अजूनकाही
लेखक नेहमीच आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांच्या नोंदी करत असतो. त्यांची दखल घेतो. त्या आपल्यापुरत्याच न ठेवता सार्वत्रिक करतो. आपलं आंतरिक भावविश्व वाचकांसमोर मांडतो. यातून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सक्रिय राहते. लेखकाचं अनुभवविश्व त्याला लिहितं करत असतं.
माणसाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी दुरावल्यावर लेखकाला आपलं समृद्ध जगणं हरवल्यासारखं वाटतं. हे वाटत राहणं म्हणजे मनाची तगमग वाढणं. या तगमगीतून लेखकाला अस्वस्थपणा येतो. त्यातून मोकळं होण्यासाठी लेखकाला लिहितं व्हावं लागतं.
बऱ्याच वेळा हातातून जे निसटलंय ते खूप महत्त्वाचं होतं, अशीही एक जाणीव माणसाच्या मनात असते. जे हातातून निसटलं ते पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवणं महत्त्वाचं वाटतं. काळ झपाट्यानं पुढे जात आहे. विज्ञान-तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञानामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे माणूस बावचळलाय, त्याची जगण्यासाठी धावपळ चाललीय. जगणंच खूप जलद झालेलं आहे. समोर आलेलं काय चांगलं, काय वाईट याचा विचार करण्याइतपतही वेळ नाही. माणूस माणसापासून लांब चाललाय. लिहिणाऱ्या संवेदनशील मनाला ही गोष्ट खटकणारी आहेच. लिहिणार्या मनाची घालमेल प्रचंडपणे वाढत आहे.
इथला निसर्ग, इथली माणसं, इथलं सांस्कृतिक संचित, माणसामधली परोपकार वृत्ती कालबाह्य ठरत असताना, रश्मी कशेळकर या लेखिका हरवलेल्या या दिवसांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या ललितलेखनामध्ये करतांना दिसतात.
त्या सध्या रत्नागिरीत स्थायिक झालेल्या, पण मूळच्या सिंधुदुर्ग, देवगडच्या. त्यांचा नुकताच ‘भुयपर्मळ’ हा ललितलेखसंग्रह प्रकाशित केला आहे. बदलत जाणार्या काळात जगण्याच्या धबडग्यात ऐतिहासिक होत जाणाऱ्या घटना, वस्तू, प्रदेश, माणसं, पर्यावरण यांच्याविषयीची नोंदी या संग्रहात खूप प्रखरपणे सापडडतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या संग्रहामध्ये लेखिकेने आपल्या काळातील अवतीभवतीचा परीघ रेखाटलेला आहे. लेखिकेच्या बालपणीच्या जगण्याभोवती घुटमळत राहणारे अनेक विषय या संग्रहात आहेत. घरापासून शाळेपर्यंत, धरणीपासून नभापर्यंत, समुद्रापासून डोंगरापर्यंत, मातीपासून झाडाच्या शेंड्यापर्यंतचा परिसर या लेखनात सापडत जातो. याचबरोबर येथील माणसांच्या जगण्याच्या रीतिरिवाजाबरोबरच रूढी-परंपरा, कुळाचार, लोक जाणिवा आणि संस्कृतीचीही नोंद लेखिका घेत राहते.
मालवणी बोली चपखलपणे त्यांच्या लेखनामध्ये येत राहते. कोकणी माणूस हा तोंडाळ आणि बोलणं शिवराळ वाक्यानं सुरुवात करतो, याचा प्रत्यय या लेखनामध्ये येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी प्रदेशानुसार थोडीफार बदलत गेलेली आहे. या तिचा विचार केल्यास लेखिकेच्या लेखनात देवगडच्या बोलीचा समावेश होतो. या भाषेमध्ये जरी शिव्या, राग दिसत असला तरी ही भाषा आतून खूप गोड आणि मधाळ असते, हे लेख वाचत असताना जाणवते. देवगडच्या बोलीभाषेला एक वेगळा नाद, वेगळा हेल आहे. इथं बोलल्या जाणाऱ्या बोली मधल्या वाक्यांची रचना होत असताना शब्दांची ठेवण येथील माणसांच्या बोलण्यातून जशी उमटते, तशीच वाक्यरचना लेखिकेनं या पुस्तकात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात उभी केलेली देवगडची भूमी व्यक्तीपुरतीच मर्यादित राहत नाही, तर ती समष्टीकडे जाते. ते जगणं केवळ लेखिकेचं राहत नाही, तर सार्वत्रिक होतं.
कोणत्याही माणसाच्या मनात आपल्या परिसराविषयी, जगण्याविषयी ज्या आस्था असतात, त्याच लेखिकेच्या लेखनातून परावर्तित होत राहतात. लेखिकेने आपले अनुभव एखादी घटना घेऊन, त्याच्या आतील खोल व आजूबाजूचे तपशील खूप प्रगल्भतेनं मांडले आहेत. कोणताही विषय न पूर्ण तपशिलासह मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते. हेच या पुस्तकाचं बलस्थान आहे, असं म्हणावयास हरकत नाही.
लेख वाचताना तिथला पूर्ण परिसर, घटना आपल्यासमोर प्रकर्षानं उभी राहते. मुळात लेखिकेचं गाव समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं गाव आहे. त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.
यातील पहिलाच लेख प्राथमिक शाळेतील शिक्षकाविषयीचा आहे. या लेखाचं ‘गुर्जी’ हे शीर्षक ‘गुरुजी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या काळात असलेल्या प्राथमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी, गाव यांचं असणारं नातं, या लेखामध्ये स्पष्टपणे जाणवत राहतं. शिक्षण प्रक्रिया म्हणजे वेगळं माणसांमधला सुसंवाद. शिक्षक या परिघाभोवती फिरत राहणाऱ्या अनेक गोष्टी लेखिकेनं या लेखांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. येथील ग्रामीण जगण्याला आणि ग्रामीण मूल्यांना साजेसं असं सहज, सोपं, ओघवतं लेखन आहे. कोकणामध्ये एखाद्या बाहेरच्या गावातून आलेल्या शिक्षकाविषयीची तेथील माणसांची धारणा काय असते? शिकणाऱ्या मुलांची त्या शिक्षकाविषयीची काय कल्पना असते, याचा लेखिकेने तपशीलवार ऊहापोह केला आहे. शिक्षकाचे राहणीमान, शिक्षक बोलणारी भाषा, त्याचं समाजातील वागणं, चालणं, बोलणं याविषयीची निरीक्षणं खूप तपशीलवारपणे लेखिकेने या लेखामध्ये रेखाटलेली आहेत.
कोकणामध्ये ठरावीक ऋतूमध्ये बहरणारे सुरंगी झाड उभं करताना त्याच्या अवतीभवती घडणारे अनेक प्रसंग, गोष्टी लेखामध्ये येतात. त्या झाडाविषयीची लेखिकेची आस्था अंतर्बाह्य जाणवते. त्याचबरोबरच बोरणी व उंडीलच्या झाडाविषयी लेखिका खूप तपशीलवारपणे लिहितात.
ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर, ज्या झाडांच्या सावलीत, ज्या झाडांच्या फुला-फळात रमलेली लेखिका सासुरवाशीण झाल्यानंतरही या नैसर्गिक संचिताविषयीची आठवण पुसून टाकू शकत नाही.
या पुस्तकात अनेक व्यक्तिरेखाही आहेत. त्यांचं अभावग्रस्त जगणं, जगण्याचे प्रश्न, त्यांच्या वेदना, आशा-आकांक्षा, जगण्यामधील उमेद, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, माणसा-माणसातले वादविवाद, संवाद रेखाटताना सर्वसामान्य जगण्यापलीकडे एक उदात्त जगणं आहे, याची अनुभूती देण्याचा प्रयत्न लेखिका करते.
लेखिका रश्मी कशेळकर ही व्यक्तीचित्रं आपल्यासमोर इतक्या समर्थपणे उभी करतात की, त्यांचं जगणं आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतं. काही व्यक्तिचित्रण तर अशी आहेत की, त्या व्यक्तींच्या आणि आपल्या जगण्यात साधर्म्य आहे, हे जाणवत राहतं.
याबरोबरच अगदी साध्या साध्या वस्तूही तपशीलवारपणे रेखाटताना लेखिकेने त्या वस्तूंच्या भोवती घडणारे प्रसंग, त्या वस्तूविषयीच्या असणाऱ्या आठवणी खूप तपशीलवारपणे मांडल्या आहेत. त्यात फापटपसारा होऊ नये, इतकी काळजी घेतली आहे. किंबहुना लेखिका म्हणून ते सहज तिच्या हातून घडत जाते. छत्रीसारख्या वस्तू व पदार्थही यातून सुटलेले नाहीत. शेवग्याच्या पानांची भाजी, मैसूर पाक अशा पदार्थांची रेलचेल या संग्रहामध्ये आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून या गोष्टींकडे आपण वरवर पाहतो, पण या गोष्टींनी आपल्या जगण्यामध्ये एक फार मोठं स्थान निर्माण केलेलं असतं. किंबहुना या गोष्टी नसत्या तर आपलं जगणं कदाचित असह्य झालं असतं किंवा आज जे जगत आहोत, त्यापेक्षा वेगळं असतं.
लेखिका लहानपणी ज्या भागात वावरली, त्यातली सांस्कृतिक जाणीव, चालीरीती, माणसं, निसर्ग, वाटा, रस्ते, समुद्र, पक्षी, प्राणी, ऋतू, फळं-फुलं, शाळा, समाज या सर्व गोष्टी ओघानं त्यांच्या लेखनात येत राहतात.
सर्वसामान्य माणसाप्रमाणे लेखिकेलाही नेहमी वाटतं की, या गोष्टी किंवा हे जगणं खूप समृद्ध होतं. त्यामध्ये एक भाबडेपणा, निष्पापपणा होता, सकारात्मकपणा होता, उमेद होती. जगण्याच्या लढाईसाठी ताकद देणारी एक अदृश्य शक्ती या दिवसांमध्ये होती, असंही लेखिकेला वाटतं.
‘मुक्ती’ या लेखामध्ये समाजाला घट्टपणे चिकटलेली डांक नावाची चाल खूप समर्पकपणे लेखिकेने मांडली आहे. लेखिका म्हणते, मी प्रत्यक्ष जाऊन ही चाल बघितलेली आहे. यामध्ये अकाली मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला पाचारण करून बोलतं केलं जातं व त्याच्या मृत्यूचं गूढ विचारलं जातं.
‘शेवग्याचे झाड’ रेखाटताना शेवग्याचे अनेकविध औषधी गुणही लेखिकेने सांगितले आहेत. चहाविषयीचा लेख खूप समर्पकपणे व तपशीलवार आहे. कोकणातल्या काही भागांमध्ये चहाला ‘कढतवणी’ म्हटलं जातं. या कढतवणीनं माणसं जोडली जातात. मोठी कामं केली जातात. ग्रामीण भागातील कष्टकरी गटाचा सहकार या कढतवणीनेच आजपर्यंत सांभाळला आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कोकणातल्या म्हणी, वाक्प्रचार, शिव्या या संग्रहामध्ये खूपच चपखलपणे वापरल्याचं दिसतं. महाराष्ट्रातल्या इतर भागात या सहज बोलल्या जाणाऱ्या शिव्या कदाचित अयोग्य ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोकणी माणूस त्यांचा खूप सहजपणे वापर करतो. समोरच्या माणसाला गारद करतोच, पण आपलासा करूनही घेतो. सहज सोपी आणि या प्रदेशाला साजेशी, सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी भाषाशैली, लेखनाला वेगळं वैशिष्ट्य प्राप्त करून देते.
एकंदरीत, हा संग्रह कोकणी माणसाच्या जगण्याचा लेखाजोखा आहे. या भागातल्या काही रूढी, परंपरा, संस्कृती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात अशा गोष्टींचं लेखन खूप आवश्यक आहे. पुढील पिढ्यांसाठी हा इतिहासकालीन ठेवा असेल. माणसाच्या जगण्यातील गुंतागुंतीचा शोध घेणारं हे लेखन आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एखाद्या अनुभवाकडे खूप तिरकसपणे पाहण्याची लेखिकेची वृत्ती वाचकाला वाचनासाठी प्रवृत्त करते. ‘भुयपर्मळ’ हे स्वतंत्र चेहरा जन्माला घेऊन आलेलं लेखन आहे. मराठीतील ललित लेखनाच्या समृद्ध परंपरेत हा संग्रह निश्चितच खूप चांगली भर घालेल, याची खात्री वाटते.
‘भुयपर्मळ’ - रश्मी कशेलकर
मौज प्रकाशन गृह, मुंबई
पाने - १७१
मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment