अजूनकाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीच्या लढ्यासाठी चार चाके मुखर केली होती अन् त्यांच्याच आधारे कणाहीन माणसांना गुलामीच्या बंधनातून मुक्त केले. ही चार चाके होती रस्त्यातला लढा, सभागृहातील चर्चा, कोर्टातील वाद-विवाद आणि साहित्याच्या माध्यमातून केलेली मनाची मशागत. ही चार चाके एक प्रकारची शस्त्रे-अस्त्रे होती अन् त्यांचा मूलधार होता ब्रेन आणि पेन. रस्त्यावरचा लढा करण्यास बळ दिले ते मेंदूने आणि लेखणीने. हा मेंदू आणि धारदार असलेली लेखणी तयार करण्यासाठी त्यांनी उच्चशिक्षणाला महत्त्व दिले. काहींनी शिखरावरच्या गरुडाप्रमाणे बलवान व्हावे, शिखराच्या पायाशी असलेल्यांना हात द्यावा आणि समता प्रस्थापित करावी, ही अपेक्षा उच्चविद्याविभूषित लोकांकडून बाबासाहेबांनी ठेवली होती. खरे तर ही जाणीव सर्वच उच्चपदस्थांना नसते.
रस्त्यातील लढ्याला अभय आणि बळ द्यावे, लढा प्रखर करावा, या विचाराने सजग झालेले लोक बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक म्हणून निर्माण होत आहेत. अशांपैकी एक नाव आहे- सुनील अभिमान अवचार यांचे. नावातच अभिमान असल्यामुळे संघर्ष हा त्यांच्या स्थायीभाव ठरतो. यातूनच ‘काळोखावरची टोळधाड’ ही त्यांची दीर्घ कविता साकारली आहे. या संदर्भात एक आंग्ल कवीने म्हटले आहे- “When I slept Tound that life is beauty, when I woke I found that life is duty”.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
काहींना सौंदर्याची स्वप्न पडतात, तर काहींना आपल्या कर्तव्याची जाणीव होते. सुनील अभिमान अवचार या कवीला संघर्षाचं स्वप्न दिसतं अन् हा संघर्ष त्यांना प्रेरित करतो, तो २९ मे १९७२ रोजी स्थापन झालेल्या ‘दलित पॅंथर’ या चळवळी संदर्भात. या चळवळीने वर्णहीन व वर्चस्वहीन चळवळ उभारली म्हणूनच आजचा तरुण ‘आजादी’च्या प्रतीक्षेत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी एक नाममात्र आझादी मिळाली. २६ जानेवारी १९५० रोजी एक वचन देण्यात आले, परंतु वचनपूर्तता न झाल्यामुळे १५ ऑगस्ट १९७२ रोजी दलित पॅंथरने साजरा केलेला ‘काळा स्वतंत्र दिवस’ कवीला अस्वस्थ करतो, अन् मग तो सहजच लिहितो की,
“प्रियाबलला गिधाडांनी चोची मारून मारून
केले आहे रक्तबंबाळ’
या रक्तबंबाळ होण्याचे कारण काय आहे?
“जात दबा धरून बसली आहे माणसाच्या मनात
जात चिकटलेली काळजाला
लोकशाहीच्या उरावर धर्मांधतेचा झेंडा फडकला आहे”
याचा परिणाम असा झाला की, दुश्मनांचीच संख्या वाढते आहे, आता मित्रच शत्रू झाले तर अशा वेळी “मित्रा पँथर, तू आठवत राहतो.... हाताची बंद मूठ करून स्वाभिमानाने निळा झेंडा घेऊन अन्यायावर चित्त्यासारखा चवताळुन जाऊन आज घडीला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ..... ‘तुमचा स्वातंत्र्य दिवस तर आमचा काळा स्वातंत्र्य दिन...’ साजरा करत असताना तुझी कमतरता जाणवते पॅंथर, कारण संविधानाने समता, स्वातंत्र्य बंधुतेचे अभिवचन दिले असले तरी “चोखोबा अजूनही उभा आहे शेवटच्या पायरीवर” इतकी वर्षे उलटली तरी पायरी नष्ट झाली नाही, समता प्रस्थापित झाली नाही.
“नवरदेव घोड्यावर बसला तर होते दगडधोंड्यांची बरसात
कामाचा मोबदला मागितला तर बोटे जातात छाटली,
पिण्याच्या पाण्यात फेकले जाते मेलेले कुत्रे वा विष्ठा
दूरवर पाहायला लागलो तर काढून घेतले जातात गवई बंधूंचे डोळे”
अन्यायाची दाद मागायला गेलेल्या गवई बंधूंचे बुब्बुळासह डोळे खेचले गेले. कवी या अमानवी क्रूरतेने एवढा अस्वस्थ होतो की, त्याला “आठवत राहतात / गवई बंधूंचे डोळे”. गवई बंधूंच्या डोळ्याच्या खाचातला अंधार आणि लटकलेली बुबुळे खेचताना जो अघोर अन्याय झाला, त्यामुळे हे कळेनासे झाले की, ‘जात्यात कोण हाय अन् सुपात कोण? / डल्ला कोण मारते अन् कोण तोंडाला पुसते पाला’.
