अजूनकाही
तरुण लेखक आणि मानववंशशास्त्राचे अभ्यासक राहुल बनसोडे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना पाचेक वर्षांपूर्वी हेमंत कर्णिक यांच्या ‘अध्यात-मध्यात’ या पुस्तकाचं ‘अक्षरनामा’साठी परीक्षण लिहायला सांगितलं होतं. त्यांनी लिहायला सुरुवातही केली. पण नंतर ते त्यांच्याकडून या ना त्या कारणानं पूर्ण करायचं राहून गेलं. दरम्यानच्या काळात या परीक्षणाविषयी त्यांच्याशी फोनवर काही वेळा सविस्तर बोलणंही झालं. ते पुढे काय काय लिहिणार आहेत, हेही त्यांनी सांगितलं. अवांतर गप्पाही खूप झाल्या, पण दुर्दैवानं हे परीक्षण काही त्यांच्याकडून पूर्ण झालं नाही. तेच हे अपूर्ण परीक्षण... या मजकुरातून त्यांच्या व्यासंगाचं, औरस-चौरस अभ्यासाचं, नर्मविनोदीपणाचं आणि अचूक निरीक्षणांचं काही प्रमाणात दर्शन घडतं... म्हणून ते प्रकाशित करत आहोत... - संपादक
.................................................................................................................................................................
१९९९ ते २००१ हा काळ नवभांडवलशाहीचा राजमार्ग स्वीकारलेल्या देशांसाठी वेगळा होता. ‘मिलेनियम चेंज’ आणि ‘वायटुके’च्या मुद्द्यांवर काही लोक वैचारिक परिप्रेक्ष्यात विचार वा उपभोग वा दोन्ही अनुभवत होते. मराठी साहित्याच्या एका क्षेत्रात मरगळ आली होती, तर एका क्षेत्रात अभूतपूर्व प्रयोग होत होते. नव्याने न्यूज चॅनेल्स दाखल होत होती आणि ‘एनडीटीव्ही’सारख्या संस्था पत्रकारितेत नवी उंची गाठू पाहत होत्या, तर ‘आज तक’सारख्या वाहिन्या पत्रकारितेत शुद्ध धंदेवाईकपणाचे प्रयोग करत होत्या. संगणक इंटरनेट आणि नवीन रंगित छपाईतंत्रामुळे वृत्तपत्रांची काही अंगे अतिविकसित होत होती, तर वृत्तपत्रांवर असलेली ब्राह्मणी वर्चस्वाची समस्या काही ठिकाणी अतिगंभीर होत होती.
किरण कर्णिकांनी डिस्कवरी चॅनेलच्या माध्यमातून अफाट ज्ञानाचा महासागर भारतीय भाषांत आणून एका वर्गाला नव्या विचारक्रांतीसाठी प्रेरित केले होते, तर ‘फॉरवर्डेड इमेल्स’ तंत्राचा वापर करून काही संघटना ‘लव्ह-जिहाद’चा नव्याने प्रचार करत होत्या. या संघटनांनी आंतर्देशीय पत्रांचा, टाईपराईटरचे तंत्र उपलब्ध झाल्यानंतर त्याचा आणि सायकलोस्टाईल तंत्र उपलब्ध झाल्यानंतर त्याचाही आपल्या प्रचारासाठी प्रभावी वापर करून घेतला होता. या संघटनांचा कंटेट हा आपापसांतल्या मर्यादित परिप्रेक्ष्यात असला तरी तो भविष्यातल्या संभाव्य समर्थकांकडेही पोहचवण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यातून क्वचित नवे समर्थक जसे जोडले जात होते, तसेच नवे विरोधकही तयार होत होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
काळाच्या या परिघावर ‘महानगर’ नावाचे सायंदैनिक मुंबईतून प्रसिद्ध होत असे. तसे ते दुपारूनच उपलब्ध असले तरी ऑफिस सुटेपर्यंत त्याची खरेदी जास्त होत नसे. एखाद्याने ‘लंच अवर’मध्येच ‘महानगर’ विकत घेतले, तर त्यात छापून आलेल्या गोष्टींच्या उलटसुलट चर्चा संध्याकाळी घरी परतताना, अर्धभूकेच्या वेळी सँडवीच वा भेळ खाताना आणि संध्याकाळचा पहिला चहा घेताना होत असत. या चर्चांमधून ‘महानगर’मधले काही लेख व्हायरल होत असत.
‘महानगर’ हे वृत्तपत्र असले तरी त्या काळच्या प्रस्थापित वृत्तपत्रांना पर्याय म्हणून पाहण्याऐवजी ते थेट वेगळे माध्यमच होते, असे म्हणता येईल. समाजातल्या एका वर्गाचा ‘महानगर’कडे पाहण्याचा दृष्टीकोन तुच्छतेचा किंवा दुर्लक्षितपणाचा होता, तर काहींना हे दैनिक म्हणजे नवीन क्रांतीच आहे की काय, असेही वाटत होते.
भांडवलशाहीचे चांगले बदल आसपास दिसू लागले होते आणि एकुणच अगोदर न उपभोगलेली काही सुखे- उदा, नियमित कोल्ड्रिंक पिणे, इंग्रजी पुस्तके वाचणे, सिनेमे पाहणे, हॉटेलात जेवणे, अशा गोष्टी मध्यमवर्गीय लोक वरचेवर करू लागले होते.
‘महानगर’मध्ये या काळाच्या आसपास हेमंत कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘अध्यात आणि मध्यात’ या नावाने सदामंगल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या लेखसंग्रहाचे समीक्षण करताना मी हेमंत कर्णिक यांच्या परिचयातील आहे, एकमेकांना माणूस म्हणून आम्ही फारसे ओळखत नसलो, तरी वर्षातून एक-दोनदा आमच्यात रोटी आणि मद्यव्यवहार होत असतो. आणि या काळात आम्ही एकमेकांशी टोकाची भांडणेही करत असतो, हे ‘डिस्क्लेमर’ इथे टाकायला हवे.
साहित्यिक राजकारणाच्या दृष्टीने मला कर्णिकांची भविष्यात काहीतरी गरज भासू शकते, म्हणून त्यांच्या पुस्तकाविषयी सांभाळून बोलावे, असा संकेत मात्र मी पाळणार नाही. हेमंत कर्णिकांचा मेंदू सोळा वर्षाच्या मुलांसारखा चालतो, हे वाक्य मी त्यांना अधूनमधून ऐकवत असतो. इथे मला अपेक्षित असलेला सोळा वर्षांचा मुलगा हा एकाच वेळी अधाशासारखे वाचन करणारा, तल्लख बुद्धीचा, व्यवहारज्ञानाने बुद्धीवर गंज न चढलेला म्हणून ताजातवाना असा वाटतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
त्याच वेळी तो काही गोष्टींचे अजिबात आकलन नसणारा, उत्साहीपणामुळे कधी कधी उथळपणा करून अपमान ओढवून घेणारा आणि मेंदूतल्या संप्रेरकांच्या अतिप्रभावाखाली असणाराही वाटतो. हे अर्थात तीन वर्षांपूर्वीचे मत आहे आणि पुढच्या भेटीत हेमंत कर्णिक हे साठी-सत्तरीतले ज्येष्ठ लेखक आहेत, अनुभवाने प्रचंड प्रगल्भ आहेत, त्यांच्यात अहंपणाचा लवलेशही नाही, या निष्कर्षाप्रत येण्यास मी तयार आहे. कधीकधी चर्चेत माझ्या संघातल्या शाळेतल्या वर्गशिक्षकांप्रमाणेच माझ्यावर डाफरण्यांच्या त्यांच्या सवयीमुळे मला त्यांच्याबद्दल कसलीही सहानुभूती न उरण्याच्या शक्यतेवरही मी येऊ शकतो.
याशिवाय बदलत्या काळात ज्ञानाच्या वेगासोबत अपडेट न होऊ शकलेल्या, बौद्धिकदृष्ट्या निरुपयोगी नववृद्धविचारवंतांमध्ये त्यांचेही नाव घ्यावे लागल्यास, मी ते आनंदाने घेईन, तसे नसले तरी ते व्यक्तीगत आकसातून त्यांना हर्ट करायचे असेल, तर ती संधी मी कदाचित सोडणार नाही.
इतकी मोठे ‘डिस्क्लेमर’ देण्याचे अनेक फायदे आणि तोटे आहेत, पण समीक्षण हे वृत्तपत्रासाठी नसून इंटरनेटसाठी आहे, त्यामुळे प्रिंटचे काही नियम इथे डावलून मला हे ‘डिस्क्लेमर’ देता येते आहे.
या पुस्तकाची सुरुवात ‘टाय लावून खोटं बोलतात’ या एका लेखाने होते. या लेखात काय आहे, ते न सांगता पहिल्या लेखातूनच लेखकाची समाजाविषयीची नजर पुर्वग्रहदूषित नसून प्रचंड कुतूहलतेची आहे आणि त्याला चौकस बुद्धीने भिडण्याचीही आहे. यासाठी कर्णिक स्वतःला कन्फ्युजनच्या जाळ्यातही ढकलतात, पण हे कन्फ्युजन बरेचसे शास्त्रीय शोधांच्या गृहितकांच्या अंगाने जाते आणि त्यात शेवटी लेखकाला सापडलेला तर्क, निष्कर्ष वा संवेदना वाचकांनाही सारख्याच पातळीवर सुखावतात.
एका अर्थाने हेमंत कर्णिक वाचकांना शहाजोगपणा शिकवण्याऐवजी त्याच्यासोबतच प्रश्नांच्या प्रवासाला निघतात आणि शेवटच्या तथ्यावर पोहचल्यानंतर स्वतःला सत्य गवसल्यानंतरचा मिळालेला आनंद वाचकांशीही त्याच पातळीवर शेअर करतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
हे असे असले तरी त्यासाठी विचार करण्याचा कर्णिकांचा परिप्रेक्ष्य हा एका निश्चित परिघात आहे. श्याम मनोहरांसारखे प्रथमदर्शनी अतर्क्य वाटणारे प्रश्नच हेमंत कर्णिकांना पडत नाहीत, निदान या लेखांमध्ये तरी ते पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे कर्णिकांच्या लेखनाला साचेबद्धता आली आहे, असे मात्र थेट म्हणता येणार नाही. ती का येत नसावी, हा खरा तर मलाही पडलेला प्रश्नच आहे. विषयविचारांची किमान व कमाल बाह्यमर्यादा बरीचशी स्पष्ट असल्याने लेखसंग्रह असूनही तो अघळपघळ झालेला नाही. कॉलम चालवलेल्या अनेक लेखकांचे स्वतंत्र लेख प्रचंड प्रभावी असले, तरी त्यांचा संग्रह होताना त्यात कुठलाही मध्यम धागा वा बेस न सापडल्याने लेखसंग्रह सपशेल फसल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. ‘अध्यात-मध्यात’ला हा शाप भोगावा लागत नाही आणि त्यामुळेच व्यक्ती म्हणूनही कदाचित कर्णिकांनाही हा शाप भोगावा लागत नसावा.
पुस्तकातल्या पहिल्या लेखाचे जसे विवेचन केले, त्याच तंत्राने प्रत्येक लेखाचे विवेचन केले जाऊ शकते, परंतु ते समीक्षेच्या दृष्टीने प्रभावहीन होईल आणि कदाचित त्यामुळे हा लेखच फ्लॉप जाईल. याशिवाय आपल्याकडे वृत्तपत्रीय लेखसंग्रहांचे फारसे समीक्षण झालेले नाही आणि जेव्हा केव्हा ते झाले, तेव्हा ते समीक्षकांच्या इतर समीक्षकी अनुभवांच्या आधारावर झाले.
‘अध्यात-मध्यात’च्या निमित्ताने वृत्तपत्रीय लेखसंग्रहाची नवीन पद्धती विकसित केली जाऊ शकते, इतपत हे पुस्तक ‘सिस्टमॅटिक’ आहे. संग्रहात पुढे आलेले पाच लेख हे सहस्त्रक बदलताना देशभरात नव्याने फोफावलेल्या पुनरुज्जीवनवाद, विखारी राष्ट्रवाद, धार्मिक वितुष्ट आणण्याचे प्रयत्न, सरंजामशाहीचा वृथा जयजकार या गोष्टींवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात.
इथे महत्त्वाची विचारात घेण्याची गोष्ट म्हणजे हे लेख दैनिकात छापून येत होते आणि ते सभोवतालच्या परिस्थितीवर तत्कालीन प्रतिक्रिया म्हणून लिहिले गेले होते. दुर्दैवाने यात नोंदवलेले सर्व आक्षेप आणि सर्व चिंता या गेल्या पाच वर्षांत दहापट वेगाने फोफावल्या. हे असे कसे झाले? याचे आश्चर्य कर्णिकांनाही वाटत असावे, पण सभोवतली वाढलेल्या विखारी राष्ट्रवाद आणि अडाणचोटपणाची प्रारंभिक मुळे कुठे होती आणि ती कुणाला दिसली होती का, यासंदर्भात हे लेख विचारात घ्यावेच लागतील.
यातील काही मुद्दे समकालीनतेशी इतके जवळचे आहेत की, ‘काळी जीभ’ असणार्या लोकांचे म्हणणे नेहमी खरे होते, अशा आपल्याकडे असलेल्या एका अंधश्रद्धेच्या धरतीवर हेमंत कर्णिक ‘काळी लेखणी’ वापरतात काय, असे विचारावेसे वाटते. सध्या काही निवडक विचारी माणसांच्या पुरोगामी भासणार्या लिखाणाची आद्यबिजे या चार-पाच लेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच अर्थाने ‘महानगर’ हे दैनिक म्हणून न पाहता माध्यम म्हणून का पहावे, याची परिणती मिळते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
यानंतरचा पुढचा सेट लेखकाची पर्यावरण आणि इतर समस्यांमुळे मानवजातीला असलेले संभाव्य धोके यांविषयाच्या वाटणार्या काळजीवर केंद्रित झाला आहे. यात ज्या समस्यांचा उहापोह केला आहे, त्या समस्या आज सर्वांत प्रखर झाल्या असून लेखकाला कधीकाळी वाटणारी चिंता आज एक अटळ सत्य बनू पाहते आहे.
या लेखनाला लेखकाची दूरदृष्टीता मात्र म्हणता येणार नाही, कारण त्या काळात जगाच्या पर्यावरणाविषयी इंग्रजी माध्यमांत बरेच काही छापून येत असे. त्यामुळे ही माहिती जाणता वा अजाणता लेखाच्या काळजीच्या सुराचे मुख्य कारण बनली असावी. तरीही दोन हजार साली कुणीतरी पर्यावरणांच्या समस्यांकडे आणि त्याविषयी माध्यमात छापून येणार्या बारीकसारीक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष ठेवून होते, ही बाब चांगलीच आहे.
या प्रश्नांकडे असेच लक्ष इतर लेखकांनी दिले असते आणि असे लिखाण छापून येत असताना त्याविषयी सरकारने उपाययोजना केल्या असत्या, तर कदाचित आजची भयाण परिस्थीती टाळताही आली असती. दुर्दैवाने पर्यावरणाबाबतीत लोक आज पहिल्यापेक्षाही जास्त निरुत्साही आहेत आणि माध्यमे आजही या विषयावर जास्त बोलत नाहीत.
(अपूर्ण)
.................................................................................................................................................................
‘अध्यात-मध्यात’ - हेमंत कर्णिक
सदामंगल पब्लिकेशन, मुंबई, मूल्य - २२५ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4262
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment