वहिदा रहमान : खानदानी अदब, सुसंस्कृतपणा, ‘थिंकींग ॲक्टर’ आणि ‘रोझी’सुद्धा!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अंजली अंबेकर
  • वहिदा रहमान
  • Sat , 30 September 2023
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा वहिदा रहमान Waheeda Rehman दादासाहेब फाळके पुरस्कार Dadasaheb Phalke Award

परवा एक जवळची मैत्रीण उदयपूरला फिरायला गेली होती आणि तिथून चित्तोडगड किल्ला बघण्यासाठी जाणार होती. हे कळताच, मी तिला क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ‘अगं किल्ल्यावर ‘गाईड’च्या रोझीसारख्या दुडक्या उड्या मारतानाचा फील आणि फोटो घे.’ इतकी रोझी आपल्या मनात बसलेली आहे! म्हणूनच ‘गाईड’, रोझी, वहिदा रहमान आणि चित्तोडगड अशा इमेजेसचा मनात एकत्रित कोलाज उतरला आहे.

हे सगळं पुन्हा अधोरेखित होण्याचं कारण म्हणजे, नुकताच वहिदा रहमान यांना मिळालेला ‘दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार’. ही बातमी कळताच, ‘अरे, यांना अद्याप मिळालेलाच नव्हता का?’ असं वाटलं. म्हणजे आपण त्यांना तो कधीचाच मिळाला आहे, असंच गृहीत धरत होतो... वहिदाजींचं हेच यश आहे, असं म्हणावं लागेल.

वहिदा रहमान खरं तर माझ्या आईवडिलांच्या पिढीच्या, परंतु त्यांचे चित्रपट बघताना ते जाणवायचं नाही. त्यांच्या अभिनयात साठ-सत्तर या दशकांचा अविभाज्य घटक असणाऱ्या ‘मेलोड्रामा’चा लवलेशही नव्हता. त्या सुरुवातीपासूनच अत्यंत वास्तववादी अभिनय करणाऱ्या होत्या. म्हणून त्या गुरुदत्त ते सत्यजित राय, यश चोप्रा ते राकेश ओमप्रकाश मेहरा यांसारख्या विविध शैलीच्या दिग्दर्शकांकडे एकाच इंटेन्सिटीने काम करू शकल्या. अजूनही काल-परवाच्या ‘द साँग ऑफ स्कॅार्पिअन्स’ आणि ‘स्केटर गर्ल’मध्ये ही तितक्याच समकालीन वाटतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वहिदाजींचा जन्म मद्रासचा, पण रहमान कुटुंब मूळचं तामिळनाडूचं. त्यांचे वडील महापालिका आयुक्त (आयएएस) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. पारंपरिक मुस्लीम कुटुंबात जन्म घेऊनही, त्यांच्या घरचं वातावरण अत्यंत प्रागतिक विचारांचं होतं. घरात चित्रपटांची आणि इतर कलांची आवड होती, म्हणूनच त्या वडिलांच्या परवानगीनं आपल्या बहिणीसोबत ‘भरतनाट्यम’चे धडे घेऊ शकल्या. अगदी लहान वयातच त्यांनी स्टेज शोज करायला सुरुवात केली होती. कुटुंबाची त्याला मान्यता होती.

आयुष्यात त्यांनी काही ठरवून केलं नाही, तर सगळं घडत गेलं, अशीच त्यांची धारणा आहे. वडिलांचं निधन झालं, तेव्हा वहिदाजींचं वय होतं अवघं तेरा आणि शिक्षणही अर्धवट झालेलं. त्यांना डॉक्टर बनायचं होतं, परंतु लहान असताना त्या सतत आजारी असायच्या म्हणून शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत.

तेलगू चित्रपटाचे निर्माते सी.व्ही. रामकृष्ण प्रसाद हे वहिदाजींच्या वडिलांचे परिचित होते. त्यांनी वहिदाजींचं नृत्यकौशल्य पाहिलं होतं. ते बघून वहिदाजींच्या वडिलांकडे वहिदाजींना चित्रपटांत भूमिका करण्याची त्यांनी ऑफर दिली होती. परंतु वहिदाजींचं वय लहान असल्यामुळे वडिलांनी त्या वेळी नकार दिला होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा वहिदाजींच्या आईजवळ प्रस्ताव दिला, परंतु वहिदाजींचा आणि त्यांच्या आईचा निर्णय होत नव्हता.

चित्रपटात काम करणं जमेल का, याविषयी वहिदाजी साशंक होत्या. परंतु रामकृष्ण प्रसादांनी त्यावर तोडगा काढला, त्यांनी ‘स्टेज वर करतेस तसाच चित्रपटात डान्स कर’ असा आग्रह केला. मग तेव्हा त्यांच्या ‘रोजूलू माराई’ या तेलगू चित्रपटात डान्स सिक्वेन्सची भूमिका वहिदाजींनी केली. ते गाणं खूप लोकप्रिय झालं.

त्यानंतर काही तेलगू चित्रपटांत त्यांनी कामं केली. ‘रोजूलू माराई’ची लोकप्रियता वाढली आणि त्याचे वेगवेळ्या शहरांत प्रमोशनसाठी वहिदाजी जायला लागल्या. हैद्राबादच्या एका शोला गुरुदत्त होते. त्यांनी त्यांचं काम बघितलं असावं. त्यांनी एका वितरकाच्या माध्यमातून वहिदाजींना भेटायची इच्छा प्रदर्शित केली, कारण त्यांना त्यांच्या नवीन चित्रपटासाठी नवीन कलावंत हवे होते. दक्षिण भारतीय असूनही, मुस्लीम नावामुळे वहिदाजींना उर्दू बोलता येत असेल, तेव्हा त्या हिंदी बोलू शकतील, याची शक्यता वाटल्याने गुरुदत्तने हा प्रस्ताव मांडला.

वहिदाजी हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या, तेव्हा अभिनेत्यांची नावं बदलण्याची प्रथा होती. वहिदा हे अत्यंत ‘नॉन ग्लॅमरस’ असणारं, साधंसं नाव बदलण्याचा गुरुदत्त प्रॉडक्शन्सकडून प्रस्ताव आला, परंतु नाव न बदलण्याविषयी त्या ठाम होत्या. त्यांनी त्याला सक्त विरोध केला आणि एक आठवडाभर त्या याच मुद्द्यासाठी अडून बसल्या, तेव्हा गुरुदत्त प्रॉडक्शनने तेच नाव राहू देण्याचं कबूल केलं.

कपड्यांच्या बाबतीतही त्यांची तशीच ठाम भूमिका राहिली. त्यांना पसंत पडल्याशिवाय त्यांनी कुठलाही चित्रपटाचा कपडेपट (कॅास्च्युम) वापरणार नाही, असं ठामपणे सांगितलं आणि तशी  अटही करारपत्रात टाकायला लावली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

घरच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जरी चित्रपटांत अभिनय करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांनी खानदानी अदब, सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. त्यांचा अभ्यास, त्यांची भूमिकेची समज फार वेगळी होती. कदाचित याच गुणांमुळे त्या सातत्यानं इतकी वर्षं विविध दिग्दर्शकांसोबत समर्थ भूमिका करू शकल्या. हा सगळा ठामपणा ‘गाईड’च्या रोझीमध्ये उतरला आहे, म्हणूनच ती आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘आयकॉनिक’ व्यक्तिरेखा समजली जाते.

वहिदाजींची अभिनयक्षेत्रातील सुरुवात झाली, ती ‘सीआयडी’ या गुरुदत्त प्रॉडक्शनच्या चित्रपटाने. त्या ज्यांच्या फॅन होत्या, त्या देव आनंदसोबतच पहिला चित्रपट करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांच्या चित्रपट आणि भूमिकांचा आलेख सतत चढता राहिला.

वहिदाजींना चित्रपट बघण्याची आवड होती आणि ‘गॅान विथ द विंड’ या चित्रपटाने त्यांना प्रभावित केलं होतं. उपजत बुद्धिमत्ता, अभिनयगुण आणि स्वतःची जपलेली मूल्यव्यवस्था, यामुळे त्या कायमच ‘डिग्नीफाईड’ अभिनेत्री राहिल्या.

आता प्रचलित असलेला आशयसंपन्न/ अर्थपूर्ण चित्रपटाचा आणि वेगळ्या भूमिकेचा वहिदाजींनी तेव्हाच विचार केला होता. ‘थिंकींग ॲक्टर’ या परिभाषेत त्या चपखल बसायच्या. अमिताभ बच्चन यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बुद्धिमान अभिनेत्रींमध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. वहिदाजी काळातही सेटवर सतत पुस्तक हातात घेऊन असायच्या आणि वेळकाळाचं भान नसणाऱ्या क्षेत्रातही रात्री नऊनंतर कुणाचा फोनही घ्यायच्या नाहीत.

वहिदाजींच्या चित्रपट कारकिर्दीचा विचार केला, तर त्यांनी केलेल्या हिराबाई (तिसरी कसम), जबा (साहिब, बीवी और गुलाम), गुलाबो (प्यासा), शांती (त्रिशूल, कागज के फूल), राधा (खामोषी), चमेलीजान (मुझे जीने दो), रेश्मा (रेश्मा और शेरा), गुलाबी (अभिजन), अंजली (कभी कभी ), जुगनी (नमकीन) आणि दाईजा (लम्हे), अशा त्यांच्या सगळ्याच भूमिका सशक्त स्त्री व्यक्तिरेखा होत्या.

यामागे त्यांचा कुठलाही स्त्रीवादी अभिनिवेश नव्हता, परंतु भूमिका सशक्त आणि वेगळ्या धाटणीची असावी, हा आग्रह असायचा. ‘गाईड’च्या भूमिकेसाठी त्यांचं नाव जेव्हा समोर आलं, तेव्हा कादंबरी वाचून, भूमिकेचे पैलू, त्यातला दृष्टीकोन आवडल्यामुळे त्यांनी ती भूमिका स्वीकारली आणि एकदा स्वीकारल्यावर त्या मागे हटल्या नाहीत. देव आनंदचाही त्यांना तेवढाच पाठिंबा मिळाला. रोझीची भूमिका त्या काळाच्या मानाने क्रांतिकारी समजली जाते.  एवढी बोल्ड भूमिका तितक्याच ‘डिसेन्सी’नं करणं, हे त्यांचं कसब होतं.

आर.के. नारायण यांच्या ‘गाईड’ या कादंबरीवर चित्रपट करण्याची इच्छा सत्यजित रे यांनीही प्रदर्शित केली होती आणि त्यांनीही रोझीच्या भूमिकेसाठी वहिदाजींनाच विचारलं होतं, परंतु त्या कादंबरीचे हक्क देव आनंदने विकत घेतले आणि हा चित्रपट त्यांच्या नवकेतन बॅनरने केला. दिग्दर्शक कुणी का असेना, रोझी करणं वहिदाजींचं भागधेयच असावं.

त्यांनी अभिनीत केलेल्या सर्व भूमिका वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. नैसर्गिक अभिनय शैलीवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांची तुलना थेट इन्ग्रिड बर्गमन, सोफिया लॉरेन, ज्युलिएट बिनोश आणि मेरील स्ट्रीपशी होऊ शकते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अभिनेत्री बनण्याच्या आधी त्या उत्तम नर्तिका आहेत. ‘गाईड’च्या गाण्याचे सीक्वेन्स सोहनलाल यांनी केले होते. वहिदाजींची रोझीची भूमिका मूळात नर्तिकेची असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला अजूनच निखार आला. त्यापूर्वी ‘तिसरी कसम’मधील हिराबाईसुद्धा नर्तिकाच होती.

सुनील दत्तसोबत केलेल्या ‘मुझे जिने दो’ या चित्रपटात ‘रात भी कुछ भिगी भिगी’ हे अप्रतिम गाणं आहे. त्याचं नृत्य दिग्दर्शन लच्छु महाराज (कत्थक) यांनी केलं होतं. त्यातल्या वहिदाजींच्या मुद्रा आणि भाव नाजूक होते. कथ्थक नृत्य शैलीत वहिदाजींना बघणं एक अविस्मरणीय अनुभव आहे. लताजींचा तीव्र कोमल स्वर आणि वहिदाजींच्या नाजूक मुद्रा, पदन्यास, साहिरचे शब्द आणि जयदेवचं तितकंच सुंदर संगीत...

वहिदाजी जितक्या उत्तम नर्तिका होत्या, तितक्याच उत्तम अभिनेत्रीही होत्या. या दोन्हीचा संयोग ज्या ज्या चित्रपटांत झालाय, तिथं त्यांनी बहार उडवून दिली आहे. वहिदाजींची ‘गाईड’मधील गाणी त्यांच्या भूमिकेसारखी अविस्मरणीय होती. रोझीचं ‘आज फिर जिने की तमन्ना हैं…’ हे गाणं सर्व स्त्रीवर्गाच्या मुक्ततेचा हुंकार वाटतो, शतकानुशतके मनावरचं जोखड क्षणार्धात फेकून, मोकळा श्वास घेतल्याचा आनंद, त्यांच्या प्रत्येक स्टेपमधून, अंगप्रत्यंगातून ओसंडून वाहत असल्याचा अनुभव, आपल्यालाही येतो. रोझीचं पूर्ण कॅरॅक्टरायझेशन या गाण्यातून व्यक्त झालं आहे.

त्या चित्रपट करताना त्यांची मतंही ठामपणे मांडायच्या. ‘प्यासा’मधील मुख्य व्यक्तिरेखा विजय मृत्यू पावला आहे किंवा नाही, अशा संभ्रमात असताना पडद्यावर गुलाबोच्या गाण्याचा प्रसंग चित्रीत केला होता, परंतु वहिदाजींना ते गाणं त्या प्रसंगी योग्य वाटलं नाही. तसं त्यांनी सांगितलं. तेव्हा राज खोसला आणि माला सिन्हा यांनाही आश्चर्य वाटलं होतं. परंतु कालांतरानं गुरुदत्त यांना ते पटल्यावर त्यांनी ते गाणं चित्रपटातून काढून टाकलं.

वहिदाजींनी त्या काळातील सर्वच महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि दिग्दर्शकांकडे काम केलं. त्यांत गुरुदत्त प्रॉडक्शनसोबत देव आनंदचं नवकेतन, सुनील दत्तचं अजंता आर्टस आणि यश चोप्राच्या यशराज फिल्म्सचा समावेश आहे.

तेच अभिनेत्यांबाबतही म्हणता येईल. त्या काळातील प्रमुख दिलीप-देव-राज, गुरुदत्त, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोजकुमार इ. परंतु सर्वाधिक काम त्यांनी देव आनंद सोबत केलं आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच वहिदाजींना हा पुरस्कार मिळावा, हाही सुंदर गाढ योगच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रथितयश संस्थांसोबतच गीतकार शैलेंद्र यांनी निर्मिलेल्या पहिल्या चित्रपटात, ‘तिसरी कसम’मध्येही वहिदाजी होत्या. चित्रपट करताना त्यांनी नेहमीच कमर्शिअल दृष्टीकोन ठेवला नाही. सत्यजित रे यांनी जेव्हा त्यांना ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या ‘अभिजन’ या लोकप्रिय कादंबरीवर आधारित चित्रपटात भूमिका करण्याविषयी विचारलं, तेव्हा स्पष्टपणे सांगितलं की, तुम्ही हिंदी चित्रपटांत खूप पैसे मिळवता, परंतु मी तुम्हाला तेवढं मानधन देऊ शकणार नाही. तेव्हा वहिदाजींनी पैशापेक्षाही रे यांच्यासोबत काम करणं, हा सन्मान समजला आणि होकार दिला.

तेच ‘तिसरी कसम’च्या बाबतीतही झालं. गीतकार शैलेंद्र यांना हा चित्रपट बनवण्यासाठी खूप वेळही लागला आणि ते आर्थिक अडचणींत आले, तेव्हा तेही वहिदाजींना पैसे देऊ शकत नव्हते. तेही त्यांनी समजून घेतलं.

वहिदाजी वैयक्तिक आयुष्यात त्यांचं खाजगीपणा जपू शकल्या. अनेकांना ‘शगुन’ चित्रपटातील कमलजीत हे वहिदाजींचे सहअभिनेता त्यांचे पतीही होते, हेही माहीत नसतं. गुरुदत्त आणि त्यांच्या ‘एपिक’ नात्याविषयीच्या बोलवा आणि गॉसिपमध्ये त्या कधीच रमल्या नाहीत. त्याबाबत बोलणंही टाळलं नाही. सत्य-असत्यापलीकडची नात्यातली ‘डिग्निटी’ त्यांनी कायमच जपली.

वहिदाजी सत्तर-ऐंशीच्या दशकांत बंगलोरला शिफ्ट झाल्या. त्यांची मुलं, त्यांचं शिक्षण, संगोपन यांत गढून गेल्या. अशरफा सत्तार या मैत्रिणीसोबत त्यांनी ‘गुड अर्थ फूड्स अँड फार्म हाऊस सिरीयल्स - ब्रेकफास्ट फूड्स’ या ब्रँड खाली व्यवसाय सुरू केला. काही काळ ‘रंग दे’ या मोठ्या क्राऊड फंडिंग संस्थेच्या ‘गुड विल अम्बॅसॅडर’ म्हणूनही काम केलंय.

वयाची पंचाहत्तरी पूर्ण झाल्यावर त्यांनी हिमांशू चंद्रकांत शेठ या प्रथितयश वाईल्ड लाईफ फोटोग्राफरकडून फोटोग्राफीचे धडे घेतले आणि तो छंद जोपासला. त्यांना पूर्वीपासून फोटोग्राफीची आवड होती. छोटासा कॅमेरा घेऊन त्या फोटोग्राफी करायच्या. परंतु त्या छंदाचा पंचाहत्तरीनंतर जाणीवपूर्वक, प्रशिक्षित होऊन पाठपुरावा केला. त्यांनी काढलेल्या आसाम, अरुणाचल प्रदेश, नाम्बीबीया, केनिया आणि टांझानिया या जंगलातील फोटोंचं प्रदर्शनही भरवलं.

त्यांची अभिनेत्री हेलन आणि आशा पारेखसोबत ‘गर्ल गॅंग’ आहे. त्या अलास्कापासून टर्कीपर्यंत अनेक देश-विदेशांत प्रवास करतात. या वयात त्यांना स्कुबा डायविंग शिकायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रल्हाद कक्करची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन केली आहे....

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......