डॉ.राजा दीक्षित : राजकीय मंडळी आपल्या गोटातील माणसं नेमत असली, तरी आमच्यासारख्या तटस्थ अभ्यासकांविषयीसुद्धा ते आदरबुद्धीनं वागतात
संकीर्ण - मुलाखत
माधव नागपूरकर, विजयचंद्र थत्ते
  • डॉ.राजा दीक्षित आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 26 September 2022
  • संकीर्ण मुलाखत डॉ.राजा दीक्षित पुणे विद्यापीठ इतिहास शिक्षक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख डॉ. राजा दीक्षित यांची अलीकडेच भारतीय इतिहास अनुसंधान परिषद या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत संस्थेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘सुप्रतिष्ठित प्राध्यापक’ हे पद बहाल केलं आहे. ‘नवभारत’ या वाईच्या प्राज्ञपाठेशाळेतर्फे गेल्या ७४ वर्षांपासून प्रकाशित होत असलेल्या ‘नवभारत’ या मासिकाच्या संपादकपदाची धुराही ते सांभाळत आहेत. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या आगामी अध्यक्षपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं ‘इतिहास शिक्षक’ या त्रैमासिकानं एप्रिल ते सप्टेंबर २०२२चा जोडअंक ‘डॉ. राजा दीक्षित गौरव विशेषांक’ म्हणून काढला आहे. या अंकात दीक्षित यांची दीर्घ मुलाखत प्रकाशित झाली आहे. तिचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

माधव नागपूरकर : आपण करिअरच्या सुरुवातीपासून बोलू या. एसएससीला चांगले मार्क असताना तुम्ही त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे सायन्सला न जाता मात्र आर्टस्कडे का गेलात? मराठी वाङ्मयाची आवड असताना, त्यातही काव्य प्रकाराची आवड असताना तुम्ही इतिहास विषय कसा काय निवडला?

डॉ. राजा दीक्षित : हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे! मी भावे स्कूलच्या ‘अ’ तुकडीत होतो... आणि थत्ते सर आहेतच इथे... त्यांनी आम्हाला शिकवलेले आहे... तर भावे स्कूलच्या ‘अ’ तुकडीतली मुलं सहसा आर्टसला जायची नाहीत आणि मी मॅट्रिक झालो, तेव्हा मी माझ्या वर्गातला एकच असा होतो आणि आमच्या बॅचचे दोघंच असे होतो की, आम्ही आर्टसला गेलो. मी आणि सुरेश कालेकर. तो ‘फर्ग्युसन’ला गेला, मी ‘एस.पी.’ला गेलो. मला अर्थातच लोकांनी वेड्यात काढलं होतं! (अनेक लोक मला आयुष्यभर वेड्यात काढत आले आहेत!) तर याचं कारण हेच होतं की, आर्टस्ला जाणं हे काहीतरी कमीपणाचं मानलं जायचं आणि मला स्वत:ला मात्र आर्टसची अतिशय आवड होती.

तुम्हाला कल्पना आहे की, माझे वडील साहित्य क्षेत्रामध्ये होते आणि त्यांच्यामुळे आमच्या घरामध्ये सदैव पुस्तकं असत आणि साहित्यिक येत असत. अनेक साहित्यिकांना मी माझ्या घरी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला साहित्याची आवड होती. बाकीच्या काही सांस्कृतिक उपक्रमांचीसुद्धा आवड होती. ते एक आकर्षण असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असंही बसलेलं होतं की, आपण प्राध्यापक व्हायचं. आणि हा निर्णय मी तेव्हाच घेतला होता. मॅट्रिकला असतानाच आर्टसला जायचं हे पक्कं ठरलं होतं. आर्टस् ही आवड घरातच माझ्यात निर्माण झाली. मी गमतीनं असं म्हणतो की, “गवयाचं पोर रडलं तरी सुरातच रहतं, तसं आमच्या घरात आहे!” त्यामुळे मी माझ्या वडिलांसारखाच आर्टसला गेलो, माझा मुलगाही आर्टसला गेला, असा परंपरेचा धागा आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माधव नागपूरकर : इतिहास हा विषय का घेतला? तो त्यामानानं दुर्लक्षित असणारा विषय आहे.

डॉ. राजा दीक्षित सर : त्याचीही गंमत माझ्या घरातलीच आहे. माझे वडील जे लेखन करायचे ते साहित्य आणि इतिहास या दोन्हीशी संबंधित असायचं आणि शाळेतही इतिहास माझा आवडता विषय होता, पण ज्यावेळी करिअर म्हणून कोणता विषय निवडायचा असा प्रश्न आला, त्या वेळी खरं सांगायचं तर माझ्यासमोर पेच होता. मला मराठी आणि इतिहास हे दोन्ही विषय आवडायचे. मग मी असा विचार केला की, जर मराठी साहित्य हा विषय घेतला, तर त्यात एवढा गुंतून जाईन की, कदाचित इतिहासाकडे माझं दुर्लक्ष होईल; पण इतिहास हा विषय घेतला, तर साहित्याचे वाचन हे चालू राहत असल्याने आपण साहित्यापासून तुटणार नाही, असं गणित मी केलं आणि इतिहास विषय घेतला. त्याचाच परिणाम म्हणून असेल, पुढे माझ्या संशोधनामध्ये इतिहास आणि साहित्य यांची सांगड मी घातली.

माधव नागपूरकर : तुम्ही एस.पी. कॉलेजमध्ये गेलात. तिथे अभ्यासाव्यतिरिक्त कशाकशात जास्त भाग घेतलात?

डॉ. राजा दीक्षित : अभ्यास सोडून सगळ्यातच भाग घेतला! वर्षभर अभ्यास सोडून इतरच गोष्टी मी जास्त करायचो आणि वार्षिक परीक्षेच्या आधी काय ते आठ-पंधरा दिवस अभ्यास करायचो. पण तरून गेलो. अडलं काही नाही माझं. एस.पी. कॉलेजने मला यश दिलं, आत्मविश्वास दिला. कनिष्ठ मध्यमवर्गीय वातावरणात आमच्या घरात दारिद्रय म्हणावं अशीच परिस्थिती होती. वडिलांनी समाजकार्याला वाहून घेतलं होतं. त्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडून साहित्य परिषदेत नोकरी केली. तिथं त्रास व्हायला लागल्यावर त्यांनी पुढे नोकरी केली नाही. म्हणजे मी कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हा वडील नोकरीत नव्हते!

माधव नागपूरकर : तुमचे वडील पुस्तकांची सूची करण्याचं काम करायचे, असं मला आठवतंय...

डॉ. राजा दीक्षित : बरोबर! पोटापाण्यासाठी त्यांनी जे काबाडकष्ट केले, त्यातलं हे एक पूरक काम! अनेक चांगल्या ग्रंथांची सूची म. श्री. दीक्षितांची आहे. त्यांनी साहित्य परिषदेतली जी नोकरी सोडली, ती भुक्कड पगाराची होती. त्यामुळे फार फरक पडला असं नाही. आधी ते मिलिटरी अकाऊंटस्मध्ये होते. क्लेरिकल जॉबच होता, पण सरकारी नोकरीत पुष्कळ बरं असतं. पुढे वडिलांनी ती चांगली नोकरी सोडली आणि ही अगदी कमी पगाराची नोकरी स्वीकारली. हौस म्हणून, २५ वर्षं नोकरी करूनसुद्धा त्यांना अगदी नगण्य पगार होता.

नागपूरकर : आता तुमच्याकडे इतिहास आणि वाङ्मय या दोन्ही विषयांचा प्रचंड ज्ञानसाठा आहे. या दोन्ही विषयांचं चौफेर वाचन कोणत्या काळात झालं? ती वाचन-तपश्चर्या कुठल्या काळामध्ये झाली?

डॉ. राजा दीक्षित : वाचन आणि व्यासंगाला पर्याय नाही. त्याशिवाय तुम्ही बौद्धिक क्षेत्रामध्ये उभे राहू शकत नाही. कसंय की, वाचनाची मला लहानपणापासून आवड, कारण मी पुस्तकांतच वाढलो. बाकीचं दारिद्रय असेना का! वडील पुस्तकं विकत नव्हे, पण वाचायला आणायचे. स्वत: लिहायचे. त्यामुळे पुस्तकाचं वातावरण होतं, त्यांना परवडायचं नाही ना, त्यामुळे ते सहसा पुस्तक विकत घ्यायचे नाहीत. किंबहुना मी घेतलेलेसुद्धा त्यांना पटायचे नाही; पण मला ते व्यसन आहे आणि तेच व्यसन मुलगा, निखिललाही लागलं. घरात सगळी पुस्तकंच पुस्तकं आहेत, पण याचा मीनलला फार त्रास होतो. मी एम.फिल करत होतो, तेव्हा केवळ त्यासाठी जमवलेली पुस्तकं मी तिच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवायचो. ते वाढता वाढता इतकं वाढायला लागलं की, शेवटी ती हताश होऊन मला म्हणाली की, “अरे, मला आता या आरशात माझा चेहरा दिसेल एवढी तरी जागा शिल्लक ठेव!” हे असं तिला कायमच भोगावं लागलंय माझ्यामुळे. वाचन हा माझा सततोद्योग होता...

माधव नागपूरकर : एम.फिल.ला तुमचा विषय काय होता?

डॉ. राजा दीक्षित : एम.फिल.ला केशवसुतांवर काम केलं. तो विषय लांबलचक होता – ‘१९व्या शतकाअखेरच्या महाराष्ट्रातील समाजविचार आणि कवी केशवसुत’. त्याचं पुस्तक जेव्हा झालं, तेव्हा ‘इतिहास, समाजविचार आणि केशवसुत’ असं सुटसुटीत नाव दिलं. इंग्रजीमध्ये ज्याला ‘Sociology of Literature’ असं म्हणतात, म्हणजे ‘साहित्याचे समाजशास्त्र’. त्याचा वापर करून मी ऐतिहासिक वास्तवावर प्रकाश टाकण्यासाठी साहित्य हे साधन म्हणून वापरलं. समाजातलं वास्तव, विचारप्रवाह आणि साहित्य यांच्यातलं नातं आणि परस्पर प्रभाव कसे असतात, ही थीम होती आणि त्याचा विशेष संदर्भ होता केशवसुत.

माधव नागपूरकर : त्या निमित्तानं काव्याचं वाचन?

डॉ. राजा दीक्षित : काव्य ही तर माझी खास आवड आहे. काव्य काय आणि गद्य काय, ‘अखंडित वाचित’च जन्म काढलाय! अर्थात अनेकदा कामामुळे मला वाचनाला वेळ कमी पडतो. उदा. मला इंग्रजी साहित्य वाचायला वेळ मिळत नाही. मी जेवढं वाचायला पाहिजे, तितकं इंग्रजी साहित्य वाचू नाही शकलो, वाचनाचा म्हणून एक मोठा बॅकलॉग आयुष्याच्या उत्तरार्धात मला अधिकच जाणवत गेला. काही कामं इतका वेळ खातात की, मग मी जेव्हा आणि जिथे वेळ सापडेल तिथे वाचत सुटतो. तासनतास काम चालू असतं, तेव्हा ‘Change of work is rest’ या न्यायाने थोडा वेळ एखादा कवितासंग्रह किंवा पुस्तक वाचत बसतो. डॉक्टरांच्या दवाखान्यातला ‘वेटिंग पीरियड’ हा बऱ्याचदा माझा वाचनाचा काळ असतो. लाल डब्याची गाडी असो वा विमान असो, एकट्याने केलेल्या प्रवासांमध्ये वाचन हे ठरलेलं. प्रवासात निसर्गशोभा पाहायला आवडत नाही का मला? पण त्या बाबतीत मन मारून वाचनालाच प्राधान्य. बरेचदा झोप लागत नाही म्हटल्यावर मध्यरात्री उठून तास-दोन तास वाचत बसतो. त्या-त्या वेळी गरजेचं वाटणारं वाचतोच, पण कधीकधी ‘काहीही’ वाचतो. कुसुमाग्रजांची कविता आहे ना की, ‘प्रेम कुणावरही करावे’, तसं आम्ही म्हणतो की, ‘संशोधन कशावरही करावे’ आणि ‘वाचन कशाचेही करावे!’ अशा प्रकारे वाचनवेड जोपासणं, हेसुद्धा काव्यमय आहे!

विजयचंद्र थत्ते सर : केशवसुतच का आवडतात?

डॉ. राजा दीक्षित : कसंय ना, मी ज्या विषयाचं काम केलं – ‘१९वं शतक आणि सुधारणावाद’, त्याला त्या काळातला अगदी अनुकूल कवी केशवसुत हा होता. कवी म्हणूनही ते श्रेष्ठ होते आणि संशोधनाला घेण्याचं प्रमुख कारण विलक्षण आहे! ते असं आहे- आम्हाला एम.फिल.ला एक पेपर होता. त्याच्यात एक साहित्याविषयीचा घटक होता आणि देशपांडे सरांनी ते फार छान शिकवलेलं होतं. त्यातून मला साहित्याची आवड! तर झालं काय की, एम.फिल.च्या परीक्षेत त्यांनी साहित्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. त्याचं काही सगळ्यांनी उत्तर लिहिलं नाही, कारण ऑप्शन असतो. मी त्याचं उत्तर लिहिलं आणि मी परीक्षेत पहिला आलो. पण मी एक विलक्षण असा एक प्रसंग सांगतो. परीक्षा झाली, निकाल लागला. सरांनी मला बोलवून घेतलं त्यांच्या केबिनमध्ये. ‘बस’ म्हणाले. पेपरचा गडा उघडला, माझा पेपर वर काढला. म्हणाले- ‘हा तुझा पेपर बघ.’ आधी मला भीती वाटली. मग म्हणाले, ‘हे उत्तर तू इतकं चांगलं लिहिलं आहेस की, त्या अनुषंगाने तू (केशवसुतांवर) काम कर. हवं तर घेऊन जा तुझा हा पेपर वाचायला पुन्हा एकदा!’ हा फार थ्रिलिंग अनुभव होता. त्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

विजयचंद्र थत्ते : देशपांडे सरांचं जे साहित्य प्रेम होतं, त्याचे तुमच्यावर विशेष संस्कार झाले का? इतिहासापेक्षा जरा झुकतं माप त्यांनी साहित्याला दिलं का?

डॉ. राजा दीक्षित : खरं तर साहित्याच्या बाबतीत सरांचे माझ्यावर खूप संस्कार आहेत असं नाही. कारण मुळातच साहित्याची आवड आणि थोडीफार जाण माझ्याकडे होती. मात्र सरांमुळे ती वाढीला लागली. त्यांच्यामुळे मी साहित्याच्या समाजशास्त्राकडे वळलो. इतिहासापेक्षा त्यांनी साहित्याला झुकतं माप दिलं, असं अजिबात म्हणता येणार नाही. ते माझ्या बाबतीतसुद्धा म्हणता येणार नाही. इतिहासापेक्षा साहित्याला ‘झुकतं माप’ आम्ही दिलं नाही, पण इतिहासासंदर्भात साहित्याला जे ‘चुकतं माप’ दिलं जात होतं, ते जागेवार आणण्याचा प्रयत्न आम्ही केला! या संदर्भातले माझे मूळ विचार सरांच्या मार्गदर्शनामुळे विकसित होत गेले. त्यांना संशोधनात्मक बैठक प्राप्त झाली.

विजयचंद्र थत्ते : लोकांना काही वेळा तुमच्यात देशपांडे सरांचा भास होतो. त्यांचे नेमके कोणते संस्कार झाले तुमच्यावर?

डॉ. राजा दीक्षित : सरांच्या संस्कारांविषयी किती आणि काय बोलू थत्ते सर! त्यांचे बौद्धिक संस्कार माझ्यावर झालेच झाले. माझी इतिहासविषयक दृष्टी विकसित होत असताना हे संस्कार झाले. प्रा. अरविंद देशपांडे हे उत्तम दर्जाचे विद्वान होते. असा विद्वान माणूस चांगला शिक्षक असतोच असं नाही; पण देशपांडे सरांचं अध्यापनही अतिशय दर्जेदार असायचं. त्याचेही संस्कार माझ्यावर झाले आहेत. विद्वानांमध्ये काही वेळा तुटकपणा किंवा तुसडेपणा आढळतो. कधीकधी लोक त्यांचा इतका वेळ खातात की, त्यांना तुटक राहावंही लागतं म्हणा! पण सरांच्या स्वभावात हा तुटकपणा कायमचा वजा झालेला! त्यांच्या स्वभावात एक उबदारपणा होता, दिलदारपणा होता, माणुसकी होती. माणूस म्हणून ते फारच वरच्या दर्जाचे होते. त्यांच्यात एक अंगभूत सुसंस्कृतपणा होता. वागावं कसं आणि वागवावं कसं, हे त्यांच्याकडून शिकण्याजोगं होतं.

कितीतरी प्रकारे सरांचे संस्कार झाले माझ्यावर! तसं पाहिलं तर मी सरांचा भक्त होतो. कोणाला हा भक्तिभाव जरा अतीच वाटला असू शकेल, पण खरं तर मी सरांचा अंधभक्त नव्हतो. त्यामुळे त्यांचे (जे काय थोडे असतील ते) दोष मला दिसत गेले. जसे माझ्या वडिलांचे अनेक दोष माझ्यात वजा होत गेले, तसे सरांचे काही दोष माझ्यात वजा होत गेले! ‘सर, मला तुमचं हे पटत नाही’ असं आम्ही वेळप्रसंगी सरांना सांगू शकायचो, इतके ते उदार होते. त्यांच्या औदार्याचं एक उदाहरण तर मी कधीही विसरणार नाही. एकदा ‘बालभारती’च्या मीटिंगमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून त्यांचा-माझा तात्त्विक वाद झाला. तो बराच रंगला, पण शेवटी सर म्हणाले, “राजा, तू म्हणतोस, ते पटतंय मला, तसंच करू या!” एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर सर्व सदस्यांदेखत म्हणाले, “शिष्यादिच्छेत पराजयम्।” या औदार्याने मी अवाक् झालो आणि गहिवरलो. या प्रसंगामुळे मी कधीही हुरळून गेलो नाही. उलट वयाने, ज्ञानाने आणि पदाने मोठे असलेली व्यक्ती प्रसंगी किती निरहंकारी पद्धतीने वागू शकते, याचा तो आदर्श नमुना मी सदैव हृदयात जपला. माझ्या एका भाषणानंतर ‘Raja, I am proud of you’ म्हणत सरांनी मला जवळ घेतलं होतं. इतक्या प्रेमानी खुद्द माझ्या वडिलांनीसुद्धा मला कधीही जवळ घेतल्याचं मला आठवत नाही!

माधव नागपूरकर : विद्यापीठात नोकरी करत असतानाच ‘बालभारती’, ‘NCERT’, SSC बोर्ड यांच्या समित्यांवर तुमची नियुक्ती झाली. तो प्रवास कसा झाला? आणि दोन्हींचा बॅलन्स कसा साधला?

डॉ. राजा दीक्षित : काही ‘हितचिंतक’, काही सहकारी यांची अशी समजूत असायची की, राजाला जे मिळतं, त्यात त्याचं कर्तृत्व काहीच नाही; सर्व काही देशपांडे सरांमुळे आहे!, एक गोष्ट खरी की, सर काही वेळा माझ्या नावाची शिफारस करत असत आणि त्यांच्या अनेक उपक्रमांमध्ये मी त्यांचा भरवशाचा सहकारी असायचो. पण व्यक्तीचे गुण पाहून त्यानुसारच शिफारस करण्याइतका विवेक सरांकडे नक्कीच होता. आपले विद्यार्थी पुढे जावेत, असा कोणत्याही शिक्षकाचा प्रयत्न असतो. देशपांडे सरांनी अनेक विद्यार्थि-विद्यार्थिनींबाबत हे केलं आणि मीही तेच व्रत आचरत आलो.

आता बालभारतीचंच घ्या! तेथील माझा प्रवेश सरांमुळे झालेला नव्हता. प्रा. सुरेंद्र बारलिंगे यांनी आपण होऊन ती शिफारस केली होती. बारलिंगे सर हे विद्यापीठातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान, तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष. त्यांची-माझी ओळखसुद्धा नव्हती. मी तेव्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक होतो. माझा ‘किर्लोस्कर’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने एक लेख छापून आला होता. बारलिंगे सरांना माझा लेख खूप आवडला होता. त्यामुळे ते मला ओळखू लागले. एका पाठ्यपुस्तकाच्या परीक्षणासाठी बालभारतीच्या काही सदस्य मित्रांनी प्रा. बारलिंगे सरांना तज्ज्ञाचं नाव विचारलं आणि त्यांनी माझं नाव सुचवलं. त्या कामानिमित्त बालभारतीच्या कार्यक्षेत्रात माझा जो प्रवेश झाला, तो दीर्घकाळ कायम राहिला.

हे खरं, की इतिहास-समितीचे एक सदस्य आणि पुढे अध्यक्ष असलेल्या देशपांडे सरांसोबत मला बालभारतीत खूप काम करता आलं. मी माझं ते भाग्य समजतो, पण हे भाग्य मुळात दुसऱ्या माध्यमातून आणि माझ्या थोड्याफार गुणवत्तेमुळेच माझ्याकडे चालत आलं!

तुम्ही म्हणता त्या संस्थांसाठी व त्याद्वारे शालेय शिक्षणासाठी मी सुमारे पाव शतकाहून अधिक काळ काम केलं. विद्यापीठाच्या कामात थोडीसुद्धा कुचराई न करता हे काम मी केलं. त्यासाठी खूप ताण पडत असे मला, पण ध्येयवादी वृत्तीमुळे मी अशा ताणांमध्येच सारं आयुष्य काढलेलं आहे. अशा समित्यांमध्ये देशपांडे सरांबरोबर काम करणं हा फार समृद्ध अनुभव होता, योगायोग असा की, सरांच्या माघारी त्यांची भूमिका माझ्या वाट्याला आली.

एक काळ तर असा होता की, बालभारती, SCERT आणि SSC बोर्ड या तिन्हींच्या इतिहास-समित्यांचा मी अध्यक्ष होतो. विद्यापीठातली कामं सांभाळून या जबाबदाऱ्या पार पाडणं ही साधीसुधी कसरत नव्हती! पण मी ती केली. या कामांसाठी विद्यापीठात जिथे देशपांडे सरांची उपेक्षा केली गेली, तिथे माझी उपेक्षा होणं ही काही आश्चर्याची बाब नव्हती. “राजा, तू तिसरीचं पुस्तक काय लिहितोस, प्राथमिक शिक्षकांसाठी काम काय करतोस.” असं म्हणत मला हिणवलं गेलं. पण माझं उत्तर ठरलेलं होतं – “मी शैक्षणिक चातुर्वर्ण्य मानत नाही!” काही ठाम वैचारिक भूमिकेतून मी हे व्रत पंचवीस वर्षं आचरलं. कल्पना करा, महाराष्ट्रात सुमारे दोन-अडीच दशकं मी लिहिलेली पाठ्यपुस्तकं अक्षरश: लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं ही माझ्यासाठी विधायक मार्गाने सामाजिक परिवर्तनाला हातभार लावणारी साधनं होती आणि आहेत. हे काम करताना मी सतत प्रयोगशील राहिलो. पुढे माझ्यावरच्या विद्यापीठातल्या जबाबदाऱ्या झपाट्याने वाढत गेल्या आणि या संस्थांच्या कामांवरचा सामाजिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढू लागला. या पार्श्वभूमीवर मी त्या जबाबदारीला पूर्णविराम दिला.

विजयचंद्र थत्ते : काही बाबतीत गुरूंचं अनुकरण तुम्ही छान केलंत. ही अध्यक्षपदं भूषवताना तुम्ही खरोखरच गुरूची परंपरा सांभाळलीत. या समित्यांमध्ये मी स्वत: हे जवळून अनुभवलेलं आहे...

डॉ. राजा दीक्षित : हो सर, आणि या पदांच्या मोहात अडकून पडलो नाही, याचेसुद्धा तुम्ही काय किंवा बापूसाहेब शिंदे काय, साक्षीदार आहात. आहो, जिथे विद्यापीठातल्या नोकरीचा मी धाडकन राजीनामा दिला होता, तिथे इतर गोष्टींची काय कथा! अर्थात कुलगुरू डॉ. श्रीधर गुप्ते आणि देशपांडे सर यांनी तो राजीनामा मागे घ्यायला लावला, ही गोष्ट वेगळी!

माधव नागपूरकर : पुणे विद्यापीठाचा इतिहास आणि फर्ग्युसन कॉलेजचा इतिहास या जबाबदाऱ्या तुमच्याकडे कशा आल्या?

डॉ. राजा दीक्षित : १९९९ साली पुणे विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव होता. त्याच्या कामाची आखणी करताना इतिहासाची कल्पना पुढे आली आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली. मी लेक्चरर असलो, तरी प्रोफेसरच्या दर्जाची कामं माझेकडे येत असत! विद्यापीठ इतिहासाच्या कामाचा कचा आराखडा कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांना सादर करताना मी त्यांना म्हणालो की, “सर, खरं तर हे काम किमान दोन वर्षांचं आहे...” त्यावर ते मला म्हणाले, “दीक्षित, मला हे मान्य आहे. पण सुवर्णमहोत्सव तर सहा महिन्यांवर येऊन ठेपलाय. तो मुहूर्त चुकवून चालणार नाही. म्हणून तर तुमच्याकडे ही जबाबदारी दिलीय...!” त्यांचंही बरोबर होतं म्हणा. विद्यापीठाने पुढच्या सहा महिन्यांत मला अध्यापनात थोडी सवलत दिली, इतिहास-लेखनासाठी मुख्य इमारतीत स्वतंत्र खोली दिली आणि लेखनाचा वेग वाढवता यावा म्हणून एक स्टेनो दिला. दिवसाचे चोवीस तास काही वाढत नाहीत, म्हणून त्या चोवीस तासांतले माझे कामाचे तास शक्य तेवढे वाढवून मी रात्रंदिवस हे काम केले.

माधव नागपूरकर : फर्ग्युसनच्या इतिहासाचं काम...

डॉ. राजा दीक्षित : प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांनी मोठ्या कष्टपूर्वक फर्ग्युसन महाविद्यालयाचा इतिहास लिहिला होता. त्याचा पहिला भाग त्यांनी प्रसिद्ध केला. दुसरा टंकलिखित झाला आणि तिसरा हस्ताक्षरात लिहून झाला. पण एकतर हे काम अतिव्याप्त झालं आणि दुसरं म्हणजे त्यावर, विशेषत: अप्रकाशित भागांवर संस्करण होणं गरजेचं होतं; पण बाचल सरांच्या शेवटच्या आजारपणामुळे त्या कामात मोठाच व्यत्यय आला. पंधराशे छापील पाने होतील एवढा इतिहास प्रकाशित करायला कोणी तयार होणं अवघड होतं. त्यामुळे सुमारे ६००-६५० पानांपर्यंत पृष्ठसंख्या मर्यादित करणं आणि संपादकीय हात फिरवणं गरजेचं बनलं. तसं केल्यावर मेहता प्रकाशन ग्रंथ प्रकाशित करायला तयार होतं. बाचल सरांनी या गोष्टीला आनंदाने संमती दिली. ते फोनवर मला म्हणत असत, “माझा तुमच्यावर पूर्ण भरवसा आहे. तुम्ही कराल ते संपादन मला मान्य असेल.” बाचल सर हे माझ्या फर्ग्युसनमधल्या अध्यापन-काळातले माझे खूपच वरिष्ठ सहकारी. फर्ग्युसनविषयीचे प्रेम, बाचल सरांविषयीचा आदर आणि पुणे विद्यापीठाच्या इतिहासलेखनाचा अनुभव हे सर्व एकत्र आलं आणि मी काम स्वीकारलं. हे सगळं ‘बाळंतपण’ मी वर्ष दीड-वर्ष खपून पार पाडलं, बाचल सरांच्या हाती डी.टी.पी. प्रत ठेवली, तेव्हाचं त्यांचं समाधान कधीही विसरू शकत नाही. पुस्तक प्रकाशित होताना मात्र ते हयात नव्हते, हे मोठं दुर्दैव!

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माधव नागपूरकर : प्रार्थना समाजाच्या इतिहासाचं काम तुमच्याकडे कसं आलं?

डॉ. राजा दीक्षित : एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आधुनिक महाराष्ट्राविषयीच्या, विशेषत: १९व्या शतकाविषयीच्या माझ्या संशोधनाची कल्पना होती. (कै.) डॉ. अरुण टिकेकर यांच्या इच्छेनुसार ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ (१९२७) हा द्वा. गो. वैद्यलिखित ग्रंथ पुनर्मुद्रित करण्याचा निर्णय त्या संस्थेनं घेतला. या ग्रंथाला एखाद्या अभ्यासकाची प्रस्तावना घ्यावी, असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार मला त्यांनी विनंती केली. मी तत्त्वश: होकार दिला; पण पुस्तक बारकाईनं पाहातो, मग तपशील ठरवू - असं सांगितलं. माझ्या लक्षात आले की, या सुमारे ९० वर्षांपूर्वीच्या ७५० पानी ग्रंथाला अनेक नव्या संदर्भाची जोड द्यावी लागेल. संपादन करावं लागेल. मी एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांना सुचवलं की, संपादनामुळे मूळ पुस्तकाचे मोल वाढेल. तुम्ही कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवा. ते म्हणाले, ‘तुम्हीच संपादन करा’. अशा रीतीनं ते काम माझ्याकडे आले.

प्रार्थना समाजाविषयीचं काम पूर्ण केल्यावर तीन संस्थांनी मला त्यांच्या इतिहास-लेखनाची ऑफर दिली. खुद्द एशियाटिक सोसायटी, भांडारकर प्राच्यविद्या संस्था आणि पुणे सार्वजनिक सभा या त्या तीन संस्था. अतिशय जड अंत:करणानं मी हे इतिहास लिहायला विनम्रपणे नकार दिला. कारणं दोन. एक, निवृत्तीपूर्वीची १५ वर्षं तरी विद्यापीठात एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या की, मोठं ग्रंथलेखन शक्य झालं नाही. निवृत्तीनंतर ठरवलं की, आपल्या हातात अॅक्टिव अशी दहा वर्षं ग्रंथलेखनासाठी आहेत, असं समजू. त्यानुसार मनात आखणी सुरू केली. प्रार्थना समाजाचं काम आले, म्हणून तो प्लॅन जरा बाजूला ठेवला, पण दुःख नाही त्याचे. कारण एक मोठं काम झालं हातून. पण आता जर तीन संस्थांचे इतिहास लिहायचे, तर तेच काम दहा वर्षं पुरवेल! मग माझ्या मनात योजलेलं मी लिहू केव्हा?

दुसरी गोष्ट अशी की, संस्थांचे इतिहास लिहिण्यात एक मोठा अडथळा असतो. तो म्हणजे त्या संस्थांचे पदाधिकारी! इतिहासकार या नात्याने त्या संस्थेची चिकित्सा करावी लागते, एखादा टीकेचा मुद्दाही असतो. कारण इतिहास म्हणजे निव्वळ गौरवगाथा वा आरती नव्हे; पण काही वेळा पदाधिकाऱ्यांना हा क्रिटिकल अॅप्रोच पचनी पडत नाही. त्यावरून वाद उद्भवला तर केलेल्या कामावर पाणी पडण्याची शक्यता मोठी! प्रार्थना समाजाचे पुस्तकही एशियाटिकने म्हणजे त्रयस्थ संस्थेने प्रकाशित केले म्हणून बरे, प्रार्थना समाज ते प्रसिद्ध करणार असता, तर काय झालं असतं कुणास ठाऊक!

माधव नागपूरकर : ICHRवरची नियुक्ती कशी झाली?

डॉ. राजा दीक्षित : ICHR काय किंवा विश्वकोश काय, दोन्ही ठिकाणच्या माझ्या नियुक्त्या मी केलेल्या कामामुळे, संशोधनामुळे झाल्या, असे मला वाटते. केंद्रात व राज्यात परस्परविरोधी सरकारे आहेत आणि बरेचदा स्वाभाविकपणे सत्तेतले पक्ष आपल्याला जवळच्या लोकांना नियुक्त करतात; पण चक्क या दोन्ही विरोधी सरकारांना पक्षीय बांधीलकी नसलेला माझ्यासारखा त्रयस्थ अभ्यासक हवासा वाटला, हे चांगलंच आहे. आधीचं काँग्रेसचं सरकार काय किंवा आत्ताचं भाजपाचं सरकार काय, ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (Indian Council of Historical Research)वर त्यांनी आपल्याला अनुकूल सदस्य नेमले यात काही शंका नाही.

ICHRवर देशभरातले सुमारे १५-१६ इतिहास-तज्ज्ञ नेमण्यात येतात. प्रा. अरविंद जामखेडकर अध्यक्ष झाले, तेव्हा ते मला म्हणाले होते की, मला तुमची मदत लागेल. पण केवळ मदत नव्हे, तर बहुधा माझ्यासारखा तटस्थ अभ्यासक असावा, या हेतूने त्यांनी सदस्य म्हणूनच माझी शिफारस केली असावी. त्यांच्या कार्यकालात मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. मी विधायक बुद्धीने व तटस्थ वृत्तीने ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’चे काम करत आलोय. जामखेडकर सर आमच्या गप्पांमध्ये वेळोवेळी माझ्या अभ्यासाविषयी आदरपूर्वक बोलत असत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकाने ‘आदर’ शब्द वापरला की मला फार संकोच वाटत असे. पण मुळात अॅकॅडेमिशियन असल्याने आणि मनाच्या औदार्यामुळे त्यांनी मला अतिशय सन्मानानेच सदैव वागवले. दिल्लीत ICHRच्या कामासाठी गेलो असलो की, दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये बरेचदा ते आणि मी ब्रेकफास्ट आणि डिनर बरोबर घ्यायचो. त्या वेळी ICHRचा विषय बाजूला ठेवून आमच्या बौद्धिक चर्चा चालायच्या. इतिहासाचे नवे प्रवाह, आधुनिक इतिहास, महाराष्ट्रातलं प्रबोधन यावर माझ्याकडून ऐकण्यात त्यांना रस होता, तर भारतविद्या, पुरातत्त्व, कलेचा इतिहास, संस्कृत साहित्य याबाबत त्यांच्याकडून ऐकण्यात मला रस वाटायचा. आमचा तो संवाद हा माझ्यासाठी एक मोठा ठेवाच म्हटला पाहिजे. त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपली, पण नंतर स्थापन झालेल्या सदस्य-मंडळाची मुदत अजून थोडी शिल्लक आहे. मात्र काम करताना त्यांची आठवण सदैव मनात असते. अर्थात अन्य संदर्भात कधीमधी त्यांचा-माझा संवाद असतोच. सुमारे ऐंशीच्या घरातसुद्धा ते ज्या उत्साहाने काम करत असतात, ते थक्क करणारे आहे!

माधव नागपूरकर : नुकतंच तुमच्याकडे ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे अध्यक्षपद आलंय. ते कसं आलं?

डॉ. राजा दीक्षित : ते मलाही पडलेलं कोडं आहे! कारण अशा नियुक्त्या काही वेळा ‘पोलिटिकल’ असतात. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे राजकीय लागेबांधे न पाहता एखाद्या तटस्थ अभ्यासकाची नियुक्ती गुणवत्तेच्या निकषावर करण्याची दृष्टीही असू शकते, हे फार सुखद आहे. महाराष्ट्राचे भाषा विभागाचे मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी चांगले अभ्यासक नियुक्त करण्याची दृष्टी बाळगून डॉ. सदानंद मोरे यांना ‘महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा’च्या अध्यक्षपदी कायम ठेवले आणि मला ‘विश्वकोशा’च्या अध्यक्षपदी नियुक्त केले, असे दिसते. आम्ही दोघे तसे पक्षनिरपेक्ष आहोत. असं बघा की, मला ICHRवर भाजपच्या केंद्र सरकारने नेमलं, विश्वकोशावर त्यांच्या विरोधी राज्य सरकारने नेमलं. पहिल्यांदा अभिनंदनाला ‘मनसे’चे कार्यकर्ते आले, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचा मला प्रेमाने फोन आला. नागपूरहन गिरीश गांधींचा अभिनंदनाचा फोन आला. खासदार कुमार केतकरांचा खूप छान मेसेज आला. खासदार विजय दर्डांचं पत्र आलं. भाजपचे आमदार विजय काळे घरी भेटायला आले. संघ-भाजप वर्तुळातील प्राध्यापक मित्र अनिल तथा ‘एपी’ कुलकर्णी आणि प्राचार्य मुकुंद तापकीरही अभिनंदनार्थ आले. तात्पर्य काय की, बरेचदा राजकीय मंडळी आपल्या गोटातील माणसं नेमत असली, तरी आमच्यासारख्या तटस्थ अभ्यासकांविषयीसुद्धा ते आदरबुद्धीने वागतात. एकंदरीत, मी आजवर केलेल्या तपश्चर्येचं फळ मला असं मिळालं आणि त्यातून मोठं मानसिक बळही मिळालं!

माधव नागपूरकर : तुम्ही बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेली आहे...

डॉ. राजा दीक्षित : हो, २२ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि आणखी दोन-तीन तरी लिहिण्याचे कबूल केले आहे.

माधव नागपूरकर : एवढ्या प्रस्तावना लिहायच्या म्हणजे केवढं वाचन केलेलं असेल! असं लेखन-वाचन करू शकणारी व्यक्ती स्टुडिअसच असणार. त्याचा परिणाम तुमच्या नियुक्तीवर झाला असेल का?

डॉ. राजा दीक्षित : शक्य आहे. अशी नियुक्ती करण्यापूर्वी त्या व्यक्तीची कामगिरी विचारात घेतली जाते. बायो-डेटाचा विचार केला जातो. तसं झालं असेलच.

माधव नागपूरकर : ‘नवभारत’चं संपादकपद कसं आलं?

डॉ. राजा दीक्षित : असंच आलं इतर पदांप्रमाणे! वास्तविक पाहता मी प्राज्ञपाठशाळेचा साधा सभासदही नव्हतो. ‘नवभारत’मध्ये लिहिलं असलं, तरी त्याचा नियमित लेखकही नव्हतो. पण प्रा. श्री. मा. भावे यांच्या मृत्यूनंतर प्रमुख संपादकाचं पद रिकामं झालं. भावे सरांवरच्या विशेषांकात माझा लेख होता. कदाचित त्या लेखामुळे माझा विचार त्यांच्या मनात आला असावा. प्राज्ञपाठशाळेच्या अध्यक्ष डॉ. सरोजा भाटे व अन्य पदाधिकारी मला ओळखत होते. प्राज्ञपाठशाळेचे कार्यवाह श्री. अनिल जोशी यांचा मला फोन आला- “तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही प्राज्ञपाठशाळेचे आजीव व्हावे. तुमच्याकडे काही जबाबदारी सोपवली, तर ती घ्याल का? ‘नवभारत’च्या संपादक मंडळात याल का?” मी ‘हो’ म्हटलं. खरं तर मुख्य संपादक किशोर बेडकिहाळ होणार होते. मी संपादक मंडळाचा सदस्य असणार होतो; पण बेडकिहाळ प्रमुख संपादक व्हायला ‘नाही’ म्हणाले आणि त्यांनी माझं नाव सुचवलं, प्राज्ञपाठशाळेलाही ते मान्य होतं. बेडकिहाळ हे माझे ज्येष्ठ मित्र. त्यांचं मनाचं औदार्य मोठं. त्यामुळे हे पद माझ्याकडे आलं. त्यात अनिल जोशी आणि किशोर बेडकिहाळ यांचा वाटा आहे; पण ही शिफारससुद्धा माझ्या आजवरच्या कामामुळे केली गेली असावी.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकंदरीतच आयुष्यभर प्रचंड कष्ट केले, चिकाटीने संशोधन करत राहिलो, बोलत राहिलो, वाचत राहिलो, लिहीत राहिलो. खूप अन्याय पचवले, हात धुवून मागे लागलेल्या दुर्दैवाकडे पाठ फिरखून कर्मयोग आचरला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची फळं मिळत गेली, दुसरं काय! पद मिळालं की, त्यावर तृप्त न राहाता मी लेगच त्या कामाला जुंपून घेतो. ‘नवभारत’चं संपादन करण्यापासून तीन-तीनदा प्रूफं तपासण्यापर्यंत इतकं काम मी करत असतो की, ‘बाबांची फुलटाईम बिनपगारी नोकरी’ अशी माझी गंमत घरात केली जाते!

विजयचंद्र थत्ते : ‘इतिहास शिक्षक महामंडळ’, महाराष्ट्र या संस्थेत प्रवेश कसा झाला?

माधव नागपूरकर : मला वाटतं देशपांडे सरांमुळे..

डॉ. राजा दीक्षित : हो, ते तर खरंच आहे. काय आहे की, बालभारती, एस.एस.सी. बोर्ड वगैरे संस्था आणि इतिहास शिक्षक महामंडळ यांच्यात एक ‘इंटर कनेक्टिव्हिटी’ होती. काही सदस्य दोन्ही-तिन्हीकडे होते आणि मुख्य दुवा देशपांडे सर हा होता. इतिहास शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष म. कृ. केरुळकर सर हे यामध्ये असायचे. ते माझं देशपांडे सरांबरोबर सतत चाललेलं काम आणि संवाद पाहायचे. डॉ. अ. रा. कुलकर्णी आणि डॉ. अ. म. देशपांडे हे आमचे दोन विद्यापीठीय शिक्षक त्यांच्या महामंडळाचे सल्लागार असायचे, पण त्यांचे व्याप मोठे. त्यामुळे ही सल्लागाराची भूमिका टप्प्याटप्प्याने माझ्याकडे मोठ्या प्रमाणात येत गेली आणि त्यांच्या दोघांच्या माघारी तर मीच दीर्घकाळ महामंडळाचा प्रमुख सल्लागार झालो.

महामंडळाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध आला तो १९८२-८३ पासून. महामंडळाचे एक कृतिसत्र केरूळकर सर मुख्याध्यापक असलेल्या ‘भारत इंग्लिश स्कूल’मध्ये भरले होते. त्यामध्ये आठवीच्या शिक्षकांसाठी मी एक व्याख्यान दिले. हा खरा आरंभबिंदू! त्यानंतर पुढे ‘इतिहास शिक्षक’च्या एका अंकात (वर्ष ८वे, अंक १ला, एप्रिल १९८३ ते सप्टेंबर १९८३) मी ‘इतिहासाचे अध्यापन : सर्जनशीलता आणि उत्पादकता’ असा विषय घेऊन मोठा दहा पानी लेख लिहिला. म्हणजे महामंडळाशी १९८२ साली, तर ‘इतिहास शिक्षक’ या नियतकालिकाशी १९८३ साली मी जोडला गेलो तो आजतागायत. सुमारे चार दशके हे नातं टिकून राहिलं आहे!

१९८०च्या दशकापासूनच माझा अनौपचारिक सल्ला महामंडळ घेत आलं, पण १९९८पासून अधिकृतपणे मी महामंडळाचा सल्लागार आणि २००२ पासून ‘इतिहास शिक्षक’ नियतकालिकाचा संपादकीय सल्लागार म्हणून काम पाहतोय. आस्था बाळगणे आणि हस्तक्षेप वा ढवळाढवळ करणे, यात एक निसरडी सीमारेषा असते. मी आस्थापूर्वक सल्ला देतो, मदत करतो, पण हस्तक्षेप कटाक्षाने टाळतो आणि खरं तर महामंडळाशी माझं नातं औपचारिक संबंधांपेक्षा अनौपचारिक, प्रेमाचं, खेळीमेळीचंच राहिलेलं आहे. उभयपक्षी प्रेम आहे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माधव नागपूरकर : शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊ. तुम्ही तुमच्या आवडीच्या कार्यात विहरत राहिलात, पण हे करताना संसाराकडे दुर्लक्ष झालं, असं वाटतं का?

डॉ. राजा दीक्षित : मी नेहमी एक किस्सा सांगतो. माझे वडील मोठ्या मिश्किलपणे मला म्हणायचे, “राजा, मीनल आहे म्हणून तुझा संसार झाला!” क्षणाचाही विलंब न करता मी म्हणायचो, “हो काका, अगदी खरंय ते!” हा नर्मविनोदी संवाद नव्हे , तर ते एक स्पष्ट वास्तव आहे. माझ्या व्यापा-तापांमध्ये घरच्यांवर अन्याय झाला. निश्चितपणे झाला. अर्थात घरच्यांवरील अन्यायात एक अगतिकता होती. ‘निव्वळ संसारी’ या चौकटीत ना माझे वडील बसू शकले ना मी! मी हाडाचा शिक्षक, पहिल्यापासून अतिशय समाजशील आणि माणसातला, अखंड ज्ञानसाधनेत मग्न, घेईन त्या कामात पूर्ण झोकून देणारा, स्वाभाविकपणे घरच्यांना कमी वेळ दिला गेला. बायको मीनल आणि मुलगा निखिल ही सोन्यासारखी माणसं.

आमच्या एकत्र कुटुंबपद्धतीत घरात दोन बायका ‘हाऊसवाइफ’ म्हणून जगत असताना स्वयंपाक-पाण्यात माझा हातभार लागण्याचा प्रश्न येत नव्हता. बाजारातली चार कामं पडतील तेव्हा करणं, प्रसंगी गिरणीतून दळण आणण्यासारखी कामं करणं, कधीमधी चहा करणं इतपतच आमची मजल होती. नाशिकच्या नोकरीत पावणेदोन वर्षे मी, मीनल आणि निखिल असा संसार होता. तेव्हा मी आपण होऊन स्वयंपाक शिकलो.

अलीकडे सून, चिरंतनाला करोना झाला, तेव्हा आम्ही सगळे होम-कारंटाइन होतो. त्या काळात वाटून घेतलेलं घरकाम मी बिनबोभाट आणि मनापासून केलं. म्हणजे काय, प्रश्न कधी इच्छेचा नव्हता, पण वेळेचा प्रश्न मात्र खूप उद्भवला आणि तेव्हा मात्र घरकामाची आघाडी मी सांभाळू शकलो नाही. त्यामुळे मीनलवर ताण पडला हे पूर्ण मान्य. एकदा मी म्हणालोच होतो की, ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो’ असा वर मीनल बहुधा मागणार नाही, पण मी तसा वर मागायला तयार आहे. इतकं श्रेय तिला आहे. अर्थात हे अलंकारिक आणि प्रतीकात्मक वर्णन बरं का! पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. त्यामुळे तर या जन्मात जमेल तेवढं काम करून ठेवण्यावर माझा भर असतो! पैसा आणि पदं येतात आणि जातात, चांगली माणसं मिळावी लागतात. मीनल आणि निखिलने ते सुख-स्वास्थ्य दिलं, म्हणूनच मी एवढं काम उभारू शकलो. चिरंतना आणि आदित्यने आमच्या सुखी संसाराची गोडी वाढवली आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......