ही लहानशी पुस्तिका एकाच वेळी खगोलशास्त्रीय मीमांसेचा आधार घेत कालगणनेची गोष्ट सांगते आणि त्याच वेळेला भारतीय जीवनशैलीतल्या धर्म‘मुक्त’ चिंतनाचा निर्देश करत आपल्या राजकीय पूर्वग्रहांवरही बोट ठेवते!
ग्रंथनामा - आगामी
दत्ता भगत
  • ‘नोंद कालगतीची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 03 May 2022
  • ग्रंथनामा आगामी नोंद कालगतीची Nond Kalgatichi प्रभाकर देव Prabhakar Deo कालगणना प्राचीन काळ Ancient Times मध्ययुगीन काळ Medieval Times आधुनिक काळ Modern Times

‘नोंद कालगतीची’ या पुस्तकाला मी प्रस्तावना का लिहावी? अन्य कुणी हा प्रश्न विचारण्याऐवजी मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो. यात माझा कुठलाही विनय नाही. साहित्य क्षेत्रातल्या माणसाला आपला समाज नकळतपणे वलयांकित करतो. त्यामुळे केवळ वलयांकित असल्यामुळे ऊठसूठ कुठल्याही पुस्तकाला- ज्या पुस्तकातील आशय सूत्राचे विवेचन करावे असा मला कुठलाच अधिकार नाही तरी मी - प्रस्तावना लिहायचे मान्य करणे, हा एक प्रकारचा उद्धटपणा आहे, असे मला स्वतःलाच वाटते. असे असले तरी मी डॉ. प्रभाकर देव यांनी ‘प्रस्तावना मीच लिहावी’ हा त्यांचा आग्रह मान्य केला. त्याचे खरे कारण वाचकांना कळायलाच हवे. सदर पुस्तिका लिहायला डॉ. प्रभाकर देव तयार झाले, ते माझे अज्ञान दूर करण्याच्या हेतूने आणि अनेक वाचकांच्या मनात सदर विषयाबाबत पूर्वग्रहविरहीत कुतूहल तरी निर्माण ठरायला हवे, या सद्हेतूने. म्हणून मी ही प्रस्तावना लिहायला तयार झालो. सर्वसामान्य वाचक आणि मराठी वाङ्मयाचा विद्यार्थी या विषयाकडे कुतूहल म्हणूनसुद्धा पाहत नाही, असे माझे निरीक्षण आहे. त्यासाठी तरुण वाचकांसाठी मी हे दोन शब्द लिहीत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

डॉ. प्रभाकर देव हे इतिहास संशोधन क्षेत्रातले एक मोठे नाव आहे. आम्ही दोघेही एकाच शहरातले आणि अध्यापन व्यवसायाचे आहोत. मित्र असलो तरी निवृत्तीपूर्व काळात माझ्या आणि देव सरांच्या फार भेटीगाठी होत नसत. सेवानिवृत्तीनंतर मात्र हे चित्र बदलले. या ना त्या निमित्ताने अनेक विषयांवर जे आम्हा उभयतांच्या अध्यापन संबंधातले विषय आहेत, त्यावर चर्चा करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र येत होतो. अशाच एका चर्चेतून डॉ. देव यांना सदर पुस्तिका लिहायला हवी, अशी प्रेरणा मिळाली. घडला प्रसंग तो असा -

मी डॉ. देव यांना आमच्या अभ्यास मंडळातील एका निर्णयाचा किस्सा सांगत होतो. तो असा- सामान्यपणे पदवी अभ्यासक्रमात वर्षानुवर्षं दोन अभ्यासपत्रिका चालू होत्या. एका अभ्यासपत्रिकेच नाव होते- ‘प्राचीन मराठी गद्यपद्य’ आणि दसऱ्या अभ्यासपत्रिकेच नाव होते- ‘आधुनिक मराठी गद्यपद्य’. यातील ‘प्राचीन गद्यपद्य’ या विषयपत्रिकेत संताची रचना, बखर गद्य, महानुभाव गद्य यातील संपादित वेच्यांची पुस्तके असत अथवा त्या कालखंडातील एखाद्या कवी\लेखकाचा विशेष अध्याय अथवा उतारा अभ्यासासाठी असे. आधुनिक गद्य-पद्यासाठी एखादा कवितासंग्रह, एखादी कादंबरी अथवा एखादा कथासंग्रह अध्यापनासाठी नेमला जात असे.

प्राचीन गद्यपद्याची विषयपत्रिका शिकवताना माझी एका विसंगतीकडे नजर गेली. त्या वेळी मी अभ्यास मंडळाचा सदस्य होतो. म्हणून मी त्या विसंगतीवर बोट ठेवून चर्चेला सुरुवात केली. कोणती विसंगती?

बखर गद्य शिकवताना बखर गद्याचा नायक मग शिवाजीमहाराज असोत, पानिपत युद्धातले पेशवे असोत की महानुभाव गद्यातले चरित्रनायक स्वामी चक्रधर असोत, यांचा उल्लेख आम्ही ‘मध्ययुगीन कालखंडातल्या व्यक्ती’ असाच करत असू. पण ज्ञानेश्वर तुकारामांच्या रचनांचे अध्यापन करायची वेळ आली की, आम्ही त्यांच्या रचनांचा विचार ‘प्राचीन’ या विशेषणाने करत असू. म्हणजे चरित्रनायकांना ‘मध्ययुगीन’ मानायचे, पण त्यांच्या रचनांना मात्र ‘प्राचीन’ मानायचे! यात एक विसंगती होती. खरे तर शिवाजीमहाराज जर मध्ययुगीन असतील, तर त्यांच्या काळातली रामदास-तुकारामांची रचना ‘प्राचीन’ कशी म्हणता येईल?

या प्रश्नावर खूप चर्चा झाली. सुमारे सर्वच विद्यापीठांमधील २५-३० वर्षं चालू असलेला हा पायंडा होता. वाङ्मयाच्या इतिहास लेखनातसुद्धा अशीच वर्गवारी छापलेली असायची. अखेर आमच्या अभ्यास मंडळाने निर्णय घेतला. ‘प्राचीन’ या शब्दाऐवजी ‘मध्ययुगीन’ या विशेषणाचा आम्ही वापर सुरू केला. ‘मध्ययुगीन गद्यपद्याचा अभ्यास’ असे अभ्यासपत्रिकेच नाव बदलण्यात आले. आज सर्वच विद्यापीठांत हा बदल सुरू झालेला आहे. हा किस्सा सांगून झाल्यानंतर देव सरांनी मला प्रश्न विचारला. तो अत्यंत महत्त्वाचा होता. ते म्हणाले, ‘प्राचीन’, ‘मध्ययुगीन’ अथवा ‘आधुनिक’ अशी कालगणना करताना तुम्ही हे कालमापन कसे करता? तुमच्या कालमापनाच्या कसोट्या कोणत्या?

खरे तर असा खोलात जाऊन आम्ही विचारच केलेला नव्हता. सर्वत्र रूढ असणाऱ्या युरोपीय भाषाभ्यासकांनी जी वर्गवारी रूढ केलेली होती, तीच वर्गवारी आमच्या मनात होती. ढोबळमानाने सांगायचे तर आरंभापासून मुस्लीम आक्रमणापर्यंतचा काळ ‘प्राचीन’; मुस्लीम आक्रमणापासून इंग्रजी राजवट येईपर्यंतचा काळ ‘मध्ययुगीन’; तर ब्रिटिश राजवटीपासून नंतरचा काळ ‘आधुनिक’, अशी एक स्थूल कालगणना आम्ही गृहीत धरलेली होती.

या गृहितावरच डॉ. देव सरांनी मला विचार करायला भाग पाडले. ‘हे रूढ गृहीत ‘कालगणनाशास्त्र’ जणू आपल्या भारतीय परंपरेत कुठेच नाही, असे समजून आम्ही पाश्चिमात्य अभ्यासकांवर अवलंबून राहिलो’, अशी सुरुवात करून त्यांनी भारतीय कालमापनाची खगोलशास्त्रीय मांडणीच उलगडून दाखवली. जी गोष्ट अत्यंत धूसरपणे आपणा सर्वांनाच माहीत आहे. ती अधिक तर्कशद्ध पद्धतीने देव सर सांगू लागले. त्यामुळे मला त्यांचे सर्व विवेचन नावीन्यपूर्ण वाटले आणि खरेही वाटले. निदान विचाराला चालना देणारे होते असे वाटले. म्हणून ‘या विषयावर तुम्ही एखादे व्याख्यान द्या’ असे मी म्हणालो. त्यांना वेळ नव्हता. म्हणून अवघ्या एक आठवड्याच्या आत त्यांनी एक दीर्घ लेख लिहिला. हा दीर्घ लेख म्हणजेच प्रस्तुत पुस्तिका. लगेच त्यांनी ती पुस्तिका कल्पना प्रकाशनाला दिली आणि या पुस्तिकेची मीच प्रस्तावना लिहावी, असा आग्रह करून ते औरंगाबादला निघून गेले. तेव्हा आपल्या सर्वसामान्य मराठी वाचकांच्या विचारात एक मौलिक भर घालणारी पुस्तिका म्हणून या पुस्तिकेतल्या विषयाचे निराळेपण सांगण्यासाठी प्रस्तावना लिहायचे मी मान्य केले, हे मी वाचकांना सांगू इच्छितो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

काही वाचकांचे वैशिष्ट्य असे असते की, ते प्रस्तावना वाचून मग पुस्तक वाचावे किंवा नाही, हा निर्णय घेतात. तर काही वाचक पुस्तक झाल्यानंतर प्रस्तावनेचे वाचन करतात. या दुसऱ्या गटातील सामान्य वाचकांना मात्र माझी विनंती की, त्यांनी प्रस्तावना वाचून झाल्यानंतर हे पुस्तक वाचावे. कारण डॉ. देव सरांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पुस्तिका संशोधनाच्या अंगाने लिहिली आहे. त्यांच्या संशोधन लेखनावर मल्लिनाथी करावी, हा माझा अधिकार नसल्यामुळे मी ही पुस्तिका का वाचावी, एवढ्यापुरताच प्रस्तावनेत विचार मांडला आहे.

सदर पुस्तिकेची प्रकरणाची शीर्षके वाचली तरी हा विषय किती जटील आहे, हे आपल्या लक्षात येईल. तर काही प्रकरणे वाचल्यानंतर अलीकडे धार्मिक पुनरुज्जीवनवादाचा जो आरंभ झालेला आहे, तसेच काहीतरी या पुस्तिकेत असावे, अशी आपली घट्ट समजूत होईल. तसे होता कामा नये, एवढाच माझ्या या प्रस्तावना लेखनाचा हेतू आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी आपले काही पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण ही पुस्तिका वाचायला हवी, असे या प्रस्तावनेतून मी सूचवले आहे.

आपले सर्व प्राचीन जग धर्मश्रद्ध वातावरणाने व्यापलेले आहे. त्यामुळे जीवनशैलीतल्या ज्या इहलौकिक गरजा आहेत, त्या भागवल्या जातानासुद्धा आपण धार्मिक परिभाषेचाच वापर करतो. भूक भागवण्यासाठी जेवण करणे यात धर्माचा कुठे संबंध आला? पण ‘उदरभरण नव्हे जाणिजे यज्ञकर्म’ असे म्हणून पंगतीतल्या लोकांनी संतवचनांचा जयजयकार करत जेवायला सुरुवात करायची, ही आपली पद्धत. वस्त्रं वापरून जुनी झाली की, नवी वस्त्रे हवी, ही आपली ऐहिक गरज आहे. पण या गरजेचा सांधा परंपरेने सणवारांशी जोडला आणि सणवारांच्या कथा पुढे पुराणिकांनी रूढ केल्या. जणू ही गरजसुद्धा आपणाला धार्मिक वाटू लागली. निवाऱ्यासाठी घर बांधले की, मग वास्तूपूजा आली आणि जवळच्या प्रिय व्यक्तीला मरणाने संपवून टाकले की, त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी ‘श्राद्ध’ भोजन आले!

आपल्या जीवनशैलीतील अनेक गरजा इहलौकिक असल्या तरी त्या भागवण्यासाठी जो आचार आपण करतो, तो ‘आचार’ केवळ आचार न राहता ‘आचारधर्म’ होतो. त्यातून मग या सगळ्याच आचारधर्मातला धर्माधिष्ठित फोलपणा आपणास सलू लागतो. आधुनिक बुद्धिवादाने धर्मविहित रूढी आणि इहलौकिक गरजा, यातील अंतरच संपवून टाकले आहे. हे अंतर बाजूला सारून आपण ‘नोंद कालगतीची’ हे पुस्तक वाचायला हवे, ही माझी तरुण वाचकांना सूचना आहे.

विचारवंताना काय वाटायचे ते वाटो, पण भारतीय माणसे हा फरक ओळखून वागण्याएवढी शहाणी आहेत, असे मला जाणवत आले आहे. हे शहाणपण त्यांना ‘धर्मशास्त्र’ वाचून आलेले नसून जीवन जगतानाच्या अनुभवातून आलेले आहे. हा फरक ओळखून धर्ममुक्त होत जगण्याची एक खास लकब आपल्या भारतीय परंपरांनी दिलेली आहे. इथे ‘परंपरा’ हा शब्द धर्माधिष्ठित मानू नये. परंपरा म्हणजे ‘आचरण’. बदल पचवून घेताना आपल्या मनोवृत्तीतही फरक पडतो, हे आपले खास वैशिष्ट्य एवढेच मला सुचवायचे आहे. हा मुद्दा मी उदाहरण देऊन सांगतो.

प्रत्येक व्यक्तीला ओळख म्हणून एक नाव हवे असते. ‘नाव’ ठेवणे ही एक धार्मिक गरज नसून ती आपली ऐहिक गरज आहे. जुने जग पुराणिकांनी धर्ममय करून सोडलेले असल्यामुळे नाव ठेवताना पुराण ग्रंथांचा आपण आधार घेतो. खरे तर यात धर्माचा काहीच संबंध नाही. पण आपणाला हे त्या वेळी लक्षातच येत नाही. हळूहळू सिनेमाच्या नायक-नायिकांची नावे नवी पिढी वापरू लागते. तेव्हा आपण धर्मभ्रष्ट होत आहेत, असेही कधी आपणाला वाटले नाही. एका परीने काळाशी सुसंगत राहून इहलौकिक जीवन जगताना आपण धर्ममुक्त होत आहोत, हेही आपण लक्षात घेतले नाही. हे अवस्थांतर धर्माला दोष न देता घडून येणे, हे भारतीय जीवनशैलीचे आरोग्यपूर्ण लक्षण आहे, असे मला वाटते.

कालगणना हीसुद्धा आपल्या जीवनशैलीतली अशीच एक ऐहिक गरज आहे. सेवाज्येष्ठतेची भांडणे धार्मिक नसतात. त्यांचा उगम कालगणनेतूनच होत असतो. दर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुका आणि होणारे सत्तांतर ही धार्मिक प्रक्रिया नव्हे. सत्तांतराची ती ऐहिक स्वरूपाची राजकीय गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी आधार घेतला जातो, तो कालगणनेचाच. अशी ही कालगणना केवळ पाश्चात्यांची ऐहिक गरज आहे, असे नाही, तर ती जगातल्या सर्वच समूहांची सर्वाधिक गरज आहे.

म्हणून तर येशू आम्हास मुळीच माहीत नव्हता. त्याही आधी विक्रमादित्य नावाच्या राजाला कालगणना सुरू करावी वाटली आणि येशू जन्माच्या आधी त्याने ‘संवत’ सुरू केले. सातवाहन राजवटीतल्या शालिवाहनाने आपला ‘शक’ सुरू केला. या दोन्ही कालगणना भारतात आजतागायत चालू आहेत. आम्ही दिवसाचे सात बार ठरवले. दोन सप्ताहांचा पक्ष पंधरवडा ठरवला आणि दोन पंधरवड्यांचा महिना ठरवला. अशा बारा महिन्यांचे वर्ष ठरवले. बारा वर्षाचे तप ठरवले, यात कुठेही धर्म नाही.

पुढे कवी लेखकांनी आपला कल्पनाविलास सुरू केला. युगांची निर्मिती केली, युगांना नावे दिली. पुराणिकांनी युग कल्पनांना अवतारकथांचे अधिष्ठान दिले. पण हे करताना एक ऐहिक वास्तव या कवी\लेखकांनीही अमान्य केले नाही. कोणते वास्तव? तर काळाचा चक्रनेमिक्रम असतो हे. आता या चक्रनेमिक्रमात अवतार कल्पना घुसडून आपले श्रेष्ठत्व रूढ करण्याचा प्रयत्न काहींनी केला. आपणसुद्धा त्यांचा हा प्रतिभाविलास एक छान मनोरंजन म्हणून स्वीकारला.

मी अवतार कल्पनाना रंजनप्रकार म्हटल्यामुळे धर्मश्रद्ध मंडळींना राग येऊ शकतो. पण वारंवार अवतार घ्यावा, असे देवांना का वाटते, हा प्रश्न आपण त्यांना विचारला तर? धर्मश्रद्ध लोकच सांगतात- लौकिक जीवनात माणसे चुका करतात, पाप करतात, त्यामुळे जगाचा नाश व्हायची वेळ येते. याचा कार्य काय? कुठलाही अवतारीपुरुष अन्याय परंपरा खंडित करूच शकत नाही, असाच होतो. तो मानवी जीवनातला चक्रनेमिक्रम आहे. म्हणून मग अवतार कल्पना अन्यायाने दुःखी झालेल्या माणसांना क्षणभरासाठी का होईना विरंगुळा देतात, कायमचे उत्तर देतच नाहीत. म्हणून हा रंजन पसारा थोडा बाजूला सारून मानवी जीवनातला, विकासक्रम शोधणे, यासाठी कालगणनेचा अभ्यास करावा लागतो. ही आपली गरज आहे असे मला वाटते.

पुराणिकांचा हा रंजन पसारा बाजूला करून मानवी जीवनाचा विकासक्रम शोधणे, यापेक्षा सेक्युलॅरिझम वेगळा काय असतो? सणवारांची नावे ठेवताना आपल्या पूर्वजांनी धर्माधिष्ठित परिभाषा वापरली. ती पक्की व्हावी, यासाठी या परिभाषेवर पौराणिक कहाण्यांची मखमली झूल पांघरली. कुणी महादेवाचे मोठेपण सांगून सणवारांचे महत्त्व विशद केले, तर कुणी शनीचे क्रौर्य सांगून आपले भयनिवारण करण्याचा प्रयत्न केला.

ज्या काळात दुर्बीण नव्हती, त्या काळात आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षं काळाचे सूक्ष्म निरीक्षण केले. कालसंगत घटनांच्या नोंदी केल्या. त्यावरून अंदाज बांधले. ते एवढे अचूक की, आपण थक्क व्हावे. चंद्र- सूर्य ग्रहणाच्या अचूक वेळा वर्षानुवर्षं सांगितल्या जातात, त्या केवळ कालगणनेच्या अभ्यासामुळे. याचा पाश्चात्य विद्येशी काहीच संबंध नाही. हे आमचे भारतीय खगोलशास्त्र आहे. इंग्रज इथे येण्याच्याही आधी चंद्र-सूर्य ग्रहणाच्या अचूक वेळा आमचे पंचागकर्ते सांगत असतील, तर तो त्यांचा खगोलशास्त्रीय अभ्यास आहे आणि कालगणनेच्या गणितीय अभ्यासातून ते हे अचूक अंदाज सांगत आले आहेत, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचा राहू-केतूच्या कथेचा बाष्कळपणा या मनोरंजनाच्या कहाण्या आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे, एवढेच मला तरुण वाचकांना सुचवायचे आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

डॉ. देवांनी या लहानशा पुस्तिकेत आणखी एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधले आहे. आम्ही आपल्या देशाचा इतिहासाचा विकासक्रम युरोपिय पद्धतीने समजून घेत आलो आहोत. त्यामुळे काही गफलती झाल्या आहेत. आपल्या देशातली धर्मसत्ता राजसत्तेला अंकित करू शकली नाही. पण युरोपात मात्र असे घडले नाही. धर्मसत्तेने राजसत्तेला गुलाम करून जनतेचे शोषण केले. म्हणून तिथे ‘धर्मक्रांती’ झाली. आपल्या देशात धर्मसत्ता आणि राजसत्ता संवादी राहिल्या. मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की, आपल्या देशातल्या धर्मसत्तेने आणि राजसत्तेने संगनमताने लोकांचे शोषण केले. त्यांचे संवादी राहणे शोषणयुक्त समाज कायम टाचेखाली राहावा, या सुप्त हेतूने वाटचाल करत आले. म्हणून इथे ‘धर्मक्रांती’ व्हायची वेळ आली की, तीच ‘धर्मक्रांती’ची परिभाषा वापरत राजकारणात ‘प्रतिक्रांती’ची सुरुवात होते. त्यामुळे इथला लढा अधिक गुंतागुंतीचा आहे.

सेक्युलॅरिझम हा धर्मक्रांतीच्या दिशेने विचार करायला लावणारा मूळ विषय म्हणजे नेमकं काय? तर ऐहिक जीवनाचं नियंत्रण धर्माने करता कामा नये, एवढाच. अत्यंत मूल्यात्मक बदल सूचवणारा हा मुद्दा आहे. म्हणून मग सेक्युलॅरिझम हा दोन हजार वर्षांपासून आमच्याच धर्मकल्पनेत कसा होता, अशी मांडणी करणारे राजकारण जन्माला यायला लागले. इथून प्रतिक्रांतीचा वेगळा आरंभ सुरू होतो. ही गुंतागुंत सामान्य माणसाला काहीशी जटील आणि गुंतागुंतीची वाटू लागते. म्हणूनच प्रस्तूत पुस्तकातली काही प्रकरणेसुद्धा मला महत्त्वाची वाटतात.

डॉ. देव यांच्यासारख्या चिंतनशील अभ्यासकाचे ही मते आहेत. त्याचा वर्तमानातल्या राजकारणाशी संबंध नसून कालगतीच्या मीमांसेशी संबंध आहे, एवढेच मला सुचवायचे आहे. काळाच्या संदर्भात आपण आधुनिक हा शब्द वापरतो. ‘आधुनिक’ जीवनशैलीच्या आधारे हा शब्द वापरला जातो. त्यामुळे या जीवनशैलीची लक्षणे कोणती, याचे नेमक्या शब्दात डॉ. देव विवेचन करतात.

माणूस हा ‘देव’ आणि ‘दैव’ यांच्या हातातले बाहुले नाही, म्हणून भौतिक जगात घडणाऱ्या घटनांची ‘बायबल’निष्ठ मीमांसा ज्या क्षणी माणूस त्याज्य समजू लागतो, तोच त्यांच्या जीवनातला ‘आधुनिकते’चा आरंभ असतो. भारतात यायला नवा समुद्रमार्ग सापडला. युरोपीय देशातले लोक भारतात या मार्गाने आले, ते व्यापारासाठी आले. व्यापार स्थिर व्हावा म्हणून त्यांनी भारताला आपली वसाहत समजून इथले शिक्षण, इथले व्यवसाय ताब्यात घेतले.

हा बदल कॉन्स्टीटीनोपलच्या पाडावानंतर झाला. हा पाडाव १४५३ साली झाला. त्यातून जीवनशैली बदलली. ईश्वराचे अस्तित्व नाकारले गेले. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण झाला. हा युरोपिय विकासक्रम आपल्या देशात त्याच काळात घडला का? ईश्वराचे अस्तित्व नाकारून, एकेश्वरी ईश्वराला मान्यता देऊन, तर कधी अनेकेश्वरी वादाचा स्वीकार करून भारतीय लोक जीवन जगत होते. या सर्व भूमिकांनी भारतीयांचा विवेकवाद कधीच नाकारला नव्हता.

आपली गफलत होते ती या ठिकाणी. आपण रूढींना धर्म समजून रूढीविरुद्ध बंड करणे म्हणजे ‘आधुनिकता’ असे गृहित धरून चाललो आहोत. हे गृहित युरोपीय शिक्षण पद्धतीने आपल्यात पेरले आहे. इथपर्यंतसुद्धा फार काही बिघडले असे नाही. पण रूढी म्हणजे धर्म हे गृहित धरल्यामुळे आपल्या संविधानातल्या ‘धर्मनिरपेक्षते’चा सिद्धान्त समजून घेणे आपणाला अवघड जात आहे.

आपल्या देशात पराकोटीची धर्मसापेक्षता कधीच नव्हती, हे गृहित धरून धर्मनिरपेक्षता आणि धर्मसापेक्षता या विषयावर वितंडवाद करत आहोत. एवढेच नाही तर रूढींना धर्म समजून आग्रह धरणाऱ्या आपल्या ‘स्मृती’लेखकांनी, शास्त्रकारांनी ‘अपवादां’ना जागा देऊन जीवनशैलीला मुक्त ठेवले आहे. कारण इथली धर्मसत्ता ना कधी ‘रूढी’ निर्माण करत होती ना, रूढीभंगासाठी धर्मदंडाचे हत्यार वापरत होती, न्यायदंड राजसत्तेच्या हाती होता. धर्मसत्ता जीवनशैलीतले अपवादाची सर्व लक्षणे सांगून लोक काय गृहित धरतात, यावर विशेष जोर देत होती. म्हणून तर वर्णसंकर होऊ नये, अशी लोक समजूत, पण वर्णसंकर तर सर्वत्र चालूच आहे आणि संकरज संततींना राजपद म्हणून मान्यता आहे, हेही स्मृतीकार सांगत राहतात.

त्याशिवाय ‘भरत’ या संकरज ऋषीपुत्राला राजा म्हणून आपण मान्यता दिली असती का? आणि आपल्या देशाचे नाव ‘भारत’ हे अभिमानाने उच्चारले असते का? आपल्या सहज जीवनशैलीत आपण काहींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. कदाचित परिवर्तनासाठी हे आवश्यकही असेल. पण आरोपीच्या पिंजऱ्यात ज्यांना उभे केले, त्यांच्याच जीवनशैलीत, सतत धर्ममुक्त आचरण रूढ असेल, तर आपण आपल्या पूर्वग्रहांचा पुनर्विचार करायला नको का? हा पुनर्विचार न केल्यास आपणाला हवा तो बदल घडवून आणता येणार नाही. उलट आपली शक्ती मात्र वाया खर्च होईल, असा एक इशारा-प्रत्यक्ष शब्दांत नव्हे पण काही प्रकरणातसुद्धा डॉ. देवांनी दिला आहे. पूर्वग्रह बाजुला ठेवून त्यांचा हा मुद्दासुद्धा आपण समजून घेतला पाहिजे, असे मलाही वाटते. समजून घेणे आणि मान्यता देणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. मी समजून घेणे हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरला आहे.

डॉ. प्रभाकर देव यांची ही लहानशी पुस्तिका एकाच वेळी खगोलशास्त्रीय मीमांसेचा आधार घेत कालगणनेची गोष्ट सांगते आणि त्याच वेळेला भारतीय जीवनशैलीतल्या धर्म‘मुक्त’ चिंतनाचा निर्देश करत आपल्या राजकीय पूर्वग्रहांवरही बोट ठेवते. म्हणून एक वेगळी चिंतन सामग्री म्हणून या पुस्तिकेचे मोल आपण ओळखायला हवे असे मला वाटते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

१९९० नंतर आपल्या देशात घडून आलेले ‘सत्तांतर’ ही एक दृष्टापत्ती आहे असे मला जाणवते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपले लौकिक जीवन युरोपिय आधुनिक जीवनशैलीने झाकून गेले होते. १९९०नंतर मंडल- कमंडलवादाने देशातले वातावरण पुरेसे ढवळून निघाले आहे. सत्तांतरामुळे भारतीय सनातन प्रवृत्तीचा अकारण गौरव असणारा एक नवा प्रवाह जोरकसपणे उदयाला आला आहे. तितकाच त्याचा प्रतिकार करणारा प्रवाहही निर्माण झाला आहे. अशा क्रांती-प्रतिकांतीच्या संषर्घमय वातावरणात विचारवंत अभ्यासकांची जबाबदारी वाढली आहे.

डॉ. देव अशा विचारवंतांपैकी एक आहेत. आपण आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपले ज्ञान-विज्ञान नव्याने समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याशिवाय आपला देश गेल्या दोन-अडीच हजार वर्षांत टिकून का राहिला, याचे मर्म आपणाला सापडणार नाही. हे मर्म सर्वच पातळीवर समजून घेण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.

डॉ. देव यांचे हे लहानसे पुस्तक त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......