कामाच्या ओझ्याखाली दबून जगणं विसरलेली कुटुंबं बघितल्यावर वाटतं की, यांना ‘पहेली’ सिनेमातल्याप्रमाणे एखाद्या भुताने येऊन प्रेमानं जगायला व एकमेकांना वेळ द्यायला शिकवावं
दीपावली २०२३ - लेख
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘बर्न-आऊट’ची काही प्रातिनिधिक छायाचित्रं आणि ‘पहेली’चं एक पोस्टर
  • Sun , 12 November 2023
  • दीपावली २०२३ लेख पहेली Paheli बर्न-आऊट‌ Burnout

‘पहेली’ हा अमोल पालेकर दिग्दर्शित सिनेमा एका राजस्थानी लोककथेवर आधारित आहे. त्याची कथा एका श्रीमंत मारवाडी कुटुंबातील घडते. एक तरुणी लग्न होऊन सासरी येते, पण तिचा नवरा तिच्यापाशी न राहता लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी व्यापारासाठी परदेशात चालला जातो. या तरुणीवर एका भुताचे मन जडते. ते तिच्या नवऱ्याचे रूप घेऊन तिच्यासोबत संसार करते. व्यापारी वृत्ती असलेल्या नवऱ्याला तरुण स्त्रीचे मन कळत नाही, मात्र नवऱ्याच्या रूपातले भूत त्या तरुणीला प्रेमाने वागवते, तिला खुश ठेवते. सिनेमाच्या शेवटी ते भूत नवऱ्याच्या शरीरात शिरून त्या तरुणीसोबतच राहते.

हा सिनेमा स्त्री-पुरुष नात्याचे अनेक कंगोरे दाखवतो. कामाच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगायला विसरलेली असंख्य कुटुंबं बघितली की वाटतं, यांना ‘पहेली’ सिनेमात दाखवल्याप्रमाणे एखाद्या भुताने येऊन प्रेमानं जगायला व एकमेकांना वेळ द्यायला शिकवावं.

काम हा आपल्या आयुष्याचा अत्यावश्यक घटक आहे, पण इतरही अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, हे आजचं ‘कामसू’ जग विसरत चाललं आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ उद्योजक व इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुण पिढीने आठवड्याला ७० तास काम करावे आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन केले. त्यावरून बराच वादंग झाला. मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार जपान व जर्मनी यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जे औद्योगिक धोरण अवलंबले, तसेच भारतानेसुद्धा करावे.

याचा अर्थ असा पण काढता येईल की, मूर्ती मान्य करतात की, भारताची आर्थिक स्थिती ही दुसऱ्या महायुद्धांनंतरच्या जर्मनी व जपानसारखी आहे. CMIEच्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात भारताने गेल्या दोन वर्षांतील सर्वांत जास्त बेरोजगारी दर नोंदवला. हा दर सप्टेंबरमध्ये ७.०९ होता, तो ऑक्टोबरमध्ये १०.०५ टक्क्यांवर गेला. हा मे २०२१नंतरचा उच्चांक आहे. ग्रामीण बेरोजगारीचा दर ६.२वरून १०.८२वर, तर शहरी बेरोजगारीचा दर किंचित कमी म्हणजे ८.४४ इतका आहे.

गहू, तांदूळ व साखर यांचा जगातील दुसर्‍या क्रमाकांचा उत्पादक असणार्‍या आपल्या देशात गेल्या ५ वर्षांतला सर्वांत कमी मान्सूनचा पाऊस झाला. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी वाढली. विविध कंपन्यांनी या वर्षात कर्मचारी कपात धोरण अवलंबले. त्यामुळे तासाला सरासरी २३ तांत्रिक कर्मचारी त्यांची नोकरी घालवत आहेत. विप्रो आणि इन्फोसिसमध्ये ‘कॅम्पस प्लेसमेंट’ थांबवली आहे. त्यामुळे तरुण अभियंत्यांना काम मिळणं कठीण झालं आहे. या वर्षात ७०हून अधिक भारतीय टेक स्टार्टअप्सनी २१,०००हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामध्ये BYJU'S, Chargebee, Cars24, LEAD, Ola, OYO, Meesho, MPL, Innovaccer, Udaan, Unacademy आणि Vedantu या युनिकॉर्नचा समावेश आहे.

तांत्रिक जॉब कपातीचा मागोवा घेणाऱ्या layoff.fyi या वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१२० टेक कंपन्यांनी आतापर्यंत ४०४,९६२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. २०२२मध्ये १०६१ टेक कंपन्यांनी १६४,७६९ कर्मचाऱ्यांना आणि २०२३मध्ये १०५९ कंपन्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत २४०,१९३ कर्मचाऱ्यांना काढून टाकले. गेल्या दोन वर्षांमध्ये दररोज सरासरी ५५५ कर्मचारी किंवा दर तासाला २३ कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली आहे.

पहा बातमी : IT industry keeps cutting jobs: 23 techies laid off every hour for 2 years

या कपातीचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. २१व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ‘कर्मचारी कपात’ ही आयटी कंपन्यांनी खासीयत राहिली आहे. इतर उद्योगांतदेखील कर्मचारी कपात होते, पण आयटी उद्योगात - ज्यात इंटरनेटसंबंधी व्यवसाय उदा. झोमॅटो, Byjusसारखे व्यवसायदेखील येतात - ही कपात सर्रास क्रूरपणे केली जाते.

इंटरनेटच्या उदयानंतर त्या संबंधित तांत्रिक व अतांत्रिक कंपन्या या अतिवेगाने फोफावल्या. मिलेनिअल पिढीला २०००पासून नोकरीत सामावून घेणाऱ्या या कंपन्या त्यांच्या HIRE आणि FIREसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक कंपन्या या सिलिकॉन व्हॅलीमध्ये असून, काही कंपन्यांचे मालक ४०चेसुद्धा नाहीत.

यांची एकंदरीत काम करायची पद्धत ही ‘नफेखोरी’वर आधारित आहे. त्यात सामाजिक भान वगैरे गोष्टी दूरदूरपर्यंत नाही. रोज नवीन नवीन अचंबित करणारे नफ्याचे आकडे व सोबत होणारी कर्मचारी कपात ही या नव-उद्योजकांची मानसिकता दर्शवते. कमालीची आत्मकेंद्री, अतिरेकी आणि चांगल्या-वाईटाची रेषा कळत नाही, अशी ही नवउद्योजक मंडळी आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, समाजाचा विचार न करता फक्त स्वतःची स्वप्नं व आकांशा पूर्ण करण्यासाठी धावतात व दुसऱ्यांनाही धावायला लावतात.

एलॉन मस्कपासून मार्क झुकेरबर्गपर्यंत बहुतेक नव-उद्योजक अहंकारी, एकलकोंडे व मानसिकरित्या बधीर आहेत. आणि तेच आज जगात सर्वांत लोकप्रिय आहेत. त्यांनी त्यांचे स्वभावगुण हे ‘सामान्य’ म्हणून लोकप्रिय केलेले आहेत. कोट्यवधी लोक त्यांना आदर्श मानतात, पण याच लोकांना आपलं आयुष्य अशाच श्रीमंतीच्या मागे धावणाऱ्या उद्योजकांनी खराब केलं आहे, हे कळत नाही.

ही उद्योजक मंडळी तुम्हाला-मला जेव्हा आठवड्याला ७०-८० तास काम करायला सांगतात, तेव्हा ज्या कामाचे ही मंडळी वर्षाला अब्जावधी कमवतात, त्याच कामाचे आपल्याला वर्षाला किती पैसे देतात?

पहा बातमी : धक्कादायक! मॅनेजर पदावरील भारतीय महिलांच्या संख्येत घसरण; पुरुषांच्या तुलनेत पगारही झाले कमी

अब्जावधी रुपये मिळूनही या या मंडळींची भूक का भागत नाही, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? लोभ/लालसा/हाव म्हणजे “you never get enough of what you don’t really want.” ज्याची तुम्हाला गरज नाही ते कितीही मिळालं तरी तुमची गरज भागत नाही. लहानपणी पूर्ण न झालेल्या भावनिक गरजा पुढे जाऊन भौतिकवादी/चंगळवादी गोष्टीत बदलतात. उदा. आई-वडिलांकडून न मिळालेल्या प्रेमाची भूक हे काही लोक संपत्ती जमा करून मिटवण्याचा प्रयत्न करतात.

व्यसनामागेदेखील हीच मानसिकता असते. त्यामुळे संपत्ती जमवणे हेसुद्धा एक व्यसनच आहे. कारण त्याला शेवट नसतो. ज्यांना लहानपणी सहसंवेदना, दया, करुणा या भावना नीट शिकवल्या जात नाहीत किंवा ज्यांचे बोलपण कष्टात, गुन्हेगारीत जाते वा ज्यांना निव्वळ भौतिकवाद शिकवला जातो, अशा लोकांमध्ये संपत्तीनिर्मितीची हाव असते. त्यांना फक्त घेणे माहीत असते. असे लोक आपला आनंद पैश्यात शोधतात. समाजाला, आजूबाजूच्या लोकांना आपण काय देतो, याचे भान त्यांना नसते.

पहा बातमी : https://www.youtube.com/watch?v=LSYd5ZDMsVA

मानसशास्त्राच्या मते पैसा व सत्ता यांची हाव मनाच्या रिकामपणातून येते. डेबोरा ग्रॅनफेल्ड (Deborah Grunfeld) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात केलेल्या एका संशोधनात आढळून आले की, अगदी सर्वसाधारण लोकांना सत्ता दिली, तरी ते तात्काळ इतर लोकांना वस्तू समजू लागतात. असे लोक काम असेल, तरच इतरांशी संपर्क ठेवतात.

यात सर्वांत दुर्लक्षित पण महत्त्वाचे म्हणजे असे लोक निसर्गाची अपरिमित हानी करायला मागे-पुढे पाहत नाहीत. गेल्या शतकभरातील औद्योगिक क्रांतीमुळे अ‍ॅमेझॉनचे अर्धे जंगल संपले आहे. प्रदूषणामुळे हिमालय व अंटार्टिकाचे बर्फाचे पहाड वितळत आहेत. प्रदूषण एवढे वाढले आहे की, श्वास घ्यायला त्रास होत आहे, आजार वाढत आहेत. पण आपण जो उद्योग करतो, त्याचे कार्बन फूटप्रिंट किती याचा विचार बहुतेक उद्योजक करत नाहीत. निसर्ग संपला की, आपण संपू, मग कोणता उद्योग करणार, हा प्रश्न या उद्योजकांच्या मनात कधी येत नसेल का?

‘workplace wellbeing’ ही संकल्पना अशा लोभी उद्योजकांना आवडत नाही, कारण कामाचे तास कमी करणे, कामगार आपल्या कुटुंबाला व स्वतः ला वेळ देऊ शकतील अशी कामाची रचना, योग्य मोबदला आणि आवश्यक सुविधा दिल्या, तर कामगारांना मनाप्रमाणे राबवून घेता येणार नाही, हे यांना माहीत असते.

जगभरात करोनानंतर कामाची रचना बदलवण्यावर भर देण्यात आला. कामाचे तास कमी करून उत्पादकता कशी वाढवता येईल, म्हणजे ‘स्मार्ट वर्क’ कसे करता येईल यावर वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात कामाचे तास कमी केले, तर उत्पादन वाढते हे लक्षात आले आणि कामगारांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येऊन त्याची कंपनीबद्दलची आपुलकी व निष्ठा वाढते, असे आढळून आले.

मानवी मेंदू व शरीराला मर्यादा आहेत हे समजून रॉबर्ट ओवेन या माणसाने १८१० सालीच ‘८ तास काम, ८ तास मनोरंजन’ याची मागणी केली होती. तिचे चळवळीत रूपांतर होऊन १९व्या शतकाच्या सुरुवातीला बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशात ८-१० तासांचा कामाचा दिवस झाला. पुढे जाऊन औद्योगिक मानसशास्त्राने यावर अनेक संशोधन करत ‘स्मार्ट वर्क’, कामाच्या जागा आनंदी ठेवणे अशा पद्धती विकसित केल्या.

जसे काम न केल्याचे म्हणजे बेरोजगारीचे मानवी मनावर परिणाम होतात, तसेच अति कामदेखील मारक आहे, हे जगभरातील वाढत्या ‘बर्न आऊट’च्या केसेस दाखवतात.

पहा बातमी : https://www.youtube.com/watch?v=VMbhM59K5FQ

आशियाई देशांची संस्कृती ही अतिकामाला आदर देणारी आहे. जपानसारखा देश गुणवत्तेसाठी जगप्रसिद्ध आहे. तो आता कामाला अति महत्व दिल्याने विचित्र सामाजिक प्रश्नांशी झुंज देत आहे. कमी होत जाणाऱ्या लोकसंख्येच्या दरामुळे जपानमध्ये शहर ओस पडत आहेत, लोक कामाच्या ताणामुळे लग्न करत नाहीत, केलं तर मुलांना जन्म देत नाहीत, त्यामुळे वृद्धांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे.

चीन व दक्षिण कोरियामध्ये १२ तास कामाच्या पद्धतीचे अति भयंकर परिणाम दिसायला लागले आहेत. चीनमध्ये सकाळी ९ ते रात्री ९, आठवड्याला ८४ तास काम करणे, हे सामान्य झाले आहे. त्याचा परिणाम लोकांच्या व समाजाच्या आरोग्यावर दिसायला लागला आहे.

पहा बातमी : https://www.youtube.com/watch?v=Ye6DPf96r-E

जपान व दक्षिण कोरियामध्ये कामामुळे मृत्यू ही आता सामान्य बाब झाली आहे. दक्षिण कोरियामध्ये अतिकामामुळे झोपेवर इतका परिणाम झाला आहे की, जगातील सर्वांत जास्त आत्महत्या दक्षिण कोरियामध्ये होतात. १९५०मध्ये तिसऱ्या जगाचा हिस्सा असलेला दक्षिण कोरिया जगातील सर्वांत विकसित देशात गणला जातो, पण एवढ्या कमी वेळात विकसित होण्याची किंमत त्याला आता मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागत आहे.

पहा बातमी : https://www.youtube.com/watch?v=LrY0mNgaXKU

एवढे अतिकामाचे आकडे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की, मराठी माणूस आळशी आहे, एवढे काम करत नाही. भारतातील व्यापारी समाज मराठी माणसाला धंदा जमत नाही, असे वारंवार ऐकवत असतो. भारतात अशी अनेक राज्यं आहेत - उदा. अति पूर्वेकडची - जी निसर्गावर आक्रमण न करता व्यवसाय करतात. दक्षिणेतील राज्यं शिक्षण, आयटी व सरकारी नोकरीवर वर्चस्व गाजवतात. बिहार सरकारी, आयएएस/आयपीएसमध्ये पुढे आहे. बंगाली लोक आयटी, साहित्य, माध्यम, अर्थशास्त्र अशा ठिकाणी वर्चस्व गाजवतात. ही सर्व मंडळी आपल्याला व्यापार जमत नाही, म्हणून बदनाम आहेत का? तर नाही. ते कधीही गुजराती, पंजाबी, मारवाडी लोकांसोबत उगाच स्पर्धा करून स्वत:ला कमी लेखत नाहीत. त्यांची बलस्थानं ओळखून काम करत आहेत. मग मराठी माणूस व्यापार जमत नाही, म्हणून का बदनाम केला जातो?

महाराष्ट्र वर्षानुवर्षं शेती, पारंपरिक व्यवसाय व जोडधंदे, खासगी नोकर्‍या, सहकार क्षेत्र, सरकारी नोकर्‍या व आयटी, अशा क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. मराठी लोक जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेले आहेत, तिथे आपली संस्कृती जोपासत आहेत. अर्थात मराठी समाज परिपूर्ण आहे, असे मी म्हणत नाही, पण निसर्गाला ओरबाडून श्रीमंत होणार्‍या ‘ट्रेंड’मध्ये मराठी माणूस वेड्यासारखा धावत नाही, हे मान्य करावे लागेल.

मराठी माणसाला असे हिणवण्याच्या मागे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असणे, हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. ज्या समाजाला व्यापार जमत नाही, त्याच्याकडे आर्थिक राजधानी कशाला हवी, असा एक सूर ऐकायला मिळतो.

Josh Cohen यांच्या मते, सतत कामात गढलेल्या व्यक्तीला सर्जनशीलतेची नस सापडत नाही. त्यांनी ‘मिलेनिअल पिढी’ ही ‘बर्न-आऊट’ झालेली पिढी आहे, असे म्हटले आहे. आयुष्य जेव्हा कधीच न संपणाऱ्या कामांची यादी बनते, त्या वेळेस काम हेच आयुष्य बनून ‘बर्न-आऊट’ होणे अटळ बनते. हे औदासीन्य नाही, तर ती अशी एक मानसिक स्थिती आहे, ज्यात अविरत काम करून व्यक्तीतील सर्व ऊर्जा संपून जाते. तरीही व्यक्ती स्वतःला ओढत, ढकलत कामाच्या समाधानाची पर्वा न करता काम करत राहते. ‘मिलेनिअल पिढी’साठी ही मानसिक स्थिती अत्यंत सामान्य झाली असून, अधिकाधिक कर्मचारी व कामगार याचा अनुभव घेत आहेत. पण दुर्दैवाने त्यांना त्याची जाणीव नाही व असली तरी उपाययोजना करणे जमत नाही.

मराठी समाजातील काही विशिष्ट वर्ग हा ‘काम करा व करतच रहा’ अशा वृत्तीचा आहे. हे ऐकायला ‘crony capitalisms’ वाटतं ना? ते आहे पण. कामाशी व त्यातून येणाऱ्या पैशांसोबत स्वतःची किंमत जोडणाऱ्या या वर्गात अपयश, कमी पैसा, मानसिक समाधान व निसर्गाशी सुसंगत आयुष्य जगणं, हे हास्यास्पद ठरतं. मराठी मातीला असणारी अध्यात्माची परंपरासुद्धा ‘चित्ती असू द्यावे समाधान’ सांगते. कुठे थांबावे हे आपल्याला कळत नसेल, तर समाज व निसर्ग यांचे काय होणार?

महाराष्ट्रात अनेक चांगले मराठी उद्योजक आहेत, पण संपूर्ण मराठी समाजाने उद्योजक व्हावे, सतत काम करत राहावे, पैशाच्या मागे धावत राहावे, कोट्यवधी रुपये लग्नावर उधळावेत, सतत छान छोकीत राहावे, त्यासाठी बँकांचे कर्ज बुडवावे आणि परदेशात पळून जाण्याचे धंदे करावेत, असे कुणाचे विचार असतील, तर आपण ते ऐकायचे का? गरज असेल तर काही काळासाठी वाजवीपेक्षा जास्त काम करणे मान्य आहे, मात्र सातत्याने अति-काम करत राहणे, हे खरंच शक्य आहे का?

जगभरात कामाचा आठवडा चार दिवसांचा करणे, गरज असेल तेव्हा घरून काम करणे, इथपासून ‘गिग वर्क’ म्हणजे २-३ वेगवेगळे कामाचे प्रोजेक्ट काही महिन्यांसाठी घेणे, अशी कामाची वेगवेगळी ‘मॉडेल्स’ विकसित होत आहेत. त्यामुळे त्या कर्मचार्‍याला कुटुंबाला व स्वत:ला वेळ देता येईल. कारण तसे न केल्यास दिवसेंदिवस जो समाजाचा तोल ढासळत चालला आहे, तो आणखी बिघडेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘Not Working : Why We Have to Stop’ या २०१८मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक Josh Cohen यांच्या मते, सतत कामात गढलेल्या व्यक्तीला सर्जनशीलतेची नस सापडत नाही. त्यांनी ‘मिलेनिअल पिढी’ ही ‘बर्न-आऊट’ झालेली पिढी आहे, असे म्हटले आहे.

आयुष्य जेव्हा कधीच न संपणाऱ्या कामांची यादी बनते, त्या वेळेस काम हेच आयुष्य बनून ‘बर्न-आऊट’ होणे अटळ बनते. हे औदासीन्य नाही, तर ती अशी एक मानसिक स्थिती आहे, ज्यात अविरत काम करून व्यक्तीतील सर्व ऊर्जा संपून जाते. तरीही व्यक्ती स्वतःला ओढत, ढकलत कामाच्या समाधानाची पर्वा न करता काम करत राहते.

‘मिलेनिअल पिढी’साठी ही मानसिक स्थिती अत्यंत सामान्य झाली असून, अधिकाधिक कर्मचारी व कामगार याचा अनुभव घेत आहेत. पण दुर्दैवाने त्यांना त्याची जाणीव नाही व असली तरी उपाययोजना करणे जमत नाही. कामाशी आपले सर्वस्व जोडणारी मिलेनिअल पिढी काम-केंद्रित आयुष्य जगते. ‘डेलॉइट मिलेनियल सर्व्हे २०२०’मध्ये असे आढळले आहे की, ५६ टक्के ‘मिलेनिअल’ भारतीय आणि ५३ टक्के ‘झेड’ पिढीतील कामगार त्यांच्या नोकरीत नियमित ताणतणाव अनुभवतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आम्ही एवढे केले म्हणून पुढच्या पिढीने एवढे काम करावे, असे म्हणणे बरोबर नाही. कारण प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्त सोयीसुविधा व वेगळ्या प्रकारचे आव्हान झेलत असते. त्यामुळे आम्ही केले, तेच येणाऱ्या पिढ्यांनी करावे, असा हट्ट वृद्धत्वाकडे झुकलेल्या पिढ्यांनी करू नये.

आज तंत्रज्ञान आणि एआयमुळे काम सोपं झालं असलं, तरी लोकसंख्या व संबंधित कारणाने नवीन पिढीसमोर वेगळी आव्हानं आहेत. एआयमुळे नवीन पिढीला नोकऱ्या राहतील की, नाहीत याची चिंता आहे. हा लेख लिहित असताना मुंबईमध्ये अति प्रदूषण झाल्याने नागरिकांवर आणि कामांवर सरकारने बंधनं आणली आहेत. तीच स्थिती दिल्लीची आहे. अति काम, मानवी हाव, आंधळी व्यापारी वृत्ती व निसर्गाला गृहीत धरणे, यामुळे ही वेळ आली आहे. पुणे, मद्रास, बंगलोर यांसारख्या शहरातदेखील काही काळानं हेच चित्र दिसेल.

प्रदीर्घ आनंदी आयुष्याचे रहस्य काय आहे, हे एका अमेरिकन माणसाने जगात १०० वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या लोकांना विचारले असता, त्याला जी उत्तरं मिळाली, ती ‘नेटफ्लिक्स’वरच्या ‘Live to 100 : Secrets of the Blue Zones’ या docu-seriesमध्ये पाहायला मिळतात. ही सर्व मंडळी आवश्यक तेवढे काम, पुरेसा आराम, आरोग्यदायी नाती आणि निसर्गाशी जवळीक साधत आनंदानं जगत आहेत. आपल्यालादेखील ते शक्य आहे, फक्त ते आपल्या समाजाला, उद्योजकांना व नेत्यांना कळायला हवे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अतिकाम कोणासाठीही फायदेशीर नाही.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......