‘अनंत अक्षर’ या मालिकेतील डॉ. नीती बडवे लिखित तीन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांच्या लेखिका जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. मराठी, इंग्रजी, जर्मन या भाषांमधून आणि या भाषांमध्ये त्यांनी अनुवाद केले आहेत. ‘निवडक काफ्का’ हे त्यांचे भाषांतरित पुस्तक प्रकाशित आहे. याशिवाय, गेली तीन दशके त्या अ-मराठी किंवा अ-भारतीय लोकांना मराठी आणि हिंदी भाषांचे धडे देत आहेत. ‘भाषा’ या विषयाचा आत्मीयतेने अभ्यास करणाऱ्या, सातत्याने भाषाविषयक लेखन करणाऱ्या त्या अभ्यासक आहेत.
‘भाषेकडे बघताना... ’ या पहिल्या भागात भाषेविषयी मूलगामी चिंतन सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडले आहे. मार्मिक निरीक्षणे नोंदवत भाषेची जडणघडण, संस्कृतीशी तिचे नाते, बोलीभाषांचे वैविध्य अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. भाषिक कौशल्याविषयी चर्चा केली आहे. तसेच भाषिक कौशल्याची व्यवहाराशी सांगड घालत, या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींबद्दलही मार्गदर्शन केले आहे. वाचनकौशल्य सुधारण्यासाठी काही स्वाध्याय दिले आहेत. याशिवाय, प्रत्येक लेखाच्या शेवटी त्या लेखातील विचारांचा पाठपुरावा करता यावा म्हणून, ‘पुढे जाता’ अशी टिप्पणी देऊन आणखी अभ्यासासाठी उद्युक्त केले आहे. कुठलाही अभिनिवेश नसल्यामुळे, तसेच व्याकरण किंवा भाषाविज्ञानाची रूढ चौकट नसल्यामुळे या पुस्तकाच्या मांडणीत एक प्रकारचा मोकळेपणा आहे.
‘मराठी भाषेकडे बघताना...’ या दुसऱ्या भागात मराठी भाषेचे चलनवलन, तिचा स्वभाव, तिच्या लकबी, याविषयी वाचकांना विस्ताराने माहिती दिली आहे. लेखिकेने गेली कित्येक वर्षे निरीक्षणे करून, त्यांचे वर्गीकरण करून, नित्य वापरातील असंख्य उदाहरणे देत मराठी भाषेविषयी स्वतंत्र मते मांडली आहेत. मराठी भाषेचा वेगळेपणा दाखवणारी अनेक निरीक्षणे वाचून कधी कधी, ‘हे आपल्याला आजपर्यंत जाणवलंच नव्हतं!’ असा प्रत्यय येतो, तर कधी एखादे कोडे सुटल्याचा आनंद मिळतो.
वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचे केवळ वर्णन करून लेखिका थांबलेली नाही, तर षष्ठी-कर्मे, तीव्रतादर्शके, पक्क्या जोड्या, अशा काही नवीन संकल्पना तिने वाचकांसमोर ठेवल्या आहेत. ‘धारणक्षमता विचार’ हा सिद्धांत मराठीला लागू करून काही ‘वाक्यरचना सूत्रे’ तयार करता येतील का, याचा ऊहापोह केला आहे. भाषाअभ्यासकांनी यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मुळात, दोन भारतीय आणि दोन पाश्चात्य भाषांवर प्रभुत्व असल्याने, लेखिकेचा दृष्टीकोन व्यापक आहे. त्यामुळे समांतर संदर्भ, तौलनिक उदाहरणे वेळोवेळी ओघाने येतात. त्या अनुभवाचा अनोखा फायदा वाचकांना मिळतो. मराठीचा अभ्यास व संशोधन करताना येणाऱ्या मर्यादा आणि जाणवणाऱ्या त्रुटींवरही लेखिकेने बोट ठेवले आहे. ही पुस्तके रूढार्थाने पाठ्यपुस्तके नसली, तरी भाषेविषयी उत्सुकता असणाऱ्या आणि भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत.
तिसरे पुस्तक आहे ‘बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...’. ‘पाठ्याचा आशय एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेण्याची क्रिया आणि प्रक्रिया’ या व्यापक अर्थाने ‘भाषांतर’ ही संज्ञा लेखिकेने इथे वापरली आहे. भाषांतराची गरज बहुभाषिकतेतून निर्माण होते. म्हणून, सुरुवातीच्या प्रकरणात जगातील बहुभाषिकतेचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. भारतात पूर्वीपासून बहुभाषिकता नांदते आहे. युरोपमध्ये मात्र पूर्वी बहुभाषिकतेकडे काहीसे नकारात्मक दृष्टीने बघितले जाई. भारत व युरोपातील बहुभाषिकतेच्या प्रवासाबद्दल यात सांगितले आहे. भारतातील बहुभाषिकता, भाषांची सरमिसळ, भारतीय इंग्रजीची वैशिष्ट्ये याबद्दल खुसखुशीत टिप्पण्या केल्या आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात वाढलेले इंग्रजीचे महत्त्व आणि नव्याने उदयाला आलेल्या भाषासमीकरणांचा वेध घेतला आहे.
फ्रेंच, जर्मन, चीनी, जपानी लोक हे ‘स्वभाषेचा आग्रह धरणारे’ म्हणून ओळखले जातात. त्यांनाही आता इंग्रजीची आवश्यकता जाणवू लागली आहे. मात्र या देशांमध्ये ‘पहिलीपासून इंग्रजी’ किंवा ‘शिक्षणाच्या सुरुवातीपासून माध्यमभाषा इंग्रजी’, असे करत नाहीत. हे लोक, तसेच इतर असंख्य देशातले लोक इंग्रजी ही परकीय भाषा म्हणून शिकतात आणि वापरतात. मग आपण भारतीय हे का करू शकणार नाही, असा प्रश्न लेखिका उपस्थित करते. स्वभाषेत पारंगत झाल्यावर दुसरी कुठलीही भाषा सुलभतेने शिकता येते, असे आग्रही प्रतिपादन लेखिकेने वारंवार कळकळीने केले आहे. यावर जरूर विचार केला पाहिजे.
बहुभाषिकता आणि भाषांतर या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे, शब्द म्हणजे आपल्याला बाह्य जगाशी जोडणारा साकव असतो. एकेक समूह आपापल्या पर्यावरणाशी आपापल्या भाषेद्वारे जोडलेला असतो. अशा भिन्नभाषिक समूहांना एकमेकांशी जोडणारा पूल म्हणजे भाषांतर. फार पूर्वीपासून आपल्या देशाचा इतर देशांबरोबर व्यापार होत असल्याचे उल्लेख आढळतात. त्या काळातील आद्य भाषांतरकारांची परंपरा आजही अबाधित आहे. आता तर भाषांतराचा विस्तार प्रत्येक क्षेत्रात झालेला आहे. भाषांतराचे स्वरूप अधिकाधिक व्यापक होत आहे. भाषांतर करण्यासाठी स्रोतभाषा आणि लक्ष्यभाषा अशा दोन्हींवर प्रभुत्व असणे आवश्यक असते. तेवढेच पुरेसे मात्र नसते, कारण भाषांतर म्हणजे एका दृष्टीने पुनर्सर्जन असते. चांगले भाषांतर करण्यासाठी याशिवाय काय काय करणे गरजेचे असते, याविषयी बहुआयामी चर्चा ‘भाषांतरविचार’ या प्रकरणात केलेली आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
एखादा वेचा जेव्हा भाषांतरासाठी समोर येतो, तेव्हा त्यातील शब्दांना त्या त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती यांचे संदर्भ चिकटलेले असतात. ते आधी नीट समजून घ्यावे लागतात. भाषांतराच्या प्रक्रियेत भाषांतरकाराची ‘वाचक’ ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते, कारण भाषांतरप्रक्रियेची तीच पहिली पायरी असते. वाचकाच्या भाषासमाजाची प्रकृती, विचार करण्याची पद्धत, अनुभवाची पार्श्वभूमी, मानसिकता, पूर्वज्ञान अशा अनेक घटकांवर त्याला होणारे आकलन अवलंबून असते. म्हणूनच त्याने मनाची पाटी जास्तीत जास्त कोरी करून संहितेचे वाचन करायला हवे. ते करताना ‘अरे, कहना क्या चाहते हो?’ हा प्रश्न मनात सतत जागा ठेवून, लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, हे समजून घ्यायला हवे. लेखकावर असणारा एखाद्या विचारप्रणालीचा प्रभाव, त्याची विचार करण्याची पद्धत, ती संहिता लिहिण्यामागचा त्याचा उद्देश यांचा खोलवर जाऊन शोध घेतल्यास, भाषांतरकाराला सूर सापडायला मदत होते. या दृष्टीने ‘वाचकाची’ भूमिका स्पष्ट करणारा, त्यासंदर्भातील सिद्धांतनांची ओळख करून देणारा लेख या प्रकरणात आहे.
याप्रमाणे संहिता स्वतःमध्ये मुरवून घेतल्यानंतर, ती लक्ष्य भाषेत उतरवणे, हे पुढचे आव्हान असते. कधी कधी एका भाषेत सहज आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या शब्दांना दुसऱ्या भाषेत प्रतिशब्द नसतात, कारण तिथे ती संकल्पनाच अस्तित्वात नसते. उदा. मराठीतील खमंग, भाकरी, खरकटं, सोवळं-ओवळं, देवपूजा हे शब्द. कधी कधी प्रतिशब्द असतात, पण त्यांना काही निराळेच संदर्भ असतात. उदा. आपल्याकडे ‘पाऊस’ हवाहवासा असतो, म्हणून त्याला सकारात्मक संदर्भ असतो. मात्र पाश्चात्य देशात तो नकोसा वाटतो, म्हणून त्याला काहीशी नकारात्मक छटा असते. तसेच ‘राष्ट्रवाद’ हा आपल्याला सकारात्मक शब्द वाटतो, परंतु जर्मनीच्या विशिष्ट इतिहासामुळे तिथे तो नकारात्मक संदर्भ घेऊन येतो.
याच प्रकारे शब्दातला आशय, प्रतिमा, प्रतीके, उपमा, रूपके हे सर्व विचारात घेऊन अर्थवाही भाषांतर करणे, हे कौशल्याचे काम असते. चपखल शब्द शोधण्यासाठी अनेकदा कष्ट घ्यावे लागतात. ते न करता परभाषेतील शब्द जसाच्या तसा वापरणे, ही शरणागती झाली. मात्र प्रत्येक वेळी ओढूनताणून प्रतिशब्द ‘पाडणे’सुद्धा सयुक्तिक ठरत नाही. या दोहोंचा तोल सांभाळत पुढे जावे लागते. या दृष्टीने पहिल्या पुस्तकात आलेला ‘गोलो मान’ यांचा लेख मननीय आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात असताना लागणारे खाचखळगे आणि चकवे याबाबत, अनेकानेक उदाहरणे देऊन सावध करण्याचे काम लेखिकेने चोख केले आहे. हा प्रवास करत असताना शब्दकोश कसे उपयोगी ठरू शकतात, तसेच शब्दकोशवापराच्या मर्यादा काय आहेत, हेही उलगडून दाखवले आहे.
यानंतर लेखिकेने रूपांतर व माध्यमांतर यांचाही परामर्श घेतला आहे. ‘स्लमडॉग मिलिअनेर’ या चित्रपटाचे उदाहरण यासाठी घेतले आहे. मूळ कादंबरीचा विपर्यास करून या चित्रपटात ओंगळ दृश्ये, धर्माधारित झगडे, धार्मिक भावनांना हात घालणारे प्रसंग जाणीवपूर्वक घुसडले आहेत. पाश्चात्यांना सोयीचे नसलेले अनेक प्रसंग मात्र वगळले आहेत. दुटप्पीपणाने केलेल्या या रूपांतर व माध्यमांतराने नकारात्मक परिणाम साधण्याची ताकद अधोरेखित होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पुढे, ‘बेर्टोल्ट ब्रेश्त’च्या दोन नाटकांच्या मराठी रूपांतराविषयी, तसेच ‘द लिटिल प्रिन्स’ आणि ‘मुग्नोक’ ही मराठीत रूपांतरित केलेली नाटके व त्यांच्या सादरीकरणाविषयी विस्तृत चर्चा केली आहे. लेखिकेने भाषांतर, अनुवाद, रूपांतर, माध्यमांतर यांच्या अनेकानेक मितींना स्पर्श करत रोचक पद्धतीने उदबोधन केले आहे. ललित आणि ललितेतर पाठ्यांचे वैविध्य समजावून सांगितले आहे. अशा साहित्याचे भाषांतर करताना आलेले अनुभव वाचकांसमोर ठेवले आहेत. स्वानुभवावर आधारित ‘भाषांतरप्रक्रिये’विषयीचे काही विचार सारांशाने, सूत्ररूपात मांडले आहेत.
मुळात, ही तीनही पुस्तके बघताच त्यांचे वेगळेपण जाणवते. लेखिकेने स्वतः केलेल्या ‘सिरॅमिक म्युरल्स’ची कलात्मक मांडणी करून प्रसिद्ध कवी व चित्रकार श्री. सलील वाघ यांनी मुखपृष्ठे केली आहेत. या तीनही पुस्तकांची शीर्षके अपूर्णता दर्शवणारी, भाषाविषयक विचारप्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याचे सूचन करणारी आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, रेखा इनामदार-साने आणि डॉ. श्यामला वनारसे या तीन जाणकार अभ्यासकांची प्रस्तावना लाभली आहे.
या पुस्तकांमध्ये विषयानुसार लेखांची मांडणी सुसूत्रपणे केलेली आहे. मात्र, लेख अनुक्रमाने वाचण्याचे बंधन नाही. प्रत्येक लेख स्वतंत्र आहे. यातील काही लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. प्रत्येक लेखाखाली पुरेसे संदर्भ आणि टिपा आहेत. ही पुस्तके वाचत असताना वेळोवेळी, ‘विषयाला नीट घट्ट धरून ठेवा म्हणजे शब्द आपोआप अनुसरतील’, ‘तुमच्या भाषेच्या मर्यादा त्याच तुमच्या जगाच्या मर्यादा!’, ‘भाषासमाजाचे संकेत पाळले नाहीत, तर माणूस एकटा पडतो’, अशी लख्ख प्रकाश पाडणारी सुवचने भेटतात.
या पुस्तकांमधील उदाहरणांचे वैविध्य थक्क करणारे आहे. यामुळे लेखनविषयाचा विविधांगाने आस्वाद घेत, तो समजून घेणे शक्य झाले आहे आणि पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली आहे. काही ठिकाणी उदाहरणांची पुनरुक्ती झाली आहे. त्यामुळे एकंदर प्रतिपादन काहीसे पसरट होत आहे की काय, असे वाटून जाते. मात्र प्रत्येक पुस्तकाचे स्वतंत्रपणे वाचन करणाऱ्यांसाठी ते आवश्यक ठरते. अक्षरांचे वळण आणि आकार सुवाच्य आहे. परंतु विशेषतः तिसऱ्या पुस्तकात अनेक टंकनदोष राहून गेले आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
थोडक्यात सांगायचे, तर ‘भाषेचा अभ्यास म्हणजे काहीतरी क्लिष्ट आणि तर्ककर्कश’, हा समज खोडून काढणारी, हसत-खेळत भाषासन्मुख करत अभ्यासप्रवृत्त करणारी ही पुस्तके आहेत. भाषेसंबंधी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने ही पुस्तके, त्यातील गंमत अनुभवत वाचावीत आणि त्यातील मुद्द्यांवर चिंतन करावे. म्हणजे लेखिकेचे श्रम सार्थकी लागतील आणि वाचकांनाही मोठा लाभ होईल.
आज भाषेच्या क्षेत्रात मोठी घुसळण चाललेली दिसून येते. अनेक भाषा एकमेकींच्या संपर्कात येत आहेत. एकमेकींच्या अवकाशक्षेत्रांत मिसळतही आहेत. उपयोजित मराठीचा गांभीर्याने विचार करणाऱ्या आणि ते उपयोजन जास्तीत जास्त नेमके, समावेशक आणि अर्थपूर्ण कसे होईल, हे बघणाऱ्या लेखनाचा तुटवडा आज समाजात आहे. ती उणीव या तीन व अशा प्रकारच्या अनेक पुस्तकांनी भरून येईल, अशी आशा आहे. कोणत्याही संस्थात्मक साहाय्यावर विसंबून न राहता, स्व-प्रेरणेने केलेले आणि कळकळीने समाजापुढे आणलेले, हे लेखन वाचताना, लेखिकेकडून भाषाज्ञानाबरोबरच तिच्या ज्ञाननिष्ठेचा वसाही घेण्यासारखा आहे.
‘अनंत अक्षर’ : भाग १ - भाषेकडे बघताना... मूल्य - १५० रुपये.
‘अनंत अक्षर’ : भाग २ - मराठी भाषेकडे बघताना... मूल्य - ३५० रुपये.
‘अनंत अक्षर’ : भाग ३ - बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे... मूल्य - ३३० रुपये.
तिन्ही पुस्तकांच्या लेखिका - नीती बडवे
तिन्ही पुस्तकांचे प्रकाशक - नितीन प्रकाशन, पुणे
.................................................................................................................................................................
आसावरी गोखले
saygo512@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment