अजूनकाही
एक धैर्यवान, हिंमतवाल्या महिला पत्रकार आरिफा एविस यांनी काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० आणि लागू केलेल्या कलम १४४ यांच्या परिणामांचे वर्णन ‘नाकाबन्दी’ या हिंदी कादंबरीत केले आहे.
नायिका दिल्लीला पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या काश्मीरमध्ये परत येते. त्याच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून काही दिवसांनी इंटर्नशिपसाठी पुन्हा दिल्लीला जाते. परतताना काश्मीर बघण्यासाठी दिल्लीतील आपल्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन येते. काश्मीर बघून ते सर्व जण अतिशय आनंदित होतात, पण दुसर्याच दिवशी सरकारकडून काश्मीरमध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना आपापल्या गावी परत जाण्याची सूचना दिली जाते. नाईलाजाने पर्यटकांना परत दिल्लीला जावे लागते. पण नायिका काश्मीरचीच असल्यामुळे तिथेच थांबते, आणि दिल्लीला वार्तांकन करण्याचा प्रयत्न करते.
त्यानंतर पुढच्या चार महिन्यांत तिच्या कुटुंबावर, काश्मीरवर ओढवलेल्या परिस्थितीचे, किंबहुना काश्मीर होत्याचे नव्हते कसे झाले, याचे दर्शन व त्याचे ज्वलंत रूप या कादंबरीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘स्वर्गापेक्षाही सुंदर’ असलेल्या काश्मीरवर कलम ३७० आणि १४४ यांच्यामुळे कोणती अवकळा कोसळली, ते या कादंबरीतून दिसून येते.
..................................................................................................................................................................
...............................................................................................................................................................
शिकार्यामध्ये प्रवासी घेणे, त्यांना गाईड करणे हेच नायिकेच्या कुटुंबीयांचे जीवन. आणि तेच त्यांचे घरही. जेवणखाण, उठणे, बसणे, झोपणे... सर्वच काही हाऊसबोटमध्येच. आजूबाजूला सफरचंदाची व इतरही मोठ-मोठी झाडे. अतिशय निसर्गरम्य स्थळ. पण असं रमणीय काश्मीर चार महिन्यांत बंदिस्त झालं, जनजीवनात दहशत निर्माण झाली.
‘जन्नत का रास्ता खुदाने जिन्दा की पहुँच से बाहेर बना रखा है। इस बात को समझाने की खातिर भारत में एक काश्मीर बना है।’ (धरती पर अगर कही स्वर्ग हैं, तो यही हैं, यही हैं, यही हैं), अशा पद्धतीचे काश्मीरचे वर्णन केले जात होते. ते सर्व इतिहासजमा झाले.
लेखिका स्वत: काश्मिरी पंडित आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः अनुभवलेले, प्रत्यक्ष पाहिलेले काश्मीरचे वर्णन यात आहे. या कादंबरीमध्ये सरकारचे धोरण व सरकारने प्रत्यक्ष केलेली कृती नमूद केली आहे. जगाला वेगळ्या प्रकारचे काश्मीर दाखवले जाते आणि कृती मात्र वेगळी केली जाते. म्हणजे आत वेगळे आणि बाहेर वेगळे.
या कादंबरीमध्ये काश्मिरी लोकांचे तडफडणे, त्यांचा आक्रोश, त्यांची अगतिकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अघोषित कर्फ्यु, कलम १४४ आणि दहा दहा पावलांच्या अंतरावर तैनात केलेले सशस्त्र सैनिक. सर्वत्र दहशतीचे वातावरण. घरामध्ये बंदिस्त झालेली लहान मुले, त्यांचे चिंताग्रस्त पालक, याचे मोठे हृदयद्रावक वर्णन, या कादंबरीत आहे. दुकाने बंद, इंटरनेट बंद, बाजार बंद, रोजगार बंद आणि शाळा-महाविद्यालयेही बंदच.
सुरक्षेच्या नावाखाली पोलीस आणि सशस्त्र सैनिकांच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे रात्री आठ वाजताच घरातील दिवे बंद करावे लागतात. नाहीतर सशस्त्र सैनिक येऊन ते बंद करायला सांगतात. घरातील तरुण मुलांना अतिरेकी ठरवून, उचलून, गाडीत टाकून जेलमध्ये डांबून ठेवतात. तेथे अंगावरील कपडे काढून, पूर्ण नग्न करून बेदम मारहाण करतात. कारण काय, तर त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली असल्याचा कथित आरोप ठेवला जातो. तेथून कधी व कशी सुटका होईल, याचा काहीही नेम नसतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सरकार एकदा विदेशी पत्रकारांना बोलावून काश्मीरमध्ये सर्व कसे व्यवस्थित चालू आहे, आलबेल आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण नायिका या परिस्थितीचा फायदा घेऊन काश्मीरमधील जनतेवर सैन्याकडून कसे अन्याय, अत्याचार होत आहेत, हे मोर्चा काढून प्रत्यक्ष स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करते.
काही वर्षांपूर्वी खुद्द नायिकेचे वडीलच गोळी लागून ठार झालेले असतात. तिची आई एका सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत असते. वडील वारल्यानंतर तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते. घरात दोन मुले व एक मुलगी. त्यांचे शिक्षण, पालणपोषण सर्व आईच करते. काका, काकू, मोठे वडील, मोठी आई व त्यांची मुले-मुली वेगवेगळे राहत असतात आणि सुखःदुःखाला एकमेकांना मदत करत असतात.
बऱ्याच दिवसांपासून लहान मुले घरात बंद असल्यामुळे त्यांना करमत नाही. लहान मुलंच ती. चूळबूळ करणारी, चंचल वृत्तीची. ती आईला न सांगता घराबाहेर क्रिकेट खेळायला जातात. तेथे आधीच काही मुले खेळत असतात. त्यांच्यात ही मुले सामील होतात. खेळत असताना त्यांचा चेंडू सडकेवर जातो. नेमका त्याच वेळेस एक मोर्चा तिथे येतो. त्यातील लोकांना पांगवण्यासाठी पोलीस अश्रूधुरांचे गोळे फेकतात. चेंडू आणायला गेलेल्या मुलाच्या डोळ्यात अश्रूधूर जातो. त्याला काही दिसत नाही. लोकांच्या धक्क्याने गर्दीतच तो कोसळतो. त्याची मोठी आई बाहेर येते, तेव्हा तिला तो खाली पडलेला दिसतो. ती धावतच त्याला उचलायला जाते, पण तेवढ्यात पोलीस त्यांच्याजवळील पॅलेटगनमधून धाडधाड छर्र्यांच्या गोळ्या सोडतात. त्या मुलाच्या चेहर्याला लागतात. एक छर्रा त्याच्या मोठ्या आईच्या डोळ्यात घुसतो. हे दृश्य मज्जिदमधील एका व्यक्तीला दिसते. तो धावतच मदत करण्यासाठी येतो. पण सैनिकांच्या भरधाव गाडीखाली येऊन जाग्यावरच मरतो. त्यांचे मोठे बाबा आणि मोठी आई त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेतात. तेथे तो आयसीयुमध्ये एक महिना असतो. मोठ्या आईच्या डोळ्यातील छर्रे काढले जातात, पण एक डोळा मात्र कायमचा निकामी होतो.
दुसर्या दिवशी नायिका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झालेल्या घटनेविषयी लेखी तक्रार देते. आधी ती तक्रार पोलीस घेतच नाहीत. ही तक्रार खोटी आहे, असे म्हणतात. पण जेव्हा नायिका प्रत्यक्ष पुरावा देते, छायाचित्र दाखवते, तेव्हा तिची तक्रार घेतात.
दुसर्या दिवशी अर्ध्या रात्री पोलीस लेखिकेच्या घरी येतात आणि जोरजोराने दार ठोठावतात. पहिल्या खोलीत तीन जण झोपलेले असतात. त्यांच्या अंगावरून चादर ओढून त्यांना फरफटतच गाडीत नेऊन कोंबतात. नायिका त्यांना विचारते की, ‘यांचा दोष काय?’ पोलीस म्हणतात, ‘यांनी दगडफेक केली आहे’. ते तिघं म्हणजे नायिकेचा भाऊ, तिचे मोठे बाबा आणि मोठ्या बाबांचा मुलगा. आणखी एक भाऊ आतल्या खोलीत असल्यामुळे तो वाचतो. त्या तिघांना जेलमध्ये नेऊन, नग्न करून बेदम मारतात.
इकडे आईला सोबत घेऊन नायिका परत पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिची आई पोलीस स्टेशनमध्ये जायला विरोध करते. कारण आधी तक्रार केल्यामुळेच हा प्रसंग त्यांच्यावर आलेला असतो. पण नायिका म्हणते, ‘हा प्रश्न केवळ आपलाच नाही, तर संपूर्ण काश्मीरमधील लोकांचा आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे.’
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
नायिका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार देते. ‘माझ्या मोठ्या बाबांना सोडा, माझ्या भावांना सोडा’ म्हणून विनंती करते. त्या दरम्यान तेथे दोन मोठे अधिकारी येतात. त्यांच्या पायावर अक्षरशः लेखिका डोके ठेवते. भावाला सोडण्याची विनंती करते. ते अधिकारी म्हणतात, “सुरक्षेच्या नावाखाली आम्ही त्यांना काही दिवस जेलमध्ये ठेवणार व नंतर त्यांना सोडून देणार.” पण नायिका तेथेच ठाण मांडून बसते. “माझा भाऊ फक्त १० वर्षांचाच आहे. या मुलाकडून तुम्हाला व सरकारलाही काय धोका होऊ शकतो?” असा प्रश्न विचारते. तेव्हा ते अधिकारी तिला सांगतात, “तुम्ही एक विनंती अर्ज लिहा. त्यावर तुमच्या गल्लीतील लोकांच्या सह्या घ्या व २५ हजार रुपये जमा करा. म्हणजे मग आम्ही त्याला सोडून देऊ.”
नायिका व तिची आई घरी जाऊन पैशांची जुळवाजुळव करतात. एक विनंती अर्ज तयार करून त्यावर खूप सार्या लोकांच्या सह्या घेतात आणि ताबडतोब अधिकार्यांना नेऊन देतात. मग कोठे ते अधिकारी तिच्या त्या दोन भावांना सोडतात. पण तिला ताकीद देतात की, जर आम्हाला ‘गरज वाटलीच तर परत आम्ही यांना घेऊन जाणार’.
या दोन भावांना तर सोडतात, पण तिच्या मोठ्या वडिलांचा काहीही ठाव ठिकाणा लागत नाही. अशी परिस्थिती फक्त या नायिकेच्याच घरची असते असे नाही, तर संपूर्ण काश्मीरमधील जवळ जवळ प्रत्येक घराची असते. खूप सारे तरुण, पुरुष जेलमध्ये कोंबलेले असतात आणि घरी फक्त स्त्रिया आणि लहान मुलं...
एक महिन्यानंतर परत नायिकेच्या घरी पोलीस येतात. ‘अख्तर’ म्हणून आवाज देतात. तो वरच्या रूममध्ये झोपलेला असतो. तो पोलिसांचा, त्यांच्या बुटांच्या आवाज ओळखतो. पोलिसांनी त्याला कशा पद्धतीने मारहाण केली, हे त्याला आठवते. शिक्षण बंद, परत सोडवण्यासाठी पैसे नाही, कोणालाच नोकरी नाही, आता जर मला पोलिसांनी जेलमध्ये टाकले तर माझ्या वडिलांसारखाच मी परत घरी कधीच येऊ शकणार नाही, असे त्याला वाटते. त्याच्या वडिलांचे रक्ताने माखलेले शरीर त्याला आठवते. तो मनात म्हणतो, “मला भरपूर शिकायचे होते, भरपूर शिकून मला माझ्या कुटुंबासाठी व माझ्या काश्मीरसाठी काही चांगले करायचे होते. पण या सरकारने काहीच्या काही बनवून टाकले! काय होते आणि काय झाले?” असे आठवून त्याला रडायला येते. परंतु आवाज मात्र गळ्याच्या बाहेर जाऊ देत नाही. संपूर्ण घरावरून, कौटुंबिक छायाचित्रांवरून एकदा नजर टाकतो व डोळे पुसतो.
‘मी जेलमध्ये जाऊन आपल्या परिवारासाठी काहीही करू शकत नाही, तर जिवंत राहून तरी काय करू शकणार? रोजरोजच्या त्या जेलमधील यातना सहन करण्यापेक्षा स्वतःच आत्महत्या करून टाकलेली बरं’, असा विचार त्याच्या मनात येतो. पोलीस जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न करत होतेच. पोलीस वरच्या रूममध्ये यायच्या आत हा मुलगा बेडवरची चादर पंख्याला बांधतो आणि फाशी घेतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
१० वर्षाच्या या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीमुळे तो पूर्णपणे अबोल होऊन जातो. एक महिन्यापासून आयसीयुमध्ये असलेला इरफान त्याच दिवशी वारतो. म्हणजे एकाच दिवशी एकाच घरातून दोन मुले मृत्युमुखी पडतात. त्याच दिवशी नायिकेच्या काकूला दोन जुळी मुलं होतात. एकीकडे दुःख आणि दुसरीकडे आनंद.
नायिका दिल्लीला येऊन आपले दुःख, आपल्या काश्मीरची परिस्थिती सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते. पण सरकार मात्र काश्मीरमध्ये सर्व चांगलेच चालू आहे, असेच सांगत असते. सर्वांनी एक होऊन आंदोलन करायला पाहिजे. काश्मीर वाचवायला पाहिजे, देश वाचवायला पाहिजे, तसेच संविधान वाचवायला पाहिजे, असे लेखिका या कादंबरीतून सांगण्याचा प्रयत्न करते.
कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया,
बात निकली तो हर बात पे रोना आया
(वरील शेर शाहीर लुधियानवी यांचा आहे.)
‘नाकाबन्दी’ - आरिफा एविस,
डायमंड बुक्स, दिल्ली
प्रकाशन - १ जानेवारी २०२०
मूल्य - १५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment