‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ : ‘आपण कवितेत कोणतीही तडजोड न करता भूमिका मांडतो’, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या कवीचा नवा संग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
किरण शिवहर डोंगरदिवे
  • ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 16 May 2022
  • ग्रंथनामा शिफारस अग्निपरीक्षेचे वेळापत्रक Agnipariksheche Velapatrak यशवंत मनोहर Yashvant Manohar

ज्यांचा शब्द त्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे आजवर अजिंक्य आहे आणि साहित्याचे अनेक प्रवाह व काव्याचे अनेक मौसम ज्यांनी पाहिले आहेत, काव्यातील, जीवनातील आणि समाजातील स्थित्यंतरं ज्यांनी अनुभवली आहेत, असे कवी म्हणजे यशवंत मनोहर. मराठी काव्यक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव, भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्ठा असलेले आणि मानवतेसाठी, समतेसाठी आग्रही असलेले स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कवी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतुसूत्रीवर भिस्त ठेवून विज्ञाननिष्ठा आणि मानवी जीवनाचा तळ शोधणारे मराठीत जे काही मोजके कवी आहेत, त्यात यशवंत मनोहर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. काही लोकांना कायमस्वरूपी गुलाम ठेवण्याची व्यवस्थेची व्यूहरचना, त्यातून शोषित-पीडितांचा संघर्ष, मानवी मूल्याचा शोध इत्यादी बाबतीत यशवंत मनोहरांची लेखणी सातत्याने स्फुल्लिंग चेतवत असते.

१९८०मध्ये आलेल्या ‘उत्थानगुंफा’पासून २०२१मध्ये आलेल्या ‘शिवराय आणि भीमराय’ या संग्रहापर्यंत मराठी रसिक तो सजीव परिवर्तनवादी अनुभव घेत आहेत. नुकताच त्यांचा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ हा नवाकोरा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. ३२१ पानांवर स्वतःचं अस्तित्व ठासून सांगणाऱ्या ५५ कविता आणि उर्वरित १२ पानांवर ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा काव्यलेखनामागची भूमिका सांगणारा लेख असे या संग्रहाचे स्वरूप आहे. व्यवस्थांतराचा ध्यास धरणाऱ्या पेरियार रामस्वामी, केशवसुत आणि कवी ब्रेख्त यांना हा संग्रह अर्पण करण्यात आला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘कवी उगवतो तेव्हा’ या कवितेत मनोहर म्हणतात-

‘हजारो वर्षांच्या तुरुंगावर

निर्णायक हल्ला करणारा

पहिला हातोडाही कवीचाच आहे.’

अन्यायाच्या विरुद्ध उभे राहणाऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून कवी असतो, हे सांगताना अज्ञानाला नागडे करणारा, अन्यायाला आग लावणारा, जुलमी सत्तेच्या बुडाखाली सुरुंग लावणारा, अशा अनेक पातळ्यांवर कवीला मनोहर उभे करतात. पूर्णपणे बरबाद झाले तरी कवींचे शब्द नवा जन्म घेतात. तुकोबांच्या गाथेप्रमाणे इंद्रायणीच्या पात्रात बुडाले तरी अमर होणारे शब्द या समाजाने पाहिलेले आहेत, त्यामुळेच कवीने स्वतःची ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि स्वतंत्र विचारसरणी जपली पाहिजे, असे मनोहर सांगतात. त्यांच्या मते-

‘कवी मृत्यूला शिकवतो जीवन

शिकवतो सभ्यता

त्याच्या असभ्यतेला

आणि मरणही जाते मरूनच

पेटलेल्या जंगलासारखा 

कवी उगवतो तेव्हा...’

कवीचे असणे हीच एक परिवर्तनकारी ललकारी आहे, मात्र त्याचे भान स्वतः कवीला असणे गरजेचे असते. जोपर्यंत स्वतःला झळ लागत नाही, तोवर हा समाज किंवा आजचे वर्तमान निव्वळ झोपेचे सोंग घेऊन पसरलेले असते. जेव्हा नाकातोंडात पाणी जायला लागते, अगदी जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र सागरात आग लावण्याची तयारी होती, असे मनोहर नमूद करतात. मात्र प्रत्येक वेळी नाकातोंडात पाणी जाईपर्यंत आपण बेसावधच असले पाहिजेत का, असे प्रश्नही त्यांनी या संग्रहात उभे केले आहेत. ‘नदीमाय’ या विलक्षण प्रवाही कवितेतली किनाऱ्यांच्या चौकटीत अडकून राहणारे अस्तित्व नाकारून पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहणारी नदी, ही प्रत्येक व्यक्तीच्या मनातील स्वातंत्र्याची आणि विस्तार विचारांची नैसर्गिक नांदी असल्याची नोंद आहे, असे वाटते. मनोहर लिहितात -

‘तिला माहीतच नसते प्रयोजन

तिला माहीत नसतो धर्म माणसाप्रमाणे

तिला माहीतच नाही कुठला भेद

तिला नसते कोणतीही जात माणसाप्रमाणे

नदी करत नाही कोणत्याही देवाची पूजा

ती करत नाही प्रार्थना कोणाचीही’

त्याचबरोबर समुद्र म्हणजे नदीचा प्रियकर ही काव्यकल्पना नाकारून समुद्र हा नद्यांचाच जैविक अनुवाद असून अनेक नद्यांची संयुक्त वसाहत आणि प्रबोधनसभा आहे, अशी संकल्पना मनोहरांनी मांडली आहे. नद्यांवर बंधारे आणि धरणे बांधून त्यांचा प्रवाह थांबवणे म्हणजे त्यांचा जनसंपर्क तोडणे, अशा विलक्षण प्रतिमा या संग्रहात वापरल्या आहेत. थोडक्यात, मनोहरांनी सांप्रत वर्तमानाचा आढावा घेत एक नवी, मात्र सर्वसामान्य जनजीवनातील प्रतिमासृष्टी निर्माण केली आहे.

‘रस्ते’ या कवितेत मनुष्य आणि रस्ते यांचा तुलनात्मकदृष्ट्या आढावा आहे. त्यातील ‘मशाली झालेल्या माणसांची वाट’, ‘सूर्याचा मेंदू असलेला माणूस’ या उपकविता जास्त प्रभावित करतात.

‘ज्या खिळ्यांनी ठोकले जातात

मायमाऊल्यांचे धिंडवडे वर्तमानाच्या क्रुसावर

ते खिळेच उगवतात आता दिवसांबदली मोकाट वस्त्यांमधून’

‘बेबंद बलात्काराचे मुजोर युग’ अशा शब्दातून ‘कलेवर संस्कृती’ या कवितेत मनोहर विदारक चित्र मांडतात. ‘वासनेच्या उन्मादाच्या संसर्गाने धार्मिक उन्मादही करतात’ या ओळीतून जातीधर्माचा उन्माद, पौरुष्य सिद्ध करण्यासाठी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे इत्यादी संकल्पनांसोबत राजकीय गुंड आणि लोकशाहीची झालेली वाताहत इत्यादींची परस्परपूरक मांडणी दिसते. ‘मयसभेला लोक राजकारण म्हणतात’ या ओळीतून राजकारण किती फसवे आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अंधारग्रस्त वर्तमान’ या कवितेत ‘सूर्य’ नावाच्या उपशीर्षक असलेल्या कवितेत मनोहर म्हणतात -

‘ज्यांनी सूर्यच बघितला नाही

असे अब्जावधी लोक बघितले मी

विझलेल्या डोळ्यांचे

त्यांच्या डोळ्यावरील पट्ट्यांशी चर्चा केली मी

पट्ट्या लपवित होते सत्य.

पाहणाऱ्याच्या मनात उगवलाच नसेल सूर्य

तर तो दिसणारच नाही बाहेर...’

हाच भाव ‘त्याच्या उजेडाची कविता’, ‘हे असेच सुरू राहिलं तर’, ‘बेट’, ‘आज तसे घडत आहे’, ‘उच्छादाचे काळे ढग’ इत्यादी कवितांतूनही जाणवत राहतो. हे सांगत असताना

‘आल्या आल्या त्यांनी

दिशा बुडविल्या धुक्यात

आणि गवई बंधुप्रमाणे धाकलीच्या

त्यांनी रस्त्याचे डोळे काढले.’

असे उदाहरणे देत दलितांवरील अन्याय-अत्याचाराचा समाचार घेत, हे चित्र बदलण्यासाठी उभे राहणे गरजेचे असण्याचे आवाहन मनोहरांनी केले आहे.

काव्यात बुद्धाचे व्यक्तित्व, विचारदर्शन, तत्तज्ञान आणि बुद्धाचा अंगीकार-स्वीकार कसा असावा याचा सुंदर परिपाठ या संग्रहामधील ‘बुद्ध!’, ‘बुद्धा!’, ‘बुद्ध आगीतून बाहेर नेणारा रस्ता’, या कवितांमधून दिसतो. 

‘युद्धभूमीवर होत्या दोन छावण्या

एका छावणीत होती दुःखे

जिथे होते रथी, महारथी वा अतिरथी.... 

आणि दुसऱ्या छावणीत होता

बुद्ध झालेला उजेड’

कधी बुद्धाबाबत चर्चा, कधी चिंतन, तर कधी बुद्धाशी संवादी पद्धतीने संभाषण करत मनोहर व्यक्त झाले आहेत.

बुद्धाइतकेच अनन्यसाधारण महत्त्व असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ‘सूर्यगृह’ या कवितेतून मनोहरांनी बाबासाहेबांच्या निवासस्थानाचा म्हणजे राजगृहाचा परिवर्तनाचे प्रतीक म्हणून गौरव केलेला दिसतो.

‘नोटबंदीच्या महापुरातही

वाहूनच गेली खूप गरीब माणसं

अडचणीचाही थांबत नव्हता पाऊस...

हे सर्वच उच्चांक नियोजनाच्या दुष्काळाचे’

असे स्पष्टपणे सांगत, नोटबंदीच्या काळात गरिबांचे झालेले हाल आणि नियोजन शून्य निर्णयाचे जीवघेणे पडसाद यावर भाष्य केले आहे. तर त्याच वेळी

‘थांबविले नाही कोणत्याही परम शक्तीने

कुलपे लावणाऱ्या हातांना.

विषाणूंपुढे माना टाकणाऱ्या कोणालाही

त्या शकल्या नाहीत वाचवू…

तरी थांबत नाही साकडे संस्कृती.’

अशी चपराकही दिली आहे. या सर्व अतार्किक श्रद्धांचा अजूनही या समाजाला कंटाळा येत नाही, ही मनोहरांची खंत आहे.

मनोहरांनी ‘झाडे’, ‘अस्वस्थ झाडे’, ‘आपण झाडे वाचतो म्हणजे’, अशा कवितांतून झाडाच्या नैसर्गिक, परोपकारी आणि परोपकारी व्यक्तीच्या रूपाला झाड म्हणून वापरत विविध विवेचन केले आहे. ‘मृत्यू येण्याआधीच’ या कवितेत

‘डोळ्यात येत नाही अश्रू

आणि मृत्यू येण्याआधीच

जंगलही आता मरून चाललंय’

या ओळींतून मानव आणि निसर्ग यांच्या तुटत चाललेल्या नात्यांची तळमळ व्यक्त केली आहे.

थोडक्यात,

‘लपवित नाही काहीही

माझी कविता

माझ्यासारखीच.’

हे सत्य या कवितासंग्रहात पूर्णपणे उतरले आहे. कवी म्हणतात त्याप्रमाणे त्यांची कविता या वर्तमानाचे पर्यावरण बदलण्याचा प्रयत्न करणारी आहे. त्या अनुषंगाने ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या शीर्षकांतर्गत ‘धोका’, ‘अंधराष्ट्र’, ‘जागेपण हरवलेले लोक’, ‘सत्य असण्याचा गुन्हा’ अशा २९ कवितांतून ही अस्वस्थता मनोहर मांडत जातात. साधारणतः सर्वच काव्यातून व्यवस्थांतर, परिवर्तनवादी किंवा विद्रोही भूमिका, मानवी जीवनातील संघर्ष, उत्क्रांतीचा जयघोष पाहायला मिळतो. 

अगदी कवीच्याच शब्दात सांगायचे तर-

‘वादळाचे निरोप गेले आहेत

बाकीच्याही सर्व वादळांना.

वेदना देत आहेत निरोप जखमांना

आणि जखमा घेत आहेत

वेदनेचे निशाणे हातात

... कधीतरी डोळे भरले होते माझे,

आता आभाळही भरून आले आहे.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मनोहरांच्या कवितेतील अनेक संदर्भ आणि शब्दातील ज्वालांचा आलेख या संग्रहाच्या शेवटी असलेल्या ‘मी अशीच कविता का लिहितो’ या लेखामधून समोर येते. त्यात मनोहर म्हणतात, “माझी कविता जशी आहे, तशी सर्वच वाचकांच्या पुढे आहे. तिच्या गुणदोषांची चर्चा करण्याचा अधिकार वाचकांचा आहे.” असे सांगून कवितेबाबतचे निर्णय वाचक घेतील, आपण कवितेत कोणतीही तडजोड न करता भूमिका मांडतो, अशी परखड भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.

वर्णमुद्राने हा कवितासंग्रह यशवंत मनोहरांच्या काव्याच्या तोलामोलाचा काढला आहे. दा. गो. काळे या नि:स्पृह समीक्षकाची ‘पाठराखण’ (Blurb) संग्रहातील जाणिवांचा अर्थ सांगणारी आहे. तर श्रीधर अंभोरे यांनी चेहरे हरवलेल्या समाजाची रेखाटने तितक्याच प्रभावीपणे काढली आहेत. संग्रहाची उंची वाढवणारे मुखपृष्ठही त्यांचेच असून त्यातून कवितेचा तोंडवळा व्यक्त होतो.

‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ - यशवंत मनोहर

वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव

पाने – ३३६

मूल्य – ४५४ रुपये.

.................................................................................................................................................................

किरण शिवहर डोंगरदिवे

kdongardive@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......