अजूनकाही
गेल्या आठवड्यात मुलांसाठी लिहिलेली दोन भाषाविषयक लक्षणीय पुस्तकं वाचनात आली. त्याविषयी काही तरी सांगितलंच पाहिजे असं तीव्रपणे वाटलं. एक तर भाषा हा माझ्याही आवडीचा, शिवाय बालसाहित्य हाही तेवढ्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या दोन्हींवरही मी गेल्या ४०-४५ वर्षांत वेळोवेळी बरंच फुटकळ लेखन केलंय. ही दोन पुस्तकं म्हणजे ‘शब्द येती घरा’ आणि ‘शब्दांमागच्या गंमतगोष्टी’. दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत सुजॉय रघुकुल. पुस्तकांबद्दल सांगण्याआधी काही गोष्टी बालसाहित्याबद्दल आणि भाषेबद्दल.
हल्ली बालसाहित्याला चांगले दिवस आलेले आहेत. विशेषतः गेल्या १०-१५ वर्षांत साहित्य अकादमीने बालसाहित्यासाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केल्यापासून बरेच होतकरू लेखक या प्रांतात घुसले आहेत. त्यात १० टक्के चांगली आणि ९० टक्के वाईट पुस्तके दर वर्षी बाजारात येत असतात. अर्थात हे १० टक्के प्रमाणसुद्धा आधीच्या तुलनेत महत्त्वाचं म्हणून स्वागतार्हच आहे. पूर्वी साने गुरुजी, ना.धों. ताम्हणकर, भा.रा. भागवत, गंगाधर गाडगीळ इत्यादी मोजकीच नावं बालसाहित्यात अग्रभागी होती. अलीकडच्या काळात बाबा भांड, दिलीप प्रभावळकर, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, अनिल अवचट इत्यादींनी बालसाहित्यात मोलाची कामगिरी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे बालकवितेत विंदा करंदीकरांच्या जवळपास पोहोचेल, असं एकही नाव दिसत नाही.
पूर्वी बालसाहित्याचा साचा ठरलेला असायचा. एखाद्या गोष्टीची जुळवाजुळव करायची आणि त्यातून बोधप्रद काही तरी सांगायचं. थोडी कल्पनाशक्ती, थोडा विनोद, एखादे साहस आणि बोधतात्पर्य. हल्लीच्या काळी आर्टपेपर, रंगीत चित्रं आणि कुठून तरी इतर भाषांमधून आणलेला किंवा स्वत:चाच अतिसामान्य दर्जाचा मजकूर घालून बालसाहित्याची पुस्तकं निघतात. त्यात मुलांच्या मानसिकतेचा विचार नसतो की, भाषेविषयीची जाण नसते. मुलांच्या कल्पनाशक्तीचा विचार नसतो की, त्यांच्या आस्थाविषयांचा विचार नसतो.
मुलांना गोष्टी आवडतात. गोष्टीतून सांगितलेले विषय दीर्घकाळ लक्षात राहतात आणि आकलनक्षमता वाढवतात. या बाबतीत मुद्दाम उल्लेख करावा लागेल, तो पूर्वीच्या अखंड रशियातून बरंच साहित्य मराठीत यायचं त्याचा. त्यातल्या मुलांसाठीच्या परीकथा, विज्ञानकथा फारच रंजक आणि उपयुक्त असायच्या.
मला सगळ्यात आवडलेली पुस्तकं म्हणजे धातूच्या शोधाविषयीच्या गोष्टी, पृथ्वीवरील आतापर्यंत न उकललेली गूढ रहस्यं आणि पेरेलमान यांची गणितावरची पुस्तकं. मूळ रशियन भाषेतून थेट मराठीत अनुवादित केलेली, अशी अनेक पुस्तकं ‘पीपल्स पब्लिशिंग हाऊस’ म्हणजे ‘लोकवाङ्मय गृहा’नं प्रकाशित केली होती. आपल्याकडेही नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियानं मुलांसाठी खास तज्ज्ञांकडून लिहून घेतलेली बरीच उत्तम पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत.
मुलांच्या कल्पनाशक्तीत वास्तव आणि अवास्तवाचं विलक्षण एकरूप दर्शन, प्रत्येक गोष्टीतलं अंतरंग जाणून घेण्याची तीव्र इछा, निर्जीवांचं मानवीकरण, लयीचं आणि सुरांचं आकर्षण, अद्भुताविषयीचं कुतूहल, विनोदवृत्ती, शब्दांशी क्रीडा, खोल भीती आणि तरीही भीतीविषयी आकर्षण, अशा कितीतरी गोष्टी असतात. बालसाहित्यविषयक लेखन करणाऱ्यांना या तमाम गोष्टींची सूक्ष्म जाण असणं आवश्यक असतं.
मुलं लहानवयात निरागसपणे शब्दांशी क्रीडा करत असतात आणि वाढत जाताना हळूहळू त्यांना अर्थाबद्दलचं प्रेमही मोहित करत असतं. मुलं भाषा कशी शिकतात आणि आत्मसात करतात, याबद्दल गेल्या ४०-५० वर्षांत एरिक्सन, बाउलबी, पियाजे, बावर इत्यादी बालमानसशास्त्रज्ञांनी बरंच संशोधन करून वेगवेगळे सिद्धान्त मांडले आहेत. बावर यांनी अनेक प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे की, मुलं अर्भकावस्थेत असतानाच अनुकरणशील असतात, पण कौशल्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. अनेक अनुभवांतून जाऊनच त्यांना कौशल्य हस्तगत करावं लागतं. भाषा शिकतानाही त्यांना संघर्ष करावा लागतोच, पण जसजसं वय वाढत जातं, तसं मुळातच असलेली कुतूहलक्षमता आणि शब्दांशी क्रीडा करण्याची वृत्ती या बळावरच मुलं सहज आणि आनंदात भाषा शिकतात.
मुलं साधारणतः किशोरवयात येण्याआधीपासून शब्दांच्या उगमापर्यंत जाण्याचा आनंद अनुभवू लागतात. त्यांच्या या वृत्तीला अनुसरूनच सुजॉय रघुकुल यांनी ‘शब्द येती घरा’ आणि ‘शब्दांमागच्या गंमतगोष्टी’ ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. आणि ती अतिशय सहज, ओघवत्या बोलभाषेत लिहिली आहेत. त्यांची शैली ही वाचकांना उद्देशून, वाचकांशी जिव्हाळ्यानं संवाद साधत कथन करण्याची असल्यानं ती अंमळ जास्तच वाचनीय झालेली आहे. मुलांप्रमाणेच मोठ्यांनासुद्धा ही पुस्तकं नक्कीच आवडतील.
‘शब्द येती घरा’ या पुस्तकात घर आणि घराशी संबंधित दैनंदिन वापरातल्या अशा शंभराहून जास्त शब्दांचा उगम कसा झाला आणि तो शब्द कोणत्या भाषेतून झाला याची रंजक माहिती आहे. या भाषा भारतातल्या प्राचीन तसंच आधुनिक, विविध प्रादेशिक, आदिवासी आहेत; अरबी, तुर्की, पर्शियन, रशियन, मलाय, चिनी, जपानी, तिबेटी, मंगोल, इत्यादी आशियाई भाषा आहेत. तसंच इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, डच, रशियन इत्यादी युरोपीय भाषा आहेत आणि आफ्रिकन भाषाही आहेत. काही हजार वर्षांच्या संस्कृतीबंधातून या भाषांमधले शब्द कधी जसेच्या तसे, तर कधी मुळापासून बदलून, कधी भ्रष्ट होऊन आपल्या भाषेत आलेले आहेत आणि आपण त्यांना सामावून घेतलेलं आहे. हे फक्त आपल्याच सभ्यता आणि संस्कृतीत झालं असं नाही, तर सगळ्यातच होत असतं.
या पुस्तकातला अतिशय वाखाणण्यासारखा भाग म्हणजे सुरुवातीलाच भाषेचा ऐतिहासिक विस्तृत पट मांडून त्याची सुबोध मांडणी केलेली आहे. भाषाशास्त्राचा इतका गुंतागुंतीचा इतिहास इतक्या सहज सोप्या आणि सरळ भाषेत सांगून मुलांना भाषेच्या इतिहास-भूगोलाची माहिती दिल्याबद्दल लेखकाचे आभारच मानावयास हवेत. यामुळे मुलांना भाषेच्या अभ्यासाची गोडी लागण्यास मदतच होईल.
इथं भारतातलाच नाही तर जगातला पहिला आणि महान भाषाशास्त्रज्ञ पाणिनीविषयीही थोडी परिचयपर माहिती दिली असती, तर योग्य झालं असतं. पाणिनीचा काळ निश्चित नाही, तरी तो किमान सहा ते चार हजार वर्षांपूर्वीचा असावा, असा संशोधकांचा कयास आहे. भाषेच्या इतिहासानंतर घराचा एकेक भाग घेऊन त्याच्याशी संबंधित अनेक शब्दांची व्युत्पत्ती सांगितलेली आहे.
जसजसं घर बांधलं जाऊन उभं राहतं, तसतशी त्याच्याशी संबंधित शब्दांची व्युत्पत्तीही इथं सांगितलेली आहे, या व्युत्पत्तीमुळे वाचकांना आश्चर्याचे हादरे बसत जातात. हे शब्द कसे आणि कुठून कुठून प्रवास करून आपल्याकडे आले, याची माहिती नुसतीच रंजक नाही, तर बौद्धिक उन्नयन करणारी ठरते. या शब्दांची शिस्तशीर यादी करून त्यांचे उगम शोधण्याचं काम थक्क करणारं आहे.
‘शब्दांमागच्या गंमतगोष्टी’ या दुसऱ्या पुस्तकात एकाच विषयाला केंद्र करून त्याच्या परिघातले शब्द घेतलेले नाहीत, तर सुमारे ५७ वेगवेगळे शब्द घेऊन त्यांच्या व्युत्पत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही काही शब्दांची व्युत्पत्ती सापडत नाही याची प्रामाणिक कबुलीही आहे. यात शब्दांचे अर्थ तर आहेतच, शिवाय इतिहास, भूगोलही आहे. विशेष म्हणजे या एकल शब्दानंतरच्या भागात सहा फारच महत्त्वाची प्रकरणं आहेत आणि ती आपल्याकडे इतर देशातून आलेले शब्द आणि आपल्याकडून इतर परदेशी भाषांत गेलेले शब्द यांच्यासंबंधी आहेत. त्या प्रकरणांच्या नावावरूनच त्यात काय आहे, याची सहज कल्पना येऊ शकेल. ती नावे अशी : ‘इंग्लंडला गेलेले शब्द’, ‘इंग्लंडला न गेलेले पण आपल्या इंग्रजीत आलेले शब्द’, ‘युरोपियनांनी बदललेली नावं’, ‘भारतीयांनी बदललेले शब्द’ आणि पोर्तुगीजांसोबतची देवाणघेवाण’.
विदेशी लोकांनी आपल्या वस्तूंची, गावांची, प्रदेशांची, अगदी आडनावांचीसुद्धा नावं बदललेली आणि आपण आजवर ती तशीच वापरत आलोत. देश स्वतंत्र झाल्यावर गावांची, प्रदेशांची नावं बदलून ती मूळ आहेत, तशी ठेवण्याची मोहीमच सुरू झाली, आणि आता तर अस्मितेच्या कारणावरून त्या मोहिमेला काही उत्साही राजकारण्यांकडून विघातक वळण देण्यात येऊ लागलेलं आहे.
ब्रिटिशांच्या काळातच आपल्याला आपल्या भाषेबद्दल ब्रिटिशांनीच जागरूक राहण्याचं शिकवलं. त्यात मेजर टॉमस कँडी (१८०४ ते १८७७) या अधिकाऱ्याचं नाव महत्त्वाचं आहे. त्यांनी १८१८मध्ये लिहिलेल्या पत्रातील हा उतारा बघा – “आता मी इतकेच सांगतो की, ज्या भाषान्तर करणाऱ्या विषयी मी वर लिहिले आहे ते इंग्लिश भाषेतल्या चालीप्रमाणे मराठी लिहिणे जर सोडून देतील, तसेच कोकणातच ज्या बोलण्याच्या रीती आहेत त्या व बोलण्याच्या इतर वाईट चाली आहेत त्या सर्व मोडून जर चांगले ग्रंथ लिहितील तर ह्यांचे ग्रंथ चांगले आहेत, असे मी आपले मत देण्यास अगदी तयार आहे.”
आपल्याकडे शब्दांच्या मुळाशी जाण्याचे ऐतिहासिक कार्य इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (१८६३-१९२६) यांनी विसाव्या शतकाच्या आरंभीच केलेलं आहे. याविषयीचे त्यांचे दोन ग्रंथ ‘मराठी धातुकोष’ आणि ‘व्युत्पत्तिकोष’ हे वाचलेच पाहिजेत, या श्रेणीतील आहेत. शिवाय सुजॉय रघुकुल यांनी दोन्ही पुस्तकांच्या अखेरीस एक विस्तृत संदर्भांची यादी दिलेली आहेच. अलीकडच्या काळात भाषाशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्वतजनांत ना.गो. कालेलकर, अशोक केळकर, स.गं. मालशे, मिलिंद मालशे, कल्याण काळे इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.
मी सुमारे ५७ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन स्तरावर वनस्पतीशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. त्या वेळी जीवशास्त्र शिकणं म्हणजे निव्वळ अनाकलनीय आणि किचकट ग्रीक-लॅटिन भाषेतील शब्द शिकणं, असे प्रचलित होते. मी महाविद्यालयाच्या अगदी पहिल्या वर्षांपासूनच अभ्यासात येणाऱ्या प्रत्येक पारिभाषिक शब्दाचा उगम सांगत गेलो. शिवाय लॅटिन शब्द कोणते, ग्रीक शब्द कोणते, हे ओळखण्याच्या ढोबळ खुणाही सांगत गेलो.
उदाहरणार्थ, एखाद्या परिभाषेतील शब्दाचा शेवट -umने होत असेल तर लॅटिन, आणि -usने होत असेल तर तो ग्रीक समजावा. जेव्हा शब्द -um ने संपतो, तेव्हा त्याचे अनेकवचन -aने होईल आणि -us असेल तर त्याचे अनेकवचन -iने होईल. जसे ovum -ova ही लॅटिन जोडी आणि radius-radii ही ग्रीक जोडी. यामुळे ग्रीक किंवा लॅटिन शब्दाचा मूळ शब्द समजला की, मुलांना आपोआपच त्यापासून तयार झालेल्या इतर पारिभाषिक शब्दांचे किमान ढोबळ अर्थ काढण्याची सवय लागली. इथं मुलांची भाषिक जाणीव वाढीस लागलीच, शिवाय त्यांचे शब्दांबद्दलचे कुतूहल आणि आकर्षण कायम राहिले. अशी मूळ शब्दापासून म्हणजे धातूपासून अनेक पारिभाषिक शब्दांची निर्मिती करण्याची क्षमता जशी ग्रीक आणि लॅटिन भाषांत आहे, तशीच संस्कृतातही आहे. आणि या भाषांचे परस्परांशी काय संबंध आहेत, हे सुजॉय यांनी आपल्या पहिल्या पुस्तकात आरंभीच्या मजकुरात सांगितलंच आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
कुठल्याही गोष्टीचं तीव्र कुतूहल असणं फार महत्त्वाचं आहे. कुतूहलातून प्रश्न पडतात. प्रश्न त्याच्या संभाव्य अर्थांना जन्म देतात. अर्थाचे अनेक पर्याय असतात. त्यातला सर्वांत योग्य, बरोबर पर्याय कोणता यासाठी सखोल चिंतन करावं लागतं, प्रसंगी प्रयोगही करावे लागतात आणि मग निष्कर्ष हाती येतो. ही संपूर्ण प्रक्रिया किंवा अभ्यासपद्धती म्हणजेच ज्ञान असते. आणि निव्वळ निष्कर्ष म्हणजे माहिती असते.
सुजॉय रघुकुल यांची वरील दोन्ही पुस्तकं मुलांचं शब्दांविषयीचं कुतूहल जागं ठेवतील. त्यातूनच पुढे दिवसेंदिवस अवनत होत चाललेल्या भाषेला सुदृढ ठेवण्यास आणि संकुचितता घालवून भाषेचा परीघ विस्तारित करण्यास हातभार लावला जाईल, अशी आशा करून हा लेख इथेच संपवतो. अखेरीस दोन चांगली पुस्तकं लिहिल्याबद्दल लेखक सुजॉय रघुकुल (जे नक्कीच टोपणनाव असावं!) यांचे आणि ती प्रकाशित केल्याबद्दल समकालीनचे मन:पूर्वक आभार!
‘शब्द येती घरा’
पाने – ४४, मूल्य – १०० रुपये.
‘शब्दांमागच्या गंमतगोष्टी’
पाने - ६०, मूल्य – १०० रुपये
- सुजॉय रघुकुल
समकालीन प्रकाशन, पुणे
.................................................................................................................................................................
लेखक चंद्रकांत पाटील कवी, अनुवादक, संपादक आणि विज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
patilcn43@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment