अजूनकाही
ललितलेखक, कथाकार, अनुवादक व कवी वसंत केशव पाटील यांचा ‘रागविराग’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यात आत्ममुग्ध करणारे काव्य आहे; अभंग, लावण्या आहेत आणि वेदनेच्या विराण्या आहेत.
झाडावरून उडालेला पक्षी पुन्हा त्याच झाडावर येतो, तसंच वसंत केशवांची कविता आकाशात भरारी मारून पुन्हा वाचकाच्या मन:पटलावर येऊन थांबते, जागवते आणि अस्वस्थही करते. निसर्गाच्या सौंदर्याने या कवीच्या मनाला भारावून टाकले आहे. त्यांची कल्पकता निसर्गाच्या आत, खोलवर शिरते आणि निसर्गाची लय वेटाळून घेत काही कवितेच्या ओळी कागदावर सहज उमटवतात-
‘काळोखाचे मोर किती त्यांच्या लाख लाख चंचू
झाडांमाजी लपूनिया चांदण्याचे पिती पाचू’
जसे वसंत ऋतुच्या सौंदर्य वर्णनाशिवाय निसर्गाचे वर्णन अपूर्ण आहे, तसेच स्त्रीसौंदर्याचे वर्णन व शृंगाराशिवाय काव्य अपूर्ण वाटते. या संग्रहातल्या काही शृंगारप्रधान कवितेत शृंगार किती कोमलतेने अवतरतो पाहा -
‘तनूधनूच्या हिंदोळ्यावर
गालांवरच्या गोड खळ्यांवर
मुक्या जाहल्या कितीक गझला’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
तनूधनूच्या हिंदोळ्यावर झुलण्याआधी प्रेयसीला नवसृजनाची एक ओढ आहे. ती प्रियकराला म्हणते-
‘सूर्य होण्याआधी
मला तुझे अंधार बोट लावू नकोस
आभाळभर सूर्य होऊन ये
मलाही मग धरित्रीचे बळ येईल
तुझ्या माझ्या सुवर्णगर्भाला
आभाळपुत्राचे फळ येईल’
एका लावणीतून रगेल, रंगेल आणि धीट अशा काही ओळी सहज उतरतात. अत्यंत काव्यमय झालेल्या या लावणीत शृंगार, प्रेमाची उत्कटता जाणवते.
‘अवघड बाका बुलंद गड तुझा
टंच भरदार भारी फड तुझा ||धृ ||
सांग हवा तुज कोण गडकरी
मिठीत येता मिटे नड खरी
चल माडीवर, पाहू गड तुझा’
परंतु वसंत केशव हे मुख्यतः वास्तवाचे भान असणारे, अंतर्मनाशी संवाद साधणारे कवी आहेत. त्यांच्या काव्यात एकीकडे प्रेम, उत्साह आहे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक दुःख आहे. एका बाजूला आत्मपरीक्षण आहे, तर दुसऱ्या बाजूला सभोवताली घडत असलेल्या विदारक परिस्थितीचे निरीक्षण आहे, त्याविषयीची चीड आहे. समाजातील शोषितांविषयी वसंत केशव यांच्या अंतरंगात कणव आहे. ते म्हणतात-
‘जात्यात ना मोती / सुपातही माती
मायेच्या लेकीला / नाही कण्या दाती
घामाला ना कुठले मोती / तोंडात रोज पडते माती...’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
वर्तमान, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विसंगतीवर कवी नेमकेपणाने बोट ठेवतात. माणसातील अंधश्रद्धेवर ते थेट परखड शब्दांत हल्ले चढवतात. उदाहरणार्थ -
‘देवळात आता । नाही कुणी त्राता ।
नसे माय -पिता । देवालाही ॥
हातामध्ये टाळ । गळ्यामध्ये माळ ।
मनाचे आभाळ । कोरडेचि ॥’
या संग्रहातील एका लावणीतून कवी नकळत मानवी शरीराच्या नश्वरतेविषयी सूचकपणे सांगून
जातात-
‘अंगसंग हा तुला प्रियकर
तांडव झडते रातरातभर
आणिक झरली अस्थिपंजर काया’
वसंत केशव यांच्या गझलेत एक प्रकारची विशिष्ट लय आणि काव्यात्मकता दिसून येते.
‘अद्याप त्या फुलांचा ताजा सुवास आहे
त्या रंगल्या विड्यांचा कंठास फास आहे’
किंवा
‘नक्षीत गोंदलेला भेटेल रानपक्षी
ही सावली उन्हाची लावून आस आहे.’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
कविता व अन्य ललितलेखनाच्या आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन यांत लेखक, कवीच्या जगण्यातील व्यक्तिगत संदर्भ शोधू नयेत, असा संकेत आहे. नकळत्या वयात वडिलांचे जाणे आणि कळत्या वयात तरुण मुलगा गमावणे, हे आघात वसंत केशव यांनी कसे सहन केले असतील?
गझलेने दुःख सहन करण्याची अपार क्षमता, अभावातही जगण्याची ऊर्जा आणि एकाकीपणाची नशा बहाल केली आहे, असे ते एका ठिकाणी म्हणतात. ते मातृशोकाने, पुत्रशोकाने आणि पत्नीच्या निधनाने कदाचित उन्मळून पडले नसतील, असं वरपांगी म्हणता येईल. परंतु त्यांच्यासारख्या संवेदनशील, प्रतिभावंताच्या कवितेतून त्यांच्या अंतरंगातील ती सल, ते दुःख कुठेतरी प्रकट होतेच. अर्थात या प्रकटीकरणावरही त्यांच्या सृजनशील प्रतिभेने कल्पिताचे संस्कार आपसूकच होतात.
ज्यांना पाहिले नाही आणि पाहूही शकणार नाही, अशा बापाविषयी ते व्याकूळ होऊन लिहितात,
‘कुठे असे तो वसे कुठे तो कुणी पाहिले त्याला
तो ना भेटे कळते तरीही देव देवासारखा
इथे कुणाचे कुणीच नसते असते आणीबाणी
आठवतो मग आभाळातील बाप बापासारखा’
अपघातात मुलाचा झालेला शेवट आणि त्या दुःखाची सल एका गझलेत, तत्त्वज्ञानाच्या अंगाने ‘अंतरा’ बनून येते -
‘जो आला तो गेला इथुनी डाव मोडुनी सारा
ताटामधला तसाच पडला घास सोन्यासारखा’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आईचे कायमचे निघून जाण्यामुळे स्वत:ला आलेलं पोरकेपण आणि रिक्त झालेली पोकळी, हे कळण्यासाठी पाटा-वरवंट्यासारख्या निर्जीव वस्तूंसोबतच दीनवाण्या आंधळ्या चिमणीचीदेखील झालेली अगतिकता दर्शवत कवी आपल्यासमोर एक चित्र उभे करतात -
‘ताटीपासचा रांजण टाकभर पाण्यात जीव देऊन कधीच मोकळा झालाय
काटवट, पाटा-वरवंटा, वाटी ताटली सारी
जीव जात नाही म्हणून बुबळं फिरवत
दीनवाणी झालीयेत आढ्याकडं बघत
वायलापासची आंधळी चिमणी कधीच
पासली पडलीय चुलीतल्या राखेत’
आईच्या आठवणीने ते गलबलून जातात-
‘कुणी यशोदा कुणी देवकी
जीव आईचा उलतो फुलतो
कान्हा रडतो यमुनाकाठी
पाझर डोळां, आठव येतो’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
पत्नीच्या निधनानंतर आपली सल व्यक्त करताना ते म्हणतात -
‘आज वेचितो नक्षत्रे मी
परी न दिसशी नभी परंतू
कालपटावर नावापुरता
उरलो आता जर्जर जंतू
आठवते जे कां न आठवू
जरी गगनचर तव रावा मी
यावे म्हणतो भेटायाला
आभाळातील तुज गावा मी
मनातल्या मनात ती थिजून रात काजळी
अजून वाट पाहते कळी मिटून पाकळी’
उपरोक्त ओळींतून वसंत केशव यांची राग (आसक्ती) दिसून येते तर-
‘पूर आला महापूर आला कशासाठी बडवा ऊर
आला तर येऊ द्या ना ब-याच काळज्या दूर होतील’
या ओळीतून विराग (विरक्ती) जाणवत राहते.
या काव्यसंग्रहात ‘डंबर’, ‘तुळव’, ‘पुळण’, ‘ताजवा’, ‘निकी’, ‘निका फडकरी’, ‘झडकरी’, ‘प्रमाथी’, ‘पाखळ’, ‘वाणतिणीचा’, ‘पऱ्हा’, ‘आबादानी’ असे अनेक हरवलेले मराठी शब्द भेटतात. इतके दिवस हे शब्द कुठे हरवले होते, याचे मलाच ‘हुमान’ (कोडे) पडले होते.
डॉ. विलास पाटील सरांनी या कवितांचे संकलन, संपादन करून लिहिलेला उपोद्घात म्हणजे एक उत्तम रसग्रहण म्हणता येईल. हा काव्यसंग्रह म्हणजे एका अर्थाने वसंत केशव यांच्या सुदीर्घ कवी जीवनाच्या सार्थकतेचं एक प्रमाण म्हणता येईल. सुंदर मुखपृष्ठ, आकर्षक छपाई आणि उत्कृष्ट बांधणी यामुळे हा काव्यसंग्रह अतिशय देखणा झाला आहे.
‘रागविराग’ - वसंत केशव पाटील
वर्णमुद्रा पब्लिकेशन्स, शेगांव \ पाने - २१८ \ मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment