अजूनकाही
जॉर्ज ऑर्वेल. ‘1984’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ओळख करून देणारं ‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असे काही’ हे लेखिका विशाखा पाटील यांनी लिहिलेलं चरित्र . त्याला नुकताच ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चा पुरस्कार जाहीर झालाय...
..................................................................................................................................................................
चरित्रलेखन ही अवघड कसरत असते. एका पातळीवर तुकड्या तुकड्यातून एकसंध चित्र उभं करायचं असतं आणि दुसऱ्या पातळीवर लेखणीचा तोल जराही ढळू द्यायचा नसतो. त्यातही चरित्रविषय जर वादग्रस्त आणि वादळी व्यक्तिमत्त्व असेल तर ही जबाबदारी दुप्पट होते. विशाखा पाटील यांचं ‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असेही काही’ हे चरित्र ही जबाबदारी उत्तम रीतीनं पेलतं.
‘नाइंटीन एटीफोर’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कादंबऱ्यांमुळे एकविसाव्या शतकातील नव्या वाचकपिढीचंही लक्ष वेधून घेणारा हा द्रष्टा कादंबरीकार आणि निबंधकार. लेखनासाठी अनुभवाच्या शोधात असणारा आणि अस्सल अनुभव घेण्यासाठी बकाल वस्त्यांत राहणारा, कमालीच्या हाल-अपेष्टा सोसणारा, मानवतावादी भूमिकेतून प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाणारा आणि जीवावर उदार होऊन लढणारा, खाण-कामगारांचं आयुष्य समजून घेण्यासाठी ते जगून पाहणारा, विरळा धैर्य आणि लोकविलक्षण आत्मसामर्थ्य असणारा, लेखकानं अनुभवांना निर्भयपणे भिडायला हवं, असं मानणारा आणि तसं जगलेला, पण अल्पायुषी ठरलेला हा लेखक.
१९०३ ते १९५० हा त्याचा जीवनकाळ. अतिशय महत्त्वाच्या आणि मानवी आयुष्यावर दूरगामी परिणाम केलेल्या घटनांचा हा महास्फोटक काळ. विविध विचारसरण्या, सत्ताकांक्षेची अनेक राक्षसी रूपं आणि त्यात भरडून निघालेली मानवजात. हा दडपशाहीचा आणि युद्धज्वराचा काळ लेखक म्हणून ऑर्वेलला सतत आव्हान देत राहिला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या काळातल्या उजव्या, डाव्या, लोकशाहीवादी, समाजवादी, भांडवलशाही, साम्राज्यवादी, साम्यवादी, अराजकवादी, फॅसिस्ट अशा सगळ्या विचारसरण्या त्यानं स्वत:च्या स्वतंत्र अभ्यासातून समजून घेतल्या. त्याच्या वेळच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, सामान्य माणसाची हलाखी आणि त्याची ताकदही नीटच समजून घेतली. तीच त्याच्या लेखनातून स्पष्टपणे आणि पारदर्शीपणे प्रकटत राहिली. या चरित्रातून हा विलक्षण माणूस आणि सच्चा लेखक कळायला मदत होते.
ऑर्वेलच्या निबंधांमधील विचार, मतं आणि त्याच्या कादंबऱ्यांतील पात्रांच्या उक्ती, कृती, त्यांचे वैचारिक प्रवास व ऑर्वेलचं जगणं, त्याचे अनुभव यांतील संगती शोधत हे लेखन केलं आहे. एका प्रकारे चरित्रात्मक समीक्षेची काही तत्त्वं लेखिकेनं उपयोजली आहेत.
लहानपणापासून वडिलांच्या सहवासाला आणि प्रेमाला वंचित राहिल्याने असेल, पण स्त्रीप्रेमासाठी तहानलेला, असा ऑर्वेल यातून फार परिणामकारकपणे उभा राहतो. त्याच्या विविध मैत्रिणी व त्यांच्या मैत्रीचे अनेक स्तर यांचेही आवश्यक तेवढे तपशील देऊन लेखकिने त्याच्या मानसिकतेचा शोध घेतला आहे. काटकसरीनं जगणारा, स्वावलंबी, श्रमशक्तीवर विश्वास असणारा ऑर्वेल जसा दिसतो, तसाच लहानपणापासून लेखक होण्याची, लोकप्रिय लेखक होण्याची कांक्षा असणारा, पण स्वतःच्या लेखनावर अजिबात समाधानी नसणारा, स्वतःचाच कठोर समीक्षक ऑर्वेल ठळकपणे उमटला आहे. लेखिकेनं वर्तमानाशी ऑर्वेलच्या विचारांची जी सांगड घालून दाखवली आहे, ती महत्त्वाची वाटते, प्रस्तुत वाटते.
