पुस्तकांशिवाय प्रखर क्रांतिकारक आणि थोर राष्ट्रवादी भगतसिंगांची कल्पना करणेही अवघड आहे!
दिवाळी २०२२ - लेख
रमेशचंद्र पाटकर
  • भगतसिंग यांची काही छायाचित्रे
  • Thu , 20 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख भगतसिंग Bhagat Singh सुखदेव Sukhdev राजगुरू Rajguru महात्मा गांधी Mahatma Gandhi जालियानवाला बाग Jallianwala Bagh लाला लजपतराय Lala Lajpat Rai गदर चळवळ Ghadar Movement समाजवाद Socialism मार्क्स Marx लेनिन Lenin गणेश शंकर विद्यार्थी Ganesh Shankar Vidyarthi

हिमनगाचा एक तृतीयांश भाग पाण्याच्या वर असतो आणि उरलेला दोन तृतीयांश भाग पाण्याखाली असतो. भगतसिंग यांचे व्यक्तिमत्त्वही हिमनगासारखेच आहे. भगतसिंग थोर राष्ट्रवादी होते आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन बलिदान केले, हे सर्वांना ठाऊक असते, पण ते सामाजिक क्रांतिकारक व मार्क्सवादी होते, अगदी तारुण्यात (त्यांना फाशी दिले, त्या वेळी ते अवघे २३ वर्षांचे होते) त्यांनी स्वत:ला तसे घडवले, तसेच एक बुद्धिमान आणि विचारवंत म्हणून त्यांची जडणघडण झाली होती, हे सर्वांनाच ठाऊक असते असे नाही.

भगतसिंगांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे झालेले संगोपन यांची त्यांच्या विचारांना व जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका राहिली. जालंदर जिल्ह्यातील कलन या गावी २७ सप्टेंबर १९०७ रोजी एका देशभक्त कुटुंबात भगतसिंगांचा जन्म झाला. सरदार किशनसिंग हे त्यांचे वडील. आपल्या मुलाच्या जन्मापूर्वी कधीतरी त्यांनी लायलपूरला (आताचे फैसलाबादनगर) स्थलांतर केले. देशभक्ती, सामाजिक सुधारणा आणि देशाचे स्वातंत्र्य यासाठी त्यांचे कुटुंब ठामपणे उभे राहिले. भगतसिंगांचा जन्म झाला, तेव्हा त्यांचे वडील किशनसिंग आणि काका स्वर्णसिंग कारावासात होते. त्यांचे दुसरे काका अजितसिंग क्रांतिकारी राष्ट्रवादी नेते होते. त्यांच्या शेतकरी वर्गातील राष्ट्रवादी कार्यामुळे त्यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात आले होते.

बालपणीच भगतसिंगांच्या मनात देशभक्तीच्या भावना निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या घरी वारंवार येणाऱ्या क्रांतिकारी नेत्यांच्या संपर्कात येण्याची संधी त्यांना मिळाली. १९१९ साली जालियानवाला बाग हत्याकांड झाले, त्या वेळी भगतसिंग लाहोरच्या डी.ए.व्ही. स्कूलमध्ये शिकत होते. या घटनेचा त्यांच्यावर विलक्षण परिणाम झाला. त्या वेळी त्यांचे वय केवळ १२ वर्षांचे होते. निष्पापांच्या रक्ताने पवित्र झालेली मूठभर माती गोळा करण्यासाठी ते जालियानवाला बागेत गेले. एक आठवण म्हणून त्यांनी ती आयुष्यभर सोबत बाळगली.

‘सरकारी मदत मिळणाऱ्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था सोडा’ असे गांधींनी आवाहन केल्यानंतर भगतसिंगांनी डी.ए.व्ही. स्कूल सोडले आणि लाला लजपतराय व भाई परमानंद यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय शाळेत प्रवेश घेतला. याच शाळेत भगतसिंगांचे भगवतीचरण व्होरा, सुखदेव व यशपाल यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. या सर्वांनी पुढे असहकाराच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला.

ऑक्टोबर १९१७च्या ‘रशियन क्रांती’चाही भगतसिंग व त्यांच्या कॉम्रेडसवर फार मोठा वैचारिक प्रभाव पडला. युरोपमधील तुलनेने मागासलेल्या देशातील कामगार व शेतकरी यशस्वीपणे क्रांती संघटित करू शकतात, तर साम्राज्यवाद्यांच्या गळफासापासून मुक्त होण्यासाठी आणि आपल्याला हवे असणारे सामाजिक बदल करण्यासाठी वसाहतवादी देशातील जनता का तयार होणार नाही? असे भगतसिंगांना वाटले आणि ते नव्या राष्ट्रउभारणीच्या कल्पनेने झपाटून गेले.

भगतसिंगांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना आकार देणारे बरेच घटक आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे १९२२ साली चौरीचौरामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे असहकाराचे आंदोलन बरखास्त करण्याचा गांधींनी अचानक निर्णय घेतला. त्यामुळे देशातील बऱ्याच युवकांचा अपेक्षाभंग झाला. जोगेशचंद्र चटर्जी, सूर्य सेन, जतीनदास, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेवसिंग, शिव वर्मा, भगवतीचरण व्होरा, जयदेव कपूर आणि त्यांच्या बरोबरीने इतर बऱ्याच जणांनी असहकाराच्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्यांच्यापैकी बरेच जण भावी क्रांतिकारक होते.

‘एका वर्षात स्वराज्य’ अशी गांधीजींनी घोषणा केल्यामुळे त्यांच्यात राष्ट्रवादाचा उत्साह संचारला होता. पण असहकाराचे आंदोलन बरखास्त केल्यामुळे त्यांचा तात्पुरता हिरमोड झाला. भारताला कोणत्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देता येईल, याचा युवकांनी विचार करायला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे भगतिसिंग. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या गळफासापासून देशाला मुक्त करायच्या आणि नवी समाजरचना निर्माण करायच्या ज्वलंत ईच्छेने त्यांच्या वैचारिक प्रक्रियेचा ताबा घेतला. संघर्षाच्या नव्या पद्धतींचा शोध घेत असताना क्रांतिकारकांअगोदरच्या पिढीने हिंसक साधनांच्या केलेल्या उपयोगाकडे ते वळले. भगतसिंगांनी ‘गदर चळवळी’च्या क्रांतिकारकांपासून प्रेरणा घेतली. धर्माची राजकारणापासून फारकत करण्याचा गदरवाद्यांनी केलेला प्रयत्न आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन यांचा भगतसिंगांवर खूप प्रभाव पडला. २० वर्षांच्या कोवळ्या वयात मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या कर्तारसिंग सरभा यांच्या धैर्याने आणि आत्मसमर्पणाच्या प्रेरणेने त्यांना विशेष स्फूर्ती मिळाली. भगतसिंगांनी सरभा यांना आपला आदर्श मानले आणि त्यांचे छायाचित्र सदैव आपल्या खिशात बाळगले.

भगतसिंग अगदी बालपणापासून पुस्तके वाचण्यात गर्क असत. लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या ग्रंथालयाला त्यांनी आपले घरच बनवले होते. त्यांचे सदऱ्याचे खिसे नेहमी पुस्तकांनी भरलेले असत. ते जेव्हा घरी येत, तेव्हा त्यांच्या एका खिशात पुस्तक आणि दुसऱ्या खिशात पिस्तूल असे, अशी आठवण त्यांची आई विद्यावतींनी सांगितली आहे.

वाचनाची ओढ त्यांनी आपल्याबरोबर तुरुंगातही नेली. तिथेही आपल्या तारुण्याची जवळपास दोन वर्षे त्यांनी वाचनात घालवली. वयाची २४ वर्षे पूर्ण होण्याअगोदर गळफासाच्या दोराने त्यांचे आयुष्य संपवले. त्यांच्या कारावासातील रोजनिशीवरून त्याबद्दलची माहिती समजते. कारावासात वाचलेल्या पुस्तकांची त्यांनी रोजनिशीत टिपणे काढली होती.

भगतसिंगांनी खटल्याच्या वेळी केलेली निवेदने, वृत्तपत्रे, मित्र व नातेवाईक यांना लिहिलेली पत्रे, यातून त्यांच्या मनोगुणांची आणि समाज, सामाजिक व राजकीय चळवळी यांच्याविषयीच्या व्यापक आकलनाची साक्ष पटते.

सरतेशेवटी ते मार्क्सवादी बनले, पण त्यांनी आयत्या तयार झालेल्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही. व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय प्रश्नांशी नेटाने टक्कर देत ते अवघड वाटेने मार्क्सवादाकडे वळले. लेनिन, मार्क्स व ग्राम्ची यांनी दाखवलेल्या वाटेवर पावले टाकत, त्याचा परिपाक म्हणून भारतासाठी समाजवादाचा मार्ग शोधण्याची त्यांच्यात क्षमता होती. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी फार मोठा प्रवास केला, त्यातून ती निर्माण झाली होती. सुरुवातीला भगतसिंगांचा अराजकवादी हिंसेवर विश्वास होता, पण लवकरच त्याचा त्यांनी त्याग केला. हळूहळू पण जलदगतीने ते समाजवाद व मार्क्सवादाकडे वळले… क्रांतिकारक व मार्क्सवादी बनले.

लाहोर सोडून भगतसिंग कानपूरला आले, तेव्हापासून त्यांच्या क्रांतिकारी कार्याचा कालखंड सुरू झाला. वयाच्या १६व्या वर्षी (१९२३) भगतसिंगांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला. क्रांतीची उद्दिष्टे त्यांनी जवळपास सात वर्षांत साध्य केली. या काळात त्यांनी राजकीय क्रांतिकारी कृती केल्या नाहीत, पण राजकीय लेखन केले. मुख्य म्हणजे त्यांनी संपूर्ण देश पायाखाली घातला. जगातील उत्तम साहित्याबरोबरच इतिहास, अर्थशास्त्रावरील पुस्तके वाचली. उर्दू, हिंदी, पंजाबी आणि इंग्रजीत लेखनही केले. संस्कृतवरही त्यांची चांगली पकड होती. कारण शाळेत त्यांनी या भाषेचा अभ्यास केला होता. त्यांचे आजोबा अर्जुनसिंग यांनी त्यांना त्यासाठी उत्तेजन दिले. नझरुल इस्लाम आणि रवींद्रनाथ टागोरांसारख्या कवींच्या कविताही त्यांना तोंडपाठ होत्या. काही काळ त्यांनी बंगाली भाषेचा अभ्यासही केला.

नंतर ते दिल्लीला गेले. तिथे त्यांनी ‘वीर अर्जुन’ या हिंदी दैनिकात काम करायला सुरुवात केली. १९२५च्या अखेरीस ते पुन्हा कानपूरला परतले. तिथे त्यांनी काकोरी कटातील राजबंद्यांना कारावासातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.

कानपूरला भगतसिंग गणेश शंकर विद्यार्थी यांच्याबरोबर राहत. तिथे त्यांची ओळख बटुकेश्वर दत्त, बिजॉय कुमार सिन्हा व चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली. १९२३च्या अखेरीस ते सचिंद्रनाथ संन्याल यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थान रिव्होल्युशन असोसिएशन’मध्ये सामील झाले. त्या वेळी त्यांनी ‘प्रताप प्रेस’मध्ये काम करायला सुरुवात केली. संन्याल यांच्या ‘बंदी जीवन’ या पुस्तकाचा त्यांनी पंजाबीत अनुवादही केला.

१९२९ साली ‘सार्वजनिक सुरक्षा विधेयक’ आणि ‘व्यापार विवाद विधेयक’ या दडपशाही करणाऱ्या दोन विधेयकांचा निषेध म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेत एक बॉम्ब फेकला. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा कळस ठरला. पहिल्या विधेयकाद्वारे भारतातून ब्रिटिश व विदेशी कम्युनिस्टांना हाकलून लावण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला मिळणार होता, तर दुसऱ्या विधेयकाद्वारे कामगारांचा कामगार संघटना काढण्याचा हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा इरादा होता. या कायद्यांनी सर्वसाधारण नागरी स्वातंत्र्याची केवळ गळचेपीच झाली नसती, तर आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांचे हक्कदेखील मर्यादित झाले असते. त्याविषयीचा निषेध भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेवर बॉम्ब फेकून व्यक्त केला. यासाठीची प्रेरणा त्यांना मिळाली ती एका पुस्तकातील एका विधानावरून.

लाला लजपतराय यांच्या ग्रंथालयाला जोडून असलेल्या द्वारकादास ग्रंथालयाच्या राजाराम शास्त्री या तरुण (वय वर्ष २०) ग्रंथपालाने फ्रान्समधील व्हॅयलन (Vaillant) या अराजकतावाद्याचे ‘Anarchism and Other Essays’ हे पुस्तक भगतसिंग यांना वाचावयास दिले. त्यात ‘Psychology of Violance’ हे प्रकरण होते. त्या प्रकरणात ‘It takes a loud voice to make the deaf here’ असे ऐतिहासिक विधान होते. ते पुस्तक वाचल्यावर भगतसिंग शास्त्रीला म्हणाले, “मित्रा, तू मला साहित्याचा उत्कृष्ट नमुना दिलास.”

भगतसिंग इतक्या झपाट्याने पुस्तके वाचायचे की, द्वारकादास ग्रंथालयाच्या सेवकांची दमछाक व्हायची. ते आणखी जगले असते तर विद्यापीठातील नामांकित प्राध्यापक झाले असते, अशी आठवण राजाराम शास्त्री यांनी सांगितली आहे.

राजाराम शास्त्री समाजवादी होते. त्यांचे ‘अमर शहिदों के संस्मरण’ हे पुस्तक १९८१ साली प्रकाशित झाले. त्यात त्यांनी भगतसिंगांबद्दल एका आठवण सांगितली आहे. भगतसिंग नियमितपणे शास्त्रीच्या घरी जाऊ लागले, तेव्हा त्यांनी नियमितपणे येणारे वाचक म्हणून त्यांची आपल्या वहीत नोंद केली. एकदा विनायक दामोदर सावरकरांचे ‘First war Independance’ (पहिले स्वातंत्र्य युद्ध) हे पुस्तक भगतसिंगांच्या हातात होते. ते शास्त्रींनी पाहिले. ते त्यांनी कुठून मिळवले, हे मात्र त्यांना ठाऊक नव्हते.

ते पुस्तक गुप्तपणे प्रकाशित करण्यात आले होते. त्याचे दोन खंड होते आणि त्याची किंमत आठ आणे होती. ‘First war Independance’ (पहिले स्वातंत्र्य युद्ध) हे पुस्तक वाचून भगतसिंग प्रभावित झाले होते. अनारकली बाजारातील पुस्तक विक्रेत्यांकडून त्यांनी समाजवादावरची बरीच पुस्तके खरेदी केली होती. भारतात बंदी घातलेली पुस्तके इंग्लंडहून चोरून आणली जात, ती अनारकली बाजारातील विक्रेत्यांकडे मिळत. बहुधा ते त्यांना तिथेच मिळाले असावे.

पुस्तके वाचण्याची भगतसिंगांची तहान बहुधा कधीच भागणारी नव्हती. त्यांच्या वाचनाची एक खास पद्धत होती. ते पुस्तक वाचून झाल्यावर त्याविषयी मित्रांशी चर्चा करत असत. नव्या ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला झालेल्या आकलनाची समीक्षा करत. मृत्युची तलवार डोक्यावर टांगलेली असताना भगतसिंग नेहमीप्रमाणे पुस्तके वाचक असत.

विशेष लक्षात घेण्यासारखी एक लक्षणीय गोष्ट आहे. ती म्हणजे स्वातंत्र्ययोद्धा असण्यापेक्षा मुख्यत: आपण समाजवादी विचारांचे प्रचारक आहोत, अशा दृष्टीकोनातून भगतसिंग यांनी स्वत:कडे पाहिले. उदाहरणार्थ, आपल्याला दिल्या जाणाऱ्या फाशीची अंमलबजावणी करणाऱ्या जल्लादाची (हँगमन) वाट पाहणाऱ्या आणि दु:खी-कष्टी झालेल्या सुखदेवाला लिहिलेल्या पत्रात भगतसिंग म्हणतात -

“आपण क्रांतिकार्य हाती घेतले नसते, तर कोणत्याही प्रकारचे क्रांतिकार्य सुरू झाले नसते, असे तुला सूचवायचे आहे काय? पर्यावरण बदलण्यास आपण काही मर्यादेपर्यंत मदत करू शकलो, ही गोष्ट जरी बरोबर असली तरीही… आणि हाच तुझा वादाच्या मुद्दा असेल तर तू चुकत आहेस. शेवटी आपण आपल्या काळाच्या गरजेची निर्मिती आहोत. मी पुढे जाऊन असेही म्हणेन की, साम्यवादाचा (कम्युनिझम) जनक मार्क्स, तोही या विचारसरणीचा जनक नव्हता. युरोपातील औद्योगिक क्रांतीने विशिष्ट पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तींची निर्मिती केली. या व्यक्तीपैकी मार्क्स ही एक व्यक्ती होती. आपल्या काळी असलेल्या परिस्थितीला मार्क्सने नि:संशयपणे एक विशिष्ट गती द्यायला मदत केली. आपल्या देशातील समाजवादी किंवा साम्यवादी विचारांना मी आणि तूसुद्धा जन्म दिलेला नाही, तर आपल्या काळाच्या व आपल्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीच्या परिणामांची ती निष्पत्ती आहे.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

भगतसिंगांच्या मोठेपणाची आणि परिपक्व आकलनाची साक्ष आपल्याला राजकारणाच्या दुसऱ्या एका क्षेत्रात पटते. भारतीय समाज व भारतीय राष्ट्रवाद यांच्यापुढे जातीयतावादाचा फार मोठा धोका उभा राहिला आहे, हे त्यांनी ओळखले होते. वसाहतवाद हा भारतीय जनतेचा जितका शत्रू आहे, तितकाच जातीयतावादही आहे, हे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे, अशा दृष्टीने धर्माकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. ते ‘नौजवान भारत संस्थे’चे संस्थापक महासचिव (जनरल सेक्रेटरी) होते. या संस्थेच्या सहा नियमांपैकी दोन नियम असे आहेत – १) जातीयतावादी फैलाव करणाऱ्या जातीय संस्था किंवा इतर पक्ष यांच्याशी आपले काही देणे-घेणे नाही. २) जनतेत सर्वसाधारण सहिष्णूतेची भावना निर्माण करणे. धर्म हा माणसाच्या व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे व त्यानुसार त्या व्यक्तीला पूर्णपणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे.

१९२५ साली नागपूरहून डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या कार्याला सुरुवात केली. ‘हिंदू महासभा’ तर त्याच्याही आधीपासून आघाडीवर होती. त्याच वेळी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘नौजवान भारत सभे’ची (१९२६) स्थापना केली. संघाला समाजात दुफळी निर्माण करायची होती, तर सभेला समाजात ऐक्य निर्माण करायचे होते. १९२० साली जातीयतावादाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. मुस्लिमांनीदेखील तबलीगसारखी चळवळ सुरू केली होती. जातीयतावाद्यांमध्ये स्पर्धा सुरू करायचे धोरण राज्यकर्त्यांनी राबवायचे ठरवले असल्याची जाणीव भगतसिंगांना झाली होती. अखेर त्याचा शेवट १९४७ साली देशाच्या फाळणीत झाला.

पुस्तकांशिवाय भगतसिंगांची कल्पना करणेही अवघड आहे. २३ मार्च १९३१. भगतसिंगांच्या फाशीला अवघे काही तास उरले होते. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला आले. ही त्यांची शेवटची भेट होती. त्यांनी भगतसिंगांसाठी एक पुस्तक आणले होते. त्याचे नाव होते – ‘The Revolutionry Lenin’. मेहतांनी पुस्तक दिल्यावर भगतसिंगांनी ते लगेच वाचायला सुरुवात केली. आपल्याकडे फार थोडा वेळ उरलेला आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यांच्या फाशीची वेळ अकरा तासांनी अलीकडे आणण्यात आली होती. त्या वेळी थंड वारे पाहत होते. भगतसिंग लेनिनचे पुस्तक वाचण्यात गढून गेले होते. त्यांना फाशीच्या तख्याकडे घेऊन जाण्यासाठी पोलीस शिपाई आले. भगतसिंग त्यांना म्हणाले, “क्षणभर थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाशी बोलत आहे. त्यांच्या आवाजात काय होते माहीत नाही, पण शिपाई थांबले. भगतसिंग पुढे वाचत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी ते पुस्तक छताच्या दिशेने उडवले आणि शिपायांना म्हणाले, “चला, आता निघूया.”, अशी आठवण मन्मथनाथ गुप्ता यांनी एके ठिकाणी सांगितली आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

भगतसिंग यांना सर्वसामान्य गुन्हेगारासारखे फाशी जायचे नव्हते. म्हणून फाशीचा दिवस जवळ आला, तेव्हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी पंजाबच्या राज्यपालांना निवेदन दिले की, त्यांना एकाच दिवशी आणि एकत्र फाशी देण्यात यावी. फाशीच्या वेळी हसत हसत ते आपल्या कोठडीतून बाहेर आले, सहजपणे तक्तपोशीवर चढले. त्यांनी काळ्या कापडाने आपले चेहरे झाकून घ्यायचे नाकारले. मृत्युला सामोरे कसे जायचे, हे त्यांनी ठरवले होते. त्यांनी परस्परांना आलिंगन दिले आणि आपली मान खाली न वाकवता ते ताठपणे उभे राहिले… धीरोदात्त क्रांतिकारकांसारखेच मृत्युला सामोरे गेले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लेखक रमेशचंद्र पाटकर कलासमीक्षक आणि मराठी साहित्यिक आहेत.

annapatkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......