प्रजासत्ताक देशातल्या नागरिकांना दुय्यम नागरिकत्वाचासुद्धा मान नाही. त्यामुळे ना स्वातंत्र्य, ना प्रजासत्ता, आहे ती फक्त नाकर्त्याची अवस्था. ही अवस्था अशी की,
“दात हाय तर चने नाय / चने हाय तर दात नाय”
ही नकारात्मकता एवढी शिगेला पोहोचली आहे की, वाढणारे हातच परक्याचे असतील, तर पंक्तीत बसण्यास तरी अर्थ काय? कवीला ही ‘नाही रें’ची अवस्था दिसत असली तरी तो आशावादी आहे, कारण जंगल आता बेचिराख होऊ लागलेय, विमुक्त आपल्या खांद्यावर पालं घेऊन आपले अस्तित्व मुखर करत आहेत. तो आता जागा झाल्यामुळे ‘आपल्या घामाचा वाटा मागणार आहे/ पुन्हा एकदा चवताळलेला पॅंथर आला आहे’ हा पॅंथर जब्याचे शरीर स्थिरस्थावर करत आहे. तो आता दगड भिरकावतोय मंदिरातल्या मूर्तीच्या रोखाने. जब्या आता जबाब मागतो आहे. ‘माझ्या धनाचा वाटा कुठाय?’ असा प्रश्न विचारतोय. त्यातूनच रोहित वेमूला जन्म घेतोय, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणत जगभराच्या जुलमी व्यवस्थेवर लाथ मारत आहे. त्याचे वैचारिक नाते जुळले आहे ते दलितांशी, त्यांच्या लढ्यांशी तो लढतोय व्यवस्थेशी, वर्चस्ववादाशी. म्हणून तर ‘खैरलांजीत तो उसळला/ लाव्हासारखा रस्त्यावर’ या लाव्हारसाची धग त्याला जाळते म्हणून तर प्रश्न विचारतो-
‘जर निर्भया भारत की बेटी हो सकती हैं
तो हाथरस की बेटी पूरे भारत की
बेटी क्यू नही हो सकती?’
कवीला या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, कारण ‘व्यवस्थाच आईचे दूध विकते/अब्रूचे निघतात धिंडवडे’. येथे स्त्रीच्या अब्रूलाही वर्गवारीची पट्टी लावली जातेय. पण हे फार काळ टिकण्यासारखे नाही. आमच्या ‘समष्टीचा हिरो’ आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्याच्याच उंचावलेल्या बोटाच्या रोखाने आम्ही पुढे पुढे जात आहोत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे जाणे आता वैश्विक ठरले आहे. अत्याचारग्रस्त आता एकवटत आहेत. त्यांचाही नारा आता ‘जय भीम’ हाच आहे. जनतेची सत्ता हा त्यांचा अंतिम ध्यास आहे. दलित पँथरला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा लढा पाहिला नाही, अनुभवला नाही, त्यांच्यासाठी ब्रेन आणि पेन पुढे सरसावले आहे. आमच्यासाठी भले सभागृह दूर असेल, कायदा न्याय देत नसेल, परंतु आमची संस्कृती, आमचे साहित्य अंधाराला चिरण्यासाठी पुरेसे आहे. भाषा, प्रांत, देश यात समानता नसेल, परंतु जगभरातील दुःख एक आहे.
आणि म्हणूनच माझ्यासारखा परित्यक्त अमेरिकेतले अनेक विद्यापीठीय विचारवंत, इंग्लंडचा लोकशाहीवादी माणूस आणि जर्मनचा परिवर्तनीय लेखक, यांच्याशी सुसंवाद साधतोय. हे उर्जितावरचे लक्षण नाही, असे कोण म्हणेल? नामदेव ढसाळची जगभर पोहोचलेली कविता, राजा ढाले यांची मार्मिकता किंवा माझे ग्रंथ सुनील अभिमान अवचार सारख्यांना स्फूर्तीदायक ठरतील अन् त्यातून निर्माण झालेली त्यांची ‘काळोखावरची टोळधाड’ व्यवस्थेला थरकापायला लावेल, यात शंकाच नको.
‘काळोखावरची टोळधाड’ : सुनील अभिमान अवचार
ललित पब्लिकेशन, मुंबई
मूल्य – १०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment