हिंदीतले ज्येष्ठ प्रयोगशील कवी-कादंबरीकार विनोदकुमार शुक्ल यांच्या ‘नोकर की कमीज़’ या कादंबरीचा ‘नोकराचा सदरा’ हा निशिकांत ठकार यांनी केलेला अनुवाद नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित झाला आहे. या मराठी अनुवादाच्या पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना- या कादंबरीचं भारतीय साहित्यातलं स्थान आणि वेगळेपण उलगडून दाखवणारी…
..................................................................................................................................................................
‘नौकर की कमीज़’ या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली, तेव्हा ती एक असामान्य कादंबरी आहे असे मानले गेले. तिची कीर्ती फार लवकर पसरली; पण ही प्रसिद्धी फक्त लेखकांपुरतीच मर्यादित राहिली. ‘वासूनाका’ किंवा ‘कोसला’सारखी विस्फोटक लोकप्रियता तिला लाभली नाही, किंवा तिची तशी चर्चाही त्या वेळी झाली नाही. तसे पाहिले तर ही त्या प्रकारची कादंबरी नव्हतीही. बराच काळ तिच्यावर चर्चा न व्हायचे कारणही तसे हास्यास्पद आहे. ही कादंबरी छापून आली, तेव्हा तिच्यात भयानक मुद्रणदोष राहिलेले आहेत असे आढळले. चार पानांचे शुद्धिपत्रक लावूनही अनेक दोष तसेच राहिलेले होते. मग मध्य प्रदेश सरकारने या कादंबरीची संपूर्ण पहिली आवृत्तीच विकत घेऊन टाकली, आणि दुसरी आवृत्ती निघायला खूपच उशीर झाला. त्यामुळे समीक्षकांना अनेक वर्षे या कादंबरीची शुद्ध प्रत मिळूच शकली नाही. दुसर्या एका प्रकाशकाने या कादंबरीची प्रमाणित आवृत्ती छापली आहे असे म्हणतात, पण तीही कुठे आढळत नाही. ही कादंबरी न मिळण्यामागे स्वत: विनोदकुमार शुक्ल यांचा नि:संगपणा आणि निष्काळजीपणाही कारणीभूत झालेला आहे. तरीसुद्धा या कादंबरीची कीर्ती वाढतच गेली, हा या कादंबरीचा अर्थपूर्ण आणि कालोचित असण्याचा पुरावा होय.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हिंदीतल्या सर्व साहित्यिकांनी या कादंबरीचा स्वीकार केला आहे, असे म्हणणेही तितकेसे खरे नाही. तसे पाहिले तर विनोदकुमार शुक्ल जवळपास चाळीस वर्षांपासून लिहिताहेत; पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती एक अद्वितीय कवी म्हणून. हिंदीत शमशेर बहादुरानंतर सर्वाधिक प्रयोगशील कवी म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांनी आपली स्वत:ची शैली आणि घाट प्रस्थापित केला आहे. त्यांच्या तरुणपणीच त्यांच्या काही कविता कालातीत मानल्या गेल्या होत्या.
गजानन माधव मुक्तिबोधांनंतर हिंदी कवितेत विनोदकुमार शुक्ल यांचे असणे अपरिहार्यच होते. पण कवितांच्या बरोबरीने त्यांनी कथाही लिहिल्या होत्या, आणि हे एक महत्त्वाचे कथालेखकही आहेत, हे विचक्षण वाचकांच्या ध्यानात आले होते. समर्थ कवींनी उत्कृष्ट कथा लिहिण्याची परंपरा रघुवीर सहाय, कुंवर नारायण आणि श्रीकांत वर्मा यांनी हिंदीत निर्माण केली होती, त्या परंपरेतच त्यांचा समावेश केला गेला. ग. मा. मुक्तिबोधांनी आधी हे केले होते. त्यांची ‘विपात्र’ नावाची लघुकादंबरी महत्त्वाची मानली जाते. पण विनोदकुमार शुक्ल हे या प्रकारच्या कवी-कथाकारांमध्ये कादंबरी लिहिणारे बहुधा एकटेच असावेत. पण हल्ली हिंदी साहित्यात जे फक्त कथा-कहाण्या लिहितात, त्यांचाच समावेश कथेच्या मुख्य प्रवाहात करण्यात येतो. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांपासून शुद्ध कथाकार आणि कवी-कथाकार यांच्या दरम्यान एक प्रकारचा जातिभेद वाढीस लागला आहे. त्यामुळे कथा संस्थानांवर कब्जा मिळवलेल्या कथाकारांना व कादंबरीकारांना असे वाटते, की ‘नौकर की कमीज़’ला दिले जाणारे महत्त्व हे अतिबौद्धिक कवी-समीक्षकांनी किंवा प्रशंसकांनी घडवून आणलेल्या खोट्या प्रसिद्धीमुळे मिळाले आहे.
