अजूनकाही
ज्या वाटेनं जाण्यास शक्यतोवर कोणी धजावत नाही, अशा वाटेनं कोबाड गांधींसारखी माणसं जातात. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे त्यांचं आत्मचरित्र. या प्रामाणिक व हुशार माणसानं आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी एक कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीची ही कहाणी आहे. उपेक्षितांसाठी आयुष्य वेचलेल्या आणि न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे, असं मानणार्या एका जोडप्याची ही कहाणी आहे. कोबाड गांधी यांनी त्यांचं आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकमेकांत गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहिलं आहे. अनुराधा एक आदर्शवत कार्यकर्त्या कशा ठरत गेल्या, याची सविस्तर मांडणी या पुस्तकात आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास सोसावे लागले त्याविषयी, त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवाबद्दलही लिहिलं आहे. एक अन्याय्य व्यवस्था एका शूर, धैर्यवान माणसाला कशी दुबळी बनवते, त्याची ही प्रामाणिक आणि आडपडदा न ठेवता लिहिलेली कहाणी आहे. शिवाय हा एका उच्चभ्रू जगातल्या संपन्नतेचा आणि आत्यंतिक निराशेचा लेखाजोखादेखील आहे.
हे जोडपं मूळ मुंबईचं. त्यांच्या कुटुंबांच्या सुधारक चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना सामाजिक कामाची प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी १९७०च्या दशकात तळागाळातल्या लोकांमध्ये काम करायला सुरुवात केली. या दोघांच्याही आयुष्यातील चढउताराच्या वेळी अनुराधाच्या आई-वडिलांनी पाठिंबा दिला. ते जुन्या ‘सीपीआय’च्या (अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष) काळातील कम्युनिस्ट होते. अनुराधा यांची आई कुमुद औरंगाबादच्या एका कम्युनिस्ट कुटुंबातील होत्या. त्यांचे भाऊ कॉ. चंद्रगुप्त चौधरी दोन वेळा ‘सीपीआय’चे आमदार होते. त्यांच्या सहापैकी तीन बहिणी ‘सीपीआय’च्या सदस्य होत्या. कुमुद यांच्याप्रमाणे त्या सर्वांनी देशभरातल्या विविध भागांतील कम्युनिस्ट नेत्यांशी विवाह केले.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
नोव्हेंबर १९७७मध्ये आणीबाणी उठल्यानंतर अनुराधा व कोबाड गांधी महाबळेश्वरमध्ये एका घरगुती समारंभात विवाहबद्ध झाले. काही जवळचे नातेवाईक या लग्नाला उपस्थित होते. त्या वेळेस अनुराधा मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रामध्ये एम.ए. आणि एम.फिल झाल्या होत्या आणि व्याख्यात्याची नोकरी करत होत्या. त्यांनी अनेक लेखही लिहिले आहेत. त्यातून भारतातील जातीसमस्यांबद्दलचा सर्वांगीण मार्क्सवादी दृष्टीकोन प्रतिबिंबित झालेला दिसतो.
२००० सालापर्यंत अनुराधा यांना तीव्र संधिवात जडला आणि सिस्टीमिक स्कलेरोसिस नावाच्या ऑटो इम्युन या आजाराचं निदान झालं. या दोन्हीचा त्यांच्या प्रकृतिवर विपरीत परिणाम झाला. पण त्याही स्थितीत त्यांचं काम चालू होतं. २००८मध्ये प्रकृती चांगली नसतानाही त्यांनी झारखंडच्या कार्यकर्त्यांकडून आलेलं एका कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं. त्यांना हा आजार जीवघेण्या फॅल्सिपॅरम मलेरियाच्या विषाणूमुळे झाला होता. पण त्यांना किेंवा तिथल्या महिला कार्यकर्त्यांना ते समजलं नाही. त्या मुंबईला परत आल्या, पण त्यांचं वेळेत निदान झालं नाही. परिणामी त्यांना फॅल्सिपॅरम मलेरियाचा अटॅक आला. त्या कोमात गेल्या. १३ एप्रिल २००८ रोजी पहाटे त्यांचं निधन झालं.
२००९मध्ये कोबाड गांधी यांनाही अटक झाली. त्या वेळेस त्यांचं वय होतं ६२ वर्षं. त्यांनाही वेगवेगळे आजार होते. त्यांनी तळागाळातील गोरगरिबांना मदत केली, हाच त्यांचा गुन्हा ठरला. माओवाद्यांचा मुख्य नेता म्हणून त्यांना शिक्षा झाली. पुढे त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे निघाले. परिणामी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. पण त्यामध्ये त्यांच्या आयुष्याची १० वर्षं तुरुंगात गेली. त्यातील पावणेसात वर्षं तिहारमध्ये, जवळजवळ एक वर्ष हैदराबादच्या तुरुंगात, एक महिना पतियाळाच्या तुरुंगात आणि सहा महिने विशाखापट्टणमच्या तुरुंगात. एकदा सुटका होऊन पुन्हा अटक झाल्यानंतर पावणे दोन वर्षं झारखंडमधील तुरुंगात आणि शेवटी दोन महिने सुरतच्या तुरुंगात व कस्टडीमध्ये काढली.
प्रत्येक तुरुंगामध्ये भेटलेले कैदी आणि त्यांच्याशी झालेल्या संवादातून\चर्चेतून मिळालेली माहिती या आत्मचरित्रात आहे. प्रत्येक तुरुंगामधील कैद्यांचं जीवन, तेथील शिस्त, कठीण परिस्थिती याचंही सविस्तर वर्णन आहे.
चार दशकांच्या कालावधीत कोबाड गांधी यांनी शोषितांच्या सेवेसाठी जे काही काम केलं, त्यापैकी कुठलंही बेकायदेशीर नव्हतं. पण त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला गेला आणि पोलिसांसमोर खोट्या कबुलीजबाबाच्या जोरावर देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्यावर खटले दाखल केले गेले. त्यांचं नाव हिंसक घटनांशी जोडलं गेलं. या सगळ्या खटल्यांतून पुढे त्यांची निर्दोष सुटका झाली.
तुरुंगवासात अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व संस्थांनी त्यांना मदत केली. शिवाय भाकप माजी जनरल सेकेटरी कॉ.ए.बी. बर्धन आणि विद्यमान सरचिटणीस कॉ.डी. राजा यांनी बरीच मदत केली. त्यामुळे त्यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली. तरी पण त्यांना १० वर्षं तुरुंगातच का राहावं लागवं? त्यांच्या मते, हा प्रश्न आहे राज्यकर्त्यांना आणि न्यायव्यवस्थेला विचारला पाहिजे. व्यवस्था आपल्याला हवी तशी वाकवून पोलीस आणि सरकार कोट्यवधी रुपयांची अफरातफरी करणार्या गुन्हेगाराला कायद्याच्या कचट्यातून सोडवतात आणि गरीब लोकांसाठी काम करणार्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र तुरुंगात डांबतात. कारण संपूर्ण कायदाव्यवस्था अजूनही ब्रिटिशांनी बनवलेली जुनी वासाहतिक व्यवस्था आहे. आजकाल राज्यातील व केंद्रातील सरकार आपल्या विरोधातील कोणत्याही स्वरूपाचा आवाज चिरडून टाकण्यासाठी या व्यवस्थेचा वापर करू लागली आहेत. त्यामुळे अशा घटना वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. राज्यकर्ता उच्चभ्रू वर्ग विरोधकांना ‘देशद्रोही’ मानू लागला आहे. म्हणजे आपण पूर्वीच्याच जागी आलो आहोत का? आपण पुन्हा एक प्रकारच्या वसाहतिक राजवटीखाली आहोत का? जिथे गोर्यांची जागा काळ्यासावळ्या लोकांनी घेतली आहे, असे विचार कोबाड गांधी यांच्या मनात येतात.
कच्चा कैदी म्हणून तुरुंगात ठेवण्यात आलं, तिथं त्यांना दररोज मानहानी सहन करावी लागत असे. तुरुंगात शिक्षा भोगणार्या गुन्हेगारांना काही जबाबदार्या दिल्या गेल्या होत्या आणि ते अधिक मुक्तपणे फिरत. कोबाड गांधी यांना मात्र कोणतेही अधिकार नव्हते. त्यांचं जीवन तिथल्या कर्मचार्यांवर अवलंबून होतं आणि ते त्यांच्या लहरीनुसार त्यांना हवं तसं वागवत.
तिहारमध्ये त्यांना भगभगीत दिव्यांच्या उजेडात झोपावं लागे. या दिव्यांची बटणं कोठडीच्या बाहेर असत. जर कधी बल्ब झाकण्याचा प्रयत्न केलाच, तर रात्री राऊंडवर येणारे वॉर्डन त्यांच्यावर आरडाओरड करत, शिक्षा होत असे. हा एक प्रकारचा छळच होता. अंधारामुळे मेकॅटोनिन हे संप्रेरक तयार होतं. त्यामुळे आपल्याला झोप लागते. प्रकाश असेल तर कोर्टिसोल हे संप्रेरक तयार होतं आणि आपण जागे राहतो. कोबाड गांधी तिहारमधल्या संपूर्ण वास्तव्यात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा असलेल्या कोठडीमध्ये होते. रात्रंदिवस त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाई- विश्रांती घेताना, खाताना, झोपलेलं असताना, व्यायाम करताना, वाचताना. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आज्ञापालन करावं लागे असे.
कोबाड गांधी यांना वाटायचं की, आता आपल्या संवेदना बधीर होणार की काय? ते आपलं मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी व शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी दररोज योगा व व्यायाम करत असत, लेखन व वाचन करत. त्यांनी लिहिलेले लेख प्रसारित होत. त्यामुळे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळे.
‘डून स्कूल’मधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला मोठा नक्षलवादी नेता’, अशी त्यांची प्रसारमाध्यमांनी प्रतिमा तयार केली होती. त्यांची जीवनकहाणी चित्रपटासाठी आदर्श वाटत होती. त्यांच्या जीवनावर तीन चित्रपटही काढण्यात आले. पहिला, प्रकाश झा यांचा ‘चक्रव्यूह’. यामध्ये ओम पुरीने कोबाड गांधी यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट चळवळीचं बरेचसं वास्तव चित्र उभं करणारा चित्रपट होता. दुसरा, मणीरत्नम यांचा ‘रावण’. यामध्ये अभिषेक बच्चनने कोबाड गांधी यांची भूमिका केली. आणि तिसरा, ‘रेड अलर्ट’. याचा फारसा गाजावाजा झाला नाही. यात भाजप नेता आणि अभिनेता विनोद खन्ना यांनी नक्षलवादी कार्यकर्त्याची भूमिका केली होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अखेरीस कोबाड गांधी यांना १६ ऑक्टोबर २०१९ रोजी जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांची मुक्तता झाली. अनेक राज्यांमधल्या अनेक खटल्यांसंदर्भात १० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर फक्त दिल्लीत एक खोटी ओळख वापरणं, या गुन्ह्यासाठी ते दोषी आढळले.
एक तपानंतर मुक्तता झाल्यानंतर त्यांना पुन्हा समाजात मिसळताना थोडं अवघड जात होतं. पत्नीचं निधन झालं होतं. जिथं परत जावं असं घर किंवा कुटुंब नव्हतं. इतक्या वर्षानंतर पुन्हा समाजात सुस्थापित होणं अवघड होतं. अगदी मोबाईल घेणं, आधार कार्ड मिळवणं, बँकेत खातं उघडणं, कायदेशीर ओळख आणि पत्ता मिळवणं, अशा छोट्या गोष्टीही त्यांना कठीण वाटत होत्या. या वयात उत्पन्नाचा स्त्रोत कोठून मिळवायचा, वैद्यकीय उपचाराचं काय? हा सर्व खर्च कसा चालवायचा? शिवाय न्यायालयात खटले चालूच होते. मात्र बाहेर मोकळा श्वास घेता येत होता, ही मोठी समाधानाची बाब होती.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद अनघा लेले यांनी अत्यंत सहज व सोप्या भाषेत केला आहे. इतका की, तो अनुवाद वाटत नाही.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ - कोबाड गांधी
अनुवाद - अनघा लेले
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment