‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु.ल. देशपांडे’ : पु.ल. देशपांडे यांच्या चार पुस्तकांची अब्राह्मणी दृष्टीकोनातून चिकित्सा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रज्वला तट्टे
  • ‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 06 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे Brahmani Mansikta Aani Pu.la. Deshpande पु.ल. देशपांडे P.L. Deshpande ब्राह्मणी मानसिकता Brahmani Mansikta

‘ब्राह्मणी मानसिकता’ ही जन्मानं प्राप्त होणारी गोष्ट नाही. ती प्रत्येक व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत असते. घरातले, परिसरातले संस्कार आणि वातावरणाचा प्रभाव पडून ती घडते. अशा मानसिकतेचा लेखक तसेच साहित्य निर्माण करून वाचकांचीही तशीच मानसिकता तयार करत जातो. संपूर्ण समाजानं अशा लेखकाला ‘लाडकं’ मानलं असेल, तर त्याच्या साहित्याची चिकित्साही कुणी करू धजत नाही.

‘ब्राह्मणी साहित्य’मधील ‘ब्राह्मणी’ हा शब्द जातीवचक नसून संस्कृती/ परंपरा/ व्यवस्था/ मानसिकतावाचक असल्याचं नमूद करत पु.ल. देशपांडे यांच्या चार पुस्तकांची चिकित्सा अ‍ॅड. संजय मेणसे यांनी ‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु.ल. देशपांडे’ या पुस्तकात केली आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असा मी’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, अशी ही चार पुस्तकं आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मेणसे सुरुवातीलाच ब्राह्मणी साहित्य हे केवळ ब्राह्मण लेखकांनी लिहिलेलं साहित्य नसून, ब्राह्मणेतर लेखकांनी लिहिलेलं साहित्यही ब्राह्मणी असू शकतं आणि याउलटही असू शकतं, हे उदाहरण देऊन स्पष्ट करतात. अरुण साधू यांच्या ‘बहिष्कृत’, ‘त्रिशंकू’, व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’, मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ या कादंबऱ्या हे अब्राह्मणी साहित्य आहे, कारण त्यात ब्राह्मणी मानसिकता दिसत नाही. याउलट रणजित देसाई यांची ‘स्वामी’ ही ब्राह्मणी मानसिकतेतून लिहिलेली कादंबरी असल्याचा मेणसे यांचा निर्वाळा आहे. ‘स्वामी’तल्या रमाबाई सती जातानाच्या प्रसंगाचे वर्णन वाचताना ब्राह्मणी मानसिकतेच्या वाचकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. अब्राह्मणी वृत्तीचा वाचक मात्र हेच वर्णन वाचताना अतिशय अस्वस्थ होतो, अन्यायी आणि विकृत सतीप्रथेचं देसाई यांनी उदात्तीकरण केल्याचा त्याचा आक्षेप असतो.

मग ब्राह्मणी साहित्य ओळखायचं कसं? त्याचे स्पष्ट परिमाण मेणसे देतात. तथाकथित उच्चजातियांना मान देणं आणि तथाकथित खालच्या जातीयांना तुच्छ लेखणं, स्थितीप्रिय आणि परंपराप्रिय असणं, सकारात्मक का असेना बदल घडू लागले की, त्याला विरोध-टिंगल करणे, बदल घडवू पाहणाऱ्यांची मानहानी करणं, बदल घडलाच तर दुःख व्यक्त करणं, मुलांनी आणि विशेषतः मुलींनी अज्ञाधारक असलं पाहिजे असं मानणं, अज्ञापालनाला त्याग म्हणणं, स्त्रियांची अकारण टिंगलटवाळी\मानहानी\निंदा करणं, त्यांच्याविषयी तुच्च्छता दाखवणं, त्यांचं कुटुंबातील दुय्यम स्थान अधोरेखित करणं, बायकोचा मूर्खपणा दाखवणं आणि त्या बिचाऱ्या नवऱ्यावर करत असलेले अन्याय, दादागिरी याला विनोदाचा विषय करणं, मुसलमानांना केवळ परकीय\ दूरचे\ विरोधक वगैरेच नाही, तर थेट शत्रू दाखवणं, सौंदर्याच्या तथाकथित ब्राह्मणी कल्पनेच्या (गोरं, सडपातळ नसणे) बाहेर असलेल्यांना कुरूप ठरवून त्यांच्या दिसण्यावरून टिंगल उडवणं, हे सारं ब्राह्मणी मानसिकतेत येतं.

ब्राह्मणी मानसिकता असं मानते की, माणसांचे स्वभाव, आवडीनिवडी, गुण, रंग–रूप, बुद्धिमत्ता, कला–कौशल्य, कर्तृत्व हे सारं जातनिहाय असतं आणि समाजातल्या चालीरितींची, रूढी-परंपरांची, कर्मकांडांची काळी बाजू दाखवणं पसंत करत नाही. सर्वसमावेशकतेचं यांना वावड असतं. नियतीवाद यांचा आवडता सिद्धान्त असतो. त्यात गूढपणा घालून आणखी धारदार केला जातो. निराशावाद, तुच्छतावाद, पलायनवाद, पराभूत मानसिकता म्हणजे ब्राह्मणी मानसिकता!

अशी आणखी काही व्यवच्छेदक लक्षणं दाखवून मेणसे ब्राह्मणी मानसिकता म्हणजे काय ते दाखवून देतात.

उच्चवर्णियांच्या स्थितीशीलतेला, स्त्रीविरोधी परंपरांना शरण जाताना त्याला नियतीवाद आणि गूढतेचा मुलामा चढवत समर्थन करणारी पात्रं पु.ल. देशपांडे उभी करतात. त्याचं ‘व्यक्ती आणि वल्ली’मधल्या नंदा प्रधानचं उदाहरण मेणसे देतात. नंदा आणि इंदूची ताटातूट होते, त्या प्रसंगात इंदूचा म्हातारा बाप तिच्या दोन लहान भावांना तिच्या पायाशी आणून आदळतो. म्हणतो, “जा, तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले, म्हातारपणी, ह्या तुझ्या भावंडांच्या पोटात दोन घास घालशील असं वाटलं होतं. तुडव त्यांना आणि जा दाराबाहेर!” आपल्या भावांच्या संगोपनासाठी इंदू नंदाशी लग्न न करण्याचा निर्णय घेते. हा प्रसंग खूप हृदयद्रावक वाटतो. इंदूच्या त्यागानं आणि नंदाच्या असहायतेनं मन भरून येतं.

पण मेणसे म्हणतात की, या प्रसंगाला दुसरी बाजूही आहे, जी फक्त अब्राह्मणी दृष्टीकोनातूनच दिसू शकेल. म्हातारपणी मुलगी शोभेल अशा मुलीशी तिसरं लग्न करणाऱ्या बापाविरोधात इंदूनं विद्रोह केला असता, नंदानं इंदूला असा विद्रोह करण्यास प्रोत्साहन दिलं असतं, आधार दिला असता तर? तसं घडलं असतं, तर ना इंदूची शोकांतिका झाली असती, ना नंदाची! पण तसं घडत नाही. इंदूसारख्या अतिशय बुद्धिमान मुलीनेसुद्धा स्वतःच्या आयुष्याचं मातेरं झालं तरी चालेल, पण विद्रोह करता कामा नये, बाप स्वार्थी आणि निर्लज्ज असला तरी त्याच्या आज्ञेबाहेर जाता कामा नये, अशी पु.ल. देशपांडे यांची धारणा आहे की, त्यांच्या वाचकांची भावनिक गरज, असा प्रश्न मेणसे विचारतात.

इंदूनं प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड का केलं नाही किंवा लेखकाने तसं का दाखवलं नाही, हा प्रश्न अब्राह्मणी विचारांच्या मनातच येऊ शकतो.  असा विद्रोह देशपांडे यांच्या चाहत्यांना इतक्या वर्षानंतर तरी पेलवेल का, हा कळीचा प्रश्न आहे.

हीच मानसिकता नाटक कंपनीत स्त्रीपात्र करणाऱ्या ‘बोलट’ या प्रकरणात जनू या व्यक्तीच्या आईने दुसरा घरोबा केला, त्याचं वर्णन करताना दिसते. विधवेला सन्मानानं जगण्याची, पुनर्विवाह करण्याची संधी त्या काळातल्या ब्राह्मण समाजात असती, तर जनूच्या आईनं त्याचा दुस्वास केला असता का? खरा गुन्हेगार कोण? ब्राह्मणी समाज की जनूची आई? जनूचं आयुष्य स्थिर नसतं, म्हणून त्याची प्रेयसी सखू वेश्याव्यवसायास लागते. जनूचा प्रेमभंग होतो. यालाही देशपांडे टिंगलीचा विषय करतात.

बापू काणे ही व्यक्तिरेखा साकारताना देशपांडे संपूर्ण कोकणस्थ ब्राह्मण समाजाला तिरकस ठरवतात. बापूचा तिरकस स्वभाव अधोरेखित करायला कानेंच्या मुखी ‘लुगडं कसं काय बोललं रे?’ म्हणून ‘विदूषी’वर टोमणा मारतात. सुशी ही बापूची बायको त्याला अर्ध्यारात्री जेऊ घालते, दीड-दोन वर्षात एक मूल जन्माला घालते, म्हणून ती आदर्श हिंदू स्त्री आहे, अशी टिप्पणी करतात.

तसंच पेस्तनकाका पारशी असल्यामुळे त्यांचा सहवास आपल्याला सात-आठ तास लाभणार, याचा देशपांडेंना आधीच आनंद होतो आणि लेखकाची पत्नी (म्हणजे सुनीताबाई देशपांडे) मात्र पतीची चूक दाखवून देणारी ‘पतिप्रमादप्रसिद्धीपरायण’ म्हणून कॉमेंट येते. ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये एकही स्त्रीपात्र का नाही, हा मेणसे यांचा प्रश्नही रास्तच आहे.

विशेष करून स्त्रिया पु.ल. यांच्या विनोदनिर्मितीच्या लक्ष्य बनलेल्या आहेत, हे खटकलेल्या मेणसे यांनी पुस्तक अर्पण केलंय तेच मुळी, ‘मुक्तीदायी विचारधारा आणि चळवळी, दुय्यमत्व लादलेले जनसमूह आणि समस्त स्त्रिया यांना’.

या सर्व मुद्द्यांची या १२४ पानी पुस्तकात बऱ्याचदा पुनरुक्ती होते. आणखी पुनरुक्ती होते, ती गांधी आणि गांधीवाद्यांच्या टिंगलीच्या चार पुस्तकांमधल्या स्थानांची. कारण या चारही पुस्तकांमध्ये गांधीवाद्यांची निंदा, टवाळी याचीही पुनरुक्ती होत राहते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये तर गांधीवादी आचार्य अगदी पराभूत होतात. ब्राह्मणेतर पुरोगाम्यांनाही ही पुनरुक्ती खटकू शकते. या अनुषंगाने मेणसे यांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की, त्या काळात मुंबईमधील मध्यमवर्गात सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रूळत असूनही संघ किंवा सावरकर हे पु. ल. यांच्या टवाळीचे विषय का नाही झाले? 

या पुस्तकात शेवटी प्रा. माधुरी दीक्षित यांचं ‘उपसंहार’ हे भारतीय खंडणमंडन परंपरेला साजेसं प्रकरणही आहे. त्यात त्या एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. तो असा- “पुरोगामी मंडळींबरोबर संघीय मंडळींनासुद्धा पुलं कसे आवडतात, या मेणसे यांच्या प्रश्नापेक्षाही अधिक गुंतागुंतीचा प्रश्न, पुरोगाम्यांना पुलं का आवडतात, असा विचारायला हवा.” ब्राह्मणेतर पुरोगाम्यांमधला गांधीद्वेष हे त्याचं कारण असू शकेल का?

आणि म्हणून ‘पुलं’ या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवलेल्या लेखकाची चिकित्सा करताना मेणसे त्यांचा त्यांच्या खऱ्या नावानेच उल्लेख करतात. यावरून लेखकाने त्यांच्या चार पुस्तकांचा किस पाडताना त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या लांब राहण्याचं भान किती जागृत ठेवलं आहे, याची कल्पना यावी. त्यांच्या भाषेचं गारुड आणि त्यातून होणाऱ्या विनोदनिर्मितीच्या प्रभावात न येता अलिप्ततेनं केलेली ही चिकित्सा तितक्याच अलिप्तपणे मराठी वाचक पचवू शकतील का? बघावं लागेल.

‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे’ – अ‍ॅड. संजय मेणसे

लोकवाङ्मय गृह, मुंबई

मूल्य  : १५० रुपये.

.............................................................................................................................................

लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vishnu Date

Wed , 08 June 2022

ललित च्या ताज्या अंकात "झारा आणि सराटा" मध्ये ह्या समीक्षेचं योग्य विश्लेषण केलं आहे!


Vishnu Date

Wed , 08 June 2022

ललित च्या ताज्या अंकात "झारा आणि सराटा" मध्ये ह्या समीक्षेचं योग्य विश्लेषण केलं आहे!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......