दुर्बोध विवेचनांमुळे प्रसिद्धीस आलेली ही कादंबरी खरोखरच एक बौद्धिकताग्रस्त कादंबरी आहे का? वस्तुस्थिती अशी आहे की, या कादंबरीवर जॉइस, प्रूस्त, काम्यू, काफ्का, सार्त्र, ग्रास, मार्केस, कुंदेरा किंवा डॉक्टोरोव यांची तर सोडाच; पण हिंदीतल्या अज्ञेय, जैनेंद्र, किंवा अगदी निर्मल वर्मा यांचीसुद्धा कुठलीच नावनिशाणी दिसून येत नाही. भाषेचे, शैलीचे किंवा घाटाचे कुठलेही धक्का देणारे प्रयोग या कादंबरीत नाहीत. अस्तित्ववाद, आधुनिकतावाद, संरचनावाद, उत्तर आधुनिकतावाद यापैकी कशाचीच दाखवेगिरी किंवा क्लिष्ट जोडतोड यात केलेली नाही. हिंदीतल्या तथाकथित मुख्य प्रवाहातल्या कथाकारांनी ‘नौकर की कमीज़’ आणि विनोदकुमार शुक्ल यांचे महत्त्व मान्य न करण्यामागे एकच कारण असू शकते. ते म्हणजे एका अप्रतिम प्रतिभेसमोर दुसर्या दर्जाच्या लेखकांना वाटणारी असुरक्षितता.
‘नौकर की कमीज़’ या कादंबरीला जर काही कथानक असेल तर ते फारच साधे आहे. मध्य प्रदेशातल्या छत्तीसगढ क्षेत्रातले एक गाव. तिथे एक सरकारी ऑफिस आहे. एका साहेबाच्या हाताखाली काही लहान-मोठे कारकून काम करताहेत. कथानायक संतूबाबू एक तरुण, नवा कारकून आहे. विवाहित आहे. बाप होणार आहे. साहेब नेहमीच एका नोकराच्या शोधात असतात. त्यांनी या नोकरासाठी एक सदरा शिवून ठेवलाय. येणार्या प्रत्येक नव्या नोकराला ते तो सदरा घालून पाहतात. फिट होतो आहे का नाही? एके दिवशी तो सदरा जबरदस्तीने ते संतूबाबूला घालायला लावतात.
पण गोष्ट एवढीच नाही. संतूबाबू एक भारतीय कनिष्ठ मध्यमवर्गातला तरुण आहे. त्याचे बालपण आणि किशोरवय एका गरीब कुटुंबाला येणार्या अडचणीत गेलेले आहे. मोठ्या मुश्किलीने त्याला नोकरी मिळाली आहे. पगार पुरत नाही. आपल्या गर्भवती पत्नीसह त्याला भाड्याच्या घरात राहावे लागते. विधवा आईला तो फक्त आपल्या मदतीसाठीच घरी ठेवून घेऊ शकतो. आपल्या थोरल्या भावाबद्दल त्याच्या खर्या-खोट्या तक्रारी आहेत. ऑफिसात त्याच्यावर मोठे साहेब, त्यांची बायको, हेडक्लार्क आणि सहकर्मचारी या सर्वांचा दबाव आहे. तो स्वत: आदर्शवादी आहे. प्रामाणिकपणे काम करायची त्याची इच्छा आहे. तो कधी कधी बंडखोरीही करतो; पण तो एकटाच नव्हे, त्याचे कुटुंबच नव्हे, तर त्याचा सगळा वर्ग आणि त्याखालचा वर्ग एका अमानुषीकरण करणार्या तंत्राचे तडफडत असलेले बळी आहेत.
प्रेमचंदांपासून सुरू झालेली हिंदी कथासाहित्याची वास्तववादी, मानवतावादी, प्रतिबद्ध, समाजोन्मुख परंपरा आता स्थिर झालेली आहे आणि निर्मल वर्मा व काही थोडे तरुण कथा-कादंबरीकार सोडले तर सगळ्या विद्यमान कथाकारांची गणना याच परंपरेत होते. एकोणीसशे साठच्या सुमारास हिंदी कथेत आशय आणि रूप यांच्या संदर्भात काही प्रयोग झाले होते, आणि अलीकडे काही कथालेखकांवर मार्केसच्या जादुई वास्तववादाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तथापि, एकंदरीत हिंदी कथासाहित्य सरळ-साध्या कथानकाचाच आश्रय घेत असते.
हिंदीत आता प्रेमचंद, जैनेंद्र, अज्ञेय, यशपाल, अमृतलाल नागर आणि फणीश्वरनाथ रेणूंच्या तोडीचे कादंबरीकार उरलेले नाहीत हे कटू सत्य आहे. बंगालीतल्या विमल मित्र, शंकर, प्रबोध सान्याल यांच्यासारखे लोकप्रिय कथाकारही हिंदीत नाहीत. कथेच्या क्षेत्रात थोडेफार लेखन होत आहे, पण नाटक आणि कादंबरीच्या बाबतीत हिंदीत आणीबाणीचीच स्थिती आहे. अशा अवस्थेत विनोदकुमार शुक्ल यांच्या या कादंबरीचे काय महत्त्व आहे, असे विचारता येईल. पण वस्तुस्थिती अशी आहे, की नेमक्या या परिस्थितीमुळेच ‘नौकर की कमीज़’चे यश जास्तच चकित करणारे ठरते.
कथानायक संतूबाबू ज्या प्रकारचे जीवन जगतो आहे, पाहतो आहे आणि सांगतो आहे ते एका बरोबरीच्या सहभागी माणसाप्रमाणे आहे. त्याच्यामागे कुठलीही आरोपित वर्गदृष्टी नाही किंवा सैद्धांतिक पूर्वग्रह नाही. त्याच्यापुढे कनिष्ठ मध्यमवर्ग किंवा आपले गाव ‘विषय’ म्हणून नाही. त्यात कोणतीही ऐतिहासिकता किंवा प्रादेशिकता नाही. ते खुद्द जीवनच आहे आणि त्याविषयीच तो सांगू पाहतोय. त्यामुळे ‘नौकर की कमीज़’ वाचताना आपल्याला काही तरी दाखवले जात आहे असे वाटत नाही. उलट, जगत असलेल्या जीवनाचीच जाणीव आपल्याला सतत होत राहते.
हिंदीतले बरेचसे कथासाहित्य सामाजिक वास्तवाचेच चित्रण करते. अनेक कथाकारांनी विशिष्ट भूप्रदेशाचे किंवा विशिष्ट वर्गाचे खूप विश्वासार्ह चित्रण केलेले आहे; पण शहरी कनिष्ठ मध्यमवर्गाच्या आत्म्यात विनोदकुमार शुक्लांनी जसा प्रवेश केला आहे तसा बांधिलकी मानणारे हिंदी कथाकार करू शकलेले नाहीत.
‘नौकर की कमीज़’मध्ये जे काही कथानक, उपकथानक आणि समांतर कथानक आहे, ते खरोखर संपूर्ण समाजालाच कादंबरीचा विषय किंवा नायक बनवण्यासाठी रचलेले आहे असे म्हणता येईल. फक्त संतूबाबूचेच व्यक्तिगत, कौटुंबिक आणि कार्यालयीन जीवन सादर करायचे असे जरी विनोदकुमार शुक्लांनी ठरवले असते तरी कादंबरीचे औचित्य सिद्ध झाले असते. त्यांना वाटले असते तर त्यांनी साहेब, हेडक्लार्क, संतूबाबू, देवांगण आणि गोरटे कारकून यांना घेऊन एक भारतीय काफ्कावजा कादंबरी लिहिली असती; पण मग ‘नौकर की कमीज़’ला मर्यादित मान्यता मिळाली असती.
विनोदकुमार शुक्लांना आपल्या कथानायकात आणि त्याच्या जगण्यातच फक्त रस नाही. कोणत्याही माणसाची गोष्ट म्हणजे त्याचे आयुष्य नव्हे, तर तिचा संबंध त्याच्या वर्गाशी, समाजाशी आणि बृहद् मानवव्यापाराशी असतो हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे या कादंबरीत एक मूळ कथा आणि अनेक उपकथा आहेतच, शिवाय जगातल्या प्राचीन तसेच लोककथेच्या परंपरेतील काही थेट असंबद्ध वाटण्यासारखी अनेक स्वतंत्र प्रकरणे आहेत, स्वगत-कथने आहेत. त्यामुळे कादंबरीची जडणघडण समृद्ध तर होतेच, शिवाय ज्याला ‘आधुनिक’ किंवा ‘प्रयोगशील’ म्हणता येईल असा घाटही तिला लाभतो. पण हे सगळे कष्टपूर्वक किंवा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून होत नाही. ‘नौकर की कमीज़’ म्हणजे ‘युलिसिस’ नव्हे. विनोदकुमार शुक्लही जेम्स जॉइस नाहीत. त्यांचे गाव ‘डब्लिन’ नाही आणि संतूही स्टीफन नाही. ही आत्ममुग्ध प्रदर्शनवादापासून दूर असलेली निखळ भारतीय कादंबरीकाराची निखळ भारतीय कादंबरी आहे.
या कादंबरीत वाचकाला सर्वांत जास्त खिळवून टाकणारा व चकित करणारा कोणता घटक असेल, तर तो म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचे, कुटुंबाचे, वातावरणाचे अत्यंत प्रामाणिक व स्वाभाविक चित्रण होय. सामाजिक वास्तवाचे चित्रण अनेक हिंदी लेखकांनी केलेले आहे; पण व्यक्तीपासून समष्टीपर्यंत पसरलेल्या अनेक छटा आणि परिमाणे एकत्र करण्याचे काम बहुधा विनोदकुमार शुक्लांनाच साधले असावे. ज्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचे चित्रण ते करतात, ज्या पर्यावरणात त्याची स्थापना करतात, त्याच्याकडे जेवढ्या सखोलपणे-प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने पाहतात, ती दृष्टी हिंदीतल्या बांधिलकी मानणार्या वा न मानणार्या बहुतेक लेखकांजवळ सापडत नाही. फक्त फणीश्वरनाथ रेणू आठवतात. पण रेणूंमध्ये नेहमीच एक आत्यंतिक लोकगीतात्मकता असते. तिच्यामुळे वास्तवापासून लक्ष बाजूला जाते. ‘नौकर की कमीज़’मध्ये मानवता आणि सहानुभूती या गुणांची उणीव मुळीच नाही, पण तिच्यामागे एक कलात्मक वस्तुनिष्ठ दृष्टी आहे. ती कादंबरीला भावुक किंवा रोमँटिक होऊ देत नाही.
विनोदकुमार शुक्लांचे जीवनानुभव सखोल आणि व्यापक आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाकडे, वर्गबहुल समाजाकडे त्यांनी इतक्या जवळून पाहिले आहे की, त्यामुळे वाचक स्वत:ला संतूबाबूत पाहतो; त्याची पत्नी, आई, थोरला भाऊ, वहिनी, त्याची मुले यात आपले कुटुंब पाहतो. साहेबात आपला साहेब, सहकर्मचार्यात आपले सहकर्मचारी, वर्गबंधूत आपले वर्गबंधू, मित्रात आपले मित्र, त्याच्या वातावरणात आपले वातावरण आणि त्याच्या समाजात आपला समाज शोधू लागतो. संतूबाबूची गरिबी, संघर्ष, असुरक्षितपणा, नाइलाज, अपमान, आदर्शवाद, कौटुंबिक वात्सल्य, विद्रोहाभास यात आपल्याला आपल्या व्यक्तिगत जीवनाची आठवण येऊ लागते. कादंबरीतले प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना, तिचे सगळे वातावरण आपण जगलोय किंवा आपण ते अनुभवलेय असे वाटते. वाचकाशी अशा प्रकारचे तादात्म्य हिंदीतल्या दुसर्या कुठल्या कादंबरीने साधले असेल असे वाटत नाही.
या कादंबरीच्या लेखकाची जीवनदृष्टी आणि त्याची बांधीलकी स्पष्टच आहे; पण त्यासाठी त्याने कोणत्याही सिद्धान्ताचा, विचारसरणीचा किंवा तयार उत्तराचा आधार घेतलेला नाही. विनोदकुमार शुक्ल आपल्या जीवनात एक वर्गजागृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ‘नौकर की कमीज़’मध्ये एक तटस्थ दृष्टी आहे, असे म्हणता येणार नाही; पण आपल्या काव्यात आणि कथेत त्यांनी कधीही आपल्या स्वत्वाशी आणि कलात्मक मानदंडाशी तडजोडी पत्करल्या नाहीत, चालू पुरोगामी चळवळीचा किंवा जनवादाचा सोयीचा मार्ग स्वीकारला नाही. एखाद्या शल्यविशारदाप्रमाणे ते शांत, सखोल वास्तवापासून सुरुवात करतात आणि लगेचच त्यात एक भावुक नसलेली जवळपास तटस्थ मानवी सहानुभूती येऊन मिळते आणि मग येतो विनोद; परपीडेतून नव्हे तर सखोल करुणेतून व सहभागातून उपजणारा. या कादंबरीत असे अनेक वास्तविक प्रसंग आहेत, मुळापासून हलवणारे आहेत. आपल्याही आयुष्यात घडलेले आहेत. त्यांचे हसूही येते; पण आपण आपल्यालाच हसतोय ही जाणीव असते. विनोदकुमार शुक्लांनी विनोदी कादंबरी लिहिलेली नाही, पण ही हिंदीतली एक वेगळीच एकुलती एक विनोदी कादंबरी आहे.
भारतीय समाज विनोदासाठी रोज कोट्यवधी प्रसंग पुरवतो. पाश्चात्त्य जीवनदृष्टीकडून प्रेरणा घेऊन कोणीही लेखक अस्तित्ववादी किंवा उत्तर आधुनिकतावादी विसंगतीबद्दल बोलू शकेल. शुद्ध भारतीय परिमितीतून एकदम निव्वळ देशज विसंगतीचा शोध ही विनोदकुमारांची उपलब्धी होय. साहेबाचे नोकरासाठी एक खास सदरा शिवून घेणे, त्यात सहकार्यांच्या जबरदस्तीने संतूबाबूला तो सदरा घालणे हे सगळे एक भयानक, अपमानजनक, अमानुष विसंगतीचे नाटक आहे. सत्तापक्ष आपल्याहून खालच्या वर्गाला गणवेश चढवून नोकर बनवणारच, आणि या कामात त्याच वर्गाचे लोक मदत करणार. एकटा संतूबाबू नव्हे तर सगळा कनिष्ठवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग या नव्या गुलामीत नाइलाजाने जगतो आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
बहुतांश भारतीय समाज तर्हेतर्हेच्या मानसिक आणि भौतिक रोगांनी ग्रासलेला आहे, कारण तो अनेक पातळ्यांवर दहशत आणि असुरक्षितता यांनी वेढलेला आहे. त्याला आपल्या प्रत्येक हालचालीची भीती वाटते, आपल्या निष्क्रियतेची आणि डोक्याची पण भीती वाटते. कारण तो विचार करायचा कधी थांबत नाही. ‘नौकर की कमीज़’मध्ये तो सगळा विद्रूपपणा, उपहास, परस्परविरोधी आकर्षण आणि दहशत आपल्या भयानक प्रामाणिकपणासह व्यक्त झालेली आहे.
‘नोकराचा सदरा’ - विनोदकुमार शुक्ल
भाषांतर - निशिकांत ठकार
समकालीन प्रकाशन, पुणे
पाने - २४६
मूल्य – ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment