‘भंग अभंग’ : देवरे यांच्या रचनेत सहजता आहे. साधेपणा व सोपेपणा आहे. या कवितेत दैहिक-लैंगिक जाणिवांचा आविष्कार आहे, पण त्यात उथळ शृंगार नाही
ग्रंथनामा - आगामी
मनोहर सोनवणे
  • ‘भंग अभंग’चं मुखपृष्ठ
  • Fri , 09 September 2022
  • ग्रंथनामा आगामी भंग अभंग Bhang Abhang सुधीर देवरे Sudhir Deore

ज्येष्ठ साहित्यिक सुधीर देवरे यांचा ‘भंग अभंग’ हा कवितासंग्रह सहित प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या संग्रहाला ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि कथाकार मनोहर सोनवणे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

डॉ. सुधीर देवरे हे साधारण चार दशकांपासून लेखन करत आहेत. कविता, कथा, ललित, समीक्षा, संशोधनपर असं बहुअंगी त्यांचं लेखन आहे. मूलतः ते लोकवाङ्मय व लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत. अहिराणी भाषेसंदर्भात त्यांनी केलेलं संशोधन व या भाषेत केलेल्या ललितलेखनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. डॉ. गणेश देवी यांच्या भाषा चळवळीत ते दीर्घकाळ सक्रिय आहेत. ‘ढोल’ या अहिराणी नियतकालिकाचं त्यांनी संपादन केलं. स्वतःच्या कवितेकडे ते ‘आत्मनिष्ठ जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार’ या दृष्टीनं पाहतात. त्यांच्या जीवनदृष्टीचं प्रतिबिंब या संग्रहात उमटलं आहे. ‘डंख व्यालेलं अवकाश’ (१९९९) व ‘आदिम तालनं संगीत’ (अहिराणी कविता, २०००) या संग्रहानंतर जवळजवळ दोन दशकांनी त्यांचा हा संग्रह प्रकाशित होत आहे. हा संग्रह नवा असून, यातील कविता १९८० ते २०२० अशा चार दशकांतील आहेत, त्यांचं मी स्वागत करतो.

या संग्रहाचं शीर्षक ‘भंग अभंग’ असं आहे. (‘भंग अभंग’चं इन्टरप्रिटेशन ‘भंगलेले अभंग’ असं होऊ शकतं.) साधारण २०००च्या सुमारास मराठवाड्यातील कवी विलास पाटील यांचा ‘भंगलेले अभंग’ या शीर्षकानं कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. नामसाधर्म्य तर नाहीच, पण दोन्हींमध्ये दृष्टीकोन आणि आशयही वेगळे आहेत. विलास पाटील यांच्या अभंगांना १९९३मध्ये मराठवाड्यात झालेल्या भीषण भूकंपाची पार्श्वभूमी आहे. भंगलेल्या धरणीचा त्यांना संदर्भ आहे. भूकंपाने झालेल्या यातना, वेदनांचे ‘भंगलेले अभंग’ त्यांनी लिहिले.

देवरे यांच्या रचनांना काव्याच्या अभंगत्वाचा संदर्भ आहे. ‘ज्या छंदात भंग नाहीत, तो अभंग’, असं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी म्हटलं आहे. ‘शब्दांत कलाविष्कार असतील तर ते स्वबळाने उद्याही अभंग राहतील, अन्यथा निसर्गाच्या नियमाप्रमाणे भंगून नामशेष होतील. त्याची काळजी करण्याचं कवीला काहीही कारण उरत नाही’ हा देवरे यांचा दृष्टीकोन आहे. तो त्यांचा स्वतःच्या कवित्वावरचा विश्वास आहे. आपले शब्द भंगणारे नाहीत, असा विश्वास ‘भंग अभंग’ अशा विरोधाभासी शीर्षकाने ते व्यक्त करतात. त्याद्वारे त्यांनी एक प्रकारे स्वतःच्या कवितेसमोर आव्हान ठेवलं आहे.

अभंग हा एक छंद प्रकार आहे. काव्यरचनेच्या देशी परंपरेत त्याचं स्थान आहे आणि मराठी भाषेत तो सातशे वर्षं रूढ आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांनी या छंदात परमेश्वर भक्तीचं काव्य लिहिलं. त्यांचे अभंग हे आपलं संचित आहे. आपल्या भाषेची, प्रदेशाची ती सांस्कृतिक ओळख आहे. अभंग हे नाव विठ्ठलाच्या रूपविशेषाशी निगडित आहे, असं डॉ. रा.चिं. ढेरे यांनी म्हटलं आहे. तेराव्या शतकातील एका कानडी संतकवीने विठ्ठलाला ‘अभंग विठ्ठल’ म्हटलं, यावरून विठ्ठलविषयक रचनांना  ‘अभंग’  हे नाव रूढ झालं असावं, असं मत त्यांनी नोंदवलं आहे. संतांच्या अभंगांचं मराठी मनावरील गारुड आजतागायत ‘अभंग’ आहे, आणि जोवर मराठी मन शाबूत आहे, तोवर ते उतरणार नाही, हे निश्चित! संतांच्या अभंगांतून विठ्ठलाची भक्ती, त्याच्या भेटीची तळमळ, आध्यात्मिक चिंतन व्यक्त झालं, पण त्यात मानवता आणि मानवी जीवनाविषयी चिंतनही ओतप्रोत होतं. संत तुकारामांनी अभंगांतून समाजाच्या वैगुण्यावर कठोर प्रहार केले. समाजाच्या तळागाळापर्यंत मानवी मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचं व ती जोपासण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अभंग सातशे वर्षांपासून करत आहेत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

काळाबरोबर जग बदललं, इंग्रजांबरोबर पाश्चात्य वारे देशात फिरले, त्याचे परिणाम आचार - विचारांवर झाले, जीवन बदललं, माणसाच्या जगण्याबरोबर साहित्याचंही रूप बदललं, तरीही आधुनिक कवी-कवयित्रींनाही त्यांच्या रचनांसाठी अभंग हा छंद खुणावत राहिला आहे. मात्र, संतांप्रमाणे केवळ विठ्ठल किंवा भक्ती, यावर त्यांची अभिव्यक्ती मर्यादित राहिलेली नाही. केशवसुत, मर्ढेकर, विंदा आदी कवींनी सामाजिक जाणिवांच्या प्रकटीकरणासाठी हा छंद जवळ केला. फ.मुं. शिंदे आणि आधी उल्लेख केलेले विलास पाटील यांच्या अभंग रचनाही या स्वरूपाच्या आहेत. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे अस्तित्ववादी विचारांचे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अभंगातून अस्तित्वशोधाचा प्रयत्न केला आहे.

सुधीर देवरे यांची कविता आत्मनिष्ठ आहे आणि कलावादी आहे. दैहिक, लैंगिक जाणिवा ती अस्पर्शीत मानत नाही. ही वैशिष्ट्ये त्यांच्या रचनांमध्ये दिसतात. अर्थात, या संग्रहात अभंगांबरोबर हायकू या काव्यप्रकारातील तसेच मुक्तछंदातीलही रचना समाविष्ट आहेत.

शरीराबद्दल, विशेषतः लिंगाबद्दल, लैंगिक जाणिवेबद्दल लिहिणं-बोलणं सामान्यतः वर्ज्य मानलं जातं, घाणेरडं मानलं जातं. कारण आपण लिंग ही लपवण्याची गोष्ट मानली आहे. शिष्टतेचे आपले अलिखित नियम आहेत. लिंग, लैंगिक भावना-जाणिवा या विषयी थेट बोलणं अशिष्ट, अश्लील मानलं जातं. ती शिवी समजली जाते, किंवा केवळ शिवी देण्यासाठी त्यांचं उच्चारण केलं जातं. सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या सातत्यासाठी आवश्यक शारीर प्रेरणांना आणि त्या संबंधित अवयवांना आपण अपवित्र मानतो, त्यांचं उच्चारण असभ्य मानतो. कामभावना चाळवणारे अश्लील, उथळ, सवंग लेखन हे हीन दर्जाचं असतंच, कारण त्या भडक उद्देशानेच ते लिहिलेलं असतं. मात्र, लैंगिक जाणीव, अभिव्यक्तीचे सगळेच साहित्य या मापात मोजता येत नाही.

काम (sex) हा मानवीजीवनाचा सहज, नैसर्गिक भाग असताना नैतिकतेच्या नावाखाली त्याच्या अभिव्यक्तीवर लादलेली बंधनं अलीकडच्या काळातील लेखक, कवी तोडू पाहत आहेत. सुधीर देवरे त्यांपैकी एक आहेत. सुधीर देवरे यांची लैंगिक अभिव्यक्ती उथळ, सवंग नाही. नैसर्गिक जैविक प्रवृत्तीच्या दृष्टीने ती लिंग, काम, कामसंबंधाकडे पाहते. त्याबद्दलच्या भावना, जाणिवा, अनुभव व्यक्त करते. ‘निसर्गाच्या हुंकाराला’ या कवितेत देवरे म्हणतात -

‘प्रत्येक शरीराला उपमा

नेसवणं जमत नाही

अवयव रोखठोक असतात

उपमेआडून संबोधणं बरं नाही’

इंद्रियनिष्ठ अनुभवाच्या अभिव्यक्तीतील मोकळेपणाविषयी ते बोलत आहेत. त्यांचा हा दृष्टीकोन प्रामाणिक आहे. मात्र, ‘योनीला योनी आणि शिश्नाला शिश्न म्हणावं’ असं रोखठोक सांगताना देवरे यांनीही इंद्रियनिष्ठ अनुभवांच्या अभिव्यक्तीसाठी सांकेतिक- असांकेतिक प्रतिमांचा, भाषेचा वापर केला आहे. मुळात त्यांचा रोख आदिमतेकडे आहे. माणूस कितीही बदलला, सुधारित झाला तरी तो जैविक प्रेरणांशी बांधलेला आहे. त्या आदिम आहेत, सृष्टीतील सार्‍याच जीवांशी निगडीत आहेत. माणूस त्यांच्यापासून वेगळा नाही. ते म्हणतात-

‘झाडांत असूनही

मी प्रत्येक फुलात

गळून पडतो

आदिम’

दैहिक प्रेरणा आदिम आहेत. त्या नैसर्गिक आहेत. आदम आणि इव्ह यांच्यात आदिम भावना उत्पन्न झाल्या, तेव्हा संकोचून त्यांनी निसर्गातील हिरव्या पात्याचा आधार घेतला. आदिमतेचं हे मिथक ‘तुझ्या माझ्या

नात्यात

आडवं

निसर्गाचं पातं

हिरवं

थरथरत वार्‍यानं...

कोणती दिशा?’

या ओळींमध्ये डोकावतं.

दैहिक जाणिवांच्या अभिव्यक्तीला लगाम घालण्याची आवश्यकता नाही, हे कवीचं मत ‘म्हणू दे कितीही/ लोक बाप पाप/ लागतेच धाप/ नैसर्गिक’ या ओळींमध्ये दिसतं. या अभिव्यक्तीवर लादलेल्या नैतिक बंधनांवर कवीची तिखट प्रतिक्रिया ‘सुंदर ते ध्यान/ वासनेचा चावा/ संस्कृतीचा बोवा/ दाराआड’ अशा शब्दांत उमटली आहे. कवीने इंद्रियनिष्ठ अभिव्यक्तीसाठी अनेक संकेत, प्रतिमांबरोबरच कृष्ण, राधा या मिथकांचा वापर केला आहे, त्यात त्यांची कलावादी दृष्टी दिसते. इंद्रियनिष्ठ अनुभवाच्या अनेक छटा या कवितांमधून व्यक्त झाल्या आहेत. विरुद्धलिंगी आकर्षण विशिष्ट वयात प्रबळ असतं. त्यातील नैसर्गिक तप्तता कवीने ‘सुंदर ते वय/ उभे सूर्यावर’ अशा शब्दांत सूचित केली आहे. अर्थात, ‘तुझ्या तनाठायी/ लाचावले मन’ अशी अवस्था विशिष्ट वयापुरती मर्यादित नसते, ‘देहात मैथुन/ म्हातार्‍याही’ हे कवीचं निरीक्षण सत्य आहे. मैथुनातील समाधान दोघांनाही हवं असतं, पण पुरुष स्वार्थी असतो. ‘कोणताच कृष्ण गोपीच्या सुखासाठी झटत नाही’ असं कवी म्हणतो. ‘आनंदी हवेत/ आनंदी देहात/ आनंदी खोप्यात/ स्वर्गात तू’ या शब्दांत कामसुख व्यक्त होत असलं, तरी ‘कितीही असो/ रेशमी बिछाना/ शेवटी नग्नता/ कृष्ण कृत्य’ ही अपराध जाणीवही व्यक्त होताना दिसते.

‘देहात मैथुन’ या कवितेत मैथुन हा सृष्टीचा नियम असल्याचं ध्वनित होतं. मैथुनाने सारा निसर्ग व्यापला आहे. ‘कणांत मैथुन/ नभात मैथुन/ ढगांत मैथुन/ पावसाच्या/ मातीत मैथुन/ झाडांत मैथुन/ पाण्यात मैथुन/ सृष्टीतही’ असं कवी म्हणत आहे. मात्र, बोकाळलेला भोगवाद त्याला मान्य नाही. ‘मैथुनात आक्खा/ सडलेला देह/ शमेना हा दाह/ मैथुनाचा’ असा निषेधही त्याने व्यक्त केला आहे.

‘त्वचेचिया राना/ उगलेला काटा’ असं शारीर सत्य सांगताना ‘ज्याच्या त्याच्या वाटा/ प्रारब्धात’ असं कवीने म्हटलं आहे. कवीचा आधिभौतिक दृष्टीकोन पाहता, इथं ‘प्रारब्ध’ या शब्दातून डोकावणारी नियतीशरणता खटकते. (कदाचित पारंपरिक संज्ञा अधोरेखित करण्यासाठी कवीने प्रारब्ध शब्द निवडला असावा.) असे अपवाद सोडल्यास ही कविता बव्हंशी जडवादी आहे. देव अस्तित्वात आहे, असं आपण मानतो, पण तो खरा अस्तित्वात आहे का? कवीला शंका आहे. त्याने देवाविषयी ‘जन्मताच स्वर्गीय(?)’ असा प्रश्न विचारून मजेशीर टिपण्णी केली आहे. देव ही एक कविकल्पना आहे, असं कवीला वाटतं. सृष्टीविषयीच्या अज्ञानातून या कल्पनेचा जन्म झाला असल्याचं कवी सूचित करतो-

‘अनाकलनीय

सृष्टीतून

देव

ही पोरक्या

पोराला

सुचलेली

आदिम कविता...’

कवीच्या देवाविषयीच्या टिपण्या तिखट आहेत. ‘बोटाला लागलेलं/ मेचडं पुसायला/ देवाने रस्त्यातल्या गायीला/ हात लावला;/ तो माणसाने पाहिला/ मग समर्थनार्थ देव म्हणाला-/ गायीत आम्ही सगळे असतो/ तेहतीस कोटी देव!/ म्हणून मागून येणार्‍या प्रत्येकाला/ गायीत देव दिसला’ अशा ओळींतून तो देवाची भाकडकथा अधोरेखित करतो. ‘देव करू शकत नाही/ भवानीचा म्हसोबा/ आणि म्हसोबाची भवानी/ तर देवाला/ म्हसोबाएवढीही संवेदना नाही/ की काळीज’ असं आव्हान त्याने देवाविषयीच्या श्रद्धांना दिलं आहे.

कवी देव या संकल्पनेचा उपहास करतो, मात्र निसर्गाची महत्ता मानतो. निसर्गावर त्याचा भरवसा आहे. त्याची शाश्वतता तो अधोरेखित करतो-

‘इतकी पाने गळून गेली/ झाड काही वठत नाही

एवढी धूळ उडून गेली / भुई काही झिजत नाही

आक्खा सूर्य गिळूनही / सृष्टी काही कण्हत नाही

सावल्यांच्या आव्हानात / सूर्य दिशा भूलत नाही’

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी निसर्ग आहे. मनुष्याचं जीवन निसर्गाने व्यापलं आहे. निसर्ग अनंत आहे, त्यात माणसाचं अस्तित्व नाममात्र, क्षुल्लक आहे, ही जाणीव ‘अनंत कीटक’ या कवितेत व्यक्त होते.

‘अनंत आकाश/ अनंत जमीन/ अनंत सागर/ जीवनात/

अनंत उन्हाळा/ अनंत पावसाळा/ अनंत हिवाळा/ आयुष्यात/

अनंत दिवस/ अनंत माणसं/ अनंत कीटक/ भेटतात/’

निसर्गापुढे माणसाचं क्षुद्रपण कीटक या रूपात कवी व्यक्त करतो. उत्क्रांतीमध्ये वानराचा मानव झाला, आता हा प्रवास उलट्या दिशेनं चालला आहे. कवी म्हणतो, ‘मानव मेला/ वानर झाला/ कळसावर चढून बसला/ वानर वानर हुपऽऽ/ तुझ्या शेंडीला तुप’. निसर्गाचा किटकाएवढाच भाग असलेला माणूस निसर्ग गिळायला निघाला आहे. माणसाचा सुखाचा हव्यास संपता संपत नाहीय. कवी उपहासाने म्हणतो, ‘नाक कोरायच्या सुखानं/ माणसं सुखी झाली असती/ तर जगातली एवढी युद्धं/ कशाला झाली असती!’ कवी माणसाची निरर्थकता ‘आला आणि गेला/ कपड्यात नंगा/ भादव्यात पित्तर/ वाढवला’ या शब्दांत सांगतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कवी कवितेमधून आयुष्याचा शोध घेत असतो. सुख - दुःख, आनंद - खंत हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. आयुष्याकडे पाहताना काय मिळालं, काय गळून गेलं, याचं चिंतन कधी आपसूक तर कधी जाणीवपूर्वक होत असतं. कवीच्या आयुष्याविषयीच्या आत्मनिष्ठ संवेदना पुढील काही ओळींत दिसतात -

१) या देहात मन रमत नाही / देह उसना घेता येत नाही

२) एकट्यानं कुणाकुणाशी लढावं / का हत्यार टाकून झुरत झुरत मरावं

३) मुळासहित झाडाला आभाळात उडता येत नाही/ आणि झाडावर बसून पाखराला गाता येत नाही

कवीच्या आत्मनिष्ठ चिंतनात व्यावहारिक जगण्याची स्पंदनंही डोकावली आहेत. काव्यगत ‘मी’ मानवी समष्टीच्या जीवन प्रवासातील काही चरित्रात्मक नोंदी करत आहे. ‘फाटकं आंगडं/ फुटकं मडकं/ तुटकं कवाड/ माझ्या घरा’ किंवा ‘अक्षर वाकडं/ चालणं फेंगडं/ जीव तडफडं/ अपयशी’ किंवा ‘नोकरीत कर्म/ कारकुनी धर्म/ पगार गोकुळ/ महिनाखेर’ अशी काही उदाहरणं या संदर्भात देता येतील.

कवीची चिंतनशीलता प्रगल्भ आहे. त्यात वैचारिकता जशी दिसते, तशीच संवेदनशीलताही प्रतित होते. त्यांच्या चिंतनात माणसाविषयी, माणूसधर्माविषयी आस्था आहे. त्यांच्या कवितेत व्यक्त झालेल्या जीवनदर्शी भावना, विचार ही सुभाषितंच आहेत. वानगीदाखल काही ओळी पहा -

१) एवढ्या एवढ्या हृदयात/ किती माणसं मावतात/ जेवढी जेवढी भरली/ तेवढी कमीच पडतात

२) खिडकी हातानं/ बंद करता येते/ मनाची कवाडं/ बंद करता येणार नाही/ आतून कडी आहे

३) जितका खंदेल पहार/ तितका सखोल हा दर

सुधीर देवरे यांच्या कवितेत सामाजिक जीवनाचे संदर्भ आढळतात. ‘सांगून वांगून/ जनता गबाळी/ सुधरत नाही/ एकाएकी// तुका गेला वाया/ आणि ज्ञानेश्वर/ गाडगे बाबाही/ पंगतीत’, तसेच ‘घोळका दिसला म्हणजे/ माणसं एकजूट असतील/ असं समजू नये/ कदाचित/ ती लोकांची/ गरजही असेल/ प्रासंगिक/ अनैसर्गिक’, अशा काही ओळींमधून समकालीन सामाजिक जीवनावर भावगर्भ प्रतिक्रिया दिसते.

सुधीर देवरे यांच्या रचनेत सहजता आहे. अभंग या छंदाला अपेक्षित साधेपणा व सोपेपणा त्यात आहे. हीच सहजता त्यांच्या मुक्तछंद रचनांतही दिसते. त्यांचे तीन ओळींचे हायकूदेखील लक्ष वेधतात.

या कवितेत दैहिक-लैंगिक जाणिवांचा आविष्कार आहे, पण त्यात उथळ शृंगार नाही, खळबळ नाही. त्यांच्या व्यक्तिनिष्ठ जाणिवांमध्ये अभिनिवेश नाही, ‘स्व’चा पोकळ डांगोरा नाही. अभिव्यक्तीत आक्रस्ताळा पसरटपणा नाही. ही कविता मूल्यदर्शनाचा अवास्तव आवही आणत नाही. ती एका जलाशयासारखी आहे. शांत, अथांग आणि खोल. जलाशयातले पाणी फुका खळखळाट करत नाही. आपल्या खोलीचा दिमाख मिरवण्याची त्याला गरज वाटत नाही. जो पाण्यात डोकावेल, त्याला पाण्याची धार आणि खोली नक्कीच जाणवेल!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......