‘टिळा’ : कुठेच आक्रस्ताळा स्वर न लावता, अगदी स्पष्ट आणि नेमक्या चित्रणाने ही कविता आरपार मेंदूत घुसते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वृषाली किन्हाळकर
  • ‘टिळा’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 11 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस टिळा Tila केशव सखाराम देशमुख Keshav Sakharam Deshmukh शेत Farm शेतकरी Farmer बैल Bull शेळी Goat दुष्काळ Drought

केशव सखाराम देशमुख यांचा ‘टिळा’ हा नवा काव्यसंग्रह हातात पडला आणि रात्री दोन वाजेपर्यंत मी वाचतच होते त्या कविता. रात्रभर मला सलग अशी झोपच लागली नाही. झोपेत अधूनमधून एखादा निमूट बसलेला उदास बैल, कोरडी ठक्क जमीन, वाळलेली पिकं, भेगाळलेली जमीन आणि अंधारलेल्या झोपड्यांमधली चिडीचूप माणसं दिसत होती.

या कवीचं लेखन काळजात उतरणारं आहे! त्याची कविता वाचली की, ‘खरेदी’ या शब्दाचा मनातल्या मनात उच्चार करण्याचीदेखील भीती अन् जराशी शरम वाटते. आपल्या सुरक्षित, उबदार घरातलं सुखवस्तूपण आपल्यालाच बोचू लागतं. ‘पाढा’, ‘चालणारे अनवाणी पाय’, ‘गाभा’, ‘तंतोतंत’, ‘अथक’ आणि आता ‘टिळा’, ही त्यांच्या कवितासंग्रहांची शीर्षकंच पुरेशी बोलकी आहेत… या कवीचं कूळ आणि गोत्र सांगणारी आहेत.

‘अथक’ हे प्राणतत्व जितकं निसर्गाचं, तितकंच या निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या शेतकऱ्यांचंसुद्धा! गरिबी त्यांच्या पाचवीला पूजलेली. कवीच्या मतानुसार या गरिबीचा रंग अमीट! गरिबी आकारहीन आणि पाठपोट एकसमान असते. ‘पाढा’पासून ‘टिळा’पर्यंत केशव देशमुखांची कविता शेतकऱ्यांच्या दुःखाशी, जगण्याशी अधिकाधिक समरस होत गेलेली आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘टिळा’मध्ये शेतकरी आणि कवी इतके एकरूप झालेले आहेत की, कवीला आता वेगळं बाजूला करताच येत नाही; कारण त्याला आता जमिनीचा श्वास वाचता येतोय! ‘बैलांच्या त्वचेलाच चिकटून आहे दुष्काळ’ असं विधान करणारा हा कवी स्वतःच्या त्वचेचे रंग सत्याच्या भुईवर पेरत निघाला आहे. आणि तो जे काय पेरत निर्धाराने निघालाय, त्यातून भाकरी साकार होणार आहे, इतका उदंड आत्मविश्वास त्याच्या छातीत भरून आहे. त्याला सर्वदूर जे कोरडं शुष्क रान दिसलंय वर्षानुवर्षं, त्यामुळे नक्कीच व्यथित झालाय तो, मात्र त्याने हातपाय गाळलेले नाहीत. आता तर त्याला उदक होऊन ढगातून फुटायचं आहे. या संग्रहातली पहिलीच कविता म्हणते -

“विहिरीच्या कपारीत थेंब पडलेला अवघडून आहे

खडकातून तहानेचं फूल मेलेलं आढळत आहे”

निसर्गाने माणसाशी असलेलं चिरंतन निष्ठेचं नातंच जर विसरून जायचं ठरवलं, तर मग शेतकऱ्यांच्या क्लेशांना, अडचणींना अंतच असणार नाही.

“शेतांना बोलायची जीभ विसरून ढग पळत आहेत

बेइमान आभाळ भाकरीचा अनुबंध विसरत आहे”

रानातल्या माणसांची, पाखरांची, जनावरांची तहानच जर भागणार नसेल, तर मग या सगळ्या जीवांनी काय थुंकी गिळूनच जगायचं की काय? आणि कुठवर हे चालणार? आशेचा एकही किरण दिसत नसल्यामुळे निराशा ओसंडून रानभर, गावभर मनभर वाहत आहे.

“जमीन जागेवर असते

भाकरीचे मालक फक्त फिरतात

भाकर चाकासारखी गोल

जग फिरते भाकरी भोवती

अथांब!”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

‘अथांब’, ‘अथक’, ही कृषिगाथेतली वेदाक्षरं आहेत. केशव देशमुखांची कविता ही अशी रान वास्तव थेट सांगणारी आहे. कुठेच आक्रस्ताळा स्वर न लावता, अगदी स्पष्ट आणि नेमक्या चित्रणाने ही कविता आरपार मेंदूत घुसते. सुन्न करते, थिजवून टाकते, स्तब्ध आणि अंतर्मुख करते! आपल्यासारखाच देह-मन लाभलेली ही मातीत राबणारी माणसं; मात्र त्यांना साध्या साध्या गोष्टीदेखील दुष्प्राय आहेत, हे जाणवून खजिल वाटतं. हा कवी म्हणतो-

“बीजांच्या सर्जनाचे उच्चार मी बैलांच्या जीभांमधून वाचतो.

मला बैलांच्या पावलांमधून वाचायला आवडतं”

काय जिव्हाळा आहे हा! प्रेमाची, आस्थेची, ममत्वाची, ही किती उच्च प्रत आहे !

“जंगलातून तगमगीचा अजगर फिरत आहे बिनबोभाट”

या विधानातला थंड कडवटपणा, माणसांच्या शोकात्म जगण्यात जसा काही रक्तासारखा वाहतोय. शेतकरी निमूट. शेतकरी हवालदिल शेतकरी चिणून चाललेला.

कोंबड्या, गाय, बैल, शेळ्या, वासरं हे अगदी शेतकऱ्याच्या कुटुंबातले सदस्यच असतात. अपार जिव्हाळा असतो, त्यांच्याबद्दल शेतकऱ्याच्या मनात. ‘शेळी’ या शीर्षकाची एक नितांत सुंदर कविता एका पानावर आपल्याला भेटते. दारातली शेळी म्हणजे जसं काळं घनदाट पूर्णविराम चिन्ह, अशी एक अत्यंत वेगळी प्रतिमा कवीने इथं वापरलीय. जागोजागी कवी असे काही शब्द बांधतो की जाणवतं, या कविता आत्यंतिक उत्कटतेतून कागदावर येत आहेत. हा उमाळा, नितांत स्वाभाविकतेने शेतसंस्कृतीबद्दल आपल्याला सांगू पाहतोय.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

केशव देशमुख यांचं शिवार-प्रेमच इतकं उत्कट आहे, दुष्काळाची इतकी खोल जखम त्यांच्या उरात भळभळते आहे आणि शेतकऱ्याच्या घरातलं निमूट औदासीन्य पाहून त्यांना इतकी तगमग होतेय की, काळजातून शब्द सैरावैरा पळत सुटतात, कागदावर गर्दी करतात आणि त्या शब्दांच्या दाटीवाटीमधून कविता फुटत राहते, नित्यनूतन पालवीसारखी! कुठल्याही दृश्याला कागदावर शब्दरूप देताना त्यांना शब्दांची, प्रतिमांची, प्रतीकांची, मनधरणी करावी लागत नाही. त्यांचं जीवापाड रानप्रेम कवितेच्या रूपात स्वतःचे अकृत्रिम रचनाबंध अन् ठळक अस्तित्व घेऊन ताठ उभं राहतं. ही कविता म्हणजे शेतकऱ्याच्या उरात अखंड धडधडणारं हृदय आहे.

या कवीचा कसलेला हात, शिवारमातीची सोन्याची पानं रेखाटतो. ग्रामीण माणसांचं सूक्ष्म निरीक्षण करून, काहीही लांबलचक भाष्य न करता मालिकारूपात चित्रात्मक शैलीत कवी वाचकांच्या पुढ्यात ठेवतो. फाटक्या कपड्यातली शक्तिसंपन्न माणसं, अंधाऱ्या घरातली तेजःपुंज माणसं! कवीला सामान्यांबद्दल विलक्षण जिव्हाळा आहे, त्यांच्या कणखर कण्याचा कवीला सार्थ आदर आहे. त्यामुळेच ही व्यक्तिचित्रणात्मक मालिकाकविता ठोस परिणाम साधून जाते.

कवीची अनुभवविशदता, दृष्टीची संपन्नता ही भन्नाटपणाकडे न झुकता, एक समृद्ध साधेपण पदरात बांधून प्रगल्भपणाने शब्द मांडणारी आहे. हे शब्द सांस्कृतिक विघटन सांगतात, सामाजिक विखंडनावर बोलू पाहतात आणि आर्थिक विषमतेचा काटा उरात सलत असल्याची पानोपानी साक्ष देतात. या कवीची चिंतनप्रक्रिया ग्रामीण जीवनाची भेदक भीषणता आणि साऱ्या दिशा भरून असणारा अभाव, हतबलता यांना ओलांडून माणसांच्या हरघडी ढासळत जाणाऱ्या माणूससपणापर्यंत पोचते.

“बोलत राहतात

सोलत राहतात

माणसं माणसांना

ढेकूळ फोडावं

तशी फोडतात

माणसंच

माणसाला!”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने सोयीसुविधांसोबतच सर्वनाशाची बीजंदेखील रोवलेली आहेत, याचा उल्लेख करायला कवी विसरत नाही.

“कवितेचे भाष्यकार

गप्प झाले.

समीक्षा झाली अबोल.

आयुष्याच्या झाडाझडतीत

सोशल मीडियाच्या मैदानातला

शब्द झाला

कविता.”

दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी सगळं सोसूनसुद्धा गावागावातला हरेकच माणूस काही दुबळा झालेला नाहीय.

“आम्ही सुगी पिकवणं सोडलेलं नाही

शेत जतन करणं विसरलेलो नाही

तुमच्या पोटातली आग

तळहातावर आम्ही सतत

झेलून धरलेली आहे.”

असा उमदा उच्चार करणारा गावातला माणूस सत्याच्या शाश्वत विजयावर पक्का विश्वास ठेवून आहे, हेदेखील कवी नमूद करतो आणि याच सत्याची वाट पाहत एक कृषिजीवनाच्या कल्याणाचं आर्त पसायदान गातो-

“झाडाचा स्वर वाऱ्याला कळू दे.

ढगाची धार नदीला आत्मसात करू दे.

मला ठेवू दे कागदावर शब्दांचा हिरवागार हात.

माझ्या स्वप्नांना येऊ दे पिकांचाच हिर्वा उच्चार.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अस्सल मातीचा वास भरून राहिलेला आहे या कवीच्या तनामनात. तळागाळातला माणूस केंद्रस्थानी ठेवून तो रोचकतेपेक्षा वृत्तीगांभीर्याच्या पारड्यात झुकतं माप टाकत, कागदावर त्याचं नेमकं समाज निरीक्षण, निसर्गाच्या तापदायक लहरी आणि कष्टकऱ्यांच्या जगण्यातली अंतहीन अनिश्चितता यांचं एक तिखट रसायन सांडत जातो.

“मी तिथूनच आलो

जिथे घामालाच प्राप्त होते स्वतःची भाषा”

अशी स्वतःची समर्थ ओळख करून देणारा हा कवी, एक संतुलित प्रौढपण अंगाखांद्यावर मिरवणारी, स्वतःचा स्वतंत्र प्रदेश निर्माण केलेली आणि उद्याच्या प्रसन्न, कल्याणकारी उषेचा टिळा भाळावर रेखलेली हिरवीगार, देखणी कविता आपल्या हातात ठेवतो.

‘टिळा’ : केशव सखाराम देशमुख

काव्याग्रह प्रकाशन, वाशिम

पाने : १३६

मूल्य : २०० रुपये

.................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर कवयित्री आहेत.

sahajrang@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......