‘सगळेच ऋतू दगाबाज’ : यात बहुतांश प्रेमकविता आहे, पण ती उगाच उसासे सोडणारी नाही... तर ती स्त्री-पुरुष राजकारणाची मांडणी टोकदारपणे करते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
श्रीधर चैतन्य
  • ‘सगळेच ऋतू दगाबाज’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Thu , 08 December 2022
  • ग्रंथनामा शिफारस सगळेच ऋतू दगाबाज Saglecha rutu dagabaaj कविता ननवरे Kavita Nanaware

कवितांची पुस्तकं इतर पुस्तकांसारखी नसतात. इतर पुस्तकं हातात घेतल्यावर दोन-चार पानांत कळतं की, चांगलं किंवा आपण बकवास पुस्तक हातात धरलंय. ते विकत घेतलं असेल तर आपण म्हणतो, यापेक्षा तीन-चार किलो तांदूळ आणले असते, तर घरातल्यांच्या शिव्या कमी बसल्या असत्या. पण बहुतांश कवितांची पुस्तकं (आणि खरं तर तिचे प्रकाशक) आपल्याला गंडवतात.

समीक्षकांनी गौरवलेल्या एखाद्या कवितेच्या पुस्तकात शंभर कवितांपैकी आठ-दहा चांगल्या, पंधरा-वीस बऱ्या, पंचवीस-तीस वाईट आणि बाकीच्या अतिशय वाईट कविता असतात. यातही कवीची, प्रकाशकाची मखलाशी अशी असते की, चांगल्या कविता सुरुवातीला आणि शेवटी असतात; बाकी पुस्तकभर बऱ्या कवितांबरोबर वाईट आणि आणखी वाईट कविता पसरलेल्या असतात. 

हवाबंद पाकिटातल्या अन्नपदार्थांसारखी सत्त्वहीन असलेली शंभर-दीडशे पानांची अशी पुस्तकं आपण  पोटाला चिमटा काढून खरीदतो आणि नंतर चरफडत बसतो. किडनी स्टोनला कोहिनूर म्हणण्याच्या या दिवसांत आपली अस्सलतेची अपेक्षा अवाजवी आहे का, असा प्रश्न विचारत असली पुस्तकं आपण ‘रद्दीवाला’ या गठ्ठ्यात बांधतो.

या सगळ्याला अपवाद असलेलं ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हे कविता ननवरेंच्या कवितांचं पुस्तक नुकतंच वाचलं. या पुस्तकात जवळपास ९० कविता आहेत. चांगल्या कविता जास्त आणि बऱ्या कविता कमी आहेत. वाईट कविता आणखी कमी आहेत! तेव्हा ग्राहक केंद्रित साहित्यबाजारात तुम्ही खर्च केलेली रक्कम योग्य ठिकाणी खर्च झाली, असं वाटतं.

या पुस्तकात मनोगत नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्या नावाखाली मी कविता कशी लिहू लागलो\ले, माझी कविता कशी फुलली, माझी कविता कशी बहरली, माझ्या आईचे- बापाचे- बायकोचे- नवऱ्याचे, आणखी कुणाचे उपकार असली ‘मी माझा’ छाप बकवास नाही. कवितेचे सोबती म्हणून पाच-सहा ओळींत काही (दादा लोकांची नावं) आहेत. कविता पूर्वी कुठं प्रसिद्ध झाल्यात ती एक (पुन्हा दादा मासिकांची) यादी एका पानात आहे. ‘आईस’ एवढ्याच शब्दाचं एक अर्पण आहे, नंतर अनुक्रमणिका आहे. आणि नंतर समोर कविताच येतात… एकदम थेट.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

फेसबुकवर या पुस्तकाचं प्रकाशनही पाहिलं. तेही असंच साधं सरळ, थेट नेमकं होतं. हे नेमकेपण, साधेपण ही या कवयित्रीची प्रकृती आहे. ती तशी असल्यानं पुस्तकाची मांडणी, प्रकाशनातही हा थेटपणा आला आहे. हा मुद्दा ‘आरसे’  ही कविता नेमकेपणानं स्पष्ट करतो -

‘ते

मला

कुरूप

म्हणाले

मी

सगळे

आरसेच

फोडून

टाकले. ’

यात बहुतांश प्रेमकविता, ती स्त्री-पुरुष यांच्या नात्याचे पदर उकलणारी आहे, पण उगाच उसासे सोडून तरल भावगीत परंपरा सांगणारी नाही. तर ही कविता स्त्री-पुरुष राजकारणाची मांडणी प्रभावी टोकदारपणे करते. व्यक्तीनिष्ठ कविता ते समष्टीची कविता, त्यातही स्त्री जाणिवा मांडणारी कविता, अशी या कवितासंग्रहाची मांडणी आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा समष्टीपर्यंतचा प्रवास जसा होतो, तशीच ही मांडणी आहे.

कविता ननवरेंचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरीही यात नवखेपणा नाही, पहिलेपणाचा भाबडा, भोंगळ अजागळपणा नाही. त्याचबरोबर आपण कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो, कविता का व कशासाठी लिहायची, याचं भानही त्यांना असल्याचं जाणवतं. भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक चौकटीला असणारा स्त्री-पुरुष राजकारणाचा संदर्भ त्यांना समजलाय, तो कवितांमधून कसा व्यक्त करायचा, हेही त्या जाणतात. उदा. ‘आर यु वर्जिन?’ ही कविता -

‘…आर यु वर्जिन?

मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून खोटंच उत्तरले,

“नो आय अ‍ॅम नॉट.”

माझ्या उत्तराने त्याच्या मुळावरच घाव बसला

त्याच्या पायाखालची जमीन सरकून

तुकडे तुकडे झाले तिचे

तो डोळ्यातला अंगार लपवू शकला नाही

आणि मी त्याच्या टिपिकल पुरुषीपणावरच माझं हसू.’

अर्थात हे राजकारण करण्यासाठी त्या कविता लिहीत नाहीत. स्त्रीच्या अस्तित्वभानाचा शोध, स्त्री-देह आणि तिच्या एकूणच भावनांचं धर्म आणि भांडवली व्यवस्थेकडून होत असलेलं सवंग व्यापारीकरण, आजच्या बाजारी जगात तिच्या असण्याचा आणि तिच्या माणूसपणाचा अर्थ तपासणं, व्यक्ती म्हणून स्त्रीची आपल्या पारंपरिक धर्मग्रस्त समाजात, कुटुंबात होणारी घुसमट, अपरिहार्यपणे येत असणारं एलिनेशन (परात्मभाव?), स्त्री-पुरुष नातं, आणि या सगळ्याचं एकूण व्यवस्थेशी असणारं नातं, स्त्री म्हणून आपलं भारतीय मध्यमवर्गीय मानव समाजातलं स्थान शोधणं त्याचबरोबर स्त्रीनं स्वत:चं माणूसपण जपण्याचा झगडा मांडणं, जगण्यातलं सत्त्व शोधणं, ते जपणं हे त्यांच्या कवितांचे विषय आहेत.

साधे पण नेमके अर्थवाही शब्द, प्रतिमांच्या सोसात न अडकणं, उगाच भाषिक मोडतोड न करणं, ही त्यांच्या कविता लिखाणाची वैशिष्ट्ये दिसतात. आधुनिकतावादाचा (आणि उत्तर आधुनिकतावादाचा) चुकीचा प्रभाव नसलेल्या या पहिल्याच संग्रहातून समंजस कविता समोर येणं, हे या कवयित्रीच्या पुढच्या कवितांची वाट पाहायला लावणारं आहे.

हा कवितासंग्रह तीन स्तरांवर तोलला आहे. स्त्रीच्यातल्या ‘मी’चा, तिच्या सहचराशी असणाऱ्या संवाद-विसंवाद, साद-प्रतिसादाच्या आणि काहीशा आत्मनिष्ठ व्यक्तीवादी कवितांमधून दिसतो. उदा. ‘तू जसा आहेस तसा ये’ ही कविता -

‘…तू

जसा आहेस

तसा ये

बेभान वादळासारखा...

जाताना,

सगळे ऋतू

उद्ध्वस्त करू गेलास

तरी चालेल...’

त्याच वेळी ‘बयो’सारख्या या कवितेतून दुसऱ्या स्तरावरच्या कवितांमधून समाजाला आणि आजच्या धर्माच्या कुबड्या घेतलेल्या भांडवली पुरुषी जगाकडून ‘बाई’ म्हणून वागवल्या जाण्याला नकार देणारा सूर दिसतो -

‘...तुला तुझा उद्धारच करायचा असेल

तर फक्त एवढंच कर

घे तलवार

अन् सर्व शक्तीनिशी कर

त्यांच्या मुळावर वार’ 

तिसऱ्या स्तरावरच्या कवितांमधून ही कवयित्री समष्ठीबद्दलची आपली भूमिका, प्रतिक्रिया मांडताना दिसते. उदा. ‘म्हणणार नाही मी’ ही कविता-

‘…धर्म जात

वंश कूळ

श्रीमंत गरीब

शिक्षित अडाणी

वरचा खालचा

उंच बुटका

गोरा काळा

अस्तित्वाला विषमतेच्या मोजपट्ट्या लावून

भेदाभेद भ्रम मंगळची जोवर ओढली जाईल री

तोवर

मानेवर कुणी तलवार ठेवली तरी

म्हणणार नाही मी

माझ्या राज्यात सूर्य उगवतोय”

किंवा ‘नीट रांगेत उभे राहा’ ही कविता वाचल्यावर ही कवयित्री समष्टीकडे कशा नजरेनं पाहते, हे लक्षात येतं-

‘...तुम्हा सर्व भक्तांचे कल्याण होवो

तुमचा वंशवेल मांडवाला जावो

(आमचा गोरखधंदा पिढ्यान् पिढ्या चालत राहो)

आणि विशेष सूचना

घंटा जोरात वाजवू नये

देव झोपलेत त्यांना जागं करू नये.’

हा समष्टीकडे पाहणारा तिसरा स्तर आणि पुरुषी जगात बाई म्हणून पारंपरिक वागायला नकार देणारा, समतेचा हट्ट धरणारा दुसरा स्तर, असे दोन्ही पहिल्या स्तराच्या तुलनेत पातळ आहेत. तसंच दुसऱ्या स्तरावरच्या कविता तिसऱ्या स्तराच्या तुलनेत अधिक सशक्त आणि संख्येनं जास्त आहेत.

आजच्या धर्माचा टेकू घेतलेल्या नवभांडवलशाही काळातले स्त्री-पुरुष राजकारणाचे विविध पैलू व्यक्त  करणाऱ्या कविता यापुढं आणखी प्रखरपणे  (संख्येनंही जास्त) लिहिल्या जातील, ही अपेक्षा आपण या कवयित्रीकडून नक्कीच करू शकतो.

आणखी एक बाब अशी की, मराठी स्त्री आणि प्रेमकवितांमधली फालतू तरल अशी भावरम्यता या संग्रहात अजिबात दिसत नाही. अगदी दोन ओळींमधल्या मोकळ्या जागेत कवयित्री जे म्हणू पाहते, तिथंही ती दिसत नाही. या कवितेत रूपबंधाचे नवे प्रयोग समोर फारसे येत नसले, तरीही इंदिरा संत यांच्या काळापासून चालत आलेली आणि आजच्या धर्माधिष्ठित भांडवली संस्कृतीची घिसीपिटी पुरुषसत्तेला मान्य होणारी रिझवणारी, बकवास रूपकांचा सोस असणारी ही नटवी कविता नाही. स्त्रीवादी कविता ज्या रूपकांचा वापर करते, तीच या संग्रहातून समोर येतात. पण ती अगदी नेमकी येतात, अर्थाच्या नव्या शक्यता तपासत येतात, अधिक दाहकपणे येतात. हे ‘तुझ्या-माझ्या इच्छा’ कवितेतल्या या ओळींमधून नेमकं लक्षात येतं. –“...तू रच व्यासाच्या अविर्भावात

तुझ्या इच्छांचं महाभारत

मी सुरू ठेवेन

माझ्याही आत माझ्या इच्छांचं सनातन युद्ध

इतकंच सांगू शकते

आपल्यातल्या कोसोदूर अंतराला साक्षी ठेवून.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्त्री कविता आणि स्त्रियांनी केलेलं एकूणच लिखाण एका चौकटीत असावं, अभिव्यक्तीचा घाट आणि भाषा शालिनता सांभाळणारी असावी, अशी जी अपेक्षा जगाच्या नियमकांकडून केली जाते, ती मागणी या कविता उधळून लावतात. पण तसं करताना या कविता उगाच आक्रस्ताळेपणा करत नाहीत. हे ‘इशारा’ ही कविता अचूक सांगते -

‘थांबत नाहीय पाऊस

घटकाभरही

बारमाही कोरडीठाक नदी

आता तुडुंब भरून वाहू लागलीय

सावधानतेचा इशारा

कळायला हवाय तुला

स्वत:चं गाव सुरक्षित स्थळी हलव तू

नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यापूर्वी’

२०२२मध्ये जेव्हा जगाच्या एका भागात नग्न स्त्री-देहाची इंस्टॉलेशन्स् एक कला प्रकार म्हणून स्वीकारला जात आहे, ॲनी ॲर्नोक्ससारख्या भाषेला सुरा म्हणणाऱ्या स्त्रीला नोबेल पुरस्कार मिळतोय, त्याच वेळी अजूनही हिजाबवरून स्त्रियांचे खून पडणं, तिच्या स्वाभाविक भावनांचं प्रकटीकरण करणं अशक्य असण्याच्या या सत्योत्तर काळातल्या आपल्या जगातल्या या कविता पुरुषी मानसिकतेला धक्का देतायत. दगाबाज ऋतूंमधल्या या कवितांचं हे असं धक्का देणं सामान्य वाचक सोडाच, पण समीक्षकांनाही धाडस वाटतंय. आणि हे चकित करणारं आहे. ही गोष्ट आपण समाज म्हणून अजूनही किती मागास आहोत, याचंच दर्शन आहे.

‘सगळेच ऋतू दगाबाज’ - कविता ननवरे

शब्द पब्लिकेशन, मुंबई, पाने - ११२, मूल्य -  १९५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......