उदा. ऑर्वेल ‘The Road to Wigan Pier’मध्ये लिहितो, “पहिल्या महायुद्धानंतर चित्रपट आणि स्वस्तातल्या कपड्यांचं उत्पादन प्रचंड वाढलं. तुमच्या खिशात भले पैसे नसतील, तुम्हाला नोकरीची चिंता असेल; पण उंची ब्रँडचे लेबल लावलेले, नक्कल केलेले स्वस्तातले कपडे घातले की, तरुण वर्ग नट-नट्या बनायची स्वप्नं बघायला लागतो. वास्तवापासून दूर जातो.’’
आपलं आज असं झालंय का, हा विचार मनात येतो आणि ऑर्वेलचं द्रष्टेपण उठून दिसतं. त्याचे विचार आजही पथदर्शी वाटतात. ‘‘सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी युद्धं हवी असतात’’, असं निर्भीडपणे म्हणणारा ऑर्वेल भविष्यातील हुकूमशाहीचं रूप दाखवत होता. सामान्य लोकांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनयंत्रणा विज्ञानाला हाताशी धरेल, अशी भीती त्याला वाटत होती. त्यातूनच पहारा ठेवण्यासाठी टेलिस्क्रीन वापरला जाईल, ही कल्पना त्याला स्फुरली. आणि आज आपण त्याचा भयप्रद अनुभव घेत आहोत.
१९४८मध्येच पुढच्या चाळीस वर्षानंतरचं भाकीत करणाऱ्या, ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’ म्हणणाऱ्या दृष्ट्या ऑर्वेलच्या व्यक्तिमत्त्वातील दुभंगही लेखिका दाखवते. आपल्या परिचयाच्या काही साम्यवादी लोकांची नावं त्यानं ब्रिटिश सरकारला कळवली होती. लोकशाही समाजवाद मानणाऱ्या ऑर्वेलचं समाजवाद्यांवर टीका करताना आपण आधुनिक विचारांवर ही टीका करतोय, याचं भान सुटलं होतं, असं लेखिका म्हणते. त्याचं व्यक्तिमत्त्व असं दुहेरी होतं. ‘अॅनिमल फार्म’मध्ये त्यानं स्टालिनच्या पोलादी पकडीतील रशियाचं हुबेहूब चित्रण केलं, पण तो मार्क्सवादाची चिकित्सा करू शकला नाही. तर्कनिष्ठ ऑर्वेलनं मुलाची कुंडली तयार करवून घेतली होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अशा विसंगतींचा चिकित्सक उहापोह लेखिकेने केला आहे. ऑर्वेलच्या धारदार विचारांची वाहक अशी उपरोधिक शैली, रसरशीत भाषा, विनोदाचा वापर यांचा प्रत्यय तर ठायी ठायी असणाऱ्या उदधृतांमधून येतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चरित्रासाठी कोणती साधनसामग्री लेखक वापरतो, त्यावर चरित्राची विश्वासार्हता अवलंबून असते. या चरित्राला जोडलेली संदर्भग्रंथांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं की, ओर्वेलचं सगळं साहित्य आणि त्याच्यावर लिहिलेलं विविध अभ्यासकांचं साहित्यही लेखिकेनं अभ्यासलं आहे. मात्र या चरित्राच्या शेवटी ऑर्वेलचा संक्षिप्त चरित्रपट दिला असता, तर संदर्भमूल्य वाढलं असतं आणि एका दृष्टीक्षेपात त्याचं धाडसी जीवनही उमगलं असतं.
स्पष्ट, स्वच्छ आणि प्रवाही शैलीतले हे ऑर्वेल चरित्र थक्क करून सोडतं. लेखक असणं म्हणजे जगणं पणाला लावणं. आयुष्याचा दीप जाळून प्रकाश निर्माण करणं. एका अस्सल लेखकाच्या या चरित्रामुळे राजहंसच्या चरित्र दालनात तर भर पडलीच, पण मराठीतील चरित्रलेखनही समृद्ध झालं आहे.
‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असेही काही’ - विशाखा पाटील
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - ३३३, मूल्य – ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी या संपादक व चरित्रकार आहेत.
vandanabk63@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment