मोठ्या व्यक्तींची उत्तम चरित्रं नेहमीच प्रेरणादायी ठरतात. त्या दृष्टीने चरित्र-आत्मचरित्र हा प्रकार गेल्या चाळीस वर्षांत खूप पुढे आलेला आणि सावकाशीनं लोकप्रियही होत गेलेला दिसतो. ज्येष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे ‘रोहिणी निरंजनी’ हे चरित्र तर खुद्द लेखिकेलाच प्रेरणादायी ठरले.
रोहिणीताईंचे व्यक्तिमत्त्व अक्षरश: झपाटून टाकणारे होते, तोच अनुभव या चरित्राच्या वाचनातून मिळतो, हा काही योगायोग नव्हे. लेखिकेचे अफाट परिश्रम त्यामागे आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “रोहिणीताईंना जाऊनही १२ वर्षे उलटली. त्यांचे स्वतःचे लेखनही भरपूर आहे. सगळे सहज मिळेल, असे वाटले खरे; पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सगळे गोळा करायला खूप परिश्रम घ्यावे लागले.”
लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी यांचे ‘निवडक मंगला गोडबोले’ हे विनोदी लेख-कथांचे संपादित पुस्तक प्रकाशित झालेले आहे. ‘कथायात्रा’ हे आणखी एक संपादित पुस्तक. याशिवाय त्यांनी ‘संपादित सानिया’ या पुस्तकाचेही रेखा इनामदार-साने यांच्यासह संपादन केले आहे. आणि आता ‘रोहिणी निरंजनी’ हे स्वतंत्र चरित्र लिहिले आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
काळ्या रंगावर रेखाटलेली रोहिणीताईंची नृत्यमुद्रेतील विविधरंगी रेखाकृती आणि लयदार शीर्षकातला मोजका सोनेरी रंगाचा वापर, असे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे देखणे मुखपृष्ठ आहे. आतील विपुल रेखाचित्रे आणि सजावटही त्यांचीच. शिवाय कृष्णधवल-रंगीत छायाचित्रे, सर्वांची एकत्रित मांडणी देखणी झाली आहे. त्या अर्थाने हे उत्तम निर्मितीमूल्य असलेले चरित्र म्हणावे लागेल. त्याचा आकार ‘युजर फ्रेंडली’ म्हणतात तसा, वाचक-मैत्रीपूर्ण फाँट छानच, स्वागतशील.
आपल्या आजोबांना आणि आईला हे पुस्तक अर्पण करताना त्यांचे संगीताशी असलेले नाते लेखिकेने अधोरेखित केले आहे. ‘नृत्यकाराचा आत्मा त्याच्या अणुरेणूतून अवघ्या शरीराला व्यापून राहिलेला असतो,’ अशा अर्थाचे खलील जिब्रानचे एक उदधृत त्यांनी अगदी सुरुवातीला रोहिणीताईंच्या सुंदर छायाचित्रासह वापरले आहे. हिंदी भाषेतील श्रेष्ठ कवी, कलासमीक्षक आणि भोपाळ येथील भारत भवन या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक व माजी संचालक डॉ. अशोक वाजपेयी यांचा प्रस्तावनापर हिंदी लेख रोहिणीताईंच्या नृत्याविषयी थोडक्यात सर्व काही बोलतो. त्यात शेवटी ते म्हणतात, “मला त्यांच्या खासगी जीवनाविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु या चरित्रातून त्यांची संघर्षकथा, नृत्यकथा, त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन सर्वच किती विस्तृत आणि प्रेरणादायी आहे हे लक्षात येईल. त्यांच्या आठवणी, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आणि प्रशिक्षण, त्यांचे विचार आणि एकूणच त्यांची जाण (नृत्याविषयी, जीवनाविषयी) ही कायमच आपल्याबरोबर राहील. आणि हीच त्यांची समृद्ध उत्तरजीवन कहाणी ठरेल.” ‘उत्तर जीवनी’ असेच या प्रस्तावनेला त्यांनी नाव दिले आहे. ही प्रस्तावना चरित्राची भाषेपलीकडील झेप सुचवते.
‘प्रेरणादायी प्रवास’ हे लेखिकेचे मनोगत. २००३-२००४मध्ये एक-दोन मुलाखतींच्या निमित्ताने लेखिकेला सहा-सात तास रोहिणीताईंबरोबर घालवायला मिळाले होते. त्यांच्याविषयी आकर्षण, आदरही होताच. अभ्यास करण्याची तयारी होती. ही गोष्ट चरित्र लिहिण्यासाठी होकार द्यायला पुरेशी ठरली. सादरीकरणाच्या कलांविषयी लिहिताना किती जागरूकता लागते, याची स्पष्ट जाणीव लेखिकेला होती. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर काही गोष्टी आपोआपच आपल्याकडे चालत येतात; अर्थात त्यासाठीची आपली पळापळ कमी होते असे नाही; परंतु तो ध्यास असल्याने अनपेक्षित काही गोष्टी मिळत जातात, हा अनुभवही आला.
रोहिणीताईंचे लेखन उदंड आहे. बहुतेक सर्व प्रकरणांच्या सुरुवातीला त्यांच्या लेखनातील उदधृते वापरली आहेत. सोबत त्यांच्या नृत्यमुद्रेचे एक सुंदर रेखाटनही आहे. त्यायोगे चरित्राला विचारसमृद्धी व देखणेपण प्राप्त झाले आहे. एकूण १५ प्रकरणे, उपसंहार, परिशिष्ट, जीवनपट, संदर्भसाहित्य यामुळे लेखन पूर्णत्वास पोहोचते.
‘उद्याची स्वप्न पाहणारे दादा…’ हे पहिले प्रकरण. “बुद्धिमान आणि अंतर्मुख माणसाला आपली ओळख मात्र थोडीशी अधिक असते व प्रत्येक जागृत क्षणी ती अंशाअंशाने वाढत असते, अशी माझी धारणा आहे,” अशा रोहिणीताईंच्या सुभाषितवजा वाक्याने त्याची सुरुवात होते. रोहिणीताईंनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केलेला एक छोटासा पण अत्यंत हृद्य प्रसंग समोर ठेवून चरित्राला सुरुवात होते; पाठोपाठ त्यांची पार्श्वभूमी समोर येते.
त्यांचे वडील गणेश भाटे स्वतः साहित्यप्रेमी समीक्षक, चिकित्सक रसिक होते. गायन- वादन- चित्रकला- बॅडमिंटन या सर्वांचे शिक्षण पत्नी आणि मुलींनीही घ्यावे यावर त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः विचाराने जातपात, धर्म, भाषा या पलीकडे गेलेले होते. परदेशात उच्च शिक्षण देऊन मुलांनाच नव्हे, मुलींनाही स्वयंसिद्ध करून मायदेशी परतल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना, लेकी-सुनांना सुशिक्षित करावे, हे त्यांचे स्वप्न त्यांच्या अकाली निधनाने स्वप्नच राहिले. परिस्थिती असहाय्य झाली. कुटुंबाचे पुढारलेपण, आई – लीलाताईंपर्यंत पोहोचलेले. वडिलांचे आधुनिक विचार, ते अमलात आणण्याचा त्यांचा कणखरपणा, रोहिणीताईंच्या वाटचालीतील मुख्य आधार ठरला. आईने केलेले संस्कार त्यांच्या वर्तनात धाडस आणि निग्रह पेरत गेले. शाळेच्या डब्यामध्ये उकडलेले अंडे देण्याचा प्रसंग, जे करू ते स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य आणि सच्चेपणा अंगी बाणवायला शिकवणारा ठरला. रोहिणीताईंना त्यांची कायम भरभक्कम साथ मिळाली. त्यातूनच त्यांना आपले जगावेगळे आयुष्य निष्ठेने घडवण्याचे सामर्थ्य मिळाले.
केरळ-तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश, ओरिसा यांच्या मधल्या महाराष्ट्रात, जिथे नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, तेथे सर्वांत प्रथम आपल्या स्वतंत्र शैलीसह रोहिणीताईंनी कथकनृत्य रुजवले, इतिहास घडवला. त्याचा हा शैलीदार प्रवास!
त्यांच्या चारही बहिणींचा यथोचित परिचय या चरित्रात थोडक्यात दिला आहे. सर्व जण अत्यंत बुद्धिमान, आपापल्या क्षेत्रात चांगली उंची गाठलेल्या! त्यांची ओळख इतरत्र कुठे मिळणार? जसे घडले त्या क्रमानेही चरित्र मांडता येतेच. पण बहुआयामी व्यक्तिमत्त्वांबाबत यातली प्रकरणांची विभागणी विविध स्तरावरील वाचकांसाठी विशेष उपयुक्त ठरावी.
लीलाबाई मुलींच्या शिक्षणाविषयी जागरूक होत्या. पैशाची सवड काढून सुट्टीमध्ये त्या मुलींना छंदवर्गांना पाठवत. त्यामध्ये आसने, सूर्यनमस्कार, लाठी-जांबिया यांचे प्रशिक्षणही असे. नुसते बायकी खेळ नव्हे, कलाप्रशिक्षण होते. क्रीडा आणि कला यासाठी लीलाताईंना आणि मुलींनाही रोहिणीताईंचे वडील पुढाकाराने पाठवत असत. मात्र नृत्याचे वर्ग नव्हते किंवा सुट्टीतल्या छंदवर्गात त्या काळी नृत्य अजिबात नव्हतेच. शास्त्र शाखेचे शिक्षण थोरल्या मुली घेतात म्हणून रोहिणीताईंनी तेच करावे, असे त्यांना वाटले नाही. त्याबाबतीत त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि ‘गाणं, नृत्य यासारख्या आवडत्या गोष्टींसाठी तुला ऊर्जा शिल्लक राहणार नाही, वेळही मिळणार नाही; तेव्हा तू आर्टस्कडे जा,’ असा सल्ला त्यांनी धाकट्या रोहिणीला दिला. त्यांची दूरदृष्टी पुढेही इतर प्रसंगांतूनही दिसते, निर्णय घेण्याचे धाडसही दिसते! ते गुण पुढे रोहिणीताईंनी आत्मसात केले.
पुढील दोन-तीन प्रकरणांमधून शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, मधुकणासारखे वेचलेले नृत्याशिक्षण, गुरू, त्यांची वैशिष्ट्ये, मिळालेले आणि पचवलेले ज्ञान... त्या छंदातूनच लग्न जमणे, एकीकडे अर्थार्जनासाठी वर्ग चालवणे, हा प्रवास उलगडतो. शिक्षणासाठीचे त्या त्या ठिकाणचे वातावरण, गावोगावी प्रवास आणि काळानुसार होणारे बदल डोकावतात. जन्मभर पुरेल असा हा ध्यास त्यांचा प्राणछंद! नृत्याच्या ध्यासातूनच जमलेल्या रोहिणीताईंच्या पहिल्या लग्नाविषयीची माहिती, निभावण्याचा प्रयत्न, याविषयी आपल्याला वाचायला मिळते. श्री. रंगविठ्ठल यांचा सुयोग्य परिचय होतो.
जुलै १९४७मध्ये रोहिणीताईंनी स्वतःचे नृत्यावर्ग सुरू केले. १९६०-६२पर्यंत सातत्याने स्वतःसाठी शिक्षणाचे मार्गही शोधत राहिल्या. ज्ञानदान हा त्यातलाच एक मार्ग म्हणून सापडला. विद्यार्थी घडवणे म्हणजे केवळ नृत्यशिक्षण नव्हे, तर जीवनशिक्षणच होत गेले. मार्ग खडतर होता. स्वतः निरनिराळ्या ठिकाणी गुरू शोधून शिक्षण घेणे, आपल्यातील प्रतिभेला आव्हान देत विद्यार्थिनींनाही योग्य वाट दाखवणे, यातून त्यांचा ध्यास दृढ होत गेला.
त्यानंतरच्या ‘प्रारंभ’मध्ये नृत्य शिक्षणाचा प्रारंभ, सर्वच बाबतीतील पहिले पाऊल... अध्यापनाची सुरुवात, साथीदारांचा - विशेषतः तबला साथीदारांचा शोध, पुढे जाऊन सर्व साथीदार, कार्यक्रमातील गायिका, हार्मोनियम - सतार - व्हायोलिन - सारंगीवादक, पढंत करणारे इत्यादी सर्व सहकाऱ्यांना नृत्याच्या साथीसाठी तयार करणे, याविषयीचे लेखन, स्वतःला शोधत असताना इतरांचीही प्रगती साधणाऱ्या रोहिणीताईंचे दर्शन घडवते. पहिला रंगमंचीय कार्यक्रम, पहिला परदेश दौरा, असे प्रारंभिक प्रसंग आणि प्रयोग यांची सविस्तर माहिती मिळते. नृत्यभारतीचा शुद्ध कथककडे प्रवास, तालाचे शिक्षण, अभ्यासक्रम तयार करणे, शिकवण्याच्या पद्धतीतील बारकावे, बदल, सुधारणा, गुरुपौर्णिमा साजरी करणे... त्यामागचे त्यांचे स्वतःचे विचार, या सर्वांचा परामर्श घेतला आहे. परदेश प्रवासात नेमका गुरुपौर्णिमेचा दिवस हुकला. त्या अस्वस्थ अवस्थेत मारवा रचताना ‘गुरू नाही, तर संगीतात सा नाही…’ असा नातेसंबंध लेखिकेने लावावा, हे सूचक ठरते!
सुरुवातीच्या काळातील रोहिणीताईंच्या शिष्या, तेव्हाचे प्रवास, कार्यक्रम, क्लासच्या शाखा, त्यातच दुसऱ्या लग्नाची, घरातली, कुटुंबातली आवश्यक तेवढी माहिती, कुठल्याही कलाकाराचे चरित्र किंवा आत्मचरित्र हे नेहमीच कलेच्या अंगाने जाणारे असते. त्यामुळे प्राधान्य हे नेहमी कलाजीवनालाच असते. रोहिणीताईंच्या बाबतीत तर सगळे जीवन नृत्याला वाहिलेलेच होते. शिवाय एक व्युत्पन्नमती, सृजनशील कलाकार, काव्यरचना, क्वचित संगीतरचना, नृत्याची कोरिओग्राफी, अशा रचनाकार, उत्तम परफॉर्मर... त्यांच्या शिकवण्याची पहिली पंचवीस वर्षे, हा सगळा धडपडीचा प्रवास आला आहे.
त्यात पुढील मार्ग स्वच्छ दिसू लागला. म्हटलं तर सगळाच प्रवास खडतर, प्रवाहाविरुद्ध, परंतु त्यातही हा काळ अधिक परीक्षा घेणारा, कठीण, शिकवण्याची पद्धत, वेगवेगळ्या पातळीवरील विद्यार्थिनी, त्यांना शिकवण्याच्या क्लृप्त्या, अभ्यासक्रमातील बदल, हे करता करता हळूहळू आयुष्यालाही वळण लागले, आकार आला, ध्येय दृढ झाले, आणि कलेला वाहून घेण्याचा, दर्जाही सतत वाढवत नेण्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. तो ‘जाणिजे यज्ञकर्म’ या प्रकरणामधून उलगडतो. घुंगरू, मुद्रा, तालीम, रियाज, अभिनय, तालातील वैविध्य, नेमकेपणा, बारकावे यांचे शिक्षण देणे कसे असायचे, ती सगळी जडणघडण स्पष्ट उलगडते.
‘अयि नर्तनशीले’ हे रोहिणीताईंच्या विशेष अशा नृत्यरचनांबद्दल सांगणारे प्रकरण! त्यांच्या नृत्याची सर्व वैशिष्ट्ये, पद्धती, विचार यामध्ये येतात. ‘माझ्या भाषेत, माझ्या माध्यमातून मला व्यक्त व्हायचंय,’ हा त्यांचा ध्यास होता. ‘नृत्यासाठी कशा प्रकारच्या काव्याची गरज असते, अंग-हस्तक्षेप, यापलीकडील भावदर्शन, अवकाश व्यापणे, रोहिणीताई स्वतः नाचत असलेल्या रचना, परंपरेशी जवळीक, नवतेशी नातं, तालवैविध्य, स्वर- लय- भावाची वीण, त्यांची खंडिता नायिका, पंचदेवतास्तुती, निको ही गाजलेली, तर वर्तमानगुप्ता ही मुक्त अभिनयाला वाव देणारी, मुग्धा... अशा रचना, इत्यादी अगदी बारकाईने उलगडते.
‘संरचनांचे नवोन्मेष’ या प्रकरणात त्यांच्या स्वरचित रचना आणि विशेषतः कोरिओग्राफ केलेल्या रचनांचा उहापोह केलेला आढळतो. त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यातील मोजक्याच इथे येतात. त्या विशेषच असल्याने छायाचित्र बघताना क्वचित आपणही त्या बघितल्या असल्याचे लक्षात येते.
कथक केवळ शृंगारिक आहे, या आक्षेपाला रोहिणीताईंनी खोडून काढले ते कसे, हेही लक्षात येते. एकीकडे प्राचीनतम अशा रचना, व्योम, तन्मात्र, ऋतुसंहार, तर दुसरीकडे काळाबरोबर जाणाऱ्या स्वरचित काव्यरचना - नृत्यरचना, त्यातील वाद्यांचा वापर, कठपुतली, उडानसारख्या नव्या कल्पना, नावे विषय, ते मांडण्यामागाचे विचार, पद्धती! त्यांच्यातील वैविध्य, त्यांचा समीक्षकांनी केलेला तत्कालीन उल्लेख, याबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे.
रोहिणीताईंनी स्वतः रचलेल्या रचनांबद्दल लिहिताना परंपरा, प्रवाह, घराणं याविषयीचा उलगडा करून त्यांच्या नृत्यरचना, त्यामागील विचार, इथपासून ते त्याची बांधणी, ताल-लय, पढंत, हस्त-क्षेप, पदलालित्य... संकल्पना ते त्याचे प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणापर्यंतचा प्रवास, मांडणीतील बारकावे, याबद्दल सविस्तर वाचायला मिळतेच, शिवाय त्या प्रक्रियेचा आपण एक भाग बनून जातो.
लेखनातील शब्दभांडार, समग्रलक्षी कलावती, संकेतनिष्ठ अभिरूची, अक्षुण्ण परंपरा, विभागांची लक्षवेधी शीर्षके, संस्कृतश्लोकांचा वापर रोहिणीईंच्या व्यक्तिमत्त्वाशी जवळीक साधतात, चरित्राच्या भाषिक सौंदर्यात भर घालतात. नृत्यासंदर्भातलेही क्वचित वापरले जाणारे शब्द… चपत, खडी तत्कार, जरबा मांडणे, हस्तक - भंगिमा, बामायना... आवर्जून वापरलेले आढळतात. मात्र रोहिणीताई भावंडांत सर्वांत धाकट्या... हा ‘धाकटा’ शब्द आजकाल विस्मरणात चालला आहे; तो चरित्रात येता, तर मजा आली असती.
‘रंगसज्जा’ या प्रकरणात रंगमंचावरील सजावट, उजवी बाजू, म्हणजे साथसंगत, त्याची मांडणी आणि नृत्याबरोबर साथ करण्यामधील वेगळेपण, साथीदारांची वैशिष्ट्ये, तालमांडणीतील स्वतंत्र विचार, प्रकाशयोजना, असे विविध विषय विस्तृतपणे आले आहेत. हर्षवर्धन पाठक यांची प्रकाशयोजनेविषयीची क्रिया-प्रतिक्रिया फार मोलाची ठरते.
‘अक्षरसमिधा’ या प्रकरणात शब्द हाच केंदस्थानी आला आहे. नृत्यासाठी काव्याची, शब्दांची निवड, त्यांची गरज, शब्दापलीकडची मांडणी, कार्यक्रमाचे निवेदन, रोहिणीताईंची लेखनाची सवय, सातत्य, निबंधलेखन, विचारांची स्पष्टता, सूत्रबद्ध बोलणे, हे विषय हाताळलेले दिसतात.
‘स्थिरद्युति ज्योती’ या प्रकरणात त्यांचे स्थिर-शांत ज्योतीप्रमाणे असलेले व्यक्तिमत्त्व, कामावराची दृढ श्रद्धा, तर ‘चैतन्यवेल’मध्ये कायम उत्साही, उत्सुक, कामसू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्त्व... त्यांचे समर्पित जीवन, ज्ञानाची आंस, कार्यमग्नता, याची ओळख होते. रोहिणीताईंचा व्यवस्थितपणा, नेमस्तपणा, शिस्त, त्यांचे दैनंदिन जीवन, संसार हा प्राधान्यक्रम नसूनही त्यामध्ये अपरिहार्यपणे कराव्या लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी निगुतीने करणे, व्यावहारिकतेकडे काहीसे दुर्लक्ष, इत्यादी गोष्टी फार सुरेख, मापात उतरल्या आहेत. अगदी शेवटच्या आजारपणातही दुसऱ्याचा त्रास वाचेल असे बघणे, नीटनेटके राहणे यावर त्यांचा कटाक्ष होता. आणि स्वभाव, गुणधर्म शेवटपर्यंत कसा त्यांना साथ देत गेला, क्वचित त्याचा त्रासही झाला, याची हृद्य नोंद घेतली गेली आहे.
‘शुभ्र निरामय’ या प्रकरणात मतभेदांपलीकडले एक विश्वासाचे दृढ नाते दिसते, तर ‘नवतामुपैति’मध्ये आता आणखी नवीन काय, असे वाटत असतानाच नृत्यभाती संस्था, तिची वाढ, वाढती - अनेकांचा आधारभूत ठरलेली चळवळ, कथकला दिलेली अभिजातता, आशयसंपन्नता, वैभव याबद्दल सखोल माहिती मिळते. ‘प्राणपक्षाचे उडून जाणे’ इथे एरवी चरित्र संपले असते. परंतु ‘पश्चात’ या उपसंहाराची गरज ते प्रत्यक्ष वाचल्यानंतरच लक्षात येईल. यानंतरच्या परिशिष्टाने चारित्राला आणखी पूर्णत्व येते. शेवटी नृत्याचा ध्यास घेतलेले, स्वतःचा आणि नृत्यकलेचाही सर्वांगीण विकास साधलेले चौफेर चौकस, ज्ञानी व्यक्तिमत्त्व ठाशीव मंदपणे मनामनात तेवत राहते.
अगदी पहिल्याच आतल्या पानावर एक गोष्ट खटकली ती म्हणजे साहित्यातील डॉक्टरेट असूनही वंदना बोकील कुलकर्णी या लेखिकेच्या नावात डॉक्टर ही उपाधी नाही आणि व्यवसायाने डॉक्टर, ज्याचा इथे काहीही संबंध नाही, अशा या संपादकांच्या नाव पुढे मात्र ‘डॉक्टर’ आवर्जून लावलेले दिसते! पाठोपाठ हिंदीतील प्रस्तावना. याचा मराठी अनुवाद चालला असता का? खरं म्हणजे होय. परंतु या चरित्राचा जो वाचकवर्ग असेल, तो याचा फार मोठा अडथळा वाटून घेईल, अशी शक्यता दिसत नाही. महाराष्ट्रात या चरित्राचा वाचकवर्ग हिंदी वाचू-समजू शकेल.
रोहिणीताईंचे वडील वारल्यानंतरची कुटुंबाची झालेली असहाय्य परिस्थिती लेखिकेने अगदी थोडक्या शब्दात परिणामकारकतेने समोर आणली आहे. नृत्याचे वर्ग पुण्यात सुरू झाले, त्या काळात या शिक्षणात येणाऱ्या अडचणी, प्रगती, शिकण्यासाठी घरातून मुलींना क्लासला घातले तरी कार्यक्रम करण्याला बंदी असणे, असे सर्व टप्पे उत्तम रीतीने प्रकटले आहेत. हे श्रेय निश्चितपणे लेखिकेचे आहे; त्याला आधार आहे, तो रोहिणीताईंच्या नोंदींचा!
१८८०मधील एकीकडे उदारमतवादी, तर दुसरीकडे संस्कृतीरक्षकांचे पुणे, लखनौच्या वास्तव्यात रोहिणीताईंनी अनुभवलेली सांगीतिक वातावरणातील श्रीमंती, भूलाबाई देसाई मेमोरियल ट्रस्ट- मुंबई, येथे क्लास चालू असताना चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य संबंधित त्या वेळचा तेथील माहोल, त्या त्या वेळचे वातावरण चोख उभे केल्याने त्या त्या वेळचा काळ स्पष्टपणे उभा राहतो. सांस्कृतिक श्रीमंतीही समजते.
रोहिणीताईंचा नृत्याशिक्षणाचा ध्यास, गुरूचा शोध, रियाज, त्यातील सातत्य, रोहिणीताई ज्या ज्या गावात, प्रदेशात शिक्षणासाठी गेल्या, ज्या महोत्सवात कार्यक्रम केले, त्या त्या ठिकाणची तेव्हाची सांस्कृतिक परिस्थिती, मंडपातला, व्यासपीठावरचा, मागचा माहोल, या सर्वाचे नेमके वर्णन परिणामकारक ठरते. पुण्यासारख्या ठिकाणच्या विद्यार्थिनी घडवत असताना मुलींनी गाठलेली उंची आणि पर्यायाने अपरिहार्यपणे होणारे मतभेद, याचा संयमाने आलेला उल्लेख लेखनाला परिपूर्णता देतो. रोहिणीताईंच्या नृत्यातील श्रीमंती, लेखनातील समृद्धी या चरित्रातही आली आहे.
नृत्याचे तंत्र, नृत्य रचना बसवणे, त्यातील टप्पे, त्यामागील विचार, बारकावे यासंबंधी लिहिणे प्रत्यक्ष सादर करणाऱ्यालाही, अनेक वर्ष शिकत असूनही सोपे नसते. आपले माध्यम लवचिक करणे, चौकटी रुंदावताना त्याच्या क्षमता विस्तारणे म्हणजे काय, याचा रोहिणीताईंच्या रचना या वस्तुपाठच असत. ते विषद करत असताना लेखिकेचा त्यामागील सखोल अभ्यास जाणवतो. त्यातील नेमकेपणाही वाखाणण्याजोगा आहे. आठवणींची तुकडेजोड उत्तम झाल्याने वाचनाचा ओघ छान टिकून राहतो. प्रकरणेही पूर्णतः सुटी सुटी न होता त्यांची संगती चरित्राला सलगता प्राप्त करून देते. परिशिष्टातली बारीकसारीक सविस्तर माहिती, रोहिणीताईंची एक विशेष मुलाखत चरित्राला पूर्णत्व देते.
चरित्र-आत्मचरित्र वाचत असताना व्यक्तीच्या दोषांचा, चुकांचा किंवा कठीण प्रसंगांचा नेमका कसा उल्लेख आला आहे, याकडे लक्ष देणारे काही लोक असतातच. त्यासंबंधी एखादा ठोस अनुभव किंवा उदाहरण कुणीतरी सांगणे फार महत्त्वाचे असते. मतभेद, तंटे, वाद याबद्दलही तशीच परिस्थिती असते. परंतु चरित्रामागचा उद्देश लक्षात घेतला की, त्याचा फार आग्रह राहत नाही. शिवाय एखाद्याचा दोष, काळी बाजू अशा काही गोष्टींबद्दल विशेषतः कलाकारांच्या संदर्भात कोणी विचारायला गेले तर, ‘झालं ते गेलं, कशाला उकरून काढता?’, हा प्रश्न ठरलेला असतो. शिवाय आजही अशा गोष्टींचा उल्लेख कुणाकडून झालाच, तर गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या त्या कलाकाराला त्या क्षेत्रात खड्यासारखे बाजूला ठेवले जाते. संगीत-नृत्यच काय, पण अभिनयाच्या क्षेत्रात तर हे अगदी सहजच नजरेस पडते. संख्याही मोठी आणि प्रसिद्धीही अधिक म्हणून!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
इथे कदाचित ज्याचा त्याचा आत्मसन्मान आणखी तीव्र असावा. चरित्रासारख्या प्रकारात तर सर्व सप्रमाण सिद्ध करावे लागते. ‘तुम्हाला म्हणून सांगते, पण हे कुठे बोलू नका हं...’ असे म्हणून कितीही गोष्टी सांगितल्या तरी त्यांची नोंद तुम्ही सहसा घेऊ शकत नाही. ‘त्यांचे आणि माझे नाते हे विशेष आहे’, असे जिथे अजूनही रोहिणीताईंच्या विद्यार्थिनींपैकी प्रत्येकीला वाटते, तिथे अशा प्रकारचे प्रमाण कोठून मिळणार? त्या अर्थाने चरित्र लिहिणे ही तारेवरची कसरत ठरते. त्यातूनही रोहिणीताईंच्या चरित्रातील अशा दोन-तीन गोष्टींच्या उल्लेखाने त्यांच्यावर नितांत श्रद्धा असणारी काही मंडळी नाराज होतीलही, परंतु ज्या गोष्टी उघड उघड सप्रमाण आहेत, त्या सत्य म्हणून, तर कधी चरित्रनायकाच्या समोरील अन्य व्यक्तीवर अन्याय नको म्हणून लिहिणे आवश्यक असते; त्या अर्थाने ही तारेवरची कसरत इथे तोलली गेली आहे, असेच म्हणावे लागेल. सर्वांनाच ते पटेल असे नाही, परंतु एक वस्तुस्थिती म्हणून त्याचे उल्लेख गरजेपुरते, पण स्पष्टपणे केलेले आढळतात.
नृत्यातील तंत्र मांडत असतानाही त्याची मांडणी वेधक, रोचक झाली आहे. ती रुक्ष आणि कंटाळवाणी होण्याची एरवी शक्यता असते. रोहिणीताईंच्या आयुष्यातील लोकांना प्रश्न पडावेत अशा बाबी, लग्न, संसार, शमा भाटे या नृत्यनिपुण स्नुषेशी असलेले मतभेद अशा कसल्याही शंका कलाकार म्हणून रोहिणीताईंबद्दल हे चरित्र वाचत असताना मनात उरत नाहीत, हे या चरित्राचे यश म्हणावे लागेल. नवनृत्यांगनांसाठी, अभ्यासकांसाठी हे चरित्र उपकारक ठरेल.
‘रोहिणी निरंजनी’ - वंदना बोकील कुलकर्णी
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - ३१०
मूल्य – ४०० रुपये.
.................................................................................................................................................................
स्वाती सुनिल
swatikarve@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment