‘ ‘काळ’मेकर लाइव्ह’ : या कादंबरीत जागृत आणि तीक्ष्ण समकालीन भान स्पष्टपणे दिसते, समकालाचे विरूप दर्शन कलात्मक पद्धतीने घडते...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मनोहर सोनवणे
  • ‘ ‘काळ’मेकर लाइव्ह’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 June 2023
  • ग्रंथनामा शिफारस ‘काळ’मेकर लाइव्ह Kalmekar Live बाळासाहेब लबडे Balasaheb Labde

बाळासाहेब लबडे हे नव्या पिढीचे प्रयोगशील लेखक व कवी आहेत. ‘मुंबई’ या थीमवर आधारलेला ‘मुंबई-बम्बई-बॉम्बे’ हा कवितासंग्रह, ‘महाद्वार’ ही थीम कविता, ‘एक कैफियत’ हा गझलसंग्रह, ‘ब्लोटेंटिया’ हा वेगळा कवितासंग्रह आणि वेगळी धाटणी व आकृतीबंध घेऊन आलेली ‘पिपिलिका मुक्तिधाम’, ही कादंबरी हे त्यांच्या वास्तववादी प्रयोगशीलतेचे ठळक दाखले आहेत. त्यांची दुसरी ‘शेवटची लाओग्राफिया’ ही जादुई वास्तववादाची कादंबरीदेखील नव्या वळणाची आहे. जागृत आणि तीक्ष्ण समकालीन भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ‘काळमेकर लाइव्ह’ या नव्या कादंबरीतही स्पष्टपणे दिसते.

काळ आणि परिस्थिती मानवी जगण्यावर परिणाम करत असते. त्यानुरूप जगण्याचा एक ढाचा बनत जातो आणि त्यात माणूस जगण्यासाठी जागा शोधत राहतो. ढाच्यात राहण्याची त्याची धडपड असते. समकाल असा आहे की, मानवी मूल्यांचा क्रमाक्रमाने ऱ्हास होताना दिसतो आहे. बहुविध समाजाची एकात्मता लोप पावताना दिसत आहे. सांस्कृतिक-सामाजिक एकात्मता हे नेहमीच स्वप्न राहिलेले असले, तरी आजच्या इतकी विखंडीतता कल्पनेपलीकडे आहे. धर्म, जात, पंथ, वर्ण, भाषा अशा वेगवेगळ्या अंगांनी शतखंडित झालेला मानवी समाज आपण पाहत आहोत. तुकड्या-तुकड्यांत विखरत चाललेला हा समाज क्रौर्याला, हिंसेला जवळ करत आहे.

समकाल असा दारुण, दाहक, वेदनादायी असला, तरी या सगळ्या काहुराकडे डोळेझाक करण्याचे बहुविध पलायनवादी मार्ग याच काळात निर्माण झाले आहेत. या काळावर नवभांडवलशाहीची सुगंधी भूल पसरली आहे. त्यामुळे जाणिवा बधीर झाल्या आहेत. भोवताली उगवलेले काटे बोचत नाहीयेत, की दाहकतेचे चटके जाणवत नाहीयेत. उत्कलन बिंदूच्या पार जाऊनही रक्त उकळत नाहीये किंवा गोठण्याची सीमा गाठण्याआधीच ते गोठले आहे. याचे कारण नवभांडवलशाहीच्या अमलाखाली सामूहिकतेचे भान सुटले आहे. माणसे, प्रत्येकाचे जगणे सुटे-सुटे झाले आहे. मजा करणारा मजेत राहतोय, भोगणारा भोगतोय, सोसणारा सोसतोय… कोणाला कोणाचे आणि कशाचेही सोयरसूतक राहिलेले नाही. बधिरतेचे साम्राज्य पसरलेले आहे. समकालाचे हे विरूप दर्शन ‘काळमेकर लाइव्ह’ या कादंबरीत कलात्मक पद्धतीने घडते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

सकृतदर्शनी या कादंबरीला कथानक नाही. या कादंबरीत काहीच घडत नाही. इथे घटना-प्रसंगांची कोणती मालिका नाही, परस्परसंबंधाने बांधलेली पात्रे नाहीत, पात्रांची गुंतागुंत नाही. एका विषाणूच्या जागतिक संक्रमणामुळे जगणे ठप्प होण्याचा विशिष्ट आणि विचित्र काळ माणसाच्या वाट्याला आला. हा काळ खुजा करून एका अ‍ॅपमध्ये कोंडलेल्या लोकांची, म्हटलं तर, ही एक कहाणी आहे किंवा या अ‍ॅपवरील आभासी घडामोडीची कॉमेंट्री आहे. कोठून कोठून लोक या अ‍ॅपवर येतात, काही ना काही परफॉर्म करतात. त्यांची काहीतरी करण्याची, काहीतरी मिळवण्याची उर्मी, ईर्ष्या या आभासी जगात उमटते आणि विरून जाते.

इथे येणाऱ्या लोकांनी आपल्या काळाला आभासी केले आहे, अस्तित्वहीन केले आहे. भासात, स्वप्नात, आपल्याच नादात जगण्याची एक मिती असते, मानवी स्वभावाचा एक भाग आहे तो. पण, इथे ती मिती, ते परिमाण उद्ध्वस्त झाले आहे. अखंड आभासात माणसं जगू पाहात आहेत.नाव, पैसा, कमाई, आपल्या जगण्याचा संदर्भ असे सगळेच या आभासी जगात शोधत आहेत.

भांडवलशाहीचा हा नवा अवतार या कादंबरीने आपल्या समोर ठेवला आहे. आजचे जग आणि जगणे किती आभासी झाले आहे, हे आपण हर घडी अनुभवत आहोत, त्याला कादंबरीच्या रूपाने दृश्याकार देण्याचा हा प्रयत्न म्हटला पाहिजे. आजचे 'आभासी' वास्तव या पद्धतीने लेखकाने मांडले आहे. त्यासाठी ऍपची भाषा, जार्गन वापरले आहे. हा एक धाडसी प्रयोग आहे. यात संगती नसली, तरी अंतर्संगती आहे, ती जाणवते. यातून जगण्याला असलेला ठोसपणा लयाला जात असल्याची, जगण्याच्या विस्कळीतपणाची, मूल्यभान लोपल्याची जाणीव तीव्रपणे समोर येते. हे या लेखनाचे श्रेय म्हणता येईल. करोना हा फक्त काळाचा पडदा आहे.

गेल्या तीन-चार दशकांत बदललेल्या ज्या जगाचा अनुभव आपण घेत आहोत, त्याचे तीन ठळक पैलू दिसतात. एक आर्थिक उदारीकरण, दुसरा माहिती तंत्रज्ञानाने केलेली क्रांती आणि तिसरा सर्वसमावेशकतेला सुरुंग लावणारा उग्र जमातवाद. आर्थिक उदारीकरणामुळे नियंत्रणात जखडलेला बाजार मुक्त झाला, हे खरे, पण विषमता कमी होण्याऐवजी कितीतरी पटीने फोफावली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग जवळ आले, हे खरे, पण माणसे माणसांपासून दूर गेली, फक्त स्वत:चा, स्वत:पुरता विचार करू लागली. टोकाचे बाजारीकरण, टोकाचा व्यक्तिवाद आणि टोकाच्या जमातवादाला पूरक भूमिका नवे तंत्रज्ञान बजावत आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................  

आज जगणे अधिक सुसह्य, अधिक मुक्त झाल्याचे कितीही गोडवे गायले, तरी पैशाच्या व सुखाच्या मागे धावताना माणसाचे झालेले रोबोकरण लपवता येत नाही. जगण्याला आलेल्या सर्वांगीण बधिरतेमुळे, आधारशून्यतेमुळे माणूसपण हतबल झाल्याचे वास्तव आभासीकरणाला जवळ करत आहे. माणूसपणाच्या या शुष्क झालेल्या किंवा गोठलेल्या अवस्थेला ही कादंबरी स्पर्श करते. नव्या आभासी जगण्याची चित्राकृती ही कादंबरी रेखाटते. मराठी कादंबरीत नव्या फाँर्ममध्ये आलेली ही कादंबरी भन्नाट नवीन नवीन कथनाचे आकृतीबंधाचे बंधाचे प्रयोग आणते. जे ‘पिपिलिका’पेक्षा वेगळे आणि स्वतंत्र आहेत.

या कादंबरीचा निवेदक आहे काळ्या उर्फ कॅडी उर्फ काळपुरुष. काळ्या उर्फ कॅडी जिताजागता माणूस असू शकतो. आपल्या निवेदनात तो काळ अधोरेखित करतोय म्हणून त्याला ‘काळपुरुष’ ही संज्ञा लेखकाने दिली असावी. तो काळाचे तुकडे आणतो. त्यावर अभिनयाच्या माध्यमातून भाष्य करत जातो. आधी म्हटल्याप्रमाणे, काळाबाबत अगदी नजीकचा संकेत विषाणूच्या संक्रमणाचा करोनाकाळाचा आहे. जगभरात पसरलेल्या या महामारीमुळे रोजचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे आलेल्या सक्तीच्या रिकामपणाचा संदर्भ या काळाला आहे.

निवेदक कॅडी सांगतोय, “सगळ्या बातम्या नुसत्या मृत्यूचे आकडे दाखवित आहेत. स्पेन, इटली, जर्मनीमध्ये मुडद्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यांना गाडण्यासाठी जागा नाही. माणसे एकटी एकटी आहेत... त्यांच्या प्रेतावर दोन फुले वाहायला किंवा अश्रू ढाळायला कोणीच नाही. हा निराशेचा वारा वातावरणात पसरला आहे. तो माझ्यापर्यंत आला आहे. त्याच्या झुळूकेने माझा मेंदू हॅंग झाला आहे. सगळे जगणे हॅंग झाले आहे...”

जगण्याला आलेल्या या रिकामपणात कॅडी या अ‍ॅपला चिकटला आहे. भोवताली जिवंतपणा हरवला आहे, म्हणून अ‍ॅपच्या आभासी पटलावर तो लाइव्ह होत आहे. कॅडीच्या रिकामपणाला इथे करोनाकाळाचा संदर्भ असला, तरी तो तितकाच मर्यादित नाहीय, त्याहूनही त्याला अस्वस्थ करणारा काळाचा पट मोठा आहे, दीर्घ आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

“आधी मी मैदानावर गाडलेला असायचो, कुणालाही मी हवा असेल तर त्याला मी हमखास ग्राऊंडवर सापडणार. त्यामुळे रेहम्या मला ग्राऊंड पडीक असा म्हणायचा”, असा संदर्भ कॅडीने त्याच्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे त्याच्या रिकामपणाला करोनाकाळाचे तात्कालिक निमित्त आहे, त्याहून त्याचे रिकामपण दीर्घ असल्याचे आणि हे निवेदन जागतिकीकरणोत्तर परिस्थितीशी जोडले असल्याचे लक्षात येते. अनेक काळावर उपहात्मक व तिरकस भाष्य ही कादंबरी करते.

रेहम्या हा कॅडीचा मित्र त्याच्यासारखाच पडीक आहे, दोघे एकमेकांना फॉलो करतात. त्यामुळे दोघे ‘काळमेकर’वर ‘लाईव्ह’ दिसतात. दोघे संवेदनशील आहेत, दोघांवरही या अ‍ॅपचे गारुड असले, तरी आपल्या लाईव्ह सादरीकरणात आपल्या काळाच्या वेदना कधी तिखटपणे, तर कधी उपहासाने प्रकट करण्याइतके ते सजग आहेत. त्यासाठी ते फुगे आख्यानाचा आधार घेतात. हे आख्यान रेहम्याने लिहिले आहे. या फुगे आख्यानात आजच्या काळाला चिमटे आहेत. ते जोरदार रूपकात्मक सटायर आहे.

रेहम्या हा समाजवादी आहे. तो म्हणतो, “आपण लवचीक असायला पाहिजे. मला जे आवडते, पटते ते मी करतो. मी कोणत्याच धर्माचा प्रचार करत नाही. जी जी चांगली तत्त्वे आहेत ती सांगतो, जे मला पटत नाही, त्याला विरोधही करतो.”

सगळे मुसलमान एकसारखे नसतात आणि सगळे हिंदूही एकसारखे नसतात, असे त्याचे मत आहे. पण रेहम्याचे लोक त्याला सतत नावे ठेवत असतात आणि हिंदूंमधले त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत असतात, अशी नोंद निवेदकाने केली आहे. एनआरसीवर प्रतिक्रिया म्हणून धार्मिकदृष्ट्या मूळ उदार असलेल्या रेहम्याने दाढी वाढवली, धार्मिक कार्यक्रमांना जाऊ लागला, मुल्ला-मौलवींना ऐकू लागला पण रूढी-परंपरेत अडकलेल्या या लोकांना कंटाळून त्याने दाढी काढून टाकली आहे, तो पुन्हा उदारवादी भूमिकेकडे वळला आहे, समाजप्रबोधन करू लागला आहे.

करोना संक्रमणामुळे एनआरसीचा मुद्दा मागे पडल्याची नोंद निवेदक करतो, पण रेहम्याच्या संदर्भाने अल्पसंख्य समाजात वाढत चाललेल्या असुरक्षिततेच्या भावनेचे, बहुसंख्य आणि अल्पसंख्य समाजातील वाढत्या अविश्वासाचे, तेढीचे त्याने उभे केलेले दृश्य अस्वस्थ करते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

निवेदकाने एका ठिकाणी अस्मितेची मूलतत्ववादी व्याख्या सांगितली आहे- “आपला विचार पेरला पाहिजे. खोलवर पेरला पाहिजे. त्यासाठी सगळी माध्यमे वापरत चला. प्रत्येक जात वेगळी आहे. प्रत्येक धर्म वेगळा आहे. तुमचा धर्म आणि तुमची जात याचा तुम्हाला अभिमान आहे, यांच्या आड येणारा प्रत्येक माणूस दुर्जन आहे. त्याचे निर्दालन करणे तुमचे कर्तव्य आहे. हीच तुमची अस्मिता आहे.” जात-धर्माच्या अशा प्रकारच्या हिंस्त्र अस्मिता फोफावल्याची विदारक दृश्ये आपण पाहात आहोत.

आपण मानतो की, आज आपण लोकशाहीत आहोत. जगात कोठे कोठे हुकूमशाही सत्ता आहेत, कोठे कोठे लष्करी सत्ता आहेत. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, असे आपण मानतो. पण हासुद्धा एक आभास आहे का? लोकांची सत्ता तर दूरच, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची तरी सत्ता आहे का?  आपले सगळे राजकारण या कंपन्या चालवू लागल्या आहेत.

ही या कादंबरीतील निवेदकाची एक टिप्पणी लक्षणीय आहे. राजकीय पक्ष उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले असल्याची चर्चा आज जगाच्या पाठीवर सगळीकडे ऐकू येते. सत्तेवर कोणीही असो, कॉर्पोरेट कंपन्यांचा त्यावर वरचष्मा असल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. ‘कॉर्पोरेटशाही’ हा एक नवा शब्द उदयाला आला आहे. कॉर्पोरेटशाहीच्या छायेत लोकशाही नांदत असल्याचे दृश्य दारुण आहे. आज नागरिकाची व्याख्या ग्राहक अशी झाली आहे आणि सत्ता विक्रेत्यांची आहे. ‘आज दोनच प्रकारची माणसं अस्तित्वात आहेत. एक विक्रेता आणि दुसरा ग्राहक ही या कादंबरीतील टिप्पणी बोलकी आहे. चित्र कितीही बदलले, तरी समाजातील शोषक व शोषित हे वर्ग कायम आहेत.’ इथे अ‍ॅपवर लाईव्ह येणारा आनंद कांबळे कंपनीचे महाभारत सांगतो -

“मार्केटिंगचे भीष्म प्रतिज्ञा करून विराजमान आहेत सिंहासनावर

आम्ही उपेक्षित सामान्य कर्ज पोटासाठीचे

आमची रुतून बसली आहेत चाके यांच्या सुंदर वेष्टणात... ”

तो शेवटी म्हणतो – ‘सामान्यांचे आंगण हे कंपन्यांचे रणांगण/ अखंड काळ चालत आलेले महाभारत’.

हा आनंद कांबळे समतावादी आहे. झोपडपट्टीत वाढलेला. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा. त्याला समतेसाठी मोर्चा काढायचा आहे, पण करोनामुळे जीवन ठप्प झाल्याने तो अ‍ॅपवर लाईव्ह झाला आहे. तो विषमतेवर बोलत आहे, कॉर्पोरेटशाहीच्या खेळावर बोलत आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

निवेदक म्हणतो, काळमेकर म्हणजे एक पार आहे, त्या पारावर अनेक रिकामटेकडी बसायला येतात. त्या रिकामटेकड्यांमध्ये रेहम्या आहे, निवेदक कॅडी आहे, आनंद कांबळे आहे आणि आणखी पुष्कळजण आहेत. रेहम्या बंधुभावावर बोलतो, कांबळे समतेवर बोलतो, तर एक म्हातारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलतो – ‘नो नीड टू एक्स्प्रेस युवरसेल्फ वुईथ रियल इमोशन्स’.

इमोजींच्या पसाऱ्यात खऱ्या इमोशन्सची गरजच उरलेली नाही! यंत्रं युजर फ्रेंडली झाली आहेत आणि माणसांनी स्वतःला यंत्रस्वाधीन केले आहे. संगणकीय यांत्रिकता आता प्रत्येकात मुरलीय. इतकी की आता हातातला मोबाईल जणू शरीराचा भाग झाला आहे. अ‍ॅपवरील सादरीकरणावर येणाऱ्या अर्थहीन, उथळ, टपोरी प्रतिक्रिया माणूस किती आर्टिफिशियल, यांत्रिक झाला आहे, हे अधोरेखित करतात. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया आपण फेसबूक, ट्विटरवर अनुभवत असतो. अशा प्रतिक्रिया देणारे रोबो असल्याचे निवेदक नोंदवतो, तेव्हा एकतर माणसाचे व्यवहार यंत्रे चालवत असल्याचे किंवा माणसेच बथ्थड यंत्र झाल्याचे ध्वनित होते.

म्हातारा आणि बहुरूपिया हे खरे तर रेहम्या आणि कॅडीच आहेत, जे वेळोवेळी काळावर, जगण्यावर, सत्तेवर, सत्तेच्या खेळावर, खेळात पिचल्या जाणार्या दीनदुबळ्यांवर, सामान्यांवर आणि आणखी कशा कशावर मार्मिक भाष्य करत आहेत. ही या कादंबरीची सशक्त बाजू आहे. त्यातून खूप व्यापक आशय व्यक्त होतो.

मराठीत कादंबरी लेखनाचे जे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, त्यात ‘पिपिलिका मुक्तिधाम’पाठोपाठ प्रकाशित होणाऱ्या बाळासाहेब लबडे यांच्या या कादंबरीचीही नोंद करावी लागेल. भाषिक पातळीवर ही कादंबरी नवी उंची गाठते. कथन, निवेदन आणि सादरीकरण अशा तिहेरी गोफासह अगदी वेगळे असे लाइव्ह दर्शन या कादंबरीत येते.

आजचे विस्कळीत आणि प्रदूषितही सोशो-पोलिटिकल-कल्चरल वातावरण ‘ब्लॅक ह्युमर’च्या अंगाने चिमटीत पकडण्यासाठी असा हटके प्रयोग आवश्यकच म्हटला पाहिजे. ही कादंबरी आजचे आभासी वास्तव मांडत आहे. ही कादंबरी वाचताना जगण्याचा ठोसपणा लयाला जात असल्याची, जगण्याला आलेल्या विसकळीतपणाची, जगण्याच्या कृत्रिमतेची, मूल्यभान लोप पावत चालल्याची जाणीव तीव्रपणे होते, हे तिचे श्रेय म्हटले पाहिजे. मराठी कादंबरीचे नवे वळण म्हणजे ही कादंबरी आहे.

आशयाभिव्यक्तिचे अनेक प्रकारचे संसूचन वाचकांपुढे निर्माण करणारी ही कलाकृती नव्या शैलीला साकार करणारी आहे. नव्या समीक्षापद्धतीची मागणी ही कलाकृती करते.

‘ ‘काळ’मेकर लाइव्ह’ - बाळासाहेब लबडे

पद्मगंधा प्रकाशन, पुणे | पाने – २९६ | मूल्य – ५५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक मनोहर सोनवणे साहित्यिक व संपादक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......