजींनी त्या परिस्थितीत कोणाचीही मदत न घेता कोकण किनाऱ्यावर आपला दरारा बसवला.

बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनचे. त्यांनी सिद्दीच्या सत्तेचा जाच स्वतः अनुभवलेला होता. ते आरमाराचं महत्त्व ओळखून होते. बाळाजी १७१३मध्ये पेशवे झाल्यावर त्यांनी मुत्सद्दीगिरीनं कान्होजीला आपल्या म्हणजे छत्रपती शाहूच्या बाजूला वळवून घेतलं. त्यानंतर आरमाराची वृद्धी होत गेली. तेव्हापासून १७५६पर्यंत मराठा आरमाराला कन्याकुमारीपासून काठेवाडापर्यंत सिद्दीच काय, कुठलंही युरोपीय आरमार आव्हान देऊ शकत नव्हतं, असं के. एम. ‘सरदार’- पणिक्करांनी किंकेड या प्रसिद्ध इतिहासकाराचा हवाला देऊन लिहिलं आहे.

किनाऱ्यावरील आरमाराच्या पाठबळाचा उपयोग जमिनीवरील लढायांना नेहमीच होत असतो, पण हे मराठ्यांच्या कधी लक्षातच आलं नाही, असं दिसतं. वसईच्या २६ महिने चाललेल्या मोहिमेत आरमाराचा उपयोग नीट केला गेला नाही. मानाजी (कान्होजीपुत्र) आंग्र्यांवर वसई किनाऱ्याची समुद्राच्या बाजूनं पोर्तुगीजांची रसद तोडण्याचा जबाबदारी टाकली होती, पण पूर्ण नाकेबंदी (naval blockade) नक्कीच झाली नव्हती, ही बाब य. न. केळकरांच्या ‘वसईची मोहीम’ पुस्तकातून स्पष्ट होते. किती पोर्तुगीज जहाजं माल आणि माणसं भरून किती वेळा परिसरातील कोणत्या बंदरांवर ये-जा करत होती, याचे तपशीलवार उल्लेख त्यांनी दिलेले आहेत.          

१७२९मध्ये कान्होजींच्या मृत्यूनंतर सेखोजी, संभाजी या त्यांच्या मोठ्या पुत्रांस सरखेली मिळत गेली. तुळाजी हे कान्होजी आंग्र्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेले धाकटे पुत्र. मोठ्या बंधूंच्या मृत्यूनंतर १७४२मध्ये तुळाजी सरखेल झाले. ते वडिलांसारखेच पराक्रमी होते. त्यांनी इंग्रज आणि डचांचे पराभव केले होते. त्यांच्या गलबतांवर आणि शिपयार्डात युरोपीयही नोकरीवर असत.

तुळाजीचं आणि त्या वेळच्या बाळाजी बाजीराव (नानासाहेब) पेशव्यांचं अजिबात पटत नव्हतं. बऱ्याच वाटाघाटी होऊनही काही समझोता होत नव्हता. तुळाजी डोईजड वाटत होते. पेशव्यांनी आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी १७५५-५६मध्ये इंग्रजांना आरमारी साहाय्यासाठी बोलावणं धाडलं. अर्काटच्या लढाईनंतर इंग्रज भारतातील एक सत्ता झालेलेच होते.

मराठा आरमाराचा इंग्रजांना त्यांच्या अस्तित्वालाच धोका वाटत होता. इंग्रजांना अनेक वर्षं आंग्र्यांचा काटा काढायचा होता. अशी आयती चालून आलेली संधी इंग्रजांनी अजिबात सोडली नाही. कमोडॉर विल्यम जेम्सने सुवर्णदुर्गावर हल्ला करून तो २ एप्रिल १७५५ रोजी ताब्यात घेतला. त्या वेळी पेशवे आणि तुळाजींची बोलणी निर्णायक स्वरूपात होती, पण इंग्रजांना तसा समझोता होऊच द्यायचा नव्हता. त्यांनी वेळ न दवडता कारवाई करून टाकली.

त्या सुमारास तुळाजी गोव्याच्या पोर्तुगीजांची मदत पेशव्यांशी लढण्यासाठी मागत होता, असा उल्लेख पिसुर्लेकरांच्या ‘पोर्तुगीज-मराठा संबंध’ पुस्तकात वाचावयास मिळतो. म्हणजे पेशवे आणि तुळाजी या दोघांनाही इंग्रज आणि पोर्तुगीज अशा भारताच्या दोन शत्रूंची मदत घेण्यास कुठलाही संकोच वाटला नाही, हे केवढं दुर्दैव!

१७५६मध्ये विजयदुर्गच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्ह हा कर्नल १४०० सैनिकांसह उपस्थित होता. दोन्ही किल्ल्यांची पूर्ण लूट करूनच इंग्रज मुंबईला परतले. ज्या वर्षी अटकेपार झेंडा फडकला, त्याच वर्षी आपण कोकण किनाऱ्यावर इंग्रजांचं स्वागत केलं. पुढील वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीची लढाई फितुरीनं जिंकली आणि भारतावर इंग्रजी राज्य सुरू झालं.

वेल्समध्ये अगदी सामान्य कुटुंबात १७२०च्या सुमारास जन्मलेला विल्यम जेम्स बाराव्या वर्षीच  जहाजावर काम करायला घरातून गेला. १७३८मध्ये म्हणजे १८व्या वर्षी तो एका जहाजाचा कप्तान झाला. काही वर्ष वेस्ट इंडीजमध्ये काढल्यावर १७४७मध्ये तो ईस्ट इंडिया कंपनीत आला. चार वर्षांनी त्याला बॉम्बे मरीन्समध्ये कमोडोर पदावर बढती मिळाली. त्याची  सुवर्णदुर्ग आणि त्याच्या आजूबाजूची किनारपट्टी यांची माहिती सखोल होती. लढाईत त्याने किल्ल्यावर तोफांचा भडीमार करून तो हस्तगत केला.

कोकण किनाऱ्यावर आरमारी वर्चस्वासाठी ईस्ट इंडिया कंपनीने बराच खर्च केला असला, तरी जेम्सला बक्षीस म्हणून फक्त काही पौंड मिळाले. इतिहासकारांच्या मते विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग पडल्यावर इंग्रजांनी किल्ल्यातील सर्व युद्ध साहित्य आणि इतर संपत्ती लुटून नेली. (लढाई जिंकल्यावर होणाऱ्या लुटालुटीत इंग्रज अधिकारी आणि त्यांचे खलाशी किंवा सैनिक किती डल्ला मारत, याची अधिकृत नोंद होत नसे). इंग्रजांनी दोन्ही किल्ले नंतर मराठ्यांच्या ताब्यात परत दिले, पण मोबदल्यात उत्तरेस जवळच्या सावित्री नदीच्या मुखावरचे बाणकोट, हिम्मतगड, इतर पाच गावं, शिवाय व्यापारावर कर सवलती घेतल्या.

युद्धात मराठा आरमाराची एवढी हानी झाली की, त्यानंतर आलेले सरखेल रुद्राजी आणि आनंदराव धुळप पराक्रमी असले, तरी आरमाराला लागलेली उतरती कळा आरमाराचा शेवट होण्यातच झाली. तुळाजीला अटक केल्यावर आरमार पुन्हा उभं करायला हवं होतं, पण पेशव्यांनी आरमाराच्या  पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केलं. तुळाजीने उरलेलं आयुष्य पेशव्यांच्या कैदेत काढलं. हा कुशल दर्यावर्दी १७८६मध्ये वंदन किल्ल्यावर मृत्यू पावला. 

तुळाजींचं १७५६मध्ये ‘दी लिटररी मॅगॅझिन ऑफ युनिव्हर्सल रिव्ह्यू’मध्ये छापून आलेलं चित्र अलीकडे उजेडात आलं आहे, पण त्याच्या सत्यतेबद्दल दाट संशय येतो. कारण चित्रातील माणूस कमरेच्या वर उघडाबंब आहे. त्याची टोपी मेक्सिको-क्युबात वापरतात, त्या पद्धतीची  ‘सॉम्ब्रेरो’ हॅट वाटते. त्याची विजार रंगीबेरंगी आहे. चित्रातला माणूस आणि कॅरिबियन समुद्रातले नेहमी दाखवले जाणारे चाचे, यांच्या पेहरावात विलक्षण साम्य दिसतं.

शिवाय चित्रकाराचं नाव, चित्राची तारीख, कुठे काढलं वगैरे माहितीही नाही. एका खानदानी मराठा सरदाराचा तो पेहराव मुळीच वाटत नाही. त्या काळात काढलेल्या कुठल्याही मराठा सरदाराचं चित्र कमरेच्या वर विवस्त्र नाही. बहुधा कॅरिबियन समुद्रातल्या एखाद्या चाच्याचं चित्र तुळाजीचं म्हणून छापून टाकलेलं दिसतंय. नाहीतरी युरोपीयन लोक आंग्र्यांना ‘चाचे’च समजत.        

हर्णेहून किल्ल्यापर्यंत जाण्यास होड्या मिळतात. आज किल्ल्याच्या आत बघायला काही शिल्लक नसलं, तरी पश्चिमेकडे खडकाचा उंचवटा खोदून त्याचाच कल्पकतेनं किल्ल्याचा तट कसा केला आहे, हे पाहण्यासारखं आहे. बांधलेली इतर तटबंदी अजून शाबूत आहे. गोड्या पाण्याची टाकी आहे. मुख्य दरवाज्या जवळील तटभिंतीवर हनुमानाची मूर्ती आणि पायरीवर कासव कोरलेलं आहे. जवळ कनकदुर्ग आणि गोवा हे दोन उपदुर्ग भग्नावस्थेत आहेत. १८०२मध्ये दुसरा बाजीराव यशवंतराव होळकरांमुळे पळून सुवर्णदुर्गावर आला होता.    

सुवर्णदुर्गाची इंग्लडमधील स्मृती

कमोडॉर विल्यम जेम्स मग इंग्लंडला परत गेला. तिथे तो ईस्ट इंडिया कंपनीत चढत डायरेक्टर झाला. शेवटी चेअरमन म्हणून निवृत्त झाला. नौकानयनातील ज्ञानात त्याने घातलेल्या भरीबद्दल त्याला ‘रॉयल सोसायटी’ची फेलोशिप मिळाली. ‘ट्रिनिटी हाऊस’चा ‘एल्डर ब्रदर’ झाला. दोनदा पार्लमेंटवर निवडून आला.

१७८४ साली तो मृत्यू पावला. त्याआधी चार वर्ष बॅरोनेटही होता. त्याची पत्नि लेडी अ‍ॅन जेम्सने त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ लंडनजवळील ग्रीनिचला एक तीन मजली दगडी वास्तू रिचर्ड जप (Richard Jupp) नावाच्या प्रसिद्ध वास्तुविशारदाकडून बांधवून घेतली. तिला सुवर्णदुर्गाचंच नाव दिलं, पण इंग्रजांना रुचेल असं ‘Severndroog Castle’ हे नाव प्रचलित पडलं.

पोर्तुगीज १४९८पासूनच भारतास येत होते, पण आपला राजदूत कधी लिस्बनला गेला नाही. इंग्रजांचा पेशवे दरबारातला राजदूत मॅलेट पुण्यातील संगमाच्या पलीकडे बंगला बांधून राहत होता, ही गोष्ट सर्वज्ञात आहे (तो बंगला ‘संगम’ नावानेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत डिस्ट्रिक्ट जजचे सरकारी निवासस्थान आहे). कुठल्याही भारतीय राज्यकर्त्यांनी आपला राजदूत युरोपीय देशांत पाठवण्याचा विचारही केला नाही. भारताच्या राजदूताने भारतीय जहाजातूनच परदेशात जाणं राजनीतीला धरून होतं. आरमाराबाबत दुर्लक्षामुळे आम्हाला केप ऑफ गुडहोप, सुएझची सामुद्रधुनी व तिचं भौगोलिक महत्त्व, अमेरिका खंडाचं  अस्तित्व वगैरेंचं पूर्ण अज्ञान राहिलं. त्याचा सामरिक, राजकीय आणि लष्करी कारणांसाठी उपयोग करणं ओघानेच गेलं.

गॉथिक शैलीत बांधलेल्या या वास्तूची गच्ची समुद्रसपाटीपासून १३२ मीटर उंच आहे. वास्तूचा क्रॉस सेक्शन त्रिकोणी असून तीनही कोपऱ्यांवर षट्कोनी बुरुज आहेत. ‘शूटर्स हिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर गर्द झाडीत हा कासल आहे. गच्चीवरून लंडन शहर आणि टेम्स नदी, यांचं विहंगम दृश्य बघायला मिळतं.

पहिल्या मजल्यावर ‘टी रूम’ आहे. तिथं उपाहार आणि दुपारचं जेवण मिळू शकतं. लेडी जेम्सच्या मृत्यूनंतर कासलचा उपयोग आणि मालकी चार-पाच वेळा बदलली. २०१३ साली  जीर्णोद्धार होऊन तो आता एक पर्यटन आकर्षण झाला आहे. सायकलवरून पिकनिकला लोक येतात. ‘सेव्हर्नद्रुग कासल’ला जाण्याबद्दल सर्व माहिती गूगलवर  मिळते.                 

आरमारी युद्धाचा काळ आणि त्याच्या परिणामांचा आढावा  

पणिक्करांनी असंही म्हटलं आहे की, सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकात अल्फान्सो अल्बुकर्कने गोव्यावर कब्जा मिळवल्यावर भारताची समुद्रावरील सत्ता गेली. तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारताचं स्वातंत्र्यही गेलं नव्हतं. वायव्येहून आधी आलेले आक्रमक भारतात स्थायिक होऊन भारतीयच झाले. सोळाव्या शतकापासून मात्र देशाचं भवितव्य त्याच्या तीन दिशांना पसरलेल्या सागरावर ठरलं.

तेव्हापासून भारताचा व्यापारही बहुतांशी परकीयांच्या हातातच गेला. १७५६मध्ये मराठ्यांनी अटकच्या किल्ल्यावर भगवा झेंडा रोवला. अटक पंजाबच्या अगदी उत्तर टोकाला सिंधू नदीच्या तीरावर आणि हल्लीच्या इस्लामाबाद या राजधानीच्या शहराच्याही उत्तरेला आहे. अटक ते कटक आणि दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेल्या मराठी सत्तेचा तो परमोच्च काळ समजला जातो.

त्याच काळात युरोपीय देशातली आरमारे जगभर मोहिमा आखून नवनवीन भूप्रदेश शोधून काढत होते. त्यांचे नाविक आणि वैज्ञानिक नौकानयनाच्या नवीन खात्रीशीर पद्धती विकसित करत होते. अक्षांश शोधण्याची पद्धत नाविकांना माहीत होती, पण रेखांश काढता येत नसत. रेखांश मिळवण्याची पद्धत शोधून काढणाऱ्यास इंग्लंड, हॉलंड आणि इतरही देशांनी मोठी पारितोषिकं जाहीर केली होती. ते बक्षीस हॅरिसन नावाच्या इंग्रजास मिळालं. त्याने विकसित केलेला क्रोनॉमीटर आजही ग्रीनिच येथील वास्तुसंग्रहालयात ठेवलेला आहे. 

१७५०च्या सुमारास पुढील पन्नास वर्षात इंग्रजांचं राज्य भारताच्या दोन तृतीयांश भागावर येईल, असं कोणा भारतीयाला वाटलंच नाही. शेवटच्या म्हणजे १८५७च्या प्रतिकारात इंग्रज जहाजे सैन्य आणि युद्धसामग्री भरभरून आणत होती. आरमाराच्या अभावामुळे त्यांना थांबवण्याची कुठलीच योजना आमच्याकडे नव्हती. शिवाजीमहाराजांनी कोकण किनाऱ्यावर दूरदृष्टीनं बांधलेल्या किंवा संवर्धन केलेल्या एकाही जलदुर्गाचा त्या वेळी वापर केला गेला नाही. परिणामी भारतीयांचा पराभव अटळ होता.      

पृथ्वीवरील महासागरांपैकी फक्त हिंदी महासागरालाच एका देशाचं - भारताचं - नाव आहे. त्याला कारण महासागराच्या आजूबाजूच्या देशांवरील भारताचं व्यापारी, सांस्कृतिक, धार्मिक आणि लष्करी वर्चस्व. वास्को-दी-गामाच्या आगमनानंतर भारताचं त्या सागरावरील व्यापारी आणि लष्करी वर्चस्व संपलं.

शिवाजीमहाजारांनी आरमार उभं केलं, ते त्यानंतर शंभर वर्षांनी. भारत हे ५४२३ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा (बेटांव्यतिरिक्त) लाभलेलं एक द्वीपकल्प हिंदी महासागरात असल्यामुळे देशाचा सर्व व्यापारही त्यातूनच होतो. म्हणून भारताच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही मग आपोआपच येते. आंग्र्यांची गलबते अरबी समुद्राबाहेर लांब महासागरी सफरींस जाण्यास योग्य नव्हती. ‘लाँग डिस्टन्स नॅव्हिगेशन’ला लागणारं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं.

त्या वेळी भारतास महासागरी आरमाराची (blue water navy) नितांत आवश्यकता होती. अशा काळात भारतीय राज्यकर्त्यांनी आपले आरमार आधुनिक युरोपीय तंत्रज्ञानाने विकसित करून सातासमुद्रात पाठवायला हवं होतं. त्या काळी तसं आर्थिक सामर्थ्य पेशव्याकडे होतं. आरमाराचं महत्त्व न कळल्यानं अशा तंत्रज्ञानात आणि राज्यविस्तारातच नव्हे तर, असलेलं स्वातंत्र्य टिकवण्यातही भारतीय मागे पडले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

फ्रान्समध्ये राज्यक्रांती आणि नेपोलियनचा उदय होत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, तिथं आणि फ्रान्समध्ये सुरू झालेली प्रजासत्ताक राज्यपद्धती, नेपोलियन आणि इंग्रज यांच्या लढाया यांची कुठलीही माहिती मराठी राज्यकर्त्यांना झाली नाही. जागतिक राजकारणाची योग्य जाणीव आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपले राजदूत परदेशात विशेषतः युरोपीय देशांत पाठवणं जरूर होतं.

पोर्तुगीज १४९८पासूनच भारतास येत होते, पण आपला राजदूत कधी लिस्बनला गेला नाही. इंग्रजांचा पेशवे दरबारातला राजदूत मॅलेट पुण्यातील संगमाच्या पलीकडे बंगला बांधून राहत होता, ही गोष्ट सर्वज्ञात आहे (तो बंगला ‘संगम’ नावानेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत डिस्ट्रिक्ट जजचे सरकारी निवासस्थान आहे). कुठल्याही भारतीय राज्यकर्त्यांनी आपला राजदूत युरोपीय देशांत पाठवण्याचा विचारही केला नाही. भारताच्या राजदूताने भारतीय जहाजातूनच परदेशात जाणं राजनीतीला धरून होतं. आरमाराबाबत दुर्लक्षामुळे आम्हाला केप ऑफ गुडहोप, सुएझची सामुद्रधुनी व तिचं भौगोलिक महत्त्व, अमेरिका खंडाचं  अस्तित्व वगैरेंचं पूर्ण अज्ञान राहिलं. त्याचा सामरिक, राजकीय आणि लष्करी कारणांसाठी उपयोग करणं ओघानेच गेलं.

फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये हिंदी महासागरावर वर्चस्वासाठी स्पर्धा होती. दोघांच्या आरमाराच्या मोठ्या लढाया मद्रास- तंजावर- नागपट्टणम किनाऱ्यावर १७४०-८५मध्ये झाल्या. १७७६- १७८१मधील अमेरिकन स्वातंत्र्य युद्धकाळात भारतातील इंग्रजांविरुद्ध  लढण्यासाठी  बायी द सुफ्रँ (Bailli de Suffren) या नावाजलेल्या फ्रेंच अ‍ॅडमिरलला फ्रान्सने मुद्दाम भारताच्या किनाऱ्यावर पाठवलं होतं. त्याने अनेक समुद्री युद्धात इंग्रजांचा पराभव केला होता. त्याचा कुठलाही उपयोग पेशव्यांनी करून घेतला नाही, कारण त्याच्या वीस वर्षं आधी १७५६मध्ये आमचं आरमार बहुतेक नष्ट किंवा अगदी दुर्बल झालं होत.

शिवाय, आरमार आणि समुद्र यांच्या महत्त्वाबद्द्ल गाढ अज्ञान. हैदरअली मात्र अपवाद म्हणावा लागेल, कारण त्याने सुफ्रँशी करार केला होता. युरोपीय शक्तींबरोबर भारतातील राजांच्या, विशेषतः मराठ्यांच्या अनेक लढाया झाल्या. भारतीयांचा पराभव झाला की, तो कायमचा असे, युरोपियनांचा पराभव झाला की, तो तात्पुरता असे, कारण समुद्रमार्गे येणारी त्यांची रसद चालू राही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१७५०च्या सुमारास पुढील पन्नास वर्षात इंग्रजांचं राज्य भारताच्या दोन तृतीयांश भागावर येईल, असं कोणा भारतीयाला वाटलंच नाही. शेवटच्या म्हणजे १८५७च्या प्रतिकारात इंग्रज जहाजे सैन्य आणि युद्धसामग्री भरभरून आणत होती. आरमाराच्या अभावामुळे त्यांना थांबवण्याची कुठलीच योजना आमच्याकडे नव्हती. शिवाजीमहाराजांनी कोकण किनाऱ्यावर दूरदृष्टीनं बांधलेल्या किंवा संवर्धन केलेल्या एकाही जलदुर्गाचा त्या वेळी वापर केला गेला नाही. परिणामी भारतीयांचा पराभव अटळ होता.                        

तुळाजी आंग्रे आणि बाळाजी बाजीराव पेशव्यांचं न पटण्याची कारणं काहीही असोत, पण एका परकीय शक्तीला हाताशी धरून शिवाजीमहाराजांनी दूरगामी धोरणाने आणि महत्प्रयासाने उभं केलेलं शंभर वर्षांचं आरमार आपणंच नष्ट करणं आणि तुळाजीसारख्या मातब्बर सरखेलाच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याऐवजी, त्याला तुरुंगात टाकणं, ही एक ‘ऐतिहासिक घोडचूक’ ठरली. ती आता पश्चातबुद्धीने अक्षम्य वाटते.

भारताचं आणि इतरही आशियातील देशांचं स्वातंत्र्य जाऊन पारतंत्र्य येण्याचं एक मुख्य कारण आरमाराचा अभाव हेच होतं. समुद्र-पर्यटनावर धार्मिक कारणं देऊन बंदी आली. समुद्रपर्यटन केलंच, तर प्रायश्चित्त घेण्याची खुळचट पद्धत जवळजवळ १९३५-४०सालापर्यंत सुशिक्षितांतही चालू राहिली. मराठा आरमार त्या काळातलं एकमेव भारतीय आरमार होतं. ते नष्ट करून भारतीयांनी एकंदरीत समुद्राकडेच पाठ फिरवली. त्याचे दुष्परिणाम आपण आजवर भोगत आलो...

संदर्भ -

१. ‘India and the Indian Ocean’ - An essay on the influence of Sea Power on Indian History by K. M. Panikkar, 1945.

२. ‘वसईची मोहीम’ -  य.न. केळकर

३. महाराष्ट्र टाईम्स, २७ मे २०१९

..................................................................................................................................................................

लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......