‘आतल्या विस्तवाच्या कविता’ : मायमराठी आणि मराठीवाचक यांना आपली भाषा नेमकेपणाने कळेल, याची कवीला खात्री वाटते... 
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
किरण शिवहर डोंगरदिवे
  • ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 30 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस आतल्या विस्तवाच्या कविता Aatlya Vistavachya Kavita संजय चौधरी Sanjay Chaudhari

संजय चौधरी हे वर्तमानावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या कवीपैकी एक. अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि कमी शब्दांमध्ये मोठा आशय सांगणारी त्यांची कविता आहे. ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ हा त्यांचा नवा संग्रह समकालीन जीवनातील वेगवेगळ्या परिघाला ११ आयामांतून स्पर्श करतो. ‘बाजारच्या कविता’ या आयामातून जगामध्ये प्रत्येक गोष्टीची बोली लावली जाते, प्रत्येक गोष्टीचा सौदा करण्याचा प्रयत्न होतो, अशा आशयाच्या दहा कविता आहेत.

‘तुकारामान  वाण्यानं

आता दुकान तरी कुठे लावायचं

की पुन्हा सदैव वैकुंठाला जायचं...?’

अशा प्रश्नातून जगाच्या या बाजारात तुकारामासारख्या भोळ्या माणसाचा निभाव लागणार नाही, हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. ‘मालापेक्षा ग्राहक महत्त्वाचा’, ‘बाई आहे एवढं पुरेसं  नाही का?’, ‘बाजार कुणाला उपाशी मरू देत नाही’, ‘बाजार फक्त तुमचा खिसा बघतो’, अशा विविध कवितांमधून जगाच्या बाजाराचा म्हणजेच व्यवहाराचा दृश्य-अदृश्य, भयाण विद्रूप असा चेहरा दाखवला आहे.

‘आता आई नाही’ या आयामात मातृगौरव सांगणाऱ्या तीन कविता आहेत. त्यातही आई नसल्यावर होणाऱ्या दुःखाचा परिचय वेगळ्या अंगाने करून देण्याचं काम केलं आहे. आईप्रमाणेच तिसऱ्या आयामात ‘वृद्धापकाळचे दुःख आणि तरुण पिढीची जुन्या पिढीसोबत तुटत चाललेली नाळ’, ‘या शबनमला तरी दिला असता जन्म’, ‘वडील जाण्याची पहिली जाते वाट’, ‘वडिलांचा मुक्काम असतो खुल्या आभाळाखाली’, अशा कवितांमधून कवींनी वडिलांची गौरवगाथा आणि स्मरणगाथा सांगितली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

आजकालची मुलं आपल्या वडिलांसोबत कशी तुसडपणे वागतात, हे परखडपणे सांगितले आहे. ‘यह नंबर मौजूद नही हैं’ या  शीर्षकाने सुरू होणारी कविता, जेव्हा ‘यह आदमी मौजूद नहीं हैं’ या वाक्याने संपते, तेव्हा प्रत्येक बाप-लेकाचं नातं क्षणभरासाठी थरथरून उठल्याशिवाय राहत नाही. चौधरी यांच्या कवितेतील नात्याची किनार नेहमी हळवी असते, पण ती या संग्रहामध्ये जास्त गडद झाली आहे.

‘जगण्याचं पोस्टमार्टम’ या आयामातील

‘अरे आपल्या पायातला काटा तर कुणीही काढेल

आपल्या पायात काटा असताना

दुसऱ्याच्या पायातील काटा काढण्याची मजा काही औरच असते’

या ओळीतून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा  कवी करतात. या चौथ्या आयामात माणसाचं दुभंगलेपण व्यक्त करणाऱ्या अकरा कविता आहेत. त्यातून स्वतः उभे करून, इतरांना उभे करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे, असे कवीला वाटते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

याच आयामाचा धागा धरून ‘माझी झाली माझ्याशी चुकामूक’ हा आयाम आपल्याला भेटतो.  यातही माणसांनी आपल्याशी स्वभाव बदलून कसेही वागले, तरी आपण मात्र त्यांच्याशी कोणतेही नाते तोडले नाही. आपण कुणाच्या  खिजगणतीत नसतो, असे कवी म्हणतात.

मध्यमवर्गीय जगण्याचे प्रतिनिधित्व करणारे कवी ‘मला बोलू दिलं गेलं नाही’ असं सांगून जनसामान्यांचा आवाज सर्वत्र दाबला जातो, हे तर सांगतातच, त्याशिवाय वर्तमान दिवस कसे आहेत, याबाबत भाष्य करताना ‘आजच्या काळात अंधार पाहून फणे काढले जातात’ हे सत्य सांगितले आहे.

आज सर्वच दिशाहीन झाले आहेत, हे सांगताना कवी म्हणतात-

‘घर घरीच सोडून आलेत लोक

लाईट हाऊस हरवलेल्या जहाजासारखे

तरंगताहेत शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये’

या कवितेतील लाईट हाऊसची प्रतिमा, हरवलेले जहाज आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वतःचे सुख शोधत स्वतःच्या घरातील सुखाचे अस्तित्व संपलेले लोक, या सर्व संकल्पना वर्तमान काळातील भौतिक सुविधा यांना प्राधान्य देत, संवेदनाहीन होत जाणाऱ्या जगण्याचे प्रतिनिधित्व करतात. 

याच वर्तमानातील ‘आयांचे मोबाईल हाताळू नयेत मुलींनी’, ही कविता व्यक्तीस्वातंत्र्याचा एक आगळावेगळा नियम घालून देणारी आहे. भौतिक सुविधांना सुख समजणाऱ्या समाजाला खरे सुख काय आहे, हे सांगणारा ‘सगळ्या सुखावर नसते गव्हर्नरची सही’, हा आयाम या संग्रहाचा आत्मा आहे.

‘सगळ्या सुखावर नसते गव्हर्नरची सही

काही आनंद लपलेले असतात आसवातही’

दुःखामध्ये सुख किंवा आनंद शोधणे, जगाच्या पाठीवरील सगळ्या सुखाला पैशांमध्ये तोलता येत नाही, असा मतितार्थ सांगणाऱ्या कविता मनाचा वेध घेणाऱ्या आहेत. ‘काय फरक पडतो लोक काहीही म्हणाले तर’, ‘एकच आकाश तरंगते सगळ्यांच्या डोक्यावर’ या शीर्षकांतून त्या कवितांतील आशय प्रतिबिंबित होतो.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

‘उगाचच येत नाही भाषेला बाळसंबिळसं’ या कवितेतून कवितेचं निरसं, पवित्र दूध येण्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात, किती अनुभूतीतून जावे लागते, याचा आलेख कवी मांडतात.

संजय चौधरी यांनी कवितेची पारंपरिक धाटणी आणि मांडणी कधीच नाकारलेली आहे. त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली अंगीकारली आहे. नेमक्या शब्दांत आपली संवेदना मांडून मनाचा ठाव घ्यायचा, हा त्यांचा विशेष गुण आहे. तो ‘माझे इवले हस्ताक्षर’, ‘कविताच माझी कबर’ आणि आता ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ या संग्रहांमध्ये दिसून येतो.

या संग्रहातल्या कविता सर्वसामान्य माणसाच्या असून, सामान्यांच्या जगण्याचं प्रतिनिधित्व करतात. या संग्रहाचं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं असून त्यातून संग्रहातील कविता प्रतिबिंबित झाल्या आहेत. ज्येष्ठ कवी-कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचं पत्र आणि समीक्षक-कवयित्री प्रभा गणोरकर यांचा मलपृष्ठ-अभिप्राय संग्रहाची दिशा आणि भूमिका सुचवतात.

‘गुंगे की माँ समझती हैं, गुंगा क्या कहना चाहता हैं’ या सूचक ओळीतून मुक्या माणसाची भाषा जशी त्याच्या आईला समजते, त्याचप्रमाणे मायमराठी आणि मराठीवाचक यांना आपली भाषा नेमकेपणाने कळेल, याची कवीला खात्री वाटते.

‘आतल्या विस्तवाच्या कविता’ - संजय चौधरी

ग्रंथाली, मुंबई | पाने - १२४ | मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक किरण शिवहर डोंगरदिवे हे कवी व समीक्षक आहेत.

kdongardive@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......