‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ : जनसामान्यांच्या उन्नयनासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि स्वकर्तृत्वाने विचारांचा मानदंड उभा करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुषांची काव्यमय शब्दचित्रे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सतीश बडवे
  • ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 03 September 2022
  • ग्रंथनामा शिफारस भूमिनिष्ठांची मांदियाळी Bhuminishthanchi Mandiyali इंद्रजित भालेराव Indrajit Bhalerao

समाजसन्मुख आणि लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या वेचक व्यक्तींच्या जीवनातील ठळक व महत्त्वपूर्ण घटनांची काव्यमय अभिव्यक्ती इंद्रजित भालेराव यांच्या ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ या  काव्यसंग्रहात अनुभवता येते. कवितेच्या स्फुट अभिव्यक्तीबरोबरच काहीशा दीर्घतेकडे झुकलेल्या या कविता आहेत. संतपरंपरेपासून ते अलीकडच्या समाजमनस्क व्यक्तींच्या  विधायक विचार व कृतींचा वेध घेणारी ही एक लक्षणीय मांडणी आहे. संपूर्ण काव्यसंग्रह त्या त्या व्यक्तींशी संवाद साधणारा आणि त्यांच्याशी समरस होत त्यांचे ‘पोर्टे्ट’ वाचकांसमोर ठेवणारा आहे. एका अर्थी मध्ययुगापासून ते आजच्या वर्तमानापर्यंतच्या विधायक दृष्टीचा शोधच त्यातून प्रकटतो. जनसामान्यांच्या उन्नयनासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि स्वकर्तृत्वाने विचारांचा मानदंड उभा करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुषांची ही शब्दचित्रे कवीच्या आत्मनिष्ठ जाणीवेचे दर्शन घडवतात. पण त्याबरोबरच त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंना प्रकाशझोतात आणतात. चरित्राचा काव्यमय आकृतिबंध त्यातून साकारतो. या सर्वांशीच कवीचे एक आत्मीय नाते असल्याचेही वाचताना सतत जाणवत राहते.

इंद्रजित भालेराव यांच्या अंतर्मनात ठाण मांडलेल्या या व्यक्ती आहेत. त्यांच्याशी जुळलेले आंतरिक नाते आणि त्यांची लोककल्याणाची भूमिका या कवितांमधून प्रकट होताना दिसते. या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातून कवीची दृष्टी समर्पक पद्धतीने व्यक्त होते. ‘भूमिनिष्ठा’ आणि ‘मांदियाळी’ हे दोन्ही शब्द विशिष्ट दृष्टीकोन व्यक्त करणारे आहेत. भूमिनिष्ठा हाच ज्यांच्या जगण्याचा ध्यास होता अथवा आहे आणि जे इथल्या सत्त्वशील परंपरेशी बांधील आहेत, अशीच शब्दचित्रे इथे अर्थपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झालेली आहेत. एक अर्थी व्यक्तीकेंद्री विचार त्यातून प्रकट होत असला, तरी तो निव्वळ व्यक्तीकेंद्री नसून विचारकेंद्री आहे, असे सहज लक्षात येते.

ही जात, पंथ, भाषा, प्रांत, देश याच्या पलीकडे जाऊन त्या कर्तव्यनिष्ठ जीवन जगलेल्या व्यक्तींची जीवनधारणा व्यक्त करणारी अभिव्यक्ती आहे. उदात्त आणि उज्वल परंपरा लाभलेला हा समूह आहे. यात पंथप्रवर्तक, विचारवंत, तत्त्वज्ञ, धीरोदात्त पुरुष, नेतृत्वगुणांनी संपन्न, सदाचारी, नैतिक दृष्टीकोन जपणारे, लोकोद्धाराची आस असणारे, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे, प्रस्थापित मदांध प्रवृत्ती विरोधात झुंज देणारे आणि आदर्श जगण्याचे पुरस्कर्ते आहेत. अशा अनेकविध वृत्ती-प्रवृतींची आणि कृतीप्रवण असणारी ही ‘मांदियाळी’ आहे. त्यांचे ध्येयनिष्ठ जगणे आणि त्यांनी उभे केलेले ध्यासपर्व यांची ही चरित्रसदृश मांडणी आहे. रूढार्थाने ही चरित्रे नाहीत, पण चरित्रातील विचारदिशांचा हा शोध आहे. तो जीवनसत्याला गवसणी घालतो. त्याच्याशी अनुबंध जोडणारी कवीची भावनिक अवस्था प्रत्येक कवितेत जाणवत राहते. त्यातून कवीच्या जीवनदृष्टीचे प्रत्यंतर येते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा असा समाजात विचारांची जागृती करून प्रबोधनाला चालना देणारा संतांचा एक गट इथे आहे. क्षमाशीलता शिकवणारे व स्वातंत्र्याला मोक्षाची पदवी देणारे सर्वज्ञ चक्रधर, मायमराठीचे रान वहितीत आणून नामा-सावता-चोख्यासह सर्वांचेच मळे फुलवणारे ज्ञानदेव, यांच्या कर्तृत्वाची नोंद  कवीने समर्थपणे केली आहे.

संत कबिराचे व्यक्तिचित्र या कवितेत काहीशा दीर्घ मांडणीतून पुढे येते. त्यात एक नाट्यमयता आहे, तीव्र संवेदनाशीलता आहे, समाज बदलाची असोशी आहे, अतिसामान्य आणि तळातील माणसांच्या उन्नतीची कळकळ आहे. मात्र अशांच्या वाट्याला येणारं दुःखही जीवघेणं असतं.…

‘वैताग आणला होता ना तुला

लोकांनी जात विचारून

तुझं खेकसणं दिसतंय मला

तुझ्या कवितेत

जात न पुछो साधू की

जात विचारायचे ते

अपमान करण्यासाठीच ना

जवळ दूर करण्यासाठीच ना

अरे आता तर काय

जात तोडायला निघालेल्यांच्या नावानेच

नव्या जाती सुरु झाल्यायत

मोठीच भिंत आहे जात 

माणसामाणसामध्ये…’

हे प्रखर वास्तवही ही कविता अधोरेखित करते. कबिरदासांच्या कवितेची व्याखाच भालेराव सांगतात. ‘देवाशिवाय धर्म धर्माशिवाय अध्यात्म म्हणजे तुझी कविता’ या अनोख्या अध्यात्मातूनच ही कविताही आकाराला आली आहे. जगण्यामधले नवे प्रश्न विचारून संघर्षाचा इतिहास लिहिणारे संत तुकाराम म्हणजे चैतन्याची आणि भुईतली कळ आहे. जगण्याचा  तोल सांभाळायला त्यांचा गाथाच आधार असल्याची कवीची धारणा आहे.

भारतवर्षातल्या रवींद्रनाथ टागोर, कवी पाश, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या भव्य व्यक्तिमत्त्वांची उचित नोंदही या कवीने घेतली आहे. टागोरांनी शेतीप्रयोग करणारे श्रीनिकेतन स्थापले, नोबेल पुरस्काराचे पैसे ग्रामोद्धारासाठी दिले, मुला-जावयांना शेतीसंशोधन करून शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी झटायला सांगितले, अशा नोंदी करत त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्या आहेत.

अगदी टागोरांप्रमाणेच शेतीमातीशी एकरूप झालेले कवी पाश, त्यांच्या कवितांच्या अनुवादात राहिलेल्या त्रुटी, त्याचे अस्वस्थपण व फुटलेपण कवीला भावविवश बनवतं. पाशच्या चरित्रातले कितीतरी प्रसंग उभे केले जातात. तत्त्वासाठी लढणाऱ्या दमन आणि दहशतीला न घाबरणाऱ्या पाशची कविता आपण काळजात कोरून ठेवल्याचेही भालेराव सांगतात. ही कविता तर एखाद्या दीर्घ स्वगतासारखी आहे. महात्मा गांधींचा भारत स्वप्नातच मरून पडला, हे आजचे वास्तव मांडत गांधीबरोबर भालेराव यांनी केलेला संवाद वर्तमान भारताच्या स्थितीगतीबरोबरच त्यांच्या तत्त्वांची नितांत गरजच अधोरेखित करतो-

‘कोणी निर्माण केले हे विकासाचे मृगजळ

आणि का धावला माझा बाप

मृग होऊन या नकली जळाच्या मागे?

त्यांचा निसर्ग विरोध

आणि माझ्या बापाचा निसर्ग

यांच्या अवमेळात

निर्माण झाले गळफास

तुमचा संदेश धुडकावून केलेल्या पेरणीला

गळफासांचे पीक आले’

महात्मा गांधींबरोबरचा कवीचा हा संवाद आजचे आपले धगधगते जीवनसत्यच मांडतो. गांधींच्या मूलभूत तत्त्वांना मोडीत काढणाऱ्या व्यवस्थेचे वाभाडे कवीने अतिशय निर्भयपणे मांडले आहेत. ज्यांचं शरीर शेतकऱ्याच्या जातीचं आहे आणि मन मुलायम मातीचं आहे, आशा पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच व्यक्तित्व इतरांच्या तुलनेत अगदीच त्रोटकपणे उमटलं आहे, पण मराठवाड्याच्या मुक्तीसाठी त्यांनी घेतलेला निर्णय फलदायी ठरल्याने सरदारांनाविषयी असणारी आत्मीय व कृतज्ञ भावनाच त्यातून मांडली जाते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या जीवन कर्तृत्वाचा शोधही या कवितेत घेतलेला आहे. यशवंतराव चव्हाण, भाई उद्धवराव पाटील, शरद जोशी, विलासराव साळुंखे, पोपटराव पवार, साधनाताई आमटे, या आधुनिक काळातील प्रभावी व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व कविमनाला भुरळ घालणारे ठरलेले दिसते.

यशवंतराव चव्हाणांचे कर्तृत्व समाजकारण, राजकारण, साहित्य यासारख्या सर्व क्षेत्रातून प्रगट झाले त्याची नोंद कवीने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुक्तीचा विचार करणारे भाई उद्धवराव पाटील प्रबोधनाचा व परिवर्तनाचा वारसा मिरवणारे होते. त्याच्या अगदी उलट विचार प्रत्यक्षात दिसत असल्याने भाई नसल्याची उणीव कवीला अस्वस्थ करते, इथल्या शेतकऱ्याला जोखड झुगरण्याचा मंत्र देणारे शरद जोशी, ज्यांनी शेतकऱ्यांना आपला खरा शत्रू ओळखायला शिकवलं आणि नारायणाबरोबर लक्ष्मीही मुक्त व्हावी याचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या मनात वास्तव आणि सन्मानाची जाणीव जागवणाऱ्या या नेत्याविषयीची आपुलकी आणि आदराची भावना भालेराव व्यक्त करतात.

विलासराव साळुंखे हे महाराष्ट्रातील असेच एक जाणते व्यक्तिमत्त्व. ‘पाणीपंचायत’ ही त्यांची अनोखी संकल्पना. पाणलोटक्षेत्र विकास हे शब्दही त्यांचेच. ‘पाणी कुणाच्या बापाचं नाही .ते सर्वांना मापानं मिळालं पाहिजे’ ही भूमिका घेऊन लढणाऱ्या या योध्याने घाम आणि ग्राम या दोन्हींना प्रतिष्ठा दिली. तसेच कार्य पोपटराव पवार यांचेही. हिवरेबाजारात त्यांनी हिरवा महोत्सव उभा केला. अगोदरच्या महात्म्यांच्या पावलांचा आधार घेत एक नवी परंपरा निर्माण केली. त्यांच्याशी कवीने साधलेला संवादही भावनेने ओथंबलेला आहे-

‘काय काळजीतलं 

आणि काय काळजातलं

हे एकदा कळालं ना पोपटराव

की मग काळजीच राहत नाही

आयुष्य घरंगळत जाण्याची

आम्ही सगळे भांबावलेलो

देश सगळा  भांबावलेला असताना

तुम्हाला दिसला  रस्ता स्वच्छ

स्वच्छता असली आतबाहेर तरच

राहत नाही कुणी बेघर भूमिहीन’

बदलाचे हे नवे वारे आणणाऱ्या पोपटराव पवारांचे हे असे अनोखे रूप इंद्रजित भालेरावांनी रेखाटले आहे. 

साधनाताई आमटे यांची अखंड साधना कवीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जगण्यात फकिरी स्वीकारलेल्या बाबांच्या मागे सर्वस्व झोकून उभ्या राहिलेल्या साधनाताई आणि विनोबा म्हणतात, तसे सेवेचे रामायणच आनंदवनात घडले आहे. कुष्ठरोगी आणि आदिवासींच्या जीवनात विश्वास निर्माण करणाऱ्या साधनाताईंचे व्यक्तीचित्रात कवीच्या त्यांच्याविषयीच्या भावना हळुवारपणे व्यक्त झाल्या आहेत.

बराक ओबामांचे व्यक्तिचित्र हे त्यांच्या जीवनातील ठळक घटनांची उजळणी करत आकाराला आहे. युगांडातील लुवो जमात, आजोबांचे शेतीमातीत रमणे, आई व मुलास सोडून जाणारा बाप, अनुभव व वाचनाची झेप, प्रतिकूलतेशी संघर्ष अशा गोष्टी या रचनेत बघता येतात. इथपासून ते थेट व्हाईट हाऊसपर्यंतचा प्रवास थक्क करणाराच. ‘बराक’ या शब्दाचा अर्थ देवाचा आशीर्वाद, म्हणूनच त्यांची महत्त्वाकांक्षा युद्धखोरीचा इतिहास बदलण्याची, वंशवाद हटवण्याची, लोकांमध्ये ऊर्मी जागवण्याची, सर्वच मानवांचा आदर करण्याची. घाव न घालता जग बदलण्याची किमया संत करू शकतात. हे संतत्व त्यांच्या जगण्याचा आधार होता. जगाला सुख शांती, समाधान देणारी बराक ओबामांची विचारधारा नवे जग निर्माण करण्याची कशी होती, हे इंद्रजित भालेरावांची कविता सूचित करते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

संतगाडगबाबांचे सारे जीवनकर्तृत्व भालेराव यांनी त्यांच्या दीर्घ चितनात मांडले आहे. अभंग छंदातल्या रचनेतून त्यांचे संपूर्ण जीवनच त्यांनी चितारले आहे. त्यांचे तप, भणंगपण, लोकोद्धाराची धडपड, कीर्तनातील लोकसंवादाची शैली, अनेकरंगाच्या चिंध्याचे बनलेले झाड म्हणजेच बाबा, कष्टकरी व दु:खितांच्या पाठीशी राहण्याची वृत्ती, प्रबोधनासाठी केलेली पायपीट, लोकभाषेतून केलेली जागृती हे सारे म्हणजे बाबांचे मुक्त विद्यापीठ असल्याची भावना अत्यंत हृद्यपणे इथे व्यक्त झाली आहे-

‘ग्यानबा तुक्याचा । भागवत धर्म

त्याचे कळे वर्म । डेबूजीला

फुल्यांनी मारल्या । ज्यांच्यावर फुल्या

त्या रूढी टाकल्या । डेबूजीने

कर्मवीरांचा तो । शिक्षणाचा धडा

गौरविला गाढा । डेबूजीने

बाबासाहेबांचा । आचारविचार

राबविला फार । डेबूजीने

रुतला माणूस । तळागाळातला

त्याला हात दिला । डेबूजीने’

आशा सहज आणि प्रवाही शब्दामधून संत गाडगेबाबांची व्यक्तिरेखा व त्यांचे जीवनचरित्र अंत:करणातील ओलाव्याने चित्रित झाले आहे.

हा इंद्रजित भालेराव यांचा काव्यसंग्रह त्यांच्या प्रगल्भ व परिपक्व लेखनाची निशाणी आहे. दीर्घतेकडे झुकणारा या कवितेचा घाट हा त्यांच्या लेखनप्रयोगाचा आविष्कार आहे. लयबद्ध अभंग सदृश्य मांडणी, काहीशी मुक्त, गद्यात्मक अभिव्यक्ती, उदात्त विचारांचे केवळ जतन न करता, स्वतःच्या जीवनात त्याचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या व्यक्तींचे जीवनचित्रण, तत्त्वनिष्ठ जगण्याचे बळ देणारी थोरा-मोठ्यांची जीवनदृष्टी यातून साकारलेली ही कविता आहे. या साऱ्या चरित्रनायकांची जनसंवादी भूमिका आणि त्यांच्या जीवनकार्याविषयी असणारी आत्मीयता याचे मिश्रण त्यांच्या कवितेतून प्रगटते. भूमी, शेती, शेतकरी, वंचितांचा समूह या साऱ्यांना कवेत घेऊन जगण्याची दिशा कशी शोधता येते, याचे प्रभावी दर्शन या कवितेत आहे. ‘आम्ही सारे भारतीय आहोत’, या उक्तीचा सार म्हणून प्रगटणारी इंद्रजित भालेराव यांची कविता मांडणीच्या नवेपणाबरोबरच जीवनसत्याचे प्रभावी दर्शन घडवते.

या संग्रहाची निर्मिती आदित्य प्रकाशनाने सौंदर्यदृष्टी ठेवून केली आहे. सरदार जाधव यांचे देखणे मुखपृष्ठ व आतील समर्पक रेखाचित्रे यामुळे कवितेचा परिणामही अधिक गडद होत जातो.

‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’ - इंद्रजित भालेराव

आदित्य प्रकाशन, औरंगाबाद

पाने - १५६

मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......