‘वीजेने चोरलेले दिवस’ : ही कादंबरी वीजेच्या प्रश्नाने गावखेड्याची, तिथल्या शेतीजीवनाची जी परवड झाली, त्याच्यावर अनेक कंगोर्‍यांनी प्रकाश टाकते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
दत्ता घोलप
  • ‘वीजेने चोरलेले दिवस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 21 May 2022
  • ग्रंथनामा शिफारस वीजेने चोरलेले दिवस Vijene Chorlele Divas संतोष जगताप Santosh Jagtap

संतोष जगताप यांची ‘वीजेने चोरलेले दिवस’ (२०२०) ही ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी आहे. अलीकडच्या काळात वास्तव समाजरचनेचा बृहद आराखडा सादर करणार्‍या कादंबर्‍या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्यापक पटावरचा ग्रामीण अवकाश सरधोपट पद्धतीने चित्रित करणे असे या कादंबर्‍यांचे स्वरूप आहे. वास्तव तपशीलातील भरताड भरणा वाटावा, या पद्धतीचे हे कादंबरीलेखन आहे. समकाळात मराठीतील वास्तववादी कादंबरी ही रुढार्थाने याच पद्धतीने येते. या पार्श्वभूमीवर वास्तववादी कादंबरीलेखनाची विशेषत: ग्रामीण कादंबरी लेखनाची ही मळलेली वाट ओलांडून जगताप यांनी मर्यादित जीवनावकाश कवेत घेत त्याला परिपूर्णतेने समग्रतेला भिडवले आहे. सरधोपटपणे कथानक पुढे ढकलत राहण्यापेक्षा, ही कादंबरी वीजेच्या प्रश्नाने गावखेड्याची तिथल्या शेतीजीवनाची जी काही परवड झाली, त्याच्यावर अनेक कंगोर्‍यांनी प्रकाश टाकत, व्यवस्थेला उघड करत, कथनाचे अनोखे प्रयोग आणि माणदेशी परिसरसापेक्ष भाषा योजनेतून हे साधते.

शेतीव्यवसायातील वीज भारनियमनाच्या मर्यादित प्रश्नाने सुरू होणारी ही कादंबरी शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतीव्यवसायाकडे आपण कसे पाहतो व व्यवस्थेने शेतीव्यवसायाची कशी छळछावणी केली आहे, ही वस्तुस्थिती समोर ठेवते. माणदेशच्या बरड माळावर दगड-धोंड्यांशी झट्या घेणार्‍या शेतकर्‍याच्या अनुभवातून हे होत असल्याने, या दाहकतेला अधिकची बळकटी येते. वीज समस्येला केंद्रस्थानी ठेवत कृषिव्यवस्थेचा आणि बदलत्या गावखेड्याचा आंतरछेद घेतला आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेचे तळपातळीवरील कार्यरत असणे वास्तवचित्रणातून दाखवून दिले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

प्रमुख पात्र जगू माळीच्या नजरेनं हा भोवताल, त्यातील खाचखळग्यांसह न्याहाळला आहे. जगू माळी उच्चशिक्षित असल्यामुळे डोळसपणे छिद्रान्वेषी व्यवस्थेचे आकलन तो सजगतेने नोंदवतो. या पडझडीत पिचणार्‍याची बाजू दाखवतानाच त्याला जबाबदार घटकही उघड करतो. शेतीप्रधान देशात शेतकरी म्हणजे शेतकरी हे नामाभिदान गौरवाने मिरवाचे राहत नाही तर शे शेतकरी म्हणजे शेळपट, या पातळीवर कसे आले, हा आलेख स्वतःच्याच जगण्याचा वाटचालीतून दाखवून दिला आहे. जगू माळीचे जगणे आणि त्याच्या भोवतालातील काही कहाण्या आल्या आहेत. ज्या शेतीच्या वर्तमान जगण्याला ठळक करतात. जगू माळीबरोबर हा समांतर संघर्ष कथाशयाचे भारलेपण वाढवतो. वीजेच्या समस्येला लगडून येणार्‍या अनेक बाजू दाखवल्या आहेत. अडचणीतल्याची नाडवणूक, दुसर्‍याच्या अडचणीत स्वतःला संधी शोधणार्‍या प्रवृत्ती जशा येतात. तशाच शेतकर्‍याच्या हातबलतेचे, बेरकीपणाचे, आपमतलबी स्वार्थाचे, साध्या प्रसंगातही विकल होणारे, तरीही चिवटपणाने सामोरे जाणारे, असे अनेक कंगारे आले आहेत. मुळातूनच गावखेड्यातील शेतकर्‍याच्या परपिडणाचे दु:ख येते.

भारनियमनाच्या प्रश्नाला हात घालणारी ही कादंबरी या प्रश्नाने गांजून गेलेल्या गावखेड्याच्या जगण्याची दाहकता उजागर करते. संपूर्ण व्यवस्थेलाच जखडून राहिलेला हा प्रश्न आहे. बदलत्या यांत्रिकीकरणाच्या आधुनिक काळात मानवी जगणे परावलंबी कसे झाले? हे परावलंबीत्व इतके ताणले गेले की, कोणतीही कृती आता वीजेशिवाय, ऊर्जेशिवाय आपण करू शकत नाही.

हे जखडलेपण अधोरेखित होते. लेखकाने भारतीय दृष्टीकोनातून हा प्रश्न हाताळला आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, कोरडवाहू-बागायती, दुष्काळी, अशा अनेक कंगोर्‍यांनी त्यातील गुंतागुंत उकलली आहे. शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंबंधी जो दृष्टिकोन विकसित केला. विशेषत: शरद जोशी यांनी ‘भारत विरुद्ध इंडिया’ ही मांडणी केली याच्या प्रभावखुणाही लेखकीय संवेदनस्वभावात दिसतात. शेतकरी चळवळीच्या दृष्टिनियंत्रणातून शेतीसंबंधी जीवनविश्व न्याहाळले आहे. सतत भारताच्या पिचलेपणाची आणि इंडियाच्या झगमगटाची कहाणी पुढे येते. तुलनात्मकतेने दोन जगाची- त्यातील भेदाचे, सुखासीनतेचा फुगवटा आणि विस्थापित जगाच्या बिकट अवस्थेची तीव्रता दाखवली. दोन परस्परविरोधी प्रसंग समोरासमोर दाखवल्याने त्यातील तीव्रता येतेच, शिवाय वाचकमनात येणारी एकाच वेळी अपराधभावाची तर हतबलतेची जाणीव निर्माण होते.

शहरी झगमगाट, कार्यालयीन पंखे लाईट ही दिवसाची उरासत, तर दुसरीकडे शेतकर्‍याला रात्रीची लाईट म्हणजे रानोमाळ रात्रीच्या अंधारात साप, विंचू, करंट, अशा कितीतरी न संपणारी संकटाची मालिका. शोषक-शोषित व्यवस्था सतत समोरासमोर दाखवून त्यातील शोषणाचे संदर्भ अधिक गहिरे केले आहेत. ‘‘खरं म्हंजे आम्हीबी माणसंच आहोत, आम्हालाबी जीव हाय हे ध्यानात घ्या. तुमचं पोरगं गुड नाइट म्हणत झोपणार. अन् आमचं पोरगं फुल्ल लाइट म्हणत जागणार. असं का रे बाबांनो. खाल्लेल्या भाकरीला जागून आमचं कुत्रं इमानदारीनं घुटमळतंय, रातभर रानामाळानं आमच्या पायात. तुम्हालाबी आम्हीच भाकरी देतोय की. त्या मुक्या जीवाला कळतंय, खरं तुम्ही दाद लागून घेत नाय. वरनं बिलासाठी आम्हालाच दट्ट्या लावताय. आम्ही फुकट मागत नाय लाइट. मतासाठी तुम्हीच घोषणा करता मोफत विजेची. अन् निवडून येताच हसण्यावारी घेता. गाजरं दावायचं धंदं करून शेतकर्‍याला येड्यात काढताय. झालं एवढं बास झालं.” (पृ.११२)

व्यवस्थेलाच कटघर्‍यात उभे करून त्यातील दाहकता जोरकसपणे व्यक्त केली आहे. सुखासीन जगाची मस्तवाल चैन आणि त्याच वेळी ‘दिवसभर उनातानाचं राबायचं न् रातचंइंदारचं अंधारात पाण्यासाठी तडफडायचं’ अशी कष्टप्रद स्थिती दाखवून या गरगरत्या वास्तवाचे अनेक कंगोरे, राजकारणी, अधिकारी ते उद्योगपती आणि कुणाच्याही खिजगणतीत नसलेला खेडूत शेतकरी, शिवाय शेतीसंबंधाने येणारे बी-बियाणे, खते, शेतमजूर, शेती, औजारे, शेतीपूरक व्यवसाय अशा कितीतरी बाजूंवर चर्चेच्या ओघात प्रकाश टाकला आहे.

शेतीप्रधान म्हणून असणार्‍या या लोकशाही देशाच्या वर्तमानाचा आंतरछेद घेतला आहे. लोकशाहीच्या स्थापनेपासून ही प्रक्रिया कोणता आदर्शवाद घेऊन होती. नेहरू काळापासूनची परिस्थती अधोरेखित करत वर्तमानातली पडझड चर्चेच्या ओघात तर कधी स्वगतकथनातून व्यक्त केली.

वीज समस्येने हैराण झालेला, त्याची प्रत्यक्षगत दाहकता काय आहे, हे दाखवतानाच या भारनियमनाच्या जमान्यात काळवंडून गेलेला त्याचा भोवताल उजागर केला आहे. वीजेच्या समस्येला असलेल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक बाजू त्यातून जगण्या-मरण्याचे उभे राहिलेले प्रश्न, असा सर्व अवकाश कधी निवेदनातून, घटना-प्रसंगातून तर कधी चर्चेतून पुढे येतो. जगू माळी हा अनुभवकर्ता हाच कथनकर्ता असल्याने घटनांचे आतून उकलने आणि सत्यतेने त्यातील दाहकतेचा दाब वाचकांपर्यत दणकटपणे पोहोचतो.

सांगण्याचा कथनपवित्रा असा की, तुलनात्मकतेने जसे दोन स्तरभेद दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर जगू माळी या पात्राच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील अनुभवांचे सेंद्रिय पद्धतीने काळांतरण करत घटना-प्रसंगांची परिणामकारकता वाढवली आहे. ‘चकचक चांगला काचेचा बंगला, धर माझ्या हाताला, चल एका रातला’ अशा हुमणाहुमणीतनं लहाणपणी माहीत झालेली बॅटरी पुढे असा जीव खाईल असा उल्लेख येतो.

आणखी एका प्रसंगात विहिरीतील पाण्याच्या पाईप वॉलमध्ये प्लास्टिक कागद अडकल्याने रात्रीची अंधारात तेही थंडीच्या कहरात पाण्यामध्ये उतरून काढण्याच्या प्रसंगात त्या अभ्रक कागदाचे एकेकाळचे अग्ररूप मुंबईची आत्या काही वस्तू घेऊन यायची त्यासोबत येणार्‍या प्लॅस्टिक कागदाचे कोण कौतुक आसायचे; परंतु तोच कागद आता सर्व रानोमाळ झाला विहिरीत पडून काम घोटाळा करायला लागला. लाईट नाही म्हणून चांदण्याच्या उजेडात जेवणाचा प्रसंगही असाच अंधारात नाईलाजाने जेवावे लागणे तर एनसीसी कॅम्पला ‘कँडल लाईट डीनर’ आठवतो.

स्थानांतरण आणि काळांतरण नेमके परिणाम साधतात. वेगवेगळ्या अनुभवछटांचे एकत्रीकरण होते. यामुळे प्रसंगचित्रणाच्या या आनोख्या पद्धतीमुळे घटनांचे प्रस्तर अधिक गडद झाले आहेत. शिवाय एखाद्या घटनेच्या भूत-वर्तमान-भविष्य बाजू सांगत घटनांचे प्रस्तर रुंदावत जगण्याशीच अंतर्गत वेढून अधोरेखित केले आहेत.

कथनरीत अशी चर्‍हाट लावल्यासारखे मुख्य कथाशयाला जोडून अनेक संदर्भातील लहानसहान घटना-प्रसंगातून प्रमुख कथाशयाचे पसरलेपण प्रवाहीपणे पुढे जाते. लाईट-लाईट खेळणारी लहान मुले, इंगळी चावलेला संदीपान, लाईट नसणार्‍या दवाखान्यातील डॉक्टर, शेतीवाडी पाहणारा शिक्षक, मकेचे पान लागून डोळा गेल्याली फुलाआत्या, साठ एकरचा ऊस बागायतदार अशा कितीतरी लोकांच्या प्रसंगोपात घडलेल्या घटना आणि त्याही पुन्हा भारनियमनाशी जोडलेल्याच आहेत. मुख्य जीवनाशयाला जोडणार्‍या आणि तपशीलबहुलतेने त्या वाटा अधिक प्रशस्त करणार्‍या आहेत.

माणदेशच्या परिसर बोलीतील हे कथन जागोजागी म्हणी, वाक्प्रचारांनी भरीव झालेले आहे. या भाषा योजनेमुळे घटना आणि तिचे घटित सार्वत्रिक आणि सार्वकालिक होते. ‘‘खांजळ बाबा खांजळ! न्हाय दुखत आमच्या पोटात! आमचीच वशी फिरल्याय... झक मारली म्हणून आता कसं चालंल? ज्याचा भार त्याला जोजार. उरावर घेतलंय, सोसावं तर लागंल. अन् म्होरचं बाळंतपणबी निस्तरावं लागंल. न्हायतर घे हिसकं न् तोड दावं, शे. जगू माळी!” (पृ.५)

हा संपूर्ण कथनतुकडाच म्हणींनी लिहिला आहे. या आगतिक अनुभवाचे सर्वव्यापी पसरलेपण जोरकसपणे येते. भाषेचा वापर असा की व्यवस्था आकलनाचे हे दु:खभान वाचकमनाला पिळवटून टाकते. लेखक फक्त व्यवस्थेला उकलत सामान्यांच्याही चुकांचा पाढा वाचत राहतो. सामान्य माणूसही या पडझडीला जबाबदार कसा ठरतो आणि लोकशाही प्रक्रियेचे गांभीर्य घालवत, स्वतःचीच फसगत कशी करून घेतो हेही तटस्थतेने दाखवतो. वास्तवाधिष्ठिततेचे सर्वच कंगोरे चर्चीले जातात. जगू माळीच्या तोंडी येणारा ‘कडू' हा शब्द क्रिया, प्रतिक्रिया, विशेषण, क्रियाविशेषण अशा अनेक व्याकरणिक रूपांसह अर्थदृष्ट्या अनेकविध भावछटा घेऊन येतो. उपहास आणि उपरोधाच्या शैलीचा सजगतेने केलेला वापर उपहासगर्भ लेखनाची उदाहरणे कादंबरीभर पसरलेली आहेत. या कादंबरीच्या भाषेचा स्वतंत्रपणेच विचारा व्हायला हवा एवढी सजगता लेखकाने पहिल्याच कादंबरीत प्रकट केली आहे.

वीजेने चोरलेल्या दिवसांचा हिशेब मांडत असतानाच त्याला जबाबदार घटक हे लोकसेवकांपासून प्रशासकांपर्यंतच्या अनेक वृत्ती-प्रवृत्तींसह त्यांच्याच शब्दांत पुढे येते. बारीक-सारीक कंगोरे तपशीलासह येतात. जगण्याच्या सर्वच बाजूंवर या यंत्रयुगाच्या काळात सर्वच जगण्याला वेढून राहिलेला प्रश्न त्याच्या अंधार्‍या पसरलेपणासह येतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘‘हा उटउळगीपणा हे अर्थातच चांगल्याचं लक्षण न्हाय. मातीच्या नादापायी म्हणा न्हायतर दुसरी वाटच न्हाय म्हणून म्हणा, आम्ही सोसवत नसूनबी वाट बदलत न्हाय... खरं हे असंच चालू राहिलं तर, आमची उद्याची लेकरं, असंबी न् तसंबी उपाशीच मरायचाय म्हणल्यावर, ह्या वाटनं अर्थातच चालणार न्हाईत. मग...” (पृ. १५६)

वर्तमानाची दाहकता पचवून त्याची भविष्यदर्शी वाट ही सुखावह नसणार आहे. हा शोषितांचा, पिचलेल्या लोकांचा विद्रोह कोणत्या वाटेने जाईल हे सांगता येण्यासारखे नाही. शिवाय जगाचा पोशिंदा म्हणवल्या जाणार्‍या शेतकर्‍याचा वर्तमान असाच हरवलेला राहिला, तर त्याचा उद्याचा विचार कोणी करायचा? शेतकर्‍याच्या पुढील पिढ्यांनी यातून बाहेर पडायचे ठरवले तर आपले काय होईल? याचा सर्वच जबाबदार घटकांनी विचार करायला हवा, याचे सूचन करून ही कादंबरी संपते.

‘वीजेने चोरलेले दिवस’ – संतोष जगताप

दर्या प्रकाशन, पुणे,

पाने – १५६

मूल्य – २२० रुपये.

(अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा (२०२१-२०२२)’मधून साभार)

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. दत्ता घोलप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......