तरुण कवी नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या संग्रहाला नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचा २०२१ सालासाठीचा ‘विशाखा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या संग्रहाला प्रा. डॉ. भरतसिंग पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या कवितासंग्रहातील कवितांमध्ये ‘पुरुष-स्त्री’, ‘मालक-मजूर’, ‘नागर-अनागर’ असा द्वंद्वात्मक आंतरिक संघर्ष आढळून येतो. हा संघर्ष ‘कुटुंब’, ‘गाव’ आणि ‘नगर-महानगर’, अशा तीन स्तरांमध्ये सामावलेला असून, ही स्तरे एकात एक असलेली अनुबंधीय आंतर्वर्तुळे आहेत असे वाटते. या वर्तुळ प्रभावांतून घडत असलेला कवीचा प्रवास हा एकप्रकारे त्याच्या जाणीवेचा, संस्कृती संचित व त्यांच्या प्रभावांचा चिकित्सिक पुर्नशोध ठरावा.
आंतर्वर्तुळ - ‘कुटुंब’: माय-बाप-पुत्र अनुबंध
मानवी समाजव्यवस्थेच्या वाटचालीत विभिन्न स्तरांवरचे शोषण अधोरेखित झालेले दिसून येते. यात कवी सामाजिक स्तरांतील शोषणाचे ‘एकक’ म्हणून ‘कुटुंब’ घेत, त्यांतील द्वंद्वात्मक स्वरूपातील शोषणाची पाळेमुळे या ‘एकक’ व्यवस्थेतून शोधू लागतो.
या कवितांमध्ये ‘कुटुंब’ या आंतर्वर्तुळात स्त्रीरूप आणि पुरुषरूप हे आई-बाप स्तरावर आविष्कृत झालेले दिसून येतात. ‘माय-बाप’ म्हणून कवी त्यांना सनातन ‘पुरुष’ आणि सनातन ‘स्त्री’ अशा द्वंद्वात्मक मूल्यभावातून त्रयस्तपणे तपासून पाहतो. म्हणून ‘माय’, ‘बाप’ आणि त्यांची अनुभूती घेणारा कवितागत ‘पुत्र’, असे तीन शिरोबिंदू असणारा त्रिकोण, ‘कुटुंब’ या वर्तुळात दृश्यमान झालेला दिसून येतो. त्यातून ‘माय-बाप’, ‘बाप-पुत्र’ आणि ‘माय-पुत्र’ असे अनुबंध दिसून येतात.
लग्नात आंदणरूपी वस्तू कायमस्वरूपी ‘वर’ पुरुषाला भोगावयास दिल्या जातात, तर वधूपिताही लग्नविधीच्या रूपात या वरास आपली कन्या ‘दान’च करत असतो. तेव्हा भोगवस्तू म्हणून आंदण, आणि तशीच भोगवस्तू म्हणून ‘माय’, यांतील समरूपता दर्शवण्यामागे स्त्री-पुरुष शारीरिकसंबंधांना मान्यता देणारी ‘भारतीय विवाह’ नावाची व्यवस्था जरी असली, तरी परंपरेने त्यात स्त्रीला कायमच दुय्यमत्वाचा, ‘वस्तूरूपाचा’ दर्जा बहाल केल्याचा दाह आणि अशा व्यवस्थेचा दांभिकपणा या पुत्राला दिसून येतो.
कारण पुढे या व्यवस्थेने जी ‘कुटुंब’ नावाची संस्था जन्माला घातलेली असते, तिच्या वाटचालीचा हा पुत्र सर्वसाक्षी असल्याने, त्याला ‘माय सदा खुंट्यावर बांधलेलं गरीब जित्राब’ वाटू लागते. मग ‘माय दारूड्या नवऱ्यानं हासडलेली झणझणीत शिवी’ ठरते!
रांधा, वाढा, उष्टी काढा, नवऱ्याचा भोग, पोरांचा जन्म, त्यांचे संगोपण ही जन्मजात कार्ये तर आहेतच, पण कुटुंबाच्या आर्थिक भारात मोलाचा वाटा उलचणारी मायच असते. म्हणून या पुत्राला ‘माय घराच्या भारानं वाकलेली कर्दळ ठूणी’ वाटते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘आई’ म्हणून या स्त्री व्यक्तीचा एकूणच जीवनसंदर्भ, ‘बाप’ नावाच्या पुरुष व्यक्तीशी जरी हा पुत्र ‘विळा-भोपळ्या’चे नाते या अर्थाने विश्लेषीत करत असला, तरी त्या दोघांतील भावसंलग्नतेचे अद्वैत भान या निवेदक पुत्राला नक्कीच आहे. म्हणून ‘विळा’ या कवितेत तो म्हणतो -
‘या विळ्याचं
जन्मभराचं नातं आहे मायशी
ओल्या सुक्या दिवसांत
त्याने इमानदारीनं साथ दिली…’
‘माय-बाप’ अनुबंधातील पुरुष आणि स्त्री या द्वंद्वामध्ये विषममूल्यभावाची कवीची जाणीव प्रखरपणे अभिव्यक्त झालेली असूनही, ‘माय’च्या या दु:खाला शोषक ‘बाप’ कारणीभूत आहे, असे जरी पुत्राला दिसत असले, तरी हा ‘बाप’च आईच्या दु:खाला कारणीभूत आहे, असे मात्र त्याला वाटत नाही. म्हणजेच हा पुत्र बापाला पूर्णत: दोषी न मानता त्याच्या माध्यमातून जी व्यवस्था याला कारणीभूत ठरते, तिचे अधोरेखन करून देत आहे, असे वाटते.
मग कवी अशा कोणत्या व्यवस्थेचा अप्रत्यक्ष निर्देश उपस्थित करत आहे? त्याचे यथार्थ दर्शन ‘लवकरच पाऊस येईल म्हणून’ या कवितेत घडून येते. भारतीय कृषीजीवनात पाऊस हा घटक अविभाज्य असल्याने तो त्यांच्या जीवनात जसा सुखदायक आहे, तसा दु:खदायकही आहे. त्याचे मूल्य कृषिसंस्कृतीच्या रोजीरोटीशी निगडित आहे. याचे जन्मजात भान या पुत्राला असल्याने त्याचे तो मार्मिक अन्वेषण करतो.
या कवितेत निसर्गाच्या बदलत्या अवस्थेचे कवितागत आई, बाप अन् निवेदक या तीन स्तरांवरच्या मानवी जीवांना भावलेले संकेत त्यांच्या भाव अवस्थेनुसार अभिव्यक्त झालेले आहेत.
बाप-पुत्र अनुबंध
मानवी सामाजिकरणाला रूढी-परंपरेचे अधिष्ठान लाभलेले आहे. आणि ही पुरुषी वर्चस्वाची परंपरा कुटुंब वर्तुळात अधोरेखित करत असताना कवी जरी ‘माय’ची तळी उचलत असला, तरी ‘बाप’ नावाच्या व्यवस्थेचे खरे स्वरूप नवसंज्ञेने त्याला समजलेले असल्याने बापाविषयीचा त्याचा कळवळाही अधोरेखित होतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
परंपरेचे गुराखीपण रक्ताच असल्याचे ‘ढोरांशी बनलंय बापाचं घट्ट नातं’ हे या पुत्राला तोही त्याचाच उत्तराधिकारी असल्याने मनोमनी उमगतं. परंतु, “आयुष्याच्या शेवटच्या काळातही बाप घरी आरामात बसत नाही, भल्या पहाटे गडाय काठी अन् विळा घेऊन निघून जातो रानात”, याची या पुत्राला तगमग तर आहेच, पण त्यासोबत मन व्याकूळ करणारे बापाचे नि:सत्व होत जाणेही आहे! कारण बाप हरवलेली गाय, चुकार वासरू, उनाड गोऱ्हा, कधी व्यालेल्या म्हशीच्या कायम शोधात आहे. परंतु त्याला कुठेच कोणतंच जित्राब सापडत नाही. असे असले तरी सवयीने आपला बाप -
‘… गावखोरीच्या लवणातून
गवताचा भारा आणायला कधीच विसरत नाही
गोठ्यात एकही ढोर
शिल्लक नाही तरीही’ (‘ढोरांशी बनलंय बापाचं घट्ट नातं’)
तेव्हा कवीला प्रश्न पडतो की, उभे आयुष्य ज्यासाठी खर्ची पडले, ज्या परंपरेचे गाठोडे खांद्यावर घेत अभिमानाने मिरवले, त्याचे फलित हेच ते काय?
‘आज बाप
जत्रेत हरवलेल्या पोरासारखा
भटकतो वणवण, शोधतो घर
भरलेला वाडा-गोठा…
जीव गुदमरतो त्याचा
गोठ्यातले सुने खुंटे पाहून…’ (‘सुने खुंट’)
कधी काळी या बापाच्या गोठ्यात गाई, बैलं होती व कुटुंबाच्या पोषणासाठी शेतीही होती, याचे मार्मिक असे अप्रत्यक्ष सूचन या कवितेतून घडते. त्यासोबतच आता गोठ्यात एकही ढोर नाही, पर्यायाने शेतीही नाही अशी बिकट परिस्थिती बापाच्या कुटुंबाची आहे. म्हणून उदरनिर्वाहासाठी माय शेतमजुरी अन् बाप गावातली गुरे वळवतो.
या बिकटतेला दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी ही कालिक कारणे सांगता येतील. परंतु या पुत्राच्या तटस्थ निवेदनातून हजारो वर्षांची परंपरा पाठीशी घेऊन स्त्रियांचा, पशुधनाचा आणि शेतीचा स्वामी असलेला हा पुरुषरूपी बाप, त्याची ही अवस्था अशी कशी झाली, त्याला कोणती व्यवस्था कारणीभूत आहे, असे प्रश्न अदृश्यपणे उभे राहतात. ते कवितेला कलात्मक उंची प्राप्त करून देतात, असे वाटते.
माय-पुत्र अनुबंध
मानवी भावसंबंधांच्या बळकट आधारावर समाज उभा आहे. त्यातील जन्म देणारी आई आणि जन्म घेणारे मूल, हा भावबंध समस्त विश्वाचा मूलाधार आहे. या संग्रहातील एकूणच कवितांचा विचार करता त्यातील ‘माय’विषयीचा जो भावबंध अभिव्यक्त झाला आहे, तो अदृश्यपणे जैविक अंगानेही समांतरपणे आविष्कृत झालेला दिसून येतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘माय’, ‘लवकरच पाऊस येणार आहे’, ‘गवरीची राख’, ‘विळा’, ‘आभाळ’, ‘मी पाऊस आणि माय’, ‘सुखाचं मरण’ या कवितांतून लावणी, पेरणी, निंदणी, कापणी या सारखी कृषीकर्म करून, हलाखीच्या परिस्थितीमुळे पतीच्या संसाराला हातभार लावत, रोजंदारीवर आपल्या कुटुंबाची भूक भागवणारी माय साक्षात होत जाते.
असा हा संवेदनशील पुत्र या मायच्या मनाशी इतका तादात्म्य पावलेला आहे की, त्याच्या जन्मापासून ते या वर्तमान क्षणापर्यंत आईचा जीवघेणा जन्मभोग पाहता, तिच्या सुखाचा विचार करता, त्याच्या मनात एक भीषण विचार येतो – आईचा मृत्यूच हा तिच्या सुखाचा क्षण! सर्वकष दु:खाचा शेवट!!
‘कण्हत कण्हत
तिचं मन मात्र निघून जातं हळुवार
सरणापर्यंत
सुखाचं मरण शोधत’ (‘सुखाचं मरण’)
मध्य वर्तुळ – ‘गाव’ : शेतमालक-शेतमजूर
या संग्रहातील कवितांमध्ये शोषणाच्या ‘गाव’ या मध्यवर्तुळात ‘शेतमालक’ आणि ‘शेतमजूर’ या द्वंद्वांतील आंतरिक संघर्ष प्रामुख्याने आर्थिक स्तरावर आविष्कृत झालेला दिसून येतो. त्यातील शोषक आणि शोषित असा द्वंद्वात्मक मूल्यभाव त्रयस्तपणे कवी तपासून पाहतो.
त्याची ही शोधक दृष्टी जरी वर्तमान क्षण बिंदूच्या वास्तव भेदावर असली तरी संस्कृतीपुटांखाली दडलेल्या व्यवस्थेच्या शोषकतत्त्वांचा वेधही घेणारी आहे. त्यातून त्याला शेत‘मालक’ आणि शेत‘मजूर’ संकल्पनेमागची प्रक्रिया उमजते. म्हणून अनवाणी पावलांनी निघालेल्या शेतमजूर बायांची, नेणीवेतील पाठ असणारी शेतात जाणारी वाट त्याला त्यांच्याच बापजाद्यांची पूर्वाश्रमीची वहिवाट असल्याचे जाणवते. अन् व्यवस्थेचे आदिम पाश त्याला लख्खपणे दिसू लागतात –
‘…आपल्याच जमिनीत करतोय मजुरी
याची खबरही नाही बेदखल बायांना
भुकेपोटी दुस-याच्या घशात टाकलाय
हा सोन्यासारख्या जमिनीचा तुकडा…’ (‘मजबुरी’)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हजारो वर्षांच्या वाटचालीत अन्न, वस्त्र आणि निवारा, या प्राथमिक गरजांपैकी विळे-खुरपे-तगाऱ्या-कुदळी-फावडे, या शस्त्रांसोबत भुकेची लढाई आजही शेतमजुरांना जिंकता आलेली नाही. वस्त्र आणि निवाऱ्याची गोष्ट अजूनही खूप दूर राहिलेली आहे. याचे दाहकपण अधोरेखित करतानाच, या पराभवामागच्या आदिम भूकेच्या मजबूरीचा गैरफायदा घेत, शेतमजूर कायम गुलाम म्हणूनच कसे राहतील, याचे सूचन घडून येते. म्हणून कासावीस होत कवी म्हणतो-
‘…शेतमजुरी ही सक्तमजुरी आहे
या बाया-बापड्यांना जन्मत: सक्तीनं मिळालेली
जी भोगत आहेत त्या पिढ्यानंपिढ्या
मालकाच्या बांधावर
शेतमजुरी ही मजबुरी आहे…’ (‘मजबुरी’)
शिसारी आणणा-या दु:खासह शेतमजुरीची सजा भोगत असताना विळ्या-खुरप्यांच्या तलवारी होत, संघर्षाचा वणवा का पेटला नाही? याची चिकित्सा करताना आधुनिक जीवन जाणीवेने संज्ञाशील बनलेला कवी गाव स्तरावरची निरीक्षणे प्रश्नांकित करतो.
बाह्यवर्तुळ – ‘नगर/महानगर’ : नागर – अनागर
या कवितांमध्ये ‘नगर/महानगर’ या बाह्यवर्तुळात कवी ‘नागर’ आणि ‘अनागर’ अशा द्वंद्वात्मक मूल्यभावातून त्रयस्तपणे ‘गाव’ आणि ‘नगर’ यांचे आंतरसंबंध तपासून पाहतो. मात्र या कवितांमध्ये ‘गाव’ या वर्तुळात जी शोषण व्यवस्था दृष्टिगोचर होते, तशी ‘नगर/महानगर’ या वर्तुळामध्ये ती प्रत्यक्षपणे घडत नाही.
एकूण कवितांचा विचार करता कवीची अनुभूती जशी ‘कुटुंब’ आणि ‘गाव’ या वर्तुळ परिघांना व्यापून आहे, त्या तुलनेने शहरी अनुभव क्षेत्र मर्यादित असल्याचे दिसून येते. अर्थातच गावकरी या संदर्भात तसे असणे साहजिकच आहे. तेव्हा गावकऱ्याचा त्याच्या वास्तव जीवनात शहरांशी जो संबंध आहे तो गरजेपुरता आहे. म्हणून कवीला शहर म्हणजे माणसांच्या रंगीबेरंगी गर्दीत हरवणारे, मोबाईल-फेसबुकसारख्या आधुनिक सुखसोयींनी युक्त मायावी भूलभुलैया आहे. शहराविषयीचा दृष्टीकोन कायम गावाशी तौलनिक असल्याने-
‘माय माती माणसं
ओढून नेतात गावात
पैसा प्रगती प्रतिष्ठा
झुलवत ठेवते शहरात’ (‘प्रश्नांचं मोहोळ’)
- अशी त्याची समजूत आहे. त्याच्या या समजूतीला गावकऱ्यांच्या लोकविश्वासाचे अस्तरही आहे. शेतमालक असो वा शेतमजूर गावगाड्याचा परंपरागत पसारा आणि वतनदारीचे पूर्वापार चालत आलेले समाजबंध तोडण्यास - शोषण होत असले तरीही - सहजासहजी कुणी तयार होत नाही. याचे “पूर्वजांनी पेवात लपवलेल्या धनाची दंतकथा नव्यानं सांगितली जातेय” असे मार्मिक सूचन कवी करतो. त्यामुळे -
‘कित्येक पिढ्यांपासून
गावाला चिटकलीयंत ही माणसं,
कराडीवर मुळ्या रोवत
उमेदीनं वाढणा-या झाडांसारखी.’ (‘भंगतीचा पाय’)
असे असले तरी गाव सोडून शहरात गेल्यावरही कवीची नाळ गावापासून तुटत नाही. गाव सोडल्याची स्मरणचित्रे त्याला गहिवरून टाकतात-
‘पाझरतं गाव
डोळ्यांच्या बुबुळांतून
आठवते मायेनं मुका घेणारी माय
पडक्या घराच्या खिडकीतून
कापऱ्या हातानं निरोप देणारा बाप’ (‘प्रश्नांचं मोहोळ’)
गावाच्या संथपणात जगलेल्या कवीला शहरातील गतीशीलता कोमेजून टाकते. पैसा, प्रगती आणि प्रतिष्ठा यांच्या हव्यासापोटी माणसाचे जगणे यंत्रवत करून टाकणाऱ्या शहराचे मायावी भूलभुलैया स्वरूप त्याला गुदमरून टाकते. तेव्हा आपल्या जगण्याला नवा अर्थ यावा म्हणून त्याची पावले आपोआप गावाकडे वळतात. तो म्हणतो –
‘रोजच्या धावपळीतून
जगणं नवती व्हावं म्हणून
गावाच्या वाटेवर पाय वळतात आपोआप’ (‘बालपण’)
मायस्वरूप गाव त्याच्या वात्सल्यपूर्तीचे माध्यम बनते. तिच्या कुशीत थकवा काढत गझनीचा महमुद बनुन हवं ते हवं तितकं सुलतानी अविर्भावात आपले बालपण शहरात दरवेळेस घेऊन जातो.
परिवर्तनाने जी नवी मूल्ये व नवे विचार जन्माला येतात ती मानवी जीवनाच्या श्रेत्रांमध्ये सर्वकष परिवर्तन घडवून आणण्यास अपयशी ठरल्याची कवीची भावना आहे. म्हणून गरीबांच्या उत्थानासाठीची व्यवस्थेची तथाकथित कटीबद्धता एक ढोंग ठरल्याचे प्रतीकात्मकतेने तो म्हणतो -
‘गरिबीला आजाराला नापिकीला कंटाळून
मरून पडलंय अवघं गाव शवागारात
शहरातल्या सरकारी दवाखान्यात.’ (‘सरकारी दवाखाना’)
सत्तेच्या परिवर्तनाने बलुतेदारीची वहीवाट बंद पडली. रोजी रोटीचा रोजचा सवाल, आदिम भूकेच्या भूजंगाप्रमाणे फणा काढून उभा राहिल्यावर भंगतीचा पाय मिरवत मातीतली माणसं, लोंढ्यांच्या संख्येने बघता-बघता उद्योगाचे माहेरघर असलेल्या सुरत-मुंबईला विस्थापितही झाली. तेव्हा आपल्या गावाचा पिंपळगाव झालेला पाहताना कवी म्हणतो -
‘ज्या घरावर उगवतो पिंपळ
ते घर कालांतराने बनत जातं बेघर
असा समज गावक-यांचा…
मी शोधली अशी गावातली घरं-
आता या पिंपळांच्या गावात
उरलीत खंगलेली म्हतारी माणसं…’ (‘पिंपळगाव’)
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
एकूणात काय तर, ‘माय’ मरून पडली आहे ‘कुटुंबात’, ‘शेतमजूर’ मरून पडले आहेत ‘गावात’, ‘गाव’ मरून पडले आहे सरकारी दवाखान्याच्या शवागारात, आणि आत्मा हरवलेली माणसे यंत्रे झाली आहेत महानगरात. तेव्हा कुटुंब-गाव-नगर/महानगर अशी चढत्या श्रेणीने जैविक अन्नसाखळीप्रमाणे ही आर्थिक शोषणाची साखळी अधोरेखित झालेली दिसते.
‘कुटुंब’ वर्तुळात ‘माय-बाप’ ही पदे कवितागत पुत्रासाठी आत्मनिष्ठ असले तरी या पदांचा अन्वयार्थ वैश्विक पातळीवर वस्तुनिष्ठ ठरत त्याला आईपण भोगणा-या स्त्रीची आणि बापपणाला पुरुषी वर्चस्वाची सार्वत्रिकता लाभते. तसेच ‘गाव’ वर्तुळात ‘शेतमालक’-‘शेतमजूर’ यांतील द्वंद्वात्मक संघर्ष अधोरेखित होताना ‘गाव’ ही एकूणच शोषण व्यवस्था सर्वकष श्रमशक्तीचे अवमूल्यन करणारी व्यवस्था म्हणून आविष्कृत होते.
त्याचप्रमाणे ‘नगर’ वर्तुळात ‘नागर-अनागर’ संबंधातून गाव परिसंस्थेला नागवणारे आणि व्यक्तीला नि:सत्व करणा-या निरंकुश सर्वकषवादी सत्तेचे प्रतीक म्हणून नगर/महानगर अभिव्यक्त झालेले दिसून येते.
काळोखाचे गूढ उकलणे ही तर कवीची एक काव्यप्रेरणा आहे. हा काळोख आहे सर्वकष शोषणाचा, हा काळोख आहे मानवी मूल्ये हिरावणाऱ्या व्यवस्थेचा आणि त्याच्या परंपरेचा. हा काळोख आहे चंद्राच्या सावलीचा म्हणजेच अमावस्येचा! ‘काळोख्याच्या कविता’ म्हणजे अमावस्येच्या कविता! ‘काळोखाच्या कविता’, ‘लवकरच पाऊस येईल म्हणून’, ‘समुद्र न पाहिलेला माणूस’, ‘आभाळ’, ‘ही कुठली दहशत’, ‘प्रश्नांचं मोहोळ’ इत्यादी कवितांमध्ये ‘अमावस्या’ ही प्रतिमा आलेली आहे. तसेच ‘जीव खोल-खोल डोह’ ‘मी उजेडाची तिरीप’, ‘तुमचं मन’, या कवितांतील ‘डोहाच्या खोल तळाशी’-‘खोल डोह’ या प्रतिमा आल्या आहेत. यांतून ‘अमावस्या’ ही प्रतिमा ‘कालातीत शोषणा’चे प्रतीक रूप धारण करत या कवितासंग्रहाचा कल्पनाबंध झाली आहे.
या कवितांमध्ये जरी आशावादी सूर दिसत नसला तरी निराशावादी सूरही नाही. या कवितांमध्ये आहे ते केवळ कालातीत शोषण वास्तव. मग हे कालातीत वास्तवच कविता होते अन् ती न्याहाळते कवीची तगमग. ही कासाविशी कवीला अस्वस्थ करते. तो म्हणतो –
‘अस्वस्थता पोखरते माझं सबंध शरीर
मन, मेंदू, पेशीपेशी
एक उजेड चालत येतो माझ्या दिशेने
विलिन होतो माझ्यात
मी उजेडाची एक तिरीप’ (‘मी उजेडाची एक तिरीप’)
मग ही उजेडाची तिरीप टाकते झोत भूतकाळाच्या खोल तळापासून ते वर्तमानाच्या पृष्ठभागावर अन् दृष्टिगोचर होतात शोषणाचे अदृश्य, अमूर्त हात - बापापासून गावापर्यंत, गावापासून नगरांपर्यंत, सांतापासून अंतापर्यंत. म्हणून या ‘काळोखाच्या कविता’ गर्भार काळोखातल्या प्रकाशवेणा ठरतात.
‘काळोखाच्या कविता’ - नामदेव कोळी
वर्णमुद्रा प्रकाशन | पाने- ११६ | मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment